Stranger to History: A Son's Journey through Islamic Lands by Aatish Taseer
ज्येष्ठ पत्रकार तवलीन सिंग यांचा आतिश तसीर मुलगा. आणि ही त्याची आयुष्याची पहिली वीस वर्षे ओळख होती असे म्हणता येईल. कारण तवलीनना हा मुलगा पाकिस्तान पीपल्स पार्टीचे एक राजकारणी सलमान तसीर यांच्यापासून झाला होता. सलमान तसीर विवाहीत होते, त्यांना त्यांच्या पाकिस्तानातील बायकोपासून दोन मुलेही होती, आणि नंतर केलेल्या एका लग्नापासून अजून तीन मुले झाली. ८०च्या दशकात बेनझीर पुनरागमन करायच्या प्रयत्नात होती आणि तेव्हा हा एक भारतीय अनौरस मुलगा राजकीय प्रवासात अडथळा होणार हे जाणून सलमान तसीरांनी आतिश व त्याच्या आईबरोबर संबंध तोडले तेव्हा आतिश दीड-दोन वर्षाचा होता. अ स्ट्रेन्जर टू हिस्टरी हे आतिशने आपल्या बापाचा व बापाच्या धर्माचा शोध घेण्याच्या प्रयत्नाचे प्रवासवर्णन.
इंग्लंडमध्ये जन्माला आल्याने ब्रिटिश नागरीक, वाढला/शिक्षण घेतले दिल्ली आणि मग बहुतेक उटीला बोर्डिंग स्कूल, महाविद्यालयीन शिक्षण इंग्लंड आणि अमेरिकेत. आईने जन्माची कहाणी लपवून न ठेवल्यामुळे, उलट त्याबद्दल खुली चर्चा करून, ओळखीच्या पाकिस्तान्यांना भेटवल्यामुळे आतिश बापाकडून आपण मुस्लिम आहोत हे लहानपणापासून जाणून होता तर आई व आईचे आई-वडिल शीख. घरातले एकूण वातावरण निधर्मी. बापाशी पहिला संबंध आला तो विशीत तोसुद्धा आतिशने पुढाकार घेऊन, बापाकडून प्रतिक्रिया थंड, मोजूनमापून.
इंग्लंडमधील २००७च्या ट्रेन बाँबब्लास्ट नंतर लिहिलेल्या वर्तमानपत्रातील लेख वाचून सलमान तसीरने मुलाला तू पाकिस्तानची व इस्लामची निंदा केली आहेस असे खरमरीत पत्र लिहिले. फारसा धर्म/धार्मिक रुढी न पाळणार्या आपल्या बापाला का राग आला, सांस्कृतिक इस्लाम म्हणजे नेमके काय, इस्लामचा आजच्या युवकांवर असलेला पगडा का आणि त्या बरोबरीने आपल्या बापाबरोबरच्या आपल्या संबंधांचा शोध घेण्यासाठी आतिश आठ महिने तुर्कस्तान, सिरिया, इराण व पाकिस्तानमध्ये फिरला, लोकांना भेटला, बाप-भावंडांना भेटला व त्यावर त्याने हे पुस्तक लिहिले.
आतिशची भाषेवरची पकड मजबूत आहे जे बहुभाषिक असलेल्या आतिशकडून अपेक्षित आहे असे म्हणता येईल. त्याने उर्दूतून इंग्रजीत भाषांतर केलेल्या मंटोच्या कथांचा अनुवाद वाचनीय आहे. पण नायपॉलचा उत्तराधिकारी असे या पुस्तकाचे झालेले वर्णन अतिशयोक्त वाटते. नायपॉलचे अमंग द बिलिवर्स व नंतरचे बियाँड बिलिफ तसेच भारतावरच्या पुस्तकांची ट्रीलॉजी ही भेदक, नेमकी आणि अधिक विस्तृत आहे. आतिशचे तुर्कस्तान, इराण व सिरियातले अनुभवकथन व काढलेले निश्कर्ष फारच तोकड्या अनुभवांवर व भेटींवर बेतलेले वाटतात आणि त्यामुळे उथळ होतात. पुस्तकाच्या शेवटी त्याने लिहिले आहे की अनेक प्रसंग या देशातील सरकारे व दमनशाहीमुळे त्यात असलेल्या व्यक्तींना हानी पोहचू नये म्हणून लिहिलेले नाहीत. तसेच त्याने येमेन व जॉर्डनमधील प्रवासांना पुस्तकात पूर्णपणे काट मारलेली आहे. या दोन बाबींंमुळे कदाचित हव्या त्या खुलेपणाने लिहिता आले नसेल. पण त्याचबरोबरीने मला तरी त्याच्या मुलाखत घेण्याच्या, भेटलेल्या लोकांना दुखर्या नसांवर बोट ठेवून डिवचण्याच्या व एकुणातच 'क्रिटिकल आय टोवर्ड्स सोसायटी' या गुणांच्या कमतरेतचा हा दोष वाटतो. ज्या सांस्कृतिक वैविध्याच्या व