उरण येथे असलेल्या माझ्या माहेरच्या वाडीत ४-५ मोठ मोठी चिंचेची झाड होती. प्रत्येक चिंच वेगवेगळ्या गुणांनी भरलेली. साधारण तीन प्रकार असायचे. एक अतिशय आंबट एक एकदम गोड तर एक जात आंबट गोड. चिंचेची झाडे दिसायलाही हिरवी गर्द खाली भरपूर सावली देणारी.
आमच्या वाडीत राबाच्या शेतावर (म्हणजे तांदुळाचे रोप करण्यापूर्वी पाला टाकून भाजून घ्यायचे शेत) एक उंच बांध होता त्यावर एक अशीच मोठी चिंच होती. ह्या चिंचाही मोठ्या आकोड्याच्या होत्या. अजूनही आठवणीने तोंडाला पाणी सुटत. पाऊस गेला जमीन सुकू लागली की ह्या चिंचेखालच्या बांधाची साफसफाई व्हायची. मग ह्या झाडाखाली गोणता अंथरून अभ्यासाला बसायला मला आवडायचं. हवी हवीशी गार वार्याची झुळुक हलणार्या हिरव्या फांद्यांतून जणू माझ्यावर पंखा फिरवायची. ह्या झाडाची चिंच पिकल्यावर खूप गोड लागे. पिकलेल्या चिंचा पडायची मी वाटच पाहत असायची. पडली रे पडली की सोलून ती चॉकलेटी रसाळ, गोड चिंच तोंडात चघळत चघळत खाणे म्हणजे अहाहा. त्यात गाभोळलेली म्हणजे कच्ची नाही आणि चॉकलेटी झालेली नाही अशी हिरवीच पण पिकायला आलेली अशी मऊ झालेली हिरवी चिंच पडलेली मिळाली की मनातल्या गुदगुल्या जिभेवर यायच्या. ही पिकलेली चिंच इतकी गोड असायची की त्यामुळे तिला तिखट जेवणात वापरता येत नसे. मग ही अशीच शेजार्यांना, नातेवाइकांना वाटून जायची.
एक चिंच आमच्या घराच्या शेजारी होती. ती आंबट गोड, आकारमानाने लहान पण चवीत एक नंबर. हे झाडही माझे लाडके होते कारण ह्याच्या फांद्या आमच्या गच्चीत यायच्या. मग गच्चीतून फांदी पकडून तिचा कोवळा पाला खाणे, केशरी-पिवळी फुलांचा आस्वाद घेणे, नुकत्याच लागलेल्या कोवळ्या चपट्या चिंचा खायला तर मजा यायची. चिंचांनी बाळसे धरले म्हणजे त्यांचे आकोडे झाले की मीठ-मसाल्याची पुडी बांधून गच्चीवर जायचं आणि चिंचा तोडून त्या मीठ-मसाल्याबरोबर खाण म्हणजे खरे चिंचसुख. गच्चीतल्या फांदीवर सहसा पिकण्यासाठी चिंच राहिलेलीच नसे.
साधारण जून मध्ये केशरी-पिवळ्या फुलांचा सडा झाडाखाली पडलेला असायचा. पावसाळ्यात आमच्या ह्या चिंचेला पांढरी फळे लागलीयेत असे वाटायचे. कारण पुष्कळ पांढरे बगळे वळचणीला झाडावर बसलेले असायचे. ह्या झाडाला अजून एक जाड जुड फांदी आडवी गेलेली होती. पाऊस गेला की त्या फांदीला वडील मला पाळणा बांधून देत. त्या पाळण्यात मी कुठल्याही बागेत अनुभवले नसतील इतके उंच उंच झोके त्या हिरव्या गर्द छत्राखाली घेतले आहेत व आकाशाला गवसणी घालत अनेक बालस्वप्नात रमले आहे. झोके घेत असताना वारा येऊन पानगळ झाली की मला स्वर्गात असल्यासारखं वाटायचा.
