ऱथ महाली पोचला. भीष्म व्यथित मनाने आपल्या कक्षात जाऊन बसले. 'गुरुंनी केलेले शाब्दिक आघात, त्यांचा अपूर्ण राहिलेला न्याय, आपल्यामुळे दुखावलेली, उधवस्त झालेली अंबा..... ! हस्तिनापूरा, वचनबद्ध नसतो, तर गुरुंवर हत्यार चालवण्याचे महापाप करण्याआधीच इच्छामृत्यू घेतला असता मी!'
विचित्रवीर्य तोल सांभाळत भीष्मांच्या कक्षाबाहेर आला, "भ्राता भीष्म...." त्याच्या हाकेने विचारांतून बाहेर पडत भीष्मांनी मागे वळून बघितले. उठून त्याला धरत आसनावर बसायला भीष्मांनी मदत केली,"युवराज, आपण का आलात? मला बोलावले असते.... मी सेवेत हजर झालो असतो."
"भ्राताश्री, युवराज नाही, तुमचा अनूज आला आहे." हात जोडत विचित्रवीर्य म्हणाला तसा त्याला खोकला लागला.
"सावकाश विचित्रवीर्या...." भीष्मांनी पाणी देत त्याच्या पाठीवरून काळजीने हात फिरवला. ऱाजवैद्य जास्तीत जास्त उत्तम दुर्लभ औषधी विचित्रवीर्यला देत होते. पण म्हणावा तितका फरक पडलेला नव्हता.
"मी ठिक आहे भ्राताश्री. पण.... आपण अशांत वाटता. माता पण म्हणत होत्या." विचित्रवीर्य आसनावर मोठ्ठ्या कष्टाने थरथरत बसला होता. भीष्मांनी खिडकीची तावदाने लावत विचित्रवीर्याच्या अंगावर शाल गुंडाळली.
"काय झाले आहे भ्राताश्री? तुम्हाला... उख्कु... उख्क... " खोकला त्याला नीट बोलूही देत नव्हता, "कोणी दुखावले आहे का ?"
"विचित्रवीर्या, तु राजवैद्यांनी दिलेली औषधी घेतो आहेस ना वेळेवर?" उत्तर टाळत त्यांनी विचारले.
"हो. उख्हु.... अंबिका, अंबालिका देखील त्याची खबरदारी घेत आहेत." भीष्मांचा हात धरत विचित्रवीर्य उत्तरला, तेव्हा त्याचे हात कापत होते. "भ्राताश्री, तुम्ही उत्तर देत नसलात तरी.... मी मनातून प्रार्थना करेन. तुमच्या या पिडेचे कारण.... उख्कू... उख्कू.. संपून जावे.." बोलल्यानेही त्याला थकवा जाणवत होता, "आणि तुम्हीच दु:खी 'राहू' लागलात तर.... हस्तिनापूरवर 'राहू'ची दशा लागेल ना....उख्हू.... उख्ह....! हा हा... हा हा" विचित्रवीर्याच्या मते त्याने भीष्मांना हसवण्याकरिता एक विनोद केला होता.
भीष्म त्याच्या समाधानाकरता हासले. त्यांना त्याच्या प्रकृतीची आता अधिक चिंता वाटू लागली. विचित्रवीर्य जाण्याकरिता लडखडत उठला. भीष्मांनी त्याला आधार देत त्याचा हात खांद्यावर टाकून घेत सगळा भार स्वतःवर घेतला. त्याचे बोलणे सुरुच होते. "भ्राताश्री, तुम्ही उदास राहू नका. तुम्ही माझ्यासाठी तातश्री समान आहात. तुम्हाला अस उदास पहावत नाही मला. उख्कु... उख्कु..." भीष्म त्याला त्याच्या कक्षेत सोडून सक्तीने आराम करण्यास बजावून आले. जर त्याने भीष्मांना झालेल्या जखमा पाहिल्या असत्या आणि त्याचे कारण त्याला कळले असते तर.... ? काय कारण सांगणार होते भीष्म त्याला त्यांच्या अस्वस्थतेच? गुरुंसमोर उलट शब्दही जिव्हेवर धारण न करणाऱ्या या भीष्माने आज गुरुंवर चालवायला उगारलेले ब्रह्मास्त्र? गुरूंनी मृत्यूदंड द्यायचा केलेला आणि नियतीने अपूर्ण ठेवलेला न्याय? कदाचित त्याची तब्येत अजून बिघडली असती. अंबाचे हस्तिनापूर महालात येऊन भीष्मांचा अनादर करणे, विचित्रवीर्याला आधीच जिव्हारी लागले होते. त्यात त्याची प्रकृती ढासळत चालली होती. अंबिका, अंबालिका त्याची पुरेपुर काळजी घेत होत्या. पण क्षणभर जरी त्यांची नजर चुकली, की हा धडपडत भीष्मांच्या कक्षात येउन बसायचा. काही तरी बोलण्याचा प्रयत्न करायचा. त्यातले थोडेफार समजण्यासारखे असायचें बाकीचे खोकला व्यापत होता.
