युगांतर - आरंभ अंताचा भाग ३३

Submitted by मी मधुरा on 17 August, 2019 - 05:37

"आवाज अनोळखी आहे हा विदुर. कोण आहे तो वीर जो द्वंद्व करण्यास आव्हान देऊ इच्छितो.... ते ही अर्जुनाला?" धृतराष्ट्राच्या अंधारलेल्या नेत्रांपुढे एक आशेचा किरण जागृत होत होता..... 'एखाद्या तिसऱ्याच व्यक्तीने अर्जुनाला हरवलं की ही स्पर्धा बाद ठरवून वेगळ्या स्पर्धेचे आयोजन ! मग दुर्योधनच्या राज्याभिषेकात अडथळा नाही.' धृतराष्ट्राला त्या वीराबद्दल उत्सुकता लागून होती.
"जितका तुम्हाला आवाज अनोळखी आहे, तितकाच अपरिचित आहे तो तरुण मला, महाराज."
"मला सांग विदुर, कसा दिसतो तो?"
"अलौकिक! सुवर्ण घातले आहे त्याने, महाराज कानांत.....आणि अंगावरचा पोषाखही पूर्ण सुवर्ण आहे."
"सर्वच सुवर्ण धारण करतात. त्यात विशेष काय आहे, विदुर?"
"ते सुवर्णच विशेष आहे, महाराज. सामान्य नक्कीच नाही. कितीही उत्तम कलाकुसर केली, कितीही बारकाईने विणले तरी असे वस्त्र बनवणे शक्य वाटतं नाही. निदान हस्तिनापुरात तरी खात्रीशीररित्या असा एकही कारागीर नाही. फक्त सुवर्णच नाही तर या वीराची कांतीही अत्यंत तेजस्वी आणिअद्वितीय आहे. महाराज, उल्कापातानंतर तारे भूमीवर येतात. त्यांचे तेज भुवर आल्यावर त्यांची साथ सोडते. मात्र भूमीवर तेजस्वी ताऱ्याच्या तेजवान तुकड्याला सचेतन रुपात पहिल्यांदाच पाहतो आहे मी, महाराज."
"खरचं विदुर?"
"हो महाराज.... त्याची धनुष्यावरची पकड एका योद्ध्याची आहे आणि चाल एका राजासारखी...... आत्मविश्वासाने भरलेली. नजर अगदी सरळ.... तीक्ष्ण."
पुढे येत त्या तरुणाने कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य आणि महाराज धृतराष्ट्राकडे पाहून नमस्कार केला.
"तुला माहित आहे, तु कोणाला आव्हान देतो आहेस द्वंद्वाचे?" कृपाचार्य उठून उभे राहिले.
"होय, कुलगुरू कृपाचार्य! ज्याला राजगुरु द्रोणाचार्य आत्ता याच राजपटांगणात समस्त हस्तिनापुरासमोर सर्वश्रेष्ठ धनुर्धारी म्हणाले, त्याला देतो आहे."
"ते युवराज अर्जुन आहेत. कुंतीपुत्र, चंद्रवंशी, गंगापुत्र भीष्माचार्यांचे पौत्र आणि कुरुघराण्याचे राजकुमार आहेत. आता तू तुझा परिचय दे वीर."
त्याने त्याचे धनुष्य वर उचलले.
"वीराचा परिचय त्याचे सामर्थ्यच देते, कृपाचार्य. एका गदाधाऱ्याचा परिचय त्याच्या गदेच्या प्रहार असतात. आणि एका धनुर्धाऱ्याचा परिचय त्याचे धनुष्यातून सुटलेले बाण." त्याने अर्जुना कडे पाहिले. "हे राजकुमार अर्जुन, मी द्वंद्व करायचे आव्हान देतो आहे."
"स्विकारले." अर्जुनाने धनुष्य उचलले आणि बाण चढवणार इतक्यात कृपाचार्यांचे शब्द कानावर पडले, "थांबा..... हे द्वंद्व नियमांनुसार मान्य नाही."
अर्जुनाने धनुष्य खाली ठेवले.
"पणं का कुलगुरू कृपाचार्य?" त्या तरुणाने आश्चर्य चकित होऊन विचारले.
"हे कौशल्य दर्शन भावी महाराजा निवडण्यासाठी होत आहे. तेव्हा येथे परिचय देणे आवश्यक आहे. अनोळखी व्यक्तीशी झालेले द्वंद्व कसे ग्राह्य धरले जाईल? त्यामुळे आधी तुझा परिचय दे."
तो मान खाली घालून शांत उभा राहिला..... जणू त्याला कोणी त्याला एखादे कटू रहस्यच विचारत होते.
