युगांतर - आरंभ अंताचा! भाग ३२

Submitted by मी मधुरा on 16 August, 2019 - 04:15

भाग ३२

"काय झाले गुरु द्रोण?"
"कृपाचार्य, तुम्ही?"
"इतक्या रात्री तुम्ही जागे का ?"
काय उत्तर द्यावं हे न सुचल्याने द्रोणाचार्यांनीच प्रतिप्रश्न केला, "तुम्ही या प्रहराला इथे?"
"एक निर्णय घेतला गेलाय आज राज्यसभेत.... त्यामुळे जरा अस्वस्थ आहे."
"कसला निर्णय?"
"ते होणारा महाराज ठरवणार आहेत येत्या सप्ताहामध्ये."
"त्यात अस्वस्थ होण्यासारखे काय आहे, कृपाचार्य? ही तर आनंदाची बाब आहे."
"ते सर्वांचे युद्धकौशल्यावर मापन करणार आहेत गुरुवर!"
"ह्मम. मग कोण निवडला जाण्याची भिती वाटते आपणास?"
"आपल्या पासून काहीच लपून नाही. नव्याने नाव घेणार नाही मी आचार्य, पण मनात द्वेष आणि राग असलेला राजकुमार राजा बनायला नको असे वाटते मला."
द्रोणाचार्य हसले.
"दुर्योधन योग्य आहे पण. त्याच्यात भरपूर ताकद आहे."
"आणि मित्र जमवण्याची कला पण!" नजर रोखत कृपाचार्य म्हणाले.
"काय म्हणायचे आहे तुम्हाला कृपाचार्य?"
"अश्वत्थामा आणि अर्जुन जरी एकत्र धनुर्विद्या शिकत असले, तरी अश्वत्थामा मित्र मात्र दुर्योधनचा आहे, हे माहित आहे सर्वांना."
"स्पष्ट बोला, कृपाचार्य."
"द्रोणाचार्य, आम्ही तुमचा तुमच्या पुत्राबद्दलचा स्नेह जाणतो. पण गुरु पुत्राचा घनिष्ट मित्र आहे, म्हणून दुर्योधन योग्य बनत नाही राज्य चालवायला."
द्रोणाचार्यांच्या चेहऱ्यावर स्मित आले.
"चिंता नसावी, कृपाचार्य. दुर्योधन योग्य आहे असे जरी मला वाटत असले तरी बाकीचे नाहीत, असे म्हणालो नाही मी. दुर्योधना पुढे असलेले प्रतिस्पर्धी अलौकिक आहेत. जर सामर्थ्यबलाची परीक्षा असेल तर भीमच्या गदेपुढे दुर्योधनाचा निभाव लागू शकेल असे मला वाटत नाही. आणि संपूर्ण जगात अर्जुनास हरवेल असा योद्धाही आता नाही."
"आता नाही? म्हणजे आधी होता?"
द्रोणाचार्य चमकले. नंतर मुद्रा शांत करत म्हणाले,
"कृपाचार्य, मी एक श्वान पाहिला. कैक वर्षांपूर्वी. पण आठवण अजूनही आहे. मुखात बाण होते त्याच्या. पण रक्ताचा एक थेंबही बाहेर आलेला नव्हता."
"बाण मुखात? असेही कोणी करू शकतो?"
"हो कृपाचार्य.....एका धनुर्धाऱ्याने केले असे."
"पण का?"
"साधनेत व्यत्यय आला श्वानाच्या आवाजाने म्हणून!"
"काय ही क्रूरता, गुरुवर!"
'क्रूरता....' त्यांच्या मनात तो शब्द घोळला. धनुर्विद्येच कौशल्य बघताना त्यांनी श्वानाच्या वेदनांकडे नकळत दुर्लक्ष केल्याच त्यांच्या आत्ताच ध्यानी आलं होतं.
"कोण होता तो धनुर्धारी, गुरुवर?"
"तोच.....उत्तम धनुर्धारी! जो कदाचित अर्जुनाहूनही...."
"द्रोणाचार्य, अर्जुनापेक्षा उत्तम?? तुमच्या शिष्यापेक्षा उत्तम? कोण?"
"एकलव्य माझाच शिष्य आहे कृपाचार्य!"
"काय? ते कसे शक्य आहे?"
"कारण तो गुरु मानतो मला."
"तुमची अनुमती नसताना?" द्रोणाचार्य शांत राहिले. "द्रोणाचार्य, तुम्ही त्याला दंड द्यायला हवा होता."
