रेंज ट्रेक भाग पहिला : ‘चोरकणा’ ‘खुटे’ ‘शिवथरघळ’
डिसेंबर महिना लागला आणि आणि मित्रवर्य मनोज भावेने त्याचा रेंज ट्रेकचा प्लान मेसेज केला.
दिवस पहीला - गोठवली ते किये, किये ते शिरगाव वाघजाई घाटाने, कावळ्या किल्ला, कावळ्या किल्ला ते कुंड, कुंड ते शिवथरघळ खुटे घाटातून
दिवस दुसरा - शिवथरघळ ते केळद नाणेची घाटातून, केळद ते सिंगापूर, सिंगापूर ते पाने सिंगापुर नाळेतून
दिवस तिसरा - पाने ते चांदर निसणी घाटाने, चांदर ते दापसर
दिवस चौथा - दापसर ते जीते ठीबठीब्या घाटाने, जिते ते ताम्हीणी बुधला घाटाने (ऑप्शनल), जीते किंवा ताम्हीणीतून मुंबई अथवा पुण्यात परत.
घाटवाटा तज्ञ मनोजने चांगलाच दमदार प्लान केला होता. वेळ, काळ, भौगोलिक स्थान, वाटा, सामान, मुक्काम यावर थोडीफार चर्चा झाल्यावर त्यानेच सांगितले फार हार्ड अँड फास्ट किंवा झालंच पाहिजे असं नाही. जमेल तितकं प्रयत्न करायचा पण अगदीच रेंगाळत आरामात दोन तास झाडाखाली बसलो मग झोपलो असेही नाही. मुख्य म्हणजे स्वतः ला आनंद आणि समाधान वाटायला हवं.
२१ तारखेला रात्री ‘मी’ आणि ‘सुनील’ ठाण्याला खोपट एस टी स्टँड वर वेळेआधी दाखल झालो. साडेबाराची ठाणे गोठवली सुटायला पंधरा मिनिटांचा अवधी असताना ‘मनोज’, ‘डेविल’ आणि ‘अविनाश’ आले. मनोज, डेविल सोबत ट्रेक झाले असल्यामुळे आधीची ओळख होतीच तर अविनाश हा मनोजचा मित्र. एस टी स्टँडवर बऱ्यापैकी गर्दी, बरीच मंडळी याच गोठवली गाडीची वाट पाहत, विकेंड त्यात दत्त जयंती उत्सव यामुळे तसेच पिंपळवाडी गोठवली या भागात सोयीची बारमाही भरून जाणारी एकमेव गाडी. चार दिवसांचा ट्रेक पाठीवर वजनदार मोठ्या सॅक पण आधीच रिजर्वेशन असल्यामुळे तशी चिंता नव्हती. गाडीत शिरताना झुंबड उडाली नंतर सॅक ठेवून बसायला थोडा त्रास झालाच. पनवेल पर्यंत थोडीफार ट्रॅफिक पण नंतर ड्रायव्हर भाऊनी जी गाडी हाकली त्याला तोड नाही. मी तरी मुंबई गोवा हायवे वर स्विफ्ट, आय ट्वेन्टी पासून एक्सयुवी सारख्या गाड्या भरघाव वेगात मागे टाकणारा एसटी वाला पहिल्यांदा बघितला. महाडला गाडी बऱ्यापैकी खाली झाली. इथेच पुण्याहून आलेले ‘मल्ली’ आणि त्याचा लहान भाऊ ‘सागर’ आम्हाला जॉइन झाले. बिरवाडीच्या पुढे गाडीत जेमतेम चार पाच जण आणि आम्ही सात वेडे. साडेपाचच्या सुमारास गोठवलीत उतरलो. तरी ड्रायव्हर भाऊ म्हणाले, ‘अहो गाडी लॉक केली आहे इंजिन जुणं झाले आहे नाहीतर अर्धा तास आधीच आलो असतो’. आता एवढं वेगात चालवून जबरदस्त ओव्हरटेक करून सुध्दा गाडी लॉक आहे असं म्हणतोय. हे तर माझ्या तांत्रिकज्ञाना पलिकडचे. असो…
कडाक्याची थंडी नव्हती मात्र हवेत गारवा जाणवत होता. एका घरात सकाळचे चहापाणी झाले तिथेच वाटांची सद्याची स्थिती वापर याबद्दल चौकशी केली. आमच्या प्लाननुसार वाघजाई घाटातून चढाई करून शिरगाव मग पुढे कावळ्या किल्ला करून कुंड गाव. पण वाघजाई घाटाची सुरुवात तळीये गावातून त्यासाठी गोठवलीतून किये मग तळीये असा किमान दोन तासाचा पायगाडीचा प्रवास मग घाटाची सुरुवात अर्धा पाऊण तास त्यात सोबत कुणी यायला तयार नव्हते आणि पहिल्याच दिवशी आर अँड डी करून आम्हाला तरी वेळ घालवणे परवडणार नव्हते. पुढच्या वेळी वाघजाई घाट करू असं म्हणून उरलेल्या पर्यायाचा विचार करू लागलो. सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या गोठवलीतून तीन प्रचलित वाटांनी घाटमाथा गाठता येतो. गावाच्या पाठीमागून सरळसोट धारेवरचा चोरकणा, त्याच्या दक्षिणेकडे त्याच धाटणीचा देऊळदांड तर उत्तरेकडील अती तीव्र चढाई असलेला चिकणा घाट. आताच्या काळात या भागातील घाटवाटा फारश्या वापरात नसलेल्या. यातील चोरकणा घाटाची वाट त्यातल्या त्यात थोडीफार मळलेली ‘मोहनगड’ उर्फ ‘जननी’ पुढे दुर्गाडी जाण्यासाठी सोयीची. कुणी सोबत आले तर नवीन वाटेने जायला मिळेल यासाठी चिकणा आणि देऊळदांड साठी विचारणा केली असता खुद्द गावातली मंडळी बऱ्याच कालावधीपासून देऊळदांड वर फिरकलेच नाही तर चिकणा घाटाने सुद्धा इतक्यात कुणी गेलेले नाही साहजिकच वाटेवर गवत बक्कळ माजलेले. एक जण चिकणा घाटाने यायला तयार झाले पण नीट चर्चा केल्यावर असे कळलं की त्यांना सुद्धा वर गेल्यावर वाट करत शोधतच जावं लागेल. कुणी तरी शिरगाव बाजूचा धनगर अदीमदी यायचा पण तोही आता यायचा बंद झाला. सर्व बाबी विचार करून कुठल्याही फंदात न पडता आम्ही चोरकणा चढायचा निर्णय घेतला. आमच्यात मनोज आणि डेविल या दोघांनी ही वाट आधी केली असल्यामुळे कुणीही सोबतीला न घेताच चालू पडलो. घरं संपून वरच्या शेताडीतून वाट वर चढू लागली.
सुरुवातीचे लहानसे टेपाड चढून गेल्यावर समोर आली ती चोरकणा घाटाची अरुंद धार अगदी आपल्या कोथळीगडाजवळील कौल्याच्या धारेची थोरली बहीण म्हणावी अशी वाट. सूर्यराव पल्याड होते. सकाळच्या सावलीतील ताज्या वातावरणाचा फायदा घेत झटपट जायचे. पहिल्या नजरेत तरी उंची अशी फारशी वाटत नव्हती. साधारण चाळीस पंचेचाळीस अंशाच्या या धारेवर कधी मध्यभागातून निमुळत्या लहान वाटेतून, तर कधी उजव्या डाव्या बाजूने चढाई. थोड वर जाताच खाली सुरुवात केली ती गोठवलीतील घरं, पाठीमागे पिंपळवाडी तिथेच या वाटांचा पाहरेकरी किल्ले ‘मंगळगड’ उर्फ ‘कांगोरी’. तसे पाहिले तर मंगळगड टेकड्यांच्या धारेने सह्याद्रीच्या मुख्य रांगेला काटकोनात जोडलेला त्या खिंडीपलीकडे दक्षिणेला ‘वडघर’ ‘कामथा’ डोळे बारीक केल्यावर ‘महादेव मुर्हा’ ओळखता आला. थोडफार घसारा त्यात वाळलेले पिवळे धमक गवत मुख्य म्हणजे पहिल्या गिअर मध्ये चढाई अधे मध्ये लागणारे पंचवीस तीस मीटरचे सपाट टप्पे. वाटेतला एक लहानसा कातळ टप्पा जपून पार करून, अंदाजे सत्तर टक्के पार केल्यावर छोटा विश्रांती थांबा घेतला. मागे पहिलं तर मंगळगडा इतपत उंची गाठली होती.
बाजूला चिकणा घाटाची सोंड उन्हाने न्हाऊण निघालेली. नावाप्रमाणे सार्थ ठरावी अशी पंचेचाळीस अंशाहून अधिक तीव्र धार. तिच्या क्रेस्टलाईन लगतच्या जंगलाचा अंदाज घेत आम्ही सर्वांनी म्हटलं बरं झालं हा पाठीवरचा अवजड बोजा घेऊन हिच्या नादाला लागलो नाही ते.
उत्तरेला पाहिलं तर तोरणा आणि त्याची राजगडाच्या दिशेने गेलेली आडवी डोंगररांग. वायव्येला आणखी निरखून पाहिलं तर ‘शिवतीर्थ रायगड’. सारं पाहून पुन्हा अंगावर येणारा चढ एक एक जण हुश्श हुश्श करत वर सरकत होता. थोडीफार कारवी,काटेरी झुडपे आणि बांबूचे अगदी तुरळक रान वगळता फारशी झाडी नसलेली ही बोडक्या धारेवरची चोरकणा घाटाची वाट चांगलाच दम काढते.
बऱ्यापैकी मळलेल्या या वाटेवर ठिकठिकाणी दगडावर खडूचे बाण व झाडांच्या फांदीवर लाल रंगाच्या रिबीन बांधलेल्या. हे चांगले काम आदल्या आठवड्यात या वाटेने गेलेल्या सह्याद्री ट्रेक फाऊंडेशनचे.
बरोब्बर अडीच पावणे तीन तासात घाटाची चढाई संपवत छोट्या झाडाखाली थांबलो, इथे फोनला रेंज होती घरी सगळे सुखरूप आणि ट्रेकची सुरुवात झाल्याची खबर देऊन टाकली. इथून वर पाहिल्यावर डावीकडे मोहनगड उठावलेला. त्या दिशेने एक आडवी घसारा युक्त अतीअरुंद वाट गेलेली ती न घेता समोरच्या टेपाडाला उजवीकडून वळसा घेत निघालो. अर्थात ही वाट सुद्धा सावकाश आणि जपून पार करावी लागली कारण भयंकर घसारा जोडीला दृष्टिभय बहुतेक ठिकाणी एक टप्पा आऊट मामला. मुख्य धारेवर आल्यावर उलगडले ते पल्याड ‘कुदळी’ ‘पाठशिळा’ ‘नाखिंड’ ‘रायरेश्वर’ ते दूरवर ‘कोळेश्वर’ ‘महाबळेश्वर’ चे निबीड अरण्याचे खोरं.
