विखुरलेलं सुख!!!

Submitted by १८तन्वी on 30 September, 2019 - 14:39

मी लेखिका नाही... पण कधीतरी वाटतं आपले चिमुकले विचार इतरांबरोबर वाटावेत... आपल्याला जसं वाटतं तसं इतरांना पण वाटत असेल का हे जाणून घ्यावं.... म्हणून हा मनातला आनंद कागदावर उतरवण्याचा छोटासा प्रयत्न !!!

मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं?
काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं...?

Well.....वरच्या प्रश्नाचं गेल्या काही दिवसात माझ्या अनुभवांमधून मला गवसलेलं उत्तर... अर्थात् माझ्या पुरतं....

अनोळखी माणसाचं अनोळखी मूल आपल्याकडे ओळख असल्यासारखं बघून हसतं... तेव्हा जे काही आनंदी वाटतं ते सुख.....

वाट चुकलेल्या बदकांच्या पिलांना त्यांच्या आईपर्यंत पोहोचवल्या नंतर त्या सगळ्यांना एकत्र बघून जे समाधान वाटतं ते सुख....

नर्सरीमधून हौसेने आणलेल्या पण निष्पर्ण असलेल्या झाडाला ७-८ महिन्यांनंतर आलेली पहिली कोवळी पालवी बघून जो आनंद होतो... ते सुख!!

मित्र मैत्रिणीं बरोबर केलेला एखादा विनोद अचानक आठवतो आणि त्यांना फोन करून तुम्ही तितक्याच दिलखुलासपणे डोळ्यात पाणी येईपर्यन्त हसता ( खिदळता ) आणि नवरा म्हणतो ‘काय वेडी झालीस का?’ त्या क्षणी मान डोलावून त्याला हो म्हणताना जो आनंद होतो ते सुख!!!

आपल्या बाल्कनीत घरटं बांधणाऱ्या कबुतरांचा, त्यांच्या पिलांचा, अंड्यापासून ते आकाशात पहिली झेप घेईपर्यंतचा प्रवास जवळून बघताना जे काही भारी वाटतं, आतून जाणवत राहतं..... ते सुख!!!!

गाणं शिकणारी तुमची मुलगी अचानक तुमच्या आवडीचं खूप जुनं गाणं गुणगुणते आणि तुम्ही तिला ‘तुला हे गाणं कसं काय आवडतं?’ म्हणून चिडवता तेव्हा त्या गाण्याचं तिच्या परीने ती जे विश्लेषण करते, समर्थन करते आणि नंतर “Mom, तुला गाण्यातलं काऽऽऽही कळत नाही” अशी टिप्पणी करते, तेव्हा मनातल्या मनांत जी मजा वाटते ते सुख...!!!

थोडक्यात काय, तर सुख छोट्या छोट्या क्षणांत आपल्या आसपास विखुरलेलं असतं.... आपण ते नजरअंदाज करतो....:)

- तन्वी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mast!