गेले वर्षभर पेंच अभयारण्यातल्या वाघांचे फोटो सोशल मिडियावर रोज कोण ना कोण पोस्ट करतच होते. ते बघून मे महिन्यात पेंच वारी करायचीच हा निश्चय झाला होता. फेब्रुवारीमध्येच सफारी आणि हॉटेल बुकिंग करुन ठेवलं. लगेचच मुंबई-नागपूर-मुंबई प्रवासाचंही बुकिंग केलं.
पेंच राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेशातल्या सिवनी आणि छिंदवाडा जिल्ह्यात विभागलं गेलं आहे. पेंच नदी ह्या जंगलातुन उत्तर-दक्षिण वाहते. ह्या नदीमुळेच ह्या जंगलाला पेंच नाव पडलं. ही पेंच नदी ह्या जंगलाला पूर्व आणि पश्चिम अशा जवळपास दोन समभागात विभागते. १९७५ साली ह्या जंगलाला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला पण १९६५ सालीच हे जंगल अभयारण्य म्हणून घोषित झालं होतं. १९९२ साली हे उद्यान १९वे व्याघ्र अभयारण्य म्हणुन घोषित केलं गेलं. ह्या जंगलाची दक्षिण सीमा महाराष्ट्राला लागून आहे. ह्या जंगलात सफारीसाठी मध्य प्रदेशातुन ५ तर महाराष्ट्रातुन ६ गेट्स आहेत.
ह्या जंगलाचं मुख्य आकर्षण अर्थातच वाघ. पण वाघाशिवाय चितळ, सांबर, नीलगाय, रानडुक्कर, अस्वल, लांडगा, कोल्हा, जंगली कुत्रे, चौसिंगा, भेकर हे ही प्राणी आढळतात. ह्या जंगलात विपुल प्रमाणात पक्षी आढळतात. जंगल सफारीचा कार्यक्रम असा होता, शुक्रवारी संध्याकाळी रिसॉर्टवर पोचायचं, शनिवारी सकाळ-संध्याकाळ आणि रविवारी सकाळ-संध्याकाळ अशा ४ सफारी करायच्या. ४ ही सफारी खुरसापार आणी टौरिया गेट वरच्या आधीच बुक करुन ठेवल्या होत्या. हे अशासाठी की गाइड्सकडून कोणत्या गेटला साइटींग चांगल होतंय हे कळल्यावर ऐनवेळेस बुकिंग मिळणं अशक्य असतं. अशा वेळेस दोन्ही गेट्सवरचं सफारी बुकिंग अगोदरच केलं असेल तर उपयोगी पडतं. नागपूरहून शुक्रवारी रात्री रिसॉर्टवर पोचायला ११ वाजले. गेल्यागेल्या मॅनेजरकडून कोणत्या गेटवर साइटिंग चांगलं होतंय ह्याची माहिती घेतली. त्याप्रमाणे खुरसापार गेट ला शनिवार सकाळ - संध्याकाळ सफारी करायची हे ठरवूनच झोपलो.
शनिवारी सकाळी ५ वाजता उठून तयार झालो. जिप्सी रिसॉर्टवर आलीच होती. जिप्सीने रिसॉर्ट ते गेट पोचायला अर्धा तास लागणार होता. पावणे सहाला गेटवर पोचलो. मी गाइड आणि सफारी बुकिंग कन्फर्म करुन गेट उघडायची वाट बघत जिप्सीमध्ये बसून राहिलो. ठीक ६ वाजता जिप्सीज नंबरप्रमाणे जंगलात सोडायला सुरुवात झाली. आमची १२व्या नंबरची जिप्सी सव्वा सहाच्या सुमारास जंगलात शिरली. १०-१२ किमी आत गेल्यावर पुढच्या सगळ्या जिप्सीज थांबलेल्या दिसल्या. थोड्याच अंतरावर 'बिंदू' गवतात बसली होती.
