२: धडपडण्यापासून धड पळण्यापर्यंत
डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.
माझं "पलायन" १: ए दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के ये है बम्बे मॅरेथॉन!!
मार्च २०१६ मध्ये एका सायकल मोहीमेच्या तयारीसाठी पहिल्यांदाच रनिंगला सुरुवात केली. त्यामध्ये अनेक अडचणी आल्या होत्या. अनेक वर्षांपासून आई म्हणायची की, पहाटे उठून पळायला जा. पण कधीच जावसं वाटलं नाही. पण २०१३ मध्ये सायकल चालवायला (पुन:) सुरुवात केल्यानंतर हळु हळु फिटनेसबद्दल रस वाढत गेला. नंतर सायकलच्या ग्रूप्सवर अनेक रनर्स दिसायचे. आणि सायकल चालवण्याचा स्टॅमिना वाढवण्याची खूप इच्छा होती. तेव्हा मग रनिंग सुरू करायलाच पाहिजे, असं वाटलं. कारण रनिंगमध्ये कमी वेळेत जास्त ऊर्जा लागते. सोप्या भाषेत रनिंगमध्ये सायकलिंगच्या दुप्पट ऊर्जा लागते. त्यामुळे जर रनिंगचा सराव केला तर स्टॅमिना वाढतो. आणि रनिंग चांगलं येत असेल व रनिंगने स्टॅमिना वाढल्यावर सायकल चालवणं सोपं होतं. कारण शरीराला जास्त थकण्याची सवय असेल, तर ते सायकलिंगमध्ये कमी थकतं. म्हणून मार्च २०१६ मध्ये रनिंगला सुरुवात केली.
पण अडचणी ब-याच होत्या. एक तर लोक काय म्हणतील, रनिंग करताना मी कसे दिसेन असं वाटत होतं. शाळेत असल्यापासून सगळे हसायचे! रनिंग तर लांबची गोष्ट, माझ्या चालण्याबद्दलही लोक खूप काही सांगायचे- असा नको चालूस, सरळ चाल इ. इ. त्या सगळ्या गोष्टी मनात होत्या. त्याची भितीच होती. त्यामुळे सुरुवातीला तर फक्त पहाटेच्या अंधारातच रनिंग करावसं वाटायचं. आणि मग अनेक दिवस आळसामुळे उठणंच व्हायचं नाही. त्यामुळे रनिंग करायचं, हे ठरवल्यानंतर प्रत्यक्ष सुरू करेपर्यंत आणखी वेळ गेला. पण हळु हळु सायकलिंगमुळे अशा प्रकारची लाज दूर ठेवायला थोडा शिकलो होतो, त्यामुळे मग मन तयार झालं. आणि निघालो रनिंगसाठी! पहिल्या दिवशी साडेपाच किलोमीटर चाललो. त्यात जेमतेम पाचशे मीटर रनिंग केलं असेन. कारण शरीराला अजिबात सवय नव्हती. थोडं पळाल्यावर जास्त वेळ थांबावं लागायचं किंवा चालावंच लागायचं. सलग दोन- तीन दिवस असं करत राहिलो. जेमतेम शंभर मीटर रनिंग व मग जास्त वॉकिंगच. कसंबसं पाचव्या दिवशी एक किलोमीटर सलग रनिंग करता आलं. त्याला खरं तर रनिंगही म्हणता येणार नाही. जॉगसारखा तो वॉकच होता. आणि थांबावं तर सारखं लागायचं. घाम फार येत होता. त्यामुळे पाण्याची बाटलीही सोबत ठेवावी लागायची. असं अगदीच विचित्र प्रकारे रनिंग सुरू केलं. आणखी काही दिवसांनी मात्र चालण्याची गरज न पडता सलग पाच किलोमीटर थांबत थांबत पण पळता आलं तेव्हा मस्त वाटलं! पण ह्या जॉगिंगची स्पीड मात्र चालण्यासारखीच होती. कारण मध्ये थांबावं लागायचंच.