"दिला असचं समजा कृपाचार्य.... "
"काय दिलात?"
"त्याला धनुर्विद्या वापरता येऊ नये असा दंड..... त्याचा उजव्या हाताचा अंगठा मागून घेतला मी कृपाचार्य! " अपराधी असल्या सारखे द्रोणाचार्य म्हणाले.
"योग्यच केलंत."
"कृपाचार्य?" द्रोणाचार्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याची छटा पसरली. "तो स्वअध्यापनावर सर्वोत्तम बनला होता. त्याला धनुष्य उचलायला मी शिकवले नाही. बाण निवडायला आणि प्रत्यंचा ताणायलाही नाही. तरीही गुरुदक्षिणा मागणे योग्य? कसे, कृपाचार्य? कसे?"
"जर साधनेत व्यत्यय आला म्हणून त्या श्वानाला घायाळ केले तर मोठेपणी तो कोणाचीच तमा बाळगणार नाही, गुरुवर. तुम्ही आत्मक्लेषात का आहात, मी समजू शकतो. पण तुमच्या त्या सर्वोत्कृष्ट धनुर्धाऱ्याने श्वानाला दिलेल्या वेदनांपुढे तुम्ही दिलेला दंड काहीच नाही. द्रोणाचार्य, त्या श्वानाला मुखात लागलेल्या बाणांमुळे वेदना होत राहतीलच, परंतु तो ना काही खाऊ शकेल, ना पाणी पिण्या योग्य त्याला धनुर्धाऱ्याने सोडले. बाणांचा आघात होऊनही रक्तस्त्राव बाहेर झाला नाही पण आत झाला नसेल? वेदना झाल्या नसतील? होणाऱ्या यातना सहन करायला जिवंत ठेवलेल्या त्या श्वानाच्या मुकपणाची ही चेष्टा आहे. ही क्रूरता नाही तर दुसरे काय आहे द्रोणाचार्य? तो अर्जुनाहून अधिक उत्तम धनुर्धारी असेलही..... एक सर्वोत्कृष्ट शिष्यही असेल.... पण योद्धा? नाही गुरुवर! ज्याला भूतदया नाही, ज्याच्या शस्त्रावर दयेचे, करुणेचे बंधन नाही, तो सर्वोत्कृष्ट योद्धा असूच शकत नाही."
कृपाचार्यांचा शब्द न शब्द खरा होता. विनय, विवेक, उदात्त हेतू आणि भूतदया नसेल तर मिळालेले ज्ञान सर्वनाश करते. द्रोणाचार्यांना मोकळे झाल्यासारखे वाटले. मनावरचा भार हलका झाला होता. त्यांना जाणवत होते..... त्यांनी जे केले ते केवळ हस्तिनापुर, त्यांचा शब्द राखण्यासाठी नव्हते... तर ते आवश्यक होते....भविष्यातल्या विनाशाला टाळण्याकरता!
"द्रोणाचार्य, मी निघतो. आज्ञा असावी."
------------
ऱाजपटांगण सजले होते. शस्त्रांचे सर्वोत्तम नमुने ठेवलेले होते. नगरवासीयांनी तुंबळ गर्दी केली होती. हस्तिनापुरचे भविष्य ठरणार होते. राजपरिवार आसनस्थ झाला होता.
"महाराज, भीष्माचार्य, कृपाचार्य, महामंत्री विदूर आणि द्रोणाचार्य यांच्या उपस्थितीत आज कौशल्यदर्शन सुरु करण्यात येत आहे."
"यात सर्वोत्तम योद्धा निवडला जाणार आहे. प्रत्येकाने आवडते शस्त्र निवडून हातात घ्या."
सगळ्यांनी आपापल्या वेधवून घेणाऱ्या शस्त्रांची निवड केली. अर्जुनाने दूरवरचे लक्षही भेदू शकेल अश्या धनुष्यबाणाची निवड केली. युधिष्ठिराने त्याच्याच सारख्या सरळ एकरेषीय भाला घेतला. दुर्योधन आणि भीमने स्वतःसारखी भक्कम गदा निवडली.
