आपल्यातलेच.... पण अनुकरणीय !

Submitted by कुमार१ on 29 July, 2019 - 10:40

समाजात अनेक जण विविध क्षेत्रांत पारंगत असतात. त्यातले काहीजण त्यांच्या कामात चांगले यश मिळवतात. त्यानुसार त्यांची दखल विविध माध्यमांतून घेतली जाते. गौरव, सत्कार, पुरस्कार अशा अनेक प्रकारे त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. त्यामुळे या व्यक्तींना एक वलय प्राप्त होते. त्यांची कर्तबगारी हेच त्यांचे समाजासाठी मोठे योगदान असते.

आता थोडे सामान्य पातळीवर येऊ. आपल्या रोजच्या पाहण्यातही काहीजण आपल्या चरितार्थाव्यतिरिक्त अन्य क्षेत्रांत झोकून काम करत असतात. त्यातले काहीजण तर त्या कामातून कुठलाही आर्थिक वा अन्य लाभ मिळत नसतानाही ते मन लावून करीत असतात. अशा कार्याला कुणी समाजसेवा म्हणेल तर कुणी 'लष्कराच्या भाकऱ्या' म्हणेल. मात्र अशा व्यक्तींच्या दृष्टीने ती त्यांची आवड असते. त्यातून मिळणारे आत्यंतिक समाधान हीच त्यांची कमाई असते.

अशा अनेकांचे कार्य खरोखर समाजोपयोगी असते. तरीसुद्धा त्याबद्दल त्यांच्या वाट्याला जाहीर आदरसत्कार वगैरे येत नाही. अर्थात त्यांना त्याचे काही सोयरसुतक नसते. केवळ निष्ठेने ते काम करीत असतात. आपल्याही परिचयाच्या अशा व्यक्ती नक्की असतील. या धाग्यावर आपण त्यांची थोडक्यात माहिती लिहावी असे मी आवाहन करतो. लिहिताना असे लोक निवडा की त्यांची कधी जाहीर दखल घेतली जात नाही. थोडक्यात ते तुमच्याआमच्यातलेच आहेत पण काहीतरी विशेष करताहेत, अगदी निस्वार्थी भावनेने. कामाचे स्वरूप कितीही 'लहान' भासले तरी त्यातून होणारा सामाजिक लाभ लक्षात घ्यावा.

या प्रकारच्या संकलनातून आपल्यालाही काही प्रेरणा मिळावी हा या आवाहनाचा हेतू. नमुन्यादाखल मी एका उदाहरणाने सुरवात करतो.
…….
यवतमाळ येथील प्रा. अनंत पांडे यांचा हा पहा अनोखा उपक्रम ! ते सार्वजनिक वीज-बचतीचे खूप छान काम करतात. दरवर्षी जून महिन्यात तेथे पहाटे ५ लाच लख्ख उजेड असतो. पण, रस्त्यावरील दिवे मात्र सकाळी ७ पर्यंत चालू असायचे. त्यांना ही उधळपट्टी पाहवेना. त्यांनी सरकारी लोकांकडून त्या दिव्यांची खांबावरील सर्व बटणे माहित करून घेतली. आता ते ५ ला व्यायामाला सायकलने बाहेर पडताना ते सर्व दिवे बंद करत जातात. या महिन्यातही अजून दिवस मोठाच असल्याने त्यांचे काम चालू आहे. गेल्या १० वर्षांपासून ते हे काम नेटाने करताहेत.

आता त्यांच्या या कामावर सरकारी बाबू पण खूश कारण परस्पर काम होतंय ना !
पांडेंना मनापासून सलाम !
….
तर मग येउद्यात अशी अनेक उदाहरणे. कामाचे क्षेत्र कुठलेही असू द्या. उदा. शिक्षण, सेवा, स्वच्छता, आरोग्य, पुनर्वसन…..इ.

धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पांडेंना मनापासून सलाम !
>>+111
चांगला उपक्रम असेल हा धागा म्हणजे. मा. बो. वरील काही हरहुन्नरी व्यक्ती अशा आपल्यातल्या असूनही सगळ्यांना त्यांच्या ध्यासाबद्दल कदाचित माहीत नसेल. तुमच्या धाग्यावर ही माहिती मिळाली तर चांगलंच होईल.

