काठीचा घाट आणि गवळण घाट

Submitted by योगेश आहिरराव on 8 July, 2019 - 00:24

काठीचा घाट आणि गवळण घाट

कर्जत, माथेरान, खोपोली, पाली भागातल्या ट्रेकला सुनील सोबत असला तर मी सहसा माझी गाडी नेणं टाळतो कारण परत येते वेळी कल्याणात शिरताना लागणारी ट्रॅफिक त्यामुळे बदलापूर पर्यंत बाईक किंवा ट्रेन ने जाणं खूप बरे पडते. ट्रॅफिकचा मनस्ताप टाळता येऊन वेळ ही वाचतो. यावेळी छोटी चार्वी सोबत असल्यामुळे पहाटे बाईक न घेता ट्रेनने जायचं ठरवलं, न जाणो तिला मागे बसून डुलकी लागली तर... त्यामुळे आपली लोकल ट्रेन बरी. आम्ही दोघे सकाळी पावणेसहाच्या सुमारास बदलापूर स्टेशन बाहेर पडतो तोच सुनील गाडी घेऊन हजर. खराब अवस्थेतला (नाईलाजाने) पाइपलाइन रोड पकडून कर्जत चौक मार्गे खोपोलीत पोहचलो तेव्हा पुण्याहून आमचे सह्यमित्र राजेश सर आधीच येऊन वाट पाहत होते. काय करणार खड्डेयुक्त रस्त्याची कृपा. एकेठिकाणी छोट्या स्टॉल समोर परवानगी घेत त्यांची बाईक उभी करून आम्ही तीन फुल, एक हाफ गाडीतून निघालो. यावेळी नियोजन होते ते कळंब अनघाई खोऱ्यातील दोन पुरातन घाटवाटा. ‘कोराई’ उर्फ ‘काठीचा’ घाट आणि ‘गवळण’ घाट. मायबोलीकर मनोजकडून दोन्ही वाटांची व्यवस्थित माहिती मिळाली त्याचा फायदा झालाच.
जांभूळपाड्याला कमानीपाशी असलेल्या हॉटेल विलास मध्ये छान चविष्ट नाश्ता करून, नऊच्या सुमारास कळंब गावात पोहचलो. सुरक्षित ठिकाणी गाडी ठेवून कळंब ठाकूरवाडीची वाट धरली. गेल्या वर्षी अनघाई किल्ल्यासाठी इथे येणे झाले होते तेव्हा पासून या वाटा खुणावत होत्या. तसे पाहिले तर अनघाई घाट, गवळण घाट आणि काठीचा घाट या तीन ह्या खोऱ्यातील प्रचलित वाटा.
IMG_4238.JPG
अनघाई किल्ला उजवीकडे ठेवत माळरानातून चाल, वाटेत झाडाजवळ अस्तव्यस्त पडलेली पुरातन शिल्प. नदी पार करून अर्ध्या पाऊण तासात कळंब ठाकूरवाडी गाठली. छोट्या चारूला पाहून बरीच मंडळी हैराण झाली. चालेल का ही पोर ? जमल का हिला ? एवढ्या लांब सहाराला जाणार तुम्ही ? पाणी पिऊन, वाटेतल्या धनगरपाड्याची वाट विचारून घेतली. पदरात वसलेला ‘डाके धनगरपाडा’, तिथून पुढे ‘काठीचा घाट’ व ‘गवळण घाट’ या दोन वाटा निघतात. ठाकूरवाडी पासून खाली नदी पात्रात मळलेल्या वाटेने उतरलो, जाताना उजवीकडे दिसणारा अनघाई किल्ला. पुन्हा वर चढून सपाटीवर आलो डावीकडच्या ढोर वाटा सोडत मुख्य मळलेली वाट धरली. तसेही या दिवसात पानगळमुळे एक वेगळाच बदल जाणवतो शिशिर ऋतू संपून वसंतची सुरुवात. त्यात आजचे वातावरण एकदम छान आणि प्रसन्न. काही अंतर जात वाट रानात ओढ्याला डावीकडे ठेवत तिरक्या रेषेत चढू लागली. मध्ये एके ठिकाणी ठाकूरवाडीतील काही बाया छोटे छोटे दगडं कातळावर घासत होत्या त्याने घूं घूं असा आवाज. त्यामुळे बिळात जमिनीत लपलेले खेकडे पाणी आलं असं समजून बाहेर येतात, मग ते पकडणे सोपे जाते. असाच अनुभव मागच्या कोकणदांड आणि भोरप्या नाळेच्या ट्रेक वेळी आला होता. दिवसभराची मेहनत घेऊन किती खेकडे मिळत असतील याचा नेमका अंदाज नाही.. असो. पुढे वाटेत लहानसा कातळटप्पा पार करून, ओढ्याच्या वरच्या भागात ब्रेक घेतला.
IMG_4298.JPG
