दुर्गम दुर्ग -मोरोशीचा भैरवगड…..
काळालाही आव्हान देणारा दुर्गम दुर्ग,जीवाचा थरकाप उडवणारी चित्तथरारक चढाई,सरळसोट कातळकडा,अंगावर येणारा ओव्हरहँग आणि निमुळत्या पायऱ्या महाराष्ट्रातील हाडाच्या भटक्यांना याची दिवसाउजेडी स्वप्ने नाही पडली तर नवलच…!
अशीच भैरवगड चढाईची स्वप्ने मी सुद्धा पाहिली होती आणि तेही थोडीथोडकी नव्हे तीन-चार वर्षापासून भैरवगड करायचा हे मनाशी नक्की होते.मित्रांचे ब्लॉग ,पेपरमधील लेख, सतत वाचत असायचो आणि असाच एक दिवस सफर सह्याद्रीची घोडदौड सुरू असताना आमचे जिवलग अमर सोबत हा विषय काढला आणि भैरवगड मारायचा हा बेत पक्का झाला.गरज लागली तर रोप वापरायचा म्हणून 100 फुटी रोप सुद्धा सोबत घेतलेला होता रविवारचा दिवस पकडून दोघे निघालो कल्याण स्वारीला सकाळी लवकरच कल्याण स्टेशनवर पोचलो.कल्याण-नगर रोडवर मोरोशी गाव हे गडाच्या पायथ्याचे गाव आहे.नगरला जाणाऱ्या बसने निघालो टोकावडे मध्ये प्रायव्हेट हॉटेलवर बस थांबली तिथे गोल भजी छान मिळतात त्यांचा आस्वाद घेतला तिथूनच भैरवगड कातळभिंत दृष्टीस पडते थोडीशी फोटोग्राफी करून मोरोशी गाठले.भैरवगड फलक दृष्टीस पडल्यावर आमच्या उत्साहाला उधाण आले गावकऱ्यांसोबत वाटांची जुजबी माहिती करून घेतली आणि झपझप पावले उचलत वाटेला लागलो.वाटेत डाव्या बाजूला म्हशींचा गोठा लागला त्यांना मुद्दाम आवाज देऊन पहिला तर त्या पण कान टवकारून पाहायला लागल्या मग त्यांचा पण एक फोटू घेऊन टाकला.
वाटेत मोहाची फुले लागली अमरचे मग मधपुराण चालू झाले सह्याद्रीत कसे जगायचे वैगरे वैगरे फुल काय सोडत न्हवता गडी मग त्याचा पण व्हिडीओ घेऊन त्याला पण खुश केले तेव्हा गडी वाटेस लागला.गावातला एकजण भाजावळ तयारी करत असलेला दिसला आम्ही पण कोकणातले असल्यामुळे थोडे ज्ञान त्यासमोर पाजळले आणि मगच त्याचा निरोप घेतला.गुरांची आणि ग्रामस्थांची शेतात आणि जंगलात येण्याजाण्याची वाट असल्यामुळे वाटा बाराही महिने मळलेल्या असतात त्यामुळे चुकण्याचा धोका अत्यंत कमी असतो.या भागात म्हशी जास्त चरायला गावकरी घेऊन येतात भैरवमाची भागात चरण्यासाठी मुबलक जागा आणि लांबलचक मोकळे पठार म्हशी सोडून दिल्या कि बसला दगडावर पानसुपारी खात आणि माचीवर चांगली रेंज मिळते मग काय चांदीच हो …
माचीच्या अगोदर दोन-तीन मोठमोठ्या दगडी आहेत आणि समोर भेसूर आकारातील झाडे तिथे पोचतो ना पोचतो ते अचानकपणे ती झाडे हलायला लागली दुपारचा सुमार होता आणि वारा सुसाट सुटलेला किल्ल्यावर जायला आम्ही दोघेच वाटेवर चिटपाखरू नाही आम्ही आपली झाडे बघतोय आणि एकमेकांकडे बघतोय हु नाय की चू नाही गप्प आपला काढता पाय घेतलेला पण भुताटकी वैगरे काय नाही फक्त मनाचे खेळ आणि भास-आभास कारण अशी लय भूत कोकणात आम्ही जवळून पाहत असतो ते सोडा…
