राजमाची कोकण दरवाजा
१ मे कामगार दिन सुट्टीचा दिवस. या सुट्टीचा सह्याद्रीत सदुपयोग करण्याच्या हेतूने मी आणि जितेंद्र खरे सकाळी आठ वाजता कोंडाणे वस्तीत दाखल झालो. सवयी प्रमाणे विचारपूस करून एका घरा समोर झाडाच्या सावलीत बुलेट लावली, हेल्मेट त्या घरातल्या मावशीकडे ठेवत पाणी पिऊन निघालो. आजचे नियोजन किल्ले राजमाची.
या आधी अनेक वेळा तिन्ही ऋतूत खास करून पावसाळ्यात दरवर्षी वारी प्रमाणे जायचो. रात्रीची पॅसेंजर पकडून पहाटे लोणावळाहून तंगडतोड करून राजमाची दुसऱ्या दिवशी उतराई करत कोंडाणे लेणी पाहून कर्जत मार्गे परत अशी दर वर्षी ठरलेली वारी. भर पावसात राजमाची पाहिला नसलेला ट्रेकर सापडणं मुश्किलच. पण हल्लीची पिकनिक छाप गर्दी पाहता पावसाळ्यात विकेंडला मुळीच जाऊ नये. हिवाळा हा तर खासच पण ऐन उन्हाळ्यात ही चांगलाच अनुभव देणारा असा हा ट्रेक. वर उल्लेख केल्याप्रमाणे लोणावळाहून येणारी वाट सोडली तर कोकणात कोंदिवडे, खरवंडी, कोंडाणे, मुंढेवाडी या भागातून तीन प्रचलित वाटांनी राजमाची गाठता येते. खरवंडीहून येणारी वाट, कोंडाणे लेणीची सर्रास वापरातली वाट व तिसरी कोकण दरवाजाची वाट. कोकण दरवाजा सोडली तर या भागातल्या बाकीच्या वाटा झाल्या होत्या. यासाठी लेणीच्या वाटेने म्हणजेच खिडकीच्या वाटेनं चढाई आणि कोकण दरवाजाने उतराई.
हल्ली कोंडाणे लेणीसाठी बऱ्याच पिकनिक, ट्रेकर, पर्यटक व अभ्यासू मंडळींची कायम ये जा असते. मोठ्या अश्या मळलेल्या वाटेने पहिलं टेपाड चढून वळसा घेत अर्ध्या तासात लेणी समोर आलो.
पुरातत्व विभागाने लावलेला बोर्ड व प्रशस्त पायऱ्या. समोर जाताच नजरेत भरणारे मोठे चैत्यगृह लक्षवेधी कमान लाकडी फासळ्या आतील स्तूप. काळाच्या ओघात बरीच पडझड झाली असली तरी हा दोन अडीच हजार वर्षापूर्वीचा ठेवा बऱ्यापैकी तग धरून आहे. आता लेणीमध्ये चांगलीच स्वच्छता, नाहीतर इथल्या धबधब्यात पावसाळी पिकनिक छाप गर्दीच्या वेळी होणारा कचरा या बद्दल सांगायला नको.
लेणींच्या वरच्या दालनात जाऊन बसलो, चारही बाजूंना नजर फिरवली वर कड्यात भलं मोठं मधमाश्यांचे पोळं. तसेही दोघेच होतो फार मोठी जत्रा आरडाओरडा करणारं इतर कुणी नाही. त्यामुळे आमचा माश्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली. डावीकडच्या भिंतीवर लहान कोरीव असे स्तूप आणि चैत्य गवाक्ष त्या भोवती कुणीतरी वाहिलेली दोन चार फुलं व शांत तेवत असलेली पणती. काहीही न बोलता निवांत बसून राहिलो. सकाळची गार हवा, स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण, तांबट पक्ष्याचा अधून मधून शांतता छेदणारा पण हवाहवासा दूरून येणारा कुटुर कुकडुक असा आवाज. खरंच इथून निघावे असं वाटत नव्हते.
