खरी आठवण

Submitted by अजिंक्यराव पाटील on 27 August, 2019 - 14:33

कच्चा माल : https://www.maayboli.com/node/71214

पावसाळा होता, आणि जसे पावसासोबत बेडकं, घरमाश्या येतात तशीच हिरवळ आणि आठवणी देखील येतात.. अश्यात कोयलला पण आपल्या बालविवाहाची आठवण आली नसती तरच नवल! पावसाने स्वच्छ धुतलेल्या रस्त्यावर मधोमध पडलेल्या शेणासारखा तो दिवस कोयलला लख्ख आठवत होता.
लहानपणी अगोचर, फाटक्या तोंडाची म्हणून ओळखली जाणारी कोयल इयत्ता ९वीत पौगंडावस्थेने हिट झाल्यावर आपल्या बापानं ठरवलेलं बाल-अरेंज मॅरेज मुकाट मान्य करण्याइतकी घुमी कधी झाली हे तिचं तिलाच कळलं नाही. नेमकी कोणती भानगड घरी कळल्यावर हा असा निर्णय घेण्यात आला किंवा आता आपलं किमान शिक्षण कसं पुरं करता येईल किंवा वर्गातल्या बाळ्या, पप्या इतरांना कसं समजवावं - कटवावं, गण्यासोबतचा सारीपाट समोर आला तर काय होणार? "मी किनई डॉक्टर होणारे" म्हटलेल्या आपल्याच लहान रुपाला काय उत्तर द्यावं या सगळ्या बारक्या गोष्टींचा विचार करण्याऐवजी कोयल कधीही न पाहिलेल्या, ज्याचं फक्त नाव माहीत आहे त्या आपल्या होणाऱ्या नवऱ्याच्या आठवणीत रमून गेली.. (आता कधीही न पाहिलेल्या / न भेटलेल्या माणसासोबतच्या आठवणी कश्या असणार असा प्रश्न तुम्हा पामर वाचकांना पडला असेल तर पडू द्या) येताजाता कोयलला आपल्या वयाचा विसर पडून आपलं प्रेम फार मोठं वगैरे वाटायला लागलं..
एव्हाना गावातल्या चार साळकाया माळकायांना या गोष्टीचा पत्ता लागून त्यांनी उगाचच कोयलकडं पाहून सर्दी झालेल्या घोड्यागत खिदळायला सुरुवात केली होतीच, आणि हे सगळं आपल्या मुळावर उठणार आहे हे विसरून कोयलसुद्धा गालातल्या गालात जीभ घोळवत लाजून मुरकून घेत होती. तर असंच एकदा वाण्याच्या सुज्याकडून आणलेल्या क्याशेटिवर साजण मेरा उसपार हैsss मिळणे को दिल बेकरार हैss ऐकताना या १०व्या वर्गातल्या पोरीला प्रेमाचं एवढं भरतं आलं की तिनं आजीच्या गावी कोणत्यातरी क्लास मध्ये असणाऱ्या आपल्या नवऱ्याला भेटायचं ठरवून सदर योजना साळकाया माळकायांना सांगितली.. पैकी माळकाया ग्रुप थोडा हुशार असल्याने तुम्ही व्हा पुढं आम्ही येतोच म्हणून कल्टी मारली, पण साळकायांना कोयलप्रमाणेच आयुष्याकडून आणि स्वतःकडून काहीही अपेक्षा नसल्याने 'तेरी मेरी यारी, मग भोक्कात गेली दुनियादारी' म्हणत आजीच्या गावचा रस्ता धरला.. तिथं कुठल्यातरी क्लास मध्ये त्यांनी एन्ट्री मारली.. त्यांच्या नशिबाने क्लासचा मास्तर अमिताबच्चन नसल्याने त्याने "ये मेरा शिकवणीवर्ग है, तुम्हारे बाप का घर नहीं" वगैरे डायलॉग न मारता साळकाया व कोयल कंपूला वर्गात सामावून घेतले.