चांगला धागा.
माझ्या माहितीत एक रिटायर्ड गृहस्थ आहेत. ते त्यांच्या घराजवळील एका बँकेत रोज सकाळी २ तास जाऊन बसतात. त्या वेळात ते अनेक अशिक्षित ग्राहकांना फॉर्म भरून देणे, एटीएम मधून पैसे काढायला मदत करणे अशी अनेक कामे आवडीने करतात. ती बँक गावातील दूरच्या भागात असल्याने तिथे बरेच खातेदार हे श्रमिक वर्गातले आहेत.

आपल्यातले आदरणीय म्हणजे अगदी आपल्या माबोवरचे दोघे आहेत की. Happy

सई कडोलीकर - नेत्रा नावाच्या ग्रुपसाठी VC विद्यार्थ्यांना रायटर्स मिळवून देणे किंवा स्वतः रायटर म्हणून जाणे. त्या ग्रुपच्या किंवा अशाच इतर काही सामाजिक कर्तव्यात अजुनही काही सहभाग असेल तर माहीत नाही. दक्षिणा- तिची बहीण किंवा माबोवरचे तिचे मित्रमैत्रिणी यात भर घालू शकतात. याखेरीज पर्सनल जीवनात एक मस्त आई, एक रसिक, खूप सारे वाचन करणारी आणि छान लिहिणारी व्यक्ती म्हणून मी तिला (थोडेसे) ओळखते.

हर्पेन - ही सईसारखीच आदरणीय व्यक्ती आहे. साहसी ट्रेक्स, नेहमीच्या मॅरेथॉनपेक्षा अधिक अंतराच्या आणि अवघड स्पर्धा, उत्कृष्ट लेखन आणि एक संयत व्यक्ती म्हणून ते आपल्याला माहीत आहेतच. त्याव्यतिरिक्त सामाजिक बांधीलकीमधून मेळघाटातील 'मैत्री' प्रकल्पासाठी ते कित्येक उपक्रमात सहभागी असतात आणि माबोकरांना त्या उपक्रमांची माहिती देऊन सहभागी करून घेतात. आदिवासी शाळेच्या 100 दिवसाची शाळा प्रकल्पासाठी हंगामी उत्साही शिक्षक मिळवणे, वैद्यकीय मदतीसाठी आवाहन करून मदत मिळवणं, वैज्ञानिक प्रकल्प या गोष्टी मला आठवताहेत. या व्यतिरिक्त जे काही लिहायचं राहिलं आहे त्यात भर घाला.

आणि हो डॉ. कुमार स्वतःसुद्धा या यादीत असायला हवेत. सध्या सोप्या भाषेत विविध आरोग्यविषयक लेख, आजारांची माहिती, काळजी, पथ्य, आहार आणि प्रतिसदांमध्ये येणाऱ्या प्रश्नांना तत्पर उत्तरं आणि एकूणच आरोग्यविषयक awareness साठी धडपड आणि उत्साह जाणवत असतो. या शिवाय वेगवेगळ्या आजारांची अजून अजून माहिती, संशोधन लेख शोधणे, वाचन हे चालूच असतं, हे त्यांच्या प्रतिसादांमधून दिसतंच. पण हे तर सगळेच डॉक्टर्स करतात, मग डॉ. कुमार या यादीत का? तर त्यांच्या सध्या सोप्या भाषेतील लेखनातून ते जो awareness ( मला मराठी शब्द खरंच आठवत नाहीए), निमार्ण करताहेत तो नक्कीच प्रशंसनीय आहे.

शब्द जपून वापरले गेले पाहिजेत. कोणाला कोणी आदरणीय म्हणावे ह्यावर निर्बंध घालायचा हेतू नाही पण सुचवेन की लेखाचे शीर्षक 'आपल्यातले आणि अनुकरणीय' असे करावे.

मीरा..जागरुकता हा तो शब्द

वरील सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार !
मीरा,
तुम्ही चांगली उदाहरणे दिलीत पण माझे नाव घेतल्याने मला अवघडल्यासारखे झाले. प्रत्यक्ष लोकांत उतरून काम करणारे खरे थोर. त्या तुलनेत मी काही विशेष करत नाही.
तरीसुद्धा धन्यवाद.

