भुताळी दवाखाना

Submitted by बोकलत on 29 June, 2019 - 12:37

कोकणातलं साधारण एक दोनशे अडीचशे उंबरठा असलेलं आमचं गाव. बालपण कोकणातच गेलं. त्याकाळी टीव्ही होते पण केबलचा म्हणावा तेव्हडा सुळसुळाट झाला न्हवता. रात्री सगळ्यांची जेवणं आटपली कि आजूबाजूचे सगळे ओटीवर जमायचे आणि गप्पांचा फड रंगायचा. राजकारण, क्रिकेट, गावातल्या घडामोडी आणि लाईट गेलेली असली कि भुतांच्या गोष्टी सांगितल्या जायच्या, भुतांच्या गोष्टी निघाल्या कि दवाखान्याचा हमखास उल्लेख व्हायचा. आडवळणावर असलेला तो दवाखाना तीस चाळीस वर्षे तसाच भकास पडून आहे. हा दवाखाना बांधण्याच्या अगोदर ही जागा गुरांसाठी चारण्याचं माळरान होतं. ही जागा शापित होती म्हणतात.लोकांना पछाडणं ,विचित्र भास होणं, रात्रीच्या वेळी भलतंच काहीतरी दिसणं असे प्रकार नेहमीचे होते.दवाखाना बांधला आणि काही दिवसातच या जागेने रंग दाखवायला सुरवात केली. रात्री किंचाळण्याचे आवाज येणं, कोणीतरी दिसणं, लाईट अचानक चालू बंद होणं, रुग्णांची तब्येत अचानक बिघडणं असले प्रकार सर्रास होऊ लागले. या घटनांमुळे हे हॉस्पिटल काही महिन्यातच बंद पडलं.अर्थात या सगळ्या ऐकीव गोष्टी. खरं खोटं देव जाणे.
लहानपणी आजीसोबत शेतावर जायचो तेव्हा दुरून हा दवाखाना दिसायचा. तिथे भुतं राहतात हीच त्याची बालवयात झालेली ओळख. नंतर साधारण सहावी सातवीत असेल काकाजवळ हट्ट करून या जागेवर पहिल्यांदा गेलो. तेव्हा खरोखरच भकास वाटली ही जागा. आतमध्ये गेलो तर नक्की कोणीतरी भूत आपल्या मानगुटीवर बसणार असं काहीतरी वाटत होतं. नंतर जाणं झालं ते मित्रांसोबत, यावेळी पाच सहा जणं होतो त्यामुळे थोडा धीर करून आतमध्ये गेलो. मस्त प्रशस्त दवाखाना होता. एकंदर बांधणीवरुन त्याकाळात एखाद्या खेडेगावात एव्हडा मोठा आणि प्रशस्त दवाखाना का बांधला असेल असा विचार मनात आला. एक आयताकृती मोठं बांधकाम, मधोमध गार्डन. समोर एक भला मोठा पॅसेज, आजूबाजूला भरपूर खोल्या, समोर प्रशस्त जागा असं आपलं अशा आपल्या रूपात तो दिमाखदारपणे उभा होता.पहिल्या वेळी थोडी भीती वाटली नंतर जरा सेट झाल्यावर इकडे तिकडे मोकळेपणी पण जरा दबकत दबकत फिरायला लागलो. खोल्यांमध्ये असणारे बेड आणि लटकलेल्या सलाईन भीती वाढवत होते,पण शांतता कमालीची होती. थोडा वेळ इकडे तिकडे भटकून नंतर घरी परतलो. थोडे दिवस गेले एकदा सहज त्या वाटेवरून येत होतो, काय झालं अचानक काय माहित मला चक्क त्या दवाखान्यात जायची इच्छा झाली. थोडा धीर करून प्रथम दरवाज्याजवळ गेलो, नंतर आतमध्ये गेलो, शांततेशिवाय तिथे कोणीही न्हवतं. आजही मी गावी गेलो कि एकदातरी तिथे भेट देतो. त्या जागेत नक्कीच काहीतरी आहे जे मला वारंवार तिथे खेचून आणतं.

