‘नॅनो’ला टाटा

Submitted by टोच्या on 11 October, 2019 - 07:42

‘नॅनो’ला टाटा
‘लाखात एक’ किंवा ‘लाखात देखणी’ असे वर्णन करण्यात आलेल्या बहुचर्चित, आम आदमीची म्हणून ओळख बनलेल्या ‘नॅनो’ या कारचा प्रवास जवळपास थांबला आहे. या वर्षात सप्टेंबर अखेर अवघी एक नॅनो कार विकली गेली असून, पूर्ण वर्षात एकाही कारचे उत्पादन करण्यात आले नाही. स्पेअर पार्ट, मनुष्यबळ महाग होत असतानाही कारची किंमत नियंत्रणात ठेवण्याची कसरत कंपनीला करावी लागली. मात्र, त्यामुळे या कारमध्ये अनेक ‘अॅडजेस्टमेंट’ कराव्या लागल्या. यामुळे ग्राहकांमध्ये असलेली नॅनोची क्रेझ कमी होत गेली आणि पर्यायाने उत्पादनालाही आहोटी लागली.
--
गोष्ट साधारण दहा वर्षांपूर्वीची. तेव्हा सामान्यांना कार खरेदी करणे त्यावेळच्या महागाईच्या तुलनेत जरा कठीणच होते. त्यावेळी मारूती ८०० ही सर्वात स्वस्त असलेली सामान्यांची कार होती, मात्र, तीही साधारण अडीच लाखांच्या पुढेच होती. त्यामुळे कार वापरण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असले तरी ते सर्वांच्याच आवाक्यात नव्हते. मोटारसायकल वापरणाऱ्या सामान्य माणसाला कारमध्ये फिरण्याचे स्वप्न पूर्ण करता यावे, या उद्देशाने टाटा मोटर्सचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी अवघ्या एक लाख रुपयांत कार उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. ‘लाखात कार’ हा त्यावेळी चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरला होता. रतन टाटा यांनी १० जानेवारी २००८ रोजी दिल्लीत झालेल्या नवव्या ऑटो एक्स्पोमध्ये ही खऱ्या अर्थाने ‘नॅनो’ असलेली कार सादर केली होती. एक्स्पोमध्येही नॅनोचीच चर्चा होती. कारण, तोपर्यंत इतक्या कमी आकाराची, नाजूकशी दिसणारी आणि आकर्षक डिझाइन असलेली इतकी स्वस्त कार बाजारात आली नव्हती. विशेष म्हणजे टू व्हीलरच्या तुलनेत कमी प्रदूषण करणारी असेही तिचे वैशिष्ट्य सांगितले गेले होते. ही कार एक लिटर पेट्रोलमध्ये २५.३५ किलोमीटर चालेल, असे कंपनीचे म्हणणे होते.
माध्यमांमध्ये बातम्यांचा विषय ठरलेली आणि सामान्यांमध्येही कुतूहल असलेल्या या बहुप्रतिक्षित ‘नॅनो’चे पहिले मॉडेल २३ मार्च २००९ रोजी लाँच करण्यात आले. टाटा नॅनो एसटीडी, टाटा नॅनो एक्सएल आणि टाटा नॅनो सीएक्स अशी त्या मॉडेल्सची नावे होती. या कारची किंमत एक लाख रुपये सांगितली जात असली तरी पहिले मॉडेल ग्राहकांच्या होती येईपर्यंत त्याची किंमत १ लाख ६७ हजार इतकी होती. खरे तर स्मॉल कारच्या बाजारपेठेत इतक्या कमी किंमतीत ही कार उपलब्ध होणे ही आश्चर्याची बाब होती. विशेष म्हणजे सरकारचे सर्व नियम पाळून टाटांनी सामान्यांसाठी स्वप्नातली ‘लाखात देखणी’ कार सादर केली होती. भारतातील मध्यमवर्गीयांची संख्या आणि त्यांची कारविषयी असलेली उत्सुकता पाहता वर्षाला साधारण अडीच लाख कारची विक्री करण्याचे ध्येय टाटा मोटर्सने ठेवले होते. कारचे बुकिंग सुरू झाल्याबरोबर तब्बल दोन लाखांवर कारचे अॅडव्हान्स बुकिंग झाले. मात्र, कंपनीची उत्पादनक्षमता वर्षाला अवघी ६० हजार युनिट असल्याने अनेकांना वेटिंग करावे लागले. या कारच्या स्पर्धेचा सगळ्यात पहिला फटका मारुती ८०० ला बसला होता. नॅनो लाँच झाल्यानंतर २००९ मध्ये मारुती ८०० च्या विक्रीत जवळपास २० टक्के घट नोंदविली गेली होती.