चार्वी आता चांगलीच सेट झाली होती घरातून निघताना अगदी ट्रेकच्या सुरुवातीला तिला खूप चालावं लागेल हे बजावून सांगितले होते. राजेश सर आणि सुनील सोबत तिची चांगलीच गट्टी जमली. डोरेमॉन, छोटा भीम, मोटू पतलू तसेच मुगांबो छोटा कमांडो असं काही तरी. छोटे चढ उतार पार करत पुढच्या पंधरा वीस मिनिटांत पदरात आलो. समोर कौलारू छप्पर असलेले विटांचे बांधकाम, जवळ गेल्यावर पाहिलं तर आत भल्या मोठ्या दगडाचा देव आजूबाजूला जुनी घंटा, समई, अर्धवट विझलेल्या अगरबत्ती. हे अनघाई देवीचे मंदिर. इथूनच घाटाची सुरुवात होते पण आम्ही थोड मागे जात डाके धनगरपाड्यात गेलो.
IMG_4331.JPG
सात आठ घरं त्यापैकी चार घरे राबती असलेला हा धनगरपाडा पहिल्या भेटीतच आवडून गेला. आजूबाजूला आंबा फणस सारखी मोठी सावली देणारी झाडं, घरासमोरील स्वच्छ सारवलेले अंगण. जवळच पाण्याची टाकी, गुरुत्वाकर्षामुळे वरच्या ओढयातून पाणी पाईपाद्वारे थेट पाण्याचा टाकीत. त्यामुळे पाण्याची चांगली सोय.
IMG_4341.JPG
‘गोविंद आखाडे’ यांनी पुढची वाट समजून सांगितली. मोकळ्या मैदानातून पाईपाच्या साथीने वाट निघाली, वाटेत एका दगडाला शेंदूर फासलेले व बाजूला पुरातन अवशेष या ठिकाणाला इथली मंडळी मरीआई देवी म्हणतात. आता आमच्या समोर होता दोन्ही वाटांचा पॅनोरमा. थोड पुढे जाउन डावीकडे धारेवर जात खिंडी सारखं दिसते तिथून जाते ती काठीच्या घाटाची वाट तर उजवीकडे सरळ टप्याटप्याने चढुन पुढे दांडावरून जाणारी गवळणीची वाट. थोडक्यात Y जंक्शन सारखे. पदरातल्या जंगलात शिरल्यावर जरा बरे वाटले. इथली ही झाडं चांगलीच मोठी आणि उंच. त्यामुळे छान गारवा जाणवत होता तसेच जोडीला अनेक पक्षी. बुलबुल, नीलपंख, भारतद्वाज, कोतवाल तर फोटो घेण्याच्या नादात हुलकावणी देऊन गेलेला स्वर्गीय नर्तक. तांबट पक्ष्याचा आवाज तर हवाहवासा वाटणारा. एकंदरीत मस्त वातावरण. मोठा अर्थात कोरडा ओढा पार करत वर चढून बरोब्बर दोन्ही वाटेच्या जंक्शनवर आलो. काठीच्या घाटाने चढाई ठरली असल्यामुळे त्या दिशेने डावीकडे निघालो. पुन्हा थोडी रानातून चाल, थोडी चढाई, मग तुरळक जंगल, पानगळ मुळे फरक जाणवला त्यात एका टप्प्यात या दिवसात बहुतेक ठिकाणी जाळतात तसेच गवत जाळून टाकलेले. आधीच झाडी नसलेला हा भाग काळा पडल्यामुळे भकास वाटत होतं. झटपट तिथून निघत झाडीच्या टप्प्यात थांबलो.
बाजूला गवळण घाट, समोर या वाटेंचा पहारेकरी अनघाई त्या मागे दक्षिणेला सरसगड. खाली पाहिलं तर डाके धनगरपाडा त्या मागे नैऋत्य दिशेला सरळ रेषेत सकाळी होतो ती कळंब ठाकूरवाडी. सुका खाऊ खात थोडा आराम करून पुढची चढाई सुरु. जवळपास अर्धा तास दाट झाडी मग बांबू कारवीच्या रानातून वाट कड्यावर बाहेर आली. इथून उलगडला पूर्ण कळंब अनघाई खोऱ्याचा विस्तृत प्रदेश.
IMG_4403.JPG
वायव्येला ड्युक्सनोज पासून लायन पॉईंट, पायमोडी घाट, मृगगड तसेच वासुंडे माणगाव खोऱ्यातील वाटा. हवा स्वच्छ असल्यामुळे बराच फरक जाणवला. फोटो काढत थोडं रेंगाळून, पुढील दहा मिनिटांत माथा गाठला. वाट एकदम सपाट मैदानावर आली, जागोजागी बहुतेक फॉरेस्ट खात्याने दगडांवर मार्किंग केलेलं. IMG_4420.JPG