थोड्यावेळाने कोयलचा हिरो, मोहननं वर्गात एन्ट्री मारली, वर्गाच्या कोपऱ्यात एकवार ओळखीची नजर मारून इतर पोरींना स्कॅन करत असतानाच नेमकं त्याच्या स्कॅनर मध्ये कोयल आली.. तिला वर्गात बघून एक क्षण मोहन चमकला खरा पण लगोलग इगणोरास्त्र मारून पुढं निघून गेला.
हिकडं आपल्या हिरोईनच्या मनात नुसती गुलाब, झेंडू जास्वंद, तगर वगैरे फुलांची मंडई उघडली होती. बाबा म्हणाले त्याहून काही फार वेगळा दिसत नाही हा असा विचार करत असतानाच सर्दी झालेलं घोडं खिंकाळलं. नेमकं झालं तर काय असा विचार करत कोयलने साळकायांना नजरेनेच प्रश्न विचारला, पुन्हा खिंकाळत त्यांनी नजरेनेच कोयलचं लक्ष कोपऱ्यावर वळवलं..
आपला हिरो साईड हिरॉईनला पुस्तक देताना पाहून कोयलच्या तळपायाची आग मस्तकी पोचली. मुडदा बशिवला सटवीचा वगैरे पवित्र मंत्र तोंडातल्या तोंडात बोलून कोयल तिथून सटकली ते सरळ दहावी पास होऊन त्याच साईड हिरॉईनच्या कॉलेजात शिकायला आली. दिवसभर दोघी एकमेकींना आंबट तोंड लांबट चेहरा करून पाहत राहायच्या. दोघींपैकी एकीचा कोणत्याही बाबतीत काही उल्लेख झाला तर दुसरी इमानेइतबारे एकमेकांसाठी भक्तिभावाने पवित्र मंत्रांचं आवर्तन करीत. एवढ्या दिवसात बेंचवर शाई सांडून ठेवणं, केसांत, कपड्यावर गोखरू टाकणं, लंगडी खेळतांना केस ओढणं, मग भांडून एकमेकींच्या झिंज्या उपटणं, वगैरे प्रेमाचे प्रकार करून झाले होते, अर्थात मूळ मुद्द्याला दोघींनीही हात मात्र कधी घातला नव्हता. कोयलच्या मनात सा ही साठी कडवटपणा ठासून भरलेला, पण सा ही ला नेमकं कारणच माहीत नसल्याने तिच्याकडून फक्त आली अंगावर तर घेईन शिंगावर एवढाच पवित्रा होता.
सावकाशीने एक दिवस असा उगवला की कोयल आणि सा ही दोघींना एकाच वेळी कसलीतरी फोटो काढायला जावं लागलं, सा ही नेच येऊन कोयल समोर तो प्रस्ताव मांडला होता. या सगळ्या भानगडीत हिरो मात्र कुठेच नव्हता.
त्या दिवशी या दोघी निघाल्या आणि जाता जाता उगा टाईमपास म्हणून कोयलने विचारलं,
" अम्म्म, कसकाय अचानक फोटो वगैरे?"
सा ही : माझे होते ते फोटो दिलेत मी कुणालातरी