पायऱ्या उतरून डावीकडची वाट घेतली. दोन मोठे कोरडे ओढे पार करून आडवं जात पंधरा मिनिटात चौकात आलो. चौक म्हटलं की चार वाटा आल्या, आम्ही आलो ती लेणी कडून येणारी वाट, दुसरी वाट डावीकडे वळून राजमाची चढते, तिसरी सरळ जाणारी वाट रानात जात पुढे कोकण दरवाजा तर चौथी खाली उतरणारी वाट मुंढेवाडी व कोंडाणे वस्तीत. थोडक्यात कोंडाणे किंवा मुंढेवाडीहून लेणी बायपास करून थेट किल्ल्याला या वाटेने जाता येते. आम्ही अर्थात डावीकडची राजमाचीची वाट धरली. थोड पुढे जात एका झाडाखाली नाश्ता साठी ब्रेक घेतला. इथून पुढची चढाई फारशी आढे वेढे न घेता सरळ सोट अशीच.
त्यात उन्हाळ्यात या दिवसात विरळ रानातून वाट दूरवर जाताना ही स्पष्ट नजरेत येत होती. जसे वर जात होतो तसे खाली उल्हास नदीचे पात्र, समोरच्या डोंगरात डावीकडे लपलेली गंभीरनाथाची गुहा तर सरळ रेषेत वसलेली ठाकूरवाडी, तसेच घाटातून शिट्टी वाजवत जाणारी रेल्वे गाडी सारं काही अगदी सहज नजरेत. जवळपास आणखी अर्धा तासाची खडी चढण संपवत लहानशा सपाटीवर आलो. यालाच हल्ली वाघजाई टेप असेही म्हणतात. इथून डावीकडची वाट खरवंडीकडे उतरते २००५ साली याच वाटेने चढाई उतराई केली होती. याच वाटेच्या वरच्या भागात, थोडक्यात सपाटीवर आल्यावर डावीकडे मळलेल्या वाटेने दहा पंधरा पावलांवर कातळात खोदलेली पाण्याची जोड टाकी.
पण पाण्याला एक वेगळाच गंध, पिण्याच्या भानगडीत न पडता हाथा पायावर व तोंडावर मारून शरीराचं तापमान कमी केलं. झाडाच्या सावलीत निवांत वारा खात बसलो, पावसाळ्यात इथे टपरी लागते चहा, भजी, मक्याचं कणीस बऱ्याच लोकांचा ठरलेला हा थांबा. इथून पुढची चढाई अंदाजे शे दीडशे मीटर, जमेची बाजू म्हणजे आता पर्यंतच्या वाटेच्या तुलनेत झाडींचे प्रमाण ही जास्तच.त्यामुळे चढ अंगावर येणारा असला तरी फारसा त्रास नाही. बरोब्बर पावणे बाराच्या सुमारास माथ्यावर आलो.
समोर तटबंदी युक्त मनरंजन दिसला. उजवीकडच्या मळलेल्या वाटेने करवंद आणि कैऱ्या यांचा आस्वाद घेत उढेवाडीत त्या आधी बाजूलाच असलेल्या गोनिदा वाडीत जाऊन आलो पावसाळ्यात ऑफिसच्या मित्रांसोबत आलो होतो तेव्हा 'मुकुंद गोंधळेकर' काकांनी इथे राहण्याची सोय करून दिली होती. उढेवाडीत 'तुकाराम उंबरे' यांच्या घरी पाण्याच्या बाटल्या भरुन श्रीवर्धनकडे निघालो.