द्वंद्वयुद्धासाठी नावे पुकारली जाऊ लागली. प्रत्येक वीर साऱ्या शक्तीनिशी जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न करू लागला. जमलेली मंडळी आवडत्या वीराचे नाव घेत विजय घोषणा देत होते.
जिंकलेल्या योद्ध्यांचे एकमेकांशी द्वंद्व सुरु झाले.
भीम आणि दुर्योधन एकमेकांपुढे उभे ठाकले. दुर्योधन अगदी आरामात आपण भीमाला हरवू अश्या विश्वासाने समोर आला. कक्षातल्या एका पुतळ्याला भीम समजून त्यावर नियमित गदेचा सराव करणारा दुर्योधन ! त्या पुतळ्यावर गदा प्रहार करून त्याने पुतळ्याचा चेंदामेंदा करून टाकला होता.
भीमाने गदा उचलली आणि थेट दुर्योधनावर फेकली. त्या अनपेक्षित वाराने तो पडता पडता वाचला. बुचकळ्यात पडून त्याने भीम कडे पाहिले. पुतळा निर्जीव होता... प्रतिकार करत नव्हता. पण भीम सचेतन होता आणि ताकदवर पण. जमेल तसा वार करत आणि हरू नये याची काळजी घेत दुर्योधन भीमाचे प्रहार चुकवत होता. ऱागारागाने तो भीमला गदेने मारण्याचा प्रयत्न करत होता. भीम सहजपणे त्याचे प्रत्युत्तर देत होता.
"हे कौशल्य दर्शन नाही. काही वेगळेच सुरु आहे.....महाराज, थांबवा हे!" शकुनीने धृतराष्ट्राच्या कानात कुजबुज केली.
"गुरु द्रोणाचार्य, थांबवा हे द्वंद्व."
द्रोणाचार्यांनी अश्वत्थामाला सांगून दोघांना बाजूला केले.
आणि अर्जुननाने धनुष्य उचलले. युधिष्ठिराच्या हातातला भाला त्याने पहिल्याच बाणाने पाडून त्याला पराजित केले. एकामागून एक बाण सोडत त्याने कधी दुर्योधनाभोवती बाणांची भिंत बांधली, कधी भीमाचा मार्ग बाणांनी व्यापून टाकला. सगळ्यांनी हार मान्य केली. अर्जुनही नम्रपणे सर्वांना नमन करत होता.
"पहा गुरुद्रोण! समोरच्या व्यक्तीला किंचितही जखम न करता पराजित करण्याची कला!" कृपाचार्य आनंदाने म्हणाले.
"पण युद्धात ही कला काय कामाची? तिथे नरसंहार करावा लागतो." शकुनी चिडून म्हणाला.
"गांधार नरेश शकुनी, युद्धात शत्रू समाप्त करावे लागतात, पण योद्ध्याचा हेतू विजय मिळवणे असावा. कोणाला हानी व्हावी हा नाही. जर एखादा शत्रू शरणागती पत्करत असेल तर त्याचा वध करणे धर्मसंगत नाही."
पुढच्या हरेक द्वंद्वातही अर्जुनाने बाणांचे पथ बांधत विजयश्री चे स्वागत केले.
द्रोणाचार्य, कृपाचार्य, कुंती आणि भीष्माचार्य अर्जुनाकडे अभिमानाने, कौतुकाने पाहत होते.
"हे योग्य नाही महाराज. ज्याच्या हातात गदा आहे, त्याला धनुर्धारीशी द्वंद्व करायला लावून पराजित मानणे कोणत्या नियमाला अनुसरून आहे?"
धृतराष्ट्र निकाल ऐकून अस्वस्थ झाला होता. पण काही पर्याय नव्हता. "शकुनी, पण अर्जुनासमोर कोण धनुर्धारी टिकेल? आणि भीम सोबतच्या युद्धात काय झाले हे पाहिले आपण."
द्रोणाचार्यांनी आनंदाने घोषणा केली, "अर्जुन हा सर्वोत्कृष्ट धनुर्धर आहे."
"नाही द्रोणाचार्य. अजून एक द्वंद्व बाकी आहे....." एक कणखर आवाज गर्दीतून ऐकू आला आणि सगळ्यांचे लक्ष त्या आवाजाच्या दिशेने गेले.

