सरांनी सांगितलेली गोष्ट
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(बालकथा - वयोगट - मोठा )
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आज शाळेचा पहिला दिवस होता. उन्हाळ्याची सुट्टी संपली होती. आकाशात ढगांची गडगड होती आणि वर्गात मुलांची गडबड !
क्रीडांगणाच्या एका बाजूला प्राथमिक आणि दुसऱ्या बाजूला हायस्कूल .
सर यायला वेळ होता. नवीन वर्ग असूनही हर्ष बिनधास्त होता. अफाटच पोरगा होता तो ! त्याने फळ्याजवळचा खडू उचलला. त्याने फळ्यावर एक चित्र काढलं -
सुरवार - झब्बा घातलेला एक माणूस. तो घसरलाय आणि त्याच्या डोक्यावरची गांधी टोपी उडाली आहे. आणि त्यामुळे त्याचं टक्कल दिसतंय ,असं गंमतीशीर चित्र त्याने काढलं होतं.
ते चित्र चव्हाण सरांचं होतं. ते प्राथमिकचे पर्यवेक्षक होते.
आठवीचे वर्गशिक्षक विश्वनाथ सर वर्गात आले.दणकट बांध्याचे , बारीक केस कापलेले .
त्यांच्या पहिलवानी शरीराकडे पाहून मुलं 'आता पुढे काय होणार ?' याचा विचार करू लागली. हर्षकडे पाहू लागली. तो गप्प झाला.
सरांनी शांतपणे डस्टर उचललं व फळ्यावरचं चित्र पुसलं. मग ते म्हणाले, " मुलांनो, मी तुम्हाला इतिहास शिकवणार आहे . त्याआधी, आपण शिवाजीमहाराजांचं चित्र काढू या. कोण काढेल ? कोणाची चित्रकला चांगली आहे ? "
मुलं ओरडली - "हर्ष !"
मुलांना मजा वाटली. चित्र काढणारा मुलगा अलगद सरांच्या जाळ्यात अडकला होता..... सर भारी होते !
" हर्ष, पुढे ये. फळ्यावर शिवाजीमहाराजांचं चित्र काढ ," सर म्हणाले .
हर्ष वरमला.
"अरे, घाबरू नकोस. खरंच काढ ."
त्याने एक घोड्यावर बसलेल्या शिवाजीमहाराजांचं छान चित्र काढलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. तेव्हा, सरांनी हर्षकडे पाहिलं. ते हसले. त्यांना काही आठवलं. ते म्हणाले," मी एक गोष्ट सांगतो."
मुलं येsss करुन ओरडली. पहिल्याच दिवशी गोष्ट ऐकायला मिळणार म्हणून !
सर सांगू लागले.-
" ही गोष्ट खूप जुनी आहे. जवळजवळ १९५० सालातली.कोकणातली.
कोकणात दापोली नावाचं शहर आहे. त्या जवळच्या एका खेड्यात एक साधा पण हुशार मुलगा राहायचा. त्याला शिकण्याची खूप गोडी. पण घरची अतिशय गरिबी. त्यावेळचं वातावरण , कष्ट व गरिबी असलेल्या आयुष्याचा तुम्ही आज विचारही करू शकणार नाही.
अंगभर कपडे नाहीत. खाली फक्त एक लंगोटी. दप्तर नाही. एका फडक्यात वह्या-पुस्तकं बांधायची. शाळा दहा मैल दूर. शाळेत चालत जायचं. कधी कोणी बरोबर असायचं नसायचं . बरं, रस्ता ? तोही धड नाही. खाच-खळगे, दगड -धोंडे, ओढे-नाले आणि साप-विंचू ! ... सकाळी खायचं आणि शाळेला सुटायचं. घरी आलं की अभ्यास. पटपट अभ्यास उरकायचा. अंधार पडायच्या आत- कारण लाईट नाही आणि दिव्यात वात असली तरी तेल नसायचं. पोटं रिकामी असली तरी रात्री जेवण नसायचं !...."
सर सांगत होते. मुलं डोळे विस्फारून ऐकत होती.
