शब्दपुष्पांजली- मला आवडलेले गोनीदांचे पुस्तक- दुर्गभ्रमणगाथा

Submitted by वावे on 29 February, 2016 - 03:44

गडकोट हेच राज्य
गडकोट म्हणजे राज्याचे मूळ
गडकोट म्हणजे खजिना
गडकोट म्हणजे सैन्याचे बळ
गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी
गडकोट म्हणजे आपले प्राणसंरक्षण
महाराष्ट्रात जवळपास चारशे किल्ले. त्यांपैकी जवळजवळ अडीचशे किल्ले गोनीदांनी पाहिले; पाहिले, म्हणजे नुसते पाहिले नाहीत, तर त्या त्या किल्ल्याचा इतिहास, भूगोल, त्या किल्ल्यावरची वनसंपदा, त्याचे वास्तुरचनाशास्त्र, राजकीयदॄष्ट्या, संरक्षणदॄष्ट्या त्याचे महत्त्व अशा अनेक मुद्द्यांचा सखोल विचार करत पाहिले, पुन:पुन्हा पाहिले. या अडीचशे किल्ल्यांपैकी उण्यापुर्या अठरा-वीस किल्ल्यांची ही ’दुर्गभ्रमणगाथा’!
या गाथेत रायगड, राजगड, सिंहगड, प्रतापगड, राजमाची, तोरणा अशा प्रसिद्ध किल्ल्यांबरोबरच रसाळगड, सुमारगड, महिपतगड असे अप्रसिद्ध किल्लेही आहेत, जे ट्रेकर्सना ओळखीचे आहेत, पण सामान्यांना फारसे ठाऊक नाहीत.
गोनीदा बालपणापासूनच शिवचरित्राने झपाटलेले होते. अचलगढ या किल्ल्याच्या कुशीतल्या गावात त्यांचे बालपण गेले. भ्रमंतीची आवड तर होतीच. अशा पार्श्वभूमीवर किल्ले पहायचे वेड त्यांना न लागते, तरच नवल! आयुष्यात सर्वाधिक प्रेम त्यांनी किल्ल्यांवर केले. या त्यांच्या प्रेमाचा आणि झपाटलेपणाचा प्रत्यय या पुस्तकात ठायीठायी येतो.
गोनीदांनी रायगड, राजगड इत्यादी किल्ल्यांच्या वार्या करायला सुरुवात केली १९४५ ते १९५० च्या आसपास. रायगडाचा १८१८ साली इंग्रजांकडून जो विध्वंस झाला, तो अगदी १९४५ पर्यंत जवळजवळ तसाच होता. त्या इमारतींच्या ढिगाऱ्यांमध्ये १८१८ साली पडलेल्या तोफगोळ्यांची कवचं सापडत. त्यांनी अशी कितीतरी भग्न कवचं, गोळ्या, नाणी जमवली. फक्त रायगडावरच नव्हे, तर राजगड आणि सिंहगडावरदेखील! असे अनेक खजिने त्यांना या दुर्गभ्रमंतीत सापडले.
महाराष्ट्रातील किल्ले आणि उत्तरेतील किल्ले यांतील प्रमुख फरक असा की उत्तरेतील किल्ले हे अजूनही बहुतांशी जसेच्या तसेच आहेत. कालपरत्वे जी काही पडझड झाली, तेवढीच. पण महाराष्ट्रातील किल्ले मुळात सौंदर्यापेक्षा उपयुक्तता हा निकष समोर ठेवून बांधले गेले. शिवाय इंग्रजांशी लढता लढता या सगळ्या किल्ल्यांची धूळधाण झाली. त्यामुळे या किल्ल्यांवर कुठे काय असेल, याची आज कल्पनाच करावी लागते. न्यायसभा, पोथीशाळा, शस्त्रागार, औषधशाळा, टांकसाळ, धान्यागार, वस्त्रागार, नगारखाना, रत्नशाळा, तोफशाळा इत्यादी अठरा कारखाने रायगडावर नांदत होते, तसेच राजगडावरही होते. या सगळ्या किल्ल्यांवरून शिवशाहीचा रथ चालवला जात होता. अनेक रोमांचक घटना, घनघोर युद्धे, युद्धांमध्ये जिंकल्याचा आनंद, पराभवाचे सल, धारातीर्थी पडलेल्या वीरांसाठी वाहिलेले अश्रू हे सर्व सर्व पोटात घेऊन हे किल्ले उभे आहेत.
