युगांतर - आरंभ अंताचा भाग ५

Submitted by मी मधुरा on 21 July, 2019 - 00:11

चंद्रदेवाने त्याची ताऱ्यांची सभा आकाशात मांडली आणि महाल दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाला. महाराजांचा रथ पोचला आणि दास-दासी लगबगीने आरती आणि गुलाब पुष्प घेऊन आले. आरतीने महाराजांचा त्यांच्या भावी पत्नीसोबत प्रवेश झाला. महाराज्यांच्या नावाचा जयघोष झाल्यावर भावी महाराणींचे नाव सर्वत्र घोषित करण्याकरिता दासांनी नावाची विचारणा महाराजांना केली. शंतनूने क्षणभर चकित होऊन सुंदरीकडे पाहिले. जिला जीवनसंगिनी बनवायचे, तिचे नावही त्याने विचारले नव्हते. दिलेले वचन तत्परतेने पाळत होता की तिचा परिचय त्याला तिच्या नेत्रांतून मिळाला होता.... कोण जाणे! महालातल्या दिव्याच्या प्रकाशात तिचे रुप अजून सुंदर भासत होते. काय असेल तिचे नाव?
"गंगा" तिच्या मुखातून बाहेर येताच तिच्या नावाने महालात जयघोष सुरु झाला. शंतनूला ते नावही परिचयाचे वाटू लागले! आपण तिच्यात किती आकंठ बुडलोय, हे जाणवून तो स्वतःशीच हसला. गुलाबाच्या पाकळ्यांना पदस्पर्श करत भावी महाराणी गंगाने महालाच्या प्रथम दालनात प्रवेश केला.
हस्तिनापुरचे आनंदाचे दिवस सुरू होते. न सांगता एकमेकांच्या भावना जाणत प्रेम सागरात तरंगणाऱ्या शंतनूला कधी प्रश्न पडले नाहीत आणि गंगेच्या वचनाची बाधा त्यांच्यात कधीच उद्भवली नाही. महाराणी गंगा आणि महाराज शंतनूच्या विवाहानंतर तर हस्तिनापुरावर निसर्ग प्रसन्नच होता जणू. वरूणदेव, सुर्यदेव, भूमाता सर्व हस्तिनापूरावर त्यांचे आशिषछत्र धरून होते. नगरात ख्याली खुशाली होती.
त्या आनंदाच्या मुकुटात सुखाचा शिरोमणी सजला. शंतनू महाराज आणि महाराणी गंगा यांना आपत्यप्राप्ती होणार, ही बातमी नगरात सर्वांना कळली. शंतनूच्या आनंदाला सीमाच राहिली नव्हती. नगरात मिष्टान्न, वस्त्र आणि धान्य वाटून त्याने नगरवासीयांचे आशिर्वाद घेतले. राज्याला वारस मिळणार ! सगळ्यांच्या आकांक्षा गंगेच्या होणाऱ्या बाळावर लागून होत्या. होणारा राजपुत्र असेल की राजकन्या असेल.... ते राज्याचा विस्तार कसा करतील.... नगरी स्वप्नांचे इमले बांधत होती.
आणि तो सोनेरी क्षण ! महालात बाळाच्या रडण्याचे सूर घुमले आणि शंतनू उत्साहाने गंगेच्या कक्षात जायला निघाला. दासीनी हात जोडून पुत्रप्राप्तीची आनंद वार्ता दिली. शंतनू हर्षित झाला. कंठमाळ काढून त्याने दासीच्या हाती ठेवली आणि कक्षाच्या दिशेने वळला. तितक्यात गंगाच बाहेर आल. हातातले बाळ केशरी रंगाच्या वस्त्रात गुंडाळून. आरक्त वर्णी नाजूक त्वचा, गोंडस लहान तन!