दवाखान्याचा दर्शनी भाग
1.jpgIMG-20190318-WA0010.jpg

गेल्या गेल्या हा नजारा दिसतो. तो एकदम समोर आहे ना तो पॅसेज. त्याच्या आजूबाजूला खोल्या आणि त्या खोल्यात तुटलेले बेड आणि लटकलेल्या सलाईन. वरती वटवाघळाचा थवा लटकलेला असतो आणि खाली एखाद दुसरा साप हमखास दिसणारच,त्यामुळे संध्याकाळी गेलो कि तिकडे पुढे जायचं शक्यतो टाळतो.
IMG-20190318-WA0004.jpg

इथून त्या पेंटिंगसारख्या त्रिकोणी डोंगराआड होणार सूर्यास्त एकदम लाजवाब
IMG-20190318-WA0013.jpg

गार्डन आता नाहीये पण एके काळी असावं
IMG-20190318-WA0014.jpgIMG-20190318-WA0012.jpgIMG-20190318-WA0007_0.jpg

कोणी काहीही म्हणोत मला या ठिकाणी जायला आवडतं. मला या ठिकाणी भुतं आहेत कि नाही ते माहित नाही पण धावपळीच्या रुटीनपासून वेगळं झाल्यावर मनाला जी शांतता लागते ती इथे नक्की आहे. मला संध्याळाकी इथे यायला आवडतं, ही शांतात मला कुठेतरी भूतकाळात घेऊन जाते आणि कितीतरी विस्मरणात गेलेले प्रसंग डोळ्यासमोर आणून ओठावर हसू फुलवते. इतके दिवस झाले मला तरी इथे काय अमानवीय जाणवलं नाही फोटो बघा तुम्हाला काय जाणवतंय का.

Group content visibility: 
Use group defaults

बोकलत अशा गुढ जागी जी शांतता मिळते ती बाकी कुठेच मिळत नाही.
3,4 आणि 5 नंबरचे फोटोज पाहुन जागेला भेट द्यावी असं वाटतंय.

डेंजर आहे.खरं असेल तर इतकी ऐसपैस जागा गावात पुढची फार वर्षं मोकळी राहणार नाही. एखादं रेझोर्ट बनेल काही वर्षात.

छान जागा आहे. ते तुटलेल्या बेड्स आणि लटकलेले स्लाईनचे फोटोपण पोस्ट करा.
बार्बेक्यू पार्टी करायला मजा येईल इथे.

सगळ्यांचे मनापासून आभार,
@akki नाही, हा एकच भाग आहे.
@मानव, हो पुढच्या वेळी गेलो की नक्की टाकेल ते फोटो.

रोचकय.
> एकंदर बांधणीवरुन त्याकाळात एखाद्या खेडेगावात एव्हडा मोठा आणि प्रशस्त दवाखाना का बांधला असेल असा विचार मनात आला. > उत्तर शोधणार का?

विनोदी विडिओ साठी कोणता धागा न सापडल्याने इथे टाकतोय. युट्युबवर बरेच ढोंगी बाबांचे चॅनेल्स आहेत . त्यातला ह्या डुप्लिकेट भुताने लै हषीवल मला Lol
https://www.youtube.com/watch?v=cqKE_3m1WLQ

अहो बोकलत भाऊ तिथे गेल्यावर तुम्हाला अपार शांती मिळते यात काही नवल नाही
मात्र तुमच्या तिथे जाण्याने भुतांची शांती नक्कीच संकटात सापडली म्हणून ती तिथून पळाली
त्याच काय.. बिचारी भुते..

उत्तर शोधणार का?>>> नको, अज्ञानात सुख असत असं म्हणतात.
@रमेश रावल त्यांनापण माझी सवय झाली असेल, मी एकदम शांतताप्रिय माणूस आहे याची खात्री झाली असेल त्यांना.

फोटोज छान आहेत. अमानवीय नाही,पण गूढ वाटताहेत. जुनाट तुटक्या जागाना असं उदास आणि गूढ वलय असतं.

मात्र हे हॉस्पिटल चालू असताना किंवा पुढे कधी चालू झालं तर मस्त असेल. हॉस्पिटलची जुन्या वाड्यासारखी रचना (मध्ये चौक असलेली) छान वाटते आहे. त्यात बाग आणि फाउंटन केलं की पेशंट आणि नातेवाईकांसाठी किती सुखद होईल.

बोकलत, या जागेची अजून माहिती काढा की.

हे बहुतेक जूने PHC असावे. राजकीय चढाओढीत दवाखाना दुसरीकडे हलवला असावा आणि बोकलत नव्या फोनची जाहिरात तर नाही ना? बाकी तुमचा देव गण असल्याने भुतं तुमच्या समोर गुणी बाळांसारखी अदृश्य अवस्थेत हाताची घडी तोंडावर बोट चूप बसत असतील.

बोकलत, या जागेची अजून माहिती काढा की.>>>> तीस चाळीस वर्षे जुना आहे दवाखाना त्यामुळे गावकऱ्यांना जास्त काही माहिती नाही, पुढच्या वेळी गेलो की तिथल्याच दोन चार भूतांना पकडून विचारतो, काही माहिती मिळाली तर मिळाली Happy
@खान, माझा राक्षस गण आहे
@सस्मित, दिसायला फक्त असे दिसताहेत, शांतता तर अशी आहे की कुंग फु पांडा मधला इनर पीस मिळेल.

