जिवंत पण जाणीवरहित

Submitted by कुमार१ on 2 June, 2019 - 22:23

बेशुद्ध पडलेला रुग्ण हा त्याच्या कुटुंबीयांसाठी धडकी भरवणारा विषय असतो. अचानक आलेली बेशुद्धी ही तर अधिक चिंताजनक असते. ही अवस्था नक्की कशामुळे येते हे सामान्यांना नीट समजले नाही तरी तिचे गांभीर्य कळते. तिच्या मुळाशी मेंदूच्या कार्यातील विशिष्ट बिघाड असतो, जो मेंदूच्या ऑक्सिजन पुरवठ्यातील कमतरतेने होतो. या बिघाडाची अनेक कारणे असतात. त्यामध्ये विविध आजार, गंभीर अपघात, व्यसनांचा अतिरेक आणि काही औषधांचे प्रमाणाबाहेर सेवन यांचा समावेश होतो. बेशुद्ध रुग्णास शुद्धीवर आणणे हे डॉक्टरसाठी एक आव्हान असते. ते पेलत असताना त्याला आपले वैद्यकीय कौशल्य अगदी पणाला लावावे लागते.

बेशुद्धावस्थेची विविध कारणे, संबंधित रुग्णतपासणी व त्याचे निष्कर्ष आणि अशा रुग्णाचे भवितव्य या सगळ्यांचा आढावा या लेखात घेत आहे. सुरवातीस आपली जागृतावस्था आणि मेंदूचे संबधित कार्य यांची माहिती देतो. त्यातून पुढे माणूस बेशुद्धावस्थेत कसा जातो हे समजेल.

coma.jpg

लेखातील विवेचन खालील मुद्द्यांच्या आधारे असेल:
१. जागृतावस्था आणि मेंदूचे कार्य
२. बेशुद्धावस्थेची कारणे
३. रुग्णतपासणी
४. उपचार, आणि
५. रुग्णाचे भवितव्य

जागृतावस्था आणि मेंदूचे कार्य:

हे समजण्यासाठी मेंदूची संबंधित रचना जाणली पाहिजे.

brain.jpg

ढोबळपणे मेंदूचे ३ भाग असतात: मोठा मेंदू, छोटा मेंदू आणि मेंदूची नाळ (stem). मोठ्या मेंदूच्या बाहेरील आवरणाला cortex असे म्हणतात. हा भाग जैविकदृष्ट्या सर्वात उत्क्रांत असतो. तिथे सर्व मज्जातंतूंच्या संदेशांचे एकीकरण होते.
याउलट मेंदूची नाळ ही जैविकदृष्ट्या सर्वात प्राचीन भाग आहे. तिच्यामध्ये RAS नावाची एक ‘उत्तेजक यंत्रणा’ असते. तिच्यातील मज्जातंतूंत सतत काही रासायनिक क्रिया होतात. त्यातून cortexला संदेश जातात. RAS आणि Cortex यांच्या समन्वयातून आपली जागृतावस्था टिकवली जाते. जेव्हा कुठल्याही कारणाने या यंत्रणेवर विपरीत परिणाम होतो, तेव्हा संबंधिताची शुद्ध जाऊ शकते.
मेंदूचे वजन शरीराच्या जेमतेम २% आहे. पण आपल्या एकूण ऑक्सिजन वापरातील तब्बल २०% वाटा त्याचा आहे. मेंदूला रक्तपुरवठा सतत चालू लागतो. जर तो काही कारणाने थांबला, तर अवघ्या काही सेकंदांत बेशुद्धावस्था येते.


बेशुद्धावस्थेची कारणे:

अनेक प्रकारचे आजार आणि डोक्याला जबरी मार बसणारे अपघात यांमध्ये व्यक्ती बेशुद्ध होते. काही प्रमुख कारणे आता समजून घेऊ.

