मलाही चेहरा माझा खरे तर भावला नव्हता
हवे ते दावणारा आरसा मी शोधला नव्हता
कहाणी काळजाची ऐकुनी त्या चारही भिंती
बिचार्या स्तब्ध झाल्या, "तो" कधी हेलावला नव्हता
गुन्हा माझा नसूनी झूठ केले पंचनामे का?
कुठेही न्याय करण्या रामशास्त्री गावला नव्हता
फुकाचे लाख सल्ले देवुनी गेले मला सारे
शोधला मीच रस्ता, जो कुणीही दावला नव्हता
न मिळते मोल कष्टाचे, न विझते आग पोटाची
सुखी ते, थेंब घामाचा जयांनी गाळला नव्हता
कशासाठी हवी मैत्री जगाला, जाणती काटे
फुले नसता दिशेने या, कुणी सरसावला नव्हता
अधी ठरले असावे द्रौपदीच्या वस्त्रहरणाचे
विजय देण्या जुगार्यांना, हरी का धावला नव्हता?
कपाटे गच्च भरलेली किती मी सापळे मोजू?
अलीबाबा कधी मागे पुढारी जाहला नव्हता
तुला "निशिकांत" नव्हते का कुणी मन मोकळे करण्या?
उबेला आपुल्यांच्या जीव हा सोकावला नव्हता
निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
वाह! सुरेखच!!
वाह! सुरेखच!!