आपल्या छोट्या आवृत्तीला कवेत घ्यायला शंतनूने हात पुढे केले. परंतू.... शंतनूकडे दुर्लक्ष करत ती सरळ महालाबाहेर गेली. भांबावलेला शंतनू तिच्या मागे मागे जाऊ लागला. गंगा वनातून वाट काढत नदी किनारी आली. नदी किनारा! त्यांच्या भेटीचे ठिकाण! हा सुंदर परिसर आपल्या विस्मरणात गेल्याची जाणीव त्याला झाली. परंतु गंगेच्या मनातला ह्या जागेविषयीचा जिव्हाळा अजून तसाच आहे हे पाहून शंतनू सुखावला. ह्या ठिकाणी बाळाला घेउन आपल्या पत्नी सोबत काही वेळ मुग्ध शांततेत काढावा म्हणून शंतनू पुढे झाला. तेव्हड्यात घडलेल्या घटनेला पाहत असताना त्याच्या चेहऱ्यावर यातना, आश्चर्य, दु:ख असे सगळे भाव एकदम दाटून आले. त्याचा डोळ्यांवर विश्वासच बसेना. पायातले सगळे बळ हरवून गेल्यासारखे तो जमिनीवर कोलमडला. हृदय-भेदक दृश्य होते ते..... प्रत्यक्ष गंगेने स्वतःच्या नुकत्याच जगात आलेल्या तान्ह्या बाळाचे नदीच्या प्रवाहात अक्षरश: विसर्जन केले होते.

घडलेली गोष्ट सत्यात घडली होती या ह्यावर त्याचे मन विश्वास ठेवायला धजत नव्हते. माता तर देवाहून श्रेष्ठ! तिने असे करावे? का? कशासाठी? कोण ठेवेल या वर विश्वास? जिने जन्म दिला तिनेच तो घ्यावा? जन्मदात्री? की हत्या करणारी? एक पाषाण हृदयी माता! तो विचारांच्या जाळ्यात अडकून तसाच जमिनीत रुतून बसला होता. डोळ्यांतून वारेमाप अश्रूंची श्रद्धांजली त्याच्याही न कळत त्याच्या नुकता जगात येउन निरोप घेणाऱ्या राजपुत्राला तो वाहत होता. जाऊन सरळ तिला याचा जाब विचरायला हवा. शंतनू ने सगळे बळ एकवटले. थरथरत तो गंगेजवळ गेला. काही बोलणार त्या आधीच गंगाने मागे न वळता उद्गार काढले, " वचन लक्षात आहे न महाराजांना?" तो जागीच हादरला. आपण दिलेले वचन आपल्या बाळाच्या गळ्याला फास बनेल, असे स्वप्नातही त्याला वाटले नव्हते. पिता म्हणून संरक्षण नाही तर निदान महाराज म्हणून हत्येची शिक्षा तरी कोणाला देणार होता शंतनू? जन्मदात्रीलाच? विस्फारलेल्या नजरेने तो नुसता तिच्याकडे पाहत होता. तिच्या मुखावर दुखा:चा, पश्चात्तापाचा लवलेशही नव्हता. गंगा निर्विकार चेहऱ्याने महालाच्या दिशेने चालू लागली.

हे सार हस्तिनापुरात सुरू असताना सुर्यदेवांभोवती भुमातेने पुढच्या ८ प्रदक्षिणा पूर्ण केल्या. हस्तिनापुर नरेशने त्याचे वचन पाळत आजवर आपल्या ७ वंशदिव्यांचे हत्याकर्म उघड्या डोळ्यांनी पाहत नरक यातना भोगल्या होत्या. वचन पाळावे तर पुत्रहत्या आणि तोडले तर गंगावियोग! शंतनू आणि हस्तिनापुर त्यांच्या महराणींच्या या कृत्याने दु:खी झाले होते. महाराणी आपल्या कुळाचा निर्वंश का करत आहेत हे काही केल्या शंतनूला उमगत नव्हते.