चिंचा पूर्णं पिकल्या की काही चिंचा गळायच्या ह्या खाली पडलेल्या आंबट गोड चिंचा खाणे हा एक मधल्या वेळेचा टाईमपास असायचा. पिकलेल्या चिंचा हालवून पाड्यासाठी गडी माणूस यायचा. प्रत्येकी चिंचेच्या झाडाचे हालवण्यासाठीचे दर ठरायचे. त्याने चढून चिंचा हालवायला सुरुवात केली की चिंचांचा बदाबदा पाऊस पडायचा. काही चिंचा टणक देठाच्या असायच्या ज्या हालवून पडत नसत मग त्यांना काठीने पाडावे लागत असे. आपण झाडाखाली असलो की चांगलाच मार लागतो ह्या चिंचांचा तो मार बरेचदा गंमत म्हणून आम्ही अनुभवायचो. चिंचा गोळा करण्यासाठी आम्ही घरातील सगळे आणि आजूबाजूची लहान मुले हौसेने यायची. त्यांना आई खाऊ आणि चिंचा द्यायची. ह्या चिंचा गोणीत भरून ठेवायच्या मग त्या गोणी घराच्या पडवीत विराजमान होत असत. काही चिंचा कच्च्याच असायच्या त्यामुळे हा चिंचा पाडण्याचा कार्यक्रम आठ दिवसाच्या अंतरावर दोन-तीन वेळा तरी व्हायचाच.
चिंचा घरात आल्या की आईचा चिंचांचा कारखाना चालू होत असे. तेव्हा आई प्रार्थमिक शिक्षिका म्हणून शाळेत कार्यरत होती. दुपारी शाळेतून आली की जेवण उरकून आई आणि आजी चिंचेच्या गोणी घेऊन बसत आणि त्या एक एक करून चिंचा सोलत असत. चिंचा सोलताना त्याला असलेले दोरे काढायचे नसतात नाहीतर चिंच आख्खी न राहता तुटू शकते. ह्या दोर्यांवरून आठवलं तोंडात टाकलेली चिंच खाऊन संपली की हे दोरे चघळायचे. त्याचा पूर्ण आंबटपणा जाऊन त्या दोर्याची चव लागेपर्यंत हे दोरे चघळण्यात मजा यायची.
गोणीतल्या चिंचा सोलून झाल्या की जर चिंच जास्त ओली असेल तर एखादा दिवस ती उन्हात वाळवावी लागे. सुकलेली असेल तर वाळवायची गरज लागायची नाही. मग आई आजीचा चिंचा काटळायचा कार्यक्रम चालू होत असे. चिंचा काटळणे म्हणजे चिंचेतील चिंचोका (बी) विळीवर चिंच कापून एक कक करून काढणे हे क्लिष्ट काम असे. पण चिंचोक्यांना काही काळाने पाखरे लागतात म्हणून चिंच टिकविण्यासाठी ते काढावे लागतात. चिंचा काटळून झाल्या की त्या टिकाव्या म्हणून मीठ लावून गोळे करावे लागत. साधारण एक किलो चिंचेचा एक गोळा बनायचा. गोळा बनवताना जाडे मीठ आधी आई पाट्यावर जाडसर वाटायची मग त्यात काटळलेली चिंच मिक्स करुन पाट्यावरच त्याचा गोळा करायची. हे गोळे पहिला सगळ्या नातेवाईक, जवळच्या लोकांना वाटले जायचे किंवा त्यांच्या नावाचे बाजूला काढले जायचे. घरात एका मोठ्या रांजणात वर्षभराचा साठा करून ठेवायचे मग उरलेले गोळे मणावर विकले जायचे. गावतील बायकाच हे गोळे विकत घेऊन संपवायचे. काहींना तर वाट्यालाच यायचे नाहीत भराभर संपल्याने. पण सतत चिंचेच्या सहवासात राहिल्याने वाताचा त्रासही दोघींना व्हायचा. मग आजीला तर आई करून नाही द्यायची पण कालांतराने तिनेही चिंचा फोडणे बंद केले. घरातल्यापुरती आणि नातेवाइकांना देण्यापुरते गोळे करून बाकी चिंच किरकोळ भावात आख्खीच विकून टाकायची. वाताच्या त्रासामुळे मजुरीनेही कोणी हे काम करायला तसे तयार नसायचे.
