अोढ.....कुठून येते ही?

Submitted by केअशु on 13 February, 2019 - 00:07

इंजिनिअरिंगला असणारा १९ वर्षांचा सुयश इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित माहितीचा चांगला जाणकार समजला जातो.त्यातला किडाच म्हणा ना! ५ वर्षांचा असल्यापासून साध्या ड्रायसेलवर LED बल्ब लावण्यापासून सुरु झालेला प्रवास आता हाय एंड सेरीजच्या बिघडलेल्या म्युझिक सिस्टीम्स लीलया दुरुस्त करण्यापर्यंत येऊन ठेपला आहे.
इलेक्ट्रॉनिक्समधला हवा तो संदर्भ विचारा.पटकन् सांगेल,अगदीच दुर्मिळ असेल तर आंतरजालावरुन झटकन शोधून सांगेल.घरातली वीजेवर चालणारी एकही अशी वस्तू नसेल जी त्यानं खोलून बघितली नसेल.शेकडो खोलल्या,शेकडो दुरुस्त केल्या.त्याबदल्यात काही वेळा अोरडून घ्यावं लागलं,मारही खावा लागला घरच्यांचा,काहीवेळा इजाही झाली.पण पठ्ठ्याने कास सोडली नाही.झोपेचे ६ तास सोडले तर बाकीचे १८ तास हातात आणि मेंदूत फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉनिक्सच!त्याच्या खोलीत गेल्यावर तर एक छोटं वर्कशॉपचं दिसतं आपल्याला.नजर जाईल तिकडे वीजेवर चालणार्‍या वस्तू खोललेल्या!

निनाद आत्ता कुठे १० वर्षांचा आहे.पण जवळपास १७ वाद्ये कुशलतेने वाजवतो.तबला,मृदूंग,बासरी,सॅक्सोफोन असं बरंच काही.घरासमोरच एक संगीतकलेची शिकवणी होती.तिथून वेगवेगळया वाद्यांचे स्वर अगदी सहज ऐकू यायचे.या शिकवणीच्या शेजारच्या घरात एक प्रसिद्ध चित्रकार काका राहतात.ते निनादच्या बाबांचे आणि त्यामुळेच निनादच्याही अोळखीचे पण निनादला चित्रकला काही भावली नाही.भावला तो वाद्यांचा आवाज!
वय बसत नसतानाही हट्टाने शिकवणीच्या सरांच्या मदतीने निरनिराळी वाद्ये वाजवायला शिकला.एवढंच काय तर हेच नाद संगणकावर वापरुन मिक्सिंग करुन नवनवीन आवाज,ध्वनी निर्माण करायला शिकला.अगदी आई बाबांच्या स्मार्टफोनवरही त्यानं निरनिराळ्या वाद्यांच्या अॅप्स घेऊन ठेवल्या आहेत.निनादला पंडीतजींच्या कार्यक्रमासाठी त्यांच्याच आग्रहावरुन तबला वाजवायचाय पण आईबाबा 'इतक्यात नको' म्हणतात म्हणून गप्प बसलाय.पण अधूनमधून पुन्हा पुन्हा विषय काढतोच.शहरातली वाद्यांची दुकानं ही त्याची आवडती ठिकाणं.तिथले काका लोक तर नवीन वाद्य आलं की आधी निनादला कळवतात.तोही लगोलग जाऊन ते वाद्य निरखून,वाजवून येतो.काकांनाही बदल्यात या नवीन वाद्याचा 'परफॉर्मन्स' समजतो.

पहिलीत ही दोन उदाहरणे? या मुलांना केवळ जुजबी आवड नाहीये.चांगली तज्ञ वाटावीत इतपत त्यांची तयारी आहे.अशी बरीचशी उत्कट(पॅशनेट) मुलं/माणसं तुमच्याही पाहण्यात असतील.कोणत्याही उद्देशाविना कुतूहलाने भारावल्यासारखी कणाकणाने आपल्याला भावणार्‍या क्षेत्रातली माहिती गोळा करत असतात.सतत भावणार्‍या विषयाच्या संपर्कातच असतात.

हाच विषय आणि काही प्रश्न घेऊन आलो आहे.

कुठून येते ही विशिष्ट गोष्टीबद्दलची अोढ?आजुबाजूला इतक्या गोष्टी असतानाही विशिष्ट गोष्टीकडेच एखाद्याचं अवधान का जातं? निनादला चित्रकला न भावण्याची कारणं कोणती? सुयशला वाद्य वादनाची आणि निनादला इलेक्ट्रॉनिक्सची आवड का नसावी?

या अोढीमागे कोणती मानसशास्त्रीय कारणं असतात?
अनुवांशिकता हा घटक यात महत्वाची भुमिका बजावतो.पण फक्त अनुवांशिकताच महत्वाची ठरते का? परीणाम करणार्‍या अन्य गोष्टी कोणत्या? या लोकांना सतत आवडीच्या विषयाच्या संपर्कात राहण्याची स्वयंप्रेरणा मिळते तरी कुठून?

दुसरं असं की हे सगळं नैसर्गिक आहे.न मागता मिळालेलं असं आपण म्हणतो.पण हीच अोढ,आवड बाह्य साधनांद्वारा निर्माण करता येईल का?
बाह्य साधने वापरुन निनादला सुयशसारखी इलेक्ट्रॉनिक्सची आवड लावता येईल का? किंवा सुयशमधे बाह्य साधनांद्वारे निनादसारखी वाद्य वादनातली अोढ निर्माण करता येईल का?

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

चांगला विषय आहे . कोणत्याही गोष्टीची आंतरिक ओढ लौकिक ज्ञानातून विशद होईल असं वाटत नाही आणि होत असल्यास का ? ते वाचायला आवडेल...

पण हीच अोढ,आवड बाह्य साधनांद्वारा निर्माण करता येईल का?>>>>> अजिबात नाही. मी तबला विशारद पूर्ण उत्तीर्ण आहे. दहावी पर्यंत सराव चालू असायचा आणि मी बऱ्यापैकी चांगलं वादन करत असे. काही कार्यक्रमातून मी भाग घेतलेला स्थानिक पातळीवर. पण मला त्यात अजिबात ओढ वगैरे नव्हती आणि दहावीचं वर्ष या कारणाखाली मी जो तबला सोडला तर आजपर्यंत त्याला परत हात नाही लावला.