US ला येऊन आता दोन महिने उलटले... पण अजूनही म्हणावी तशी नाही रुळले मी इथे...कितीही नाही म्हटल तरी अस मुळापासून रोप उपटून एकदम दुसरीकड लावल तर लगेच थोडीच रुजणार...शेवटी ज्याला त्याला त्याचा असा थोडा वेळ द्यावाच लागणारं ना..तसच माझ झालय.. काही ना काही कारणाने सतत आपल मायदेश, माझी जिवाभावाची माणस, माझ पुण.. माझ्या लहानपणापासून डोक्यात भिनलेल्या पेठा .. कुठ काय कस चांगल मिळत ...याच आई आजी पासून चालत आलेल अगाध ज्ञान... हा सारा (गायकीचा)राग डोक्यात ही घोळतो, मनातही आळवला जातो .. अन् अवचित कधीतरी ओठांवर ही येतो ..मग मात्र सचिनचा(माझा नवरा)रोष ओढवून घ्यायला लागतो .. मग त्याची मुक्ताफळे लगेचच कानावर आदळतात, काय आपल तेच तेच, जरा म्हणून प्रगती नको, पुढे जाण नको, तेच ते जुन पुराण कवटाळत बसायच .. काही होणार नाही तुमच भल..जा आपले मायदेशी परत .. जगा reservation castच्या मायजालातचं...काय बोलणार .. माझ आपल तोंड गप्प...
खरं तर आता श्रावण चालू झाला, म्हणजे नागपंचमीला पुरणाची धिंड, श्रावणी शुक्रवार ला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य, एका शुक्रवारी आईकडे माहेरवाशीण म्हणून सवाष्णी चा मान ..काय अन् किती मिस करणार याला काही गणतीच नाही...पुढचा महिना भाद्रपद म्हणजे गणपती गौरी..किती रेलचेल, लगबग सासूबाई ,आजे सासूबाई दोघींची आधीपासूनच सारी तयारी... जुने तांदूळ आणून धुवून टाकून.. कडकडीत उन्हात वाळवून.. त्याची सुवासिक पिठी उकडीच्या मोदकासाठी.. हा सारा आटापिटा त्या म्हाताऱ्या बायकांचा ..घरच्या मंडळीच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी चा... पण इथे सारेच थंड... ना सणवार.. ना गोडधोड.. ना की कसलं आपल्या चार माणसांना जेवू घालण्याचा आनंद ..पण असं वाटत असतानाच एकदम चमत्कार घडला ..
एक दिवस सचिन अचानक बातमी घेऊन आला, आपण इथे गणपती बसवू या... साऱ्या आँफिसमधल्या इंडियन लोकांना एक दिवस गणपती बघायला बोलवीन...तसंही तुला माणसं लागतातच ना .. छान फक्कड उकडीचे मोदकच कर..तुला चांगले येतात ना..सारे खूष होतील बघ...
मी अवाक्.. पण म्हणलं चला त्या निमित्ताने चार ओळखी होतील.. पण मन मात्र धास्तावलं.. याची यादी वाढत वाढत.. रामायणातल्या वानराच्या शेपटासारखी संपता संपता म्हणता संपेचना .रोज एक दोन जणं वाढवतं ती चाळीस पंचेचाळीस च्या घरात पोहोचली... सचिन म्हणाला, एक दोघांच्या बायका येतील तुझ्या मदतीला ..आणि कुणी कुणी एखादा पदार्थ ही करुन आणतील.. तू फार लोड घेऊ नकोस ग...
मला मात्र रडावं का हसावं तेच कळत नव्हत...खर तर घरात सासूबाई, आजेसासूबाई असल्यामुळे मला मेलीला तसा स्वयंपाकाच्या अंदाजाचा कधीच प्रश्न पडला नव्हता, त्यांच्या अनुभवी नजरेने, वर्षानुवर्षे करण्याच्या सवयीने ..मला कधी स्वतःचं डोक अंदाज या विषयात घालावचं लागलं नाही... दहा माणसांना साधा चहा करायचा तर किती कप पाणी, किती कप दूध, किती चमचे साखर, किती चमचे चहा पावडर असा विचार करायच्या आत सासूबाई सांगायच्या... ते मोठ पातेल घे पाऊण भरेलं एवढ पाणी ठेव .. ..त्यांना कधी कपानी पाणी मोजायची गरजच नव्हती... इतकं मुरब्बी पण होतं की विचारुच नका...तसच आजेसासूबाईच..एकदा चिंच गुळाची आमटी करताना मी घाईत गूळच घालायचा विसरले होते..तर नुसत्या वासावरुन त्या म्हणालाय् होत्या, अग प्रमिला (सासूबाई) आज आमटी बिन गुळाची केलीस का ग...सासूबाईंनीही लगेचच चाखून बघत गूळ घातला होता... अन् आज सचिन मला पंचेचाळीस माणसांसाठी उकडीचे मोदक कर म्हणतोय... काय सांगू याला ..
