गाढवलोट घाट हिर्डी आसनवडी केवणी घोणदांड घाट खडसांबळे लेणी

Submitted by योगेश आहिरराव on 11 April, 2019 - 06:56

गाढवलोट घाट हिर्डी आसनवडी केवणी घोणदांड घाट खडसांबळे लेणी

IMG_3110.JPG
सह्याद्रीत काही जागा आणि तिथे जाण्याचे योग फार विचित्र असतात अर्थात माझ्या बाबतीत तरी हे खरंय. दोन वर्षांपूर्वी खडसांबळे लेणी पहायची राहिली तर गेल्या वर्षी डेर्या घाट केला तेव्हा गाढवलोट व आवळीची वाट यांनी कोड्यात पाडलं, या सर्व गोष्टी राहून राहून मनांत इथे येण्यासाठी खुणावत होत्या. एकदाचं काय ते निकालात काढायचं ठरवलं. याच विचारात असताना, त्याच वेळी अजय शेडगे यांचा फोन योगायोग म्हणजे ते घनगड केवणी भागात ट्रेकबद्दल बोलत होते. मग काय नागशेत गाढवलोट घाट हिर्डी आसनवडी केवणी घोणदांड घाट खडसांबळे लेणी नागशेत असा रूट ठरवला.
ठरल्या प्रमाणे रात्री चिन्मयच्या सुपर फास्ट गाडीने पनवेल येथे एकत्र जमलो. अजय यांच्या सोबत गणेश धारेचा ट्रेक झाला होता तेव्हाच सुधीर सोबत ही ओळख झाली होती. अदिती, प्रशांत व चिन्मय यांना पहिल्यांदा भेटत होतो. पण या सर्वांचा उत्साह आणि तयारी पाहून ट्रेक चांगलाच होणार याची खात्री पटली. नागशेत अलीकडे भैरवनाथ मंदिरात मुक्कामासाठी थांबलो तेव्हा रात्रीचे दोन वाजत आले होते. हवेत गारवा होता थंडी अशी नव्हतीच. आकाशात पाहिले तर चांदण्याचा सडा पडलेला तेवढ्यात कुणीतरी म्हणाले अरे आज तर कार्तिकी अमावस्या. जागरण गप्पा यात न पडता झोपी गेलो. सकाळी उजाडण्याआधीच उठलो. मंदीर परिसर प्रशस्त आणि स्वच्छ. एका बाजूला पाण्याची टाकी आणि नळ. मुख्य म्हणजे पाण्याची चांगली सोय झाली. मंदिरासमोर जिल्हा परिषदेच्या शाळेचे मोकळे मैदान त्यामागे केवणी ते हिर्डी खजिन्याचा डोंगर पर्यंतची मुख्य रांग. तोच होता आमचा ट्रेक रूट. अजयने झटपट चूल मांडून चहा तयार केला. सोबत ब्रेड जाम खाऊन आवराआवरी करून निघालो. पाच मिनिटाच्या अंतरावर नागशेत गावात शाळेजवळ गाडी लावली. उतरल्यावर राम राम शाम शाम झाले, समजले की गावात कार्तिकी आमावस्यामुळे बैल नाचवण्याचा कार्यक्रम आहे त्यामुळे बहुतेक जण त्याच तयारीत होते.
नागशेत ते कुंडी धनगर पाडा सकाळी सकाळी पाऊण तासात पार केले. कोंडजाईचे स्थान मागच्या वेळी आलो होतो तेव्हा पाहिले होते आता वेळ न घालवता पुढे निघालो. कुंडी धनगर पाडा सोडला की नदीच्या पलीकडे म्हणजे डेर्या घाटाच्या दिशेला तसेच नदी पार न करता सरळ रेषेत थोड अंतर गेल्यावर धनगर वस्ती आहे हीच तळा धनगर वस्ती. इथूनच सरळ मळलेली वाट पुढच्या वस्तीवरून खजिनाच्या डोंगर आणि हिर्डी यामधील खिंडीतून वर चढते तीच आवळीची वाट जी आम्ही गेल्या वेळी उतरलो होतो. तर दुसरी गाढवलोट घाटाची वाट. थोडक्यात आवळीची आणि गाढवलोट या दोन वाटांनी हिर्डीत जाता येते.