हे किल्ले ज्यांनी नांदते ठेवले त्या धनगरांशी, गडावर टिकून राहिलेल्या काही मोजक्या लोकांशी गोनीदांनी मैत्री केली. रायगडावरील अनेक धनगर, राजगडावरील भिकुले, राजमाचीचे उंबरे असे लौकिकार्थाने गरीब, अशिक्षित, कष्टकरी पण उमदे मित्र त्यांना मिळाले. रायगडावरच्या साऊ अवकीरकर या धनगरणीशी तर त्यांनी बहीण-भावाचं नातं जोडलं होतं आणि ’साधने’त तिच्यावर ’साऊ अवकीरकरीण: एक प्रसन्न निर्धनत्व’असा लेखही लिहिला होता. या धनगरांना गुरू करून ते किल्ल्यांवरील आडबाजूचे अवशेष शोधत हिंडले, त्यांच्या मागोमाग अवघड कडे चढून गेले, त्यांच्या झोपडीत बसून चविष्ट दह्यादुधाचा, ताक-लोण्याचा, भात आमटीचा, घावनांचा आस्वाद घेतला.
पाककला ही गोनीदांची अजून एक आवड! दुर्गभ्रमंती करताना वेळोवेळी रांधलेल्या आणि चाखलेल्या स्वयंपाकाची त्यांनी अगदी रसभरीत वर्णनं केलेली आहेत. स्वयंपाक अर्थात बर्याच वेळा साधाच, कधी पिठलंभात, कधी खिचडी, तर कधी कौतुकाच्या दाळबाट्यासुद्धा!
गडकिल्ले भटकण्याची आवड असलेले अनेक समानशील सवंगडीही गोनीदांनी जमवले. त्यापैकी सर्वात ठळक नाव म्हणजे बाबासाहेब पुरंदरे! असंख्य वेळा अनेक किल्ल्यांच्या वार्या दोघांनी एकत्र केल्या, कधे दोघेच, तर कधी मोठ्या गोतवळ्याला सोबत घेऊन. ज्या तिथीला शिवाजीमहाराज पन्हाळा ते विशाळगड ही वाट पार करून गेले आणि बाजीप्रभूंनी छातीचा कोट करून गजापूरची खिन्ड पावन केली, त्याच तिथीला पावनखिंडीत जाऊन त्या घनघोर युद्धाचे स्मरण जागवण्याच्या आकांक्षेने गो. नी. दांडेकर, बाबासाहेब पुरंदरे आणि अजून बारा-पंधरा जवान मुसळधार पावसात ही बिकट वाट चालून गेले. आता सर्रास हा ट्रेक त्या तिथीला आयोजित केला जातो, पण त्या काळात त्यांनी केलेला हा पहिलाच प्रयत्न होता ( त्याचप्रमाणे, ट्रेकर्समध्ये प्रसिद्ध असलेल्या ढाकच्या बहिरीला गेलेले गोनीदा आणि त्यांचा मित्र रणजितसिंग हे पहिले पांढरपेशे)
पन्हाळगड ते विशाळगड या वाटेने जात असताना एक जिवावरचा प्रसंग त्यांच्यावर येऊन गेला; त्यांच्याच शब्दांत:
’वाटेत एक ओढा आला. कंबर कंबर पाणी. गढूळ. खळाळ गर्जवीत वेगाने कासारीकडे चाललेला. गमबूट काढायचा कंटाळा केला अन तसाच चाचपडत पाण्यात शिरलो. कंबरभर पाणी खूप वेगाने वाहात असलेलं. एका धोंड्यावर पाय ठेवला, तर धोंडा निसटला. मी पाण्यात आडवा झालो, अन अतिशय वेगाने कासारीकडे चाललो.
मी चाललो, हे पाहताक्षणी मुकुंदा गोंधळेकर आणि राम डिंबळे दोघे मजवर झेपावले. तिसरे बाबासाहेब पुरंदरे!
कसेबसे एकमेकांना धरून, कासारी सताठ हात राहिली असता काठाला लागलो.
