युगांतर-आरंभ अंताचा! भाग २७

Submitted by मी मधुरा on 11 August, 2019 - 10:38

दुर्दैव आणि शाप एकाच घराण्याला गिळंकृत करू पाहत होते. एकीकडे कुंती वनवास भोगत होती आणि दुसरीकडे तिचा चुलत भ्राता वसूदेव, कारावास ! माता पित्यांपासून दूर देवकीनंदन कृष्ण गोकुळात वाढत होता आणि त्याचा आत्मबंधु युधिष्ठिर आणि सोबत वायुपुत्र भीम राजमहालापासून दूर वनातल्या कुटीत.
कुंतीने मंत्रशक्तीने इंद्राला पाचारण केले.
काळंभोर ढगांची गर्दी झाली आणि शुभ्र विजेचा झोत येत तेजस्वी रुप समोर आले.
"प्रणाम इंद्रदेव!"
"कुंती, कश्या पुत्राची अपेक्षा आहे तुला?"
"तो....जो मानव म्हणून उत्कृष्ट असेल. तहानलेली धरा आणि रूक्ष झालेल्या वृक्षांना पाहून जसा तुम्हाला पाझर फुटतो तसाच त्याच्याही मनात करुणता आणि मानवतेचा निर्झर अखंड असावा."
"तथास्तू!"
हातातले बाळ नाजूक आणि दिसायला सुंदर होते. साक्षात इंद्राचं रूप! कुंती आणि पंडु बाळाला घेऊन कुटीत आले. माद्री स्वयंपाकात गर्क होती. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून तिने कुंती कडे पाहीले.
कुंतीने स्मित हास्य ठेवत बाळाला तिच्या हातात ठेवले. माद्रीने बाळाला छातीशी धरले. lतिच्या डोळ्यात अश्रू आले.
"माद्री, काय झालं?"
"काही नाही ताईश्री!" तिने बाळं कुंतीच्या हातात ठेवत डोळे पुसले. "खूप गोड आहे तुमचा पुत्र ताईश्री!"
मनाचा मोह चेहऱ्यावर दिसू द्यायचा नाही, असा पक्का निश्चय करून तिने सुती कापडाची घडी उलगडून बाळाभोवती लपेटले.
पंडू काहीवेळ बाळाशी खेळून त्याला झोपवून शेताकडे गेला. कुंती माद्री जवळ येऊन बसली.
"काय झालंय माद्री?"
"कुठे काय? काहीच नाही." चुकून पुन्हा डोळे भरून तर आले नाहीत ना? तिने तपासले.
"अश्रू लपवशील तू. खुशाल लपव. पण कारण नको लपवूस!"
माद्रीला भरून आलं. 'काय कारण सांगू? हे की तुम्हाला तीन पुत्र रत्ने मिळाली आणि मी....? असहाय्य. एकटी. मेघ धुसमुसून बरसत असतानाही कोरडी ठक्क! नाही.... माद्री दुसऱ्यांवर जळणारी, कमकुवत हृदय असणारी नाही. मन घट्ट ठेव, माद्री. तुझ्या भाळी एकटेपणा असेल, तर त्याला ताईश्री तरी काय करणार? त्यांना मिळालेली संताने त्यांच्या चांगल्या कामाचे श्रेय आहे. पुण्य आहे, आशीर्वादांचं संचित आहे. आपल्या दु:खात त्यांना ओढून परिवाराचा आनंद गिरावण्याचा अधिकार नाही तुझा, माद्री. ज्या क्षितिजाची आस लावते आहेस, तो केवळ आभासी छळ आहे.' माद्रीने स्वतःलाच दटावले.