१. मेंदूच्या रक्तपुरवठ्यातील अडथळा: याची दोन कारणे आहेत.
अ) रक्तवाहिन्या त्यांच्यात साठलेल्या मेद-थरांमुळे आकुंचित वा बंद होणे (Stroke)
आ) रक्तवाहिनी फुटणे.
या कारणामुळे येणारी बेशुद्धी ही बरेचदा अचानक येते. बऱ्याचदा अशा रुग्णांना लकवा / पक्षघात झालेला असतो.

२. अपघात : बऱ्याच वाहन अपघातांत डोक्यास जबरी मार लागतो. तसेच डोक्यावर कठीण वस्तूचा जोराचा प्रहार हेही महत्वाचे कारण आहे.

३. औषधांची विषबाधा: मेंदूला गुंगी आणणारी औषधे (प्रामुख्याने opium गट) आणि अन्य घातक पदार्थ अतिरिक्त प्रमाणत घेणे. हे मुख्यतः व्यसनी लोकांत आढळते. तसेच आत्महत्या वा खून करण्यासाठी देखील यांचा वापर होतो. जवळपास ४०% बेशुद्ध रुग्णांत हे कारण सापडते.

४. हृदयक्रिया बंद पडणे: हृदयविकाराचा तीव्र झटका व अन्य काही आजारांत जर हृदयस्पंदन थांबले (arrest) तर मेंदूचा रक्तपुरवठा खंडित होतो. सुमारे २५% बेशुद्ध रुग्णांत हे कारण सापडते.

५. जंतूसंसर्ग: विशिष्ट जिवाणू आणि विषाणूंमुळे मेंदूदाह किंवा मेंदूच्या आवरणांचा दाह होतो. हे आजार गंभीर असतात.

६. ग्लुकोजच्या रक्तपातळीचे बिघाड: मेंदूला ग्लुकोजचा योग्य प्रमाणात पुरवठा सतत आवश्यक असतो. रक्तातील ग्लुकोजची पातळी अति वाढणे अथवा कमी होणे या दोन्ही कारणांमुळे बेशुद्धावस्था येते. आता ही दोन्ही कारणे विस्ताराने बघू.

अ) ग्लुकोजची पातळी अति वाढणे : याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे अनियंत्रित मधुमेह. जेव्हा ग्लुकोजची पातळी खूप वाढते तेव्हा शरीरातील भरपूर पाणी मूत्रावाटे निघून जाते (dehydration). त्यातून एकूण रक्तपुरवठा खूप मंदावतो(shock). तसेच अशा रुग्णास खूप उलट्याही होत असतात. त्यातून दुष्टचक्र होऊन परिस्थिती अजून बिघडते.

आ) ग्लुकोजची पातळी खूप कमी होणे: जेव्हा ही पातळी ४० mg/ dL चे खाली जाऊ लागते तेव्हा मेंदूच्या आकलन कार्यात बिघाड होऊ लागतो. जर का ती २० mg /dL इतकी खाली गेली तर रुग्ण बेशुद्ध होतो.
ही पातळी कमी होण्याची प्रमुख कारणे अशी: मधुमेहीने घेतलेला इन्सुलिनचा अतिरिक्त डोस, स्वादुपिंडातील अति-इन्सुलिन निर्माण करणाऱ्या गाठी, यकृत आणि मूत्रपिंडाचे तीव्र आजार आणि फाजील मद्यसेवन. मद्यपी लोकांत मद्यपानाच्या जोडीला अन्य व्यसनी पदार्थांचे सेवन सुद्धा असू शकते. तसेच असे लोक जबरी वाहन अपघातालाही आमंत्रण देतात.
७. चयापचयातील अन्य बिघाड: यामध्ये रक्तातील सोडियमची पातळी खूप कमी वा जास्त होणे आणि काही हॉरमोनचे बिघाड यांचा समावेश आहे.

८. अपघाती विषबाधा: यामध्ये मुख्यतः कार्बन मोनोऑक्साइड व शिसे यांचा समावेश आहे. खाणी किंवा गटारातील कामे करणाऱ्यांना कार्बन मोनोऑक्साइडची विषबाधा होऊ शकते. हा वायू आपल्या रक्तात हिमोग्लोबिनला घट्ट चिकटतो आणि त्यामुळे असे हिमोग्लोबिन ऑक्सिजनचे वहन करू शकत नाही.