नॅनो खरेदी करणाऱ्या ग्राहकांची उत्सुकता अल्पकालीन ठरली. अनेकांनी उत्साहाच्या भरात कारचे बुकिंग केले खरे, पण काही दिवसांतच तिच्यातील दोष समोर यायला लागले. नॅनो कारने पेट घेतल्याच्या अनेक घटना त्यावेळी घडल्या. मागच्या बाजूला असलेले इंजिन, आतमध्ये बसताना कम्फर्टेबल न वाटणे, कुठल्याच मॉडेलमध्ये एसी नसणे, पॉवर स्टेअरिंगचा अभाव आदी बाबींमुळे या कारविषयी नकारात्मक भावना निर्माण होत गेली. कोणतेही वाहन विकत घेताना ग्राहक अपघातविषयक सुरक्षेचा विचार करतो. या कारच्या हलक्या वजनामुळे इतर वाहनांच्या तुलनेत कमी वेग, अपघातांचा धोका जास्त होता. शिवाय, एअर बॅगचाही अभाव होता. त्यामुळेही या कारकडे ग्राहकांचा ओघ हळूहळू कमी होऊ लागला. कारची किंमत कमी ठेवण्यासाठी या कारमध्ये इतर सुविधा देणे अशक्य होते.
‘नॅनो’ची प्रसिद्धी करण्यासाठी टाटांनी ‘गोल्ड प्लस’ हे तब्बल २२ कोटींचे नॅनो कारचे मॉडेल प्रदर्शित केले. या मॉडेलची विक्री करण्यात आली नाही. या कारला ८० किलो २२ कॅरेट सोन्याने मढविलेले होते. शिवाय १५ किलो चांदीचाही वापर करण्यात आला होता.
लोकांच्या सूचनांचा विचार करून नॅनो ट्विस्ट हे मॉडेल सादर करण्यात आले. यात एक्स टी आणि एक्स ई अशी दोन मॉडेल्स होती. या मॉडेलची किंमत मात्र अडीच लाखांपर्यंत गेली. या मॉडेलच्या लूकमध्ये फारसा बदलाव नसला तरी ती ग्राहकांना थोडा ‘लक्झरी’ फिल देणारी होती. या कारमध्ये वापरल्या गेलेल्या प्रत्येक गोष्टीच्या गुणवत्तेबाबत खास लक्ष देण्यात आले होते.
२०१० मध्ये जिनिव्हा येथे झालेल्या मोटार शोमध्ये टाटांनी इलेक्ट्रिक नॅनो आणण्याची घोषणा केली होती. मात्र, ती प्रत्यक्षात उतरू शकली नाही. त्यानंतर ऑक्टोबर २०१३ मध्ये नॅनो सीएनजी इमॅक्स ही बाय-फ्यूएल कार बाजारात आणली गेली. ती गॅसोलीन आणि सीएनजीवर चालू शकत होती. ही कार दिल्ली, लखनऊ आणि महाराष्ट्राच्या काही भागात विकली गेली, जेथे सीएनजी इंधन उपलब्ध होते, अशाच ठिकाणी ही कार वापरता येणे शक्य होते. डिसेंबर २०१४मध्ये सुपर नॅनो हे मॉडेल आणले गेले. जिच्यात २३० एचपीचे इंजिन होते.
२०१८मध्ये टाटा ग्रुपचे अध्यक्षपद सोडल्यानंतर सायरस मिस्त्री यांनी टाटा नॅनो हा प्रोजेक्ट अपयशी ठरल्याचे वक्तव्य केले होते, त्याला व्यवस्थापनानेही दुजोरा दिला होता. मे २०१८पर्यंत नॅनोचे उत्पादन बंद होईल, अशी चर्चा होती. त्यात तथ्यही होते, असे म्हणता येईल. कारण, गेल्या सहा महिन्यांत सानंद येथील प्रकल्पात अवघ्या तीन टाटा नॅनो कारचे उत्पादन करण्यात आले, तर जून २०१८मध्ये अवघ्या एका कारचे उत्पादन झाले. त्यामुळे, हा प्रकल्प बंद होणार याविषयी चर्चा जोर धरू लागली आहे. कंपनीने मात्र टाटा नॅनोचे उत्पादन बंद करण्याचा कोणताही विचार नसल्याचे म्हटले असले तरी वास्तव नाकारता येणेही शक्य नाही.
सिंगूर प्रकल्पाचा वाद
पश्चिम बंगालमध्ये टाटा नॅनो प्रकल्पासाठी राज्य सरकारने एक हजार एकर जागा दिली होती. तेथे प्रकल्प उभारण्यात आला होता. मात्र, तृणमूल काँग्रेसने त्यास प्रचंड विरोध करीत, शेतजमिनी औद्योगिक कारणासाठी वापरण्यास हरकत घेतली. त्यानंतर तेथील शेतकऱ्यांनी आंदोलने करीत आपल्या शेतजमिनी परत मागितल्या. त्यामुळे टाटांनी ‘नॅनो’ प्रकल्प गुजरातमधील साणंद येथे हलविला. त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. असे म्हटले जाते की, मोदी यांनी रतन टाटांना ‘सुस्वागतम्’ असा एकाच शब्दाचा मेसेज टाकला होता, ज्यानंतर लगेच हा प्रोजेक्ट साणंदला नेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आणि अवघ्या १४ महिन्यांत प्रकल्प उभाही राहिला होता.