माद्री काही बोलत नाही हे पाहून कुंती विचारात पडली. 'काय झालं असेल? गेले कैक दिवस माद्री शांत शांत असते.... का? तिला आपल्या परिवारात नवीन सदस्य आले म्हणून वाढलेल्या कामाचा त्रास वाटतं असेल का? पण माद्रीला तर व्यस्त राहायला आवडते. युधिष्ठिर आणि भीमचं सारं तर स्वतः करते आनंदाने. मग?'
तिला एकदम लक्षात आले.....
"माद्री, एक संधी आहे अजून."
"कश्याची संधी ताईश्री?"
"पुत्रप्राप्तीची!"
"आजचं पुन्हा करायचा विचार आहे का?"
"नाही. मी नाहीच करणार."
माद्री गडबडली. चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं.
"मग?"
"तू करायचायसं!"
"मी?" तिच्या चेहऱ्यावर आश्चर्यासोबत असंख्य प्रश्नांची लागलेली रांग कुंतीने हेरली.
"हो, तू. चल माझ्या सोबत."
"कुठे?" माद्री गोंधळलेली होती.
कुंतीने तिला नदीकाठी नेले. पाणी ओंजळीत भरत तिने ते माद्रीच्या तळहातावर धरले. डोळे बंद केले. 'हे परमेश्वर..... मला मिळालेल्या वरदानाचा शेवटचा मंत्र आणि मंत्रफळ माद्रीला देत आहे.' पाण्याचा शेवटचा थेंब कुंतीच्या ओंजळीतून खाली पडला. आपण हे नक्की जे केलयं ते सफल झालयं का नाही पाहायला तिने मंत्र आठवून पाहिला. पण तिला एक शब्दही आठवेना. डोळे उघडून तिने माद्री कडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर आनंद, कृतज्ञता... सगळे भाव दाटले होते.
माद्रीने कुंतीला घट्ट मिठी मारली.
"ताईश्री.... "
"माद्री, तुझा निस्तेज चेहरा पाहवतं नाही मला."
"मी हे कधीच विसरू शकणार नाही. तुमच्या या ऋणातून कधीच मुक्त होणार नाही ही माद्री!"
आनंदाने माद्रीच्या डोळ्यांत उभे राहिलेले अश्रू तिने गाल भिजवून कुंतीच्या खांद्यावर आले. कुंतीने तिला मिठीतून सोडवत तिचा चेहरा निरखला. माद्रीचा आधीच सुंदर ! त्यात आनंदाने चेहऱ्यावर पसरलेली लाली ! स्वर्गलोकीच्या अप्सराही लाजतील इतके तिचे सौंदर्य अप्रतिम भासत होते. तिने कुंतीच्या पायांना स्पर्श केला.
"मला तुझं हे असं हर्षभरित मुखकमल पाहायचं होतं. आता मी निश्चिंत झाले."
दोघींनी कुटीची वाट धरली.
'ताईश्री, आज मला जाणवलं तुम्ही फक्त नात्याने, अधिकाराने नाही, श्रेष्ठत्वाच्या बाबतीतही खूप जेष्ठ आहात. तुमच्या पुण्याची फळे माझ्या पदरात टाकलीत. तुम्ही मला मातृत्व देऊ केलेत. पण जेष्ठत्व.... हे तुमच्याच पुत्रांकडे राहिल. ही माद्री तुमचा आणि तुमच्या पुत्रांच्या सन्मान अबाधित ठेवेल आणि माझे पुत्रही!'