रुग्णाची शारीरिक तपासणी:
सर्वप्रथम रुग्णाचे नातेवाईकांकडून त्याचा इतिहास जाणून घेणे महत्वाचे असते. यात व्यसनाधीनता, पूर्वीचा आजार, औषधे आणि अपघात या माहितीचा समावेश होतो.

प्रत्यक्ष तपासणी करताना डोक्याला मोठी जखम आहे का आणि हातापायाच्या त्वचेवर सुया टोचल्याच्या खुणा पाहतात. मग रुग्णास चिमटे काढून तो काही प्रतिसाद देतो का अथवा डोळे उघडतो का, हे पाहतात. तसेच मनोरुग्णांचे बाबतीत ते बेशुद्धीचे सोंग करीत नाहीत ना, हेही पहावे लागते. शरीर-तापमान पाहणे महत्वाचे. रुग्णाच्या नाडी आणि श्वसनाची गती आणि ताल हे काळजीपूर्वक पहिले जाते. दोन्ही डोळ्यातील बाहुल्यांचा आकार आणि त्यांनी टॉर्चच्या प्रकाशाला दिलेला प्रतिसाद पाहणे हेही महत्वाचे ( विशेषतः ओपियम गटातील रसायनांची विषबाधा झाली असल्यास). याव्यतिरिक्त रुग्णाचे विविध प्रतिक्षिप्त प्रतिसाद तपासले जातात.

निरोगी डोळ्याच्या बाहुल्या : (चित्र १)

pupilsN.jpg

ओपियम विषबाधा : डोळ्याच्या बाहुल्या : (चित्र २)

pupils Op.jpg

पूर्ण शारीरिक तपासणीनंतर बेशुद्धीची खात्री केली जाते आणि तिची तीव्रता ठरवली जाते. आता पुढची पायरी म्हणजे बेशुद्धीचे कारण ठरवणे. त्यासाठी विविध प्रयोगशाळा आणि प्रतिमाचाचण्या कराव्या लागतात.

प्रयोगशाळा चाचण्या
१. रक्त: यावरील चाचण्या ३ गटांत मोडतात. रक्तनमुन्यात खालील रासायनिक घटक गरजेनुसार मोजले जातात.

अ) ग्लुकोज, कॅलशियम, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, युरिआ आणि क्रिअ‍ॅटिनिन.
आ) ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण, अमोनिआ
इ) विशिष्ट औषधांचे प्रमाण

२. पाठीच्या मणक्यातील द्रव (CSF) : जेव्हा मेंदूच्या जंतूसंसर्गाची शक्यता वाटते तेव्हा ही तपासणी केली जाते. त्यात जंतूंचा शोध घेणे आणि काही रासायनिक चाचण्या करतात.

प्रतिमा चाचण्या
यात मुख्यत्वे CT अथवा MRI स्कॅन आणि EEG (मेंदू-विद्युत आलेख) यांचा समावेश असतो. त्यातून मेंदूला झालेल्या इजेबद्दल सखोल माहिती मिळते.
वरीलपैकी योग्य त्या चाचण्या झाल्यावर बेशुद्धीचे निदान केले जाते. आता त्यानुसार उपाय केले जातात.

उपचार आणि रुग्णाचे भवितव्य
अशा रुग्णांना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात ठेवले जाते. त्यांच्यावर उपचार करताना प्रथम त्यांच्या श्वसन व रक्ताभिसरण या मूलभूत क्रियांवर लक्ष केंद्रित केले जाते. गरजेनुसार रुग्णाच्या श्वासनलिकेत नळी घातली जाते. तिचा उपयोग कृत्रिम श्वसन देण्यासाठी होतो. बेशुद्धीच्या कारणानुसार शिरेतून औषधे देऊन उपचार केले जातात.

