युगांतर - आरंभ अंताचा भाग २२

Submitted by मी मधुरा on 6 August, 2019 - 05:07

"कुंती, माद्री, ऐकलंत का?" हातातली रवी तशीच सोडून कुंती बाहेर आली.
"काय झालं आर्य?" शेतावरून मधेच परत आल्याने दोघींना काळजी वाटली. पंडुच्या नाजूक तब्येतीने त्याला काही होणार तर नाही ना ही सतत मनाला लागलेली भिती! त्यात किंदम ऋषींचा शाप.... कुंतीने माद्रीला सांगितले तेव्हा तिची अवस्था गर्भगळीत झाल्यासारखी झाली होती. राजमहल सोडून कुटीत राहायला आली तेव्हाही तिच्या चेहऱ्यावर कधी दु:खी भाव नव्हते. या शापाने मात्र तिला एकटे पाडले होते. गांधारीची सुंदरता आणि माद्रीचे लोभस रुप यात एक साम्य होतं..... लागलेलं ग्रहण! गांधारीच्या रुपाला अंधत्वाचं आणि माद्रीच्या रुपाला शापाचं! हे सगळं होऊन सुद्धा आणि पंडुने विचारले असताना ही दोघींनी त्याला सोडून जायला ठाम नकार दिला होता. पंडुला जपणं कुंती आणि माद्रीसाठी खूप महत्त्वाचे होते. पंडुचा आवाज ऐकून मागच्या परसबागेतून धावत येऊन माद्री बाहेर डोकावली.

"अगं, भ्रातृजाया गांधारी देवींची शुभ वार्ता घेऊन आलेत हे राजमहालातून." पंडुने आनंदाने सांगितले आणि कुंतीही आनंदली. कुटीत जाऊन विर्जणाला लावलेल्या दुधाला घुसळून नुकताच काढलेल्या लोण्याचा एक छोटा गोळा साखर टाकून आणला. विभागून दासासकट सगळ्यांच्या हातात ठेवला. नकळत माद्रीच्या डोळ्यांतून अश्रू बाहेर पडले. लोण्यातही मिसळले की काय माहित नाही पण गांधारीचे वृत्त ऐकून लोण्याची चवही तिला अगोड भासली. अश्रूंचे नेमके कारण तिला कळेना..... जळून भस्म झालेल्या आपल्या स्वप्नांची राख डोळ्यात खुपते आहे की कोणाचे तरी सौभाग्य ? तिला स्वतःच्याच विचारांची घृणा वाटली.

'कोणाचा तरी हेवा करत जळणारी नाही ही माद्री. नियतीला सामोरे जाण्याची ताकद आहे तिच्याच. केलेले अन्याय पचवायची आणि तरीही जिद्दीने उभे राहायची हिंमत आहे. स्वतः दु:खात असतानाही आपल्या लोकांच्या आनंदात हसण्याची कलाही जमवून घेईल ही माद्री....' ओठ ताणत ती हसली. "गांधारी देवींना आमच्या कडून शुभेच्छा कळवा."