हस्तिनापुरात पांडु आणि कुंतीला पुत्रप्राप्तीची बातमी कळली.
"प्रणाम महाराज!"
"शकुनी."
"होय महाराज."
"बोल."
"महाराज, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता. आपली अनुमती असेल तर....."
"विचार."
"महाराज, आपल्या अनुजावर आपला किती विश्वास आहे?"
"म्हणजे?"
"म्हणजे तो नक्की वनात वनवास करायला गेला आहे, हे खरे वाटते तुम्हाला?"
"त्यात असत्य काय असू शकते ? शकुनी, वनात राजपरिवाराचे सदस्य केवळ दोन कारणांसाठी जातात. एक म्हणजे शिकार आणि दुसरे म्हणजे वनप्रस्थासन. आणि वन्यजीवांची शिकार न करण्याची प्रतिज्ञा केली होती त्याने वनात जाण्याआधी." शकुनीला काही बोलण्याचा वेळ न देता धृतराष्ट्र पुढे म्हणाला, "प्रतिज्ञेच्या बाबतीत तो भीष्माचाऱ्यांच्या पदचिंन्हांवर चालतो, शकुनी. काहीही झालं तरी तो प्रतिज्ञा मोडणार नाही."
"वन्यजीवांची शिकार करणार नाही, असं म्हणलेत ते महाराज. माणसांची शिकार करणार नाही असं कुठे म्हणालेत?"
"शकुनी, स्पष्ट बोल."
"महाराज, मी ऐकलंय की पंडुला तिसरा पुत्र झाला आहे. तेही इंद्र देवा कडून!"
"मग ही तर आनंद वार्ता आहे, शकुनी."
"महाराज, तुम्हाला ही आनंद वार्ता वाटते?"
"मला जेष्ठ पुत्र दुर्योधन आणि त्याचे ९९ अनुज असे १०० पुत्र आहे शकुनी. पंडुला झालेल्या तिसऱ्या पुत्रप्राप्तीचा मला त्रास का वाटावा?"
"शत्रू सैन्य जमावतो आहे, महाराज."
"शकुनी...."
"महाराज, जर वनातच राहायचे आहे तर युधिष्ठिराला लहान वयातच भाला चालवण्याचे शिक्षण का देतो आहे तुमचा अनुज?"
धृतराष्ट्राला राग आला.
"गांधारी...."
"महाराज, बोलावलंत?"
"गांधारी, हे पाहिलेस काय होते आहे.... तू कारणीभूत आहेस या सगळ्याला."
"काय झालं महाराज?"
"तू वेळेवर मला पुत्र दिला असतास तर आज ही भिती राहिलीच नसती."
"कसली भिती महाराज?"
"हीच, की पंडू त्याच्या जेष्ठ पुत्राला राजा बनवण्याचा प्रयत्न करेल..... तो तयारी करतोय, गांधारी! माझ्या पुत्रांचा अधिकार काढून घेण्याची. त्याच्या पुत्राला राजगादीवर बसवण्याची. आपल्या पुत्रांना सिंहासनाचा दास बनवण्याची. आणि ह्याला तू आणि केवळ तू जवाबदार आहेस."
गांधारी घाबरून निरुत्तर उभी राहिली. कुंतीच्या पहिल्या पुत्रप्राप्तीची वार्ता ऐकून स्वतःच्या उदरावर पर्यायाने गर्भावरच केलेला आत्मघाव तिला आठवला. तिने असे का केले याचे खरे उत्तर ती स्वतःलाच देऊ शकली नव्हती.