अरे, जुनी पुराणी पिढी त्यांच्या अनुभवाने, वर्षानुवर्षे करण्याच्या सातत्याने इतकी परिपक्व असते...की त्यापुढे..आमची ही पिढी सुद्धा फिकी पडते रे... तुझी आई आजी ..जेवढा पटापटा अंदाज देतात तेवढा मला वीस वर्षे संसार करुनही येत नाही रे .. मान्य की मी त्यांच्या हाताखाली तयार झाले ..पण अजूनही थोडसं रितेपणं आहेच रे ..
शेवटी कसयं ना मंडळी .. जुनी जाणती माणसं आपल्या घरात, अवतीभवती असण हेच तर खर भाग्याच लक्षण असत..त्यांच्या जुन्या सुरकुतलेल्या हातांची चव, त्यांच्या पांढरे केस झालेल्या डोक्यातील परिपक्व कल्पना, त्यांच्या म्हाताऱ्या डोळ्यांतील अचूक अंदाज, अन् सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या अनुभवी विचारांची देवाणघेवाण हीच तर खरी पुंजी असते पुढच्या पिढीसाठी...म्हणूनच या अनुभवी जुन्या पिढीला त्यांचा सन्मान देऊनच आपणही त्यांच्याकडू न चार गोष्टी आत्मसात कराव्यात हे मात्र नक्कीच...
म्हणून चं शेवटी मी सासूबाईंना फोन करुन तांदळाची किती पिठी लागेल, नारळ किती लागतील या साऱ्यांचा अंदाज घेतला ...अन् अखेर गणपती बसल्यानंतर दोन दिवसांनी वीकेंड होता.. तेव्हाच सचिनने सारा गोतावळा बोलावला... सारे पदार्थ ,अगदी उकडीचे मोदक सुद्धा छान तर झालेचं .पणं व्यवस्थित पुरले ..सार जमल हे पाहून मलाचं हुश्श झालं...
तेवढ्यात सचिनचा एक आँफिसमधला कलीग पीटर (नाँन इंडियन) म्हणाला, मँडम..यू आर ग्रेट.. हाँट अ वंडरफुल अँरेंजमेंट... अँड लव्हली फुड...थँक्स.. फाँर एव्हरीथिंग .. मी ही फक्त मान हलवली ..थँक्स म्हणले... मनातून मात्र सासूबाईंनाच त्रिवार वंदन करत थँक्स म्हणले मी....
©मृणाल वाळिंबे
छान लिहिले पण शेवट घाईत उरकला
छान लिहिले पण शेवट घाईत उरकला आहे असे वाटलं. पुरणाची दिंड हा बदल करावा. धन्यवाद.
स्वयंपाकाच्या अंदाजाचा कधीच
स्वयंपाकाच्या अंदाजाचा कधीच प्रश्न पडला नव्हता, त्यांच्या अनुभवी नजरेने, वर्षानुवर्षे करण्याच्या सवयीने ..मला कधी स्वतःचं डोक अंदाज या विषयात घालावचं लागलं नाही >> इतकं टेंशन नका घेऊ. इथे मायबोलीवर विचारलं असतं तरी घटक पदार्थांचा अंदाज, परदेशात आणि फारशी मदत नसताना एवढा मोठा घाट घालायचा असेल तर प्लानिंग टिप्स असं सगळं मिळालं असतं.
मनोगत आवडले. ज्येष्ठ मंडळी
मनोगत आवडले. ज्येष्ठ मंडळी घरात असणं जास्त करुन भल्याचेच असते हे खरे आहे. बाकी स्वयंपाक ही कलाच आहे, हेही तितकेच खरे.
तुम्ही एक टोक गाठलं म्हणुन त्यांनी दुसरं टोक गाठलं. भांडणात असच होतं.
>>जगा reservation castच्या मायजालातचं>>
नागपंचमीला पुरणाची धिंड >>>
नागपंचमीला पुरणाची धिंड >>> दिंड
धिंड वर ठेचकाळले.
तेवढं बदला.
पुढे वाचते.