पांघरून अंगावर गेला चादर बहुधा

Submitted by सुप्रिया जाधव. on 18 January, 2019 - 10:50

प्रेम स्वतःचे, म्हणतो 'त्यांचे चक्कर बहुधा !'
स्वार्थापोटी जागृत होतो मत्सर बहुधा

प्रत्येकाला कसे वाटते हवेहवेसे ?
दुर्मिळ त्याच्या व्यक्तित्वाचे अत्तर बहुधा !

शिवण घालते तिथे नेमके फिसकत आहे
नात्यामधले विरले आहे अस्तर बहुधा !

नाव कोरुनी माझे त्याच्या ह्रदयावरती
विसरुन गेला तोच स्वत:चे अक्षर बहुधा

कडेलोट झाल्यावरसुध्दा उभेच्या-उभे !
आयुष्याचे झाले आहे मांजर बहुधा

कुशीत नव्हते निजले तरिही गाढ झोपले
पांघरून अंगावर गेला चादर बहुधा

टिचकीवरती नाचवणारा मांजा तुटला
पतंग झाली विधवा, सुटले सासर बहुधा

तुझ्याचसाठी हात तुझा धरलाय तिने पण;
तिच्याच माथी फुटेल आता खापर बहुधा

----------------------------------------

जीन्स-टॉपवर पैंजणवाल्या पोरी चढल्या
पॅसेंजर पुट-पुटले, आले दादर बहुधा !

सुप्रिया मिलिंद जाधव

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>प्रत्येकाला कसे वाटते हवेहवेसे ?
दुर्मिळ त्याच्या व्यक्तित्वाचे अत्तर बहुधा !>>> सुरेख!

>>>शिवण घालते तिथेच का फिसकटते आहे ?
नात्यांमधले विरले आहे अस्तर बहुधा !>>>बढिया!

>>>नाव कोरले त्याने माझे ह्रदयावरती
विसरुन गेला तोच स्वत:चे अक्षर बहुधा>>>बहुत बढिया!

>>>कडेलोट झाल्यावरसुध्दा उभे राहते
आयुष्याचे झाले आहे मांजर बहुधा>>>क्या बात है!