लेखाचे शीर्षक वाचून तुम्ही नक्कीच बुचकळ्यात पडाल. या वैज्ञानिक लेखात हे दैव वगैरे कुठून आले हा प्रश्न लगेच मनात येईल. पण घाबरू नका ! कर्करोगासंबंधात ‘दुर्दैव’ हा शब्द दोन वैज्ञानिकांनीच उपस्थित केलेला आहे. सामान्य माणूस ज्याला दुर्दैव म्हणतो त्याचा वैज्ञानिक पातळीवरील अर्थही त्यांनी सांगितलेला आहे. तो तुमच्यापर्यंत पोचविण्यासाठीच मी हा लेख लिहीत आहे.
तर या सगळ्या प्रकरणाची सुरवात २०१५मध्ये झाली. Cristian Tomasetti (गणितज्ञ) आणि Bert Vogelstein (जनुकतज्ञ) या वैज्ञानिकांनी काही कर्करोगांचे मूळ कारण सांगणारी त्यांची “Bad Luck Theory” विज्ञान विश्वात सादर केली. ती जाणून घेण्यापूर्वी या विषयाचा पूर्वेतिहास थोडक्यात जाणून घेऊ.
कर्करोगाची कारणमीमांसा हा अनेक वर्षे सतत अभ्यास होत असलेला विषय आहे. त्यावर अफाट संशोधन होत आहे. त्यातून नवनवी गृहीतके पुढे येतात. मग त्यावर सखोल चर्चा होते आणि मतभेद झडत राहतात. या सगळ्यामागे वैज्ञानिकांचा हेतू एकच असतो. तो म्हणजे कर्करोगाच्या कारणाच्या सखोल मुळाशी पोचणे. एव्हाना या रोगाच्या बाबतीतली मध्यवर्ती कल्पना स्पष्ट झालेली आहे - मुळात कर्करोग होण्यास पेशींतील काही महत्वाच्या जनुकांचा बिघाड कारणीभूत असतो.
जनुकीय बिघाड(mutation) हा मुख्यतः दोन प्रकारे होतो:
१. वातावरणातील (environmental = E) कर्करोगकारक घटक : यात किरणोत्सर्ग, रसायने आणि काही विषाणूंचा समावेश होतो.
२. अनुवंशिकता (Heredity = H)
या दोन्ही प्रकारातील( E व H) कारणे प्रस्थापित झालेली आहेत. परंतु काही कर्करोगांच्या बाबतीत ती दोन्ही लागू होत नसल्याचे आढळून येते. त्यामुळे संशोधकांना अन्य काही कारणांचा शोध घेणे क्रमप्राप्त होते. त्यासाठी पेशीतील DNAवर लक्ष केंद्रित झाले. जेव्हा एखाद्या मूळ पेशीचे विभाजन होते, तेव्हा त्यातील DNAचेही विभाजन (replication) होऊन त्याच्या प्रतिकृती तयार होतात. या प्रक्रियेत कधी ना कधी चुका (random errors) होतातच आणि त्या अटळ असतात. अशा काही चुकांतून जनुकीय बिघाड होतात. त्यातील काहींमुळे पुढे कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे कर्करोगाच्या कारणमीमांसेतील हे तिसरे कारण स्पष्ट झाले आणि त्याला ‘R’ (Replication दरम्यानच्या चुका) असे संबोधले गेले. वयानुसार जसे पेशींचे विभाजन वाढत्या प्रमाणात होते, त्याच प्रमाणात या चुकाही वाढत जातात. परिणामी कर्करोगाची शक्यता वाढती राहते. आता ‘R’ प्रकारच्या चुका का होतात? तर याला काही उत्तर नाही. काही व्यक्तींत त्या जास्त तर काहींत कमी होतात इतकेच. म्हणून या तत्वास अनुसरून या वैज्ञानिक द्वयीने या प्रकाराला ‘bad luck’ असे लाक्षणिक अर्थाने संबोधले. अन्य काहींनी या गृहितकाला ‘TV थिअरी’ असेही नाव दिले – यातील T व V ही त्या दोघांच्या आडनावाची अद्याक्षरे आहेत !
२०१५मध्ये हे गृहीतक प्रसिद्ध झाले खरे पण त्यात काही त्रुटी होत्या. अन्य कर्करोग संशोधकांनी त्यावर खालील आक्षेप घेतले:
१. समाजातील एकूण कर्करोगांपैकी नक्की किती टक्के हे ‘R’ चुकांमुळे होतात?