"वीर, तुझे तेजच आम्हाला सांगते आहे की तू कोणी सामान्य नाहीस. द्रोणशिष्य अर्जुनाला आवाहन केलेस तेव्हाच इथे बसलेल्या लोकांच्या नजरेत तुझ्याबद्दल कुतूहलासोबत आदरही निर्माण झाला. परंतु नियम पाळावे लागतात. परिचय दे. तुझे युध्द कौशल्य बघायला आम्ही उत्सुक आहोत." भीष्माचार्य म्हणाले.
तो अजूनही शांत होता. पण शांतता फक्त मुखापुरती मर्यादित होती. मनात कल्लोळ माजलेला होता. आणि डोळ्यांत अपमानाची भिती होती.
"परिचय दे, वीर. कोणाचा पुत्र आहेस? कोणत्या वंशाचा?"
"थांबवा हे सगळं." दुर्योधन आसनावरून उठला. भीमच्या गदेच्या प्रहाराने जागोजागी लागलेल्या मुकामाराला विसरून चालत चालत त्या तरुणाजवळ आला. "आचार्य, प्रत्येकाचा परिचय त्याची योग्यता असते. गुरु द्रोण, तुम्हालाही असे वाटते की परिचय विद्येपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे?"
"दुर्योधन, ही रणभूमी नाही. राजपटांगण आहे. इथे शस्त्राइतकेच महत्त्व शास्त्रालाही आहे. आणि स्वतःचा परिचय देण्यात काय आपत्ती आहे?"
तरुण अजूनही शांत उभा होता.
"अस्सं? काय परिचय हवा आहे तुम्हाला कृपाचार्य? एका प्रदेशाचा भूपती असण्याचा परिचय पुरेसा आहे?" त्याने तरुणाकडे पाहिले. सुर्याचा प्रकाश त्या वीरावर पडला होता. क्षणभर त्या सुवर्ण कवचाच्या लखलखाटाने दुर्योधनचे डोळे दिपले. आणि पुढच्याच क्षणी त्याच्या खांद्यावर हात ठेवत दुर्योधन म्हणाला, "तुझा परिचय नाही विचारणार मी. तो तुझ्या धाडसाने, हिंमतीने दिला मला. परंतु निदान मला या वीराचे नाव कळू शकेल....मित्रा?"
'मित्रा??? मी ? मला एक राजपुत्र मित्र म्हणाला? ते ही समस्त हस्तिनापुरसमोर???' तरुणाने आश्चर्याने दुर्योधनाकडे बघितले.
"कर्ण नाव आहे माझे, युवराज." त्याच्या मुखातून नाव बाहेर पडले आणि आणि दुर्योधनाने घोषणा केली.
"मी दुर्योधन..... महाराज धृतराष्ट्र यांचा जेष्ठ पुत्र, मिळालेल्या अधिकारांच्या अंतर्गत, माझ्या मित्र-कर्णाला..... हस्तिनापुरातील अंग देशाचा राजा घोषित करतो आहे."
त्याने कर्णाकडे पाहिले. कर्णाच्या चेहऱ्यावर सगळे मिश्र भाव होते. आनंद, आश्चर्य, कृतज्ञता.....! स्वप्नवत होतं सारं! पापणी लवते न लवते तोच तो अंग देशाचा राजा बनला होता, एका राजकुमाराचा मित्र बनला होता आणि सर्वात महत्वाचे.... त्याला मिळाली होती...... अर्जुनाशी द्वंद्व करण्याची मान्यता!
"या पुढे हा दुर्योधन तुझा मित्र आहे आणि तू एक राजा आहेस, कर्ण." सुरा उपसून दुर्योधनाने स्वतःच्या अंगठ्यावर खसकन फिसवला आणि रक्ताने कर्णाच्या कपाळावर राज्यतिलक लावला.....कर्णाच्या नावाने जयघोष सुरु झाला. "अंगराजा कर्णाचा विजय असो....."
"मिळाली ओळख, आचार्य? मिळाला परिचय?" दुर्योधनाने कृपाचार्यांना प्रश्न केला. त्यांनी होकारार्थी मान हलवली.
"युवराज दुर्योधन..... तुम्ही जे उपकार केले आहेत ते फेडण्याकरता हा कर्ण आयुष्यभर तुमच्या आधीन राहिल." दुर्योधनाने कर्णाला मिठी मारली. दुर्योधनच्या चेहऱ्यावर कितीतरी वेळानंतर एक स्मित दिसू लागलं होतं.
"जा अंगराज कर्ण. तुमचे द्वंद्व पूर्ण करा."
कर्णाने धनुष्य हातात घेतले आणि अर्जुनाने बाण प्रत्यंचेवर ताणला, तोवर एक हाक आली.
"कर्ण!"
"पिताश्री?"
कर्णाने त्याच्या पित्याला वाकून नमस्कार केला आणि काही बोलणार तोवर मागून कृपाचार्यांनी ओळखले......"अधिरथ महोदय?"