"एकदा काय झालं ? शाळा सुटली. रस्त्यावर गारुड्याचा खेळ चालू होता. तो एका देखण्या नागाला टोपलीबाहेर काढून त्याच्याशी सहजपणे खेळत होता. मुलं आश्चर्याने पहात होती. घाबरून नव्हे, कारण कोकणातल्या मुलांना सापाचं काय कौतुक ? त्यांच्या इथं साप पैशाला पासरी . त्यांना गारुड्याचं कुतूहल वाटत होतं. तो विषारी नागाशी लीलया खेळत होता. डोलत होता. पुंगी वाजवत होता, डमरू वाजवत होता.
- आणि जमलेली गर्दी पैसे देत होती !
त्या मुलाला फक्त पैसे गोळा करणारा तो गारुडी दिसत होता.
खेळ संपला तसा मुलगा निघाला. त्याच्या डोक्यात आता जणू विचारांची पुंगी वाजत होती. तो त्या धुनेवर जणू डोलत पुढे सरकत होता.
झाडांच्या शेंडयावरून संध्याकाळ खाली उतरत होती. त्याला झपाझप पाय उचलायचे होते. पण ? - त्याच्या वाटेवर एके ठिकाणी सागाची झाडं होती. त्यापलीकडे वारूळ होतं. त्याच्या आसपास त्याने एक चमकदार नाग दोन-तीन वेळा पहिला होता... काय असावं त्याच्या डोक्यात ? ...
- त्याला तो नाग धरायचा होता. जिवंत, तुकतुकीत, विजेसारखा सळसळणारा !
आणि त्याला तो गावला. तडफदार फण्याचं रुबाबदार जनावर !डोक्यावर काळसर दहाचा आकडा असलेलं .
मुलाने विचार न करता त्याच्यावर झेप घेतली. ते जनावर कसलं चपळ ! ते झटक्यात पुढे गेलं. पण हवाच कोंदटलेली होती. अस्वथ करणारी. त्या नागालाही कसनुसं होत असावं.तो पुढे गेला आणि मागे वळून फणा काढून उभा राहिला.
आता मात्र मुलगा घाबरला. आता प्राणाशी गाठ होती ! आजूबाजूला कोणी नव्हतं.मुलाने धडपडत त्याची पुस्तकं उचलली व तो पळत सुटला. जीव खाऊन , वेडावाकडा -लांब ! धापा टाकतच तो घरी पोचला.
आई त्याच्याकडे पहात राहिली. " काय रे ? काय झालं ? "
मग त्याने आईला सगळं सांगितलं. त्याला तो नाग धरायचा होता. गारुड्यासारखा खेळ करण्यासाठी ! पैसे मिळवण्यासाठी, गरिबी दूर करण्यासाठी.
आई कडाडली ," मी अजून काम करीन. उपाशी राहीन. पण असल्या थेराच्या मागे लागू नकोस. शिक अन मोठा हो."
मुलगा शरमला.
पुढे तो शिकला. खूप शिकला. शिक्षक झाला. मग मुख्याध्यापक ! पण तो त्याची परिस्थिती व आईची शिकवण विसरला नाही.
गरिबीमुळे कोणाच्या शिक्षणाला अडथळा येऊ नये, याची त्याला तळमळ होती. तो विद्यार्थ्यांना नेहमी मदत करायचा. जमेल ती, वाट्टेल ती !
त्याच्या शाळेत एक मुलगा होता. त्याला गरिबीमुळे एकदा फी भरणं शक्य नव्हतं. तेव्हा त्या मुख्याध्यापकांनी ते पैसे स्वतः भरले. त्यावेळी त्यांनी स्वतःची कहाणी त्या विद्यार्थ्याला सांगितली.
मग त्यांचा तो विद्यार्थी पुढे शिकतच गेला. पण तो मुख्याध्यापकांची शिकवण विसरला नाही. नेहमीच त्याने शिक्षणाला महत्व दिलं. आपण शाळेत शिकण्यासाठी येतो, हे तो कधीच विसरला नाही.....
आता तुम्ही मला सांगा. उद्यापासून तुम्ही दंगा करणार का अभ्यास ?"
इतक्या वेळ गोष्ट ऐकणाऱ्या मुलांच्या माना खाली गेल्या. वर्गात चिडीचूप शांतता पसरली. एखादा हळू आवाज-' अभ्यास ! '
सर पुढे बोलू लागले , " साप पकडायचा प्रयत्न करणारा तो गरीब मुलगा, जो पुढे मुख्याध्यापक झाला, तो म्हणजे या हर्षचे आजोबा !......"