त्या क्षणी मला घट्ट धरून बाबा म्हणाला, आप्पासाहेब, या क्षणी मी आपल्यापाशी आहे, याचं किती वाटतं, म्हणून सांगू!"
तो माझ्या जिवीचा जिवलग असं हे वाक्य बोलला’
असे कमीअधिक धोक्याचे प्रसंग कधी त्यांच्यावर आले, तर कधी त्यांच्या सोबत्यांवर. कधी कुणी पाय घसरून तीस-चाळीस फूट खाली कोसळलं, तर कधी कुणावर मधमाश्यांनी हल्ला केला. पण ’दुर्गम’अशा दुर्गांवर चढत-उतरताना हे असे प्रसंग कधीतरी येणार, हे अपेक्षितच!
गो. नी. दांडेकरांनी वेळोवेळी अनेकांना किल्ले दाखवले आहेत. त्यांत अगदी विजयाराजे शिंदे, पं. महादेवशास्त्री जोशी, उषा मंगेशकर अशी मोठीमोठी नावं आहेत, तशा काही व्यावसायिकांनी काढलेल्या मोठ्या गटांच्या सहलीही आहेत. आपल्या कुटुंबाला आणि मित्रमंडळींच्या गोतावळ्याला घेऊन गोनीदा अनेक वेळा वेगवेगळ्या किल्ल्यांवर जाऊन राहिले आहेत, आपल्या काही पुस्तकांचं लेखनही त्यांनी एखाद्या गडावर निवांतपणे आठ-पंधरा दिवस राहून केलं आहे. असे त्यांचे गडकिल्ल्यांशी अजोड मैत्र होते.
गडकिल्ले हे त्यांच्यावर घडलेल्या इतिहासासाठी, त्याच्याशी निगडित भूगोलासाठी तर पहावेतच, पण त्याबरोबरच गडांवरून दिसणारे निसर्गसौंदर्य पाहण्यासाठीही आपले डोळे उघडे असू द्यावेत. गोनीदांनी हे सौंदर्य भरभरून पाहिले, आपल्या कॅमेर्यात बद्ध केले आणि आपल्या चित्रदर्शी आणि सुडौल भाषेत ते उतरवले. काही काही वर्णनं तर खास गोनीदांनीच करावी अशी...
’तळहातावर आवळा घेऊन निरखावा तसं खालचं दृष्य अगदी स्पष्ट दिसत होतं’
’एकेक तारा मऊ होत होता, उजाळ वर उठत होता.’
’पायांतळी असा वनपुष्पांचा गालिचा अंथरलेला असतो आणि आपण बिराण्या देशीच्या राजपुत्रासारखे त्या रुजाम्यावरून अवशेष धुंडाळीत हिंडत असतो’
’(महाड) उन्हाळ्यात तर बटाटे पातेल्यात उकडू घालावेत तसं चहू अंगांनी रटरट शिजत असतं’
’आस्वलीच्या केसात हरवलेली ऊ एका परीने सापडेल, पण या रानी हरवलेलं माणूस गवसणं कठीण!’
गोनीदांची सौंदर्यदृष्टी दगडांवरूनही फिरत असे. रंगीबेरंगी, वैशिष्ट्यपूर्ण दगडांचा, म्हणजेच चित्रपाषाणांचा मोठा संग्रह त्यांनी केला होता. त्यातच अवचित एक उल्काही त्यांना सापडली होती.
पण या सगळ्याच्या पलीकडचा, दाखवता न येण्यासारखा, कदाचित शब्दांतूनही व्यक्त करता येणार नाही असा एक अमूल्य ठेवा गोनीदांना नक्कीच मिळाला होता. माझ्यासारखीलाही जेव्हा शिवनेरीवर ’छत्रपती शिवाजीमहाराजांचे जन्मस्थळ’ असा फलक दिसतो, एस्टीतून जाताना लांबूनच का होईना, पण रायगड दर्शन देतो, सिंहगडावरून चालताना ’या मातीला कधीतरी शिवाजीमहाराजांचे पाय लागले आहेत’ अशी जाणीव होते, प्रतापगडावर गेल्यावर तिथे साडेतीनशे वर्षांपूर्वी घडलेल्या थरारक साहसनाट्याची आठवण होते, तेव्हा अंगावर रोमांच उभे राहतात आणि त्या अमूल्य ठेव्यातला एक कण सापडल्याचा आनंद होतो.
