एका बालक माकडाचे कुतूहल

Submitted by Dr Raju Kasambe on 29 July, 2019 - 11:29

एका बालक माकडाचे कुतूहल

एका घनदाट जंगलामध्ये लंगूर माकडांचा एक कळप राहत असे. त्यात अनेक माकडं होती. पण एक फार मोठे नर माकड सर्वांवर अधिकार चालवीत असे. त्याला सर्वजण आदराने भड्या म्हणत. असे म्हणायचे की कळपात जन्माला आलेल्या सर्व बच्चे कंपनीचा तोच पिता होता. इतर तरुण नर माकडांना तो मारून रागावून धाकात ठेवत असे आणि कळपातल्या तरुण माकडीनींजवळ अजिबात फटकू देत नसे.

कळपातील एक माकडीन गेल्या अनेक दिवसांपासून थोडी मंदावली होती. तिने या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारायचे पण कमी केले होते. फळे आणि लुसलुशीत पाने खायला जाताना पण ती फार काळजी घेत असे.

लवकरच तिने एका छोट्या गोंडस बाळाला जन्म दिला. ते अगदीच लाल रंगाचे होते. त्याचे डोळे मोठे होते. आपल्या आई बाबांप्रमाणे त्याच्या अंगावर राखाडी केस नव्हते की त्याचे तोंडही काळे नव्हते. एवढेच नव्हे तर ते ‘हुप हुप’ ऐवजी ‘ची ss ची’ करून केकाटत असे. त्याच्या आईने प्रेमाने त्याचे नाव ‘मंकी’ ठेवले.

सुरुवातीला मंकी फार घाबरट होता. आईच्या छातीला पक्के बिलगून चिकटून बसायचा आणि चीs चीs करून दुधाची मागणी करायचा. त्याची आई पण त्याला आपल्या कुशीत लपवून ठेवी. त्याचे लाड पूरवी. कळपातल्या इतर माकडीनी सुद्धा त्याचे लाड करीत. त्याला खेळवित, समजावित. पोटाशी धरित. त्याची काळजी घेत.

हळूहळू मंकी वाढू लागला. त्याच्या अंगावर सोनेरी लव यायला लागली. तो सुद्धा आईला सोडून एखाद्या फांदीवर जाऊन बस, एखाद्या वडाच्या पारंबिला लटकुन बघ, छोटीशी उडी मार, कळपातल्या दुसर्‍या पिल्लाची शेपटी ओढ असले खेळ खेळू लागला.
कळपात धोक्याचा इशारा झाला की मंकीची आई त्याला पटकन उचलून छातीशी लावायची आणि झाडावर उंच ठिकाणी जाऊन बसायची. मंकी खेळत असला की तिचे लक्ष सदानकदा मंकीकडेच लागून असायचे.
संध्याकाळ होऊन अंधार पडला लागला की मंकी गुमानं आपल्या आईच्या कुशीत लपून छान झोपत असे. त्याला तेथेच सुरक्षित वाटायचे.
एकदा रात्री त्याची झोपमोड झाली. शेजारच्या झाडावरून आवाज येत होता.
‘ही ही हीs... हु हु हुs हा हा हाs…’
‘आई आपल्याला कोण हसतंय?’ मंकीने विचारले.
‘बेटा ते घुबड आहे आणि ते हसत नाहीये. त्याचा आवाजाच तसा आहे.’ मंकीची आई.
‘त्याला झोप नाही येत का?’ मंकी.
‘अरे घुबड निशाचर असतं. म्हणजे ते दिवसभर झोप काढतं आणि रात्रभर शिकार शोधतं!’ मंकीची आई.
‘मग त्याला दिसतं कसं? मला तर काहीच दिसत नाहीए’ मंकी.
‘त्याचे डोळे फार मोठे बटबतीत असतात. भीती वाटण्याइतके. त्याचे कानसुद्धा अतिशय तीक्ष्ण असतात. नुसत्या आवाजावरून सुद्धा ते अंधारात शिकार साधू शकतात!’ मंकीची आई.
‘शिकार? काय गं खातात ते?’
‘उंदीर, खारी, सरडे असे छोटे प्राणी!’
‘अय्या, म्हणजे ते आपल्यासारखं फळं, कोवळा पाला खात नाहीत?’
‘नाही बाळ, आता तू झोप. उद्या सकाळी तुला मी वडाच्या झाडाच्या ढोलीत झोपलेले घुबड दाखवीन.’

अर्थात, दुसर्‍या दिवशी मंकीला खेळण्याच्या धुंदीत याची आठवण राहिली नाही. पण, त्याला एक लांब कुरूप पण रंगीत पक्षी त्याच्याकडेच उडत येताना दिसला. त्या पक्षाचे पंख आणि शेपटी काळी होती. चोच पिवळी होती. चोचीच्या वर शिंगासारखे काहीतरी होते. तो पक्षी जवळच्याच फांदीवर उतरला आणि वडाची फळे खाऊ लागला.