आता रुग्ण शुद्धीवर कधी येणार हा कळीचा प्रश्न असतो. त्याचे उत्तर मेंदूस किती प्रमाणात इजा झाली आहे, यावर ठरते. ती मध्यम स्वरूपाची असल्यास काही दिवसांत रुग्ण शुद्धीवर येतो. मात्र ती गंभीर स्वरूपाची असल्यास तो महिनोंमहिने बेशुद्धीत राहू शकतो. त्यानंतर पुढे ३ शक्यता असतात:
१. काही रुग्ण बरे होतात
२. काही मृत्यू पावतात, तर
३. काही लोळागोळा ( vegetative ) अवस्थेत राहतात.

‘लोळागोळा’ अवस्था
आता ही अवस्था आणि निव्वळ बेशुद्धावस्थेतील फरक समजून घेऊ. बेशुद्ध माणूस निद्रिस्त आणि जाणीवरहित असतो. तर ‘लोळागोळा’ अवस्थेतील माणूस हा “जागा” असला तरी पूर्णपणे ‘जाणीवविरहित’ असतो. असे रुग्ण हे वेळप्रसंगी डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल करू शकतात. तसेच ते ‘झोपी जाणे’ आणि ‘जागे होणे’ या अवस्थांतून जाऊ शकतात. पण, त्यांना कुठलेही आकलन (cognition) होत नाही. एक प्रकारे ही ‘जागृत बेशुद्धावस्था’ (coma vigil) असते !

म्हणजेच असा रुग्ण हा केवळ कागदोपत्री जिवंत पण काहीही समजण्यास वा करण्यास असमर्थ असतो. असा रुग्ण जर या अवस्थेत १ महिन्याहून जास्त काळ राहिला तर तो कायमच्या अशा अवस्थेत गेल्याची नोंद होते. त्यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांना त्या रुग्णावरील सर्व ‘जीवरक्षक उपाय यंत्रणा’ बंद करण्याची कायदेशीर परवानगी (काही देशांत) मिळते.
****

‘खोटी’ बेशुद्धावस्था
( Locked-in syndrome)
हा एक दुर्मिळ प्रकार असून त्याची थोडक्यात माहिती अशी :

१. . हे रुग्ण जागृत असतात, पण ते बोलू शकत नाहीत. ते डोळ्यांच्या हालचाली व्यतिरिक्त अन्य कुठल्याही हालचाली करू शकत नाहीत.
२. या आजाराचे मूळ कारण मेंदूचा रक्तपुरवठा खंडित होणे किंवा त्यात रक्तस्त्राव होणे, हे आहे.

३. अशा प्रसंगी मेंदूच्या नाळेतील ‘Pons’ या भागाला इजा होते.
४. सुरवातीस हे रुग्ण अर्धवट बेशुद्ध असतात. नंतर ते ‘जागे’ होतात पण आता बोलू शकत नाहीत आणि त्यांना पक्षघात होतो.

५. भवितव्य: असे रुग्ण उठून हिंडूफिरू लागणे अवघड असते. पण त्यांना काही विशिष्ट वैद्यकीय सुविधा पुरवल्यास ते डोळ्यांच्या द्वारा “संवाद” साधू शकतात !
६. त्यांच्या आधुनिक उपचारांत word processor, वाचा-निर्मिती यंत्र आणि संगणकीकृत संवादांचा समावेश होतो.
*****

अनेक प्रकारचे अपघात, गंभीर आजार, व्यसनांचा अतिरेक अशा अनेक प्रसंगांत माणूस बेशुद्ध होतो. आपल्या कोणाच्याही कुटुंब अथवा परिचयातील व्यक्तीवर अशी वेळ येऊ शकते. अशा दुःखद प्रसंगाला सामोरे जाताना आपल्याला मनोबल वाढवावे लागते. त्या दृष्टीने बेशुद्धावस्थेची मूलभूत माहिती या लेखात दिली आहे. वाचकांना ती उपयुक्त वाटेल अशी आशा आहे.
***********************************************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण व उपयुक्त लेख.
बेशुद्धीच्या कारणांत फाजील मद्यसेवन हे कारण लेखात आहे. त्याने ग्लुकोज पातळी कशी कमी होते? जरा अधिक लिहिणार का?

साद, धन्यवाद.

>> फाजील मद्यसेवन हे कारण लेखात आहे. त्याने ग्लुकोज पातळी कशी कमी होते? जरा अधिक लिहिणार का?>>>
चांगला प्रश्न. त्यासाठी अल्कोहोलचा शरीरातील चयापचय समजून घेतला पाहिजे. या प्रक्रियेदरम्यान काही रसायने जास्त प्रमाणात तयार होतात. त्यांच्यामुळे यकृतात जी नव-ग्लुकोजनिर्मिती प्रक्रिया असते, तिला खीळ बसते. त्याचा परिणाम म्हणून रक्त-ग्लुकोज पातळी कमी होते.

शाली, +१. धन्यवाद.

Stroke आधी कधी कधी आपल्या दृष्टीस एका वस्तूची दुहेरी प्रतिमा दिसते. हे काही सेकंद दिसते. पुन्हा सर्वसामान्य दृष्टी येते. असे दिवसातून ४-५ वेळा होऊ शकते. त्यामुळे असे लक्षण डोळ्याशी निगडित समजून दुर्लक्ष करु नये.
डॉ. खूप धन्यवाद . नेहमीप्रमाणे सहजसुंदर लेख.

वरील सर्व नियमित वाचकांचे मनापासून आभार !

दत्तात्रय,
सहमत. डोळ्यांच्या लक्षणाबरोबर बोलताना अडखळणे वा चालताना झोक जाणे अशी लक्षणेही असू शकतात.

syncope
वेसिक्ल syncope बद्दल सन्गा

@ तनमयी,
Syncope = मूर्च्छा

या प्रकारात तात्पुरती शुद्ध हरपते. मेंदूला होणारा रक्तपुरवठा काही काळ कमी झाल्याने असे होते. ही घटना झरकन घडते, थोडाच वेळ टिकते आणि ती व्यक्ती पूर्ववत शुद्धीवर येते.

याची कारणे ३ प्रकारांत मोडतात:
१. रक्तदाब कमी होणे : विशेषतः आडव्या स्थितीतून एकदम उभे राहिल्यावर
२. प्रतिक्षिप्त क्रिया: दीर्घकाळ उभे राहणे किंवा भावनिक ताणतणाव
३. विविध हृदयविकार

@ कुमार१,

विषय समजावून सांगण्याची हातोटी विशेष आहे तुमच्याकडे. तुम्ही वैद्यकाच्या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असणार नक्की Happy

एक शंका - मधुमेहाचे रोगी आणि मूर्च्छा / कोमा ची शक्यता यांचा काही संबंध आहे का ?

अनिंद्य, किल्ली : धन्यवाद.

मधुमेह व बेशुद्धावस्था यांचा संबंध वर लेखात दिलाच आहे. तो अधोरेखित करतो:

१. जेव्हा अनियंत्रित मधुमेहात ग्लुकोजची पातळी खूप वाढते तेव्हा शरीरातील भरपूर पाणी मूत्रावाटे निघून जाते (dehydration). त्यातून एकूण रक्तपुरवठा खूप मंदावतो(shock). तसेच अशा रुग्णास खूप उलट्याही होत असतात. त्यातून दुष्टचक्र होऊन परिस्थिती अजून बिघडते. >>>> बेशुद्धावस्था

२. आता इन्सुलिन घेणारा मधुमेही पाहू. उपचाराच्या सुरवातीच्या काळात इन्सुलिनचा डोस set झालेला नसतो. तेव्हा काहींना तो डोस अतिरिक्त ठरून ग्लुकोज पातळी जर बरीच कमी झाली तर मूर्च्छा येऊ शकते.

अनु व साद,
अभिप्रायाबद्दल आभार ! पहिल्या शीर्षकातून वाचकांना विषयाची कल्पना येईल का, अशी शंका आली होती.

कुमार सर आजकाल कायप्पावर ब्रेनडेड पेशंटला डॉ. लोक बिल वाढवण्यासाठी ऑक्सिजन'वर ठेवून लुटतात वगैरे गोष्टी सारख्या येत असतात. असे करणे शक्य आहे काय?