मध्ये मध्ये मोठी गॅपही पडायची. एप्रिलमध्ये काही रन्स झाल्यानंतर मात्र सलग दहा किलोमीटर पळता आलं. पण वेळ किती लागला हे मात्र विचारू नका! जवळजवळ पावणे दोन तास!! आज हसू येतं. सुरुवातीला अनेक महिने मी ज्या गतीने पळत होतो, त्यापेक्षा फास्ट आज चालतो! स्पीड बाजूला ठेवली तर रनिंगची मजा मात्र नक्कीच येत होती. कोणतीही विद्या शिकताना सगळ्यांत कठीण टप्पा हाच असतो- गोडी येईपर्यंतचा टप्पा. एकदा चव मिळाली की मग आपोआप आपण ती गोष्ट धरून ठेवतो. हळु हळु मग चढाच्या रस्त्यावर- डोंगरावरही पळण्याची हिंमत आली. घाम फारच यायचा, पण मजाही यायची. पण... ह्या काळात सायकलिंगमध्ये गॅप आली, त्यामुळे परत काही महिने रनिंग बंद झालं. मार्च २०१६ मध्ये रनिंग सुरू करूनही पूर्ण वर्षात फक्त २६ दिवस रनिंग केलं. पण आपण जे करून शिकतो, ते कधी विसरत नाही. रनिंग पुन: सुरू होणार होतं व पुढे जाणार होतं.
पुढील भाग- पलायन ३: मंद गतीने पुढे जाताना
अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग
फारच लवकर आटोपला हा भाग
फारच लवकर आटोपला हा भाग
मस्त चाललीय मालिका.. आवडतंय
मस्त चाललीय मालिका.. आवडतंय
धन्यवाद!
धन्यवाद!
@ हर्पेन, पुढचे भाग मोठे येतील. हा छोटा झाला, कारण सुरुवातच होती.
छान लेख.
छान लेख.
ब्लॉग पाहिला
आपकी हिंदी सराहनिय एवं कौशल्यपूर्ण है|| इसे बनाए रखे |
मार्गी,
मार्गी,
फार छान लिहिता तुम्ही.
तुमच्या धाग्यावर माझ्या अनुभवाचा/प्रश्नाचा मोठा प्रतिसाद लिहिणार आहे. तुमची काही हरकत नसावी अशी आशा करते.
नमस्कार!
नमस्कार!
खरंतर हा प्रतिसाद इथे कितपत योग्य आहे माहीत नाही. पण मार्गी यांनी लिहिलेल्या काही गोष्टी वाचून मलाही माझा अनुभव, माझे प्रश्न इथे मांडावे असे वाटले.
साधारण मे २०१५ मध्ये मी एका डॉक्टरांकडे गेले होते आणि त्यांनी अनेक ट्रायथलॉन, किल्ले चढणे आणि अश्या अनेक गोष्टी केलेली सर्टिफिकेटस तिथे पहिली. तेव्हाच डोक्यात मॅरेथॉनमध्ये धावायचा किडा वळवळायला लागला. मायबोलीवर असलेल्या मॅरेथॉन रनिंग च्या धाग्यावर प्रश्नही विचारला. आणि २०१५ च्या डिसेंबरमध्ये पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनमध्ये ५ किमी चे रनिंग केले. ते धावणे म्हणजे couch to ५ km असा अनुभव होते. जेमतेम एक महिना चालणे आणि थोडे धावणे असा सराव केला.
त्यावेळी ऑनलाईन काही मार्गदर्शन मिळते का म्हणून पहिले तर ते माझ्या तरी कामाचे नव्हते. मला जाणवलेलं कारण म्हणजे त्यात तुमचा फिजिकल फिटनेस एका विशिष्ट पातळीवर गृहीत धरलेला वाटला. मला जेमेतेम १०० पावलं धावायचं म्हणजे जॉगिंग सारखं तरी अवघड जात होतं. ५ किमी साठी तयारी करताना ३ किमी च्या अंतरामध्ये ८ वेळा १०० पावले धावणे आणि उर्वरित चालणे असे करू शकले. (इथे मार्गी हे स्वतः कित्येक किमीचे सायकलिंग करत असूनही त्यांना धावणे सुरुवातीला अवघड गेले हे वाचून आपण इतकेही वाईट नाही असे वाटले आणि म्हणून इथे प्रतिसाद लिहीत आहे.)