सरळ मुख्य वाट धरली, समोरच उत्तर दक्षिण पसरलेला कोरीगड, ईशान्येला मोरगिरी तर उजवीकडे साल्टरचा डोंगर. भर उन्हात त्या झाडी नसलेल्या पठारावरून चालणं भारी काम ! त्यामुळे चार्वी, कधी येईल ? अजून किती राहिलं ? असं विचारू लागली. थोडं आहे, आलंच आता. तिथे गेल्यावर तुला आईसक्रीम गिफ्ट देणार असे काहीतरी सांगून मी आणि सुनील तिला पुढे नेत होतो. पठारावर इकडे तिकडे बऱ्याच ढोरवाटा त्यात ही फॉरेस्टची मुख्य रस्त्याच्या दिशेने जात असलेली. बरेच अंतर गेल्यावर उजवीकडे एक बऱ्यापैकी ठळक वाट जाताना दिसली, दिशेनुसार आंबेटेप धनगरपाडा तिथेच होता. थोडक्यात सरळ रस्त्याला आंबवणे गावाच्या दिशेनं जाऊन वेळ अधिक घालवण्यापेक्षा त्या ठळक वाटेला लागलो. पुढे ती वाट गेट मधून अनेक लहान मोठे बंगल्याचा प्रोजेक्ट कॉलनीत.
सिक्युरिटी गार्डने विचारलं, त्याला कसे कुठून आलो ते स्पष्टीकरण दिले. मग तिथून पूर्ण फिरून मेंन गेट ने भांबर्डे रस्त्यावर आलो. बाहेर येताच लगेच उजव्या हाताला आंबेटेप धनगर पाडा. अगदी अत्याधुनिक सोयी सुविधा असलेल्या बंगलो प्रोजेक्ट लगत हा धनगरपाडा. कुठे तो हायफाय विकास आणि कुठे हे स्थानिक भूमिपुत्र. क्षणात तफावत जाणवली हल्ली बहुतेक हिल स्टेशन वर हाच ट्रेण्ड दिसतो, आपल्या जमिनी परप्रांतीयांना विकून त्यांचीच चाकरी करायची. एके ठिकाणी थांबलो नेहमी प्रमाणे विचारपूस करण्याधीच गार पाण्याचा तांब्या हजर. घरातल्या मावशीला आमचे खास करून लहान चारु, तिचं त्यांना खूप नवल वाटले. दुपारचे दोन वाजून गेलेले, त्या मावशींच्या अंगणातच जेवणाला थांबलो, जेवण अर्थातच घरून आणलेले. गप्पांमध्ये समजले की हे ‘आखाडे’ पदरातल्या डाके धनगरपाड्यात राहणारे ‘गोविंद आखाडे’ यांचे भाऊबंद चुलते निघाले. त्यात मध्येच केवणीचा विषय आला चक्क तिथल्या ‘ढेहबे’ मामांच्या घरात या घरातली मुलगी दिलेली हे सारे एकमेकांना सोयरिक.
निघते वेळी मावशीची मुलगी व जावई आले, पुन्हा तोच विषय त्यांनाही भर उन्हात घाटाने आलो आणि परत खाली तसेच जाणार याचं मोठं कौतुक. खुद्द जांभूळपाडा गावात राहणारे असून ते कधी घाटाने येत नाहीत, हल्ली झालेली वाहतुकीची सोय आणि साधनं. जवळपास सर्वत्र असेच. पर्याय तयार असताना वेळ आणि श्रम वाचत असल्यास कुणाला नको आहे, आपण ही आज त्यांच्या जागी असतो तर हेच केले असते ! .. असो. मावशीचा ‘अनिल’ आम्हाला गवळण घाटाची सुरुवात दाखवायला सोबत आला. आंबेटेप मधून मावळतीला निघाल्यावर डावीकडे मोठं शेततळे. हल्लीच फॉरेस्टवाल्यांनी तयार केलेले असेच दोन तळे आम्हाला खाली सुद्धा पहायला मिळाली. चांगला उपक्रम म्हणायला हवे. वीस एक मिनिटांत तुरळक झाडीतून वाट उतरू लागली. पुढची वाट समजवून सांगत, इथून अनिल माघारी फिरला.
IMG_4453.JPG
झाडीचा लहान टप्पा उतरून वाट कड्यावर आली. डावीकडे सरळसोट कडे आणि तीव्र उताराच्या घळी तर उजवीकडे येताना दिसलेला नागफणी मृगगड ते आलो त्या काठीच्या घाटाचा नजारा. सौम्य उतरण घेत वाट दोन्ही बाजूला दरी असलेल्या निमुळत्या दांडावर आली. अंदाजे पाच सातशे मीटर त्या दांडावरून चाल. फार असा तीव्र उतार आणि घसारा नव्हता ते एक बरं झालं. सुनील आणि राजेश सरांनी चार्वीला बोलण्यात गुंतवत तो भाग एकदम आरामात पार केला. पुढे वाट उजवीकडे यु टर्न घेऊन नागमोडी वळणं घेत उतरू लागली. नंतर झाडीच्या टप्प्यात उजवीकडे खाली ओढ्याला ठेवत प्रशस्त अशी वाट.