माचीच्या अगोदर चढणीचा टेपाड लागते तिथे चांगलाच दम निघाला पण कसलेला असेल तो तासाभरात माचीवर पोचला पाहिजे एवढी सोपी चढाई माचीपर्यंत आहे ज्याला गडावर जाणे शक्य नाही त्याने माचीवर यायचे भुरभुर वारा खायचा मस्त पथारी पसरायची एक डुलकी काढून उठले कि दोनचार फोटो काढायचे आणि मग घरची वाट धरायची यात पण सुख आहे.कुठल्याही गडाच्या माचीवर आलं कि थोडी विश्रांती करायचीच हा आमचा नेहमीचा दंडक का म्हणून विचाराल तर माचीवर जसा वारा लागतो तसा कुठे लागेल का नेढ असलं तर गोष्ट याच्या उलट करतोय.माचीवर विश्रांती करून मुख्य गडाच्या चढणीला लागलो.माजलेल्या करवंदीच्या बेटातून वाट काढत उजवीकडे वाट सरकत होती.बेटात शिरतोय तोच आजूबाजूची झाडे जोरात हलायला लागली गच्च झाडी पळू पण शकत नाही आमची जाम तंतरली आयला वर झाडावर बघावं तर कोण नाय आता काय करायचं बाबा विचारच पडला मग एकदम शेवटच्या झाडावर एक माकड पळताना दिसलं तेव्हा कुठं जीवात जीव आला.हुश्श सुटलो एकदाचा भानामती सुटली. बेट संपली आणि भैरवगडाची धडकी भरवणारी आडवी कातळभिंत अगदी हाकेच्या अंतरावर बघूनच डोळे दिपले प्रथमदर्शनी हा किल्ला असावा यावर विश्वासच बसत नाही.ईथुन मग सरळसोट कातळ चढायचे वाट सोपी अशी नाहीच भैरवगड राहिला दूरच पण हि वाट चढायची म्हणजे खायचं काम नाही जाम घसरट आणि उभी आधाराला पण जास्त काही नाही.
इथे उभे राहिले आणि पहिलं तर डाव्या हाताला पायरी उध्वस्त मार्ग आणि उजव्या हाताला गिर्यारोहण करणाऱ्यांचा मार्ग आहे. SCI संस्थेने गडाच्या दोन्ही बाजूला बोल्ट ठोकून आरोहण मार्ग सुरक्षित केला आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तितके कमीच त्यांच्यामुळे आमच्यासारखे सर्वसामान्य भटके या गडाला भेट देऊ शकतात.पायरीच्या मार्गाने चढाई करायची असल्याने सरळसोट उभ्या चढणीच्या वाटेने वरती आलो ईथुन डावीकडे वळलो कि पुढे पायरीमार्ग लागतो.या वाटेच्या अगदी वरती तोंडासमोर खोदीव आयताकृती खांब टाके आहे.या गडावरील पाण्याचे सर्वात मुख्य साधन कंबरभर उंच, मोठे आणि बारमाही थंडगार पाणी हे या टाक्याचे वैशिष्ट्य आहे.आतमध्ये असे खोदत नेले आहे कि कसलाही कचरा टाक्यात पडणार नाही जसे चंदेरीला माथ्यावर जाताना खिंडीमध्ये उजव्या हाताला टाके आहे.टाक्यापासून पुढे निघाल्यावर एक रॉकपॅच चढावा लागतो हा चढ संपला कि भैरवगडाची पूर्व बाजू उत्तमरीत्या दिसू लागते.इथे जागोजागी बिलेसाठी बोल्ट ठोकलेले आहेत.थोडेसे पुढे गेल्यावर परत खाली उतरायचा एक पॅच आहे घसरट आणि निमुळती जागा आहे त्यामुळे जरा जपूनच हा पॅच पार केला.उजवीकडे कातळात एक नैसर्गिक चौकोनी कपार आहे अमर भाऊंना काय हुक्की आली ते म्हणले मला बघायची आहे जाणे अवघड आहे पण बोल्टवर पाय रोवत भाऊ जाऊन बसले कपारीत त्यांच्या आनंदाला पारावर न्हवता म्हणले फोटो काढा तर मी आपले 2-4 फोटो काढले आणि मी आपला वाटेस लागलो तर भाऊ आले पाठून धापा टाकीत मी आपला विचार करतोय एवढं सगळं अवघड प्रकरण उतरून हा माणूस 2 मिनिटात माझ्याजवळ कसा आला तर म्हणतात गुहेत सापदादा होते वेटोळ घालून बोललो नशीब माझं थोर ..