५ किमी चे मॅरेथॉन रन झाल्यावर पुन्हा खंड पडला. तब्येतीच्या अनेक प्रकारचे चढउतार करता करता धावणे पूर्णपणे मागे पडले. पुन्हा २०१८ मध्ये Pune Womens Half Marathon मध्ये ५ किमी केले पण मला स्वतःला समाधान वाटले नाही.
अजूनही किमान हाफ मॅरेथॉन करायची इच्छा आहे. पण माझे माझ्या बाबतीतले निरीक्षण असे आहे की इतके वर्षे स्वतःकडे केलेले दुर्लक्ष, २ बाळंतपणे, दिवसातले ३ - ३.५ तास ओट्याशी उभे राहून केलेले काम आणि नोकरी करत असताना किमान ८ तास खुर्चीवर बसणे ह्याने पाठ आणि कंबरेच्या स्नायूंकडे खूप दुर्लक्ष झाले. नुसते चालायचे असेल तरी तुमची कंबर धडधाकट लागते ह्याचा स्वतः अनुभव घेतलेला असल्याने धावणे अवघडच असणार ह्याची कल्पना आहे.
त्यामुळे आता सध्या ३ -३.५ किमी चालणे आणि २५ मिनिटे योगासने सुरु केले आहे. आता पुन्हा Pune Womens Half Marathon आहे. पण ४ किमी सारखं फुटकळ टार्गेट न ठेवता थोडा दीर्घदृष्टी प्रयत्न करावा असे ठरवले आहे.
आता मुद्दा येतो तो धावायचा सराव करायचा. घराच्या आसपास काँक्रीटचे रस्ते आहेत. कित्येक जण सांगतात की काँक्रीटच्या रस्त्यांवर धावले तर गुढघ्यांसाठी चांगले नसते. नुसते माती असलेले मैदान कुठे शोधावे हा एक प्रश्नच आहे. शनिवार-रविवार पुणे रनर्स ग्रुप भेटतो हे माहित आहे पण थोडा आळशीपणा, थोडी घरातील कामे नडतात.
२०१५ मध्ये पहिल्यांदा ५ किमी धावले होते तेव्हा मनाशी ठरवले होते की २०१८ मध्ये स्वतःला चाळीशीचं गिफ्ट म्हणून ४२ किमी ची मॅरेथॉन पूर्ण करायची. (आता विचार केला की असे वाटते की जरा जास्तच महत्त्वाकांक्षी अपेक्षा होती स्वतःकडून).
फुल मॅरेथॉन नाही तर निदान हाफ मॅरेथॉनचं स्वप्न सोडवत नाहीये.
==========================
एवढा मोठा प्रतिसाद लिहिला कारण नुसती मनात असलेली गोष्ट कागदावर उतरली की प्रत्यक्षात उतरायची शक्यता वाढते. तसेच आपल्याकडे इतके अनुभवी लोक आहेत की त्यांच्याकडून काही तरी मार्गदर्शन मिळेल.
मार्गी एकदम झकास लिहिलं आहेस
मार्गी एकदम झकास लिहिलं आहेस
मी सध्या याच मार्गाने चाललोय
दहा किमी ला पावणेदोन तास वाचून तर अगदी अगदी झाले
माझेही आता तीच वेळ आहे
खूप मस्त लिहितोयस पटापट टाक पुढचे भाग
वरील प्रतिसाद आत्ताच बघितले!!
वरील प्रतिसाद आत्ताच बघितले!! धन्यवाद आशूचँप!!
@ मनस्विता जी, ओहह!! प्रतिसाद वाचायचाच राहून गेला होता. धन्यवाद.. आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा!