मूळ पेशींचे शास्त्रीय नाव आहे Stem cells. वैद्यकविश्वात विविध अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आता नियमित होतात. त्याच धर्तीवर निरोगी व्यक्तीतील मूळ पेशींचे देखील प्रत्यारोपण एखाद्या रुग्णात करता येते. रक्ताच्या काही गंभीर आजारांत अशी प्रत्यारोपणे आता नियमित होतात. ‘बोन मॅरो’ चे प्रत्यारोपण हा शब्दप्रयोग आपल्यातील बरेच जणांनी ऐकला असेल. या विषयावर आधारित काही चित्रपट देखील प्रदर्शित झालेले आहेत. गेल्या काही दशकांत विकसित झालेल्या या विज्ञानाचा परिचय करून देण्यासाठी हा लेख.
शरीरातील मूळ पेशींचा मूलभूत अर्थ, त्यांचे गुणधर्म व कार्य, प्रयोगशाळेत उत्पादन आणि कोणत्या आजारांत त्या प्रत्यारोपित करतात याची माहिती आपण करून घेऊ.
मूळ पेशी म्हणजे काय?
आपल्या शरीरात अनेक प्रकारचे अवयव आहेत आणि त्यांची कार्ये भिन्न आहेत. त्यानुसार या अवयवांतील पेशी देखील भिन्न रचनेच्या (differentiated) असतात. मात्र जन्मतःच आपल्याला काही पेशी अशा मिळतात की त्या अभिन्न स्वरूपाच्या (undifferentiated) असतात. त्या शरीराच्या मूलभूत पेशी असतात. त्यांना विशिष्ट अवयवाचे असे काही काम लगेच करायचे नसते. थोडक्यात त्या ‘सर्व अवयवांसाठी उपलब्ध’ (हरकाम्या) अशा पेशी असतात. अशा या जनकपेशींना ‘मूळ पेशी’ म्हटले जाते.
गुणधर्म आणि कार्य
आपल्या वाढीसाठी शरीरातील प्रत्येक पेशीचे विभाजन सतत होत असते. एखाद्या मूळ पेशीचे जेव्हा विभाजन होते तेव्हा दोन शक्यता असतात:
१. तिच्या विभाजनानंतरची पुढची ‘पिढी’ ही मूळ पेशीच राहते किंवा,
२. या नव्या पेशींचे रुपांतर विविध अवयवांच्या विशिष्ट पेशींमध्ये होते. उदा. त्यातील काही रक्तपेशी, स्नायूपेशी वा मेंदूपेशी होतात.
३. काही अवयवांत ( पचनसंस्था व अस्थिमज्जा) जुन्या पेशी मरणे आणि नव्या तयार होणे अशी उलाढाल सतत चालू असते. तिथे तर मूळ पेशींची खूप मदत होते. तिथल्या गरजेनुसार त्या खूप मोठ्या प्रमाणात विभाजित होतात.
मूळ पेशींचे प्रकार
१. गर्भावस्थेतील मूळ पेशी : जेव्हा एखादा गर्भ ४ दिवसांचा होतो तेव्हापासूनच या संपूर्ण शरीराच्या जनकपेशी म्हणून काम करतात.
२. प्रौढत्वातील मूळ पेशी: या विशिष्ट अवयवांत वास्तव्य करतात आणि तिथल्या विशिष्ट पेशींची निर्मिती करतात.
प्रयोगशाळेतील निर्मिती
मूळ पेशींचा सखोल अभ्यास करण्यासाठी त्यांची प्रयोगशाळेत मोठ्या प्रमाणावर निर्मिती करणे आवश्यक होते. त्यासाठी सुरवातीस संशोधकांनी उंदीर व तत्सम प्राण्यांवर प्रयोग केले आणि त्या पेशी वेगळ्या काढल्या. १९९८ मध्ये मानवी गर्भापासून अशा पेशी वेगळ्या काढण्याचे तंत्र विकसित झाले. त्यासाठी कृत्रिम गर्भधारणा तंत्र (IVF) वापरून प्रयोगशाळेत मानवी गर्भ तयार केले जातात. मग त्यातील मूळ पेशींची वाढ करून त्यांचा अभ्यास केला जातो.