‘श्रीवर्धन’ व ‘मनरंजन’ हे दोन्ही राजमाचीचे जुळे बालेकिल्ले. या दोन्ही मध्ये खिंड तिथेच भैरोबाचे देऊळ समोर दगडी पुरातन शिल्प, दीपमाळ व घोडा. खिंडीच्या आसपास असलेल्या मोठ मोठ्या झाडांमुळे इथे दुपारी सुध्दा गार वाटतं. एव्हाना एक वाजत आला होता जेवणासाठी श्रीवर्धनची गुहा गाठायचे ठरवले. भर उन्हात चढाई करत कधीकाळी अस्तित्वात असलेल्या दरवाज्यातून भग्न अवस्थेतल्या देवडीतून किल्ल्यात प्रवेश केला. उजवीकडे तटबंदीच्या कडेकडेने जात डावीकडे दोन मोठी टाकी, एकात पाणी तर दुसरे कोरडे. ज्या टाक्यात पाणी होते तिथून एक पाइप खाली सोडलेला. थोड पुढे जात वरच्या बाजूला असलेल्या गुहेत आलो.
पश्चिमाभिमुख असलेल्या या गुहेतून दिसणारा नजारा भारीच. घरातून आणलेलं जेवण उरकून तासभर ताणून दिली. त्या शांत थंडगार गुहेत झोपून राहावं असेच वाटत होते, थोडा वेळ तसेच बसून पुढचा उतराईचा पल्ला आठवत निघालो. तीन वाजेच्या सुमारास माथ्यावर आलो समोरच डौलाने फडकत असलेला तिरंगा.
१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण केले असावे. अंदाजे ९०० मीटर उंच असलेल्या या किल्ल्याच्या सर्वोच्च स्थानावरून चौफेर नजर फिरवली असताना किल्ल्याचे भौगोलिक स्थान व महत्त्व लक्षात येते. पूर्वेला शिरोटा जलाशय त्याचा खोलवर गेलेला फुगवटा, ईशान्येला ढाकचा बहिरी,
आग्नेयला तुंगार्ली राजमाची-वळवंड मार्ग, नैऋत्येला नागफणी, पश्चिमेला हाकेच्या अंतरावर मनरंजन त्याखाली वसलेली उढेवाडी समोर बोरघाटातला रेल्वे मार्ग, तर वायव्येस कर्जत खांडपे भागातलं कोकण ते दूरवर इरशाळ सोंडई माथेरान पर्यंतचा मुलुख सहज नजरेत आला. मुख्य म्हणजे दुपार नंतर हवा स्वच्छ झाल्यामुळे फोटो ही छान मिळाले. सह्याद्रीच्या मुख्य रांगेला जोडलेल्या या किल्ल्याच्या कुशीत उल्हास नदी उगम पावते, पुढे हीच नदी कर्जत नेरळ कल्याण अशी वाहत वसई जवळ अरबी समुद्राला जाऊन मिळते. इतिहासाबद्दल सांगायचं झालं तर महाराजांच्या काळात १६५७ मध्ये हा किल्ला स्वराज्यात आला. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकुट, यादव, कदंब, बहमनी, आदिलशाही, शिवशाही, पेशवाई या सर्व राजवटी या किल्ल्याने पाहिल्या. या बद्दल बरीच माहिती पुस्तकात व इंटरनेट वर उपलब्ध आहे.
आता वेध लागले ते कोकण दरवाजा या अल्पपरिचित वाटेने उतरायचे. खाली आलो मनरंजनच्या पायथ्याशी असलेल्या गुहेतल्या टाक्यातून थंडगार पाणी भरून घेतले.
वाटेची सुरुवात माहितगार शिवाय सापडणं कठीण, तसे गोधनेश्वर शिवमंदिरला जाणाऱ्या वाटेवर उजव्या हाताला दिशा दर्शक बोर्ड लावला आहे पण पुढे पठारावर अनेक ढोरवाटा हमखास चुकायला होणार. आकाश आमच्या सोबत सुरुवात दाखवायला आला. वाडीतली वस्ती सोडून मावळतीकडे निघालो, अगदी सरळ न जाता दक्षिणेला वळलो. इथल्या पठारावर करवंदाची जाळी खूप, काही पिकायला आली होती ती बरीचशी तोंडात टाकली. मोठा आडवा ओढा पार करून वाट रानातून फिरून मोकळंवनात आली. पुढे एकच मुख्य वाट कड्याच्या टोकावर गेलेली, कधी काळी अस्तित्वात असलेल्या तटबंदीच्या खुणा, सध्या त्याचे दगड अस्तव्यस्त पडलेले.
