पक्ष्यांचे स्वआरोग्यरक्षण
मला नेहमी पडत असलेला प्रश्न म्हणजे पक्ष्यांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतात काय? घेऊ शकतात काय? आता मात्र मी खात्रीने सांगू शकतो की सर्व प्राणी स्वतःच्या आरोग्याची निश्चितच काळजी घेतात. त्याकरिता ते शरीराची योग्य निगा राखतात. निगा रखणार्या सजीवांमध्ये विशेष करून पक्ष्यांचा उल्लेख करावा लागेल. कारण पक्षी स्वतःच्या शरीराची, त्यातही विशेषतः पिसांची खूप काळजी घेताना दिसतात. पिसांचे स्वास्थ्य जर बिघडले तर पक्षी उडू शकणार नाही आणि लवकरच शिकार्यांना बळी पडेल. तसेच काही पक्षी तर औषधी वनस्पतींचा सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग करून घेतात.
दररोज उदरभरण झाले की फावल्यावेळेत पक्षी एखाद्या सुरक्षित ठिकाणी बसून स्वतःच्या पिसांची साफसुफ करीत बसलेले दिसतात. मग प्रत्येत उड्डाणपिसामधून चोच फिरवून त्याला स्वच्छ केले जाते. सोबतच पिसांची घडीसुद्धा नीटनेटकी केली जाते. शिंजिरासारखे (सनबर्ड) छोटे पक्षी तर ह्या बाबतीत अतिशय जागरूक असलेले दिसतात. शिंजिर तसेच धनेश (हॉर्नबिल) तर दर काही मिनिटाला चोच साफ करताना दिसतात. शिंजिराला त्याच्या चोचीची धार टिकवून ठेवायची असते तर धनेशाला ती स्वच्छ ठेवायची असते. सातभाई सारखे सामाजिक पक्षी तर पिसांच्या निगराणीत फार सहचर्य दाखवतात. ते फावल्या वेळात एकमेकांची पिसे साफ करून देतात (ह्याला इंग्रजीत अॅलो-प्रीनिंग म्हणतात). त्यामुळे सातभाईंच्या थव्यात मैत्री-प्रेमभावना-एकी सुद्धा टिकून राहते.
पिसांना तेल लावणे (तैल-स्नान):
पक्षी दररोज त्याच्या शरीरातील तैल ग्रंथीमधून (युरोपायजीयल ग्लॅंड) स्त्रावणारे तेल पिसांना चोपडत असतात. त्यामुळे अनेक प्रकारच्या कीटकांपासून त्यांच्या पिसार्याचे रक्षण होते. धनेशपक्षी दररोज असे तेल पिसांना चोपडत असतात. त्यांच्या अंगाला हात लावला तरी त्याचा उग्र दर्प येतो. काही पाणपक्षी, जसे वन्य बदके ह्या तेलाचा उपयोग पिसं भिजू नयेत म्हणून करून घेतात. त्यामुळे त्यांची पिसे ‘वॉटर-प्रूफ’ राहतात व भिजत नाहीत. दुर्दैवाने पाणकावळे मात्र पाण्यात उदरभरण करीत असले तरी त्यांच्याजवळ ही ग्रंथी नसते. त्यामुळे प्रत्येक वेळेस मासे खायला गेले की त्यांची पिसं पाण्याने भिजतात. त्यामुळे पोट भरले की बिच्चारे पाणकावळे उन्हात बसून कपडे वाळवल्याप्रमाणे पंख हलवून हलवून पिसं वाळवताना दिसतात. दिवसभरात त्यांना ही कसरत अनेकवेळा करावी लागते.
जलस्नान:
अनेक पक्षी प्रजाती दररोज पाण्याने आंघोळ करतात. असे करताना संपूर्ण शरीर भिजेल याची ते काळजी घेतात. त्यासाठी काही विशिष्ट प्रकारच्या हालचाली ते करतात. विविध पक्ष्यांची आंघोळ करण्याची पद्धत सुद्धा वेगवेगळी असते असे दिसून येते.