मुलं आश्चर्यचकित . हर्ष त्यांच्या दुप्पट !
" आणि त्यांचा तो लाडका विद्यार्थी विशू- म्हणजे मी !...."
पूर्ण वर्ग अवाक होऊन सरांकडे पहात राहिला.
"हर्ष, संध्याकाळी नुसतं खेळण्यापेक्षा, मोबाईलमध्ये डोकं घालून बसण्यापेक्षा आजोबांच्या जवळ बस. त्यांच्या तोंडून हे सारं ऐक . त्यांच्याकडे गोष्टींचा ,ज्ञानाचा , अनुभवांचा खजिना आहे."...
सरांचं बोलणं ऐकून हर्षला लाजल्यासारखं झालं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं . पण जवळ येऊन सरांनी जेव्हा स्वतः त्याची पाठ थोपटली , त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं, तेव्हा त्याचे डोळे काहीतरी चांगलं करण्याच्या उर्मीने चमकले.
बाहेर- तास संपल्याची घंटा वाजली.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बिपीन सांगळे
वाह! खूपच छान गोष्ट आहे.
वाह! खूपच छान गोष्ट आहे.
छान आहे कथा! आवडली..
छान आहे कथा! आवडली..
अजकाल शिक्षक अश्या प्रकारे
अजकाल शिक्षक अश्या प्रकारे मुल्यशिक्षण देण्याच्या फंदात जास्त पडत नाहीत हे दुर्दैवच आहे! & that academic is turning man in robots...
फारच भारी
फारच भारी
अप्रतिम
अप्रतिम
तुम्ही इतकं सुरेख लिहीता ना
तुम्ही इतकं सुरेख लिहीता ना की बस्स !
खूप सुंदर लिहिले आहे. मला
खूप सुंदर लिहिले आहे. मला त्या मुलाची गोष्ट वाचून डॉ. पांडुरंग खानखोजे यांची आठवण झाली.
आवडली कथा, छान आहे
आवडली कथा, छान आहे
अगदी अप्रतिम कथा!
अगदी अप्रतिम कथा!
सर्व वाचकांचे मी मनापासून
सर्व वाचकांचे मी मनापासून आभार मानतो
व विनंती करतो की हे मुलांपर्यंत पोचवावे .
तुम्ही इतकं सुरेख लिहीता ना
तुम्ही इतकं सुरेख लिहीता ना की बस्स !
Submitted by रश्मी.. on 16 October, 2019 - 03:56
विशेष प्रतिक्रियेबद्दल विशेष आभार
खूप सुंदर लिहिले आहे. मला
खूप सुंदर लिहिले आहे. मला त्या मुलाची गोष्ट वाचून डॉ. पांडुरंग खानखोजे यांची आठवण झाली.
Submitted by सोमा वाटाणे on 16 October, 2019 - 04:28
बरं वाटलं वाचून सोमाजी .
आभार
व विनंती करतो की हे
व विनंती करतो की हे मुलांपर्यंत पोचवावे. >> त्याआधी जमल्यास मुले विचारू शकतील अशा एका प्रामाणिक पण स्पेक्युलेटिव प्रश्नाचे ऊत्तर द्याल का?
हर्षने चित्र काढले
म्हणून सरांनी गोष्ट सांगितली
त्यानुषंगाने "उद्यापासून तुम्ही दंगा करणार का अभ्यास ?" असे विचारले
म्हणून मुलांच्या माना खाली गेल्या
"हर्ष, संध्याकाळी नुसतं खेळण्यापेक्षा, मोबाईलमध्ये डोकं घालून बसण्यापेक्षा आजोबांच्या जवळ बस. त्यांच्या तोंडून हे सारं ऐक . त्यांच्याकडे गोष्टींचा ,ज्ञानाचा , अनुभवांचा खजिना आहे."... >> आणि ह्याचा पुन्हा हर्षचे चित्र काढण्याशी
अशा सगळ्या गोष्टींचा एकमेकांशी कसा संबंध आहे?
प्रश्न ऊद्दाम वा आगाऊ वाटल्यास प्लीज ईग्नोर मारा.
हाब आहे की हो संबंध.
हाब आहे की हो संबंध.