तळा धनगर पाड्यात वाटेची चौकशी केली, तिथेही तेच म्हणणे या वाटेने फार कुणी जात नाहीत. घाटाची सुरुवात दाखवायला ‘बावधने’ मामा सोबत आले. थोड अंतर जात पुढच्या खाणाखुणा समजवून घेत मामांचा निरोप घेतला. गर्द रानातली अगदी फार मळलेली नसली तरी व्यवस्थित लक्षात येईल अशी वाट. सुरुवातीचा चढ चढून गेल्यावर एके ठिकाणी ओढ्याजवळ पहिला ब्रेक घेतला. नंतर वाट कड्याला डावीकडे ठेवत तिरक्या रेषेत चढू लागली. खाली झाडीतून दरीत डोकावले तर आवळीच्या वाटेवरचा हा झाप. home.JPG
समोर उजवीकडे खजिन्याचा डोंगर, तसेच कड्याकडे पाठ करून उभे राहिलो तर पश्चिमेला केवणी त्यामागे थोड डावीकडे दूर पुसटसा सरसगड.
IMG_3008.JPG
छोटा कातळटप्पा पार करून वाट कारवीत शिरली, या टप्प्यात ही वाट चांगलीच मळलेली. तळा धनगर पाडा सोडल्यानंतर आरामात जात दिड तासात गवताळ पठारावर दाखल झालो. इथेही मोठा ब्रेक घेतला. इथून पुढे मात्र खरी कसोटी होती. आम्ही होतो तिथून दिशेप्रमाणे हिर्डी गाव आग्नेयेला त्याच दिशेने पाऊलवाट पकडून निघालो. उजवीकडे वळून छोटी चढाई करत माळरानावर आलो. समोर पूर्वेला पाहिलं तर हिर्डीचा डोंगर त्याच डोंगराला उजवीकडे ठेवत आसनवडीचा रस्ता जातो, मनात आले चला दिशेनुसार घुसखोरी करून हिर्डी बायपास करून गेलो तर वेळ वाचेल. पण नाही बऱ्याच वेळा सह्याद्रीत दिसतं तेवढं सोपं नसतं. गपगुमान त्या गवताळ पठारावरून वाट तुडवत जाऊ लागलो जसे पुढे सरकत होतो तसा खजिना डोंगर जवळ येऊ लागला. फार पुढे गेलो तर आवळीची किंवा विळेकडच्या वाटेला लागू. डावीकडे वरच्या बाजूला रोख ठेवला. काही अंतर जाताच माणसांचा आवाज ऐकू आला जाऊन पाहतो तर हिर्डी गावाची मुख्य वाट हीच वाट पुढे उतरत उजवीकडे वळून आवळीची वाट आणि सरळ गेलो तर पलीकडे विळे गावात.
IMG_3026.JPG
दहा मिनिटांची चढाई करत हिर्डीत पोहचलो तेव्हा दुपारचे बारा वाजून गेलेले. एके ठिकाणी अंगणात अवजड सॅक ठेऊन पाणी पिऊन जुन्या महादेव मंदिराकडे निघालो. समोर मोठे कुंड बाजूला पाण्याचे छोटे कुंड आतमध्ये काही पुरातन मुर्त्या आणि शिवलिंग. घटकाभर तिथली शांतता अनुभवली. सह्याद्रीतल्या दुर्गम वाडी वस्त्या सारखेच हिर्डी. थोडीफार पावसाळी शेती बाकी वान सामान साठी विळे किंवा तासभर अंतरावर आसनवडी पुढे घुटका. एक वाजेच्या सुमारास हिर्डीतून आसनवडीसाठी निघालो.
IMG_3047.JPG
वाटेत उजवीकडची अंधारबन पिंपरी कडची वाट गेली. समोर हिर्डीचा डोंगर तर मागे ताम्हिणी घाटाची रांग.
हिर्डीचा धबधबा अर्थात कोरडा पार करून वाट रानात शिरली टिपिकल माथेरान रूट अशी चाल. अधेमधे डोंगराच्या बाजूने येणाऱ्या पावसाळी ओढ्यांवर हूम पाइप टाकण्याचे काम आजूबाजूला रेती मातीचे ढिगारे. भर दुपारी चालायचा थोडा वेग मंदावला दिड तासानंतर आसनवडीत दाखल झालो. मागच्या वेळी आलो तसाच आत्ताही शुकशुकाट.