सर्वात जास्त प्रकारचे पक्षी उथळ पाण्यात उभे राहून घुसळून घुसळून छान आंघोळ करतात. त्यानंतर एखाद्या फांदीवर बसून पंख थरथरवून कोरडी करतात व चोचिने परत सुस्थितीत बसवतात. चिमण्या, कावळे, बुलबुल, दयाळ (रॉबिन), साळुंकी (मैना), माशिमार (फॅनटेल, फ्लायकॅचर), कस्तुर (ग्राऊंडथ्रश), गिधाडे, कावळे, शिक्रा इ. अनेक पक्ष्यांची अशी संपूर्ण आणि बिनधास्त आंघोळ असते.
विशेष म्हणजे पाणथळीत आढळणारे लांब पायाचे ‘चिखलपायटे’ पक्षी (वेडर्स), उदा. चिखल्या (प्लोव्हर), शेकाट्या (ब्लॅक विंग स्टील्ट), तुतारी (सॅंडपायपर), टिलवा (स्टिंट) आणि पाण्यातच पोहणारी वन्य बदके (स्पॉटबिल डक, पोचर्ड), टिबुकली (दाबचिक, लिटिल ग्रीब), तसेच पाणकावळे (कार्मोरंट) सुद्धा अशा प्रकारे पाण्यात आंघोळ करतात. पाणकोंबड्या (वॉटरहेन, स्वाम्पहेन), कमळपक्षी (जकाना), फटाकडी (क्रेक, रेल) ह्यांची आंघोळसुद्धा भरपूर वेळ देऊन केलेली असते.
गिधाडे जरी बघायला कुरूप असली तरी मृत प्राण्याचे मांस खाल्ल्यानंतर दरवेळी लागलीच एखाद्या पाणवठ्यावर (तलाव, नदी) जाऊन ते सामूहिक आंघोळ करतात. एकदा मला शेतातील पाटावर एकूण २०० ते २५० कावळे एका रांगेत बसून शिस्तीत आंघोळ करताना बघायला मिळाले.
अनेक पक्षी जसे कोतवाल (ड्रोंगो), राघू (बी-ईटर) (ब्लॅक-नेप्ड मोनार्क), धिवर (किंगफिशर) सुद्धा पाण्यात उडी मारून वरच्यावर डुबकी मारतात आणि परत उडून जाऊन फांदीवर बसतात. एकदा निळपंख (इंडियन रोलर) सुद्धा पाण्याच्या टाकीत उड्या मारून आंघोळ करताना मला बघायला मिळाला. स्वर्गीय नर्तक नराची शेपटी खूप लांब आसते आणि त्याला ती जमिनीला स्पर्शू द्यायची नसते. त्यामुळे पाण्यात सुर मारून निमिषार्धात बाहेर पडतो. तेव्हाची त्याची चपळाई आणि शेपटीची गिरकी बघायला मिळणे म्हणजे स्वर्गीय सुख असते. नेहेमी हवेवर स्वार असणारे पक्षी, जसे भिंगर्या (स्वालो), पंकोळया (मार्टिन) तर उडता उडताच पाय-पोट पाण्याला स्पर्शून जातात. असे करताना ते शेपटी उंचावतात जेणेकरून पाण्याचे तुषार पंखांवर उडतात.
नाचण (फॅनटेल) पक्षी तर आंघोळ करताना शेपटीचा पंखा करून नाचतोय असेच वाटते (कदाचित त्यामुळेच त्याला नाचरा सुद्धा म्हणतात). काही बुजर्या स्वभावाचे पक्षी तर एका क्षणात पाण्याला स्पर्श केला न केला असे केवळ पोट भिजवून झुडुपाकडे पळ काढतात. गर्द झुडुपात बसून मग पंख थरथरवून पाणी झटकतात. मग पिसं साफ करीत बसतात. पुन्हा पुन्हा ते असे करतात. बाकचोच सातभाई (इंडियन सिमीटार बॅबलर) ह्या अतिशय बुजर्या स्वभावाच्या पक्ष्याची आंघोळ अशा प्रकारची असते.
आणखी काही पक्षी तर आंघोळ करायला पाणथळीच्या ठिकाणी येतच नाहीत. जंगलात काही विशिष्ट झाडांच्या तसेच वेलींच्या मोठ्या पानांवर सकाळी दव पडतं. त्या परिसरातील पक्ष्यांना ह्या झाडांची चांगलीच माहिती असते. विशेष करून लहान आकाराचे पक्षी अशी दवबिंदूंची आंघोळ (दव स्नान अर्थात ड्यु बाथ किंवा लीफ बाथ) करतात. त्यासाठी ह्या भिजलेल्या पानांवर ते स्वतःचे पोट-पंख घुसळवतात. निसर्गातील अशा प्रकारे उपलब्ध असलेल्या काही थेंब पाण्याचासुद्धा उपयोग कसा करायचा ते आपण पक्ष्यांकडून शिकायला हरकत नाही. राखी वटवट्या (अॅशी प्रिनीया), शिंजिर (सनबर्ड), शिंपी (कॉमन टेलरबर्ड), चष्मेवाला (ओरिएंटल व्हाईटआय) ई. इवल्या आकाराचे पक्षी अशा प्रकारचे दव-स्नान घेतात.
अमरावतीला असताना माझ्या अंगणात मी बरीच झाडं लावली होती. त्यातल्या ईक्झोरावर मी पाइपनी पाणी घातले की लागलीच वर उल्लेख केलेले छोटे पक्षी त्याच्या पानांवर साचलेल्या पाण्याच्या थेंबांनी घुसळवून घेऊन आंघोळ निपटून घ्यायचे. अगदी माझ्यादेखत.
ठाण्याला असताना, पहिल्या पावसानंतर माडाच्या (नारळाच्या) मोठ्या झावर्यांवर (पानांवर) पोपट तसेच कावळे अशा प्रकारची आंघोळ करताना मला बघायला मिळाले. त्यावेळेस मी सातव्या माळ्यावर राहात असल्यामुळे हा प्रसंग बघणे शक्य झाले. ह्याला दवबिन्दु स्नान नव्हे तर पर्ण-स्नान (लीफ-बाथ) म्हणता येईल.
उन्हाळा संपून पहिला जोराचा पाऊस पडतो तेव्हा कावळे, पोपट, पारवे (कबुतर), बुलबुल, घारी, चिमण्या असे कितीतरी प्रजातीचे पक्षी (इतर वन्यप्राणी सुद्धा) छान उघड्यावर बसून पावसाचा मनसोक्त आनंद घेतात. त्यांनाही उन्हाळ्याची काहिली सोसल्यानंतर पावसात भिजायला आवडत असणार.
सूर्यस्नान:
सूर्यस्नान (सनबाथ अथवा बास्किंग) म्हणजे स्वतःच्या पिसांना उन्हात शेकून घेणे. ह्यात पक्षी दोन्ही पंख उघडून सूर्यकिरणांशी काटकोन करून बसून राहतात. पाठीवरील पिसे उभी ठेवली जातात. जेणेकरून सूर्यकिरणे पिसांमधून त्वचेपर्यन्त पोचतील. सूर्यकिरणांमुळे पक्ष्यांच्या पिसांचे निर्जंतुकीकरण होते. राघू (बी इटर), हरोळया (हरियाल, ग्रीन पिजन), होले (डव्ह), धनेश (हॉर्नबिल) ई. अनेक प्रजातीचे उन्हात बसून पंख शेकताना दिसतात. शिंजिर पक्ष्यांना सूर्यपक्षी अर्थात सनबर्ड हे नावच त्यांच्या सूर्यस्नानाच्या प्रेमातून पडले आहे. सूर्याची पहिली किरणे पडली की हे पक्षी झाडाच्या उंच फांदीवर व विद्युत तारांवर बसून पंख शेकून घेतात. सोबतच पिसांच्या साफसफाईचे काम सुद्धा चालते.
धूलिस्नान:
पक्ष्यांना अनेक प्रकारच्या रोगजनक जंतूंपासून मुक्तता मिळवण्यासाथी धूलिस्नानाचा उपयोग होतो. पक्षी दररोज त्यांच्या शरीरातील तैल ग्रंथीमधून (युरोपायजीयल ग्लॅंड) स्त्रावणारे तेल पिसांना चोपडत असतात. ह्या तेलामुळे पिसं चिकट होऊन उडताना बाधा निर्माण होऊ नये यासाठी पिसांमधील तेल वेळोवेळी काढून टाकणे गरजेचे असते. त्याकरिता पक्षी जमिनीवर छान धूळ (बारीक माती) असेल अशा ठिकाणी धूलिस्नान घ्यायला जमतात. मातीत लोळून संपूर्ण पिसारा धुळीत घुसळवून घेतात. त्यामुळे पिसांना लागलेले तेल धूळ शोषून घेते व पिसे कोरडी होतात. चिमण्या, धनेश, लावा (क्वेल), तित्तिर (फ्रँकोलीन), रानकोंबडी (जंगलफाउल), राघू (बी-ईटर) ई. पक्ष्यांना धूलिस्नान फार प्रिय आहे.