२. या अभ्यासात स्तन आणि प्रोस्टेटच्या कर्करोगांचा समावेश नव्हता आणि हे तर बऱ्याच प्रमाणात आढळतात. त्यामुळे अशा चुका आणि विशिष्ट अवयवाचा कर्करोग याची सांगड कशी घालायची?
३. हा अभ्यास फक्त अमेरिकी रुग्णांच्या माहितीवर आधारित होता. मग जगातील विविध वंशियांना याचे निष्कर्ष कसे लागू होतील?
त्यातून स्फूर्ती घेऊन या द्वयीने या विषयाचा व्यापक अभ्यास केला. आता त्यांनी संशोधनात जगातील ६९ देशांतील रुग्णांचा समावेश केला. त्याचबरोबर एकूण ३२ प्रकारचे कर्करोग अभ्यासले आणि त्यात अर्थातच स्तन आणि प्रोस्टेटच्या कर्करोगांचाही समावेश होता. मग २०१७मध्ये त्यांनी पुढील निष्कर्ष जाहीर केले. त्यात विविध कर्करोग आणि त्यांच्या कारणांची साधारण टक्केवारी दिली. ती अशी होती:
१. ६६% कर्करोग हे ‘R’ मुळे होतात.
२. २९% .......... हे ‘E’ मुळे, तर
३. ५% ....... हे ‘H’ मुळे.
अर्थात ही सर्वसाधारण आकडेवारी होती. मग निरनिराळ्या अवयवांच्या रोगांचीही टक्केवारी काढली गेली. त्यातली काही प्रमुख अशी:
* प्रोस्टेट, मेंदू आणि हाडांचे कर्करोग : ९५% ‘R’ मुळे
* फुफ्फुस कर्करोग : ३५% ‘R’ मुळे (आणि ६५% ‘E’ मुळे).
यावरून एक लक्षात येईल. काही कर्करोगांच्या बाबतीत ‘R’ हे कारण अगदी योग्य आहे पण अन्य काहींच्या नाही. फुफ्फुसाचा कर्करोग होण्यास ‘E’ म्हणजेच धूम्रपान अधिक अंशी जबाबदार आहे. त्यामुळे दुर्दैवाचे गृहीतक प्रत्येक कर्करोगाला लागू होईलच असे नाही.
आता या गृहितकावर अधिकाधिक टीका होऊ लागली. काही गणितज्ञांनी याचा बारकाईने अभ्यास केला. त्यांच्या मते या वैज्ञानिक द्वयीने त्यांच्या अभ्यासात संख्याशास्त्राची सूत्रे नीट वापरलेली नाहीत. त्यामुळे या विषयावरील गोंधळ अजून वाढला.
Tomasetti आणि Vogelstein यांनी त्यांच्या गृहीतकाच्या समर्थनार्थ काही मुद्दे मांडले. त्यांच्या मते ‘R’ कारण जर आपण रुग्णांना पटवून दिले तर त्यांच्या मनाला खूप बरे वाटते. विशेषतः खालील प्रकारच्या रुग्णांत याचा उपयोग होतो:
१. अजिबात धूम्रपान न करताही फुफ्फुसाचा कर्करोग झालेले रुग्ण.
२. काही जणांची आहारशैली अगदी आरोग्यपूर्ण असते तसेच ते वातावरणातील कर्करोगकारक जहाल घटकांच्या फारसे संपर्कात आलेले नसतात. तरीही त्यांना एखादा कर्करोग झालेला असतो.
३. लहान मुलांच्या कर्करोगात तर हे स्पष्टीकरण खूप कामी येते. त्यांचा रोग जर अनुवांशिक नसेल तर अशा वेळेस त्यांच्या पालकांना खूप अपराधी वाटते. मुलांत ‘E’ प्रकारची कारणे सहसा लागू नसतात. “मग माझ्याच मुलाच्या वाट्यास हे का आले?” असे ते उद्वेगाने म्हणतात. इथे ‘R’ चे स्पष्टीकरण चपखल बसते.
वरील तिन्ही प्रकारांत संबंधित रुग्ण “नशीब माझे” असेच स्वतःला दूषण देतो. त्याचेच शास्त्रीय स्पष्टीकरण म्हणजे ‘R’ थिअरी.
‘R’ गृहीतकाचे प्रवर्तक आणि टीकाकार यांच्या प्रदीर्घ विचारमंथनातून आता असा सुवर्णमध्य काढता येईल:
१. कर्करोगाची कारणमीमांसा गुंतागुंतीची आहे. तो E, H व R यांतील निव्वळ एका घटकामुळे होत नाही, तर या तिघांच्या एकत्रित परिणामातून होतो.