उत्तर ऐकल्याबरोबर कोयलचा जळून जळून कोळसा झाला. पण कोयलने बाजीगर पिच्चर गण्यासोबत मागच्या लाईनीतल्या कोपऱ्यात बसुन तीनदा पाहिला होता (एकावेळी पूर्ण कधी पाहून होतच नसे), आणि म्हणून तिने शांत राहायचं ठरवलं. साळकायांकरवी निरोप पाठवून कोयलने वाण्याच्या सुजाला कॉन्टॅक्ट केला..

तिसऱ्या दिवशी:
"काय तरी बाई पोरीचं वाईट झालं"
"फार सुंदर होती हो पोरगी, पण या अचानक लागलेल्या हगवणीनं एकाच दिवसात पार वाट लागली पोरीची"
"हगवण म्हणयची की विषबाधा"
गल्लीतल्या बायकांचं तोंडावर पदर लावून कुजबुजणं चालू असतानाच कोयलच्या आजीनं कोयलला आवाज देऊन सांगितलं, अगं त्या पोरीनं तुझी एक वही पण आणून दिली होती, बघ तिथं कपाटात ठेवली तुझ्या..

हे ऐकल्याबरोबर कोयलचं हृदय लककन हललं. धावतच जाऊन तिने वही घेतली तर त्यात एक चिट्ठी!

प्रिय कोयल,
सानविवि आपणास कळविण्यात आनंद होतो की मागल्या रविवारी मोहन भेटला असता मला तुमचे झेंगाट कळले. नुकताच गंगा जमूना सरस्वती हा पिक्चर पाहिल्याने मी तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाण्याचा ठरवला आहे, तरी आपण काळजी करू णये. जिस तर्हा गंगा जमुना सरस्वती का संगम आणि एक मोड पर सरस्वती गायब हो जाती है वगैरे.
जसे हळदीकुंकू मध्ये दोन सवती राहतात तसं राहणं मला जमणार नाही, त्यामुळे मी गण्याला होकार द्यायचे ठरवले आहे, त्याच्याकडे हिरोंडा गाडी असून तो मोहन सारखा मावा खात नाही, म्हणून मोहन सारखा त्याच्या तोंडाचा वास येणार नाही. तरी मी माझे दोन शब्द सम्पवते.
जय हिंद जय महाराष्ट
आपली नम्र
शालू.

ता क: चिट्ठी वाचल्यावर फाडून टाकणे, कालच्या तुझ्या हातच्या भज्या चांगल्या होत्या, याच वहीत रेशिपी लिहून पाठवणे.
----------
हे सगळं आठवून आज कोयलच्या डोळ्यांना पुन्हा बारकीशी धार लागली.. आणि कोयल पुन्हा तेच शब्द बोलली, जे चिट्ठी वाचल्यावर तिने उच्चारले होते..

"गण्या तपकीर लावतो आणि गायछाप पण खातो"

- अजिंक्यराव पाटील.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>> Submitted by ॲमी on 28 August, 2019 - 05:19<< त्या धाग्यावरच्या तुमच्या प्रतिसादातली कल्पना सत्यात उतरली इकडे!

> त्या धाग्यावरच्या तुमच्या प्रतिसादातली कल्पना सत्यात उतरली इकडे! > हो Lol
खरंतर ते वाचून प्यार तुने क्या किया मधली उर्मिला आठवली होती मला.

Rina, क्षमस्व.. पण तुमची चौफेर उधळलेली कथा वाचून स्वतःला अडवताच नाही आलं मला.. खिलाडूवृत्तीने वाचा, मजा वाटली तर एन्जॉय करा! नाही तर इगणोरास्त्र आहेच.

>>प्यार तुने क्या किया मधली उर्मिला << चित्रपट पाहिलेला नाही, पण विकिपीडियावर वाचून आलं लक्ष्यात.

ध मा ल लिहिलंय अगदी. हहपुवा झाली. मूळ कथेत फार लांबण लावलंय आणि जीव फार थोडा आहे पण तुम्ही अगदी जबरदस्त फोडणी दिली आहे. मूळ लेखिकेने अजून कथा लिहाव्या आणि तुमच्या प्रतिभेला अजून धुमारे फुटावे ही सदिच्छा.
हिरोंडा Rofl
आली अंगावर तर घेतली शिंगावर Rofl

Happy आवडली.. दोन्ही विडंबनं मस्त आहेत. ह्यापुढे मायबोलीवर हळुवार, भावनिक ई. ई. लिहीणार्यांना पाटीलसाहेबांचा धाक असणार हे नक्की. Wink Happy

मस्त जमली आहे.
मूळ कंसेप्ट (स्टोरी) इतकी युनिक आहे कि वाचायला मजा आली.

धमाल Lol
आधी जाऊन मूळ आठवण वाचली. मग तिचा हा metamorphosis

>>आवडली.. दोन्ही विडंबनं मस्त आहेत. ह्यापुढे मायबोलीवर हळुवार, भावनिक ई. ई. लिहीणार्यांना पाटीलसाहेबांचा धाक असणार हे नक्की<<
नाही हो, या विडंबन कथेची प्रेरणा असलेली कथा वाचून मला गरगरायला झालेलं, म्हणून लिहिलं हे. भावनिक कथा म्हणाल तर मला आवडतात भावनिक वगैरे, पण थोडं रिऍलिस्टिक असेल तरच.