त्यावेळी चिंचोक्यांनाही खूप डिमांड होते. चणे-शेंगदाणेवाले तसेच गावातील खाऊच्या दुकानात हे चिंचोके विकले जायचे. मग ते भाजून एका बरणीत विकायला ठेवलेले दिसायचे. मी हे चिंचोके आमच्या चुलीत भाजायचे आणि खिचात भरून मैत्रिणींसाठी शाळेत न्यायचे तसेच घरीही खायचे. चिंचोके खाण्यातली गंमत दीर्घकाळ असते कारण चिंचोके कडक असल्याने शेंगदाण्यासारखे न तुटता ते चघळत चघळत खावे लागतात.
ही चिंच आमच्या परिसरात माशांच्या कालवणात जास्त वापरतात. प्रत्येक कालवणात ह्या चिंचेचा कोळ टाकला जातो. तसेच आमट्यांमध्येही हिचा वापर केला जातो. मी एकदा पुस्तकात बघून कच्च्या चिंचेचा ठेचा केल्याच आठवतंय. कच्च्या तयार झालेल्या चिंचा शिजवून त्याच्या रसातील मिरचीचे लोणचे अप्रतिम लागते. चिंचेची कढी ही मटणाबरोबर काहींचा ठरलेला पदार्थ आहे. चिंच गुळाची जोडी अनेक पदार्थांची रुची वाढवते जसे की अळूवडी, अळूचे फतफते, आंबट वरण आणि इतर काही पदार्थ. गरोदर पणात बहुतांशी स्त्रियांना ह्याच चिंचांचे डोहाळे लागतात. चिंच लावून घासलेली तांबा पितळेची भांडी शोभेला ठेवण्यासारखी लख्ख चमचमतात.
तर असे हे चिंचपुराण जे सध्या पुराणात जमा झाले आहे पण मनात अजून आंबट गोड आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत आहे.
हा लेख दिनांक १८/०२/२०१९ रोजी महाराष्ट्र दिनमान या वर्तमान पत्रात प्रकाशीत झालेला आहे.
मस्त लेख..
मस्त लेख..
फोटो पाहून पाणी सुटले तोंडाला
छान लिहीलय जागू तै.. एक्दम
छान लिहीलय जागू तै.. एक्दम चटक मटक
मस्त लेख जागू. आमच्या
मस्त लेख जागू. आमच्या शाळेच्या वाटेवर ३-४ मोठी चिंचेची झाडे होती त्यामुळे त्या आंबट आठवणींनी दात सळसळले.. पोरे येताजाता हिरवे आकडे पाडत असत. गाभुळलेली चिंच फार कमीदा मिळाली खायला.
जागुटले, सुपर्ब झालाय लेख.
जागुटले, सुपर्ब झालाय लेख. तुझ्या निसर्गप्रेमाचे कौतुक आहेच पण हे तू आम्हाला शेअर करतेस त्यामुळे आम्हालाही लहान झाल्यासारखे वाटते.
शाळेत असतांना खूप चिंचा खाल्ल्यात, पण गारसेल ( एकदम कोवळ्या पेराएवढ्या चिंचा ) जास्त खाल्ल्यात. उकडलेले आणी भाजलेले चिंचोके व गुळाची चिक्की हा लहानपणचा खाऊ. धन्यवाद !! मन चांगलेच रमले.
>>>असे हे चिंचपुराण जे सध्या
>>>असे हे चिंचपुराण जे सध्या पुराणात जमा झाले आहे पण मनात अजून आंबट गोड आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत आहे.>>>
छान...
खुप छान लेख.
खुप छान लेख.
चिंचेच्या सहवासात रहिल्याने वाताचा त्रास होतो हे आधी माहित नव्हते. रबरी हातमोजे घालुन हा त्रास टाळता येउ शकेल का?
चिंचेचं नाव काढलं तरी माझे
चिंचेचं नाव काढलं तरी माझे दात आंबतात ईतक्या चिंचा खाल्या आहेत. कोवळा पाला तर कैकदा खाल्ला आहे. चिंचेखाली झोपू नये असं आज्जी म्हणायची पण मी दुपारी तेथेच झोपायचो. किती आठवणी जागवल्यास जागूतै! भारीच!