अधिरथने सर्वांना प्रणाम केला.
"कर्ण, तू अधिरथाचा पुत्र आहेस?" कृपाचार्यांनी विचारले.
कर्ण पुन्हा शांत बसला.
"हा तर सूतपुत्र आहे....." भीमला हसू आवरेना. 'इतका वेळ तो कुणी राजकुमार आहे की काय असे वाटतं होते. उगाच अर्जुनाकरवी पराभव झाला म्हणून प्रतिशोधात हस्तिनापुरावर आक्रमण होणार.... मग युद्धात वेळ खर्ची जाणार.... आणि महत्वाचे म्हणजे त्यात राजभोजन वेळेवर होणार नाही. उगाच कष्ट! सगळं टळलं.'
गर्दीला चर्चेचे उधाण आले होते....
"महाराजांच्या रथाची देखभाल अधिरथच करायचा ना?"
"आणि आता त्याच्या पुत्र बघा.... थेट राजकुमारांशी द्वंद्व करायला आलाय तोंड वर करून...."
"लाज कशी वाटतं नाही त्याला...."
"हा अर्जुना समोर उभा राहील असे याच्या पित्याला तरी वाटले होते का?"
"काही नाही हो... दुर्योधनकडून दान हवे होते त्याला...." "मग काय ! पांडव आणि दुर्योधनाचे वैर माहिती असणार त्याला."
कर्ण मान खाली घालून उभा राहिला.
"कर्णा, मला कळले की तुला अंग देशाचा राजा घोषित केलेले आहे...."
"हो, पिताश्री."
"अभिनंदन कर्णा. चल. तुझ्या मातेलाही ही वार्ता द्यायला हवी."
"पण पिताश्री.... एक द्वंद्व पूर्ण करायचे आहे. मी नंतर येईन."
"द्वंद्व? कोणाशी?"
कर्णाने हातात धनुष्य घेऊन वाट बघत उभ्या असणाऱ्या अर्जुनाकडे बोट दाखवले.
अधिरथच्या चेहऱ्यावरचे भावच पलटले. चेहरा पांढराफटक पडला. विस्फारलेल्या नजरेने त्याने कर्णाला म्हणले, "कर्णा.... राजकुमारांशी द्वंद्व करायची परवानगी कोणी दिली तुला? चल.... हे स्थान आपल्या करता नाहीये."
"हो ना.....उगाच वेळेचा अपव्यय!" भीम म्हणाला तसा कर्ण चिडला. 'आधी सुतपुत्र म्हणाला. आता आपल्या कौशल्य प्रदर्शनाला वेळेचा अपव्यय म्हणतो?'
कर्णाला काय माहिती? भीमच्या जेवणाची वेळ उलटून गेली होती या सगळ्या प्रकारात! हेतूपुर्वक नसले तरी भीमचे बोलणे कर्णाला चांगलेच झोंबले होते.
"अर्जुनने आव्हान स्विकारले आहे, पिताश्री. मी असा परत येऊ शकत नाही." त्याने भीम कडे पाहिले, "आणि जर वेळेचा अपव्यय झालेलाच आहे, तर अजून काही वेळ गेल्याने काही बिघडणार नाही."
भीम चिडला, "एका सूतपुत्राला माझ्या बंधु समवेत द्वंद्व करता येणार नाही."
"भीम, शांत हो. विदुर, तुला काय वाटते?" भीष्माचार्यांनी विचारले तेव्हा विदुर कर्णाच्या सुवर्ण कवचाकडे पाहत होता.
"द्वंद्वयुद्धाला संमती द्यावी, महामहीम!" भीष्मांनी कृपाचार्यांकडे पाहिले.
"ठीक आहे. अनुमती आहे."
अधिरथ घाबरून बाजूला उभा राहिला. मनातून देवाला प्रार्थना करत की हे द्वंद्व होऊच नये.
कर्ण आणि अर्जुन समोरासमोर उभे होते. धनुष्याची पकड घट्ट झाली. बाणाने ताणलेली प्रत्यंचा पुर्वपदावर येण्यासाठी आतूर झाली होती. सगळ्यांच्या नजरा उत्सुकतेने बघत होत्या. धनुष्याच्या प्रत्यंचेचा टंकार होणेच बाकी होते.
.......आणि सुर्यास्त झाला!
"कौशल्य दर्शन समाप्त होत आहे. नियमानुसार आज निकाल न लागल्याने ही स्पर्धा रद्दबादल करण्यात येत आहे. राजा निवड प्रक्रिया आता दुसऱ्या पद्धतीने करण्यात येईल." कृपाचार्यांनी घोषित केले.
"आणि त्यात कौरववंशी राजकुमारांनाच सहभागी होता येईल." द्रोणाचार्यांनी एक नवीन नियम जोडला.
एकमेकांकडे नजर टाकून दोघांनी धनुष्य खाली ठेवले.

