मी मोती तलाव बोलतोय...

Submitted by डी मृणालिनी on 17 March, 2019 - 04:47

प्रबुध्द जनहो !

आजच्या या धकाधकीच्या जीवनात कोणालाही कोणाची साद ऐकू येत नाही. याची मला कल्पना आहे. पण मला खात्री आहे कि तुम्ही माझ्या सादेला नक्कीच प्रतिसाद द्याल. कारण मी तुमचा लाडका मोती तलाव बोलतोय.... माझ्या अथांग पसरलेल्या निळ्याशार पाण्यामध्ये जेव्हा सूर्यकिरणांचा स्पर्श होतो ,तेव्हा चमकणारं हे पाणी विखुरलेल्या हिऱ्या-मोत्यांसारखचं दिसतं आणि म्हणून 'मोती' हे नाव मला अगदी साजेसं आहे. ३१ एकरमध्ये पसरलेल्या माझ्या शुद्ध आणि निर्मळ पाण्याच्या चहूबाजूंनी वसलेलं शहर म्हणजेच सुंदरवाडी. जणू परमेश्वराला पहाटे पडलेलं एक स्वप्नचं ! सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या या शहराचं ,नावाप्रमाणेच रुपही अगदी सुंदरच आहे. पूर्वी सावंत या राजघराण्याचं हे एक संस्थान होतं.या राजघराण्यात होऊन गेलेले सर्व राजे-महाराजे हे अतिशय थोर,प्रामाणिक व न्यायप्रिय होते. 'प्रजा सुखी तरच राजा सुखी' या विचाराने सावंत राजघराण्यातील व्यक्तींनी आपली कर्तव्ये निष्ठेने पार पडली. १६९२ साली खेमसावंत दुसरे यांनी सुंदरवाडी शहर हे राजधानी असल्याचे घोषित करून येथे विद्यमान राजवाड्याची उभारणी केली. कालांतराने सुंदरवाडीचं नामकरण सावंतवाडी करण्यात आलं. याआधी सुंदरवाडी ही चराठा या गावाची एक छोटीशी वाडी होती. राजधानी घोषित झाल्यावर मात्र या वाडीला महत्व प्राप्त झालं. आणि याच काळात माझा जन्म झाला. माझ्या अस्तित्वाने सुंदरवाडीचे सौंदर्य द्विगुणित झाले. सुंदरवाडी जणू इंद्रप्रस्थच वाटू लागली. दक्षिणेला व पूर्वेला असलेल्या दोन वहाळांना दगड-विटांचा बांध घालून माझी उभारणी करण्यात आली. भौगोलिकदृष्ट्या माझी उभारणी शहराच्या बरोब्बर मध्यभागी करण्यात आली. यामुळे सावंतवाडी आज एक peripheral city चे उत्तम उदाहरण आहे. पुढे १८८ वर्ष हा दगड-विटांचा बांध भक्कमपणे उभा होता. मात्र १८७४ साली इंद्रदेवाने सुंदरवाडीवर जरा जास्तच कृपा केली आणि त्यामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे हा बांध कमकुवत झाला. म्हणून १८७५ साली रघुराम महाराजांच्या नेतृत्वाखाली हा बांध पाडून नवीन काळ्या दगडांचा बांध घातला. तसेच माझ्या पाण्यातला कचरा वेळोवेळी साफ व्हावा यासाठी सावंतवाडीच्या महाराजांनी कारागृहातील कैद्यांची नेमणूक केली. कैद्यांमध्ये श्रमसंस्कार येणे हा यामागचा मूळ उद्देश होता. या सर्व घटनांचा उल्लेख १८८५ च्या गॅझेटियर बॉम्बे प्रेसिडेंसि खंड-१० मध्ये आहे. काळ्या दगडांचा बांध घालताना त्यात अनेक शिंपले सापडले. त्यावरून माझे नाव 'मोती तलाव' असे ठेवण्यात आले. तिन्ही बाजूंनी उभ्या असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतावरून पावसाळ्यात येणारे पाणी मी माझ्यात सामावून घेतो आणि त्यामुळे सुंदरवाडी ही सदैव हिरवे वस्त्र नेसलेल्या नववधूसारखी खुलून दिसते. माझ्या पश्चिमेला उभा