©मधुरा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे सांगायचे राहिलेच की......
तुमचं लिखाण एकदम जबरदस्त आहे... लहानपणी पाहिलेली रामानंद सागर ची मालिका अर्थातच डोळ्यापुढे उभा राहते...... आणि ती उभा करणे खचितच सोपे काम नाही..... तुम्ही लिहिलेल्या प्रत्येक भागात तुम्ही लिहिण्यासाठी घेतलेले कष्ट दिसून येतात.....
तुमचा महाभारताचा गाढा अभ्यास दिसून येतो....
प्रत्येक वाचल्यानंतर पुढच्या भागाची उत्सुकता लागून राहते.....
पुढचा भाग लवकर येईल अशी आशा व्यक्त करतो.....
पुढील लिखाणासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा......

कृष्णाच्या मनातील द्वंद तुम्ही निश्चितपणे उत्तमरित्या साकाराल.....
मला विश्वास आहे.....
मी वाट पाहिन....

मग मला तरी असे वाटते की महाभारताचे युद्ध पांडवांना त्यांच्या स्वबळावर कृष्णाने लढू द्यायला हवे होते......
हे. मा. वै. म.
>> सहमत. कृष्ण पांडवाचा पक्षधारी होता व पांडवांचा जय होण्यासाठी सर्व काही केले. सगळ्यात वाईट वाटते आपलेच रक्ताचे सैन्य विरोधी पक्षात देऊन नाश करवले. कृष्ण हा अत्यंत उद्विग्न होऊन शेवटी एकटाच वनात गेला पण हे त्याला देव मानणारांना कधीच पटत नाही.

मधुरा ताई तुम्ही छानच लिहित आहात आणि गेल्या एक दोन भागांवरील प्रतिसादही खूपच रंजक आहेत. एकाच घटनेचे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून केलेले आकलन मजा आणते आहे. त्यामुळे सर्व प्रतिसादकांचेही आभार.
आजचा भाग विषेश आवडला कारण कालच्या भागावर जी चर्चा झाली होती त्यात भर घालणारा वेगळा पैलू तुम्ही कृपाचार्यांच्या मते सांगितलात. एकलव्याच्या बाबतीत झाले ते योग्य का अयोग्य ह्याचे उत्तर काळ्या पाढर्‍या सारखे स्पष्ट नाही हे जाणवले. आजच्या जमान्यातही एखादा विद्यार्थी फी न भरता किंवा मनाई केली असतानाही खासगी शिकवणी चोरुन ऐकू लागला तर शिक्षकाला चालायचे नाहीच Happy मग त्या काळातल्या शिक्षकालाही ते आवडले / चालले नाही असे असू शकते. द्रोणाचार्य ही शेवटी मनुष्यच. असो..
एक विचारु का? तुम्ही "भीमने", "भीमच्या", "भीमला" असे लिहिता.. ते भीमाने, भीमाच्या असे हवे ना? कारण इतर वेळी तुम्ही दुर्योधनाने, अर्जुनाने असे लिहिता, तसेच भीमाला ही हवे Happy

मस्तच !

भीमपुत्र बार्बरीकबद्दल माहीती पहिल्यांदाच वाचायला मिळाली.
अजुन कुठे मिळेल?
कुणीतरी लिहा प्लीज!

अमर,
कृष्ण देव नव्हता? मग कोण आहे देव तुमच्या करता?
जरा सांगाल?

धन्यवाद चौकट राजा.

भीमाने लिहिल्यावर काही जणांनी आक्षेप घेतला म्हणून भीमने असे लिहिले. Happy

मस्तच !>>> धन्यवाद आसा.

भीमपुत्र बार्बरीकबद्दल माहीती पहिल्यांदाच वाचायला मिळाली.
अजुन कुठे मिळेल?
कुणीतरी लिहा प्लीज! >>>>> बार्बरिक भीमाचा पौत्र होता. भीम त्याचा आजोबा. भीमाचा पुत्र घटोत्कच! त्याचा पुत्र बार्बरीक.