किती सुरेख आणि अकृत्रिम
किती सुरेख आणि अकृत्रिम लिहितेस तू!
आता घरात चिंच वापरासाठी आणली आहे, नवीन आहे.जराशी ओलसर आहे,पण खायला गोड आहे.
गाभुळलेली चिंच फार कमीदा मिळाली खायला.>>>+१..
काय मस्त आठवणी जाग्या झाल्या.
काय मस्त आठवणी जाग्या झाल्या. हिरव्या चिंचा मीठ लावून खाणं .. अहाहा! आणि चिंचेचे मिठातले गोळे! तोंडाला पाणी सुटलं.
जुई, किल्ली, अनघा, रश्मी,
जुई, किल्ली, अनघा, रश्मी, दत्तात्रय साळुंके, व्यत्यल, शालीदा, देवकी धन्यवाद.
व्यत्यय हो बहुधा रबरी हातमोज्याने नाही होणार त्रास.
मस्त लिहिले आहे चिंचपुराण !!!
मस्त लिहिले आहे चिंचपुराण !!! वाचायला सुरुवात केल्यापासून तोंडाला पाणी सुटले. वाचून झाले तरीही थांबत नाहीय
जागुतै सहज लिहिलयस, तोंड
जागुतै सहज लिहिलयस, तोंड खवळले. लहानपण गेल डोळ्यासमोरून, शाळे जवळची चिंचेची झाडे आठवली. आताही माझ्याकडे चिंचेचे झाड आहे, त्याच्या चिंचा फार गोड आहेत, सध्या मी रोज खातो.
सलाम, नेहमीनुसार !
सलाम, नेहमीनुसार !
चिंचसुख...अहाहा! गावाकडल्या
चिंचसुख...अहाहा! गावाकडल्या अंगणातल्या चिंचेची आठवण आली.
मस्त लेख. वाचण्यात इतकी गुंतले कि चहा ऊतू गेला
आंबटगोड लेख आवडल्या. जुन्या
आंबटगोड लेख आवडल्या. जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
जागु छान लेख. तुझ मिरचीच
जागु छान लेख. तुझ मिरचीच चिंचेच्या रसातल लोणच रेसीपी होती ती आठवली एकदम.
इथे बर्याचदा चिंचाचे बॉक्स मिळतात. बहुदा मेक्सिकन किंवा थाई. प्रचंड गोड असतात.
मेक्सिकन अक्वा फ्रेस्का (थंड ज्युस) च्या दुकानात चिंचेचा ज्युस मिळतो. (चिंच उकळवून त्याचा कोळ पाण्यात मिक्स ,साखर घालुन ड्रिंक तयार करतात. नुस्ते प्लेन किंबा रम/टकिला मध्ये मिक्स करून पण मिळते.) तो बघितला कि भारतात अस तयार करुन का विकत नाहीत अस वाटत.
नेहमीप्रमाणे छान लेख.
नेहमीप्रमाणे छान लेख.
लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. मजेचे दिवस, बिल्डिंगच्या आसपास असलेल्या चिंच, जांभूळ, लिंबू इत्यादी झाडांचा मेवा उन्हाळी सुट्टीत खायचो ते आठवलं.
खूप छान लेख....
खूप छान लेख....
हल्लीच्या काळात हे अनुभवायला मिळणं कठीण...
सुंदर मागोवा घेतला आहे त्या
सुंदर मागोवा घेतला आहे त्या काळच्या जीवनाचा. जीवनात सरमिसळून भरून राहिलेल्या निसर्गाच्या अस्तित्वाचा.
चिंचेच्या झाडाचे व्यक्तिमत्वच मला भावते ! अतिशय भक्कम , टोले़जंग , घनदाट पसारा ..आत्ममग्न - गंभीर , वडीलधारं !!!
त्याच्या तळाच्या मातीला एक वेगळा शीतल स्पर्ष असतो.. त्याच्या सावलीत खेळणे म्हणजे परमआनंद ....
वावे, गोल्डफिश, कोदंडपाणी,
वावे, गोल्डफिश, कोदंडपाणी, भाऊ, सोनाली, मंजूताई, सीमा, असुफ, नीरूदा, पशुपत धन्यवाद.