धनेश पक्षी सुद्धा धूलिस्नान घेतात. भारतीय राखी धनेश अगदीच नावापुरतेच जमिनीवर पोट टेकवताना दिसले. राघू तसेच मलबारी कवड्या धनेश थव्याने धूलिस्नान घेतात. मला असे वाटते की ढोलीत तसेच बिळात घरटे करणार्या पक्ष्यांना (धनेश, राघू, निलपंख, धिवर ई.) धूलिस्नानाची विशेष गरज भासत असावी. ढोलीत तसेच बिळात पिल्लांची विष्ठा साचून घाण होते. विशेषतः राघू पक्षी (बी-ईटर) घरट्याचे बिळ स्वच्छ करीत नाहीत व त्यांच्या बिळातून फार घाणेरडा दर्प येतो. त्यामुळे अशा पक्ष्यांच्या शरीरावर रोगजनक परजीवी जंतूंचा (उवा, लिखा इ.) अधिक प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आढळून आलेला आहे. मग असे पक्षी धूलिस्नान घेताना पोट मातीत घुसळवतात. त्यामुळे जंतूंपासून मुक्ति मिळत असणार.
मुंगी-स्नान:
मुंगी-स्नान (सेल्फ-अॅनॉइंटिंग किंवा अँटिंग) फार कमी वेळा आपल्याला बघायला मिळते. ह्या प्रकारात पक्षी ज्या ठिकाणी जमिनीवर विषारी (चावणार्या – फॉर्मीसिडी कुळातल्या) मुंग्या असतील त्या ठिकाणी लोळतात. असे केले की मुंग्या त्यांना चावतात. कधी कधी स्वतः पक्षी मुंग्यांना चोचिने चिरडून त्यांच्या शरीरातील रसायने (फॉर्मिक अॅसिड) स्वतःच्या पिसांवर चोपडतात. फॉर्मिक अॅसिड हे विषारी असून त्यात किटकनाशक (इनसेक्टिसाईड, मायटीसाईड) गुणधर्म असतात. कोतवाल, समुद्री घार, होला, सातभाई, कावळे, साळुंक्या ई. २०० प्रजातीच्या पक्ष्यांची मुंगी-स्नानाचा फायदा घेताना नोंद करण्यात आली आहे.
औषधी वनस्पतींचा उपयोग:
मी धनेश पक्ष्यांवर संशोधन करताना मला धनेश पक्षी स्वतःचे पोत साफ ठेवण्यासाठी महावृकच्या, तूतीच्या तसेच अनेक वनस्पतींच्या पानांचे सेवन करताना आढळले. महावृकाची पाने पोटातील जंत मारण्यासाठी उपयुक्त आहेत. एवढेच नव्हे तर धनेश तसेच अनेक प्रजातीचे पक्षी किटरोधक (इंसेक्ट रीपेलंट) गुण असलेल्या वनस्पतीची पाने, जसे कडूनिम, कढीपत्ता आणून आपल्या घरट्यात टाकतात. त्यामुळे घरट्यातील अंड्यांचे तसेच पिल्लांचे संरक्षण होते. पण ह्या विषयावर फारसे संशोधन झालेले नाही.
डॉ. राजू कसंबे,
सहायक संचालक – शिक्षण,
बॉम्बे नचरल हिस्ट्री सोसायटी, फोर्ट, मुंबई – ४००००१.
भ्रमणध्वनि: ९००४९२४७३१.
(पूर्वप्रसिद्धी; दैनिक तरुण भारत, जुलै २०१९)
सर इतकं छान लिहिता... ह्या
सर इतकं छान लिहिता... ह्या पक्षांचे फोटो पण टाकले असते तर अजुन मजा आली असती वाचायला
मस्त माहिती
मस्त माहिती
छान माहिती.
छान माहिती.
