खनिजांचा खजिना : भाग ४
भाग ३ (पोटॅशियम) : https://www.maayboli.com/node/68990
*****************************************
आपल्या हाडांचा गाभा हा प्रथिनरुपी असतो. त्यावर जेव्हा कॅल्शियम व फॉस्फरस या खनिजांचे थर चढवले जातात तेव्हाच हाडे खऱ्या अर्थाने बळकट होतात. या दोन्ही खनिजांचा परिचय या लेखात करून देतो.
कॅल्शियम
हे एक धातुरुपी खनिज आहे. आपल्या शरीरातील सर्वाधिक प्रमाणात असणारा हा धातू होय. निसर्गात तो मुख्यतः CaCO३ या रुपात चुनखडीमध्ये आढळतो. शरीरातील ९९% कॅल्शियम हाडांत साठवलेला असतो. उरलेला १ टक्का हा रक्त आणि इतर पेशीबाह्य द्रवांत असतो. तिथे तो अनेक महत्वाची कामे करतो.
कॅल्शियमचे आहारातील स्त्रोत व प्रमाण, शरीरातील चयापचय व कार्य, त्याची रक्तपातळी आणि संबंधित आजार या सर्वांचा आढावा या लेखात घेतला आहे.
आहारातील स्त्रोत
हे चार गटांत विभागता येतील:
१. दूध, दही ,चीज, इ.
२. हिरव्या पालेभाज्या
३. सोयाबीन्स व इतर द्विदल धान्ये, कठीण कवचाची फळे (nuts).
४. तसेच कॅल्शियमने ‘संपन्न’ केलेली काही धान्ये आणि सोयाबीन्स बाजारात मिळतात.
अशा विविध स्त्रोतांतल्या कॅल्शियमचे आतड्यांत शोषण मात्र कमीजास्त प्रमाणात असते हे लक्षात घ्यावे. प्रौढांमध्ये आहारातील त्याच्या एकूण प्रमाणाच्या सुमारे २०%च शोषले जाते. एकूण स्त्रोतांपैकी दुग्धजन्य पदार्थांतील शोषण चांगले होते. पण इतर स्त्रोतांतील कॅल्शियमच्या शोषणात मात्र काही अडथळे असतात.
प्रथम पालेभाज्यांचे बघू. पालक आणि काही इतरांतले कॅल्शियम हे oxalates शी संयुगित असते. त्यामुळे त्याचे शोषण खूप कमी होते. ब्रोकोली व कोबीतील कॅल्शियमचे शोषण तुलनेने बरे होते.
तर द्विदल धान्ये आणि nuts मधील कॅल्शियम हे phytatesशी संयुगित असते. त्यानेही शोषणाला अडथळा होतो.
कॅल्शियमचे शोषण हे वाढत्या वयानुसारही कमी होत जाते. बालके आणि मुलांत ते आहारातील प्रमाणाच्या तब्बल ६०% असते तर म्हातारपणी ते बरेच कमी होते. उत्तम शोषण होण्यासाठी आहारात त्याच्या जोडीने ‘ड’ जीवनसत्व असणे जरुरीचे असते. ‘ड’ आणि कॅल्शियम यांचा परस्परसंबंध जाणण्यासाठी वाचकांनी माझा ‘ड’ वरील स्वतंत्र लेख इथे वाचावा: https://www.maayboli.com/node/68623.
प्रौढ व्यक्तीत कॅल्शियमची आहारातील रोजची गरज १ ग्रॅम इतकी आहे. म्हातारपणी हे प्रमाण १.२ ग्रॅम करावे लागते.
शरीरातील कार्य:
१. त्याचे सर्वात महत्वाचे काम म्हणजे हाडांना व दातांना बळकट करणे. हाडांच्या प्रथिनयुक्त गाभ्यावरती मिश्र खनिजांचा थर चढवला जातो. या मिश्रणात कॅल्शियमबरोबर फॉस्फरस, सोडियम, मॅग्नेशियम, कार्बोनेट व फ़्लुओराइडचा समावेश असतो. यामुळेच हाडे व दात बळकट होतात.