'मी दुसरे काय करु शकणार होते, नाथ..... तुमच्या अपेक्षाभंगाला जवाबदार ठरणार म्हणून स्वतःला शिक्षा देण्याचा प्रयत्न केला होता मी! कदाचित कुंतीचा लोभही वाटला असेल.... पण काय मिळाले हाती? भीष्माचार्य आणि व्यासांनी वाचवले म्हणून.... नाहीतर आजही मी निसंतान असते, आर्य. आणि आज तुम्ही मला जवाबदार ठरवता आहात?' मनातल्या मनात ती दुवे:खी होतं राहिली.

"पण महाराज...."
"शकुनी.... एक शब्द बोलू नकोस. निघून जा आत्ताच्या आत्ता!"
आपण पंडुवर चालवू पाहिलेला बाण असा आपल्या भगिनीलाच जखमा करेल असे त्याला चूकूनही वाटले नव्हते. शकुनी आपल्या कक्षात जाऊन आसनावर बसला. खूणगाठ आरक्त करायला त्याने सुरा उचलला. गुडघ्यावरची जखम भरून त्यावर चढू पाहणाऱ्या खपलीला फाडत नसा कापत सुऱ्याने जखम ताजी केली. "आह्....." डोक्यात वेदनांच्या असंख्य कळा गेल्या. डोळ्यांत असहाय्यपणा आणि रागाची मिश्र भावना झळकली.
'पंडुला झालेल्या पहिल्या पुत्राची शिक्षा माझ्या भगिनीने भोगली.... स्वतःच्या एकमेव परिचारिकेला आपल्याच पतीपासून दिवस गेलेत, हे माहित असतानाही त्याच गर्भार परिचारिकेला सतत आसपास पाहण्याची शिक्षा! काय यातना झाल्या असतील माझ्या भगिनीला तिच्या परिचारिकेच्या पुत्राला पाहून! केला कोणी याचा विचार? एका राजाने असा बदला घ्यावा? तोही स्वतःच्या पत्नीचा? ही तीच नारी आहे जिने तिचे सुंदर, मृगाक्ष तुमच्या करता अंधारात लोटून दिले.... अगदी कायमचे!
ही तीच भार्या आहे तुमची जिने असह्य वेदना सहन करून, सामान्य काळाहून जास्त स्वतः उदरात तुमच्या १०१ आपत्यांना जगवले.
प्रसव वेळेत झाले नाही म्हणून तुम्ही इतका भयंकर दंड देऊन मोकळे झालात?
यावर खुद्द महामहीम भीष्मही गप्प राहिले? मानले, की त्यांना राजाज्ञा दिली गेली.
पण विदुर? ते तर धर्मात्मा म्हणवतात ना स्वतःला तुम्ही तरी का गप्प राहिलात?

चिंता करू नकोस, गांधारी! मी या सर्वांचा बदला घेईन. सर्वांचा! तुझ्या या जखमेच्या वेदनांची धग त्या प्रत्येक अधर्मी आणि अन्यायी माणसाला लागेल. त्या प्रत्येकाचा अंत करेल, ज्यांनी तुझ्या आयुष्याची अशी हालत करून ठेवली.'

शकुनीच्या मनात घोळणारी भावना प्रतिशोधाची होती की न्याय मिळवण्याची..... त्याने हा विचार केव्हाच मागे टाकला होता.

Previous part
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2581856285207065&id=10000148...

©मधुरा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मधुरा जी बाळ जर ती देवता डायरेक हातात देते ( जादू सारखं) मग कुंतिच्या हातात दिलं किंवा माद्रीच्या. त्यांना आई कसं मानायचे? आणि माद्रीला मंत्र सांगूनही ती जैविक आई थोडीच होणार आहे. मला तर वाटते पंडूला मंत्र शिकवला असता तर त्यालाही बाळ( झालं) दिले असते आवाहन केलेल्या देवतेने.

मला ठाऊक असलेल्या महाभारतात धृतराष्ट्र आणि गांधारी यांचे नाते खूप प्रेमाचं, विश्वासाचं व एकमेकांचा आदर असलेलं होतं.

मंत्र कुंतीला मिळाला होता. पुण्यसंचित तिचे होते. तिला होणारी संताने पांडुचेच पुत्र झाले. त्यामुळे तिला वरदान पंडुला हस्तांतरित करण्याची गरज वाटली नसावी.

अजून एक, त्याकाळी पुत्र आईच्या / मातेच्या नावाने ओळखले जात.
उदाहरणार्थ, राधेय, कौंतेय, देवकीनंदन.
त्यामुळे पुरुषांना हा वरदान देण्याऐवजी नारी ला दिला जात असावा.

नियोग पध्दतीकरता जर देवाने मानवयोनी धारण केली, तर जन्मत: कर्णाकडे सुवर्णकवच आणि कुंडल आलेच कसे? कुंतीच्या गर्भात सोन्याचे टिकाऊ आणि बाणांच्या लोह अग्रानेही भेदता न येणारे सुरक्षाकवच आणि कुंडल आलेच कसे? हे मानवी असूच कसं शकतं????