हर्ष व्रात्य आहे व त्यानेच चित्र काढले हे अप्रत्यक्षपणे, सिद्ध झाले. म्हणुन सरांना सांगायचे आहे की तुझ्या आजोबांजवळ बस. खूप मोठी लेगसी आहे तुझ्याकडे. त्यांच्याबद्दल जाणून घे.
सकाळपासून साईटला काही अडचण
सकाळपासून साईटला काही अडचण होती . प्रतिसाद देऊ शकलो नाही .
सामो आभारी आहे
सामो
आभारी आहे
वाचक मंडळी ,
वाचक मंडळी ,
वर हायझेनबर्ग यांचा एक प्रतिसाद आहे .
कृपया तो पहावा .
आपण याच्याशी सहमत / असहमत असाल .
आपण ठरवा व तशा प्रतिक्रिया द्याव्यात ही नम्र विनंती.
हर्ष ने चित्र काढले म्हणून तो
हर्ष ने चित्र काढले म्हणून तो व्रात्य आहे
म्हणून सरांनी त्याला एक गरिबीची कथा ऐकवली.
सरांच्या गरिबीची कथा ऐकून काही अनाकलनीय कारणाने मुलांच्या माना खाली जातात.
आजोबा गरिबीतून वर आले म्हणून हर्षने खेळणे बंद करून आजोबांचे गरिबी=संस्कार असे पुराण ऐकायचे.
हर्षने एक साधे चित्र काढले म्हणून तो व्रात्य आहे आणि तो आयुष्यात पुढे वाया जाऊ शकतो म्हणून हर्षने गरिबीचा संस्कारी डोस रोज थोडा थोडा घ्यावा असे प्रिस्क्रिप्शन ईतिहासाचे सर गोष्टीतून देतात... हं कळाली आता... धन्यवाद सामो.
हर्ष ने चित्र काढले म्हणून तो
हर्ष ने चित्र काढले म्हणून तो व्रात्य आहे ...................... होय कारण - सरांच्या फजितीचे
म्हणून सरांनी त्याला एक गरिबीची कथा ऐकवली. ................ (होय कारण अभ्यास सोडून तो हे व्रात्य धंदे करत होता व शिक्षकांनी संस्कार केलेच पाहीजेत)
अनाकलनीय कारणाने मुलांच्या माना खाली............... काही जण गरीबीतुन वर येतात व आपण सगळं सुखासुखी असूनही व्रात्यपणा करतो - याचा पश्चात्ताप
आजोबा गरिबीतून वर आले म्हणून हर्षने खेळणे बंद करून आजोबांचे गरिबी=संस्कार असे पुराण ऐकायचे. ............. नाही हो हाब. आजोबा कर्तुत्ववान आहेत म्हणुन मोबाईलवर पडीक रहायचं सोडून हर्षने काही शिकावे असा आशावाद.
हर्षने एक साधे चित्र काढले म्हणून तो व्रात्य आहे ................... नाही. सरांच्या फजितीचे व्यंगचित्र रेखाटले म्हणुन तो व्रात्य आहे.
आणि तो आयुष्यात पुढे वाया जाऊ शकतो ................................ तशी शक्यता आहे म्हणा किंवा सरांना मिळालेली उपदेशाची एक संधी मिळाली म्हणा
म्हणून हर्षने गरिबीचा संस्कारी डोस रोज थोडा थोडा घ्यावा .................. नाही हाब. गरीबीतून वर येण्यासाठी जे परिश्रम घेतले त्या कर्तुत्वाचे धडे, हर्षला सहजसुलभ आहेत कारण त्याचे आजोबाच तसे आहेत.
__________________________
एक अर्थपूर्ण चित्र साकारण्याकरता 'कनेक्टिंग डॉट्स' करणे वाचकावरती सोडलेले आहे.
छान कथा!
छान कथा!
>>हर्षने एक साधे चित्र काढले म्हणून तो व्रात्य आहे आणि तो आयुष्यात पुढे वाया जाऊ शकतो म्हणून हर्षने गरिबीचा संस्कारी डोस रोज थोडा थोडा घ्यावा असे प्रिस्क्रिप्शन ईतिहासाचे सर गोष्टीतून देतात..>>
मला तरी असे वाटले नाही. हर्ष मधे कलागुण आहेत आणि वयानुरुप व्रात्यपणाही आहे. याचा अर्थ तो पुढे वाया जावू शकेल का ? तर नाही. पण हर्षकडे जे चांगले आहे त्याची त्याला जाणीव करुन देणे हे चांगल्या शिक्षकांचे कर्तव्य. हर्षला शिवाजी महाराजांचे चित्र काढायला सांगणे , आणि त्याच्याच आजोबांची गोष्ट सांगणे हे त्याचाच एक भाग.