सामान्यांना चारचाकीत फिरण्याचे स्वप्न दाखविणारी आणि ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्याही स्वप्नातील ही ‘लाखात एक’ कार आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. ही कार फेल गेली असली तरी टाटांची व्यापक दृष्टी आणि उद्योगपती म्हणून समाजाविषयी बांधिलकी यातून अधारेखित झाली, हे नाकारता येणार नाही.
(महाराष्ट्र टाइम्सच्या नाशिक आवृत्तीत पूर्वप्रकाशित)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Nano "You get what you pay for" Cha उत्तम उदाहरण आहे. टाटा त्यांच्या सामाजिक बांधीलकी साठी प्रसिद्ध आहेत आणि त्याबदद्ल काही वादच नाही. पण ही गाडी १०-१५ वर्ष उशिरा आली. या वेळेर्यंत छोट्या कार चे मार्केट खूप स्पर्धात्मक झाले होते आणि या कार घेणाऱ्या ग्राहकांना मारुती ८००, हुंडई, देवु सारख्या कार्स चे पर्याय उपलब्ध झाले होते. आणि त्यामुळे या गाड्यांचे मार्केट संपले होते. या गाड्या घेण्यासाठी बुक करणारे शक्यतो निवृत्त लोक किवा ज्या लोकांना केवळ हौस म्हणून कार हवी असे लोक जास्त होते. बाकी या कार चा उपयोग शो ऑफ च्या पलीकडे शून्य होता. हे माझे वयक्तिक मत.

नॅनो गाडी अंडाकृती डब्बा आहे. अशा पुचकाट गाड्या दणकट लोकांना आवडत नाहीत. गरिबाची कार म्हणणं गरीबांना हिणवण्यासारखं आहे.
मुळात डिसिजन मेकिंग वाला माणूस मुर्ख असणार. किती वेगवेगळ्या प्रकारच्या नॅनो डब्यांची रचना केली. ट्विस्ट काय अन् काय काय..

किल्ली, प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
--
<ही गाडी १०-१५ वर्ष उशिरा आली. या वेळेर्यंत छोट्या कार चे मार्केट खूप स्पर्धात्मक झाले होते >
बुन्नू, सहमत
--
<गरिबाची कार म्हणणं गरीबांना हिणवण्यासारखं आहे.>
सोमा वाटाणे, मुळात मोटारसायकल खरेदी करू शकणाऱ्याच्या आवाक्यातील कार त्यांना द्यायची होती. पण तिची किंमत वाढत गेली.
--
<स्टेटस सिम्बॉलच्या काळात नॅनो आली>
रॉनी, सहमत