( वनविभाग त्या त्या अभयारण्यातल्या वाघांना T-1, T-2, T-3 असे क्रमवार नंबर देतात तर गाइडस आपल्या आवडीची नावं देतात. खुरसापार गेटच्या जंगलात बिंदू, बारस ह्या वाघिणी दिसतात, ही त्यांची टेरिटरी. ) बिंदू आमच्याकडे पाठ करुन बसली होती. कॅमेरा सज्ज ठेवून जिप्सींच्या ताफ्याकडे कधी बघतेय ह्यावर नजर ठेवून होतो. एवढ्यात 'बिंदू' उठली आणि सरळ पुढे चालायला लागली. सगळा जिप्सींचा ताफा तिच्या मागे ठराविक अंतर राखून होता. एका वळणावर 'बिंदू' रस्ता सोडून जंगलात घुसल्यावर जिप्सी थोडी पुढे घेउन काही 'हेड ऑन' फोटो काढले.
'बिंदू' जंगलात दिसेनाशी झाल्यावर गाइड म्हणाला की पुढे असलेल्या वॉटरहोल ला आपल्याला 'बारस' दिसण्याचे चान्सेस आहेत. सगळ्याच जंगलात काही नैसर्गिक पाणवठे असतात तर काही ठिकाणी वन विभाग क्रुत्रिम पाणवठे तयार करतं. स्थानिक गाइडस ह्या पाणवठ्यांना वॉटरहोल्स म्हणुन संबोधतात. वॉटरहोल जवळ पोचलो तर आधीच ६-७ जिप्सीज थांबलेल्या होत्या. गाइडला म्हटलं की आता इथेच थांबून 'बारस' ची वाट बघत बसू. एव्हाना सकाळचे साडे सात वाजले होते. सकाळच्या सफारीची वेळ सकाळी ६ ते ०९:३० अशी असते. साडे नऊ पर्यंत गेटवर पोचणं अपेक्षित असतं. वॉटरहोलच्या स्पॉटपासून गेटला पोचायला २० मिनिटं लागणार होती. ह्या हिशोबाने जवळपास पावणे दोन तास हातात होते. अर्धा तास काहीच मुव्हमेंट दिसेना त्यामुळे इतर जिप्सीही निघुन गेल्या. आता आमचीच जिप्सी तिथे उभी होती. अचानक झाडाआडून 'बारस' उगवली. आजूबाजूचा कानोसा घेत सरळ पाण्यात जाउन बसली.
सहसा जंगलात वाघाची मुव्हमेंट होउ लागली की कॉल सुरु होतात. कॉल म्हणजे वाघाची मुव्हमेंट सुरु झाली की भेकर, सांबर, लंगुर वगैरे प्राणी एक विशिष्ट आवाज काढून इतर प्राण्यांना सावध करतात. 'बारस'च्या अशा अवचित उगवण्याच्या वेळेस असं काहीच कॉलिंग झालं नव्हतं आणि अचानकच ती झाडाआडून अवतीर्ण झाली होती. म्हणजेच ती वॉटरहोलपासून जवळच कुठे तरी बसून होती आणि थोडी शांतता होण्याची वाट बघत होती. अर्थात जंगलात अशी सरप्राइजेस मिळतातच. आपल्याकडे सफारीला लोकांचा कलकलाट एवढा असतो की आपण जंगलात आलो आहोत आणि आपल्या आवाजाने जंगलातले प्राणी विचलित होतील असा विचार कधीही करत नसतो. १५-२० मिनिटे पाण्यात बसून झाल्यावर 'बारस' पाण्यातुन बाहेर येउन सावलीत बसली. फोटो मनसोक्त मिळत होते. ९ वाजत आले होते. गाइडला म्हटलं की १० मिनिटात निघुया परत.
एवढ्यात जिप्सीच्या मागच्या बाजुच्या जंगलातुन मोराच्या ओरडण्याचा आवाज आला. जंगलात मोर, इतर पक्ष्यांचे आवाज तसेही येत असतातच. सहज मागे वळून बघितलं तर एक भेकर ( Barking Deer ) वॉटरहोलच्या दिशेने जाताना दिसलं. 'बारस' ने ही भेकर बघितलं होतंच. ह्या वॉटरहोलची जागा किंचित उंचावर होती. 'बारस' जिथे बसून भेकराला न्याहाळत होती ती जागा थोडी सखल होती. 'बारस' ला भेकर अगदी व्यवस्थित दिसत होतं पण भेकराचं मात्र 'बारस'कडे अजिबात लक्षं नव्हतं. तसंही वाघ जंगलात बसून असेल तर पटकन नजरेस पडत नाही. शिवाय जंगलातल्या गवताच्या रंगाशी तो इतका बेमालूमपणे मिसळून जातो की त्याला शोधायला सराइत नजर लागते. भेकराने वॉटरहोल ला पोचून सावधपणे आजूबाजूला बघितलं पण काहीच धोका दिसला नाही. आता भेकराने नि:शंकपणे पाणी प्यायला सुरुवात केली.
