करवंदी आणि पायमोडी

Submitted by योगेश आहिरराव on 11 November, 2019 - 01:36

करवंदी आणि पायमोडी

मृगगड जाऊन आल्यापासून या माणगाव खोऱ्यातील घाटवाटा खुणावत होत्या. पण जाणे काही होत नव्हते. यंदा जूनच्या पहिल्या पंधरवड्यात जितेंद्र खरे यांनी जोर लावल्यामुळे एकदाचा मुहूर्त मिळाला. रविवारी पहाटेच कल्याणहून मी जितेंद्र व अनिरुद्ध तिघेही निघालो, वाटेत बदलापुरात सुनीलला घेतले. माझ्या सोबत बहुतेक ट्रेकला हजेरी लावणारे राजेश सर पुण्याहून खोपोलीत आम्हाला जॉइन झाले. जांभुळपाड्याला कमानीपाशी हॉटेल विलास मध्ये थांबलो. हॉटेल मालक एकदम हसतमुख व्यक्तिमत्व आपुलकीने विचारपूस करणारे. पोटभर नाश्ता झाल्यावर गाडीला स्टार्टर मारून जांभूळपाड्यातून अंबा नदीच्या बाजूने माणगावकडे निघालो. गावात पोहचल्यावर सुरक्षित ठिकाणी गाडी लावली, आता इथून पुढचा प्रवास पायीच. नियोजन होते ते करवंदी नाळेतून चढाई व पायमोडी घाटाने उतराई. या बद्दल प्रिती सोबत चर्चा केली होती, खास करून करवंदीच्या नाळेची त्याचा फायदा झालाच. मृगगडाच्या अल्याड पल्याड साधारण उत्तर दक्षिण अनुक्रमे ‘फल्याण’ व ‘भेलीव’ ही गावं आहेत. यातील फल्याण करवंदीच्या नाळेसाठी तर भेलीव पायमोडी घाटासाठी सोयीचे. माणगावहून चालत पाऊण तासात फल्याणला आलो तेव्हा दहा वाजून गेलेले. फारशी वापरत नसलेली वाट त्यात वेळ आणि पुढचा पल्ला ध्यानात घेत किमान सुरुवातीला काही अंतर कुणीतरी सोबत घेणं गरजेचं होतं. समोरून दोघं तिघे येताना दिसले पेहराव पाहून लगेच लक्षात आले हे पुढच्या धनगर पाड्यातील असतील यांना तर या भागाची सर्व खडानखडा अचूक माहिती असणारच. त्यापैकी एकाला विचारलं हावभाव व बोलण्यावरून समजून चुकले की भाऊची गाडी गिअर मध्ये आहे. वाटा माहित होत्या आणि यायला सुध्दा तयार झाला. सोबत त्याची बायको होती, थोडं थांबा आलोच म्हणाला. तो आल्यावर निघालो तोच पाच एक मिनिटात त्याची बायको तावातावाने ओरडत आली त्याला चक्क हाथ धरून ओढून घेऊन गेली. नवऱ्याने बायकोच्या धाकात राहावं याच उत्तम उदाहरण असो... हा भारीच किस्सा घडला. खरंतर पावसाच्या सुरुवातीच्या काळात ही माणसं शेती त्या संदर्भात इतर काही कामाच्या पूर्वतयारी मध्ये व्यस्त असतात अशा वेळी योग्य सोबत मिळणं कठीण. पुढे जात एका वयस्कर मामांना विचारलं. कोण कुठले चौकशी झाल्यावर कपडे बदलून कमरेला कोयता अडकवून आमच्या सोबत निघाले. फल्याण गावाला तिन्ही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले आहे. उत्तरेला कोथळदारा, दक्षिणेकडे मृगगड तर पूर्वेस सह्याद्रीची मुख्य रांग. गावाबाहेर येत मुख्य रांगेच्या दिशेने जाणारी वाट धरली. 22_0.jpg
वळवाचे दोन तीन मोठे पाऊस झाल्याने माळरानावरील हिरवी छटा नजरेत भरली. जोडीला आकाशात काळ्या पांढऱ्या ढगांची गर्दी थोडाफार वाहता वारा एकदम अनुकूल असे वातावरण. सुरुवातीलाच करवंद भरपूर मिळाली जाता जाता तोंडात टाकत सोबत भरून घेतली. बहुदा यामुळेच वाटेला करवंदी नाव पडले असावे.
333_1.jpg
मृगगड उजव्या हाताला ठेवत साधारण अर्धा पाऊण तासाच्या चालीनंतर वाट ओढ्यात आली. या मुख्य ओढ्याचे पुढे जाऊन दोन भाग होतात. सरळ जाणारा करवंदी नाळेच्या बाजूने तर दुसरा डावीकडून घाटावरच्या आय एन एस शिवाजी कडून येणारा. तिथल्या लहान धरणामुळे या ओढ्याला भर उन्हाळ्यातही पाणी असते.
444_0.jpg