पुढे हे विज्ञान अधिकाधिक विकसित झाले आणि २००६मध्ये त्यातील एक नवा टप्पा गाठला गेला. आता संशोधकांनी प्रौढ व्यक्तीतील सामान्य पेशींच्या जनुकांत काही बदल घडवले आणि त्यांचे रुपांतर मूळ पेशींत केले.
मूळ पेशी आणि रोगोपचार
शरीरातील अनेक रोगांत विशिष्ट अवयवाच्या काही पेशी खूप दुबळ्या होतात किंवा नाश पावतात. अशी अवस्था झाल्यावर त्या अवयवाचे कार्य थांबते आणि रुग्णास एखादा आजार होतो. अशा वेळेस पारंपरिक औषधोपचार हे फारसे उपयुक्त नसतात. त्याचबरोबर अशा काही तीव्र औषधांचे दुष्परिणाम देखील घातक असतात. त्यादृष्टीने इथे काही मूलभूत पातळीवरचे उपचार करता येतील का यासाठी संशोधन झाले. आधी थेट इंद्रिय प्रत्यारोपण यशस्वी झाले. त्याचीच पुढची पायरी म्हणून मूळ पेशींच्या प्रत्यारोपणाची कल्पना पुढे आली. १९७०च्या दशकात त्याचे सूतोवाच झाले. तेव्हा असे प्रत्यारोपण एक प्रकारच्या रक्तकर्करोगासाठी केले गेले. त्याचे अनेक प्रयोग झाल्यावर हळूहळू ही उपचारपद्धती वैद्यकात रुजली.
आज जवळपास ७०हून अधिक रोगांच्या उपचारांसाठी या पेशींचा वापर होतो. त्यामध्ये मुख्यतः रक्तपेशींच्या आजारांचा समावेश आहे. त्यांना नजरेसमोर ठेऊन आता या उपचार पद्धतीची माहिती घेऊ.
मूळ पेशींचे प्रत्यारोपण
याचे २ मूलभूत प्रकार आहेत:
१. स्वपेशी –प्रत्यारोपण : यात ज्या व्यक्तीवर उपचार करायचे आहेत तिच्याच शरीरातून मूळ पेशी बाहेर काढल्या जातात. पुढे त्यांच्यावर काही प्रक्रिया करून त्या पुन्हा त्याच व्यक्तीत सोडल्या जातात.
२. परपेशी- प्रत्यारोपण : यात एका व्यक्तीवर उपचार करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीतील पेशींचा वापर केला जातो.
प्रत्यारोपणासाठी मूळ पेशींचे स्त्रोत :
शरीरातील मूळ पेशी ३ ठिकाणांहून मिळवता येतात.
• अस्थिमज्जा
• नवजात बालकाची नाळ, आणि
• रक्तप्रवाह
आता दोन्ही प्रकारांचे विवेचन करतो.
• स्वपेशी- प्रत्यारोपण
हे खालील आजारांत उपयुक्त असते:
१. मल्टीपल मायलोमा
२. लिम्फोमा
३. ल्युकेमिया (AML)
४. मज्जातंतूचा ट्युमर
५. काही ऑटोइम्यून आजार.
स्वपेशी- प्रत्यारोपण प्रक्रिया
ही समजण्यासाठी लिम्फोमाचा रुग्ण एक उदाहरण म्हणून घेऊ.
१. प्रथम या रुग्णाच्या शरीरातून मूळ पेशी बाहेर काढतात. मग त्यांच्यावर प्रक्रिया करून त्या थंड तापमानात साठवतात.
२. आता या रुग्णाच्या आजारासाठी केमोथेरपी + रेडीओथेरपीचे उपचार दिले जातात. त्यामुळे कर्करोगपेशींचा नाश होतो. (त्याचा दुष्परिणाम म्हणून रुग्णाच्या अस्थिमज्जेची जननक्षमता दाबली जाते).