असलेला विशाल, दैदिप्यमान नरेंद्र डोंगर माझं आणि माझ्या सुंदरवाडीचं जणू रक्षण करतोय असचं वाटतं. माझ्यालगतचा राजवाडा परिसर सुरुच्या झाडांनी वेढलेला आहे. या वृक्षवल्लीतून जेव्हा वारा सुसाट धावतो ,तेव्हा होणारी पानांची सळसळ आणि भुईवर पसरलेला सुरुच्या पानांचा गालिचा. हे दृश्य फारचं मोहक असतं. सावंतवाडीकरांची संध्याकाळ ही नेहमी माझ्या सहवासात असते. यावेळी माझ्या काठावर न बसलेला असा सावंतवाडीकर तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. मराठी साहित्यातील कविवर्य केशवसुत , वसंत सावंत यासारख्या महान व्यक्तींनाही माझ्या या अलौकिक सौंदर्याने भुरळ घातली आहे. माझ्याकाठी असलेल्या डेरेदार आंब्याच्या झाडाखाली बसून कवी.केशवसुत यांनी 'सायंकाळ' ही कविता लिहिली. त्यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आलेली ती तुतारी आजही तुम्हाला माझ्या मध्यभागी असलेल्या पुलावर तेजस्वी सूर्यकिरणात चमकताना दिसेल. महात्मा गांधी,डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा थोर व्यक्तींच्या चरणस्पर्शाने मी आणि माझी सुंदरवाडी पवित्र झालो आहोत. असा प्रदीर्घ आणि रोचक इतिहास मला लाभला आहे. जन्मापासून ते आजपर्यंत माझ्या सुंदरवाडीचा होत असलेला उद्धार बघताना मला फार आनंद होतो. निसर्गाची तर माझ्यावर कृपा आहेच,पण शिवाय ज्यांनी मला घडवलं त्या सावंत राजघराण्यातील सर्व राजे-महाराजे तसेच ज्यांनी मला जपलं त्या सावंतवाडीकरांचा मी अत्यंत कृतज्ञ आहे.
वाडीचा राजा आमचो थोर
सावंत-भोसले कुळी सरकार
रयतेच्या हितास देती थार
तयांच्या ओदार्या नाही पार
तयावरी संतकृपा अनिवार
दुमदुमे किरत प्रितवीचा पार
या शब्दात आमच्या महाराजांचे मी नेहमीच गुणगान गात आलेलो आहे आणि पुढेही असेच गात राहीन. तुम्हा सर्वांकडून मला आजपर्यंत मिळत आलेलं प्रेम,आस्था माझ्यासाठी बहुमूल्य आहे. आशा करतो पुढेही असच मिळत राहील.
तुमचा
मोती तलाव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह्ह्ह... नेहमी गोव्याला किंवा कोकणात जाताना किंवा परत येताना सावंतवाडी आली कि हा तलाव दिसतोच.

3_1522991252t.jpg

किंबहुना सावंतवाडी आली हे ओळखण्याची तीच खुण आहे. पण तलावाबद्दल फारसे माहित नव्हते. त्याचे नाव मोती आहे हे हेसुद्धा माहित नव्हते. या लेखामुळे बरीच माहिती मिळाली. सावंतवाडी विषयी सुद्धा. पुढच्यावेळी तेथून जाताना नक्की लक्षात राहील Happy छान लिहिले आहे.

सावंतवाडीला आर्ट कॉलेजला असताना संध्याकाळच्या वेळी मोती तलाव टाईमपास करायचा कट्टा असायचा !!खूप छान आठवणी दिल्यात सावंतवाडीने.

खेमसावंत हे प्रजेसाठी आदर्श राजे होते पण खेमसावंतांनी शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत त्यांची साथ नाही दिली असं काहीस ऐकल्यामुळे त्यांच्याबद्दलच्या माझ्या मनातल्या आदरास थोडा तडा गेला.
अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. आणि तुमच्या भावनांचा आदर आहेच .