त्यांना जोडणाऱ्या धार्मिक धाग्याच्या शोधावर आतिश आहे त्यासाठी फारच कमी वेळ त्याने दिला असे वाटते. एव्हडे देश फिरण्यापेक्षा भारतात त्याला हेच वैविध्य दिसले असते असे वाटत राहिले. माझ्या जन्मगावी, अगदी मी वाढलो त्या गल्लीत त्याला मध्यमवर्गीय सरकारी नोकरी करणारा (ज्याचे वाडवडील कारकुनीत होते, शिकलेले होते), गरिबीतून 'थोडासा' वर आलेला पण कनिष्ट जातिचा शिक्का असलेला, राजकारणात यश मिळालेला तुलनेने पापभिरू आमदार, चंदन तस्कर व बाया ठेवणारा नगरसेवक, धान्य व्यापारी बोहरी, झोपडपट्टी ते बंगला असा देऊन थेट प्रवास केलेली 'लोअर क्लास' मुलगी अरबाला दिलेली म्हातारी, मूळचे कोरडवाहू शेती असलेल्या दुष्काळी भागातून स्थलांतर केलेल्या मोलकरीण काम करणाऱ्या बायका व त्यांचे बिनकामाचे नवरे, या सगळ्यात फिरणारे नुकतेच सौदीचा पैसा आलेले कडवे ताबलीग हे 200मीटरच्या त्रिज्येत मिळतील. आणि हे भारतातल्या अनेक गावांचे चित्र आहे जिथे आतिष तासीर अधिक प्रभावीपणे लिहू शकला असता.
आतिश फॉर्ममध्ये येतो जेव्हा तो त्याच्या व बापाच्या संबंधांवर लिहितो व त्यानुषंगाने तो पाकिस्तानबद्दल व तिथल्या अनुभवांबद्दल लिहितो. ही इज अॅट होम इन पाकिस्तान. या भागामुळे हे पुस्तक वाचणे वेळेचा अपव्यय नक्कीच करत नाही.
पुस्तकाचे नाव अ स्ट्रेन्जर टू द फादर असे ठेवायला हवे होते - ते अधिक योग्य ठरले असते.
त.टी.: सलमान तसीर यांच्या अंगरक्षकाने २०११मध्ये गोळी घालून त्यांचा खून केला. तेव्हा ते पंजाबचे गवर्नर होते. सलमान तसीरने पाकिस्तानातील ब्लास्फेमी कायद्याविरोधात विधान केले होते आणि त्यामुळे तिथल्या धार्मिक संघटनांनी/पक्षांनी वातावरण तापवले होते. सलमान तसीरचा मुलगा शहाआझचे अतिरेक्यांनी २०११मध्ये अपहरण केले व साडेचार वर्षांनी २०१६मध्ये सोडले. इंग्लंडच्या राजघराण्यातील एक युवतीबरोबर आतिशचे तीन-साडेतीन वर्षे संबंध होते. याबद्दल त्याने केलेल्या लिखाणावरूनही गदारोळ झालेला आहे. सध्या आतिश त्याच्या अमेरिकन नवर्याबरोबर राहतो. आतिशची आई तवलीन सिंग या ज्येष्ठ राजकीय पत्रकार आहेत व नेहरू-गांधी परिवाराविरोधात लिहिणार्या सुरुवातीच्या मोजक्या पत्रकारांपैकी एक आहेत. आतिश तसीर हिंदी इंग्रजीसोबतच उर्दू आणि संस्कृत भाषांचेही जाणकार आहेत.
अवांतरः मी पुर्वी कधीतरी या पुस्तकाबद्दलही लिहिले होते, आता सापडत नाही. Pakistan: A Hard Country by Anatol Lieven. पाकिस्तानच्या राजकीय व सामाजिक प्रवासावर या पुस्तकाइतके समग्र दुसरे पुस्तक मी अजून वाचलेले नाही. इतर अनेक उत्तम पुस्तके सामाजिक व राजकीय विषयांवर आहेत मात्र ती त्या मर्यादित व पुस्तकाच्या मुख्य विषयकेंद्रित आहेत. अनतोल लीवनचे पुस्तक इंडिया आफ्टर गांधी प्रमाणे पूर्ण प्रवास माडते. नक्कीच वाचनीय
आतिश तासिर का वादग्रस्त
आतिश तासिर वादग्रस्त लिखाणा करता आधिपासुन कुप्रसिद्ध आहे. मागे टाइम/ड्ब्लुएसजे मध्ये त्याने पाकिस्तानच्या राजकिय्/सामाजिक परिस्थिती विषयी एक लेख लिहिला होता. स्वातंत्र्य मिळाल्या पासुन पाकिस्तान "किपिंग अप विथ दि जोनसस" सिंड्रोम झाल्या सारखा वागतो, भारताच्या संदर्भात - अशा आशयाचा तो लेख होता. बरीच राळ उठली होती त्यावेळेला. थोडक्यात, पुरेसा अभ्यास न करता काहि तरी सनसनाटी लिहिण्याकडे याचा कल दिसुन येतो.
याची जन्माची स्टोरी एखाद्या हिंदि सिमेमा सारखी आहे; बापाबद्दल असलेली त्याच्या मनातली अढि कदाचित त्यामुळेच असेल. जिओटी मधलं टिरियन लॅनिस्टरचं एक वाक्य बदलुन आतिश ताहिरच्या बाबतीत म्हणता येइल - ऑल बास्टर्ड्स आर ड्वार्फ्स इन देअर फादर्स आइज...
रोचक
रोचक
पुस्तक परिचय अतिशय आवडला.
पुस्तक परिचय अतिशय आवडला. लेखकाची पार्श्वभूमी थोडक्यात पण नेमक्या शब्दांत व्यवस्थित मांडली आहे. सारही तटस्थपणे मांडले आहे. मी हे पुस्तक वाचलेले नाही. पण नायपॉलशी तुलनेविषयीचे मत पटले. नायपॉल खूप बारकावे आणि माहितीसह लिहितात. चिंतनही खोल असते. त्यांचे लेखन वरवरचे वाटत नाही.
लेख आवडला.
हा पुस्तक परिचय मी वाचलेले
हा पुस्तक परिचय मी वाचलेले पुस्तक धाग्यावर काही महिन्यांपूर्वी लिहिला होता. टाइम्स मॅगझीनमधल्या लेखानंतर अतिष तासीर यांच्यावर पाकिस्तानी आहे इथपासून शरद पवारांच्या कनेक्शन पर्यंत (वाया तवलीन-अजितचंद गुलाबचंद) आरोप होऊ लागले. अनेक व्हाट्सअप्प ग्रुपवर स्पष्टीकरणे देताना व्हॉटआबाऊटरी सुरू झाली की लेखकाने मुसलमान धर्माबद्दल लिहिले आहे का वगैरे. तेव्हा आतिशने लिहिलेल्या पुस्तकाची ओळख धागा द्यायला सोपा जावा म्हणून हा काढला
लेखक आणि पुस्तक परिचय आवडला.
लेखक आणि पुस्तक परिचय आवडला.
टाइममधल्या लेखाव रच नाव वाचून
टाइममधल्या लेखाव रच नाव वाचून मी वाचलेले पुस्तकमधल्या तुमच्या प्रतिसादाची आठवण काढली होती.
<अनेक व्हाट्सअप्प ग्रुपवर स्पष्टीकरणे देताना व्हॉटआबाऊटरी सुरू झाली की लेखकाने मुसलमान धर्माबद्दल लिहिले आहे का>
ही ठरलेली पद्धत आहे. इथे मायबोलीवरच एकाने लिहिले होते की कोणी मोदी सरकारवर टीका केली की त्याने आधी कोणावर अशी टीका केली की नाही, हे विचारायचं. त्याच्या हेतूंवर शंका घ्यायची. विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लावायचं.
पुन्हा एकदा, ही पुस्तकं वाचून त्यांचा विस्तृत परिचय इथे लिहिल्याबद्दल आभार. बहुतेकांना ही पुस्तकं सहजी वाचायला मिळणं आणि जमणं कठीण आहे.
आपले वडील पाकिस्तानी
आपले वडील पाकिस्तानी असल्याची माहिती लपवून ठेवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल भारत सरकारने आतिश तासीरचे OCI कार्ड रद्द केले आहे.
If the applicant, or his/her parents or grand-parents have ever been a citizen of Pakistan or Bangladesh, he/shewill not be eligible for an OCI card. असा नियम आहे.
आतिश तासीरचे OCI कार्ड रद्द
आतिश तासीरचे OCI कार्ड रद्द केले आहे. >> मला हे समजून घ्यायला आवडेल की अश्या vendetta political गोष्टी कुठल्या लेवलवरून राबवल्या जातात.
म्हणजे हे नेत्यांना खुष करण्यासाठी परराष्ट्रविभागातल्या एखाद्या बाबूने केलेली कारवाई आहे की PMO मधून आलेली ऑर्डर?
लेखक आणि पुस्तक परिचय आवडला.
लेखक आणि पुस्तक परिचय आवडला.