आज पुन्हा महालात तान्हूला रडण्याचा आवाज कानावर पडला. जल्लोषा ऐवजी पसरलेली भयाण शांतता शंतनूला आतून जाणवत होती. शंतनूला आता ही शांतता असह्य झाली होती. 'ज्याच्या संरक्षणात जीवन वृक्ष वाढायला हवा, त्याच पित्याच्या नजरे समोर त्यांचा होणारा अंत माझ्याच भाळी का?' हा प्रश्न उच्च स्वरात कधी अश्रू गाळत तर कधी केविलवाण्या स्वरात देवाला केला होता.
गंगा वनातली वाट तुडवत बाळाला नदीकिनारी घेऊन चालली होती. तटावर रडून मस्तक तप्त झालेल्या बाळाला नदीच्या थंड प्रवाहात ठेवायला वाकली. शंतनूचा स्वतःवरचा ताबा आता पूर्णपणे सुटला. शंतनू जिवाच्या आकांताने तिच्या पायांना विळखा घाळत म्हणाला, 'थांबा महाराणी! का करताय या निष्पाप जीवांच्या हत्या?"
महाराणीच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच दु:खी भाव शंतनूने पाहिले. तिने श्वेत वस्त्रात गुंडाळलेल्या बाळाला शंतनूच्या हातात ठेवले. शंतनूने आवेगाने बाळाला छातीशी घेतले. कपाळावर ओठ टेकवताच अश्रूंचा थेंब बाळाच्या मस्तकावर पडला. कितीतरी वर्षांने त्याच्या हातात त्याचे इवलेसे बाळ होते..... जिवंत!

" तुम्ही वचन मोडलत महाराज? "
" गंगे...."
गंगा नदीत उतरू लागली.
" निदान उत्तर तरी द्या, महाराणी! का पाडलत मला वचन मोडायला भाग? का केलीत आपल्याच आपत्यांची हत्या?"
मागे वळून तिने त्याच्या डोळ्यांत पाहिले. तिच्या डोळ्यांत एक तिव्र दु:खाची किनार त्याला जाणवली.
" हत्या नाही, महाराज! मुक्तता केली मी त्या सर्वांची या मृत्यू लोकातून!"
" मुक्तता? "
"अष्टावसूंना मिळालेल्या शापातून! त्यांनी मला विनंती केली राजन्! माझ्या पोटी जन्म देउन त्त्या जन्मातून मुक्ती देण्याचे सहाय्य त्यांना करायचे ठरवले मी! पण या वसूच्या भाग्यात अजून मृत्यूलोकीच्या यातना बाकी आहेत असे दिसते, महाभिषक!"
" महाभिषक? मी ? "
"अज्ञानात सुख असते, राजन्! आपण जगत असलेले आयुष्य शापाची पुर्तता करण्यासाठी आहे, हे समजले की पुढची वाटचाल अवघड होते. मला आणि तुम्हाला या मृत्युलोकी यावे लागले तेही शापामुळेच! " व्यथित शंतनू कडे पाहत तिने बाळाला हातात घेतले, " आपल्या प्रेमाने तुला वेदना दिल्या राजन्! पण तुझ्यामुळे मृत्युलोकात राहण्यास भाग पडलेल्या या आपल्या बाळाचे आयुष्य तुझ्यासाठी मी आनंददायी बनवेन. "
" कुठे घेऊन चाललात प्रिये त्यास? " शंतनू हळहळला.
" काळजी नसावी राजन्! आई म्हणून मनाला भीषण जखमा करून घेत वसूंना मुक्ती दिली मी. आता मन पुन्हा कठोर बनवणे शक्य नाही मला. आता आपल्या पुत्राला तुमच्या राजगादीवर बसण्यायोग्य बनवेन आणि तुमच्या स्वाधीन करेन मी, राजन्! आज्ञा असावी! "
गंगा बाळाला घेउन नदीप्रहावावर चालत धुक्यात गुप्त झाली. संपूर्ण बरसून मेघ पांढरे शुभ्र होऊन शुष्क बनतात शंतनूचे नेत्र असेच शुष्क बनून शुन्यात बघत होते. आता तो एकटाच होता..... पुन्हा त्याच नदीतटावर!

क्रमशः

Part 4 link: https://m.facebook.com/story.php?story_fbid=2542474512478576&id=10000148...

Note: Picture found on net.
#Yugantar_Part5
#Mahabharat
#Yugantar_Aarambh_Anatacha

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users