यातील बरीचशी स्नाने पाहिली आहेत.
खूप छान माहिती देताय सर!
खूप छान माहिती देताय सर!
छान माहिती!
छान माहिती!
खूप छान माहिती
खूप छान माहिती
वाह, मस्त माहितीपूर्ण लेख...
वाह, मस्त माहितीपूर्ण लेख...
अनेक धन्यवाद....
माहितीपूर्ण लेख...
माहितीपूर्ण लेख...
फोटो पण द्यावेत, म्हणजे वाचतांना अजून छान वाटेल.
माहितीपूर्ण लेख, धन्यवाद
माहितीपूर्ण लेख, धन्यवाद
वा !!! खूप छान माहिती.
वा !!! खूप छान माहिती. मुंगीस्नानाबद्दल वाचून तर अचंभित झालो.
माहितीपूर्ण लेख.
माहितीपूर्ण लेख.
आमच्या बागेत पक्षांच्या
आमच्या बागेत पक्षांच्या पिण्यासाठी आणि आंघोळी साठी पावसाळा वगळता कायम मातीच्या परळात पाणी ठेवलेलं असतं.
आणि चिमण्या, बुलबुल आणि दयाळ कायम आंघोळी करता येत असतात. शिंजिर ही येतात पण ते झाडांना पाणी दिल्यावर पानावरच्या थेंबात आंघोळ करतात..
ही बुलबुल पक्षाच्या आंघोळीची युट्युब लिंक....
https://youtu.be/UY-DRhStm2Q
वाह खूप इनट्रेस्टिंग लेख,
वाह खूप इनट्रेस्टिंग लेख, कितीतरी माहिती कळली
छान माहीती
छान माहीती
छान लेख! पक्षांचे फोटो टाकले
छान लेख! पक्षांचे फोटो टाकले तर लेख पोचेल.
मस्त माहिती. मुंगीस्नान ..
मस्त माहिती. मुंगीस्नान .. अबब...
सुंदर माहिती आणि लेख.
सुंदर माहिती आणि लेख.
धन्यवाद.
माहितीपुर्ण लेख! फोटो हवाच.
माहितीपुर्ण लेख! फोटो हवाच.
मजेशीर, रोचक, अचंभित करणारी
मजेशीर, रोचक, अचंभित करणारी माहिती.
पक्षांचे अंघोळ करतानाचे फोटो हवे होते.
खुपच छान आणि माहितीपूर्ण
खुपच छान आणि माहितीपूर्ण लिहीता तुम्ही. धुळीचे स्नान पाहिले आहे पण ते स्नान असते हे आत्ताच कळाले. मला वाटायच काहीतरी चाळे करतात पक्षी. आमच्या झाडाना पाणी घालायच्या पाईपला मध्ये होल पडल की त्यातून जो फवारा यायचा त्यात अनेकदा बुलबुल स्नान करायची. झाडावर मारलेल्या पाण्यावर टेलरबर्ड आणि सूर्यपक्षी भिजताना दिसतात.
माझ्याकडील काही पक्षी
माझ्याकडील काही पक्षी
2)भारद्वाजाने पावसातच स्नान केले आहे.
3) पीसे साफ करताना बुलबुल
4) kingfisher
5)पावसात स्नान करणारा दयाळ
अजून असतील पण शोधण्यात वेळ जातोय.
चिमण्यांच्या धुलीस्नानावरून
चिमण्यांच्या धुलीस्नानावरून पावसाचा अंदाज बांधता येतो असे वाचल्याचे आठवते. सकाळी सकाळी चिमण्या धुळस्नान करत असतील तर दुपारी पाऊस येतो असे काहीसं.
जागू प्राजक्ता खूप खूप
जागू प्राजक्ता खूप खूप धन्यवाद. फोटो अतिशय सुंदर आहेत
मस्त फोटो आहेत जागु!
मस्त फोटो आहेत जागु!
पहिल्या फोटोत ती लाल पाठीची चिमणीसारखी कोण आहे?
पहिल्या फोटोत ती लाल पाठीची
पहिल्या फोटोत ती लाल पाठीची चिमणीसारखी कोण आहे? >> ठिपकेदार मुनिया(Scaly breasted munia )
अच्छा. धन्यवाद
अच्छा. धन्यवाद