इथे हे लक्षात घ्यावे की हा थर कायमस्वरूपी नसतो. रोज त्यातील काही भाग खरवडून रक्तात येतो आणि त्याचे जागी रक्तातून आलेल्या खनिजांचा नवा थर चढवला जातो. म्हणजेच रोज आपली हाडे ही अंशतः ‘कात’ टाकत असतात.
२. स्नायूंचे आकुंचन: या मूलभूत क्रियेमध्ये तो मध्यवर्ती नियंत्रकाची भूमिका बजावतो.
३. रक्त गोठण्याची क्रिया: जखमेनंतर रक्तस्त्राव थांबण्याची जी गुंतागुंतीची क्रिया असते त्यात त्याचाही वाटा महत्वाचा असतो.
४. याव्यतिरिक्त पेशींच्या मूलभूत क्रिया, एन्झाइम्सचे उत्तेजन आणि काही हॉर्मोन्सच्या कार्यात तो मोलाची मदत करतो.
कॅल्शियमची रक्तपातळी
ही पातळी ९-११ mg/dL इतकी असते. कॅल्शियमची शरीरातील अनेक महत्वाची कार्ये बघता ती कायम स्थिर ठेवावी लागते. त्यासाठी दोन हॉर्मोन्सचे योगदान खूप महत्वाचे असते:
१. पॅराथायरॉइड हॉर्मोन (PTH) : मानेतील थायरॉइड ग्रंथीच्या बाजूस ४ छोट्या पॅराथायरॉइड ग्रंथी असतात त्यांत हे तयार होते. ते हाडातील कॅल्शियम रक्तात आणण्यास मदत करते.
२. ‘ड’ जीवनसत्वाचे कार्यकारी रूप (Calcitriol) हे हॉर्मोन असते आणि ते मूत्रपिंडात तयार होते. ते आहारातील कॅल्शियमचे शोषण वाढवते आणि रक्तातील कॅल्शियमला हाडात जाण्यास मदत करते.
निरोगीपणात वरील दोन्ही हॉर्मोन्सचा सुरेख समतोल साधला जातो जेणेकरून कॅल्शियम हाडांत व रक्तात योग्य प्रमाणात राहते. आहारात कॅल्शियम व ‘ड’ ची दीर्घकाल कमतरता झाल्यास मात्र हाडांतील कॅल्शियम खूप खरवडले जाऊन रक्तपातळी टिकवली जाते पण त्याचबरोबर हाडे कमकुवत होतात. मुलांत या आजाराला मुडदूस म्हणतात.
कॅल्शियमची पातळी विविध आजारांत कमी व जास्त होऊ शकते. आता त्याचा आढावा घेऊ.
कॅल्शियम रक्तपातळी कमतरता
ही मुख्यतः खालील आजारांत आढळते:
१. ‘ड’ जीवनसत्वाची कमतरता : यात आहारातील कॅल्शियमचे शोषण होत नाही.
२. PTH ची कमतरता
३. दीर्घकालीन मूत्रपिंड विकार : यात ‘ड’ जीवनसत्वाचे कार्यकारी रूप तयार होत नाही.
या कमतरतेचे रुग्णावर परिणाम असे होतात:
हातापायात मुंग्या येणे, स्नायूंच्या अकुंचानाचा झटका, मानसिक स्थितीतील बदल आणि हृदयकार्यावर विपरीत परिणाम.
कॅल्शियम रक्तपातळी अधिक्य
ही मुख्यतः खालील आजारांत आढळते:
१. PTH चे अधिक्य
२. विविध कर्करोग : यांत PTH सारखे एक प्रथिन तयार होते आणि ते हाडांना पोखरून काढते. मग त्यांतील भरपूर कॅल्शियम रक्तात उतरतो.
अधिक्याचे परिणाम:
१. चेतासंस्थेचे बिघाड व मानसिक दौर्बल्य
२. मळमळणे, बद्धकोष्ठता
३. मूतखडे होणे
४. हृदयकार्यावर विपरीत परिणाम.
* * * * *
फॉस्फरस
कॅल्शियमचा जोडीदार असलेले हे खनिज. शरीरातील खनिजसाठ्यांमध्ये त्याचे स्थान कॅल्शियमच्या खालोखाल म्हणजेच दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचा सर्वाधिक साठा अर्थातच हाडांत आहे. अल्प प्रमाणात ते रक्तात असते आणि तेथील त्याचे प्रमाण हे कॅल्शियमच्या सुमारे निम्म्याने असते.
पेशींतले फॉस्फरस हे उर्जा देणाऱ्या संयुगांच्या स्वरुपात असते. पेशीत तयार होणारी उर्जा ही ATP या ‘चलना’त साठवली जाते. त्यातील ‘P’ म्हणजे फॉस्फेट होय. तसेच DNA व RNA या मूलभूत रेणूंचाही फॉस्फरस हा घटक असतो.
त्याचे आहारातील चांगले स्त्रोत म्हणजे दूध आणि मांस. ज्या पदार्थांतून कॅल्शियम व प्रथिन उत्तम मिळते त्यांतून फॉस्फरसही आपोआप उपलब्ध होते. आहारातील कॅल्शियम :फॉस्फरसचे प्रमाण १.५ : १ या गुणोत्तरात असावे.
फॉस्फरसची रक्तपातळी
ही 2.5 to 4.5 mg/dL इतकी असते. मुलांत ती प्रौढापेक्षा अधिक असते कारण हे वाढीचे वय असते.
ही पातळी वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे दीर्घकालीन मूत्रपिंड विकार. ती पातळी दीर्घकाळ जास्त राहिल्यास त्याचा कॅल्शियमशी अधिक प्रमाणात संयोग होतो. परिणामी त्या दोघांचे मिळून तयार होणारे ‘खडे’ शरीराच्या मउ भागांतही साठू लागतात.
*************************************************
चित्र जालावरुन साभार.
नेहमीप्रमाणे वाचनीय लेख.
नेहमीप्रमाणे वाचनीय लेख.
पूर्वी कॅल्शिअमच्या गोळ्या
पूर्वी कॅल्शिअमच्या गोळ्या सर्रास घेतल्या जायच्या. पण हल्लीच्या ट्रेंड्नुसार जास्त कॅल्शिअममुळे कॅल्सिफिकेशन (बोली भाषेत हाड वाढणे) होउ शकते. ते बरोबर आहे का?
वाढत्या वयानुसार कॅल्शिअमचे शोषण कमी होणे, दूधातली भेसळ, विटॅमीन ड ची कमतरता अशा या युगात कॅल्शिअमची योग्य पातळी कशी राखावी? पूर्वी विड्यात चुना असायचा त्याने फायदा होतो का? म्हणजे त्याचे शोषण होते का?
मला पण हाच प्रश्न पडलाय
मला पण हाच प्रश्न पडलाय डॉक्टर. सध्याच्या भेसळीच्या, हायब्रीडच्या जमान्यात ह्या खाण्यातून पुरेसे कॅल्शियम मिळते का?
चाळीशीच्या पुढील स्त्रियांना कॅल्शियम सप्लीमेंटची गरज आहे का?
लेख छान!!
वरील सर्वांचे आभार. आता
वरील सर्वांचे आभार. आता शंकानिरसन.
या प्रतिसादात माधव यांचे प्रश्न घेतो.
१. जास्त कॅल्शिअममुळे कॅल्सिफिकेशन (बोली भाषेत हाड वाढणे) होउ शकते. ते बरोबर आहे का? >>>
प्रथम एक लक्षात घेऊ. कॅल्शिअमच्या गोळ्या या प्रत्येकाने उगाचच “वय झाले आता”, म्हणून स्वतःहून घेऊ नयेत. डॉ नी सल्ला दिला असेल तरच मर्यादित काळासाठी घ्याव्यात. ‘हाड वाढणे’ असे काही होत नाही.
जर कॅल्शिअम अनियंत्रित घेतले गेले तर शरीरातील अन्य ठिकाणी कॅल्सिफिकेशन होऊ शकते. त्यात प्रामुख्याने रक्तवाहिन्या आणि मूत्रमार्ग हे येतात. रक्तवाहिन्यानचे काठीण्य होणे हा मुद्दा बरोबर आहे. अर्थात उलटसुलट संशोधन झालेले आहे.