कथेत तो येईलच. Happy

कृष्ण माझ्या साठी हायेस्ट आय क्यू, इ क्यू असलेला माणूसच होता. तो गनिमीकावा जाणणारा चतूर माणूस होता व जनतेच्या भावना जाणून योग्यवेळी योग्य कृती करणारा मुत्सदी होता. आपल्या लोकांना अद्वितीय कामगिरी करणाऱ्या लोकांना देवत्व बहाल करण्याची सवयच आहे. कौरवांविषयी त्याच्या मनात द्वेष होता व चाणक्याप्रमाणे कौरवांना संपवण्यासाठी अनेक अव्यवहारी कामे त्याने घडवून आणली.

जसं वाचलंय आणि मला आठवतंय, त्यानुसार एकलव्याने श्वानाच्या मुखात सात बाण मारले होते. मात्र त्या बाणांनी श्वानाला कुठलीही जखम न होता, त्याचे फक्त भुंकणे थांबले, याचे द्रोणाचार्यांनाही आश्चर्य वाटले. अर्जुनालाही ही कला अवगत नसताना, हा धनुर्धारी कोण, याचा त्यांनी शोध घेतला, आणि पुढची कथा घडली. मात्र हे दान घेऊन द्रोणाचार्यांनी त्याला मध्यमा आणि तर्जनीचा उपयोग करून बाण चालविण्याची विद्या शिकवली, व हीच विद्या पुढे प्रचलित होईल असा आशीर्वाद दिला...
एकलव्य हा कृष्णाचा चुलत बंधू. वसुदेवाचा भाऊ देवश्रवा रानात हरवला तेव्हा निषादराजाने त्याला दत्तक घेतले. एकलव्य त्याचा मुलगा, आणि कृष्णाला त्याची कीर्ती ठाऊक होती, म्हणून त्याने द्रोणाचार्यांना अंगठा मागण्यास सांगितले.
एकलव्य कुणी साधा निषाद नव्हता, तो शृंगबेर राज्याचा राजा होता. त्याची स्वतःची सेना होती. तो जरासंधाचा मांडलिक राजा होता. त्याने हस्तिनापूर आणि यादवाना सळो की पळो करून सोडले, म्हणून कृष्णाने त्याचा वध केला.
एकलव्याचा पुनर्जन्म म्हणजे धृष्टद्युम्न!!!!
शेवटी म्हणायचं झालंच, तर एक वर्तुळ पूर्ण झालं.

मी काय म्हणते, अमर, यावर आपले एकमत होणे नाही.
पण तुम्ही एकदा विचार करा..... सुदर्शनचक्र, लहानपणीचे चमत्कार, विश्वदर्शन रुप..... हे एक मनुष्य करू शकतो का?

युधिष्ठिर राजसिंहासन पर विराजमान हो गये, तब धृतराष्ट्र गृहस्थ-आश्रम से वानप्रस्थ-आश्रम में प्रविष्ट हो वन में चले गये। (अथवा ऋषियों के एक आश्रम से दूसरे आश्रमों में होते हुए वे वन को गये।) उनके साथ देवी गान्धारी और पृथा (कुन्ती) भी थीं। विदुर जी दावानल से दग्ध हो स्वर्ग सिधारे। इस प्रकार भगवान विष्णु ने पृथ्वी का भार उतारा और धर्म की स्थापना तथा अधर्म का नाश करने के लिये पाण्डवों को निमित्त बनाकर दानव-दैत्य आदि का संहार किया। तत्पश्चात भूमिका भार बढ़ाने वाले यादवकुल का भी ब्राह्मणों के शाप के बहाने मूसल के द्वारा संहार कर डाला। अनिरूद्ध के पुत्र वज्र को राजा के पद पर अभिषिक्त किया। तदनन्तर देवताओं के अनुरोध से प्रभासक्षेत्र में श्रीहरि स्वयं ही स्थूल शरीर की लीला का संवरण करके अपने धाम को पधारे वे इन्द्रलोक और ब्रह्मलोक में स्वर्गवासी देवताओं द्वारा पूजित होते हैं। बलभद्र जी शेषनाग के स्वरूप थे, अत: उन्होंने पातालरूपी स्वर्ग का आश्रय लिया। अविनाशी भगवान श्रीहरि ध्यानी पुरुषों के ध्येय हैं। उनके अन्तर्धान हो जाने पर समुद्र ने उनके निजी निवासस्थान को छोड़ कर शेष द्वारकापुरी को अपने जल में डुबा दिया। अर्जुन ने मरे हुए यादवों का दाह-संस्कार करके उनके लिये जलांजलि दी और धन आदि का दान किया। भगवान श्रीकृष्ण की रानियों को, जो पहले अप्सराएँ थीं और अष्टावक्र के शाप से मानवीरूप में प्रकट हुई थीं, लेकर हस्तिनापुर को चले। मार्ग में डंडे लिये हुए भीलो ने अर्जुन का तिरस्कार करके उन सबको छीन लिया। यह भी अष्टावक्र के शाप से ही सम्भव हुआ था। इससे अर्जुन के मन में बड़ा शोक हुआ। फिर महर्षि व्यास के सान्त्वना देने पर उन्हें यह निश्चय हुआ कि 'भगवान् श्रीकृष्ण के समीप रहने से ही मुझमें बल था।' हस्तिनापुर में आकर उन्होंने भाइयों सहित राजा युधिष्ठिर से, जो उस समय प्रजावर्ग का पालन करते थे, यह सब समाचार निवेदन किया। वे बोले-