हिरडस मावळ हा तसा उत्तर जावळीतील भाग. चंद्रराव मोरे इथले सत्ताधारी, महाबळेश्वराला मानणारे विजापूरच्या बादशाह प्रती निष्ठा ठेऊन असणारे. या भागातील ‘रायरी’,‘चंद्रगड’,‘मंगळगड’,‘भोरप्या’,‘मकरंदगड’, ते लहान ‘सोनगड’,‘चांभारगड’. तसेच या भागातील पुरातन घाटवाटा वरंध’,‘वाघजाई’,‘रडतोंडी’,‘निसणी’,‘पारघाट’,‘ढवळ्याघाट’ असा हा मोठा मोक्याचा प्रदेश स्वराज्यात दाखल होणं गरजेचं स्वतः शिवाजी महाराज १६५६ मध्ये जावळीवर चालून आले.
"येता जावळी, जाता गोवळी." हे मनोमन पटते.
आता सुरू झाली ती थोड उतरून घेत आडव्या रेषेत चाल, समोर पूर्व असल्यामुळे थोडा उन्हाचा तडाखा जाणवू लागला.
वाट मोहनगडाच्या पदरातून आडवी पुढे सरकू लागली. एके ठिकाणी कुदळीकडे जाणारी वाट गेली. आम्ही सरळ वाटेने पण बऱ्याच ठिकाणी अती अरुंद वाट. आधी म्हणालो तसे चोरकणा चढून येणं सोपे पण माथ्यावर आल्यावर या भागातून अचूक वाट घेत ‘दुर्गाडी’ किंवा ‘शिरगाव’ गाठणे सोपे नक्कीच नाही. नकाशा वाचन, दिशाज्ञान आणि सोबतीला अनुभवी भिडू असणं गरजेचं नाहीतर गावातून माहितगार घेणं सोयीचं. कारण सुरुवातीच्या या भागात कुठेही दूर दूर पर्यंत मनुष्य वस्तीच्या खुणा दिसत नाही. अर्धा तासानंतर एका ओढ्यात पाण्याची बारीक धार, पाणी भरून घेत पुढे निघालो. जानेवारी फेब्रुवारी नंतर या वाटेवर गोठवली सोडल्यावर थेट शिरगाव किंवा दुर्गाडी गावापर्यंत कुठेही पाणी नाहीच, तेवढा पाण्याचा साठा हवाच.
एके ठिकाणी थोड मागे पुढे झाले पुन्हा अगदी थोडे मागे येत अचूक वाटेला लागलो आता वाट मोहनगडाच्या रानात शिरली एक मोठी चढण चढून जंक्शन वर आलो. डावीकडची वाट गडावर जाणारी त्याच वाटेने थोड अंतर जात शिरगावकडे उतरणारी वाट तर उजवीकडची दुर्गाडीच्या दिशेने. शिरगाव पेक्षा दुर्गाडी सोयीचं म्हणून आम्ही खाली उतरत उजवीकडे दुर्गाडीच्या वाटेला लागलो. रानातून वाट बाहेर येत बोडक्या सोंडेवरची उतराई. समोर दूरवर तोरणा राजगड, खाली चकाकणारे निरा देवघर जलाशयाचे पाणी. साडेबाराच्या सुमारास रानातल्या जननी बाजी अंधारीच्या लहान देवळाजवळ आलो. गावकरी सफाई करून पूजेची तयारी करत होते दत्त जयंती आणि पौर्णिमा असल्यामुळे थोडीफार वर्दळ होती. कधी काळी गडावर असलेली दुर्गाची जननी देवी माचीवर आणली गेली पुढे आणि बदलत्या काळात सर्वांना सोयीचे व्हावे म्हणून इथे गावाजवळ स्थापना केली गेली. इथल्या पंचक्रोशीतील लोकांचं आराध्य दैवत. थोडा वेळ विसावा घेत नंतर कच्चा रस्त्यावरून पंधरा मिनिटात दुर्गाडी गाठले. आता पाय बऱ्यापैकी बोलायला लागले होते, एका बंद दुकानाच्या शेड खाली बैठक मांडली. सुनील आणि मल्ल्ली ने समोरून पाणी आणले तोवर मनोज जे मिळेल ते नेटवर्क ट्राय करून गाडीवाल्याला फोन लावत होता. नियोजनाप्रमाणे इथून निघून वरंध घाटात वाघजाई देवी - भजी पॉईंट इथे गाडीने जाऊन झटपट कावळ्या किल्ला पाहणं.