IMG_4491.JPG
कुठेही चुकायची अशी शक्यता नाहीच. बऱ्यापैकी खाली आल्यावर मोठा ब्रेक घेतला, राजेश सरांनी लिंबू सरबत तयार केले. या वाटेने खाली उतरताना डावीकडे अनघाई किल्ला तर उजवीकडे काठीची वाट कायम दिसत रहाते. हा थोडफार प्रकार नाखिंड व कौल्याच्या धारेसारखा ते दोन्ही घाट सुद्धा अगदी असेच. अर्ध्या तासात Y जंक्शनला आलो. पुन्हा छोटी उतराई मग ओढा पार करून जंगलातील आडवी चाल संपवत मोकळ्या मैदानात आलो. धनगरपाड्या जवळच्या पाण्याचा टाकीतून रिकाम्या बाटल्या भरून घेतल्या.
सायंकाळच्या उन्हात त्या पठारावर एकदम प्रसन्न वाटत होते. सकाळी येताना आखाडे मामांना सांगितलं होतं की सायंकाळी चहा घ्यायला येऊ. त्याप्रमाणे मामांचे घर गाठलं. अनायसे जिथं जेवणासाठी थांबलो ते नेमके तुमचे चुलते निघाले आणि केवणीतल्या ढेहबे मामांचा मागच्या ट्रेकचा मोबाईल मधला फोटो मामांना दाखवला. तिथल्या म्हाताऱ्या मंडळींना फारच आश्चर्य वाटलं. दिवसभराची चाल आणि चार्वीकडे पाहत ते तर आम्हाला रात्रीच्या जेवण व मुक्कामासाठी आग्रह करू लागले. पुढच्या वेळी फुरसत मध्ये नक्की येऊ, सध्या फक्त चहा घेणार.
IMG_4506.JPG
गप्पांमध्ये इतर विषय निघाले, कधीकाळी इथल्या ठाकरं, आदिवासी, धनगर यांनी सहारा सिटीच्या वेळी पंचवीस पन्नास रुपये रोजंदारीवर या वाटांनी ये जा करून काम केलेले. आज तरुणवर्ग उद्योग धंदा पोटापाण्यासाठी बाहेर पडला मागे राहिली ही जुनी खोडं उतारवयात आपलं हक्काची जागा आणि घर सोडवत नाही मग आहे ते पशुधन सांभाळत राहणं. हेच चित्र जवळपास सगळीकडे. अर्धा तासाच्या या ब्रेक मध्ये चांगलेच रिफ्रेश झालो. निरोप घेऊन पुन्हा नक्की येणार असं सांगत उतराईसाठी आलो ती ठाकूरवाडीची वाट न घेता, मोठी वापरातली खालच्या आखाडे धनगर पाड्यातून जाणारी मुख्य वाट धरली. पक्षी गुरं ढोरं आपल्या घराकडे निघालेली, त्या पार्श्वभूमीवर आभाळाची रंग पंचमी पाहत सुर्यास्ताचा रम्य देखावा.
IMG_4522.JPG
हळुवार येणाऱ्या गार वाऱ्याच्या साथीने पठारावरून संधीप्रकाशात एकदम शांत निवांत चाल. डाव्या बाजूला दरी पलीकडे समोर कळंब ठाकूरवाडीत दिवे लागण होऊ लागलेली. पाऊण तासात खाली उतरून आखाडे धनगर पाड्यात आलो. इथून फार्म हाऊसच्या दिशेने निघालेली मुख्य रस्त्याची वाट सोडून डावीकडे नदी पात्राला समांतर जाणारा शॉर्टकट घेतला. वाटेत काही ठिकाणी वाळू गाळण त्यासाठी बहुदा हा बैलगाडी, ट्रॅक्टरचा मार्ग. पुढे जात नदी पार करून गावात जाणारी उजवी बरोब्बर पकडली. पुढे माळरानात दगडी शिवपिंड व पुरातन अवशेष. खरंच या भागात भरपूर प्राचीन काळाच्या सध्या नामशेष होत जाणाऱ्या अनेक खुणा. कोकणातील अनघाई, घाटावर कोराई यांच्या देखरेखीत या वाटांचा होणारा पूर्वापार वापर हीच साक्ष देतात.
गावात दाखल झालो तेव्हा आठ वाजलेले. ज्याच्या घराजवळ गाडी लावली होती ते वाटच पाहत होते. पूर्ण दिवसभरची चर्चा मग फ्रेश होत चहा घेऊन परतीला लागलो. दिवसभरात सारच मनासारखे घडून अतिशय आनंददायी असा हा ट्रेक आम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहील यात वादच नाही.