३. आता या रुग्णाच्या साठवलेल्या मूळ पेशी त्याच्या रक्तात सोडल्या जातात.
४. या ‘नव्या’ पेशींपासून नवीन निरोगी रक्तपेशी निर्माण होऊ लागतात.
या प्रक्रियेचे फायदे:
१. उपचारानंतर जंतुसंसर्गाचा धोका कमी असतो.
२. रुग्णाच्या शरीराने स्वतःच्याच मूळ पेशी नाकारण्याची प्रक्रिया अत्यंत दुर्मिळ असते.
* परपेशी- प्रत्यारोपण
हे खालील आजारांत उपयुक्त असते:
1. अनेक प्रकारचे ल्युकेमिया
2. थॅलसिमीआ
3. सिकल सेल अॅनिमिया
4. तीव्र इम्युनोडेफीशियन्सीचा आजार.
परपेशी- प्रत्यारोपण प्रक्रिया
इथे परक्या व्यक्तीची दाता म्हणून निवड करावी लागते. सुयोग्य दाता होण्यासाठी खालील निकष लावले जातात:
१. सर्वसाधारण निरोगी अवस्था व व्यसनांपासून अलिप्तता
२. रक्ताची रुटीन तपासणी व रक्तगट
३. रक्तातील पांढऱ्या पेशींतील HLA या प्रथिनांचे वर्गीकरण (typing). दाता व रुग्ण यांची ‘HLA-जुळणी’ हा मुद्दा इथे सर्वात महत्वाचा असतो. या जुळणीची टक्केवारी जितकी जास्त तितके चांगले.
४. विषाणूजन्य आजारांच्या तपासण्या
५. छातीचा क्ष-किरण, इसीजी, इ.
दाता निवडीचा प्राधान्यक्रम :
खाली दिलेल्या पर्यायांत क्र.१ हा सर्वोत्तम असतो. तो न मिळाल्यास उतरत्या क्रमाने पुढे जातात.
१. रुग्णाचे (असल्यास) एकसमान जुळे भावंड : इथे ‘जुळणी’ तंतोतंत होते.
२. सख्खे भावंड
३. प्रथम दर्जाचे भावंड (cousin)
४. बऱ्यापैकी ‘जुळणारी’ त्रयस्थ व्यक्ती. यासाठी अनेक इच्छुक दाते ‘पेशी-पेढी’त नोंदलेले असतात.
५. नवजात बालकाच्या नाळेतील पेशी : हा पर्याय लहान मुलांसाठी वापरला जातो.
प्रक्रियेनंतरचे औषधोपचार:
जेव्हा रुग्णास त्याच्या एकसमान जुळ्या भावंडाच्या पेशी दिल्या जातात तेव्हा या प्रक्रियेनंतर immunosuppressive औषधे द्यायची गरज नसते. मात्र अन्य परक्या व्यक्तीच्या पेशी दिल्यानंतर ती द्यावी लागतात. याचे कारण म्हणजे रुग्णाचे शरीर परक्या पेशींना स्वकीय समजत नाही. त्यातून जी शरीर-प्रतिक्रिया उमटते ती या औषधांनी दाबावी लागते.
तसेच या प्रक्रियेनंतर सर्वच रुग्णांना जंतूसंसर्ग होऊ नये म्हणून प्रतिजैविके आणि अन्य काही औषधे दिली जातात.
मूळ पेशी व अन्य रोगोपचार
वर आपण पहिले की मूळ पेशींचे उपचार हे प्रामुख्याने रक्तपेशींचे आजार आणि दुबळी प्रतिकारशक्ती यांसाठी वापरले जातात. याव्यतिरिक्त अन्य काही आजारांतही त्यांचा उपयोग होऊ शकतो. असे आजार आहेत:
१. त्वचेचे काही जनुकीय आजार
२. जन्मजात एन्झाइम्सचा अभाव
३. हृदयस्नायूचे आजार.