शाळेच्या व्हरांड्यात जेवण व थोडी विश्रांती. आता पुढचा टप्पा होता तो मुक्काम पोस्ट केवणी. हिर्डी आसनवडीच्या तुलनेत आसनवडी ते केवणी हि वाट तशी फार वापरात नसलेली. मुळातच केवणीत फक्त ढेहबे मामांचे एक घर त्यात त्यांची सोयरिक, नाहीतर कधीकाळी आपल्यासारखे डोंगर भटके गुराखी यांचे येणे जाणे. जवळच्या नळातून पाणी भरून घेतले निघताना पुढे एका घराच्या अंगणात आजी बसलेल्या त्यांनी ताक घेणार का विचारलं, पोटभर जेवण झाल्यावर मस्तपैकी ताक. मला तर चांगली तासभर ताणून द्यावीशी वाटली. वेळेचे गणित जुळवत सूर्यास्त व्हायच्या आत कसेही करून केवणीत पोहचायचे. होते ना ! "सरळ जा इकडे तिकडे नका फिरू, वाटेत गावची लोकं झाडणी करताय खळ्या मध्ये ती भेटतील तुम्हाला, जा सरळ", असे आजीने सांगितले. कच्चा रस्ता पकडून निघालो थोड्या अंतराने कच्चा रस्ता घुटका गावच्या दिशेने गेला. तिकडे न वळता मारठाण्याचा डोंगर उजवीकडे ठेवून सरळ पठारावरून अनेक गुराढोरांच्या पायवाटा मधून जी मोठी व स्पष्ट आहे ती वाट धरून सुसाट निघालो. पठारावर एक दोन ठिकाणी अजूनही ओढ्यात थोडेफार पाणी आणि माजलेले रान सहाजिकच गुरांना खाद्य मुबलक प्रमाणात. अर्ध्या तासाच्या चालीनंतर खळ्यात झाडणी करणारे गावकरी दिसले. त्यांच्या कडून पुढच्या वाटेबद्दल विचारत असताना एक दोघे आमच्या कडे पाहून हळू आवाजात म्हणाले, कशाला इतकं सामान घेऊन फिरायच त्या पेक्षा आम्हाला मदत करा. त्यांच्याकडे बघितल्यावर ते सुद्धा हसू लागले. वाटेत एक विहीर लागणार आणि मुख्य म्हणजे घनगड व मारठाणा डोंगराच्या खिंडीच्या खालून वाट डावीकडे जाते हे लक्षात घेत निघालो. थोडक्यात सांगायचे झाले तर आसनवडी हिर्डी हे एकच पठार त्याला काटकोनात जोडलेले एकोले घनगडचे पठार त्याला पुन्हा जिमखोड्याची खिंडीतून डावीकडे असणारे केवणीचे पठार असा हा सारा मामला. फार रानात न शिरता डाव्या बाजूने पुढे जात थेट दरीच्या बाजूला आलो, समोर होते ते केवणी तर उजवीकडे खिंडीचा मार्ग. आणखी थोड अंतर जात पाहिलं तर कडेला काही सिमेंटचे खांब बहुदा फॉरेस्टवाल्यांनी लावले असावे आणि त्याच वाटेने आम्ही इथवर येऊन धडकलो. पण त्या निमित्ताने फोटो मात्र छान मिळाले. मूळ वाट मागे राहिली हे तर पक्के होते, तसेच पुढे जात उजवीकडे झाडीत घुसखोरी करायला पर्याय नव्हता कारण मागे जाऊन पुन्हा शोधणे हे वेळेचा हिशोब पाहता परवडणारं नव्हते. प्रशांत, सुधीर आणि मी थोड खालच्या टप्प्यात उतरून वाट उजवीकडे वळते का ते पहायला गेलो पण वाट एका ओढ्यापाशी येऊन नाहीशी झाली त्या ओढ्यातून वरच्या बाजूला दाट काटेरी झाडीतून जाता येणे मुश्किल. IMG_3098.JPG
पुन्हा दरीच्या टोकाला माघारी फिरलो. इथून उजवीकडे दिशेने अंदाज घेत अजय वरच्या बाजूला थेट झाडीतून, करवंदाच्या जाळीतून मार्ग काढत त्या मागोमाग आम्ही दहा मिनिटात ते गचपण पार करून छोटी पण मळलेली वाट मिळाली. बहुतेक खळ्याच्या पुढे निघाल्यावर विहिरी नंतर उजवीकडे न जाता आम्ही सरळ सरळ मग डावीकडे वळत दरीच्या टोकावर पोहचलो हीच काय ती चूक झाली. तसेच नंतर ढेहबे आजी सोबत बोलताना समजले की याच विहिरीच्या पुढे वाटेवर एक जुने धनगराचे झाप आहे आणि रचलेला देव आहे. आम्हाला वाट चुकल्यामुळे हे सारं काही पाहता आले नाही. पाच एक मिनिटाचा थांबा घेऊन चालू पडलो.