२. जवळपास ४०% कर्करोगांचा प्रतिबंध आरोग्यपूर्ण जीवनशैलीतून करता येतो. त्यामुळे ‘E’ कडे दुर्लक्ष करून चालणार नाही. उदा. धूम्रपान व मद्यपानापासून अलिप्तता ही महत्वाची राहीलच. तसेच विविध किरणोत्सर्ग हेही याबाबतीत महत्वाचे आहेत.
३. कर्करोग्यांचे समुपदेशन करताना गरजेनुसार ‘R’ गृहीतकाचा वापर करता येईल.
काही कर्करोगांच्या बाबतीत E व H ही कारणे लागू नसतील तर ‘R’ हेच स्पष्टीकरण मानावे लागेल. अशा बाबतीत रोग टाळणे हे आपल्या हातात नसेल. पण कर्करोग जर अगदी लवकरच्या अवस्थेत कळून आला तर त्यावरील उपाय प्रभावी ठरतात. त्यादृष्टीने आयुष्याच्या योग्य त्या टप्प्यात विविध चाळणी चाचण्या करून घेणे हितावह ठरेल.
.....
आज समाजात विविध रोगांमुळे होणाऱ्या मृत्युंमध्ये हृदयविकार हे आघाडीवर आहेत आणि त्याखालोखाल स्थान आहे ते कर्करोगाचे. सध्या जगभरात कर्करोगाने जवळपास ८५ लाख लोक दरवर्षी मरण पावतात. हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. चालू शतक संपेपर्यंत बहुधा कर्करोग हा हृदयविकाराला मागे टाकून ते अव्वल स्थान पटकावेल अशी चिन्हे दिसताहेत. त्यादृष्टीने कर्करोगावरील संशोधन हे बहुमूल्य आहे. कोणत्याही रोगावरील प्रभावी उपचार शोधण्यासाठी त्याची कारणे सूक्ष्म पातळीवर समजणे गरजेचे असते. कर्करोगाच्या बाबतीत तर ते खूप गुंतागुंतीचे आहे. प्रस्तुत वैज्ञानिक द्वयीने मांडलेली ‘R’ थिअरी हे त्या प्रयत्नांचाच एक भाग आहे. जरी ती वादग्रस्त असली तरी ती या संशोधनाला एक वेगळे परिमाण देते हे निश्चित.
**************************
कर्करोग या विषयावरील माझे अन्य लेखन:
१. रसायनांचा धुमाकूळ आणि कर्करोगाचा भस्मासुर
(https://www.maayboli.com/node/64645)
२. मोबाईल फोन आणि कर्करोग ? : (https://www.maayboli.com/node/60382)
अगदी नेमक्या शब्दांत मांडलंय
अगदी नेमक्या शब्दांत मांडलंय तुम्ही. कर्करोगाने पीडित व जीव गमावलेली नातेवाईक मंडळी पाहून मनात आलेल्या ही शंकांपैकी दैव हीदेखील बाब होतीच.. चांगली लेखमाला नेहमी प्रमाणेच
R आणि oncogenes यांचा काही
R आणि oncogenes यांचा काही परस्पर संबंध आहे का ?
नवनवीन माहितीबद्दल अनेक धन्यवाद.
____/\____
प्राचीन व शशांक,
प्राचीन व शशांक,
धन्यवाद !
R आणि oncogenes यांचा काही परस्पर संबंध आहे का ? >>>>
नाही. oncogenes हे व्यवस्थित ‘E’ गटातील कारण झाले.
प्रस्थापित कारण सापडत नसले की R म्हणायचे.
धन्यवाद डाॅ. साहेब...
धन्यवाद डाॅ. साहेब...
____/\____
नेहमीप्रमाणेच माहिती पूर्ण
नेहमीप्रमाणेच माहिती पूर्ण लेख.
कॅन्सरच्या चाळणी चाचण्या करायचे योग्य वय काय ?
साद, धन्यवाद.
साद, धन्यवाद.