'भैया! वही धनुष है, वे ही बाण हैं, वही रथ है और वे ही घोड़े हैं, किंतु भगवान श्रीकृष्ण के बिना सब कुछ उसी प्रकार नष्ट हो गया, जैसे अश्रोत्रिय को दिया हुआ दान।' यह सुनकर धर्मराज युधिष्ठिर ने राज्य पर परीक्षित् को स्थापित कर दिया

इसके बाद बुद्धिमान् राजा संसार की अनित्यता का विचार करके द्रौपदी तथा भाइयों को साथ ले हिमालय की तरफ महाप्रस्थान के पथ पर अग्रसर हुए। उस महापथ में क्रमश: द्रौपदी, सहदेव, नकुल, अर्जुन और भीमसेन एक-एक करके गिर पड़े। इससे राजा शोकमग्न हो गये। तदनन्तर वे इन्द्र के द्वारा लाये हुए रथ पर आरूढ़ हो (दिव्य रूप धारी) भाइयों सहित स्वर्ग को चले गये। वहाँ उन्होंने दुर्योधन आदि सभी धृतराष्ट्रपुत्रों को देखा।
>>> यातच संपूर्ण महाभारताचे सार आहे. एवढे मोठे युद्ध लढल्यानंतर, अठरा अक्षौहिणी सैन्याच्या नाशानंतर पांडवांना कळाले की संसार अनित्य आहे. हेच मानवानं शिकलं पाहिजे.

मधुरा एक अनाहूत सल्ला देतो, तुम्ही माफ कराल अशी आशा आहे.
सातवी - आठवीत असताना मला महाभारताच प्रचंड वेड लागलं होतं, इतकं की महाभारतावर जे पुस्तक दिसेन, ते वाचूनच काढलं पाहिजे असा माझा दंडक होता. दिवस रात्र महाभारत डोक्यात असायचं. (टीनेजके केमिकल लोचे Lol
मात्र जसजसं अनेक पुस्तके वाचत गेलो तसतसं मनस्थिती बिघडत गेली. काय खरं, काय खोटं, कोण चांगलं, कोण वाईट काहीच सुचेनास झालं. विमनस्क मनस्थिती होऊन गेली होती माझी. अनेक दोरे गुंडाळून एकही धागा सापडू नये, अशी मनाची अवस्था झाली होती.
यातून माझ्या आजोबांनी मार्ग काढला. त्यांनी मला सगळी पुस्तके पुन्हा वाचायला सांगितली, मात्र एक पुस्तक मी वाचल्यावर ते स्वतः दुसरं पुस्तक द्यायचे. आणि महाभारत वाचून अस्वस्थ होणारा मी, ते एन्जॉय करायला लागलो, कारण माझ्या प्रत्येक प्रशांची उत्तरे महाभारतातच दडली होती, जसजशी कथा पुढे सरकते, गुंते उलगडत जातात... आणि शेवटी उरतं काहीतरी भव्यदिव्य वाचल्याचं समाधान....
महाभारतातला कुठलाही स्टोरी आर्क अपूर्ण नाही... कुणाचीही कथा अपूर्ण नाही... उत्तरे त्यातच दडलीत...
म्हणून तटस्थ लिहा. त्रयस्थ लिहा. मनात हे पात्र हिरो, हे पात्र व्हिलन ठरवून लिहू नका. कुणाला जस्टीफाय करू नका, आणि कुणाला दोषी ठरवू नका. जसजशी स्टोरी पुढे जाईल, तसतसं एक एक स्टोरी आर्क कम्प्लेट होईल, आणि आम्हा वाचकांना पुनः प्रत्ययाचा आनंद मिळेल...पण मनात कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह न ठेवता लिहिल्यास, तुम्हालाही काही नवीन सापडेल आणि आम्हालाही.
Happy