"महाराणी गांधारी यांना तुमचा निरोप मी नक्की कळवेन." दासाने पंडुकडे बघितले, "राजभ्राता, तुम्हाला महामहीम भीष्माचार्यांनी स्वतःची काळजी घ्यायला सांगितले आहे."
पंडुला भरून आलं.
"तातश्रींना सांगा. मी ठिक आहे. माद्री आणि कुंतीही कुशल आहेत."
दास गेला आणि माद्री आत जाऊन बसली. मनाला कश्यात तरी रमवायचे म्हणून प्रयत्न करू लागली. पंडुला माद्रीची मनस्थिती जाणवली. तो ही मनातून थोडा खिन्न झाला.
'दोघींनी त्याच्यासाठी राजमहाल, राणीपद, सुख....सारं सोडलं. आणि आपण त्यांचा माता बनण्याचा अधिकारही काढून घेतला. शाप एकाला मिळतो मात्र भोगावा त्याच्या स्वजनांना लागतो. त्या म्हणतात, आपल्या जवळ असणे हेच त्यांच्यासाठी मोठे सुख आहे. आणि आपणही सत्याकडे कानाडोळा करत जगत राहतो. त्याला आपल्याकडे पर्यायही नाही. ना मी राज्याला वारसं देऊ शकतो, ना कुंती आणि माद्रीला वैवाहिक जीवन!' धृतराष्ट्राची वार्ता ऐकून पंडुच्या मानेवरचा एक भार कमी झाला होता. ऱाज्याला नवा वारस मिळणार होता.
चैत्र, वैषाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशिर्ष, पौष, माघ, फाल्गुन..... दिवस जात राहिले. गांधारीला प्रसव होत नाही म्हणून धृतराष्ट्रासकट सगळा राजपरिवार चिंतीत होता. वैद्यांनी हात वर केले. भीष्मांनी ऋषीमुनींना बोलावले. पत्रिकेवर ग्रहांचे स्थान बघून त्यांच्या चेहऱ्यावर चिंता पसरली.
"काय झाले मुनीवर?"
"सत्य सांगण्या आधी आम्हाला अभय द्यावेत, महामहीम."
"दिले. पण असे काय आहे मुनीवर? की अभय मागावे लागेल?"
"महाराणींना होणारा पुत्र राक्षसी प्रवृत्तीचा असेल असे दिसते महामाहीम."
"माझ्या होणाऱ्या पुत्राबद्दल बोलता आहात तुम्ही मुनीवर. जपून बोला." धृतराष्ट्र चिडून म्हणाला.
"शांत व्हा महाराज." भीष्मांनी धृतराष्ट्राला गप्प करत मुनींना विचारले, "असे का म्हणालात मुनीवर?"
"महामहीम, हा गर्भ सामान्य नाही हे तर आपण सर्व जाणतोच आहोत. ग्रह दशेनुसार होणारा पुत्र या वंशाचा सर्वनाश करेल. कौरव वंश संपवेल."
भीष्मांच्या आज्ञेमुळे शांत बसलेला धृतराष्ट्र तडकून तिथून उठून निघून गेला.
"काही उपाय असेलच ना मुनीवर?"
"आहे. प्रत्येक संकटातच सुटकेचा मार्ग दडलेला असतो."
"बोला मुनीवर!"
"जन्मताच त्याला मुक्ती देणे."
भीष्माचार्य कल्पनेनेच शहारले.
"काय अभद्र बोलता आहात आपण?"
"हस्तिनापुराचा विनाश करु पाहणाऱ्या शक्तीला समाप्त करायचा उपाय सुचवतो आहे मी, महामहीम."
भीष्माचार्य गोठल्यासारखे स्तब्ध उभे राहिले.

अजून महालातून काही शुभवार्ता आली नाही म्हणून पंडुला आश्चर्य वाटत होते. काहीतरी अनुचित घडलेले असणार म्हणून काही आपल्याला कळवलेले नाही तातश्रींनी, हे त्याने पुरेपूर ओळखले होते. हस्तिनापुराच्या राजगादीला वारसं कसा मिळणार याची चिंता त्याला खाऊ लागली. कुंतीने पंडुला एकटेच विचार करत पडलेल्या झाडाच्या आडव्या खोडावर बसलेले पाहिले. ती पंडु जवळ आली.
"आर्य."
"ये कुंती. बस ना. माद्री कुठयं?"
"कुटीत आहे."
"हं."
"तुम्ही खूप दु:खी आहात न आर्य?"
"अं.... दु:खी? हं... पण तु तरी कुठे सुखी आहेस? माद्री तरी कुठे आहे?"
"मी आहे, आर्य,"
"आणि माद्री?"
कुंती शांत बसली.
"कुंती, तुमच्या कडे सुखप्राप्तीचा मार्ग आहे."
"आर्य...."
"मी अजूनही म्हणेन.... जा तुम्ही महालात. असं एकाकी कुटीत कधी पर्यंत राहाल?"
"नाही आर्य, तुम्हाला सोडून आम्ही कुठेही जाणार नाही."
"पण का? ना माझ्यापासून तुम्हाला पुत्रप्राप्ती होणार आहे आणि ना...."
"आर्य, जर पुत्रप्राप्ती झाली तर तुम्ही आणि माद्री सुखी व्हाल?" कुंतीला पती आणि माद्रीची घुसमट असह्य झाली होती. आज काहीही झालं तरी त्यांच्या चेहऱ्यावर तिला आनंद पाहायचा होता. खरा आनंद!
पंडु आश्चर्याने तिच्या डोळ्यांत बघू लागला.
"सांगा ना आर्य, व्हालं सुखी?"
"पणं कसं शक्य आहे ते?"
"विश्वास बसेल तुमचा आर्य?"
"सांग कुंती...."
"एक वरदान मिळालं होत मला. दुर्वास ऋषींकडून...."
"कोणतं वरदान?"
"मी गर्भधारणेविना हव्या त्या देवाचे आवाहन करून पुत्र प्राप्त करू शकते."
"काय बोलतेस कुंती....." हर्षोल्हासित होऊन त्याने कुंतीकडे बघितले. "म्हणजे आपण माता पिता बनू शकतो? अप्रतिम ! तू खरचं माझी अर्धांगी आहेस कुंती. तुला मिळालेलं हे वरदान माझ्या शापाचं परिमार्जन आहे. मंत्रोच्चार कर कुंती. यमदेवांना बोलावं!"
"यमदेव, आर्य?"
"हो कुंती. त्यांच्या न्यायावर तर देव देवताही संशय घेत नाहीत."
"हो, आर्य."
चेहऱ्यावर स्मितहास्य उमलले आणि कुंतीने मंत्रोच्चार करायला सुरवात केली. काळे ढग जमा झाल्यासारखा परिसर काळवंडला. त्यातून तेजस्वी आकृती साकारू लागली. कुंती आणि पंडु हात जोडून तो चमत्कार बघत राहिले.
"या मंत्राने तु मला आवाहन करशील असे वाटले नव्हते मला कुंती." आवाज घुमल्यासारखा ऐकू येत होता. ती आकृतीच बोलत असावी, "मृत्यूलोकी सर्व भयभित होतात माझ्या नावानेही."
"कारण त्यांना माहित नसते यमदेव, की तुम्ही मुक्तीदाता आहात. आमचा प्रणाम स्विकार करा, यमदेव." पंडु म्हणाला.
"मी प्रसन्न झालो. बोला, कसा पुत्र हवा आहे तुम्हाला?"
"तुमच्यासारखा, यमदेव. स्थिरबुद्धीचा, न्यायी, ज्ञानी. सर्व परिस्थितींत शांत राहणारा."
"तथास्तु!"
यमदेव अंतर्धान पावले.
कुंतीच्या हातात एक बाळं होतं. लहान, गोंडस, शांत. इतकं की ते रडतही नव्हतं!
पंडुला स्वप्नात असल्यासारखा भास होत होता. 'आपला पुत्र! आपला स्वतःचा पुत्र!' कुंतीच्या हातून बाळाला त्याने छातीशी कवटाळलं आणि आनंदाने ओरडला, 'मला पुत्र झालायं कुंती. आपल्याला पुत्र प्राप्ती झाली आहे.' बाळाला खेळवत तो कुटीच्या दिशेने जाऊ लागला. कुंती तशीच उभी होती. पंडुच्या चेहऱ्यावर आधी दिसणारे दु:ख आता तिच्या चेहऱ्यावर पसरले होते. माथ्यावर तळपणाऱ्या सुर्यदेवाकडे पाहून तिच्या डोळ्यांत पाणी आले. पणं त्याचे कारण त्यांचे तिव्र, प्रखर तेज नव्हते!

©मधुरा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

महामहीम, हा गर्भ सामान्य नाही हे तर आपण सर्व जाणतोच आहोत. ग्रह दशेनुसार होणारा पुत्र या वंशाचा सर्वनाश करेल. कौरव वंश संपवेल."
>> हे आणि यापुढचे महाभारत मला तरी काल्पनिक कथा वाटते. दुर्योधन व इतर कौरव यांना खलनायक ठरवणारा बाकीचा भाग मला अजिबात पटत नाही ‌. द्रौपदी वस्त्रहरण वगैरे सर्व काल्पनिक वाटतं. दुर्योधन वंशाचा सर्वनाश करतो तर श्रीकृष्णाने वेगळे काय केले? गांधारीचा शाप जरी निमित्त असला तरी यदुकुळाचा नाश श्रीकृष्णामुळेच घडला म्हणजे तो सुध्दा दुर्योधनासारखा अपशकुनीच होता असे म्हणावे लागेल. हे माझं वैयक्तिक मत आहे. कुणावरही सहमत असण्याची सक्ती नाही.

माथ्यावर तळपणार्या सुर्यदेवाकडे पाहुन तिच्या डोळ्यांत पाणी आले. पणं त्याचे कारण त्यांचे तिव्र, प्रखर तेज नव्हते!
>>>
भागाचा शेवट खुप सुंदर केलाय तुम्ही.काहीच स्पष्ट उल्लेख न करता खुप काही सांगुन गेल्या दोन ओळी.

चैतन्य, Keep reading Happy

मधुरा जी तुम्ही मृत्युंजय सारखा ग्रंथ ज्यात प्रत्येक पात्राचं स्वगत आहे असा ग्रंथ लिहू शकाल. तुमच्याकडे ते potential आहे असं मला वाटतं.

हे फारच बालिश होतय. महाभारत्तात अगदि एक एक श्लोक वाचून पाहिला आहे. दुर्योधना बद्दल अस कुठेही नहिये की जन्मल्यावर
मारून टाकावे.
मूल होत नसेल तर नियोग करून वारस मिळवणे हे ही सर्व संमत होत. मन्त्र म्हणला आणी बाळ हातात वगैरे , जरा जास्तच भाबडे पणा होतोय.
किम्बहुना ध्रुतराश्ट्रा आधि आप्ल्याला मूल झाल नाही तर आपल्या मुलाचा हक्क डावलला जाइल या विचाराने, लवकर नियोगाचा निर्णय घेतला गेला असणार.

शिरिन मला वाटते कर्ण जन्माच्या वेळी कुंतीने नऊ महिने दासीच्या मदतीने गरोदर पण लपवलं व जन्म झाल्यावर त्याग केला. त्या दासीचं नाव आठवत नाही. गरोदरपणाचे वेळेस कुंती दुसरीकडे जाऊन राहीली होती असे आठवतेय. इतर पाच पांडवांचा जन्मही गर्भातूनच झाला होता. कुंतीने माद्रीला दोन मंत्र शिकवले. मंत्र म्हटल्यावर तो तो देव मनुष्य रुपात येत असे. थोडक्यात नियोग सारखेच होते.

कुंती ने माद्रीला एकच मंत्र शिकवला. तिने अश्विनी कुमारांना आवाहन केले. म्हणून २ पुत्र झाले. जुळे!

अजून एक प्रश्न, जर नियोग पद्धत होती आणि त्यातून गर्भधारणा झाली तर पुत्रच का झाले? कन्या का नाही?

स्टारप्लसचे महाभारत, मृत्यंजय, सुर्यपुत्र कर्ण, राधेय या रसाळ कलाकृती आहेत. पण त्या तंतोतंत सत्य असल्याचा दावा करत नाहीत. त्यात एका पात्राला मध्यस्थानी ठेवत कथा रंगवली आहे.

थोडक्यात, स्वतःच्या पध्दतीने सर्वजण महाभारत रंगवतात. त्यात काहीच गैर नाही आणि बालिशही नाही. मला जे लॉजिक पटते आहे ते मी लिहिले. गैरसमज नसावा. Happy

<<<स्टारप्लसचे महाभारत, मृत्यंजय, सुर्यपुत्र कर्ण, राधेय या रसाळ कलाकृती आहेत. पण त्या तंतोतंत सत्य असल्याचा दावा करत नाहीत. त्यात एका पात्राला मध्यस्थानी ठेवत कथा रंगवली आहे.

थोडक्यात, स्वतःच्या पध्दतीने सर्वजण महाभारत रंगवतात. त्यात काहीच गैर नाही आणि बालिशही नाही. मला जे लॉजिक पटते आहे ते मी लिहिले. गैरसमज नसावा. >>>>
खरंय मी पण या सगळ्या कादंबरी वाचल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी नवनवीन माहिती मिळते.

अजून एक प्रश्न, जर नियोग पद्धत होती आणि त्यातून गर्भधारणा झाली तर पुत्रच का झाले? कन्या का नाही?
>> कारण त्यांच्या नशिबात पुत्रयोगच होता. Happy
मधुरा जी लिहीत रहा. वाचक म्हणून आम्ही आमची मतं मांडू. बालिश हा शब्द मलाही आवडला नाही. तुम्ही छानच लिहित आहात.

संपुर्ण महाभारत मला काल्पनिक कथा वाटते. त्यामुळे कुणीही कुठेही जे काही लिहिलंय ते मला त्या लेखकाचा कल्पनाविलास वाटतो. Happy
मधुरा, तुम्ही छान लिहिताय. सादरीकरण पण छान आहे.
फक्त मला ते भीष्मा, विदुरा वैगेरे संबोधणं खटकतं. Happy

मला असं वाटते की आपण आपल्याच धर्मग्रंथाला काल्पनिक समजतो म्हणून कुठेतरी धार्मिक बाबतीत आणि धर्म रक्षणाबाबतीत आपण कमी पडतो.

दुसऱ्या धर्मातही असंभव कथा आहेत त्यांचे धर्मग्रंथ म्हणून. पण त्या धर्माचे लोक ना स्वतः कधी ते खोटं /काल्पनिक समजतात, ना दुसऱ्यांना त्याबद्दल बोलू देतात. म्हणूनच कदाचित त्यांच्या धर्माचा प्रचार होत तो वाढला आणि आपण आत्मपरीक्षणाच्या नादात अडकून पडलो.

हे माझे व्ययक्तिक मत आहे.

कृपया गैरसमज नसावा.
प्रत्येकाच्या मताचा योग्य तो आदर मला आहेच. Happy

शेकडो हजारो वर्षांपूर्वी घडून गेलेल्या घटनांवर लिहिताना काळाच्या ओघात अनेक लेखकांनी स्वत:चे काही प्रसंग जे काल्पनिक आहेत असे मनोरंजन मुल्य वाढवण्यासाठी घुसडले असतील. असे मला वाटते.

कर्ण जन्माच्या वेळी कुंतीने नऊ महिने दासीच्या मदतीने गरोदर पण लपवलं व जन्म झाल्यावर त्याग केला. हे मी वाचलय

जयु, चुकून सेम कॉमेंट तू दोन धाग्यांवर टाकली आहेस.
Happy
उत्तर इथे देते.
मृत्युंजय, राधेय इत्यादी कलाकृती सत्य असण्याचा दावा करत नाहीत.
आणि मी ही नाही करत. पण लॉगिकली जे पटते आणि सत्याच्या जवळ जाते ते लिहिते आहे.
Happy

त्याकाळात गर्भधारणा लपवणे कितपत शक्य होते एका राजकन्ये साठी?
जर देव मनुष्यरुप घेऊन नियोग करायला आले तर, गर्भ धारणा होईल आणि पुत्रच होतील याची खात्री ते कसे देऊ शकतील?
याचे योग्य पटेल असे उत्तर मला मिळाले नाही.

Happy प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद!

तुम्ही छानच लिहित आहात Happy
But गर्भधारणेविना पुत्रप्राप्ती हे नाही पटल... कथा माहिती असली तरी तुम्ही छान लिहिताय ते वाचायला आवडत
keep writing.... Happy

Back to top