कन्यादान या तेंडुलकरांच्या नाटकाबद्दल श्रीमती सुहास जोशी यांच्याशी बोलायचं ठरवलं आणि योगायोगानं त्याच वेळी दोन आत्मचरित्रं वाचनात आली. श्रीमती सुधा वर्दे यांचं गोष्ट झर्याची आणि श्रीमती यशोधरा गायकवाड यांचं माझी मी ही ती दोन आत्मचरित्रं. म्हटलं तर वेगळी, पण बरीचशी सारखी. सुधाताई वर्दे महाराष्ट्राला परिचित आहेत त्या सेवादलाच्या एक नेत्या म्हणून. सेवादलाचं आणि सेवादलाशी जोडलेल्या कलापथकाचं कामच सुधाताईंनी आयुष्यभर केलं. सुधाताईंचं हे पुस्तक आहे ते त्यांच्या व श्री. सदानंद वर्दे यांच्या सहजीवनाबद्दल. पक्षानेच त्यांचा हा विवाह ठरवला. पतीही सेवादलाचा कार्यकर्ता आहे म्हणजे लग्नानंतरही सेवादलाचं काम करता येईल, हा विचार करून सुधाताईंनी वर्द्यांशी लग्न केलं. दोन व्यक्तींना आपापल्या आयुष्यात जे करायचं आहे ते आयुष्यभर आनंदानं करायला मिळणं आणि परस्परविश्वासानं, सहकार्यानं आपआपली आयुष्यं संपन्न करता येणं, म्हणजे आदर्श सहजीवन. सुधाताई व वर्द्यांचं हे आदर्श सहजीवन व्यतीत झालं ते समाजवादी पक्षाच्या छायेखालीच. राजकारणात व समाजकारणात नैतिकता व शुचितेला स्थान असण्याचा तो एक काळ होता. वैयक्तिक स्वार्थ, सत्तालोलुपता आणि जातिधर्माच्या बाबतीत संकुचित मनोवृत्तीपासून अलिप्त असणारे नेते तेव्हा समाजाचं नेतृत्व करत होते. राजकारणातली ही चांगली मंडळी त्याकाळी समाजवादी पक्षात होती. नानासाहेब गोरे, एस. एम. जोशी, बॅ. नाथ पै, मृणाल गोरे, अण्णासाहेब सहस्रबुद्धे या नेत्यांची सचोटी, निष्ठा वादातीत होती, आणि म्हणूनच सामान्य जनतेनं या नेत्यांवर आत्यंतिक प्रेम केलं. सेवादलातील कार्यकर्त्यांना समाजवादी पक्षातील या नेत्यांचं मार्गदर्शन लाभलं होतं.
काळ बदलला, माणसं बदलली, निष्ठाही बदलल्या. महात्मा गांधी आणि साने गुरुजींना आदर्श मानणार्या सेवादलाचे कार्यकर्तेही याला अपवाद नव्हते. देश व पक्षापेक्षा व्यक्तिगत स्वार्थ महत्त्वाचा ठरला. नेतेही स्वत:च्या प्रतिमेत अधिक गुंतत गेले. आपल्या विचारसरणीचं आपण स्तोम माजवतो आहोत, हे त्यांच्या लक्षातच आलं नाही. गांधीवाद, समाजवाद हे लोकांच्या हसण्याचे विषय बनत चालल्याचं या मंडळींना कळलं नाही. आपली वागणूक किती आदर्श आहे, आपण नैतिकतेचं किती आचरण करतो, हे दाखवण्याच्या भानगडीत हे नेते चक्क दांभिक बनले. सुधाताईंच्या आत्मचरित्रात समाजात आणि मुख्यत्वे कार्यकर्त्यांत झालेले हे सारे बदल बघायला मिळतात. आणि लक्षात राहतो तो राजकीय नेत्याच्या सामाजिक आणि खाजगी जीवनातला फार मोठा फरक. स्वातंत्र्य व समतेच्या गप्पा मारणारे काही समाजवादी नेते खाजगी आयुष्यात कसे संकुचित विचारसरणीचे होते हे सुधाताईंच्या या आत्मचरित्रातून ठळकपणे समोर येतं. समाजवादी साथी व नवरा या दोन्ही भूमिका वठवणारी व्यक्ती एकच असली तरी या दोन्ही भूमिकांमधल्या तिच्या वागणुकीत फार मोठा फरक असतो, हे सुधाताईंनी लिहून ठेवलंय. यशोधरा गायकवाडांच्या आत्मचरित्रातूनही हीच बाब ठळकपणे समोर येते. यशोधराबाईंचे पती एक दलित नेते. समाजात बर्यापैकी मानाचं स्थान असलेले. दलित समाजाला स्वातंत्र्याची व समान हक्कांची जाणीव करून देणार्या या नेत्यानं आपल्या पत्नीचा, म्हणजे यशोधराबाईंचा अनन्वित छळ केला. दुसरं लग्नंही केलं. या दुसर्या लग्नापायी नोकरी सोडवी लागली, तर पैसा गाठीशी जोडता आला नाही, याचं खापर आपल्या दलित असण्यावर फोडलं.
लोकांना नैतिकतेचे उपदेश करताना आपणही ती नैतिकता आचरणात आणणारे काही लोक पूर्वी अस्तित्वात होते. या मंडळींच्या शिष्यांनी दुर्दैवानं बेगडी नैतिकता अंगिकारली. आपल्याला आदर्श असणार्यांच्या वागणुकीचे स्वत:ला सोयीस्कर असे अर्थ लावून घेतले. आणि वर आपल्याच वर्तनाचे गोडवेही गायले. तेंडुलकरांचं कन्यादान हे नाटक घडतं ते याच पडझडीच्या काळात. ही एका सुसंस्कृत जोडप्याची कथा आहे. सेवादलाचे संस्कार अभिमानानं मिरवणारं हे जोडपं. यातल्या पत्नीला समाजवादी विचारसरणीची, दलितांची कदर आहे, पण आपल्या मुलीनं एका कलंदर दलिताशी लग्न करू नये, कारण दोघांची आजवरची पार्श्वभूमी भिन्न असल्यानं त्यांचं एकमेकांशी पटणार नाही, असं तिला वाटतं. समाजवादी प्राध्यापक-नवरा मात्र या विवाहाच्या बाजूनं आहे. त्याला हे लग्न अगदी क्रांतिकारक वगैरे वाटतं. लग्नानंतर मुलीचे हाल होतात आणि आईची भीती बरोबर ठरते. तरीही प्राध्यापक-नवरा एका समारंभात आपल्या जावयाची बाजू उचलून धरण्याचा मोठेपणा दाखवतो, आणि आपला नवरा कसा थोर कवी असून समाजानं व आपल्या आईनं त्याला पुरतं कसं ओळखलं नाही, असं, त्याच्या हातचा रोज मार खाणारी मुलगी बापाला सुनवत असताना नाटक संपतं.
तसं पाहिलं तर हे नाटक म्हणजे एक चकवा आहे. तेंडुलकर सतत बाजू बदलत आहेत, असं हे नाटक वाचताना वाटत राहतं. दलितपणाचे गोडवे गाण्याच्या प्रचलित फॅशनची दुसरी बाजू सांगणारा, म्हणजे अस्सल तेंडुलकरी असा हा विषय, चूक करणाराही समर्थनीय असू शकतो, हेही सुचवून जाण्याचा प्रयत्न करतो.
तेंडुलकरांनी या नाटकात साचेबद्ध विचार करणार्या समाजवादी व दलित नेत्यांना चांगलंच झोडपलं होतं. अपेक्षेप्रमाणे हे दोन्ही गट बिथरले आणि नाटकावरून वाद सुरू झाला. 'सवर्णांनी दलितांना मुली देऊच नयेत की काय?',अशी ओरड दलित नेत्यांनी केली, तर समाजवाद्यांना त्यांच्या पराकोटीच्या दुराग्रहाचं, दांभिकपणाचं चित्रण आवडलं नाही. सत्तरच्या दशकात समाजवादी व दलित चळवळीच्या विघटनाचं अस्सल चित्र खरंतर तेंडुलकरांनी या नाटकात रेखाटलं होतं. कन्यादानमधील पात्रांवरूनही त्या काळी बरीच चर्चा झाली होती. नाटकातला दलित कवी म्हणजे नामदेव ढसाळ असा अनेकांचा समज होता. एका ब्राह्मण, मराठी लेखिकेच्या मुलीनं दलिताशी लग्न केलं, आणि या घटनेवर आपण हे नाटक रचल्याचं पुढे तेंडुलकरांनी सांगितलं. ( आयुष्यभर हाल सोसूनही मनाचं निर्मळपण कायम राखून डोंगराएवढं मोठं होणार्या बेबीत थोड्या शांताबाई शेळके होत्या, हे याच मुलाखतीत तेंडुलकरांनी सांगितलं होतं.)
कन्यादान रंगमंचावर आलं तेव्हा मुलीची म्हणजे ज्योतीची भूमिका केली होती सुषमा तेंडुलकरांनी, तर समाजवादी विचारसरणीच्या पित्याची भूमिका केली होती डॉ. श्रीराम लागू यांनी. आईच्या भूमिकेत होत्या श्रीमती सुहास जोशी . दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्यमहाविद्यालयातून प्रशिक्षण घेतलेल्या सुहासताईंनी आपल्या अभिनयानं असंख्य नाटकं, चित्रपट व दूरदर्शन मलिका गाजवल्या आहेत. एक अतिशय बुद्धिमान अभिनेत्री अशी त्यांची ओळख आहे. श्रीमती सुहास जोशी यांचं हे मनोगत...
त्र्याऐंशी साल असावं बहुधा. एका सकाळी मला सदाशिव अमरापूरकरचा फोन आला की, आय.एन.टीतर्फे विजय तेंडुलकरांचं कन्यादान हे नाटक करायचं ठरलं आहे. नाटकाचं स्क्रिप्ट पाठवून देतो, त्यातली आईची भूमिका तुम्ही करायची आहे. म्हटलं, ठीक आहे, स्क्रिप्ट वाचून काय ते सांगते.
मला खूप आनंद झाला होता. विजय तेंडुलकर ! दिल्लीला नाट्यमहाविद्यालयात शिकत असताना मराठीतलं सर्वांत जास्त दबदबा असलेलं नाव. रंगायनसारखी संस्था उभी राहिली ती ज्यांच्या नाटकांनी, ते तेंडुलकर, ते रंगायन, ज्याने मराठी रंगभूमीचा चेहरामोहराच बदलून टाकला. दिल्लीच्या अभ्यासक्रमात शांतता... होतंच. या निमित्ताने तेंडुलकरांची जवळजवळ सगळी नाटकं वाचली होती. पुण्याला फर्गसनमध्ये असताना पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत तेंडुलकरांच्या पाचसहा एकांकिका तरी असायच्याच. कॉलेजतफे ओळख, काळोख केल्या होत्या. चार दिवस तर दिल्लीला कितीतरी विद्यार्थी-दिग्दर्शकांनी केली होती. रात्र वाचून वाटलं होतं, हो असू दे हा रेडिओ-प्ले, पण आपल्याला ही एकांकिका स्टेजवर करायला मिळायला हवी. ती इच्छा अपूरीच राहिली. बहात्तर साली मी व्यावसायिक मराठी रंगभूमीवर काम करू लागले, पण तेंडुलकरांच्या नाटकात काम करण्याचा योग काही येत नव्हता. तो हा असा अचानक आल्यामुळे मी खूष होते. दिल्लीला परदेशी नाटककारांची नाटकं केली तेव्हा मराठी रंगभूमी अजून मेलोड्रामामध्ये अडकून बसली आहे, असं वाटायचं. व्यावसायिक कामं करायला लागल्यावर जरी मेलोड्रमॅटिक असलं तरी मराठी रंगभूमीची तीच गरज आहे हेही कळत होतं. पण त्यातल्या त्यात चांगल्या नाटकांची निवड मी करत होते. ती नाटकं वाईट होती, असं नव्हे - पण तेंडुलकरी नव्हती. तेंडुलकर प्रत्येक नाटकात एक नवीन धक्का देऊन जात. त्यांच्या भाषेची तर मला फारच मोहिनी पडली होती. साधी, सरळ भाषा. पण प्रत्येक नाटकामधून त्या भूमिकेच्या खूप खूप खोल मनात शिरून काहीतरी ग्रेट बाहेर येई, ते फार भावत होतं. कन्यादान हे नाटक नावावरून कसं कौटुंबिक जिव्हाळ्याचं वाटतं. पण ते स्क्रिप्ट मी वाचलं अगदी एका बैठकीतच. कारण त्या नाटकानं मला जागचं हलूच दिलं नाही. माझ्या माहेरच्या सनातनी वातावरणामुळे, किंवा राजकारणापासून एकंदर खूप दूरच राहायच्या पद्धतीमुळे, मला सेवादलाबद्दल फारशी माहिती नव्हती. पण कसं कोण जाणे, नाटक वाचतानाच नाथ देवळालीकरांच्या जागी ग. प्र. प्रधान दिसायला लागले. सेवाच्या जागी अनुताई लिमये दिसायला लागल्या.
नाटक वाचून झाल्यावर डोकं कसं बधीर झालं होतं - एका स्वप्नवादाचा वास्तववादाने केलेला पराभव. खणखणीत सत्य ! नाटक आवडलं होतंच. पण मला माझ्या सत्याकडेही पाहणं गरजेचं होतं. पहिला विचार आला की तेंडुलकरांच्या सर्व तरुण नायिका सोडून आपल्या वाट्याला ही म्हातारीच का यावी? ज्योतीएवढी मी तरुण नसले, तरी सेवाएवढी म्हातारी पण नव्हते. दुसरा स्वार्थी विचार असा आला की इथे एकदा आईची भूमिका केली की आपल्यावर आईचाच शिक्का ! कोणी नंतर नायिकेच्या भूमिकेत घेणार नाही.
गोंधळलेल्या अवस्थेत असतानाच मला तेंडुलकरांची एक जुनी आठवण आली. संगीत नाटक अकादमीतर्फे एक बरंच मोठ्ठं संमेलन होतं. तेंडुलकर, गिरीश कर्नाड, बादल सरकार वगैरे बरेच बडेबडे लेखक उपस्थित होते. मला अंधुक आठवतं, विषय होता 'लोककलेचा आधुनिक नाटकांवर झालेला परिणाम'. चर्चा चालू होती. बरंचसं माझ्या डोक्यावरून जात होतं. सरकार, कर्नाड वगैरे आपआपल्या नाटकांवर बोलले आणि मग गाडी तेंडुलकरांच्या अशी पाखरे, सरी ग सरी या नाटकांवर आली. इकडून तिकडून पाच-दहा प्रश्नांची खैरात झाली, आणि फोकस तेंडुलकरांवर आला. तेंडुलकर गप्प ! विचित्र शांततेत एकदोन मिनिटं गेली आणि शेजारी बसलेल्या अरविंद देशपांड्यांनी बोलायला सुरुवात केली. देशपांडे काय बोलत होते त्याकडे माझं लक्षच नव्हतं. नाटकांवर चर्चा जरूर व्हायला हव्यात. पण मला स्वत:ला कधीही अशा चर्चांत बोलता येत नाही. नाटक प्रत्यक्ष करणं यावर माझा भर. तेंडुलकरांना गप्प बसलेलं पाहून मला मनातून खरंच बरं वाटत होतं. ही चर्चा संपल्यावर तथाकथित भारतीय रंगभूमीला आपणच तगवून धरणार, अशी भावना असणार्या स्कूलमधल्या मंडळींमध्ये एकच कल्लोळ उडाला. त्याचा मराठी तर्जुमा साधारण असा - 'असा कसा हा माणूस? काहीच कसं बोलू शकत नाही?' वगैरे. मला खरंच मनापासून वाटत होतं की त्यांना जे सांगायचं आहे ते त्यांच्या नाटकांत मांडलंय त्यांनी. आता त्याची जी काय चिरफाड करायची ती बाकीच्यांनी करावी. तेंडुलकरांचं त्या दिवशीचं ते गप्प बसणं माझ्या मनात खोलवर जाऊन बसलं होतं. आणि आज आपणहून त्यांचं आलेलं नाटक, करावं की नाही या संभ्रमात मी होते. माझी अस्वस्थता वाढत होती. आणि सुभाषला (श्री. जोशी) माझा गोंधळच उमजत नव्हता. त्याचं म्हणणं होतं - 'नाटक उत्तम आहे, ते करायलाच पाहिजेस तू.' तरीही माझा निर्णय होईना, तेव्हा त्याने एक गुगली टाकला. 'हे बघ, सध्या बहुतेक नाटकांमध्ये, टिव्हीवर ज्या बायका म्हातार्यांचं काम करतात, त्या सर्व विजयाबाईंची नक्कल करतात. तुला वेगळं नाही काही करता येणार?' हा बाण मात्र वर्मी बसला आणि तालमी सुरू झाल्या.
कन्यादान हे तसं कौटुंबिक नाटक. पण त्यातल्या संघर्षामुळे ते एका विशिष्ट, वेगळ्याच स्तरावर जाऊन पोहोचतं. हा संघर्ष तुमच्याआमच्या कुटुंबापुरता मर्यादित राहत नाही. त्यात नाटकाचं लिखाण असं की तालमी सुरू झाल्यावर प्रत्येकजण अगदी सहजरीत्या त्या त्या भूमिकेत शिरत असे. प्रत्येक पात्राचे संवाद त्या पात्राचा विशिष्ट र्हिदम दाखवत असल्यामुळे नटांकडून नैसर्गिकरीत्याच तो उचलला जात असे ! त्यात पुन्हा कंसातील स्वच्छ सूचना !
सेवा आणि नाथ देवळालीकर आणि त्यांची दोन मुलं यांत 'बाप व मुलगी' आणि 'आई व मुलगा' अशा सरळ दोन फळ्या दिसतात. मुलगी बापासारखीच आदर्शवादी आणि स्वप्नाळू आहे, तर आई आणि मुलगा आदर्शवाद संभाळूनही व्यवहारी आहेत. ज्योती, म्हणजे देवळालीकरांची मुलगी, अरुण आठवले या तरुणाशी लग्न करायचं ठरवते. अरुण आठवले दलित आहे. नाथ आणि अरुण दोघंही आपआपल्या परीनं ढोंगीच आहेत. मुलगी दलित मुलाशी लग्न करते आहे म्हटल्यावर नाथ इतका खूष आहे की, तो बाकी सारासार विचार करतच नाही. नाथला हे लग्न सामाजिकदृष्ट्या अत्यंत आदर्श वाटतं. आपण स्वत: घरातूनच कशी सामाजिक सुधारणा करतो आहोत, हे जगाला दाखवण्यातच तो मग्न आहे. इकडे अरुण आठवले स्वत:च्या दलितपणाचं भांडवल करून बसला आहे. या लग्नाला आई विरोध करते पण मुलगा पाठिंबा देतो. या नाटकावर जेव्हा गदारोळ उठला तेव्हा अरुण आठवलेला सर्व दलितांचं प्रतिनिधित्व देण्यात आलं. खरं पाहता सेवाचा विरोध हा त्याच्या दलितपणाला नसून त्याच्या आर्थिक अस्थैर्याला आहे. तिच्यातला व्यवहारीपणा अरुणची वागणूक आणि भणंगपणा पाहतो, तेव्हाच आपली मुलगी स्वप्नाळूपणे एका खाईत उडी मारते आहे, याची तिला जाणीव होते. समजा हा अरुण दलित असूनही एखाद्या मंत्र्याचा किंवा कारखानदाराचा वगैरे मुलगा असता तर सेवाने हा विरोध केला नसता ! तिच्या कामानिमित्ताने तिनं आजुबाजूचं जग पाहिलेलं आहे. मुलीला किमान स्थैर्य मिळावं अशी अपेक्षा इतर कुठल्याही आईप्रमाणे ती करणारच. अरुणवरचा तिचा सगळा राग त्याच्या भणंगपणावर व दलितपणाचं भांडवल करण्यावरच आहे. नाथ देवळालीकर मात्र या तळागाळातल्या माणसांना आपण इतपत सूट दिलीच पाहिजे असं म्हणत मुलीच्या लग्नाला पाठिंबा देतो. नाटकाचा पहिला अंक इथे संपतो.
दुसर्या अंकातली दु:खात्मिका सुरू होण्यापूर्वी एकदा गंमत म्हणून सेवाच्या भूमिकेचा विचार करताना दोन अंकांमधलं हे लग्न कसं झालं असेल असा विचार करत होते. आणि मला चक्क दिसलं की ज्योती तर भारावलेलीच असणार, पण नाथ तिच्याहीपेक्षा खूष असणार. दुसर्या अंकात सेवाच्या तोंडी वाक्यच आहे की, 'स्वत:च्या लग्नात नाचला नसशील इतका नाचत होतास तू त्या लग्नात.' पण सेवा मात्र हॉलच्या एका कोपर्यात उभी राहून अत्यंत तटस्थ्पणे - तिला हे लग्न आवडलेलं नाही हे चेहर्यावर स्पष्ट दाखवत - उभी असणार.
नाटकाच्या तालमी सुरू झाल्यावर सुषमा तेंडुलकरला मी म्हटलं, 'एकदा तुझ्या बाबांना भेटता येईल का?' ती लगेच म्हणाली, 'हो, त्यात काय, उद्याच जाऊ आपण तालीम सुरू व्हायच्या आधी.' मग आम्ही दादरला एका हॉटेलवर, जिथे त्यांचं दुसरं काही लिखाण चालू होतं, तिथं गेलो. समाजवादी घरांबद्दल त्यांनी अत्यंत मोकळेपणाने माहिती सांगितली : समाजवाद्यांची बरीचशी लग्नं पक्षच ठरवत असे. तसंच हे असणार. घरात संपूर्ण मोकळं वातावरण. मुलं मुलींचीही कामं करतात. मुली मुलांचीही कामं करतात. घरात प्रत्येकाला मतस्वातंत्र्य, नवर्याला 'अरे-तुरे' करणं, आईवडील, भावांवर आंधळं प्रेम नसणं, वगैरे. छान गप्पा झाल्या. अशी एखादी बाई सांगा, जिचा रोलसाठी उपयोग करून घेता येईल, असं मी म्हटल्यावर त्यांनी सुषमाला माझी व सुधा वर्द्यांची भेट घालून दे, म्हणून सांगितलं. दुर्दैवानं माझी आणि सुधाताईंची भेट कधी झालीच नाही. पण एक बरं झालं. सुधाताईंची आंधळी नक्कल टळली. सेवाच्या स्वभावाच्या दोनतीन वेगळ्याच बायका मला आढळल्या. त्या सगळ्यांची मिळून मी सेवा साकार केली.
ही सेवाची भूमिका करताना माझ्यातली सुहास मी बरीच हरवून बसले होते. सेवाचा स्वभाव आणि माझा स्वभाव म्हणजे दोन टोकं. आनंदीगोपाळमधली आनंदी किंवा बॅरिस्टरमधली राधाक्का त्यामानाने मला जवळच्या, या दोघी घाबरट, मुळूमुळू रडणार्या, तर सेवा मात्र विचारी, शांतपणे विचार करून बोलणारी, संयमी, आत्मविश्वास असलेली अशी. ती साकारताना माझ्याच स्वभावातले अनेक दोष मला समजू लागले. तालमींमध्ये जसजशी सेवा मला समजायला लागली तशी त्या भूमिकेच्या प्रेमात पडून मी सेवामय होत गेले. आत्मविश्वासाच्या बाबतीत माझं पारडं बरंच खाली. त्यामुळे आपल्यात जे नाही ते साकारायला मिळतंय, याचा आनंद होत होता. अगदी डॉ. लागूंसमोर असताना - एकंदरीत त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे, बुद्धिमत्तेमुळे, अफाट अभिनयक्षमतेमुळे सुहास घाबरून जायची, पण सेवा नाही घाबरायची.
मी सेवा कशी झाले बरं? मागे म्हटल्याप्रमाणे तशा स्वभावाच्या दोनचार बायका मला निरीक्षणाला मिळाल्याच होत्या. ही बाई रोज खादीच्या साड्या नेसणार हे तर उघडच होतं. मंगळसूत्र घालेल, पण बांगड्या घालणार नाही असं मला वाटलं. त्यामुळे हाताची जेश्चर्स खूप मोठी असतील असंही वाटलं. आनंदी, राधाक्का किंवा अग्निपंखमधली बाईसाहेब हातांच्या हालचाली ठरावीक आणि बेताच्या करतील, पण सेवाचा मोकळेपणा तिच्या हातांतून दाखवावा असं वाटलं. त्याचप्रमाणे विचार करताना काही ठरावीक वेळेला तिला केसाच्या भांगातून हात फिरवण्याची सवय असेल असं वाटून सेवाला ती एक लकब मी दिली होती. सेवाचं वय पन्नासच्या आसपास आहे म्हटल्यावर तिला सायटिका असावा, असं मला दिसलं. (चष्माही घातला.) त्यामुळे सुहासची नेहमीची चाल बदलून तिला सेवाचा र्हिदम मिळाला. आयुष्यभर साधेपणाने राहिल्याच्या या खुणा वाटल्या. एस.टी.तून प्रवास केला असल्यामुळे सायटिका अगदी चपखल बसला. (नाथसुद्धा व्याख्यानाला एस.टी.नेच निघाला होता ना? ) आता आवाजाच्या बाबतीत. सेवाचं वय दाखवायला नेहमीच्या आवाजापेक्षा दोन सूर कमी आवाज लावावा, असं वाटलं, जो राधाक्कासाठी मी चार सूर उंचच नेला होता. एकदा हा सूर सापडल्यावर तेंडुलकरांची वाक्यं त्यात बरोब्बर सेवामय होत गेली. माझं एरवीचं बोलणं कॅज्युअल असलं तरी नाटकात मी जरा जास्तच स्पष्ट बोलते. प्रत्येक वाक्याचा अर्थ प्रेक्षकापर्यंत पोचावा ही इच्छा त्यात असते. पण सेवाच्या बाबतीत तिच्या घरचे ब्राह्मणी संस्कार अधिक सेवादलाचे संस्कार, म्हणून सर्वच बोलणं जास्त स्पष्ट ठेवलं होतं. त्यातूनच स्पष्ट आणि निर्भीड स्वभावही दाखवता येत होता.
सबंध नाटकात नवर्याच्या बरोबरीनं काम करणारी, वेळी त्याला त्याची चूक दाखवणारी, मुलीच्या हट्टानंतर हतबल झालेली, मुलीच्या लग्नानंतर पोटच्या प्रेमामुळेच मुलीशी भांडणारी अगतिक आई, मुलाने चूक समजावल्यानंतरही आईपण न विसरू शकणारी, शेवटी स्वभावाविरुद्ध खोटं बोलून नवर्यावर प्रेम करणारी ही मनस्वी स्त्री तेंडुलकरांनी त्यांच्या संवादांतून मला आपोआप दिली. सेवाबद्दल विचार करताना वाटतं की, तिचे इतर नातेसंबंध पाहता ही बाई दोन वेगळ्या व्यक्तिमत्त्वांची आहे. घराबाहेर सेवादलाचं काम धडाडीनं करणारी, त्यांची मूल्यं मानणारी, जपणारी सेवा घरात मुलांच्या बाबतीत मात्र कमालीची हळवी आहे. शिक्षणामुळे, बाहेर काम केल्यामुळे तिची स्वत:ची ठाम मतं आहेत. त्यांचं ती आग्रहाने प्रतिपादनही करते. पण आई म्हणून ती खरोखरी आईच आहे. मुलीला तिचा नवरा मारतो म्हटल्यावर हमसून रडणारी सेवा, त्याच मुलीला, हे तू सगळं टाळू शकली असतीस, असंही सुचवते. मुलीसाठी स्वत:च्या नवर्याला आग्रहाने त्या व्याख्यानाला पाठवणारी सेवा, तितक्याच कठोरपणे, हे सगळं तू ओढवून घेतलं आहे, हेही सांगते. तसंच नव्या नीतिनियमांबद्दल मुलगा समजावून सांगतो, तेव्हा त्याला, तुझं सगळं खरं आहे, पण तुला मुलगी झाली आणि ती मोठी झाली कीच तुला माझी अवस्था कळेल, हे सांगते. अशी ही दुहेरी पेडाची व्यक्तिरेखा रंगवणं माझ्यातल्या अभिनेत्रीला एक आव्हानच होतं.
या नाटकाच्या तालमी इतर व्यावसायिक नाटकांच्या मानाने फार वेगळ्या झाल्या. डॉ. लागू चित्रीकरणात व्यस्त होते. ते संध्याकाळी सहाच्या पुढे येत. कधी कधी आठ-दहा दिवस मुंबईबाहेरही असत. अमरापूरकरांचं अर्धसत्यचं चित्रीकरणही त्याच काळात होतं, त्यामुळे नीट तालमी व्हाव्यात म्हणून मुद्दाम जवळजवळ अडीच महिने ठेवले होते. बाबुलनाथला आय. एन. टी.च्या वर्कशॉपमध्येच तालमी होत. खूप मोठी जागा होती. तेथे सर्व सेट मांडलेला असे. तिथेच गोडाउन असल्यामुळे बारीकसारीक प्रॉपर्टीसुद्धा पहिल्या दिवसापासून वापरायला मिळाली. प्रॉपर्टी वापरताना ती वस्तू आपल्या हातून इतकी हाताळली गेली पाहिजे की त्या वस्तूचं नवखेपण उरता कामा नये. ही संधी या नाटकानं भरपूर दिली. साधा टेलिफोन बघ ना. मायमिंग करून तालमी करायच्या आणि रंगीत तालमीला खरा टेलिफोन मिळायचा ही खरी पद्धत ! पण पहिल्यापासून टेलिफोन मिळाल्यामुळे किती बारीकसारीक गोष्टी भरता आल्या. एकदा तालमीत टेलिफोनची वायर अडकली. तालीम न थांबवता तशीच ती वायर सोडवत मी बोलत राहिले. आणि ती अॅक्शन माझी मलाच इतकी आवडली की दर प्रयोगाला मी ती करत असे. तीच गोष्ट चष्म्याची. चष्मा घालायचा कधी, काढायचा कधी ते तालमीतच बसवलं गेलं. रडू आल्यावर चष्मा काढायचा, तो पुसून घालायचा वगैरेसुद्धा. सदाशीवनं आम्हां सर्वांना स्वत:ला सुचलेल्या गोष्टीसुद्धा अत्यंत प्रेमाने स्वीकारल्या, हे महत्त्वाचं. कारण खरा रिंगमास्तर तो. त्याला एखादी गोष्ट पटली नाही तर ती आम्ही बदलत असू. सबंध नाटकात पाचच पात्रं आणि तालमीला भरपूर वेळ. यामुळे अॅक्शन्स आणि त्याहूनही महत्त्वाच्या रिअॅक्शन्स तालमीतच बसवल्या गेल्या. त्यांत प्रयोग चालू झाल्यावर एकमेकांच्या संमतीने छान भरतकाम करता आलं. नाटक बसत असताना मी विजयाबाईंसारखी म्हातारी करायची नाही, हे ठरवून वेगळाच आराखडा ठेवला होता. सतीश आळेकरसारखा नाटकवेडा नाटक पाहून मला म्हणाला होता, 'अभिनंदन. विजयाबाईंपेक्षा पूर्ण वेगळी म्हातारी दाखवल्याबद्दल !'
या नाटकाच्या निमित्तानं एक आणखी नवाच अनुभव मला मिळाला. तो म्हणजे शेवटची दोन मिनिटं सोडता या सबंध नाटकात कुठेही पार्श्वसंगीत वापरलेलं नाही. अनंत अमेंबल तालमींना येतही होते. पण सदाशिवचं म्हणणं होतं, पाहिजेच कशाला संगीत? मला आपलं नामावली सांगताना, पडदा उघडताना जरा टुंई टुंई ऐकायची सवय. अजिबात संगीत नको म्हटल्यावर मी सदाशिववर उगीचच नाराज होते. पण प्रयोग करताना जाणवलं की खरंच या नाटकात संगीत नाही, असं कुठेही जाणवत नाही. अगदी अंकाचा पडदा पडतानासुद्धा. नाटकाच्या अंकाच्या शेवटी असलेला संघर्षच इतके विविध सूर पसरवतो की वेगळी संगीताची गरजच भासू नये.
या नाटकाच्या एका प्रयोगाची आठवण मी कधीही विसरणार नाही. नाशिकचं टकले यांचं ग्रीन-व्ह्यू हॉटेल. एका हॉलमध्ये जुजबी प्रॉपर्टी आणि फर्निचर. प्रेक्षक एकटे तात्यासाहेब शिरवाडकर. भन्नाट रंगला हा प्रयोग. कन्यादानचे आम्ही जवळजवळ १५० प्रयोग केले, त्यांतला हा सर्वोत्कृष्ट प्रयोग.
या नाटकाचे परत प्रयोग करायला मला नक्की आवडेल. पहिल्या प्रयोगाला सदाशिवनं जसं नाटक बसवलं होतं तसाच प्रयोग आज करता आला तर बहार येईल.
ह्या प्रयोगाची VCD/DVD मिळते
ह्या प्रयोगाची VCD/DVD मिळते का रे ?
खजिना आहे चिनुक्सच्या
खजिना आहे चिनुक्सच्या पोतडीत.
तो एक एक रत्ने आपल्यासाठी बाहेर काढतोय दाखवण्यासाठी.
आवडली बातचीत.
असामी, या नाटकाचं चित्रीकरण
असामी,
या नाटकाचं चित्रीकरण उपलब्ध नाही. दूरदर्शनने या नाटकाचं चित्रीकरण करून ठेवलं होतं. पण मुंबई केंद्रावर archivingची सोय नाही. पूर्वी ज्या टेप मिळत त्याच पुसून नवं चित्रीकरण करण्याची पद्धत होती. 'कन्यादान'चं चित्रीकरणही असंच पुसलं गेलं.
लागु तरुण दिसतायेत इत्त.
लागु तरुण दिसतायेत इत्त.
हा भागही आवडला. ही दोन
हा भागही आवडला.
ही दोन आत्मचरित्र वाचली पाहीजेत आता.
स्वातंत्र्य व समतेच्या गप्पा मारणारे काही समाजवादी नेते खाजगी आयुष्यात कसे संकुचित विचारसरणीचे होते हे सुधाताईंच्या या आत्मचरित्रातून ठळकपणे समोर येतं. समाजवादी साथी व नवरा या दोन्ही भूमिका वठवणारी व्यक्ती एकच असली तरी या दोन्ही भूमिकांमधल्या तिच्या वागणुकीत फार मोठा फरक असतो, हे सुधाताईंनी लिहून ठेवलंय. >>>> खरंय. महत्वाचा विचार. नेतेच कशाला एकदा अनेक कवी/लेखक/नट वगैरेंनी तेच केलय.
वाह मस्त रे चिन्मय .. मजा आली
वाह मस्त रे चिन्मय .. मजा आली वाचायला. कधी पहायला मिळालं तर चंगळच. सध्या निदान नाटक तरी मिळवून वाचेन.
वा!! सुहास जोशी मला अत्यंत
वा!! सुहास जोशी मला अत्यंत आवडणारी अभिनेत्री.. निव्वळ आवाजाच्या फेकीनं लक्ष वेधून घेणारी.. ह्या नाटकाबद्दल माहित नव्हतं.. त्यांचं मनोगत आवडलं.. धन्यवाद चिनूक्सा..
मस्त वाटलं वाचुन. धन्यवाद
मस्त वाटलं वाचुन. धन्यवाद चिनुक्स.
सुहास जोशी हे नाव वाचून इथे
सुहास जोशी हे नाव वाचून इथे आले. सध्या झीवर चालू असलेल्या 'कुंकू' मधली त्यांनी साकारलेली आत्याबाई नुसती जाता-येता नजरेस पडली तरी तिळपापड होतो पण स्टार प्रवाहवरच्या अग्निहोत्रमधली त्यांची प्रभामामी खूप आवडते. म्हणूनच त्यांच्याबद्दल वाचायला इथे आले. एखाद्या भूमिकेचा कसा अभ्यास करतात हे पाट्या टाकणार्या आजकालच्या टीव्ही-मालिका फेम नटनट्यांनी वाचायला हवं. माध्यमाची गरज नसेलही ती कदाचित. पण तेच लोक अनेक मालिकात तोच अभिनय करताना पाहून वैताग येतो. चिनुक्स, धन्यवाद, हे आमच्यापर्यत पोचवल्याबद्दल!
धन्यवाद चिनुक्स .सुहास जोशी
धन्यवाद चिनुक्स .सुहास जोशी बद्दल वाचायला फार आवडल .
अनेक धन्यवाद चिनुक्स.
अनेक धन्यवाद चिनुक्स. कन्यादान साहित्यसंघात (गिरगाव) पाहिल होत.अजुनहि आठवतय, नाटक संपल्यावर सुन्न मनःस्थितीत बाहेर पडले होते. लग्नानंतर ज्योतीने केलेला व्हय म्हारीन हाय मी म्हारीन आक्रोश अजुनहि कानात घोळतोय. सगळच जबरदस्त होत.
सुहास जोशींचे एक संगीत नाटक
सुहास जोशींचे एक संगीत नाटक पाहिल्याचे आठवतय. संशयकल्लोळ का?
मस्त चिनुक्स.
मस्त चिनुक्स.
वाह !
वाह !
मस्त ले़ख! सुहास जोशी
मस्त ले़ख! सुहास जोशी "सातच्या आत घरात" मध्ये त्यांची छोटीशीच पण छान भुमिका होती.... निरांजनाच्या ज्योतीवर सिगारेट पेटवणार्या मुलाला "झापतानाचा"(हा माझा शब्द ;)) प्रसंग खुप पट्लेला आणि आवडता..
btw कोणाला माहीत असल्यास नाटकात पुढे काय होतं ते लिहा ना pls ..
सुहास जोशींची बहुतेक सर्व
सुहास जोशींची बहुतेक सर्व नाटके मी बघितली आहेत. बॅरीष्टर (सोबत विक्रम गोखले, विजया मेहता ),
आनंदी गोपाळ ( सोबत डॉ कशिनाथ घाणेकर ) चूक भूल द्यावी घ्यावी ( सोबत दिलीप प्रभावळकर निर्मिती सावंत ) किरवंत ( सोबत डॉ लागू ) आत्मकथा ( सोबत डॉ लागू, शुभांगी संगवई आणि ज्योति म्हापसेकर ) डॉक्टर तूम्हीसुद्धा ( सोबत महेश मांजरेकर ) सख्खे शेजारी ( सोबत अरुण जोगळेकर ) अशा अनेक नाटकांबद्द्ल त्याना बोलते करायला पाहिजे. त्यानी, श्रीकृपेकरुन असा एक जवळजवळ एकपात्री प्रयोग केला होता ( जवळजवळम्हणायचे कारण त्यात त्यांचा मुलगा छोट्या भुमिकेत होता )
नवीन मालिका मी बघितल्या नाहीत, पण स्मृतिचित्रे मधे तरुण लक्ष्मीबाई टिळकांची भुमिका त्यानी केली होती.
हि मुलाखत फ़ार चुट्पूट लावून गेली.
दिनेश स्वरबहार विश्वनाथ बागूल
दिनेश स्वरबहार विश्वनाथ बागूल यांच्या बरोबर त्यानी संशय्कल्लोळ मध्ये काम केले असल्याचा मला संशय आहे.
मस्त आहे हा भाग पण !!
मस्त आहे हा भाग पण !!
मस्तच मुलाखत एकदम. धन्यवाद
मस्तच मुलाखत एकदम.
धन्यवाद चिनूक्स
रॉबीन, मी संशयकल्लोळ चे बरेच
रॉबीन, मी संशयकल्लोळ चे बरेच प्रयोग बघितले, पण हा आठवत नाही. माझ्या माहितीप्रमाणे त्यानी नृत्य गायनाचे प्रशिक्षण घेतले आहे, पण तशी भुमिका मी नाही बघितली. मी बघितल्या त्यापेक्षा त्यानी बर्याच नाटकात भुमिका केल्या. त्या आणि रोहिणी हट्टंगडी एकाचवेळी नाट्यशिक्षण घेत होत्या, बहुतेक. त्या दोघीनी विविध भुमिका केल्या, आपणच करंटे, ती नाटके आपण चालू दिली नाहीत.
वा! मस्त.
वा! मस्त.
खूप छान! अजून वाचायला आवडेल.
खूप छान! अजून वाचायला आवडेल.
मस्त! सुहास जोशींचे मनोगत
मस्त! सुहास जोशींचे मनोगत आवडला. सुरेख ओळख करून दिली आहेस .
धन्यवाद