हर्पेन,
योग्य सुचवणीबद्दल आभार. तुमच्या कार्याबद्दल अभिनंदन !
शीर्षकात बदल केला आहे.

धन्यवाद कुमार१.

अजून खोलात शिरून 'आपल्यातल्या लोकांनी केलेली अनुकरणीय कृत्ये' असे शीर्षक सुचवतो
कारण एखाद्या(च) चांगल्या कामामुळे संपुर्ण व्यक्ती अनुकरणीय असेलच असे नाही.

असो. धाग्याची कल्पना चांगली आहे.

लॉ कॉलेज रस्त्यावरच्या 'वाडेश्वर' शेजारची कांचन गल्ली टेकडीपाशी जिथे संपते तिथे शेवटी असलेल्या एका घरातल्या माणसांकडून बाहेर कुंपणालगत, उन्हाळ्यात दररोज सकाळी एक पिंपभर पाणी ठेवले जाते आणि त्याच्या बाजूला असतात जुने तेलाचे रिकामे कॅन / पाण्याच्या बाटल्या. टेकडीवर फिरायला जाणारी माणसे आपापल्या ताकदीनुसार एक लिटर दोन लिटर पाच लिटर पाणी वर घेऊन जातात आणि टेकडीवरच्या झाडांना पाणी घालतात. पिंपातले पाणी संपत आले की ते परत भरले जाते आणि वर नेलेले कॅन / बाटल्या रिकाम्या झाल्यावर परत खाली आणल्या जातात.

मी लहान असताना आम्ही घरून बाटल्या न्यायचो त्यापेक्षा हे खूप सोयिस्कर पडते.

पुण्यातील सदाशिव मालशे (उर्फ हरिओम) यांचा हा उपक्रम :

बऱ्याच जणांना चांगल्या कामासाठी व्यक्ती/संस्था यांना देणगी द्यायची असते. पण ज्यांना आपण देणगी देणार आहोत त्याचा पुढे विनियोग योग्य प्रकारे होईल का, अशी धास्तीही असते. मालशे यांचेकडे विश्वासार्ह अशा संस्थांची /व्यक्तींची यादी आहे. जर आपण त्यापैकी एखादी निवडली तर देणगीचा धनादेश ते स्वतः संबंधित ठिकाणी पोचवतात. अर्थातच ते हे काम विनामूल्य आणि आवडीने करतात.

(मी ही माहिती काही वर्षांपूर्वी एका मासिकात वाचली आहे).

त्यापेक्षा वरिष्ठांकडे / मंत्र्यांकडे / कोर्टात तक्रतक्रार्/दाखल केली की सरकारी बाबु वठणीवर येतील. हवे तर मिडीयाची मदत घ्यावी पण सरकारी नोकरांची कामे जनतेने करण्याचे टाळावे. अशाने सरकारी नोकर अजुनच कामचुकार बनण्याचा धोका संभवतो.

नवीन , सरकारी लोकांना कामाचा खूप ताण असतो, सरकारी नोकर कामचुकार कोणत्या तोंडाने बोलता, घरात वीज, पाणी रेल्वे, पोलिओ लस, रस्ते, कोण प्रायव्हेट बिल्डर किंवा कंपनी तयार करते काय,आणि जर जनतेची कामे होत असतील तर कुणीही करावीत तक्रार करून होणारे काम होणार नाही, आणि अजून एक कदाचित आवडणार नाही ज्याचे त्याचे त्यांनी ठरविलीली प्रायोरिटी असते आपल्यातलेच नक्कीच आहेत अनुकरणीय नक्कीच नाहीत कारण स्वतः स्वतःला काय हवे ते निवडावे कोणाची कॉपी नको

माझ्या माहितीतील एका ज्येष्ठ नागरिकांनी सुरू केलेला हा उपक्रम.
सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी सोसायटीतील ४ मोलकरणी च्या मुलांना मोफत इंग्लिश शिकवायला सुरवात केली आहे.

छान धागा.
हर्पेन, हरिओम काकांना संपर्क करायचा झाल्यास कसा करता येईल?

हर्पेन, हरिओम काकांना संपर्क करायचा झाल्यास कसा करता येईल?
>>>

सॉरी सुनिधी मी आता वाचला प्रतिसाद. आमच्याकडे असलेला त्यांचा नंबर आहे ९६०४६ ४४२१२