मंत्र ज्या व्यक्तीने उच्चारला त्या व्यक्तीलाच पुत्र देणे अपेक्षित होते. तसे नसते, आणि तुम्ही म्हणता त्या नुसार, थोडक्यात मृत्युंजय कादंबरीनुसार जर देव मनुष्यावतारात येऊन नियोग करणार होते, तर त्या नुसार कुंतीचा प्रथम पुत्र, हा तिच्या मर्जी विरुद्ध सुर्यदेवाने तिच्या नियोग पद्धतीने उदरात टाकला होता??? सुर्यदेव असं करतील? तिने 'मला देण्याऐवजी दासीला पुत्र द्या' असे का नाही म्हटले? आणि जर ते खरचं मानव रुपात आले, तर हा प्रकार नियोग म्हणवला जाईल? कारण नियोग विवाहित स्त्री सोबत केला जातो, जनकल्याणाच्या हेतूने तिची मर्जी असेल तरच. ना की एखाद्या कुमारी सोबत जिची इच्छाच नाही पुत्रप्राप्त करण्याची.

काही गोष्टी चमत्कारिक आहेत आणि त्या तशाच मान्य कराव्या लागतात. गर्भधारणेविना तिने पुत्रप्राप्ती केली. नाहीतर तिची हिंमत झाली असती कर्णाला असं गंगेत सोडून द्यायची?

जर नियोग पध्दती होती तर कुंतीला सर्व पुत्रच का झाले? आणि माद्रीलाही? कन्या का नाही?

हाच प्रश्न धृतराष्ट्र आणि पंडुच्या जन्मावर पण उठेल तुमचे म्हणणे मान्य केले तर.

आता परत म्हणाल का की त्या सर्वांच्या भाळी पुत्र योग होता?

छान भाग

ध्रूतराष्ट्र - परिचारिकेचा पुत्र कोण मग?

@आसा : युयुत्सू

तो सुद्धा एक महत्त्वाचा हिस्सा आहे या महाभारताचा. Happy
धन्यवाद!

छानच लिहीत आहात.
<<<एकीकडे कुंती वनवास भोगत होती आणि दुसरीकडे तिचा चुलत भ्राता वासूदेव, कारावास !>>>
इथे वसुदेव करा. कृष्णपिता वसुदेवच, वासुदेव नाही. वासुदेव श्रीकृष्ण आहे, ती उपाधी पितामह भीष्म यांनी कृष्णाला दिली आहे.

<<<शकुनीच्या मनात घोळणारी भावना प्रतिशोधाची होती की न्याय मिळवण्याची..... >>> नक्कीच प्रतिशोधाची. महाभारत युद्ध पेटवले त्यानेच. धुतराष्टला पांडू पुत्रा विरुद्ध त्यानेच भडकवले. त्याच्या जागी तोही बरोबरच आहे म्हणा. कारण पितामहांनी शब्द टाकून अंध धुतराष्ट्र सोबत गांधारीचा विवाह केला.. महाभारतातील प्रत्येक व्यक्ती त्याच्या जागेवर योग्यच होती. धुतराष्र्टाने तरी का वनप्रस्थात गेल्याला पांडूच्या मुलांना युवराज करावे.

अक्की, अक्कु whatever it is.
प्रत्येक धाग्यावर एकच प्रतिसाद चिकटवून काय मिळणार आहे?
ते गेल्याच इतकंच वाईट वाटत असेल तर धागा काढा, पण प्रत्येक धाग्यावर तेच ते लिहत बसू नका.
एखाद्या ट्रोलला ट्रोल म्हणताना आपण तीच तर सुरुवात करत नाही ना, याची एकदा खात्री करून घ्या.
विनाकारण पुढच्या अवतारात चांगल्या धाग्यांची वाट लावायची.