‘आई गं ते बघ घुबड फळ खातेय’ मंकी आनंदाने किंचाळला.
‘अरे बाळा ते घुबड नाहीए. तो धनेश आहे. आणि त्याला प्राणी नव्हे तर फळं खायला आवडतं.’
‘आणि पक्षाला शिंग कसे गं आले?’
‘बेटा, अंडी घालायची असतात तेव्हा धनेशाची मादी स्वतःला झाडाच्या ढोलीत कोंडून घेते. ढोलीचे छिद्र चिखलाने लिंपून घेते. पिल्लं जन्मली, उडण्यायोग्य झाली की ती ही ढोली फोडून पिल्लांना घेऊन बाहेर पडते. त्या ढोलीचे लिंपण फोडायला तिला शिंग कामी येते.’
‘मग मी पण खाऊ का वडाची फळं?’
ह्या प्रश्नावर त्याच्या आईने त्याला एक छान लालचूटूक फळ काढून दिलं. मंकीने लगेच ते खाल्लं.
‘पण मंकी खूप शेंड्यावर जायचं नाही. नाहीतर फांदी मोडून पडशील खाली.’
‘मग कशी गं खायची फळं?’
‘अरे जाड फांदीवर घट्ट बसायचं आणि आजूबाजूच्या बारीक फांद्या हाताने ओढून फळं तोडून खायची.’

मंकीचे काही समाधान झाल्यासारखे वाटले नाही. पण त्याला वडाच्या फळांची चटकच लागली. तो अगदी बारीक फांदीवर जाऊन लोंबकाळत किंचाळत राहायचा. मग त्याची आईच त्याला जवळ ओढून घ्यायची. दात विचकाऊन त्याच्यावर रागवायची सुद्धा.
एके दिवशी दुपारी काय झाले की कळपातील सर्वजण पोटभर फळे आणि लुसलुशीत पाला खाऊन सुस्तावले होते. मंकीच्या आईला पण डुलकी लागली होती. ही संधी साधून मंकी आणि आणखी एक पिल्लू हळूहळू झाडावरून खाली उतरले. मग पारंब्यांना लटकुन त्यांनी छान झोके घेतले. एकमेकांची शेपटी ओढली. एकूण काय तर खूप माकडचेष्टा केल्या. आज मंकी खूप उल्हसित होता.

अचानक भड्याने जोरात आवाज दिला
‘सावधान! खक खक खकोss खक.’
मंकी आणि त्याचा सोबती उड्या मारून पटकन एका फांदीवर चढून बसले.
‘अरे बापरे, केवढा मोठा प्राणी! चीs चीs चीs’ मंकी ओरडायला लागला.

मंकीच्या आईची झोप कधीचीच उडाली होती. ती वेड्यासारखी त्याला शोधत होती. मंकी आणि त्याचा सोबती पार घाबरले होते. त्यांच्या अंगावरचे केसन केस उभे झाले होते आणि दोघेही चीs चीs चीs ओरडत डोळे विस्फारून झाडाखालचे दृष्य बघत होते.
त्यांचा आवाज ऐकताच ती लांब उड्या टाकीत मंकीजवळ पोहोचली. आईने जवळ घ्यायच्या आधीच तो तिच्याकडे झेपावला आणि तिच्या छातीला बिलगला. त्याची छाती प्रचंड धडधडत होती.

‘आई कोणता गं प्राणी हा? मला त्याची फार भीती वाटतेय. माझ्याकडेच बघत होता तो.’
‘आधी तू शांत हो बघू. तू मला वचन दे की तू मला सोडून उगाच ऊनाडक्या करणार नाहीस.’
‘अगं मी ऊनाडक्या नाही केल्या. पारंब्यांना लटकुन छान झोके घेतले. कित्ती कित्ती मज्जा...’
आईने त्याच्या मुस्कटात एक हाणली म्हणून त्याचा आवाज बंद झाला. छोट्या मंकीच्या डोळ्यात अश्रु तरळले. आईला बिलगून तो हमसू लागला. माकडीन त्याला थोपटू लागली. पाठीवरून हात फिरवीत त्याला म्हणाली,
‘अरे बेटा, तो खाली उभा आहे ना प्राणी, तो पट्टेवाला वाघ आहे. तो माकड जातीचा नंबर एकचा शत्रू आहे!’
‘म्हणजे गं काय?’ मंकीने मुसमुसतच विचारले.
‘अरे बाबा तो माकडांना मारून खातो!’
‘पण का गं? आपण त्याला त्रास तर नाही ना दिला?’
‘कारण त्याला फळं आवडत नाही. तो मांसाहारी आहे. तो फार चपळ असतो. आपल्यालाच नव्हे तर जंगलातील कुठल्याही प्राण्याला तो मारून खातो. तो कुणालाच भीत नाही. म्हणून तर आम्ही त्याला जंगलाचा राजा मानतो...’
आईची गोष्ट पूर्ण होण्याआधीच मंकीचे डोळे मिटले होते. पण छाती मात्र अजूनही धडधडत होती.