कर्ण आतून घुसमटला होता. त्याच्या आत आग लागून सारे स्वप्न खाक झाले होते. त्याचा धूर मनात सर्वत्र पसरून त्याला श्वास घेणेही जड जाऊ लागले. इतका अपमान सहन करून त्याला सामर्थ्य दाखवण्याची संधी मिळाली होती. आणि ऐनवेळी सुर्य देवाने पाठ फिरवली होती. 'कुठे कमी पडलो सुर्यदेव? भक्तीत कमी पडलो की उपासनेत? तुम्हाला माहित होते ना माझे स्वप्न? शस्त्र उचलताना..... निद्रावस्थेत असताना..... विद्या ग्रहण करताना...... रोज अर्घ्य देताना.... एकच तर स्वप्न होते! सर्वांना सामर्थ्य दाखवायचे. गुरू द्रोणांना दाखवायचे की मी कौरव नसलो, क्षत्रिय नसलो तरी योद्धा आहे! एकच संधी मिळाली होती मला. आता ती ही गेली.... आज काही क्षण थांबायला हवं होतं तुम्ही, सुर्यनारायणा! केवळं काही क्षण!!!'

"कुंती, तू गप्प का? काय झाले?"
गांधारीने कुंतीला पुन्हा हलवून पाहिले. तिला आत्ता लक्षात आले, की कुंती तर बेशुद्ध पडलेली आहे.

©मधुरा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा भाग खुप आवडला..

आधी मृत्युंजय मधे केलेलं वर्णन डोळ्यासमोर दिसायचं.तसाच आता तु लिहिलेला हा भाग लक्षात राहिल. Happy Happy पु.भा.प्र!

नमस्कार,

युगांतर- आरंभ अंताचा या कथेचे ३३ भाग पूर्ण झाले. रोज एक भाग टाकत आज महिना उलटून गेला. मराठीत कोणतेही पात्र मध्यवर्ती न ठेवता महाभारत लिहिण्याचा प्रपंच मी असाच सुरु ठेवणार आहे, मात्र पुढचे भाग आता रोज टाकणे जमेल असे दिसत नाही. जमेल तसा वेळ काढून पुढचे भागही लिहून पोस्ट करेन.

लोभ असावा. Happy

-मधुरा

मैत्री असावी तर कर्ण दुर्योधन सारखी.

भीम खरंच इतका भुक्कड होता का? फार विनोदी वाटत आहे त्याचे वागणे या भागात.

धन्यवाद अज्ञातवासी.

च्रप्स, तो भुक्कड नव्हता पण वाईटही नव्हता. भीमने कर्णाचा अपमान केला सूतपुत्र म्हणून. इतकाच उल्लेख आहे. त्याचे योग्य असे कारणच नाहीये. अर्जुनाच्या बाणांवर सर्वांचा अढळ विश्वास होता. मग एकटा भीमच का चिडला कर्णावर? तर कर्णाने चिडून प्रत्युत्तर दिले आणि मग भीम चिडला. सुरुवात एका छोट्या गोष्टी पासूनच होते मोठ्या वैराची. Happy

हे.मा.वै.म.