सर्व नवीन प्रतिसदकांचे आभार !

****कायप्पावर .......वगैरे गोष्टी सारख्या येत असतात. >>>>

त्यांच्याकडे कायप्पाच्या गोष्टी म्हणूनच बघावे !

वसोवेगस >>>>

तुम्हाला vasovagal syncope असे म्हणायचे असावे.

त्याची वैशिष्ट्ये अशी:
१. काही विशिष्ट परिस्थितीत एखाद्यास अचानक मूर्च्छा येते. उदा. रक्त सांडल्याचे / अन्य भीतीदायक दृश्य पाहिल्यास.
२. त्यामुळे एकदम रक्तदाब व नाडीचे ठोके कमी होतात
३. >>>> मेंदूस जाणारा रक्तपुरवठा एकदम कमी होतो

४. >>> तात्पुरती शुद्ध हरपते.
५. अशी घटना निरुपद्रवी असून त्यासाठी वैद्यकीय उपचारांची गरज नसते.

काही काळ बेशुद्ध पडतात हे अपस्मार, फिटचे लक्षण आहे का >> होय

फिट कशामुळे येते.>>>>

याची अनेक कारणे आहेत. प्रमुख अशी :

१. लहान मुलांत: अनुवांशिक आजार, मेंदूवाढीतील दोष, डोक्याला मार आणि जंतूसंसर्ग.
२. मोठ्या व्यक्तींत : डोक्याला मार, स्ट्रोक, मेंदूचे ट्युमर.

३. म्हातारपणी : अल्झायमर व मेंदूची झीज करणारे इतर आजार.

धन्यवाद सर. थोडेसे अवांतरआमच्या प्राथमिक शाळेत राधाकिसन नावाचा वर्गमित्र होता, त्याला आम्ही राध्या म्हणत असू . राध्याला कधीही फिट यायची. मग गुरूजी चप्पल त्याच्या नाकाला लावायचे, आम्ही कांदा आणायला घरी धुम ठोकत असू . राध्याची फिट आमचा ब्रेक ठरत असे. मोठे झाल्यावर त्याला फिट कधीच आली नाही व बायको मुले संसार व्यवस्थित सुरू आहे. आमच्या एका शेजाऱ्याने सारखी फिट येणाऱ्या मुलीचे लग्न मुलाकडच्यांना अंधारात ठेवून लावून दिले. नंतर सासरी कळल्यावर त्यांनी घटस्फोट मागितला तर मुलीच्या बापाने पोटगी वसुल करुन मग घटस्फोट करून दिला. माझा धाकटा भाऊ कॉलेजमध्ये चक्कर येऊन काहीवेळ बेशुद्ध पडत असे. त्याला मी रूबी हॉल क्लिनिक मध्ये प्रसिद्ध न्युरोसर्जन होते नाव आठवत नाही. त्यांच्याकडे घेऊन गेलो. तेव्हा साठ रुपये फी होती. त्यांनी तपासून फक्त दहा न्युरोबिअॉन गोळ्या लिहून दिल्या. परत त्याने त्या गोळ्या घेतल्या नाही , तरी त्याला कुठलाही त्रास परत झाला नाही.

उपयुक्त सूचना, चांगल्या शंका आणि पूरक माहितीची भर या सगळ्यांमुळे चर्चा छान झाली.
सर्व सहभागी सदस्यांचे मनापासून आभार !

लेखाचा विषय असलेली अवस्था आपणा कुणावरही कधीही न ओढवो, या सदिच्छेसह समारोप करतो.

बिहार मधील मुलांचे मृत्यू :

सध्या चर्चेत असलेली ही दुर्घटना आहे. या रुग्णांत मेंदू बिघाड असा झालाय:

काही कुपोषित मुलांनी लिचीची फळे खाल्ली असा अंदाज >>
त्यातील
methylene cyclopropyl glycine (MCPG) या विषामुळे रक्तातील ग्लुकोज पातळी खूप कमी झाली >>>

बेशुद्धावस्था >>> मृत्यू.

Pages