गझल - एक रस्ता, एक गाडी

Submitted by बेफ़िकीर on 3 February, 2019 - 12:22

गझल - एक रस्ता, एक गाडी
=====

एक रस्ता, एक गाडी, एकटेपण आणि मी
आणले होतेस तू ते मोजके क्षण आणि मी

तू न माझे राहणे, मग मी न माझे राहणे
सोबतीला रोज माझ्या हे कितीजण आणि मी

एक मोफत एकवर ही योजना स्वीकार तू
उंबऱ्याबाहेर आहे मुक्त अंगण आणि मी

या तिघांना माणसांनी कोठवर सोसायचे
आव मीपण त्यागल्याचा आणि मीपण आणि मी

फरफटत ओलांडतो दोघेच आलेला दिवस
सौम्य मेंदूशी मनाचे तीव्र घर्षण आणि मी

तू असा नाहीस, दाखवतो तुला तो तू खरा
वाद घालत राहतो दररोज दर्पण आणि मी

पोचतो उपऱ्याप्रमाणे शेवटी अपुल्या घरी
बेघरांना मी दिलेले तृप्त घरपण आणि मी

दोष देण्याने स्वतःच्या झाकता येती चुका
'बेफिकिर' दुनिया हुडकते रोज कारण आणि मी

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users