घनगड आणि मारठाणाच्या खिंडीला खालच्या पातळीवर आडवी मारून मळलेल्या वाटेने लहानसा जंगलपट्टा पार करून मोकळंवनात आलो. इथून एक वाट डावीकडे पठारावर तर थोडी अधिक मळलेली उजवीकडे जात होती. सूर्य मावळतीला झुकला होता, वेळ दडवून चालणार नव्हते. पठारावर पुन्हा भूलभुलैया नको म्हणून उजवीकडच्या वाटेने थोड वर जात थेट घनगडाच्या धारेवर आलो. आता होती ती सरळसोट धारेवरील उतराई. इथून मात्र नजारा लाजवाब केवणीचे पठार आणि तैलबेला या मधील दरी, सुधागड पासून तैलबैलाच्या दिशेने निघालेले कडे अनेक घळी व नाळा. त्यात मावळतीच्या विविध रंगांच्या छटा पठारावर वाऱ्याने डोलणारे सोनेरी गवत. फोटो घ्यावे तितके कमीच. इथूनच खूप छानसा सूर्यास्त पाहिला मिळाला. IMG_3114.JPG
उजवीकडे पठारावरून एकोले गावातून येणारी वाट एकत्र येऊन जिमखोड्याच्या खिंडीतून केवणीच्या पठारावर आलो तेव्हा पूर्ण पठारावर संधिप्रकाश दाटला होता. अनेकदा अश्यावेळी मनात एक वेगळीच घालमेल होते ती शब्दात मांडणे कठीण.असो...
मामांच्या घरी जाई पर्यंत पूर्ण अंधार पडला. कुत्र्याचे भुंकणे ऐकत बाहेरूनच आवाज दिला. मामांच्या घरी त्यांचे दोन्ही मुले आणि नातू आलेले होते. अंधारात आजूबाजूला इकडे तिकडे न जाता त्यांच्या अंगणातच सॅक टाकून तंबू लावले. पाठीवरचं ओझं उतरल्यावर जरा हायसे वाटले. पहिलं काम झटपट सूप तयार केले, गरमागरम सूप पोटात गेल्यावर जरा बरे वाटले. रात्रीच्या जेवणासाठी चूल मांडायला घेतली, मामांनी पुढे येत झटक्यात चूल पेटवूनही दिली. पाणी सुद्धा घरातलं वापरायला देत होते पण पाणवठा लांब त्यात असं आयत घेणं, त्यांनी त्यांच्यासाठी मेहनतीने आणलेले पाणी घेण्याचा प्रश्नच नव्हता. अदितीने स्वयंपाक त्यासाठी तयारी करायला घेतली. आम्ही रिकामे कॅन घेऊन थेट कुंडावर, तिथेच अंघोळी आटपून पाण्याचे कॅन भरून घेऊन आलो. आता थेट सकाळ पर्यंत पाण्याचे पाहायला नको. भाजी, कांदे, गाजर इतर काही कापणे चिरणे यात दोघा तिघांनी मदत केली. चविष्ट असा पुलाव सोबत पापड लोणचे. आडवा हात मारत पोटभर जेवण केले. आदल्या रात्रीचा प्रवास आणि दिवसभराचा मोठा पल्ला त्यामुळे फार वेळ न घेता लगेच झोपी गेलो.
सकाळी आरामशीर उजाडल्यावर उठलो तशीही फार घाई नव्हती. नेहमी प्रमाणे ट्रेक मधील प्रसन्न सकाळ. गेल्या वेळी याच थंडीच्या दिवसांत केवणीत अशीच सकाळ अनुभवली होती. हा पण मुक्काम कायम लक्षात राहील. मला तर केवणी पहिल्यांदा आलो होतो तेव्हा पासून मनात भरले. माझी काही निवडक आवडती ठिकाणं यात केवणीचा नंबर नक्कीच वर.