आताही ओढ्याला स्वच्छ आणि नितळ पाणी. फोटोग्राफी करत जवळपास अर्धा तास ब्रेक घेतला. खरंतर निघावे असे वाटत नव्हते पण पुढचा पल्ला मोठा असल्याने निघणं भाग होतं. ओढ्याला डावीकडे ठेवत वाट सरकू लागली. मृगगड बराच मागे जाऊन उजवीकडे मोराडी सुळक्याचा डोंगर. तसं पाहिलं तर मोराडी सुळका व मृगगड सह्याद्रीच्या मुख्य रांगेला काटकोनात जोडलेले आहेत. लहानसा चढ चढून याच ओढ्याला वरच्या भागात पार करत वाट गच्च रानात शिरली. गावातून निघाल्यापासून आतापर्यंत रमत गमत केलेली आडवी चाल, पण आता वाट अस्ते कदम चढू लागली. पुढे काही अंतर जात दोन वाटा, एक मळलेली वाट उजवीकडे तर दुसरी डावीकडे. मामांनी डावीकडची घेतली नाहीतर इथे हमखास गंडणार. गर्द झाडीतील वाट अर्ध्या तासात कातळकड्यापाशी घेऊन आली. हाच कडा मामा सुरुवातीला गावाबाहेर पडल्यावर दाखवत होते. बाजूला पाहिलं तर मोराडीचा सुळका आकाशात घुसलेला तर समोर सह्याद्रीची कातळ भिंत बुलंद आणि भलतीच उंच वाटत होती तिकडे पाहून माथ्या पर्यंतची चढाई अजुन तीनशे मीटर सहज शिल्लक असेल.
55_0.jpg
उंचीच्या हिशोबाने पाहिलं तर आता पर्यंत फक्त निम्मी चढाई आणि पंचवीस टक्के ट्रेक झालेला. वेळ आणि अंतर याच गणित जुळवू पाहता वेगावर लक्ष देणं गरजेचं. करवंदीच्या नाळेत करवंद भरपूर मिळाली तर पायमोडीने उतरताना पाय नको मोडायला असच काहीतरी वाटून गेलं.
कातळटप्पा पार करून वाट नाळेत शिरली पंधरा वीस मिनिटांची चढाई मग बाहेर येत आडवी मारत मोकळ्या कातळ टप्प्यात आलो. इथून माथ्यावरचा लायन्स पॉईंट अर्थात जवळ नव्हताच पण नजरेत आला. या लायन्स पॉईंटवर अनेक चित्रपटांचं शूटिंग झालं आहे व अजूनही होतच. वेलकम चित्रपटाच्या वेळी शेवटी जे घर दरीत कोसळत जाताना दाखवलं आहे ते याच पॉईंट वर. खालच्या जंगलातून घराचं भंगार गोळा करून गावातल्या दोघा तिघांनी चाळीस हजार रुपये मिळवले असं मामांनी सांगितले. मामानंसोबत नाश्ता केला, इथून पुढची वाट समजवून ते माघारी गेले. आता मामांच्या सांगण्यानुसार मुख्य दोन टप्पे शिल्लक होते. पहिला वाटेच्या अलीकडे लागणारी बबनची झोपडी तर दुसरा पाण्याची जागा.
मळलेल्या वाटेने तिरक्या रेषेत चढाई पुन्हा उजवीकडे वळून अरुंद किंचित दृष्टिभय असलेला ट्रेव्हर्स पार करत वाट रानात शिरली. एके ठिकाणी टी जंक्शन आम्ही उजवीकडे वळलो आडवी वाट पाच मिनिटांच्या अंतराने एका लहानशा खोपट्यात घेऊन आली. दोन गोणपाट, जुनी खुर्ची, मडके आणि दोन चार पातेली हीच ती बबनची झोपडी.
आजूबाजूला आवाज देऊन पाहिलं तर काही प्रतिसाद नाही. हा बबन एकटा या रानात राहतो. झाडावरची माडी काढून विकतो. आता पावसाला सुरुवात झाल्यावर खाली गावात जाऊन राहणार मग दिवाळी नंतर पुन्हा इथे. बबनच्या झोपडी पुढे जाणारी वाट धरली, काही अंतर जात लक्षात आले की वाट फिरून वर जात नाही उलट थोड खाली उतरत जंगलात जातेय. याच भागात काही माडाची उंच झाडे त्यावर वरती चढून माडी काढता येईल अशी केलेली सोय. हे सारं बबनच काम. माघारी फिरलो झोपडी सोडून पुन्हा टी जंक्शन वर आलो, येताना खालून येत उजवीकडे वळलो होतो आता विरुध्द दिशेने सरळ वर जाऊ लागलो. पंधरा वीस मिनिटे चाललो असू तोच समोरून दोघं जण आले. हाच बबन असणार हे आम्ही बरोबर ओळखलं. तो आणि त्याची बायको वरून खाली परतत होते. आमची विचारपूस करत आमच्या सोबत चार पावलं येत पुढची वाट समजवून सांगून माघारी फिरला. उजवीकडे कडा डावीकडे दरी तसेच वर जात वाट झाडीत शिरली. काही ठिकाणी मुरुमाचा घसारा पण बबनची येण्या जाण्याची वाट असल्यामुळे त्याने ठीक ठिकाणी छोट्या पावठ्या खोदून ठेवलेल्या. शेवटचा छातीवरचा चढ चढून वाट सपाटीवर आली आधी वाटलं आलो माथ्यावर, पाहिलं तर माथा अजुन अंदाजे शे दीडशे मीटर उंचीवर सहज असेल पण इथून पॉईंट वरची मंडळी त्यांचा आवाज रेलिंग सार काही स्पष्ट.