स्वाती,
स्वाती,
आठवीतल्या मुलाला त्याने काही व्रात्यपणा (सरांचे चित्र काढणे म्हणजे व्रात्यपणा का... तुम्ही आम्हीही काढली असतील) केला म्हणून त्याच्या आजोबांच्या गरीबीची गोष्ट सांगण्यात काय लॉजिक आहे? हर्ष गरिबाघरचा असता आणि तरी त्याने चित्र काढले असते मग काय गोष्ट सांगितली असती सरांनी?
ह्यापेक्षा मुकुंद जोशीबरोबर बेंद्रीण जास्त लॉजिकल वागते की.. तीही नववीतलीच मुले असतात. बाई-सरांच्या जोड्या लावणे, टक्ल्या मास्तरला प्रेमचोप्रा ओरडणे, मुलीला लाईन देता का विचारणे वगैरे खराखुरा व्रात्यपणा ती करतात.. जोशी आणि सुर्या दोघांचे वडील तेव्हा लॉजिकल वागतात असले संस्कारी ग्यान देत बसत नाहीत. आणि तो तर ७५ चा वगैरे काळ.
चित्र बित्र काढण्यापेक्षा नाग बिग पकडणे मोठा व्रात्यपणा म्हणेन मी तर. (आम्हीही त्या काय सापाच्या कवड्या शोधायचो, त्या विकून खंडीभर पैसे मिळतात असे आम्हाला वाटायचे ते आठवले)
व्रात्यपणा करणे आणि दोन पिढ्या आधी गरिबी असणे काय संबंध आहे दोहोत. हर्शच्या व्रात्यपणाने गरिबी पुन्हा येणार नाही का?
हर्षचे आजोबा व्रात्य नव्हते म्हणून गरिबीतून मुख्याध्यापक होऊ शकले का? हर्ष व्रात्य आहे म्हणून तो आजोबांसारखा कर्तबगार होऊ शकणार नाही का?
त्या वयात खराखुरा व्रात्यपणा तुम्ही आम्ही सगळ्यांनी सदोदित केला म्हणून तेव्हाच्या मोठ्यांनी आपल्याला ऊठताबसता त्यांच्या गरिबीतून वर येण्याच्या गोष्टी सांगितल्या? काय लॉजिक कळत नाही बुवा. जाऊ दे.. माबुदोस.
कोणी आजच्या मोबाईलच्या जमानातल्या पिढीला असले सो-कॉल्ड मूल्यशिक्षण देऊन पहावे.. मुले दोन मिनिटात वैतागून ऊठून जातील नाहीतर पुढच्या वेळी अशा प्रिची मास्तरांची मिमिक्री करून अजून व्रात्यपणा करतील.
>>>> कोणी आजच्या मोबाईलच्या
>>>> कोणी आजच्या मोबाईलच्या जमानातल्या पिढीला असले सो-कॉल्ड मूल्यशिक्षण देऊन पहावे.. मुले दोन मिनिटात वैतागून ऊठून जातील नाहीतर पुढच्या वेळी अशा प्रिची मास्तरांची मिमिक्री करून अजून व्रात्यपणा करतील.>>>> हे बाकी खरे आहे उलटा परीणाम होइल.
>>>>>>> आम्हीही त्या काय सापाच्या कवड्या शोधायचो, त्या विकून खंडीभर पैसे मिळतात असे आम्हाला वाटायचे Proud ते आठवले>>>> हाब, सापाच्या कवड्या म्हणजे? कात?
Rattlesnake tail.
Rattlesnake tail.
ओह धन्यवाद!!
ओह धन्यवाद!!
हाब , त्या वयात सगळेच करतात ,
हाब , त्या वयात सगळेच करतात , म्हणूनच वयानुरुप म्हटले आहे. त्याला व्रात्यपणा म्हणायचे का? तर मला तरी तेव्हा शाळेत 'व्रात्य' म्हणायचे, आणि बरेचदा वर्गाचा कोपरा वाट्याला यायचा.