** कॅन्सरच्या चाळणी चाचण्या करायचे योग्य वय काय ?>>>>
याचे एकच असे उत्तर नाही. कर्करोगाचा प्रकार आणि लिंगानुसार उत्तरे असतील. अधिक माहिती साठी हा माझा धागा पहा:
https://www.maayboli.com/node/65597
डॉक्टर अनेक धन्यवाद. मनातल्या
डॉक्टर अनेक धन्यवाद. मनातल्या बर्यापैकी शंका दूर झाल्या. मध्यंतरी अभिनेत्री सोनाली बेंद्रेला जो कॅन्सर झाला, त्याला हायग्रेड कॅन्सर म्हणतात असे कळले. आधी साधी अंगदुखी आहे म्हणून तिने ते दुखणे अंगावर काढले, मग तपासण्या झाल्यावर सर्व कळले. तसेच एक विचारायचे होते की हाडांच्या कॅन्सर वर काही इलाज आहे का? एका मैत्रिणीच्या काकुंना हा झालाय. काल तिचा फोन आला आणी त्यातुन तुमचा हा लेख दिसला. त्या काकुंनी पण अंगदुखी आहे समजून एका जनरल फिजीशीयन कडे उपचार घेतले. त्याला पण निदान झाले नाही मग त्याने त्यांना मुंबईला पाठवले.
{{{ आता ‘R’ प्रकारच्या चुका
{{{ आता ‘R’ प्रकारच्या चुका का होतात? तर याला काही उत्तर नाही. काही व्यक्तींत त्या जास्त तर काहींत कमी होतात इतकेच. म्हणून या तत्वास अनुसरून या वैज्ञानिक द्वयीने या प्रकाराला ‘bad luck’ असे लाक्षणिक अर्थाने संबोधले. }}}
शास्त्रज्ञांकडून ही थिअरी अपेक्षित नाही. याला काही उत्तर नाही असे लिहिण्यापेक्षा उत्तर अजून गवसले नाही असे लिहिले पाहिजे. शिवाय असे काही घडतेय तर ते का घडतेय या मागे काहीतरी ठोस कार्यकारणभाव असलाच पाहिजे. आपण तो शोधत राहिलो तर निश्चितच सापडेल.
@ रश्मी, धन्यवाद.
@ रश्मी, धन्यवाद.
*** हाडांच्या कॅन्सर वर काही इलाज आहे का? >>>>
हा एकच आजार नसून त्याचे प्रकार असतात. त्यानुसार ठरेल.
उदा. अस्थीमज्जेचा कर्करोग ( Myeloma) असेल तर त्यासाठी औषधे, किरणोत्सर्ग आणि मूळ पेशींचे प्रत्यारोपण असे अनेक उपाय आहेत.
@ बिपीन, सहमत.
धन्यवाद डॉ.
धन्यवाद डॉ.
अगदी नेमक्या शब्दांत मांडलंय
अगदी नेमक्या शब्दांत मांडलंय तुम्ही. कर्करोगाने पीडित व जीव गमावलेली नातेवाईक मंडळी पाहून मनात आलेल्या ही शंकांपैकी दैव हीदेखील बाब होतीच.. चांगली लेखमाला नेहमी प्रमाणेच>>>>>> + १
धन्यवाद, मंजूताई.
धन्यवाद, मंजूताई.
एक गैरसमज दूर करतो. हा एकच लेख आहे; पुढे लेखमाला नाही.
छान मार्गदर्शन.
छान मार्गदर्शन.
ऐकावं ते नवलच. 'R' टाईप मध्ये
ऐकावं ते नवलच. 'R' टाईप मध्ये पेशी विभाजनाच्या वेळी नवीन पेशी शरीराचं नियंत्रण झुगारून देण्याची शक्यता विभाजनाच्या वेगानुसार वाढते, हे या लेखातून नव्यानेच कळलं.
पण मला लेख वाचून काही प्रश्न पडलेत.
१) कर्करोग म्हणजे पेशींची अनियंत्रित वाढ असा सर्वसाधारण समज आहे. हा सगळ्या प्रकारच्या कर्करोगांना लागू आहे का?
२) अनियंत्रित वाढीला असे कोणते जीन्स जबाबदार आहेत? आणि असलेच तर ते नॉर्मल पेशींमध्ये आपला असर का दाखवू शकत नाहीत?
३) अजून एक शंका अशी, की जेवढ्या जास्त पेशी असतील तेवढा विभाजनाचा रेट जास्त आणि तितकीच 'R' टाईप कॅन्सर होण्याची शक्यता वाढली पाहिजे. पण मागे एकदा 'bbc' च्या डॉक्युमेंटरीत हत्ती आणि व्हेल माशात कॅन्सरच प्रमाण माणसापेक्षा कितीतरी पटीने कमी आहे, असे पाहिल्याचे आठवते. दोन्हीही प्राणी माणसापेक्षा कितीतरी पटीने अवाढव्य आहेत, तरीही 'R' टाईप त्यांना लागू होतंय असं वाटत नाही. याच कारण काय ?
विलभ आपल्या तिसऱ्या प्रश्नाचे
विलभ आपल्या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर कदाचित जीवनशैली हे असेल. मानवाने विज्ञानाच्या प्रगतीबरोबर अति तणावपूर्ण, सत्वहीन व अनावश्यक आहाराचा समावेश असलेली जीवनशैली अंगिकारली आहे. असं मला वाटतं.
विलभ व हि हा, आभार !
विलभ व हि हा, आभार !
आता एका वेळेस एक असे प्रश्न घेतो.
१.
***कर्करोग म्हणजे पेशींची अनियंत्रित वाढ असा सर्वसाधारण समज आहे. हा सगळ्या प्रकारच्या कर्करोगांना लागू आहे का?>>>>
होय. ती कर्करोगाची व्याख्याच आहे.
रोचक!
रोचक!
विलभ,
विलभ,
२.
अनियंत्रित वाढीला असे कोणते जीन्स जबाबदार आहेत? आणि असलेच तर ते नॉर्मल पेशींमध्ये आपला असर का दाखवू शकत नाहीत?>>>>
मुळात कर्करोग होण्यास पेशींतील काही महत्वाच्या जनुकांचा बिघाड कारणीभूत असतो.
पेशीत काही विशिष्ट जनुके proto-oncogenes या स्वरूपात असतात. तशी ती ‘निद्रिस्त’ असतात. जेव्हा काही कारणाने किंवा तसेही त्यांच्यात बिघाड (mutation) होतो. आता त्यांचे रूपांतर oncogenes मध्ये होते.
आता या बिघडलेल्या जनुकाच्या नियंत्रणात विशिष्ट प्रथिने तयार होतात आणि ती पेशींची अनियंत्रित वाढ घडवतात.
काही वेळेस एखाद्या विषाणूंच्या संसर्गातूनही असे oncogenes आपल्या पेशींत सोडले जातात.
तसेच निरोगी पेशींत काही जनुके ही कर्करोग-दाबणारी (suppressor) या प्रकारची असतात. पण जेव्हा रोग होतो तेव्हा oncogenes या दबाव-जनुकांवर मात करतात.
उपयुक्त माहिती डॉक्टर!
उपयुक्त माहिती डॉक्टर!
हिज हायनेस यांचा प्रतिसाद वाचून एक प्रश्न पडला : आनंद / समाधान विरुद्ध मानसिक ताणतणाव आणि कर्करोग याबाबत अभ्यास झाला आहे का? त्याबाबत काही आकडेवारी उपलब्ध आहे का?
विलभ,
विलभ,
३.
** हत्ती व व्हेल हे प्राणी माणसापेक्षा कितीतरी पटीने अवाढव्य आहेत, तरीही 'R' टाईप त्यांना लागू होतंय असं वाटत नाही. याच कारण काय ? >>>>
प्राण्यांचा माझा अभ्यास नाही. पण वाचनावर आधारित माहिती देतो.
काही देवमासे कर्करोगमुक्त असतात तर हत्तीतील कर्करोगाचे प्रमाण खूप कमी आहे. याचे कारण त्यांच्यात असलेली विशिष्ट प्रथिने आणि अर्थात त्यांचे नियंत्रण करणारी जनुके.
त्यामुळे , जर त्या प्रथिनांशी संबंधित जनुके माणसात समाविष्ट करता आली तर रोग नियंत्रण शक्य होईल. अशा दृष्टीने संशोधन चालू आहे.
* अमी व माधव, धन्यवाद.
धन्यवाद डॉक्टर. चांगली माहिती
धन्यवाद डॉक्टर. चांगली माहिती मिळत आहे
पुलेंशु
ideopathic हा प्रचलित शब्द न
ideopathic हा प्रचलित शब्द न वापरता "बॅड लक" वापरणे हे दिशाभुल करणारे वाटले.
बिपीन यांच्या प्रतिसादाशी पुर्णतः सहमत
छान लेख आणि चर्चा.
छान लेख आणि चर्चा.
त्याच अनुशंगाने पण कदाचित धाग्याच्या विषयापासून थोडीशी फारकत घेणारी शंका.