४. मज्जातंतूचे काही आजार (अल्झायमर व पार्किन्सन आजार)
५. पूर्ण पेशीनाश करणारे आजार ( मधुमेह- प्रकार १)
यांपैकी काही आजारांत प्रयोगशाळेत वाढवलेल्या मूळ पेशींचा वापर करून पाहण्यात येत आहे. हे प्रयोग गुंतागुंतीचे आहेत. यासंबंधी अजून पुरेसे संशोधन झालेले नाही. भविष्यात त्याचे चित्र अधिक स्पष्ट होईल.
मूळ पेशी व अत्याधुनिक तंत्रज्ञान
यासंदर्भातली विज्ञानाची प्रगती अक्षरशः थक्क करणारी आहे. त्याची एक झलक:
१. मूळपेशी वापरून केली जाणारी अवयवांची त्रिमिती छपाई : यामध्ये, मूळपेशी वापरून, त्रिमिती प्रिंटरच्या सहाय्याने, प्रयोशाळेत नवीन अवयव "छापले" जातात.
२. मूळपेशी वापरून केली जाणारी अवयव निर्मिती : यामध्ये, प्रथम अवयवाचा साचा बनवून, त्यावर मूळपेशींची वाढ करून, प्रयोशाळेत नवीन अवयव "बनवले" जातात.
भविष्यात ही तंत्रे खूप विकसित झाली तर ती अवयवदानाला पर्याय ठरू शकतील.
****************************************************************
काही प्राथमिक शंका
काही प्राथमिक शंका
१. रक्तात सोडलेल्या मूळ पेशीला 'बाई, तुला क्ष ठिकाणी (उदा. अस्थिमज्जा) जाउन थांबायचे आहे' हे कसे सांगितले जाते ?
२. मूळ पेशीला 'तुला अमुक प्रकारच्या पेशी निर्माण करायच्या अहेत' हे कसे सांगितले जाते?
३. मूळ पेशीला क्ष प्रकारच्या किती पेशी निर्माण करायच्या हे कसे सांगितले जाते? जास्त पेशी तयार झाल्या तर कॅन्सरसारखी परिस्थिती नाही होत का?
४. एखाद्या (खास करून मेंदूच्या, हृदयाच्या ) पेशी तयार करायच्या असतील तर त्या प्रिसाइज आकारातच तयार करा हे कसे सांगितले जाते ?
खूप छान माहिती आहे.
खूप छान माहिती आहे.
चांगला लेख.
चांगला लेख.
आम्ही बाळ जन्माच्या वेळी स्टेम सेल प्रिझर्व्हेशन केले आहे.
यावर सध्या खूप उलटसुलट विचार प्रवाह आहेत.स्टेम सेल रोपण निवडकच आजारांवर होते.त्यातही ते करणारी पुण्यात 3 केंद्र, रोपण खर्च 15 लाखाच्या पुढे इ.काही मुद्दे आहेत.
पण आयुष्यात एखादी वन टाईम करता येण्याजोगी गोष्ट असते, अनेक वर्षांनंतर सायन्स पुढे गेले, जागोजागी स्टेम सेल इंप्लान्ट केंद्र बनली, आणि आपल्याला उपयोग करावा असे वाटतेय आणि स्टेम सेल केलेल्याच नाहीत अशी रुखरुख नको म्हणून केले आहे.
वापर करू किंवा नाही करू हे आता माहीत नाही.
वरील सर्वांचे आभार !
वरील सर्वांचे आभार !
@ माधव,
तुमच्या प्रश्नांची अंतिम उत्तरे ही पेशीविज्ञानातील अणूरेणू-पातळीवर जाऊन द्यावी लागतील. माझा तसा अभ्यास नाही पण जमेल तितका प्रयत्न करतो.
१. रक्तात सोडलेल्या मूळ पेशीला 'बाई, तुला क्ष ठिकाणी (उदा. अस्थिमज्जा) जाउन थांबायचे आहे' हे कसे सांगितले जाते ? >>>
रक्तात सोडलेल्या मूळ पेशी शरीरात सर्वत्र पोचतील हे बरोबर. आता प्रत्यक्ष ज्या अवयवात त्यांची ‘खरी गरज’ असेल तिथल्या विशिष्ट ‘सिग्नल’ नुसार तिथे या पेशी प्राधान्याने जमा होतील.
२. मूळ पेशीला 'तुला अमुक प्रकारच्या पेशी निर्माण करायच्या अहेत' हे कसे सांगितले जाते? >>>>
पहिल्या उत्तरातील ‘सिग्नल’ नुसार आता एके ठिकाणी या पेशी खूप जमल्यात. मूळ पेशीकडे शरीरातील कुठल्याही प्रकारची पेशी होण्याची अंगभूत क्षमता असते.
विशिष्ट ‘सिग्नल’ नुसार >>>
विशिष्ट ‘सिग्नल’ नुसार >>> तो सिग्नल बाहेरून (म्हणजे एखादे रसायन टोचून इ.) निर्माण केला जातो की पिडीत अवयव स्वत:च असा सिग्नल द्यायला सुरू करतो ?
मूळ पेशीकडे शरीरातील कुठल्याही प्रकारची पेशी होण्याची अंगभूत क्षमता असते. >>> तेच तर! समजा मला ह्रुदयाच्या स्नायुतला बिघाड दुरुस्त करायला नविन स्नायुपेशी निर्माण करायच्या आहेत. मूळ पेशी कुठल्याही प्रकारच्या पेशी निर्माण करू शकते. तेंव्हा तिला माझ्या केसमध्ये 'तू चेतापेशी तयार न करता स्नायूपेशी तयार कर' हे कसे सांगितले जाते? ते सांगण्याएवढे आजचे विज्ञान प्रगत झाले आहे का?
माधव,
माधव,
पेशीविज्ञानातील अणूरेणू-पातळीवर गेल्यास पेशींचे रासायनिक वा विद्युत सिग्नल अशा संकल्पना आहेत.
... इथे वैद्यकाची हद्द संपून जीवशास्त्राची सुरु होते.
माधव,
माधव,
३. मूळ पेशीला क्ष प्रकारच्या किती पेशी निर्माण करायच्या हे कसे सांगितले जाते? जास्त पेशी तयार झाल्या तर कॅन्सरसारखी परिस्थिती नाही होत का? >>>>
यासाठी आधी निरोगी शरीरातील पेशी-विभाजन समजून घेऊ. ही प्रक्रिया दोन प्रकारच्या जनुकांच्या नियंत्रणात असते :
१. उत्तेजक जनुक व
२. दडपणारे जनुक.
हे दोघेही विशिष्ट प्रथिने निर्माण करतात. पहिल्याची प्रथिने पेशीवाढीला उत्तेजन देतात तर दुसऱ्याची त्यांना विरोध करतात. या दोन्ही विरोधी बलांच्या समन्वयातून नियंत्रित पेशीवाढ होते.
पण, जेव्हा जनुकीय बिघाडामुळे क्र.१ शिरजोर होतो तेव्हाच कर्करोग होतो.
४. एखाद्या (खास करून मेंदूच्या, हृदयाच्या ) पेशी तयार करायच्या असतील तर त्या प्रिसाइज आकारातच तयार करा हे कसे सांगितले जाते ? >>>
क्षमस्व. जीवशास्त्राच्या अभ्यासकाने हे उत्तर द्यावे हे बरे.
अनु, धन्यवाद.आम्ही बाळ
अनु, धन्यवाद.
आम्ही बाळ जन्माच्या वेळी स्टेम सेल प्रिझर्व्हेशन केले आहे. >>>
चांगली कृती. ही जागरुकता कौतुकास्पद.
मानवी मेंदू हा शरीरातील
मानवी मेंदू हा शरीरातील प्रत्येक बिघडला कारणीभूत असावा असे मला नेहमी वाटते .कोणत्याही अवयव chya मुळ पेशींना सुधा कोणताच निर्णय घेण्याचं स्वतंत्र नाही असे मला वाटत .
शंका निरसन करणे
पेशींचे विभाजन किती प्रमाणात
पेशींचे विभाजन किती प्रमाणात झाले पाहिजे कधी झाले हे सर्व सर्व मेंदूचं ठरवत असावा
मानवी मेंदू हा शरीरातील
मानवी मेंदू हा शरीरातील प्रत्येक बिघडला कारणीभूत असावा >>>>
मेंदूचे काम हे केंद्रीय नियंत्रणाचे आहे. जसे की देशाचे केंद्र सरकार ! पण ‘प्रत्येक बिघाडाला’ असे नाही म्हणता येणार.
खूप धन्यवाद डॉक्टरसाहेब. लेख
खूप धन्यवाद डॉक्टरसाहेब. लेख नेहमीप्रमाणे सुंदर आहे.
काही शंका आहेत
स्पायनल कॉर्डवर T3/T4 लेवला असलेला Benign Tumor जो स्पायनल कॉर्डवर दबाव टाकत होता त्यामुळे रुग्न लंगडत होता म्हणून सर्जरी केली व Tumor काढला पण त्यात nerve root damage झाले आणि lower limb control गेले. अशा केस मधे स्टेम सेल रोपण उपयुक्तता किती?
स्पायनल कॉर्ड इंजुरी मध्ये किती फायदा होतो?
बऱ्याचदा या उपचाराने प्यारेलीसीस बरा होऊ शकतो असे क्लेम केले जातात. पण जिथे हे उपचारहोतात त्याठिकाणी फिजिओथेरपी चांगल्याप्रकारे केली तरच उपयोग होईल असे सांगितले जाते. खरे काय ?
अस्थिव्यंग/ अस्थिरोगात हे कितपत उपयोगी आहे.
एक प्रवाद असाही आहे की मूळ पेशी प्रत्यारोपण शास्र अजूनही खूप बेसिक अवस्थेत आहे त्याचा फायदा होईलच असे नाही.
दत्तात्रय, आभार .
दत्तात्रय, आभार .
तुम्ही वर्णन केलेल्या रुग्णात या पेशींचे उपचार उपयुक्त नसावेत असे वाटते. अर्थात ज्या डॉ ने त्याला प्रत्यक्ष पहिले आहे त्यांचेच मत महत्वाचे.
एक प्रवाद असाही आहे की मूळ पेशी प्रत्यारोपण शास्र अजूनही खूप बेसिक अवस्थेत आहे त्याचा फायदा होईलच असे नाही. >>>
अगदी बरोबर. रक्तपेशींचे आजार वगळता इतर ठिकाणी पुरेसे संशोधन व्हायचे आहे.
खूप धन्यवाद डॉक्टरसाहेब...
खूप धन्यवाद डॉक्टरसाहेब...
शंकानिरसन झाले..
आणि प्रत्येकाच्या पेशीत
आणि प्रत्येकाच्या पेशीत असलेला वेगळा genetic code गोंधळ तर निर्माण करत नाही ना दुसऱ्या व्यक्तीच्या स्टेम cell वापरल्यावर
राजेश, लेखातील हे बघा:
राजेश, लेखातील हे बघा:
अन्य परक्या व्यक्तीच्या पेशी दिल्यानंतर immunosuppressants द्यावी लागतात. याचे कारण म्हणजे रुग्णाचे शरीर परक्या पेशींना स्वकीय समजत नाही. त्यातून जी शरीर-प्रतिक्रिया उमटते ती या औषधांनी दाबावी लागते.
लेख नेहमीप्रमाणे सुंदर आहे.
लेख नेहमीप्रमाणे सुंदर आहे. उपयुक्त माहिती.
एक समजले नाही.
>>>>
नवजात बालकाच्या नाळेतील पेशी : हा पर्याय लहान मुलांसाठी वापरला जातो.>>>>
हा पर्याय मोठ्या माणसांना का चालत नाही ?
साद, धन्यवाद.नवजात बालकाच्या
साद, धन्यवाद.
नवजात बालकाच्या नाळेतील पेशी : हा पर्याय लहान मुलांसाठी वापरला जातो पण तो मोठ्या माणसांना का चालत नाही ? >>>
नाळेतून मिळणाऱ्या रक्ताचे (व पर्यायाने पेशींचे) प्रमाण (volume) कमी असते, जे प्रौढ व्यक्तीसाठी पुरेसे नसते.
ओह.सध्या सर्व कंपनीज
ओह.सध्या सर्व कंपनीज पालकांच्या भविष्यातील आजारांवर बाळाच्या नाळेचे रक्त प्रिझर्व्ह करून उपचाराला वापरता येईल असा दावा करतात.
आम्ही 8 वर्षांपूर्वी दिलेले रेट 60000 होते.त्यात 18 वर्ष प्रिझर्व्हेशन.त्यानंतर करायचे असल्यास ऍड ऑन चार्जेस.
आता खूप कंपनीज या व्यवसायात असल्याने रेट अगदी कमी असतील, 15000 वगैरे.
धन्यवाद डॉ कुमार.
धन्यवाद डॉ कुमार.
@ मी अनु,
>>>बाळाच्या नाळेचे रक्त प्रिझर्व्ह करून उपचाराला वापरता येईल असा दावा करतात.>>>
या रक्तपेढ्या कुठे असतात आणि वीसेक वर्षांनी आपण त्याचा पाठपुरावा करू शकतो का? जरा माहिती सांगाल का?
रच्याकने.....
रच्याकने.....
दाता व रुग्णाच्या मूळ पेशी जुळणे हा विषय ‘जन्म’ या मराठी चित्रपटात अगदी नाट्यमयरित्या दाखवला आहे. घटस्फोटाचा दावा लावलेल्या एका स्त्रीच्या तरुण मुलीस एक आजार आहे. आणि त्यावर उपचार म्हणून तंतोतंत जुळणाऱ्या मूळ पेशी हव्या आहेत !
मग काय, ही स्त्री वेगळे राहणाऱ्या नवऱ्याला चक्क परत बोलावते आणि “मला अजून एक मूल दे”, अशी विनवणी करते !
रीमा लागूंची भूमिका असलेला हा सुंदर चित्रपट ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी जरूर बघा. यु ट्यूबवर आहे.
साद,
साद,
रक्तपेढी दर वर्षाला एक न्यूजलेटर शेअर करते.त्यांच्या लॅब चा पत्ता दिलेला असतो.आपण फोन करून विनंती केल्यास लॅब व्हिजिट ठरवतात.
आम्ही कधी केलेले नाहीय हे सर्व.पण वर्षाला (म्हणजे वर्षा ला नाही, मलाच ☺️) फोन येतो तेव्हा सगळं ठीक ठाक प्रिझर्व्ह होतं आहे का वगैरे जुजबी चौकशी करतो.
भारतात खूप रक्तपेढी आहेत.मला बेबीसेल लाईफसेल आणि कॉर्डलाईफ माहीत आहेत.
माहितीबद्दल धन्यवाद मी अनु.
माहितीबद्दल धन्यवाद मी अनु.
बराच पद्धतशीर कारभार आहे त्यांचा.
@ माधव,
@ माधव,
*** मूळ पेशीला 'तुला अमुक प्रकारच्या पेशी निर्माण करायच्या अहेत' हे कसे सांगितले जाते?>>>>
याच्या उत्तरात थोडी भर घालतो.
या पेशी जेव्हा प्रयोगशाळेत वाढवतात तेव्हा त्यांना काही विशिष्ट रसायने पुरवून प्रयोग झालेले आहेत.
१. समजा,मूळ पेशीला ठरवून हृदयपेशी करायचे असेल तर तिला Activin & BMP-4 ही प्रथिने पुरवतात.
२. जर तिला मेंदूपेशी करायचे असेल तर Retinoic acid पुरवतात.
….. अर्थात हे प्रयोग काही प्रमाणातच यशस्वी झाले आहेत.
त्यामुळे शरीरात या पेशी सोडताना असे काही बरोबर द्यायचे का, यावर अजून फारसे संशोधन नाही.
धन्यावाद डॉक्टर!
धन्यावाद डॉक्टर!