फोटोत कुठे दिसल्या नाहीत.>>> त्या भागात मी संध्याकाळी जात नाही,सेफ नाहीये त्या भागात संध्याकाळी जाणं, विंचू साप वैगरे, काय भरोसा नाही. हे फोटो हॉस्पिटलचा 30% ते 40% भाग कव्हर करताहेत, अजून पुढे हॉस्पिटल बऱ्यापैकी मोठं आहे. पुढच्या वेळी गेलो की त्या भागाचे पण टाकेल फोटो.

छान लिहिलेय. आधी वाटले भुताची गोष्ट बिष्ट आहे पण वाचून छान वाटले. गावी अशा बऱ्याच जागा असतात जिथे काहीतरी असते, शहरात माणसांना जागा नाही तिथे भुतांना कुठून मिळणार.....

आमच्या गावी असे भूताळी हॉटेल आहे. तीन मजली भले मोठे लाम्बरुंद हॉटेल उभे आहे. जिथे हॉटेल उभे केले त्या जागी कधी काळी सती गेलेल्या बायांची वृंदावने उभी होती. ती तोडून तिथे हॉटेल उभे केले गेले. हॉटेल बनल्यावर ते सुरु व्हायच्या आधीच प्रॉब्लेम्स सुरू झाले. संध्याकाळच्या वेळी हातात पंचारती घेतलेल्या बाया दिसायला लागल्या व. व. आता हे सगळे खरे की हॉटेल चालू नये म्हणून इतर हॉटेल वाल्यांनी अफवा उडवून दिली देव जाणे. हॉटेल सुरू होत नाही म्हटल्यावर मालकाने जागा शाळा किंवा तत्सम कामासाठी भाड्याने द्यायचा प्रयत्न केला पण तोही निरांजनवाल्या बायांनी हाणून पाडला. रस्त्याला लागून असलेली ही वास्तू सध्या मोकळी पडलीय. हॉटेल सुरू झाले असते तर बऱ्यापैकी चालले असते हे नक्कीच.

अंधेरी येथील पारशी कॉलनी (पंप हाऊस साईडला) आहे तिथे पूर्वी माझ्या मैत्रिणीचे घर होते एका डोंगरावर छान मस्त भले मोठे प्रशस्त आणि थोडे वर गेले कि तिथे एक पडीक किल्ला होता व त्याचा भलामोठा दरवाजा (त्या दरवाज्यामागे काय होते हे आम्ही कधीच जाणून घ्यायचे प्रयत्न नाही केले) लहानपणी त्या दरवाज्यासमोर असलेल्या जागेत डान्स प्रॅक्टिस करायचो स्कूल च्या ग्यादेरिंगसाठी. पण खर सांगू तीही जागा अशीच पडीक आणि भुताळलेली होती आम्ही मात्र आपल्याच मस्तीत जगत असल्याने अश्या गोष्टींचे आम्हाला कधीच प्रॉब्लेम नाही झाला. तिथेच जवळपास पारशी लोकांची विहीर सुद्धा होती ज्यात ती लोक जिवंत प्रेते टाकत (वंदता होती) आम्ही कधीच नाही पहिले पण कोणी आत्महत्या केल्याचे ऐकून होतो.

मस्त लिहलंय, अशा काही जागा मी राहायचो त्या गावी पण होत्या पण कालांतराने तिथे प्लॉट्स आणि घरं निर्माण झाले.

बोकलत, हा दवाखाना मुंबई गोवा महामार्गाजवळचा का? शेट्टी हॉस्पिटल? मी नाव ऐकून आहे, पण प्रत्यक्ष पाहिलेला नाही. अपघातग्रस्तांवर लगेच उपचार व्हावेत म्हणून हे हॉस्पिटल हायवेजवळ बांधलं होतं असं ऐकलंय.

नाशिकजवळील देवळाली कॅम्प येथे बऱ्याच मुंबईच्या श्रीमंत लोकांनी उन्हाळी सुट्टी घालवायला खूप मोठमोठ्या हवेल्या/बंगले बांधले आहेत. काहिंचे मालक हयात नाहीत तर तिथे असंच भितीदायक वाटतं.

सगळ्यांना परत एकदा धन्यवाद,
@वावे, तुम्ही म्हणताय तो दवाखाना हाच असेल, माणगांवच्यापुढे लोणारेवरून गोरेगावला जायला रस्ता आहे तिथे आडवळणावर आहे हा दवाखाना. फक्त नाव शेट्टी नसून सेठिया आहे.

Pages