बऱ्याच वेळा नॅनोची मार्केटिंग स्ट्रॅटेजी चुकली हे ऐकण्यात आलंय, आणि तेच नॅनो लोकांना अपील होऊ न शकण्यामागचं कारण असावं.
दुचाकीवर प्रवास करणार्यांना चारचाकीवर आणण्याच टाटांचं स्वप्न होतं. पण भारतीयांसाठी दुचाकी ही 'गरज' आहे तर, चारचाकी ही 'लक्जरी.' आणि आपण चैनीची वस्तू वापरतो, पण तिला स्वस्त लेबल लावणं, ही कल्पनाच भारतीयांना रुचली नाही, म्हणून नॅनोकडे हेटाळणीच्या दृष्टीनेच बघितलं गेलं, आणि गरिबांची कार म्हणून हिणवले गेले.
स्वस्त ऐवजी छोटी कार किंवा स्मॉल फॅमिली कार या दृष्टीने नॅनोच मार्केटिंग झालं असत तर चित्र वेगळं दिसलं असत.

मस्त लेख! टाटा मला आवडतात. ग्रेट माणूस. पण नॅनो मला सुरवातीपासूनच आवडली नाही. ती स्वस्त आहे म्हणून नाही पण त्यात काहीतरी असे होते की जे नेहमी खटकत राहीले.

स्वस्त ऐवजी छोटी कार किंवा स्मॉल फॅमिली कार या दृष्टीने नॅनोच मार्केटिंग झालं असत तर चित्र वेगळं दिसलं असत.>> मलाही असेच वाटते अगदी. बऱ्याच लोकांची मानसिकता असते अशी. मी सायकलवर फिरेन पण अल्टो घेणार नाही किंवा फुकट दिली तरी नॅनो नको असं म्हणनारे बरेच पाहिलेत.

बऱ्याच वेळा नॅनोची मार्केटिंग स्ट्रॅटेजी चुकली हे ऐकण्यात आलंय, आणि तेच नॅनो लोकांना अपील होऊ न शकण्यामागचं कारण असावं. >> सहमत.

नाहीतर अमेरिकेत जिथे लोक सेमाई ट्रक सगळीकडे घेऊन फिरतात, तिथे अशी छोटी कार दिमाखात फिरालीच नसती.

Smart-ForTwo-Passion-Cabriolet_0.jpg
नॅनो आली तेव्हा भारतीय जनतेच स्वस्त गोष्टीचं कौतुक already संपून गेलं होतं.

टाटा ह्या कंपनी ऐवजी हुदाई,toyatoआणि इतर परदेशी ब्रँड खाली नॅनो कार आली असती तर काय फरक जाणवला असता.
मुळात भारतीय लोकांना विदेशी वस्तूंचं भारी कौतुक आहे .

मार्केटिंग योग्य दिशेने झालं नाही याच्याशी सहमत. ही गाडी दारात असणे ही अप्रतिष्ठेची गोष्ट आहे, आपल्या गरीबीची खूण आहे असा संदेश गेला खरेदीदारांकडे.

टाटा ह्या कंपनी ऐवजी हुदाई,toyatoआणि इतर परदेशी ब्रँड खाली नॅनो कार आली असती तर काय फरक जाणवला असता. >>
असे वाटत नाही. असे असते तर टाटांच्या इतर गाड्या उदा. सूमो, इंडिका आणि मारुती च्या बहुतेक सर्व गाड्या इतक्या यशसवी झाल्या नसत्या.

शाली, बुन्नू, हीरा, सहमत. स्टेट्सचा प्रश्न हाही कळीचा मुद्दा म्हणावा लागेल. नॅनो घेतली की लोक गरीब समजतील ही मानसिकताही होतीच.
राजेश, परदेशी कंपनीची कार असती तरी नव्याचे नऊ दिवस चालली असती. उपयोगिता महत्त्वाची.
बोकलत, ती बिनशेपटीच्या उंदरासारखी दिसते हे मात्र खरं

देवकी, प्रतिसादाबद्दल धन्यवाद

Many people who already owned luxurious sedan or SUV still prefer to have a nano for city ride due its small size and convenience of parking in crowded areas.

नॅनोची मार्केटिंग स्ट्रॅटेजी चुकली हे मान्य आहे. पण १ लाखात लोकांसाठी गाडी देण्याचे स्वप्न बघणे आणि त्याच्यासाठी मनापासून प्रयत्न करणे, या कारणासाठी रतन टाटा यांच्याबद्दलचा आदर दुणावला आहे.