जास्त कॅल्शिअममुळे मूतखडे होतात का ,हा मात्र अत्यंत वादग्रस्त प्रश्न आहे. जर कॅल्शिअमच्या गोळ्या चालू असताना आहारातील oxalates चे प्रमाण कमी ठेवले, तर अजिबात खडे होत नाहीत, असे अलीकडील संशोधन सांगते. त्यासाठी त्या दरम्यान सोयाबीन, मांस, पालेभाज्या यांचे सेवन कमी करावे.
२. पूर्वी विड्यात चुना असायचा त्याने फायदा होतो का? म्हणजे त्याचे शोषण होते का? >>>
चुना म्हणजेच कॅल्शिअम हे बरोबर. पण, विड्यावरील चुन्याचे प्रमाण किरकोळ आहे. त्यातही आपण जेवढे खातो त्यातले जेमतेम २०% च शोषले जाते. त्यामुळे हा काही मुख्य स्त्रोत होऊ शकत नाही.
@ विनिता:
@ विनिता:
१. सध्याच्या भेसळीच्या, हायब्रीडच्या जमान्यात ह्या खाण्यातून पुरेसे कॅल्शियम मिळते का? >>>>
रासायनिक शेतीमुळे विविध कीटकनाशके अन्नात येत आहेत हे खरे. पण, त्यामुळे त्यातील कॅल्शियमच्या प्रमाणावर परिणाम होईल असे मला वाटत नाही. कारण कॅल्शियम हे एक दणकट खनिज आहे. अर्थात संबंधित तज्ञाने यावर मत द्यावे हे बरे.
२. चाळीशीच्या पुढील स्त्रियांना कॅल्शियम सप्लीमेंटची गरज आहे का?>>>>>
चांगला प्रश्न. पण उत्तर गुंतागुंतीचे आहे. यात मतांतरे/मतभेद आहेत.
१. सरसकट सर्व स्त्रियांना कॅल्शियम सप्लीमेंटची गरज नाही.
२. ऋतुसमाप्तीनंतर हाडे ठिसूळ होतात. मात्र ती कितपत तशी झाली आहेत हे डॉ चा सल्ला आणि तपासण्या केल्यावरच सांगता येते.
३. समजा बरीच ठिसूळ आहेत. आता त्यावर कॅल्शियम, ‘ड’, ब-१२ आणि हॉर्मोनचे उपचार असे अनेक पर्याय आहेत.
४. कुठला उपचार कोणी घ्यायचा हे डॉक्टरच्या सल्ल्यानेच ठरेल. सरसकट स्त्रियांसाठी एक विधान करता येणार नाही.
५. पन्नाशीनंतर काही स्त्रियांना हाडांच्या आरोग्यासाठी प्रतिबंधात्मक कॅल्शियम उपयोगी असते.
माहितीपूर्ण लेख..
माहितीपूर्ण लेख.. प्रतिबंधात्मक कॅलशियम म्हणजे काय?
अनघा.
अनघा.
म्हणजे हाडे ठिसूळ होण्याआधीच Ca गोळ्या खाणे.
धन्यवाद __/\__
धन्यवाद __/\__
५० नंतर डॉ. च्या सल्ल्याने
५० नंतर डॉ. च्या सल्ल्याने गोळ्यांचा कोर्स करावा असेच ना?
नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण लेख!
नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण लेख! धन्यवाद डाॅ!
नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण लेख!
नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण लेख! धन्यवाद डाॅ!
अनघा, बरोबर.
अनघा, बरोबर.
मंजुताई, द सा, धन्यवाद !
नेहमीप्रमाणेच उत्तम लेख.
नेहमीप्रमाणेच उत्तम लेख.
कॅल्शियम, फॉस्फरस आणि प्रोटिन्स हे तीनही घटक मत्स्याहारातून चांगले मिळतील. यासाठी भारतातील काही विशिष्ट मासे सुचवाल का?
साद, धन्यवाद.
साद, धन्यवाद.
बोंबील, मांदेळी, इ. माशांमध्ये फॉस्फरस चांगल्या प्रमाणात उपलब्ध असतं. त्यामुळे वरील तीनही घटक मिळण्यासाठी हे मासे चांगले.
धन्यवाद, डॉ.
धन्यवाद, डॉ.
बोंबील माझा आवडता मासा आहे.
‘हाड वाढणे’ असे काही होत नाही
‘हाड वाढणे’ असे काही होत नाही. >>> पूर्वी टाचदुखी, क्वचीत प्रसंगी मनगटदुखी अशा प्रकारात डॉक्टर हाड वाढलंय असे निदान करायचे. हल्ली एका नातेवाइकांच्या बाबतीत 'तिथे कॅल्सिफिकेशन होऊन हाड वाढल्यासारखे वाटते त्यामुळे दुखणं येतं' असे निदान ऐकले. (मी अॅलोपाथीबद्दलच म्हणतोय, इतर पाथींबद्दल नाही.) तसं नसतं का?
माधव, तथाकथित हाड 'वाढण्याची
माधव, तथाकथित हाड 'वाढण्याची'अन्य काही कारणे असतात. जास्त काळ कॅल्शियम च्या गोळ्या खाऊन तसे होत नाही हे मा वै म.
माहितीपूर्ण लेख
माहितीपूर्ण लेख
मस्त माहिती मिळत्येय!
मस्त माहिती मिळत्येय!
त्यामुळे टाळलं जात )
त्याचे आहारातील चांगले स्त्रोत म्हणजे दूध > दूध जर न तापवता प्यायलं तर चालतं का? (मला तापवल्यावर आवडत नाही
रावी, अहो प्या की बिनधास्त !
रावी, अहो प्या की बिनधास्त ! Ca &P च्या दृष्टीने त्यात काहीच फरक पडणार नाही.
बाकी आपण जर पाश्चराईजड दूध घेत असू तर ते पुन्हा का तापवतो हे मला जाणून घ्यायची इच्छा आहे. कोणीतरी सांगावे.
धन्यवाद
आपण जर पाश्चराईजड दूध घेत असू
आपण जर पाश्चराईजड दूध घेत असू तर ते पुन्हा का तापवतो? >> सवयीने
मला गरम दूध आवडते 
बाकी आपण जर पाश्चराईजड दूध
बाकी आपण जर पाश्चराईजड दूध घेत असू तर ते पुन्हा का तापवतो हे मला जाणून घ्यायची इच्छा आहे. > पाश्चराईजड दूध नाहीये. पण दाट्पणा आणि एकुणच आवडलं म्हणून सुरू केल आहे.
तसेही गावाकडचे पैलवान ताजे
तसेही गावाकडचे पैलवान ताजे निरसे दूध पितातच की. पोषणाच्या दृष्टीने काहीच फरक नाही.
निरसे दूध फार मस्त लागते
निरसे दूध फार मस्त लागते
एकदम छान ! ☺️
एकदम छान ! ☺️
डॉ. कुमार,
डॉ. कुमार,
शरीरातील कॅल्शियम आणि इन्सुलिनचा काही संबंध असतो का?
साद,
साद,
स्वादुपिंडाच्या विशिष्ट पेशींत इन्सुलिन साठवलेले असते. तिथून ते बाहेर स्त्रवण्यास कॅल्शियम मदत करते.
माहितीपूर्ण लेख आणि प्रतिसाद.
माहितीपूर्ण लेख आणि प्रतिसाद.
>माधव, तथाकथित हाड 'वाढण्याची
>माधव, तथाकथित हाड 'वाढण्याची'अन्य काही कारणे असतात. जास्त काळ कॅल्शियम च्या गोळ्या खाऊन तसे होत नाही हे मा वै म.<
इतरच कारणे असावीत कारण मी अजिब्बात जास्तीचे कॅल्शियम घेत नाही तरीही अचानक टाचदुखी सुरु झालीय. सगळ्या तपासण्या केल्यावर चक्क बी१२ खूप वाढलय असं कळलं. आणि अर्थातच डी कमी झालय.
तुमचा बी१२ चा लेख परत वाचून काढते.
चक्क बी१२ खूप वाढलय असं कळलं>
चक्क बी१२ खूप वाढलय असं कळलं>>>>
बी १२च्या गोळ्या बरेच दिवस खाल्ल्या होत्या का ?
Pages