साधारण ६-७ वर्षापूर्वी स्टेम सेल थेरपीने पॅरेलिसिसच्या रुग्णांना फायदा होतो असा दावा एका मुंबईतल्या डॉक्टरने केला होता. म्हणजे रुग्णाच्या बोन मॅरोतून स्टेम सेल्स काढून त्यांचे कल्चर बनवून त्या रक्तात सोडायच्या. मग त्या नविन चेतापेशी तयार करतील... अशी कल्पनेची आयडीआ होती.
तेंव्हा हे सगळे प्रश्न आले होते डोक्यात. अजूनपर्यंत त्यांची उत्तरे नव्हती मिळाली.
मूळ पेशींचा अनेक आजारांत
मूळ पेशींचा अनेक आजारांत उपयोग करण्यासंबंधी दावे भरपूर केलेले आहेत. पण बरेचसे संशोधन हे प्राण्यांवरील प्रयोगांपर्यंतच पोचले आहे.
प्रत्यक्ष मानवी प्रयोग (trials) पुरेसे झाल्याशिवाय निष्कर्ष काढता येणार नाहीत.
खूप धन्यवाद डॉक्टरसाहेब. लेख
खूप धन्यवाद डॉक्टरसाहेब. लेख नेहमीप्रमाणे सुंदर आहे. >>>> + 999
मानवी शरीरात होणाऱ्या जैविक
मानवी शरीरात होणाऱ्या जैविक क्रिया खूप गुंतागुंतीच्या आहेत .
एक अवयव वर उपचार करताना दुसऱ्या अवयव वर दुष्परिणाम होण्याची शक्यता सुधा असू शकेल .
त्याच प्रमाणे मुळ पेशींचा वापर रोग निवारण करता करताना खूप साऱ्या शक्यतांचा विचार करावा लागत असेल त्या बद्दल सुधा थोडे लिहावे
यामध्ये, प्रथम अवयवाचा साचा
यामध्ये, प्रथम अवयवाचा साचा बनवून, त्यावर मूळपेशींची वाढ करून, प्रयोशाळेत नवीन अवयव "बनवले" जातात. >>>>
याचीच पुढची पायरी म्हणजे ‘हवा तसा’ मानव देखील जन्माला घालता येईल ! बऱ्याच विज्ञान काल्पनिकांतून हा विषय रंजकतेने हाताळला आहे.
माझा प्रश्न आहे की भविष्यात खरेच असे काही घडेल?
शशांक, धन्यवाद !
शशांक, धन्यवाद !
@ साद,
माझा प्रश्न आहे की भविष्यात खरेच असे काही घडेल? >>.
अशा धर्तीचे काही प्रयोग आले आहेत. या तंत्रज्ञानाचे शास्त्रीय नाव आहे ‘ जर्मलाईन अभियांत्रिकी’. यात कृत्रिम गर्भधारणा करून प्रयोगशाळेत त्या गर्भातील जनुकांचे फेरफार करतात.
तूर्त हा विषय वादग्रस्त आणि नैतिकतेच्या चौकटीत न बसणारा आहे. बऱ्याच देशांत त्यावर बंदी आहे.
तरी देखील.....
२०१८मध्ये चीनमध्ये या प्रकारचा एक ‘उद्योग’ चोरून करण्यात आला आणि त्यातून दोन जुळ्या मुली जन्मल्या. यावर खूप टीका झालेली आहे.
फक्त एका बाबतीत याचे समर्थन होऊ शकते. ते म्हणजे ज्या जोडप्यांत एखादा दुर्धर अनुवांशिक आजार आहे, तिथे त्यांच्या अपत्याच्या गर्भातच जनुकीय फेरफार करून तो रोग टाळता येईल. अर्थात यावरही अद्याप वैद्यकविश्वाचे एकमत नाही.
असले फेरफार करताना अशीही एक शक्यता असते. ती म्हणजे जनुकांच्या हाताळणीतून एखादे नवे त्रासदायक जनुक देखील निर्माण होऊ शकते. अन त्यामुळे मानव जातीत आजपर्यंत नसलेला एखादा नवा रोग उत्पन्न होऊ शकतो.
Pages