66.jpg
खाली दरीत सरळ रेषेत पाहिलं तर आम्ही सुरुवात केली ते फल्याण गाव, वाटेतला पाणवठा, उजवीकडे कोथळदरा, डावीकडे महाकाय मोराडीचा सुळका. बराच वेळ फोटो काढत वारा खात बसलो. कड्यावरून जाणारी वाट सरळ वरच्या कातळ टप्प्यात न जाता डावीकडे वळली. आता मुख्य कडा उजवीकडे ठेवत वाट पलीकडच्या बाजूला आली. या ठिकाणी मोठा ओढा दरीत उडी घेत होता.
77.jpg
ओढयामुळे लहानसा डोह तयार झालेला भर पावसात इथल दृश्य नक्कीच बघण्या सारखं असणार. मामांनी सांगितलेली हीच ती पाण्याची जागा म्हणजेच दुसरा टप्पा. घड्याळात पाहिलं तर दोन वाजत आले होते. एकमेकांकडे बघत काय ते समजून गेलो. जेवणासाठी या पेक्षा चांगली जागा कोणती ! तिथेच बैठक मांडली जेवण अर्थातच घरून आणलेले. भात भाजी पोळी ब्रेड अंडी एकदम खास म्हणावं असं अनिरुद्धने स्वतः बनवून आणलेलं चिकन. दोन घास जरा जास्तच गेले. त्यामुळे खरतर लगेच निघणं जीवावर आलं होतं. एके ठिकाणी वाटेला लागताना गंडायला झालं पुढे गेलेल्या सुनील आणि राजेश सरांनी अचूक वाट बरोब्बर शोधली. नुकत्याच झालेल्या सुरुवातीच्या पावसामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या आडव्या झालेल्या त्यामधून वाट काढत शेवटच्या टप्प्यात कारवीच्या रानात आलो. इथं वाटेवर भरपूर प्लॅस्टिकचा कचरा जोडीला दारूच्या बाटल्या. पॉईंट जवळ आल्याची अशी ही खूण.
88.jpg
बाहेर येताच समोर लायन्स पॉईंटचे रेलिंग. थोडं अलीकडे जात फोटो घेतले.
99_0.jpg
इथून वायव्येस आय एन एस शिवाजीचे तळ, दूरवर नागफणी कुरवंडेची बाजू.
101.jpg
डावीकडे मोराडीचा सुळका, छोटेखानी मृगगड.
पॉईंटवर गजबजलेल्या चौपाटी पेक्षाही भयंकर अवस्था. दोन पाऊस काय झाले नाही तर ही तोबा गर्दी. ‘बी एम डब्लू जीटी’, ‘फोर बाय फोर फोर्ड एन्डेवर’ सारख्या गाड्या पार खडकाळ भागात घालून रेलिंगला खेटून लावलेल्या, वर पॅराशूट लावलं की खाली थेट कोकणात तेवढंच फक्त बाकी. ‌बेशिस्त बेताल वर्तन, पैसा फेको तमाशा देखो, फोफावलेला चंगळवाद याच गटातील लोकांची गर्दी. गर्दीतून बाहेर येत लोणावळा सहारा रोडवर आलो. इथेही रस्त्यावर कुठेही कशाही गाड्या लावलेल्या जे चित्र पहिलं त्यावरून शिस्तीची अपेक्षा नव्हतीच. शनिवार रविवार पेठ शहापूर, आंबवणे, भांबर्डे, सालटर, तेलबैला या भागातले ग्रामस्थ लोणावळा गाठायचे असले तर काय करत असतील? लायन्स पॉईंट ते शिवलिंग पॉईंट हे अंतर तीन ते चार किमी असावे. ट्रॅफिक व उन्हामुळे डांबरी रस्त्याने जाण्याचा वेळ वाचवा म्हणून रिक्षावाल्याला विचारलं तर तो बहाद्दर अडीचशे रुपये मागू लागला. खरे साहेबाला म्हणालो, "चला पायी, काहीही वाटेल ते मागतात". पायीच निघालो, भरघाव वेगाने जाणारी वाहन त्यामुळे रस्त्याच्या कडेने लक्ष देत जात होतो. काही अंतरावर डावीकडे आतवण गावठाणकडे जाणारा कच्चा रस्ता, पूर्वापार याच आतवन ते कोकणात माणगाव खोऱ्यातील गावांना जोडणाऱ्या या दोन्ही घाटवाटा. याच रस्त्याला पुढे एका वळणावर डाव्या बाजूला लोहगड विसापूर जोडगोळी व्यवस्थित दिसते. पाऊण तासात शिवलिंग पॉईंटवर दाखल झालो. लायन्स पॉईंटच्या तुलनेत इथे कमी गर्दी. एके ठिकाणी स्टॉलवर चहा घेतला. स्थानिक स्टॉलवाल्याकडूनच पुढची पायमोडी घाटाची वाट कन्फर्म करुन घेतली. या