अजय साहेबाने पुन्हा चुलीवर ताबा मिळवत, आले व गवती चहा टाकून जबरदस्त चहा तयार केला. त्यानंतर मॅगी, ही फक्त ट्रेकला कधी तरी खातो पण अशी चवदार रंगतदार मॅगी कधीही खाल्ली नाही. खरं तर या ट्रेकला खाण्या पिण्याची खूप चंगळ अगदी नेहमीचे पदार्थ असलेले कोकम सरबत, चहा पासून पुलाव, मॅगी पण यांची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे.
break.JPG
याचं सारे श्रेय अदिती, अजय आणि बाकी टीमला. तंबू इतर सामान आवरते घेत सफाई करून दहाच्या सुमारास सॅक पाठीवर घेतल्या, निसर्गरम्य शांत केवणींतून निघायला जीवावर येत होतं.
IMG_3151 (1).JPG
ढेहबे आजींचा निरोप घेत समोरच्या मंदिरातील काळूबाईला मनात दंडवत घालून निघालो. आता वेध लागले होते ते घोणदांड घाट आणि खडसांबळे लेणीचे. वाटेची सुरुवात दाखवायला संतोष सोबत होते. डावीकडची एक दोन जुनी घरं आणि बंद पडलेली शाळा कधी काळी केवणीत राबता असल्याच्या खुणा.
थोड अंतर जात उजवीकडे वाट नाळेच्या दिशेने गेली. आम्ही डाव्या हाताला साधारण आग्नेय दिशेला सरळ जात राहिलो. त्या पिवळया जर्द पठारावर सकाळच्या कोवळ्या उन्हात मंद गार वारा घेत अतिशय सुखावह चाल. अर्ध्या पाऊण तासानंतर थोड खालच्या बाजूला उतरत छोट्या मैदानात आलो कडेच्या बाजूला गेल्यावर मोठे दांड खाली झेपावले होते तीच होती घोणदांड घाटाची वाट.
IMG_3178.JPG
इथल्या एका टप्प्यावर आमच्यातल्या पुढे गेलेल्या संतोष आणि सुधीरला हरण दिसले. टिपिकल कडेलोट पॉईंट सारखी जागा समोर हिर्डीच्या पल्याड ताम्हिणी रांगेत धुक्याची चादर तर मागे पडलेला घनगड डावीकडे मारठाण्याचा डोंगर त्याला चिकटून असलेले घुटक्याचे पाळणे (छोटे सुळके) आणि बरोबर उजवीकडील धारेच्या पोटात असलेली दुर्गम खडसांबळे लेणी.
IMG_3175.JPG
आम्ही सारं दृष्य पाहत बऱ्याच वेळ तिथे बसून राहिलो. खाली नदी पलीकडे सरळ रेषेत होते ते कोंडी धनगर पाडा त्याच्या थोड उजवीकडे नागशेत. खालच्या धनगर वस्तीतून नदी ओलांडून शॉर्टकट होता, इथून सारं वरवर पाहून लक्षात घेत. पुढची वाट समजवून संतोष इथून माघारी गेले. सुरुवातीला थेट दांडवरून न उतरता वाट उजवीकडे ओढ्यातून खालच्या बाजूला तिथून डावीकडे वळून घसारा असलेला छोटा ट्रेव्हर्स पार करून बरोब्बर खालच्या टप्प्यात आली. आता थेट दांडावरून उतराई त्यात पिवळ्या गवतातून उतरताना पाय सरकत होते कारण सकाळच्या दवाने बहुतेक ठिकाणी गवत भिजलेले. तसेच सावकाश बर्यापैकी खाली उतरल्यावर दांड निमुळता होत वाट नाहीशी झाली. दोन्ही बाजूला जाऊन पाहिले तर शे दीडशे मीटर खाली झाडोरा दिसत होता पण तिथे जाणारी आम्ही होतो तिथून एकही वाट उतरण शक्यच नाही. थोड माघे येत डाव्या बाजूला म्हणजे आसनवडी डेर्या घाटाच्या दिशेला उतरत गेलो, भुसभुशीत माती आणि काटेरी झुडपे पुढे मागे एखादी वाट सापडेल या हेतूने बरीच मजल मारली.
शेवटी पुन्हा जसे उतरलो होतो तशीच वाट काढत वर आलो. फार झाडी नाहीच मुळी, तुरळक बांबूचे रान असलेल्या त्या दांडावर आता उन्ह चांगलेच जाणवू लागले. त्यात झाल्या प्रकारात आमचा अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ गेला. शांतपणे एकत्र चर्चा केली कोकम सरबत, खजूर आणि संत्रे यांचा डोस घेतल्यावर जरा बरे वाटले. तसे पाहिले तर घोणदांड घाट हा जरी फार वापरात नसला तरी वाट मिळणार नाही इतपत अवघड मुळीच नाही त्यात कुंडी नागशेत या भागात गुर ने आण करण्यासाठी हीच वाट गावकरी वापरतात. पंधरा वीस मिनिटांचा ब्रेक घेऊन पुन्हा वर उलट चढाई करायचे ठरवले. आश्चर्य म्हणजे मोजून पाच मिनिटे गेल्यावर बरोबर उजवीकडे वाट वळली होती. थोडक्यात हा पूर्ण यू टर्न होता जो आम्हाला उतरायच्या नादात दिसला नाही.
डावीकडे कडा त्याला बिलगून जाणारी दहा मिनिटांची आडवी चाल पुढे खालच्या झाडीत शिरली. एका ओढ्याच्या जवळ पुन्हा थोडी गडबड, डाव उजवं फारसं न करता दिशेप्रमाणे अंदाज घेत अचूक वाटेला लागलो. या भागात काही दगडांवर बाण मार्क केलेले. उतार संपून जंगलातली धोपट वाट लागली. आता केवणीचा कडा उजवीकडे ठेऊन मळलेल्या पायवाटेने निघालो. जंगल पट्टा संपून माळरानावर आलो.
IMG_3224.JPG
आता मागे होती ते घोणदांड घाटाचे मोठे दांड तर समोरच्या कड्यात झाडी पल्याड लपलेली लेणी.
लेणी नजीकचा ओढा पार करून वाट पुन्हा जंगलात शिरली ओढ्याच्या दोन टप्प्यात अजूनही चांगले पाणी तेच पाणी रिकाम्या बाटलीत भरून घेत, तोंडावर मारून फ्रेश झालो. लेणी कुठे आहेत हे वरून उतरताना पहिलं होते त्याच भागात बरोबर खाली आल्यावर वाट उजवीकडे जायला हवी. पण तसे काही न दिसता वाट सरळ पुढे खडसांबळे नेणवलीच्या दिशेने जात होती. थोड अंतर जाताच पुन्हा उलट दिशेला बाण मार्क केलेला दिसला, पुन्हा आलो त्या वाटेने मागे येत मुख्य वाटेला एक फाटा डावीकडे म्हणजे लेण्याच्या दिशेने गेलेला. दहा मिनिटांची सोपी चढाई करत लेण्यात आलो. प्रथमदर्शनी पाहताच हा खडसांबळे लेण्यांचा एवढा मोठा समूह २१ विहार आणि एक स्तूप.
पण कोंढाणे, भाजे, कार्ले, बेडसे अगदी लगतची ठाणाळे या लेण्यांच्या तुलनेत फारच दुर्गम आणि जांभ्या मुरुमाच्या दगडाची छाप असलेला काहीसा अर्धवट अवस्थेत वाटला.
पुरातत्व खात्याचा नेहमीचा सूचना देणारा जुना बोर्ड सोडला तर दुसरं काही नाही. खुद्द लेणीत येण्याची वाट ही सहजा सापडेल अशी नाही. अर्थात काळाच्या ओघात झीज होऊन पडझड होणारच.
इ.स. पूर्व साधारण दुसऱ्या शतकात खोदलेले हे लेणं हिनायान बौद्ध शैली. काळाच्या ओघात लपलेली ही लेणी मुंबई मिशन चे अधिकारी रेव्हरंड रॉबर्ट यांनी १८८९ मध्ये शोधून काढली.... माहिती स्त्रोत : सांगाती सह्याद्रीचा.