तूर्तास तरी त्या कावळ्या किल्ल्याला बाजूला ठेवून पोटातल्या कावळ्यांना शांत करायचं ठरवले. पंगत बसली जेवण अर्थात घरून आणलेले. आता पोटात गेल्यावर डोळे जड होऊ लागले, गाडीवाल्याचा पत्ता नाही मग काय आपसूकच पडी मारली. दुकान उघडायला आजी आल्या तेव्हा जाग आली पाहतो तर अडीच वाजून गेलेले. अशा रीतीने कावळ्या काही होत नाही हे कळून चुकलं. दुकानदार आजी सोबत गप्पा मग पोंगे खरेदी, मुक्कामी बस, कुदळी, भोर इतर बऱ्याच गोष्टी झाल्यावर एक जुनी रत्नागिरी पासिंग महिंद्रा पिकअप गावात आली. मनोज भाईने व्हाया व्हाया संपर्क साधून जमावले. सात ही जणं एकदाचे दुर्गाडीतून निघालो. शिरगाव मग पुढे वरंध भोर रस्त्यावर एके ठिकाणी चहा घेऊन, धारमंडप (द्वारमंडप) इथे थांबलो. सॅक गाडीतच ठेऊन निघालो ते पुरातन ‘नीरबावी’ पहायला. दहा पावलं मागे येत वाट उजवीकडे खाली उतरू लागली. वाटेवर जंगल मस्त, दहा पंधरा मिनिटे उतरल्यावर चौकोनी आकाराचे पाण्याचे कुंड हीच नीरबावी.
यालाच नीरा नदीचा उगम असेही म्हणतात. बाजूला थोडे पडीक अवशेष व ‘नंदी’ आणि ‘शिवपिंड’. परिसर खूपच शांत आणि प्रसन्न. खरं तर या साऱ्या वाटा वरंध वाघजाई, कुंभेनळी, चिकणा घाटाकडे तसेच शिरगाव या मार्गावरील महत्वाच्या खुणा.
वाघजाई पॉईंटकडे जाणारा घाटाचा रस्ता सोडून धारमंडप पासून उजवीकडे वळलो. खालचा रस्ता अशिंपी गावाकडे गेला तर वरच्या बाजूचा शिळीम, कुंड, सांगवी मार्गे पुढे थेट भोर पर्यंत जातो. हा रस्ता बाकी भारीच जरी कच्चा आणि अरुंद असला तरी इथून जाताना दिसणारं दृश्य खासच. डावीकडे वरंध घाटाची उतरत जाणारी रांग, उत्तर टोकाला कावळ्या किल्ला त्याला चिकटून असलेला न्हाविण सुळका. दरी पल्याड शिवथर खोरं तर त्यामागे घाटावर अगदी नजरेत येणारे स्वराज्याचे बुलंद मानकरी ‘राजगड’ आणि ‘तोरणा’.
शिळीम मागे पडले पुढे उजवीकडे सांगवी गावाचा फाटा सोडून कुंड गावात आलो तेव्हा चार वाजत आले होते.
कुंड गाव घाटमाथ्यावर वसलेले लोकेशन एकदम मस्त. त्यात सायंकाळच्या सुमारास फारच प्रसन्न वाटत होते. पिकअप वाल्यांचा निरोप घेऊन खुटे घाटाच्या मार्गाला लागलो. घाटाची सुरुवात गावापासून बरीच दूर पश्चिमेच्या माळावर वाट चुकायला बराच वाव. वेळ पाहता अंधार पडायच्या आत शिवथर घळ कसेही करून पोहचायचे होते. पीकअप वाल्या काकांनी एका आजाला घाटाच्या सुरुवातीला सोबत लाऊन दिले. त्यांचा निरोप घेऊन खुटे घाटाच्या मार्गावर लागलो. उत्तरेकडे घाटाच्या पल्याड भले उंच तोरणा राजगड.