उन्हाळ्याच्या दिवसात गरमीने त्रस्त होऊन या वाटेवर,गडावर जास्त प्रमाणात साप आढळतात त्यामुळे खूप सांभाळून जावे लागते.
ईथुन पुढे 5 मिनिटांवर पहिली पायरी लागते पायरीला नतमस्तक होत भैरवदेवाला मनोमन साकडे घालत गडाला भिडलो.अमर भाऊ पुढे जाऊन गुहेत विसावले पाठीवरची बॅगांची ओझी गुहेत ठेवून दिली आणि रोप घेऊन गुहेतूनच भिंतीच्या आधाराने वरचा टप्पा गाठला आणि शेवटी तो अंगावर काटा आणणारा क्षण आलाच ओव्हरहँगचा पॅच अमरभाऊंचा प्रयत्न करून झाला पण धीर चेपेना आता मग मीच पुढे झालो.थोडाफार अभ्यास करून आलो होतो त्याचा उपयोग करायची वेळ आली होती.खाली तुटलेला पायऱ्या खाली नजर टाकली तरी दरदरून घाम फुटावा दोन बोल्टचा काय तो आधार त्यात निमुळती पायरी केवळ थरारक….पण हा थरार पुढच्या पाच मिनिटांत दोघांनीही फ्री कलाईम्ब करत संपवला कसे ते सविस्तर सांगता येणार नाही इथे पुढे गेल्यावर तुटलेल्या पायऱ्याचा अवघड पॅच सुद्धा आरामात पार झाला.पायऱ्यांना खोबण्या असल्यामुळे चढाई अडचणी येत न्हवती.डाव्या बाजूला एक पाण्याचे मोठे कोरडे टाके लागते ते पाहून परत पुढे सरकलो गडवाटेवर निवडुंगाची जाळ्या खूपच ठिकठिकाणी माजल्या होत्या ते पाहून खूप दुःख वाटले.वाटेत अजून 2-3 पाण्याची टाकी पाहून वर सरकत शेवटी एकदाचे माथ्यावर पोचलो.
सह्याद्रीतील वारा किती बेफाम असतो ते या माथ्यावर आल्यावर लगेच जाणवते.भगव्याची जोरात होणारी फडफड आणि समोर दिसणारे सह्याद्रीचे उंचच उंच ताशीव कातळकडे डावीकडे दिसणारा भव्य नाणेघाट घाटघर परिसर,नानाचा अंगठा व हरिश्चंद्र, कलाडगड,रोहिदास,कळसुबाई शिखर परिसर डोळ्यांचे पारणे फिटावे आणि कित्येक वेळ तेच दृश्य डोळ्यांत साठवण्याचा प्रयत्न करत बसणे.भैरवगड माथ्यावर फार जागा नाही.थोडा वेळ आराम करून लगेच परतीचा प्रवास पकडला.खाली उतरताना दगडमातीने भरलेली टाकी लक्ष वेधून घेत होती ते पाहून जीव कासावीस झाला आणि तिथेच दोन मित्रांचा दृढनिश्चय झाला फुल न फुलाची पाकळी म्हणून या गडासाठी काहीतरी करायचे या टाक्याला पुन्हा नवसंजीवनी घ्यायची.आलो तसेच पुन्हा ओव्हरहँग पॅचजवळ आलो तेव्हा खालून मुले येताना दिसली त्यांना गडावर येण्यासाठी मदत केली आणि आम्ही दोराशिवाय खाली उतरलो आता त्या चढाईचे सूत्र दोघांनाही समजले होते उमजले होते.खाली उतरताना दुसऱ्या बाजूने गिर्यारोहक कसे चढतात ते आम्हाला पहायचे होते म्हणून त्या बाजूने सर्व आरोहण मार्ग पाहून घेतला आणि काय मनात आले ते सरळ वाटेने न उतरता ढोर वाटेने उतरण्याचा निर्णय झाला.खिंडीकडून हि वाट सरळ भैरवमाचीवर उतरते वाट अशी नाहीच काट्याकुट्यातून वाट काढत,अंदाज घेत भैरवमाची वर येऊन थेट भैरवदेवाचे ठाणे गाठले आशीर्वाद घेऊन आल्या पावली वाटेस लागलो.