इथे दंगा करणार्या मुलांना शिक्षणाच्या संधीचे महत्व शिक्षक गोष्टीरुपाने समजावतात. मला गोष्ट गरीबीची नाही वाटली तर 'मी कष्ट करेन पण तू शिक आणि मोठा हो ' असं सांगणार्या आईची आणि शिकून मोठे झाल्यावर तिच शिक्षणाची संधी गरीब मुलांना देणार्या एका चांगल्या व्यक्तीची वाटली.
हर्ष गरीबा घरचा असता तर काय? याचे उत्तर माझ्याकडे नाही. या कथेत हर्षचे आजोबा आणि हर्षचे शिक्षक यांच्यामधे दुवा आहे. कदाचित त्यामुळेच ते हर्षच्या निमित्ताने वर्गात गोष्ट सांगतात.
त्यातल्या 'आजोबां कडून सारं ऐक' याचा अर्थ मी आजोबांच्या सहवासात वेळ घालव, त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप काही आहे असा लावला.
शेवटी ही एक बालकथा आहे.
हाब , त्या वयात सगळेच करतात ,
.चुकून दोन प्रतिसाद.
हाब नवोदित लेखकांच्या मुद्दाम
हाब नवोदित लेखकांच्या मुद्दाम मागं लागत आहेत का? तुमचे प्रतिसाद खवचट वाटू लागले आहेत. कृपा करून पहिल्या सारखं छान लिहा.
छान आहे गोष्ट.
छान आहे गोष्ट.
हर्षने चित्र काढले
हर्षने चित्र काढले
म्हणून सरांनी गोष्ट सांगितली
त्यानुषंगाने "उद्यापासून तुम्ही दंगा करणार का अभ्यास ?" असे विचारले
म्हणून मुलांच्या माना खाली गेल्या
"हर्ष, संध्याकाळी नुसतं खेळण्यापेक्षा, मोबाईलमध्ये डोकं घालून बसण्यापेक्षा आजोबांच्या जवळ बस. त्यांच्या तोंडून हे सारं ऐक . त्यांच्याकडे गोष्टींचा ,ज्ञानाचा , अनुभवांचा खजिना आहे."... >> आणि ह्याचा पुन्हा हर्षचे चित्र काढण्याशी
अशा सगळ्या गोष्टींचा एकमेकांशी कसा संबंध आहे? >>>>
हाब,
खर्या आयुष्यातही अशा तार्किकतेच्या कसोटीवर न उतरणार्या गोष्टी घडताना कधीच दिसल्या नाहीत का तुला? आणि तसे पाहता ह्याचा एकमेकांशी अजीबातच, काहीही संबंध नाही असे तुला का वाटतेय?
खरोखरच असे कोणी मुलाने तुला हा प्रश्न विचारला तर तू त्याला आणि त्याआधी तुला पटेल असे काय उत्तर देशील हे वाचायला आवडेल मला.
कित्येकदा असं होतंच न की मुलं केवळ लहान असतात म्हणून खूप जास्त वेळ प्रतिवाद करत नाहीत. गप्प बसतात पण म्हणून त्यांना पटलेलं असतंच असं नाही. अनेक नॉन सेन्सिकल गोष्टींबाबत माझी मुले मला प्रश्न विचारतात त्यावेळी त्यांना उत्तर देताना मला नक्की मदत होईल त्याची.
बिपिन सांगळे - प्रश्न तुमच्या कथेबाबत उपस्थित केला गेलाय. तुम्हाला उद्देशून विचारला गेलाय असं असताना स्वतः त्याचे उत्तर द्यायचे सोडून
वाचक मंडळी ,
वर हायझेनबर्ग यांचा एक प्रतिसाद आहे .
कृपया तो पहावा .
आपण याच्याशी सहमत / असहमत असाल .
आपण ठरवा व तशा प्रतिक्रिया द्याव्यात ही नम्र विनंती.
असे लिहिणे हे जबाबदारी झटकल्यासारखे वाटत आहे.
गंमतीशीर चित्र काढू नयेत.
गंमतीशीर चित्र काढू नयेत. चांगलं दाखवणारी, चांगल्या माणसांचीच चित्रं काढावीत.
संध्याकाळी नुसतं खेळूही नये.
आजोबांचं ऐकत बसावं.
दंगा अजिबात करू नये. (दंगा म्हणजे काय?)
Pages