तशी 'बारस'ने stalking position घेउन १-२ मिनिटे भेकराचा अंदाज घेतला. अचानक उसळी घेउन 'बारस' भेकराच्या दिशेन झेपावली. भेकर पाणी पीत होतं तरी सावध होतंच. भेकराने २-३ उड्या मारत वेगाने पळण्याचा प्रयत्न केला. पण 'बारस'ने घेतलेल्या वेगापुढे भेकराचा वेग खुपच कमी पडला. 'बारस'ने ३-४ उड्यांमध्येच भेकराला गाठले आणि त्याची मान जबड्यात धरली. वाघाच्या जबड्यात मान धरली गेल्यावर केवळ ४-५ सेकंदात भेकराचा जीव गेला. 'बारस'ने तसंच भेकराला जबड्यात धरुन वॉटरहोल पर्यंत खेचत आणलं. भेकराला तिथेच टाकून 'बारस' थोडा वेळ दम खात तिथेच बसून राहिली. काहीतरी अॅक्शन होणार ह्या अपेक्षेने ड्रायव्हरने जिप्सी चालूच ठेवली होती, लगेचच जिप्सी मागे घेउन 'बारस'ने केलेल्या शिकारीचे फोटो काढले. पेंचच्या ह्या ट्रीपला माझ्यासोबत शीतल तळेकर होती, तिची टायगर सफारीला जायची ही पहिलीच वेळ. भेकर वॉटरहोल ला चाललंय हे दिसल्याक्षणी तिल म्हटलं होतं की कही तरी निश्चित घडेल, फोटो मी देइन तुला पण तु व्हिडिओ शूट कर. हा सल्ला मानून शीतलने 'बारस'ने केलेल्या शिकारीचा व्हिडिओ मात्र झकास शूट केला.
https://www.youtube.com/watch?v=ONwzVeYRZtE&feature=youtu.be
गाइडने सांगितलं की ०९:२५ झालेत, आता कॅमेरे सांभाळा, गेटवर पोचायला हवं वेळेत. गेटवर पोचेस्तोवर पावणे दहा झाले होते.
पहिल्याच सफारीला अशी जबरदस्त बोहनी झाल्यावर पेंच ट्रीप अपेक्षेहूनही यशस्वी झाली होती. कधी कधी ५-६ सफारी करुनही वाघाचं नख द्रूष्टीस पडत नाही तर कधी ध्यानीमनी नसताना वाघ डोळ्यासमोर शिकार करताना दिसतो. अशा वेळेस नशीब जोरावर असणं म्हणजे काय याचा प्रत्यय येतो.
टीप - हा लेख मिसळपाव ह्या संस्थळाच्या दिवाळी २०१९ अंकात प्रकाशित झाला आहे. ह्या लेखात अजुन काही फोटो मी टाकलेले आहेत.
खरोखरच जोरदार नशीब म्हणायचं.
खरोखरच जोरदार नशीब म्हणायचं.
हे इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
हर्पेन +१
हर्पेन +१
छान आलेत फोटो आणि व्हिडिओही.
कातिल फोटोज !!!
कातिल फोटोज !!!
वाघोबा काय आले आहेत एकदम
>>आपल्याकडे सफारीला लोकांचा
>>आपल्याकडे सफारीला लोकांचा कलकलाट एवढा असतो की आपण जंगलात आलो आहोत आणि आपल्या आवाजाने जंगलातले प्राणी होतील असा विचार कधीही करत नसतो.
अगदी अगदी. रणथंबोरला हे अनुभवून झालंय. छान फोटो. व्हिडिओ पहायची मात्र हिंमत झाली नाही.
भारीच आहेत सगळे फोटो.
भारीच आहेत सगळे फोटो.
सगळे फोटो पाहील्यावर मी मात्र विचार करत होतो की हरणाच्या फोटोत दिसणारा पक्षी इंडीयन रोलर असेल का?
सगळे फोटोज भारीच.
फोटोज भारीच आहेत.
वाघ तर अगदी रुबाबदार.