कर्करोग कोणालाही होऊ शकतो हे सत्य स्विकारुन, तो झालाच तर त्यावर होऊ शकणार्या उपचाराच्या खर्चाच्या तरतूदीसाठी विमा कंपन्या (medical insurance coverage) कितपत तयार झाल्या आहेत या बद्दल जाणकारांकडून मार्गदर्शन होऊ शकेल का ?
हिज हायनेस म्हणतात ते खरे पण
हिज हायनेस म्हणतात ते खरे पण असावे. किती वेळा सांगुनही लोक जंक फुड, स्ट्रीट फुड खाण्यावर प्राधान्य देतात. यातील कृत्रिम रंग, मैदा, अजीनोमोटो सारखे पदार्थ आरोग्याला अपायकारक असतात. लहान मुले तर अशा चटपटीत खाण्याला जास्त बळी पडतात. वडापाव, पावभाजी, चायनीज पदार्थ हे अपायकारकच. कधीतरी सहा महिन्यातुन एकदा वगैरे ठीक आहे. पण पोरे ही ऐकत नाहीत आणी आई बापही. रेडी टु इट अन्न झटपट पर्याय देणारे असल्याने आई बापांना ते किफायतशीर वाटते. उदा चिप्स वगैरे पण त्या पेक्षा घरचे अन्न चांगले .
मैदा न पचल्याने पोट साफ होत नाही, मग ते मुख्य कारण असल्याने बाकी गोष्टींवर पण परीणाम होतो. असो !
सुंदर लेख...
सुंदर लेख...
धन्यवाद डॉक्टर....
छान लेख.
छान लेख.
व्यत्यय, सहमत.
व्यत्यय, सहमत.
मित, दत्तात्रय व मानव धन्यवाद.
@माधव,
** मानसिक ताणतणाव आणि कर्करोग याबाबत अभ्यास झाला आहे का?>>>>
होय, काही अभ्यास झाले आहेत. विशेषतः स्तन-कर्करोगाच्या लाखभर रुग्णांवर अभ्यास झालेला आहे. ताण व हा रोग या दोन्हींचा थेट संबंध सिद्ध झालेला नाही.
पण, काही वेळेस अप्रत्यक्ष संबंध असा विचारात घेता येईल:
ताणतणाव >> तंबाकू/ मद्य अशी व्यसने >>> दीर्घकाळाने कर्करोग.
अर्थात इथे व्यसनेच थेट जबाबदार राहतील.
सगळे प्रतिसाद अजून वाचले
सगळे प्रतिसाद अजून वाचले नाहीत, फक्त लेख वाचलाय.
कोणत्याही रोगावरील प्रभावी उपचार शोधण्यासाठी त्याची कारणे सूक्ष्म पातळीवर समजणे गरजेचे असते. कर्करोगाच्या बाबतीत तर ते खूप गुंतागुंतीचे आहे. प्रस्तुत वैज्ञानिक द्वयीने मांडलेली ‘R’ थिअरी हे त्या प्रयत्नांचाच एक भाग आहे. >>>>>
ही थिअरी महाघातक आहे हेमावैम.
माझे उदाहरण खूपच ताणलेले आहे पण तुझे नशीब खराब म्हणून कर्करोग झाला हे म्हणणे = एकलव्याला तू खालच्या जातीतील म्हणून माझा शिष्य बनू शकत नाही म्हटल्यासारखे आहे.
रोग होण्याच्या विविध कारणांत रोग्याची मानसिक जडणघडण हेही कारण अभ्यासले जावे.
एखाद्या व्यक्तीचा पराकोटीचा
एखाद्या व्यक्तीचा पराकोटीचा तिरस्कार वाटत राहिल्याने कर्करोग होतो असे काहीसं वाचल्याचं आठवलं. एखाद्या अवयवावर सतत अत्याचार उदा. खाजविणे, टोकदार वस्तू ने टोचत राहणे, अति तिखट खाणे. याने हा आजार होतो काय?
डॉक्टर, कर्करोगावरच्या
डॉक्टर, कर्करोगावरच्या तुमच्या दुसर्या धाग्यात तुम्ही म्हटले आहे की:
>> आपल्याला होणाऱ्या एकूण कर्करोगांपैकी सुमारे ८०% हे रसायनांमुळे होतात
म्हणजेच ८०% कर्करोग "E" प्रकारामुळे होतो. पण या धाग्यात तुम्ही माहीती दिलीय की फक्त २९% कर्करोग "E" प्रकारामुळे होतो. हा विरोधाभास का? नक्की कुठले आकडे खरे समजावेत?
Pages