एकलव्य कुणी साधा निषाद नव्हता, तो शृंगबेर राज्याचा राजा होता. त्याची स्वतःची सेना होती. तो जरासंधाचा मांडलिक राजा होता. त्याने हस्तिनापूर आणि यादवाना सळो की पळो करून सोडले, म्हणून कृष्णाने त्याचा वध केला.
एकलव्याचा पुनर्जन्म म्हणजे धृष्टद्युम्न!!!!

>>>> धृष्टद्युम्न. .....—— द्रोपदीचा भाऊ ना!
एकलव्य पांडवाचा समवयस्क असेल. तर मग धृष्टद्युम्न
एकलव्याचा पुनर्जन्म मानला तर वयाचा ताळमेळ कसा बसतोय?

अज्ञातवासी,

अत्यंत योग्य आहे तुमचे म्हणणे.
मी कोणालाही जस्टीफाय करण्याच्या फंदात पडत नाहीये. पण सर्व बाजू त्यात असाव्यात असे मला वाटते. सर्व जमणार नाहीत. जमतील तितके आणि योग्य वाटतील तितके लिहिन.

Happy

धन्यवाद!

एकलव्य पांडवाचा समवयस्क असेल. तर मग धृष्टद्युम्न
एकलव्याचा पुनर्जन्म मानला तर वयाचा ताळमेळ कसा बसतोय?>>>>>
बरोबर! म्हणूनच तो यज्ञकुंडातून तरुणच प्रकट झाला होता, शिशु म्हणून नाही.
Happy
प्रत्येक स्टोरी आर्क कम्प्लेट असण्याचं प्रातिनिधिक उदाहरण! Lol

कृष्णाने काय चूका केल्या???>>>> मला फक्त असं म्हणायचंय की सामान्य माण्सासारख्या राग, लोभ आपला-परका, कावेबाजपणा हे भाव त्याच्याठाईही होते. आजच्या काळात त्याचं देवपण बाजुला ठेवुन पाहिलं तर धुर्तपणा/खोटेपणा/धोखा म्हणता येईल. Happy
आणि आजच्या काळाच्या कसोटीवर चुका म्हणशील तर महाभारतातल्या सगळ्याच पात्रांच्या ढिगाने आहेत. हो! कृष्णाच्या ही. Happy

छान जमलंय!
सगळे भाग एकत्र द्यावेत.
पुराण काळापासून असे कितीतरी एकलव्य आहेत जे स्वतः च्या कौशल्यामुळे राजकारणाचे बळी ठरलेत.
कृपाचार्यांचे स्पष्टीकरण पटत नाही. कुत्र्याचं तोंड बंद केल्याची शिक्षा म्हणून अंगठा कापला तर मग दुर्योधन, भीमाचं काय?

धन्यवाद यशोदा.

बरोबर आहे तुमचं.
पण कृपाचार्य त्यांच्या जागी योग्य होते.
हस्तिनापुराशी त्यांना कुठल्याही प्रतिज्ञेने बांधले नव्हते. पण तरीही ना युध्दात त्यांनी हस्तिनापुरचा पक्ष सोडला ना कुठल्याही गोष्टीत विचार करताना. पुढे जाऊन जर एकलव्यने हस्तिनापुरवर आक्रमण केले असते तर अर्जुनही बहुदा त्याला रोखू शकला नसता.

हे. मा. वै. म.

Tom Marvolo Riddle is lord voldemort. ही संभावना वाटली कृपाचार्यांना! Happy

सगळे भाग एकत्र द्यावेत.>>>> रोज लिहिते आहे. सगळे भाग अजून लिहूनच झालेले नाहीयेत. Keep reading and do comment about what ever you feel. Happy

Pages