हळूहळू आईने मंकीला आजूबाजूच्या जंगलाचा परिचय करून दिला. मंकीला आता वड, पिंपळ, उंबर, आंबे, पेरु, जांभळं अशा कितीतरी फळांची ओळख झाली होती. एवढेच नव्हे तर कोवळा लुसलुशीत पाला सुद्धा त्याला आवडायला लागला होता.
त्याच्या अंगावरची सोनेरी लव जाऊन आईसारखेच राखाडी केस त्याच्या अंगावर आले होते. तोंड पण लाल न राहता आईसारखे काळे झाले होते. कपाळाच्या वर छान टोपी घातल्यासारखे सरळ केस आले होते. उन्हात त्याची डोळ्यावर छान सावली पडत असे.
एक दिवस सोबत्यासोबत जमिनीवर माकडचेष्टा करीत असताना त्याला पालापाचोळयात काहीतरी हालचाल जाणवली. तो मागच्या दोन पायांवर उभा राहून बघू लागला. पण त्याला काहीच दिसत नव्हते. चीs चीs आवाज करून त्याने झाडावर चढून आईला गाठले.

‘आई, तेथे काय आहे गं?’
‘बारे झाले तू वर चढून आलास. अरे त्या पालापाचोळयात अजगर लपलाय!’
‘मग तो दिसत का नाही?’
‘कारण तो तुझी शिकार करणार होता!’
‘म्हणजे?’
‘अरे तो फार प्रचंड आकाराचा साप असतो. संपूर्ण हरिण सुद्धा तो गिळंकृत करू शकतो.’
आपले प्राण संकटातून वाचल्याचे ऐकुन मंकीचा घसा कोरडा पडला होता. जंगलातील अनेक प्राण्यांचा मंकीला हळूहळू परिचय होत गेला. त्याला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्याची आई तिच्या परीने देत असे.

एवढ्यात त्याला चितळ नावाचे हरिण खूप आवडायला लागले होते. त्याच्या कळपाला बघून अनेकदा चितळांचा कळप झाडाखाली घुटमळत असे. मग मंकी आणि त्याचे मित्र चितळांसाठी खूप सार्‍या फांद्या आणि फळे तोडून खाली टाकत असत. चितळ ते आनंदाने खात. कधी कधी मंकी आणि त्याचे सोबती खाली उतरून चितळांच्या पाठीवरून उड्या मारीत नाहीतर त्यांची त्यांची शेपटी ओढीत. पण बिचारे चितळ कधी रागवायचे नाहीत.
जंगल जीवनात आवश्यक असलेली सतर्कता मंकी शिकत होता. अन्न कसे मिळवायचे ते पण तो शिकला. हळूहळू तो हुशार होत होता. आईचे त्याच्यावर फार प्रेम होते. त्याला बरेचदा आईच्या कुशीत झोपायची इच्छा व्हायची. पण इतर समवयस्क माकडांकडे बघून तो सुद्धा एखाद्या फांदीवर छान ताणून द्यायचा. मग हळूच त्याची आई जवळ येऊन त्याच्या केसातून हात फिरवायची. एखादी ऊ शोधून पटकन खायची. तेव्हा त्याला आपण खूप सुरक्षित आणि जगात सर्वात सुखी असल्यासारखे वाटायचे.

त्याला फक्त त्याच्या बाबांची म्हणजे भड्याची भीती वाटायची. ते विनाकारण त्याच्यावरच नव्हे तर सर्व पुरुष मंडळींवर डाफरायचे. दात विचकायचे. अंगावर धाऊन जायचे. त्याला तर ते रागीट स्वभावाचे आहेत असे वाटायला लागले होते. मंकी त्यांच्यापासून नेहेमी चार उड्या दूरच राहायचा.
मंकी दिवसागणिक वाढत होता. त्याचे आईला प्रश्न विचारून भंडावून सोडणे हळूहळू कमी होत गेले.

डॉ. राजू कसंबे
२००५

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानेय गोष्ट.
शेवटी क्रमशः लिहायचे राहिले.
जंगलाचा राजा सिंह ना?
माकडीन ६० एक वर्ष जगते पण एक-जास्तीतजास्त दोन पिल्लं जन्माला घालते हे ऐकून आश्चर्य वाटलं होत.

सो माकडांच्या कळपात फक्त अल्फालाच माकडीणी मिळतात आणि त्याचाच वंश पुढे जातो. मग बाकी सगळे मेल माकड राहतात तरी कशाला गटात? मधमाशांसारखं एकच राणी, काही मेल आणि भरपूर कामगार माशा, असं नसतं ना माकडांत? ते बीटा मेलदेखील फरटाइल असतात ना?