युगांतर आरंभ अंताचा भाग २३

Submitted by मी मधुरा on 7 August, 2019 - 06:34

हस्तिनापुरात आनंदाचे ढोल, नगारे वाजत होते. आपल्या अनूजाला पुत्र होणार ही वार्ता कळल्यावर धृतराष्ट्राने मिष्टान्न वाटले. सर्व नगरीत अन्न-वस्त्र वाटून भीष्मांनी पंडुकडेही मिष्टान्न पाठवले.
"प्रणाम महाराज !"
"शकुनी.... बोल."
"महाराज, तुम्ही काय करताय हे?"
"काय करताय म्हणजे? स्वागत करतोय! राजपरिवाराच्या नव्या सदस्याचे! आनंद साजरा करतोय मी शकुनी!"
"पण कसला आनंद महाराज?"
"अरे तू ऐकलं नाहीस? पंडुला पुत्रप्राप्ती....."
"ते ऐकलं महाराज. म्हणूनच आश्चर्य वाटते आहे तुमच्या वागण्याचे!"
"पण का? त्यात आश्चर्य वाटण्यासारखे आहे तरी काय?"
"महाराज तुम्ही विसरता आहात. तो राजपरिवाराचा नविन सदस्य नाहीये फक्त. राजगादीचा दावेदार पण आहे."
"शकुनी, पंडुने वनवास घेतला आहे आणि तो शब्दाचा पक्का आहे. तो नाही येणार परत इथे. मग कसली चिंता?"
"महाराज, वनवास पंडुने घेतलाय. त्याच्या पुत्राने नाही."
धृतराष्ट्र विचारात पडला. 'खरचं की! पंडुचा पुत्र पंडुप्रमाणे राजगादीचा त्याग करेलच कशावरून? म्हणजे पुन्हा एकदा राजगादीचे सौभाग्य कोण्या दुसऱ्याच्याच भाळी? आणि का? तर तो ज्येष्ठ आहे म्हणून? मग आपल्या पुत्रांच काय? ते पंडु पुत्राची सेवा करणार? का? कश्यासाठी? कुणामुळे? राजाच्या पोटी जन्माला येऊनही माझ्या पुत्रांना राजगादी मिळणार नाही? जन्म उशीरा झाला म्हणून? हो.... तेच तर कारण आहे.'

तितक्यात एक दासी धावत आली.
"महाराज, महाराणींना प्रसव झालयं."
धृतराष्ट्राचे मन आनंदाने भरून गेले. शकुनीला स्वप्नात असल्यासारखे भासू लागले. 'मी मामा झालो......!'
"महाराज तुम्ही पिता झालात."
"हो शकुनी...." आनंदाच्या भरात त्याने शकुनीला मिठी मारली. धृतराष्ट्राच्या भक्कम मिठीत शकुनी कासाविस झाला. धृतराष्ट्र अंध नसता तर सामर्थ्यशाली योद्धा असता हे नक्की.
"गांधारी कुशल आहे ना?"
"हो गांधारनरेश. आत्ताच शुद्धीत आल्या आहेत.'
".... आणि आम्हाला पुत्र जन्मला आहे ना? किती पुत्र आहेत?" धृतराष्टाची उत्सुकता त्याच्या प्रकाशहिन नजरेत दिसत होती.
कोणी काही बोलले नाही.
"कन्या आहे का?" अंदाज घेत शकुनी ने विचारले.
"नाही गंधारनरेश."
"मग दासी?"
"महाराज, मासाचा गोळा आहे." दासीने घाबरत घाबरत सांगितले. शकुनी आणि धृतराष्ट्राला धक्काच बसला.
"काय???"
"हो महाराज...."
"गांधारी...." ऱागाने थरथरत धृतराष्ट्र सर्व शक्तिनिशी किंचाळला. महाल दणाणला. शकुनी बिथरला. दास दासीही घाबरून गेल्या.
आवाज ऐकून गांधारी जमेल तितक्या लवकर भित्तिकांचा आधार घेत कक्षात पोचली.
"आर्यन्...."
"गांधारी... तु चेष्टा केलीयेस माझी.... फसवलयंस मला!" धृतराष्ट्राला इतक्या रागात आणि तारसप्तकात बोलताना गांधारीने पहिल्यांदा ऐकले होते. ती घाबरली.
"मी? नाही आर्य. मी नाही... " ती रडु लागली.
"महाराज, शांत व्हा. तिची यात....."
"मध्ये पडशील तर तुला दंड देईन शकुनी...."
धृतराष्ट्राचा आवाज आणि चेहरा पाहून शकुनीही घाबरला.
"गांधारी, कुठे आहेत शंभर पुत्र?"
"महाराज...." 'इतके माह पोटात वाढलेला एक निर्जीव गोळा होता? मासाचा?' तिचा तिलाच यावर विश्वास बसत नव्हता.
"की वरदान खोटा होता गांधारी?"
"महाराज, असं बोलून शंकर देवांचा अपमान करु नका."
"मी करतोय अपमान? तू करते आहेस! माझाच नव्हे, या राजगादीचा, राजघराण्याचा आणि हस्तिनापुरचाही! आणि मला शिकवते आहेस मान कसा जपायचा? मग काय करावं अशी अपेक्षा आहे? वारसं मिळणार म्हणून आस लावून बसलेल्या परिवारातल्या प्रत्येकाच्या डोळ्यांवरही तू बांधलिस तशी पट्टी बांधू? सांग गांधारी.... तुला दंड न देण्याचे एक कारण सांग!"
"कारण महाराज, त्यांच्या आवाक्यातले संकट नाही हे." भीष्माचार्य म्हणाले तसा गांधारीला दिलासा वाटला. "आणि अर्धांगिनीला दैवाच्या हातात असलेल्या गोष्टींबद्दल दोष देणे कितपत योग्य आहे?"
"महामहीम...." भीष्माचाऱ्यांचा आवाज ऐकून धृतराष्ट्राचा राग शांत झाला. "वर्षभर वाट पाहूनही.....मी निपुत्रिक आहे !" तो दु:खात गुरफटून गेला.
"महामहिम, शंकर देवांचं वरदान असं विफळ कसं होऊ शकेल?" असहाय्यपणे गांधारी भीष्माचार्यांकडे पाहत म्हणाली.
"शांत व्हा महाराणी. देव-देवतांचे, सिद्ध जनांचे शाप आणि वरदान कधीही विफल होत नसतात. मात्र ते पूर्ण होण्याचे मार्ग आपल्याला शोधावे लागतात. एक मार्ग मला माहित आहे."
व्यासांच्या कुटीसमोर भीष्माचार्यांचा रथ थांबला.
"या भीष्माचार्य! कैक वर्षांनंतर भेट झाली आपली."
"प्रणाम वेदव्यास! समस्या घेऊन आलो आहे निराकरणाकरता."

©मधुरा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे !!! ह्या प्रसांगाबद्दल माहित नव्हते. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.

छान आहे !!! ह्या प्रसांगाबद्दल माहित नव्हते. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत

>>>+ १

बरं Happy