मधुरा

शापित Fish ला दोन अपत्ये झाली होती
एक कन्या व दुसरा पुत्र

1)कन्या महाराणी सत्यवती आहे तर

2) पुत्रा चे नाव काय आहे ? ?

महाभारता मध्ये त्याचे काय पराक्रम आहेत .

@अशोक, पहिल्या काही भागांमध्ये याचे उत्तर आहे.

सुधन्वा राजा (उपरिचर) ह्या त्याच्याच पित्याने त्याला मासेमार निषाद कडून पुत्र म्हणून स्विकारले आणि मत्स्यराज म्हणून त्या पुत्राने ते राज्य अबाधित ठेवत चालवले. त्या प्रदेशाचे नाव मत्स्यराजा वरून मत्स्यदेश असे पडले.

Map_of_Vedic_India_0.png

<<<"प्रणाम इंद्रदेव!"
"कुंती, कश्या पुत्राची अपेक्षा आहे तुला?"
"तो....जो मानव म्हणून उत्कृष्ट असेल. तहानलेली धरा आणि रूक्ष झालेल्या वृक्षांना पाहून जसा तुम्हाला पाझर फुटतो तसाच त्याच्याही मनात करुणता आणि मानवतेचा निर्झर अखंड असावा."
"तथास्तू!">>>
अर्जुन हा इंद्रपुत्र, परंतु पुराणात आणि सिरिअल्स मध्ये इंद्र नेहमीच अहंकारी, उतावीळ, सिहासन प्रति प्रमाणापेक्षा जास्त आसक्ती असलेला. युद्ध कधीच स्वतःच्या बळावर न जिंकलेला तसेच नेहमी त्रिदेवांकडे याचना घेऊन जाणारा, असुरांकडून नेहमी असुरक्षित वाटणारा दाखवला आहे.
मला हे कळत नाही मग अर्जुन असा कसा? किंवा कुंती ने इंद्र देवाकडे का पुत्र मागितला..
मला नेहमी हा प्रश्न पडतो. कुणाला नाही वाटत का असे?

शीतल, खरंतर सारे पुत्र तिने एकाच देवाकडून का मागितले नाहीत, हा ही प्रश्न पडतो मला.
पण कदाचित त्या त्या वेळी तिला ज्या देवाकडून मागावा वाटला त्या देवाकडून तिने मागितला.

दुसरा पुत्र सुर्यदेवांकडे/पवनदेवांकडे मागितला असता तर हे महायुद्ध झाले नसते हे नक्की. Happy कारण ना ते स्वतः खड्यात गेले असते, ना राज्य, अनूज आणि पत्नीला द्युतात हरले असते.

हो ते तर आहेच, तो वेगळाच मुद्धा. खरेतर यमदेव धर्मराज सुद्धा किती परखडच, परंतु युधिष्ठर तसा नव्हता धर्म जाणणारा मानणारा सत्य बाजू घेणार होता परंतु यमदेव पुत्र सारखं काही खास नव्हता नाही (यमदेव आपली पत्नी पणाला लावेल का).
असो, पण अर्जुनाच्या बाबतील फार वाटत कारण तो श्रेष्ठ धनुर्धारी, अजेय योद्धा वगैरे सांगितलं आहे परंतु इंद्र देव तसें नव्हते असं दिसतेय. पळपुटे आसक्त अहंकारी असे जाणवते मालिका बघून म्हणजे जेवढ्या मालिका झाल्या tv वर त्यात तसेच दाखवले आहे

भाग नेहमीप्रमाणे सुंदरच!
चर्चासुद्धा खुप माहितीपुर्ण! महाभारताचे काही माझ्या वाचनात न आलेले संदर्भ इथे प्रत्येक भागात आणि चर्चेत वाचायला मिळत आहेत.

Pages

Back to top