वा मस्तच आशु शीतल, भारीच
वा मस्तच आशु
शीतल, भारीच
वा अप्रतीम
वा अप्रतीम
फारच थरारक. मस्त लेख तोषा
फारच थरारक. मस्त लेख तोषा आणि थंडूचा व्हिडिओदखील भारी.
सुंदर फोटो!
सुंदर फोटो!
भारीच. मस्त फोटो मिळाले की.
भारीच. मस्त फोटो मिळाले की.
बारसचा वर बघताना फोटो तर लय भारी आलाय. फोटोतूनही संमोहीत करू शकताहेत ते डोळे.
भारी फोटोज !
भारी फोटोज !
वा! सगळे फोटो मस्त आलेत.
वा! सगळे फोटो मस्त आलेत.
यात नक्की "थरार" काय आहे ?
यात नक्की "थरार" काय आहे ?
बंदिस्त जीपमधे बसून वाघाचे फोटो काढणे, याला 'थरार' म्हणतात का ?
जबरदस्त फोटो आहेत.. मस्त
जबरदस्त फोटो आहेत.. मस्त आशुदा..
@ सुमित...बंदिस्त नसतात जिप्स
@ सुमित...बंदिस्त नसतात जिप्स. ओपनच असतात.
आणि थरार कळायचा तर प्रत्यक्ष अनुभवावा लागतो तरच कळतो. सो जंगल सफारी करा, अनुभवा
सॉल्लिड बॉस...
सॉल्लिड बॉस...
तसेही वाघ न दिसून सांगतो कोणाला?? :)... तू जंगलात गेलास की वाघ स्वतःच येत असणार भेटायला.
खूप मस्त फोटो.
खूप मस्त फोटो.
लई भारी फोटो!!!
लई भारी फोटो!!!
जबरदस्त नशीब आहे. मस्त फोटोज
जबरदस्त नशीब आहे. मस्त फोटोज.
सफारीचं बुकिंग कसं केलंत ते ही सांगून ठेवा.
काय देखणे फोटो!
काय देखणे फोटो!
>>हरणाच्या फोटोत दिसणारा पक्षी इंडीयन रोलर असेल का?
हो इंडीयन रोलरच वाटतोय.
धन्यवाद लोक्स लेख आणि फोटो
धन्यवाद लोक्स लेख आणि फोटो आवडल्याबद्दल.
सफारीचं बुकिंग कसं केलंत ते ही सांगून ठेवा<<<<<आडो, ही घे लिन्क.
http://www.mahaecotourism.gov.in/Site/Common/OnlineBooking1.aspx
हरणाच्या फोटोत दिसणारा पक्षी इंडीयन रोलर असेल का?<<<<< इन्डियन रोलरच आहे.
@सुमित,
लेखातला थरार हा वाघाने आमच्या समोर केलेली शिकार हा आहे. केवळ जिप्सीमध्ये बसून वाघाचे फोटो काढणे एवढाच जंगल सफारीचा उद्देश नसतो. प्रत्येक जंगलाचं आपलं वैशिष्ट्य असतं, ते जंगल अनुभवणं ही ही एक कला आहे. प्रत्यक्ष जंगलात गेल्याशिवाय ते कळणार नाही.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जंगल सफारी आणि झू सफारी यात जमीन आसमानाचा फरक आहे.जंगलात शिरल्यावर लगेचच वाघ काही समोर येत नाही.वाघाची मुव्हमेंट आणि आपल्या जिप्सीची मुव्हमेंट जुळणं महत्वाचं. त्यासाठी गाईड अनुभवी असणं फार गरजेचं असतं.
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक फोटोसाठी लागणारी मेहनत, पेशन्स. नॅशनल जिओ किंवा अॅनिमल प्लॅनेट वगैरे चॅनेल्स वर दाखवल्या जाणार्या अर्ध्या तासाच्या डॉक्युमेंटरीजना कमीत कमी २-३ वर्ष लागतात.
असे मोकळे वाघ अंगावर येत
असे मोकळे वाघ अंगावर येत नाहीत का? जरी तुम्ही अंतर राखून असलात तरी. (सिरिअसली विचारतेय)
एक विडिओ पाहिला होता कुठला होता आठवत नाही पण त्यात वाघ कि सिंह मागे लागला होता जीपच्या.