अधिक फोटोसाठी हे पहा : https://ahireyogesh.blogspot.com/2019/03/kathi-gavalan.html

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

वा! छान झाला की ट्रेक. चार्वीचे कौतुक. लहान वयात केवढी एनर्जी ! बरं, नाश्ता, जेवणात काय खाल्ले ते पण लिहीत जा, तेवढीच आम्हाला पण व्हरायटी .

नेहमीप्रमाणे मस्त लेख. फोटोही सुरेख आहेत.
चार्वीची कमाल आहे. चांगली तयार होईल. मुक्कामी ट्रेक असेल तर तिला जरा सोपे होईल असे वाटते. कौतुक आहे तिचे.

वा! इतर बरोबरीची मुले नसली तरी चार्वीने ट्रेक केला!
---
रसायनी स्टेशनहून कर्नाळा आणि गोवा रस्त्याने परत हा ट्रेक आवडेल तिला.

धन्यवाद रश्मीजी. बरं, नाश्ता, जेवणात काय खाल्ले ते पण लिहीत जा, >>> फार काही विशेष नसते ओ, घरातून साधा पोळी भाजीचा नाही तर ठेपले पराठे किंवा पुलाव भाताचा डबा असतो.

या वयाची मुले मोठ्यांच्या पुढे असतात ट्रेक मधे. फक्त त्याना आवड पाहिजे !
नेहमीप्रमाणे उत्तम ट्रेक वर्णन आणि फोटो !

धन्यवाद शाली व SRD .... मुक्कामी ट्रेक असेल तर तिला जरा सोपे होईल असे वाटते>>> खरय तिलाही मुक्कामी ट्रेकच जास्त आवडतात.
रसायनी स्टेशनहून कर्नाळा आणि गोवा रस्त्याने परत हा ट्रेक आवडेल तिला. >>> कर्नाळासाठी मुहुर्त काही येत नाहीये.