दोन वर्षांपूर्वी वाट चुकल्यामुळे येता आलं नाही. आताही प्रयत्नाने वाट मिळाली तर नाहीतर या वेळी सुध्दा लेणी हूकतात कि काय असेच वाटले होते. थोडा फार सुका खाऊ, फोटोग्राफी असा निवांत अर्ध्या तासाहून अधिक ब्रेक घेऊन लेणीतून निघालो. खडसांबळे नेणवलीत जाणारी मुख्य वाट सोडून धनगर पाड्याच्या दिशेने डावीकडे वळालो. वाट उतरून आणखी एका गवताळ पठारावर आली, वाढलेल्या गवतामुळे जवळपास एकही वाट अशी नव्हती. जसे पुढे सरकत होतो तसा उतरत खालच्या बाजूला रानात एंट्री मारली. धनगर पाडा जरी वरून लेणीच्या रेषेत सरळ दिसत होता तरी तिथे पोहचणे सोपं नाही हे लक्षात आले. दोघं तिघे इकडे तिकडे पांगलो पुन्हा एकत्र आलो न जाणो एवढं उतरून ही वाट नाही मिळाली तर पुन्हा वर चढून यावं लागेल शेवटचा उपाय नेणवलीत जाऊन नागशेत परतणे पण हा खूपच लांबचा फेरा होता. अजयराव वाट शोधायला खाली रानात उतरत पाड्याच्या दिशेने गेले ते दहा पंधरा मिनिटांत ‘खाली या रे’ असा आवाज देत परत आले. मिळेल तशी वाट काढत तो झाडीतला उतार संपवून मोकळवनात आलो. समोर चार पाच घरांचा घोबडी धनगर पाडा. लोकेशन एकदम खास मागे पहिलं तर लेणीच्या उजवीकडून येणारा ओढा अगदी सरळ रेषेत त्याच्या समीप उजवीकडे घोणदांड घाट. अगदी वरून सकाळी पहिलं त्याप्रमाणे इथवर आलो. धनगर, कातकरी, ठाकर ही सारी रानातली मंडळी. रोजीरोटी पोटासाठी थोडीफार गरजेपुरती काय असेल ती पावसाळी शेती बाकी इतर वेळी कुठे डोहात मासेमारी, मिळालं तर मध नाहीतर ताडी पण यासाठी बहुत मेहनत आणि फिरणं. जमेलच तर अंगणात काही निवडक भाज्या आणि कंदमुळं. असेच गरम पाण्यात उकडलेले गरगट व करंदे ही कंदमुळ खात ‘इठू पिंगळे’ यांच्या अंगणात बसलो. तो औटघटकेचा थांबा आम्हा सर्वांना फारच आवडून गेला. वेळ पाहत भानावर येत निघालो इथेही वाटेची थोडी गडबड झाली. मागे आवाज देत खुद्द पिंगळे मामा, ते काही कामानिमित्त नागशेत जात होते. मग काय त्यांच्या मागे फार विचार न करता ते नेतील तसे शेतातून रानातून बांधावरून शॉर्टकट मारत मुळ वाटेला लावून मामा पुढे निघून गेले. IMG_3260_0.JPG
अर्ध्या पाऊण तासाच्या चालीनंतर नदी पार करून कच्च्या रस्त्याने नागशेत मध्ये पाच वाजता आलो. ठरल्याप्रमाणे वर्तुळ पूर्ण झाले होते, आम्ही सारे आनंदी आणि समाधानी चित्ताने परतीच्या वाटेला लागलो.

अधिक फोटोसाठी हे पहा : https://ahireyogesh.blogspot.com/2018/12/gadhavlot-kevani-ghondand-khads...

योगेश चंद्रकांत आहिरे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पठारावर संधिप्रकाश दाटला होता. अनेकदा अश्यावेळी मनात एक वेगळीच घालमेल होते ती शब्दात मांडणे कठीण>> अगदी
कसलं भारी . फोटोज सग्गळे सुंदर ! कसला रंग उतरलाय पिवळसर केशरी ! छान वर्णन . आवडलं

धन्यवाद SRD .
जाण्यासाठी कोणती बस पाली येथून जाते? कुठे उतरायचे? >>> पालीहून ठाकुरवाडी नियमित बस आहेत, ठाकुरवाडीला उतरून दिड एक तासात जाता येइल. तसेच नेणवली कोशींबळे बसने नेणवलीत उतरून तेवढाच वेळ लागेल.