हाच पूर्वीचा कोकण दरवाजा पुढची वाट समजून सांगत आकाश माघारी फिरला. सुरुवातीची उतरण एका घळीत घेऊन गेली, इथून खाली तीव्र उताराचा ओहळ सारखा भाग तो पार करण्यासाठी झाडाच्या फांद्या कापून त्याची शिडी लावलेली. शिडी पर्यंत जाणारी वाट फारच निमुळती आणि घसरडी. स्वतःचा तोल सावरत शिडीवर पहिलं पाऊल टाकलं, नीट निरखून पाहिलं तर खिळे ठोकून शिडी मजबूत केलेली.
शिडी पार करून पलीकडे कड्याला बिलगून वाट ती उतरून खालच्या माळरानात आलो. मागे वळून पाहिले असता आम्ही आलो ती वाट.
डावीकडच्या डोंगरात दिसणाऱ्या कातळाच्या उजव्या बाजूने वाट येते. राजमाचीचा डोंगर आता डावीकडे, खाली उल्हास नदीचं खोरं तर समोर सरळ रेषेत नागफणी खंडाळ्याच्या भाग.
पुढची उतराई ही रुंद अश्या सोंडेवरून. एका मागोमाग एक एक टप्पे उतरत पाऊण तासात पदरात आलो लगेच यु टर्न घेत आडवी चाल. थोडक्यात नदीला समांतर मुंढेवाडीच्या दिशेने वरच्या टप्प्यातून चाल. या भागात मोठी झाडं अशी नाहीच. त्यात लाकूड तोडीचं प्रमाण ही जास्तच. खाली नदीजवळ जरी दाट जंगल असले तरी हा मधला भाग त्या तुलनेत फारच भकास वाटत होता. दोघेच होतो त्यामुळे फार काही न बोलताच शांतपणे चालत होतो. खरे साहेब फोटो साठी मागे थांबले मी आपला बराच पुढे, अचानक डावीकडून झाडीतून हरीण बाहेर येत पलीकडच्या बाजूला वेगात पळत गेले. अचानक झालेले असे वन्य प्राण्याचे दर्शन, खरंच मनात विचार आला मानवाने आपल्या भौतिक गरजा भागवण्यासाठी चालवलेला अमर्यादित निसर्गाचा ऱ्हास थांबवला तर नक्की हे सारं पुन्हा उभारी घेईल यात शंकाच नाही.
जवळपास अर्धा पाऊण तास चाली नंतर मुंढेवाडीकडे उतरणारी डावीकडची वाट घेतली पण उतरून पाहतो तर आणखी आडवी नदीला समांतर अशी बरीच चाल बाकी होती. नदी पल्याड समोर ठाकूरवाडीच्या डोंगरापलीकडे सूर्य मावळतीला गेल्यावर शांत गूढ संधीप्रकाशात ती चाल फारच आवडून गेली. शेवटच्या टप्प्यात लेणींच्या दिशेने गेलेली आडवी वाट सोडून डावीकडची छोटी उतराई संपवत मुंढेवाडी. तिथून दहा मिनिटांत कोंडाणे. गाडीपाशी येत हेल्मेट घेतलं, कोकण दरवाजाने आलो याचं त्या मावशींना कौतुक वाटलं, निघताना त्यांचा चहा साठी आग्रह नम्रपणे नकार देत फक्त गार पाणी पिऊन निरोप घेतला. आम्हा दोघांनाही ग्रीष्मातल्या या दोन सहजसोप्या घाटवाटांच्या ट्रेकनं पुन्हा राजमाचीच्या प्रेमात पाडलं.
अधिक फोटोसाठी हे पहा : https://ahireyogesh.blogspot.com/2019/05/rajmachi-kokan-darwaja.html
नेहमी प्रमाणे उत्तम लेख आणि
नेहमी प्रमाणे उत्तम लेख आणि फोटो.
सुरेख!
या वाटेने जायचे आहे एकदा.
या वाटेने जायचे आहे एकदा. गोधनेश्वराच्या वाटेवरचे आंबे खूप लागलेले असतात आणि मे महिन्यात असतात पडलेले. पण सगळे आंबट ढस्स. उलट खाली कोंदिवड्याकडे सगळे गोड. थोडी शेकरु आहेत ना? घरटी पाहिली पण शेकरु दिसली नाहीत.
मस्त! राजमाची नेहमीच हुलकावणी
मस्त! राजमाची नेहमीच हुलकावणी देत आलाय!!
मस्त लिहिलंय. मी बऱ्याच
मस्त लिहिलंय. मी बऱ्याच वर्षनपूर्वी राजमाची ट्रेक केला होता. आता तुंगारली मार्गे गाडीरस्ता झाला आहे म्हणे ! ट्रक वगैरे जातात !! तेव्हा खूपच रिमोट भाग होता आणो त्यामुळे घनदाट झाडी होती.
हा लेख वाचून मला स्वत:च तिथे
हा लेख वाचून मला स्वत:च तिथे जाऊन आल्यासारखं वाटलं. मस्तच! आत्ताच युत्युबवरचा महाराजांच्या दक्षिणेतल्या किल्ल्यांवरचा व्हिडिओ पाहिला. तिथले किल्ले खूप सुस्थितीत आहेत. अर्थात आपल्या इथल्या किल्ल्यांनी युध्दाची धामधूम खूप पाहिली त्यामुळे तसं झालं आहे हे खरं. पण तरी वाईट वाटलंच. रच्याकने, सोंड आणि पदर हे दोन्ही शब्द किल्ले किंवा ट्रेकिंगवरच्या अनेक लेखात वाचलेत. ह्यांचा नक्की अर्थ काय??
धन्यवाद शाली
धन्यवाद शाली
SRD , रोनी, पराग व स्वप्ना _
SRD , रोनी, पराग व स्वप्ना _ राज खुप खुप धन्यवाद.
थोडी शेकरु आहेत ना?>>> या भागात आता कमीच दिसतात.
आता तुंगारली मार्गे गाडीरस्ता झाला आहे म्हणे >>> होय पावसाळा सोडला तर गाडी जाते.
सोंड आणि पदर हे दोन्ही शब्द किल्ले किंवा ट्रेकिंगवरच्या अनेक लेखात वाचलेत. ह्यांचा नक्की अर्थ काय?? >> सोंड म्हणजे, एखाद्या डोंगराकडे पाहिल्यावर जी सौम्य उताराची धार थेट पायथ्या पर्यंत आलेली दिसते ती. त्यावरून सहज वर खाली जाता येते. याच प्रकारची जर तीव्र किंवा अधिक अंशात असेल तर त्याला दांड असेही म्हणतात.
पदर म्हणजे अडीच तीन हजार फूट उंचीच्या सह्यपर्वताच्या निम्म्याहून अधिक उंचीवर सह्य शिरो धारेला समांतर असे पठार लाभलं आहे यालाच पदर असे म्हणतात. पेठ वस्ती, पदरवाडी, कळकराई, चेराव, नाणेमाची, कर्णवाडी, आंबेनळी अशा अनेक पदरातील वाड्या वस्त्या.
योगेशजी स्पष्टीकरणाबद्दल
योगेशजी स्पष्टीकरणाबद्दल मनापासून आभार
_/\_
_/\_