पॉईंटहून मोराडीचा सुळका शिवलिंगा सारखा दिसतो म्हणून हा शिवलिंग पॉईंट. सरळ जात खालच्या मैदानात उतरलो तिथून उजवीकडे वळल्यावर आणखी खालच्या टप्प्यात आलो उतरण घेत वाट कड्यावर आली. इथून खाली पाहिलं तर भेलीव गाव सरळ रेषेत, जवळच या वाटांचा पाहरेकरी मृगगड, त्यालगत भला मोठा मोराडीचा सुळका, दक्षिणेला सव घाटाची रांग, आग्नेयेला मोरगिरी, तर दुरवर नैर्ऋत्येस सालटरची डोंगररांग. वातावरण स्वच्छ असल्याने खूप दूर पर्यंतचा प्रदेश नजरेत आला. यावेळी खरंच कॅमेरा न घेऊन मोठी चूक केली. जसे मिळतील तसे मोबाईलने घेतले फोटो. निवडुंग आणि तुरळक खुरट्या झुडुपांच्या बाजूने वाट खाली उतरू लागली. सुरुवातीला कड्यावर कोरलेल्या जुन्या पावठ्या तिथून थोड पुढे सरकतो तोच डाव्या हाताला मोठी नैसर्गिक गुहा तिच्या बाजूला कातळावर काही ठिकाणी शेंदूर फासलेला. त्यापुढे दहा मिनिटांची झाडी भरली चाल बाहेर पडताच लहानशा घळी समोर घेऊन आली.
102.jpg
उजवीकडे कडा ठेवत मोठ मोठे बोल्डर असलेल्या घळीतून उतराई. सुरुवातीच्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी माती ढासळून लूज बोल्डर त्यामुळे सावकाश उतरण तरीही पायावर ताण जाणवत होताच. हे संपताच थोडं आडव थोडी उतरण अशी टप्पा टप्प्यात चाल. या वाटेवर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे या भागात आपली उतराई दक्षिणोत्तर अशी तर मुख्य रांगेला जोडला गेलेला मोराडीचा सुळका समोर कायम दिसत राहतो. उजवीकडे मुख्य कातळभिंत ठेवत वाट ओढ्याजवळ बाहेर आली. डावीकडे कड्याला बिलगून पायवाट गेलेली, त्याच वाटेला दहा पावलांवर कातळात खोदलेले पाण्याचं टाकं.
103.jpg
अशी टाकी, कोरीव पावठ्या, क्वचित कुठे शेंदूर फासलेला देव या वाटा पुरातन असल्याची ग्वाही देतात. टाक्यात पाण्याची पातळी बरीच खाली गेलेली राजेश सरांनी दोन पायावर अजय देवगण सारखी कसरत करत पाणी बाटलीत भरून घेतलेच. सर्वांनी गार गार पाणी प्यायल्यावर त्यांच्या लक्षात आलं, "अरे टाक्यात तळाशी कुठल्यातरी प्राण्याची विष्ठा पडली आहे". ते ऐकून सगळेच स्तब्ध झालो. असो...
मोठा ब्रेक घेऊन, मुख्य वाटेला लागत खालच्या ओढा पार करीत वाट उजवीकडे वळली. आता होती ती मोराडीच्या सुळक्याच्या खालच्या भागातून चाल. अध्ये मध्ये अस्पष्ट होत पुढे एकच मळलेली वाट त्यात या वाटेवर काही ठिकाणी गोळ्या बिस्किटांचा कागदाचा कचरा होताच.
पदरातील ही चाल रानातून असली तरी खाली दमट हवेत पार घामटा निघाला. सकाळपासुन पाऊस यावा असे वाटत होते पण पावसाने नाहीच तर घामाने न्हाऊण निघालो. टप्प्या टप्प्याची उतराई मोकळवनात घेऊन आली. मागे वळून पाहिलं तर आम्ही आलो ती पायमोडी घाटाची वाट.
104.jpg
मध्यभागी तिरक्या रेषेत झाडांची हिरवी रेघ दिसतेय तोच पायमोडी घाट. इथून सरळ वाट गावाच्या दिशेने जात होती, पुढे असलेल्या राजेश आणि सुनील यांनी मृगगडाच्या पायथ्याशी असणारी आडवी वाट धरली. थोडक्यात किल्ल्याचा वाटेने गावाच्या वेशीवर आलो तेव्हा कातरवेळ झाली होती. आकाशात गुलाबी रंगाच्या छटा त्यावर काळ्या ढगांची गर्दी अधूनमधून होणारा विजेचा लखलखाट. दोन चार वृध्द शांतपणे ते चित्र पाहत तर दोघं तिघे तरुण मोबाईल मध्ये माना घालून. आम्हीही शांतपणे दिवसभराचे क्षण पुन्हा आठवत बराच वेळ बसून राहिलो. भेलीव ते माणगाव रात्रीच्या शांततेत आजूबाजूला अनेक काजवे पाहत पायी चालण्यात वेगळीच मजा. नऊ वाजता माणगाव मध्ये परतलो ते मृगगडाची प्रदक्षिणा पूर्ण सफल करूनच.

अधिक फोटोसाठी हे पहा : https://ahireyogesh.blogspot.com/2019/06/karvandi-paaymodi.html

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लायन पॉइंटवरून खाली दिसणारे सुळके पाहताना एकदा लक्षात आलं की त्यावर एकजण उभा आहे आणि हात हालवतो आहे. मग आम्हीही हात हलवले.
इकडे एकदा जावंसं वाटतं आहे.

मी गेलो तर लायन पॉईंटवरून खाली येईन. वरती गेल्यास सवातीनची लोणावळाची बस चुकली की बोंबला.{ आंबिव्यालीच्या} प्राइवेट गाड्यांना लिफ्ट मागणे मूर्खपणा आहे.

मी गेलो तर लायन पॉईंटवरून खाली येईन. वरती गेल्यास सवातीनची लोणावळाची बस चुकली की बोंबला >>> काका हरकत नाही. बहुतेक लोक हा ट्रेक असा एका बाजुने उतरुनच करतात कारण या भागात सार्वजनिक वाहतुक फारशी सोयीची नाही. म्हणुन लोणावळा बाजुने सकाळी लवकर जाऊन घाट उतरणे बरे पडते.

फल्याण माझं गाव आहे मलाही इथे डोंगरांमध्ये भटकायला आवडते... आणि मी या घाटवाटा, मृगगड आणि मोराडी च्या सुळक्यावर मित्रांसोबत फिरत असतो.
तुमचा हा लेख वाचून खूप छान वाटलं. धन्यवाद!

धन्यवाद.. स्वप्ना _ राज rmd व संदीप.
मी या घाटवाटा, मृगगड आणि मोराडी च्या सुळक्यावर मित्रांसोबत फिरत असतो. >>> वाह छान !