पशुपत छान लिहीलयत तुम्ही.
त्या हिरव्या कच्च्या कैर्या
त्या हिरव्या कच्च्या कैर्या
अन गाभुळलेल्या चिंचा,
किति गोड नि आंबट थोडा
तो खजिना आठवणींचा!!
काय मस्त लिहिलाय लेख.
काय मस्त लिहिलाय लेख.
हे वाताचं माहीत नव्हतं.
चिंच न खाता नुसती प्रोसेस करणाऱयांना पण त्रास होतो का, पॅसिव्ह स्मोकिंग सारखा?किंवा चिंचेतून एखादा गॅस बाहेर पडतो का?(गंमत म्हणून नाही, खरंच प्रश्न पडलेत.)
शरद धन्यवाद.
शरद धन्यवाद.
अनु चिंच सोलताना किंवा काटळताना ती हाताला चिकटते व अत्यंत आंबट असल्याने जास्त संपर्कात आल्याने वाताचा त्रास होतो. हा त्रास जास मोठ्या माणसांना म्हणजे वयाने जास्त जाणवतो.
ओह अच्छा. म्हणजे टारटरीक ऍसिड
ओह अच्छा. म्हणजे टारटरीक ऍसिड शरीराला जास्त लागल्याने हा त्रास होतो.
मस्त लेख जागूताई
मस्त लेख जागूताई
लहान असताना मी पण खाल्लीत चिंचेची फुलं, मग छोट्या चिंचा, गाभोळ्या चिंचा, पिकलेल्या चिंचा आहाहा! तोंपासु. आणि इतक्या खाल्या जायच्या की, तोंड येत असे.
शाळेचे दिवस आठवले. चिंचेचं
शाळेचे दिवस आठवले. चिंचेचं झाड एकदम मजबूत असतं. आम्ही कोणत्याही बारीक फांदीला लोंबकळून झाडावर चढायचो. गेले ते दिवस गेले..
आता मी जांभळं, चिंचा, करवंद, भोकरं विकत घेऊ शकत नाही.
वाह सुंदर.
वाह सुंदर.
तो चिंचेच्या पालाचा आणि फुलांचा फोटो कित्ती गोड आहे.
मला कच्च्या हिरव्या चिंचा खायला आवडतात, पिकलेल्या नाही. डोंबिवलीत आयरे रोडवर मोठं चिंचेचं झाड होतं. अर्थात त्या झाडाच्या नाही खायचो, जरा लांब होतं ते पण विकत घेऊन खायचो. हिरव्या चिंचा तिखट मीठ लावून खायच्या. त्याची चटणी पण मस्त लागते आणि मिठाच्या पाण्यात टाकून पण आवडतात. भाजके चिंचोके खायला पण मजा यायची. कोवळा चिंचेचा पाला पण मस्त लागतो.
काही विशिष्ठ भाज्या चिंच गुळाच्या छान लागतात. पण एरवी आमटीत वगैरे कोकम वापरतो आम्ही. नालासोपारा इथे राहताना शेजारच्या चौलच्या वहिनी चिंच गोळा द्यायच्या मला आणि मी कोकम द्यायचे त्यांना. ती चिंच अजूनही छान आहे माझ्याकडे. मध्ये बहिणीने पण दिलेली आहे. खूप वापरली जात नाही पण बघितली की वहीनी आठवतात.
जागुले मस्त मस्त तोंपासु लेख
जागुले मस्त मस्त तोंपासु लेख
पवनपरी, सरळसाधा, अन्जू,
पवनपरी, सरळसाधा, अन्जू, वर्षूतै धन्यवाद.
लेख वाचुन दातातुन लाळेच्या
लेख वाचुन दातातुन लाळेच्या पिचकार्या निघाल्या..!!
अगदी परवाच गावाला गेलो होतो तेव्हा घराशेजारील शेताच्या बांधावरच्या चिंचेच्या झाडावरुन चिंचा काढुन चटणी-मीठासोबत खाल्या.. मला असे चिंचा खाताना बघुन घरचे लोक्स चेहर्याचा जाम वाईट्ट व्यायाम करतात..!!
Pages