उतरताना मग छोटासा चकवा लागुन चांगलीच तंगडतोड झाली पणनशिबाने गावातील स्थानिक माणसे भेटली ते जंगलात वेगळ्याच कामासाठी चालले होते. त्यांच्याकडून जेवणाचे काही संपर्क घेतले सर्व परिसर गोलाकार फिरून शेवटी मुख्य रस्त्यावर आलो ते मनोहर दादांच्या घर कम ढाब्यावर पोचलो. उन्हाने अंग पार पोळून निघालेले त्यात घशाला कोरड पडलेली ती काही केल्या जाईना हातपाय धुण्याच्या नादात अर्धी आंघोळच आटपली तेव्हा कुठं जरा बरं वाटलं.तोपर्यंत मनोहर दादाने गरमागरम चिकन आणि भाकरी ताटात वाढली ती खाऊन समाधानाने ढेकर दिला मनोहर दादासारखा प्रेमळ माणूस या आडवाटेवर भेटला हे मोठेच भाग्य होते भैरवगडावर होऊ घातलेल्या चांगल्या कार्याची ती नांदी होती.असा हा राकट रांगड्या भैरवगडाचा ट्रेक सुफळ संपूर्ण झाला आणि आम्ही समाधानाने पुन्हा परतीची वाट धरली ती पुन्हा इथे येण्यासाठीच….
भैरवगड माथ्यावरील पाण्याचे टाके 2 संवर्धन मोहीम घेऊन सफर सह्याद्री ट्रेकर्सच्या माध्यमातून साफ करण्यात आले आहे या गडवाटेवर वृक्षारोपण सुद्धा टीमतर्फे करण्यात आले आहे त्याची खाली लिंक देत आहे.
http://safarsahyadri.com/social-events/
तळटीप : मोरोशीचा भैरवगड हा सह्याद्रीतील एक अवघड गिरिदुर्ग असून पुरेशा अनुभवाशिवाय,गाईडशिवाय व टेक्नीकल साहित्याशिवाय इथे जाणे धोक्याचे आहे तसा कोणीही प्रयत्न करू नये. व अशा कोणत्याही कृत्याचे आम्ही समर्थन करत नाही.
किरण भालेकर
सातारा ,रत्नागीरी जिल्ह्यात
सातारा ,रत्नागीरी जिल्ह्यात कोणता ट्रेक असेल तर मला मेसेज टाका, मी येईन.
छान लिहिलंय.. फोटो टाकले तर
छान लिहिलंय.. अजुन फोटो हवे होते..!!
छान लिहिलंय.. अजुन फोटो हवे
छान लिहिलंय..
मस्त
मस्त
जबरदस्त, एक नंबर !
जबरदस्त, एक नंबर !
थरार झक्कास !
थरार झक्कास !
तुम्हाला सलाम !
छान लिहलय
छान लिहलय
भारी.
भारी.
अगागागा ! फोटोतला गड पाहुन
अगागागा ! फोटोतला गड पाहुन डोळे फिरले. वृत्तांत मस्त आहे.
छान सविस्तर लिहिता तुम्ही.
छान सविस्तर लिहिता तुम्ही. वाचायला मजा येते.
मला नेहेमी कौतूक वाटतं ;
मला नेहेमी कौतूक वाटतं ; इतक्या उंचीवर जाऊन , अशा भयानक निमुळत्या ठिकाणी पाहिर्या खोदणार्यांचं..
कलावंतीण , मदन आणिक कित्येक गडांवर अशा पाहिर्या आढळतात.