फरपटीचा काळ माझा वेळ ना सुस्तावयाला
थांबणे सोसेल तोवर लागते चालावयाला
फक्त ही सुरुवात आहे वेदनामय जीवनाची
आसवे आताच का मग लागली साचावयाला
वाटण्या आनंद जगती हास्य मी जोपासतो
मज हवा अंधार थोडा आसवे गाळावयाला
पाळले गोंजारले मी खूप माया लावलेली
तेच आता श्वान मजवर लागले भुंकावयाला
मारणे ठोशास ठोसा आवडे मजला तरीही
आपुल्यांचे वार असती मूक ते सोसावयाला
पुण्य मी केले किती ते नोंद ठेवी माय अंबे
मी कधी येणार नाही जोगवा मागावयाला
"मोह सोडी मानवा तू" सांगती बाबा गुरू पण
'ओम शांती"ने कमवती संपदा भोगावयाला
एक गोत्री लग्न करता मारती पत्नी पतीला
सांगती हे जी पुराणे द्या मला जाळावयाला
कोळला इतिहास प्यालो अन परिक्षा पास झालो
फक्त होत्या त्या विभूती पुस्तकी वाचावयाला
काय कलमेतून झरते भान कोठे शायराला ?
अर्थ गजलेचा मला मी लागलो समजावयाला
गोफ का "निशिकांत" विणला? गुंफली नाती किती रे !
रेशमांचे पाश आता लागले काचावयाला
निशिकांत देशपांडे मो. न. ९८९०७ ९९०२३
अतिशय सुंदर आहे. किती कडवी
अतिशय सुंदर आहे. किती कडवी आवडली ते लिहायला घेतले तर, आख्खी कविताच (गझल) उतरेल.
आहा हा! भारीच
आहा हा! भारीच
पुण्य मी केले किती ते नोंद ठेवी माय अंबे
मी कधी येणार नाही जोगवा मागावयाला
प्रत्येक शेर भारीच. वाह