या भागात एक गोष्ट अशी जाणवली की सह्याद्रीची मुख्य रांग ‘कुंभे’ ‘घोळ’ पासून साधारण ‘केळद’ ‘कुंबळे’ ‘सांगवी’ पर्यंत पूर्व पश्चिम पसरली आहे पुन्हा नैऋत्य मग दक्षिण उत्तर असच काहीसं. याच नैऋत्य सह्यघाटमाथ्यावर कुंड, शिळिम वसले आहेत.
सोनेरी गवताळ पठारावरून पश्चिमेचा गार वारा घेत सुखवाह चाल. अर्ध्या पाऊण तासात वाट डावीकडे थोड खालच्या बाजूस उतरत पुन्हा उजव्या टेपाडावर आडवी जाऊ लागली. इथेच घाट चढून येणारे एक मामा आणि त्यांच्या सोबत दोन शाळकरी पोरं. तिघांनीही चपला हातात घेतलेल्या. बोलणं झाल्यावर आम्हालाही तेच सांगू लागले, बाबांनो कडा सांभाळून उतरा, सावकाश जा, वाट खराब आहे, वर गवत आन खालून बारीक दगडी निसटतात, पाय सरकतो, तेव्हा चपला बूट काढून जा. हे थोड विचित्र वाटले, हो जाऊ सावकाश असं म्हणून निघालो. ती आडवी गवताळ ट्रेव्हर्सी पार करून, वाट उजवीकडे फिरून थेट कड्यावर आली.
अंदाजे तीन चारशे मीटर नजर सरळ रेषेत खाली थेट पदरातल्या मंदिरावर गेली. इथून सोबतचे आजोबा माघारी फिरले. मनोज व सुनील यांनी लीड घेतली तर शेवटी मी असे एक एक सुरक्षित अंतर ठेवत निघालो. तीव्र उतरण असलेली कड्याला बिलगून जाणारी वाट, सुरुवातीला पहिलं तर लगेच लक्षात येत नाही पण जस जसे पुढे जाऊ तशी वाट पुढे सरकते. चुकून पाय सरकला तर थेट पुढच्या माणसाला घेऊन खालीच. बाय वन गेट वन फ्री असा मामला. एखादा दगड सटकला की वॉच आऊट म्हणून ओरडून पुढच्याला सावध करायचं. अक्षरशः बॉल बेरींग वर चालतोय की काय असा मुरुमांच्या छोट्या दगडांचा घसारा.
अवघड ठिकाणी काठीचा आधार घेत उलटे प्रसंगी बुड टेकवत सावकाश उतरत होतो. आता वाटेत भेटलेल्या मामांचे बोलणं खरं वाटू लागलं. आधी आम्हाला वाटलं खुटे घाट म्हणजे एखाद्या अवघड ठिकाणी कातळात खुट्टा किंवा झाडाची मोळी वगैरे लावलेली असेल. बरं आधी या वाटेने जाऊन आलेल्या ओळखीतल्या एक दोघांसोबत बोललो तेव्हा त्यांनी असे काही सांगितले नव्हते. पिकअप वाले तर सांगत होते, तुम्ही आरामात अर्धा तासात पदरात उतराल. पण ही वाट तर मुरबाड रामपुरच्या खुट्टेदाराची लहान बहीण निघाली. तरी दृष्टीभय असलेल्या ठिकाणी थोडफार कारवी तर कुठे काटेरी झुडपांचा आधार होता. चार दिवसाच्या तयारीने अवजड सॅक पाठीवर घेऊन हे उतरणं जीवावर आलं होतं.
छोटा कातळ टप्पा उतरून डावीकडे पहिलं तर कावळ्या किल्ल्या मागे सूर्यास्त, आता पूर्ण उतरून घळीत जाई पर्यंत अंधार होणार हे तर पक्के. तासाभरात खुटेचा कडा उतरून पदरात थेट मंदिरासमोर आलो. मागे एक धनगराचे रिकामे झाप. याच भागात चंद्रराव मोरेंचा जुना वाडा आणि एक विहीर आहे पण आता पर्यंतचे झालेले श्रम आणि वेळ पाहता शोध भानगडीत न पडता सरळ चेराव ची वाट धरली. पदरात गवत भरपूर त्यात इथेही ढोरवाटा भरपूर मुख्य वाट दिशा धरून निघालो. या भागात अगदी ‘शेवत्या’ पासून ‘कर्णवडी’ ‘आंबेनळी’ या पदरातल्या वाडी वस्त्या. ‘सिद्धगड’ ‘भीमाशंकर’ ‘कोथळीगड’ या सारखा निम्या उंचीवर सह्य शिरोधारेला समांतर असा पदर या भागातही आहे.
चेरावची वाट बरीच लांबून फेरा घालून जाणारी पण संधीप्रकाशात ती चाल त्यामुळे काही वाटलं नाही तसेही सर्व दमलेले, त्यामुळे कुणी कोणाशी न बोलता गपगुमान चालत होते. वस्तीवर राम राम शाम शाम झाले पुढे थेट रस्ता धरून पंधरा मिनिटात शिवथरघळीत उतरलो. विकेंड असल्यामुळे थोडीफार गर्दी होती. आरती प्रार्थना झाल्यावर रात्रीचे जेवण व मुक्कामासाठी खोलीची विचारणा केली. आधी ‘नचिकेत जोशी’ याने इथल्या सभासदाला फोन करून तसे सांगितले होते पण समोरचे काका चक्क नाही म्हणू लागले. ‘फोन किंवा निरोप मिळालाच नाही ऐन वेळी सोय करणं अवघड होत तरी तुम्ही थांबा बघतो काय ते’. जरा वेळात प्रभू कृपा जाहली. गरम गरम जेवण आणि सात जणांना प्रत्येकी दोन बेड असलेल्या चार खोल्या. एकदम परीट घडीच्या पर्यंटकांची सोय. ट्रेकरसाठी तर ही फाईव्ह स्टार ट्रीटमेंट. अशा प्रकारे पहिल्या दिवसाची सांगता झाली.
जय जय रघुवीर समर्थ !!!
क्रमशः
अधिक फोटोसाठी हे पहा : https://ahireyogesh.blogspot.com/2019/01/chorkana-khute-shivtharghal.html
झकास सुरुवात !
झकास सुरुवात !
या गवताळ वाटा फार घातकी असतात
या गवताळ वाटा फार घातकी असतात.
मोठा ट्रेक ! मजेदार. आवडल लेख.
धन्यवाद हर्पेन !
धन्यवाद हर्पेन !
या गवताळ वाटा फार घातकी असतात
या गवताळ वाटा फार घातकी असतात. >>> अगदी बरोबर SRD
एकदम मस्त! फोटो भारीच!
एकदम मस्त! फोटो भारीच!
धन्यवाद शाली !
धन्यवाद शाली !
इतिहासाचे स्मरण करत , शिवाजी
इतिहासाचे स्मरण करत , शिवाजी महाराजांना आठवत , सह्याद्रीच्या अंगा-खांद्यावर हुंदडणे हा स्वर्गीय आनंद तुम्ही घेता आहात आणि आमच्यापर्यंत पोहोचवत आहात... धन्यवाद !
मस्त लिहिलंय !!
मस्त लिहिलंय !!
धन्यवाद... पशुपत आणि पराग !
धन्यवाद... पशुपत आणि पराग !