'आराम का करत नाहीस ?' या प्रश्नावर त्याच 'जीव गुदमरतो.' हे उत्तर ! भीष्म पुरते घाबरलेले होते. दिवसागणिक भीष्मांना त्याची तब्येत खालावल्यासारखी वाटू लागली.भीष्मांनी अनेक वैद्य त्याच्या तैनातीत ठेवले. पण जसे तडा गेलेल्या घड्यात समुद्र जरी ओतला, तरी त्या घड्याच्या नशिबी रिते होणेच लिहिलेले असते, तशी स्थिती विचित्रवीर्यच्या नशिबाची होती.
'त्याचा दुर्धर आजार त्याला क्षणाक्षणाला गिळंकृत करू पाहतोय..... आणि नुसते बघण्याऐवजी आपण काSही करू शकत नाही..... जवळच्या व्यक्तीला अस कणाकणाने मरताना बघत राहायचं.... ?' एक दिवस विचित्रवीर्या ऐवजी भीष्मांच्या कक्षेत अंबिका आणि अंबालिकेच्या आक्रोशाचा ध्वनी घुमला.......
©मधुरा
छान. <<भीष्म त्याला त्याच्या
छान. <<भीष्म त्याला त्याच्या कक्षेत सोडून सक्तीने आराम करण्यास बजावून आले. >> टायपो झालाय.
कक्षात असा शब्द हवा.
संपादन केले. धन्यवाद!
संपादन केले. धन्यवाद!
^^^^^भीष्मांचा हात धरत
^^^^^भीष्मांचा हात धरत विक्रमवीर्य उत्तरला, तेव्हा त्याचे हात कापत होते.^^^^^ इथे विचित्रविर्य असायला हवं....
कथा एकदम छान चाललीये..... सगळं महाभारत माहिती असुनही तुमचं लिखाण वाचताना महाभारत वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघायला मिळतंय.....
पुढचे भाग येऊद्या लवकर.....
केले संपादन.
केले संपादन.
धन्यवाद. लिहिते आहे. ऱोज एक भाग टाकेन
खूपच छान
खूपच छान
धन्यवाद ऊर्मिलास जी
धन्यवाद ऊर्मिलास जी
खूप सुंदर लिहित आहात. मला आता
खूप सुंदर लिहित आहात. मला आता रोज पुढच्या भागाबद्दल उत्सुकता असते. महाभारत तसे माहिती असले तरी तुमच्या कथेतून नव्याने वाचायला मिळते आहे आणि नवीन गोष्टी कळत आहेत. पु.ले.शु.
माझे महाभारताचे आणि एकुणच इतिहासाचे वाचन फारसे झालेले नाही. तुम्ही लिहित आहात त्यात कल्पना विलास किती आहे?
धन्यवाद चौकट राजा जी !
धन्यवाद चौकट राजा जी !
महाभारत स्वतःच इतकी रंजक कथा आहे, कि फार काही नटवायची गरजच पडत नाही. कथेत कल्पना विलास चवीला घातलेल्या मिठाइतका आहे. सत्य घटना दडवणे किंवा चुकीचा रंग देणे असे काही केलेले नाही. मालिकेपेक्षाही काल्पनिक प्रसंग यात कमी आहेत, अस म्हणले तरी चालेल.