दुर्गभ्रमणगाथा वाचण्यापूर्वी माझा किल्ल्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा खूपच मर्यादित होता. म्हणजे प्रतापगडावर गेल्यावर अफझलखानाचा वध, सिंहगडावर गेल्यावर तानाजीची शौर्यगाथा, पन्हाळ्यावर गेल्यावर सिद्दी जौहरच्या वेढ्यातून निसटून गेलेले शिवाजीमहाराज अशा इतिहासातील प्रसिद्ध घटनांचीच आठवण होत असे. पण दुर्गभ्रमणगाथा वाचल्यावर या किल्ल्यांकडे पाहण्याचा एक नवीनच दृष्टिकोन मला मिळाला.
तीन-साडेतीन हजार वर्षांपूर्वी आपल्या देशाचा परदेशांशी समुद्रमार्गे व्यापार चालायचा. निरनिराळ्या प्रकारचा किमती माल पश्चिम किनार्यावरच्या समृद्ध बंदरांमधे येऊन उतरायचा. तो माल बैलांच्या पाठीवर लादून तांडॆच्या तांडे घाट ओलांडून वर जायचे. वाटेत दाट झाडी, रानटी जनावरं, दरोडेखोर असायचे. त्यांच्यापासून या तांड्यांचे रक्षण करण्यासाठी जे सशस्त्र सैनिक असायचे, ते त्यापोटी जकात वसूल करायचे. जकात वसूल करण्याच्या चौक्या आणि या सैनिकांची ठाणी, हे या सर्वच किल्ल्यांचं मूळरूप. पुढे सातवाहन, चालुक्य, शिलाहार या राजवटींनी ही ठाणी मजबूत केली. रायगडाचं जुनं नाव रायरी, राजगडाच्या डोंगराचं जुनं नाव मुरुंबदेवाचा डोंगर. पन्हाळगडाचे पर्णालदुर्ग. सिंहगडाचं अर्थातच कोंढाणा/ कौंडिण्यदुर्ग. असा या प्रत्येक गडाला प्रचंड इतिहास आहे. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार अशा या देशातल्या संपन्न राजवटींनी हे किल्ले बांधले, वापरले आहेत. मात्र जवळजवळ सर्वच किल्ल्यांचं आज दिसणारं रूप हे शिवकाळातलं. प्रतापगड तर त्यांनी शून्यातून बांधला. रायगड, राजगडही नव्यानेच बांधले. त्यांनी दुर्गरचनेचं, व्यवस्थेचं, जपणुकीचं एक स्वतंत्र शास्त्रच बनवलं.
गडकिल्ल्यांचा असा प्राचीन इतिहास समोर आल्यामुळे माझा किल्ल्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच व्यापक झाला. हडसरगडावर असलेली प्रचंड टाकी, शिवनेरीच्या डोंगरातील लेणी ही मला जर परत पहायला मिळाली, तर मी नक्कीच अधिक उत्सुकतेने, डोळसपणे आणि आत्मीयतेने पाहीन.
या नवीन जाणीवेसाठी आणि पुस्तक परतपरत वाचताना मिळालेल्या अवर्णनीय आनंदासाठी वाहिलेली ही शब्दपुष्पांजली!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!

खुपच सुन्दर लिहिलय. पुस्तक नुकतेच वाचायला घेतल्याने सगळ्या गोष्टीन्चे सन्दर्भ लागले.
<<दुर्गभ्रमणगाथा वाचण्यापूर्वी माझा किल्ल्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा खूपच मर्यादित होता.<< अगदी अगदी.

'दुर्ग भ्रमण गाथा' हे माझेही आवडते पुस्तक आहे. या काही गोनीदांच्या ओळी प्रस्तावनेमधून:

किल्ले पाहणे हा एक निदिध्यासाचा विषय झाला आहे. आयुष्यभर सर्वाधिक प्रेम जर कोणावर केलं असेल, तर ते किल्ल्यांवर. सगळा जन्म तो छंद प्राणपणानं जोपासला आहे.

कधी कुण्या किल्ल्याच्या तटाखालून चालतो आहे. कधी त्याचा उत्तुंग कडा चढतो आहे. कधी त्या मध्ये कोरलेल्या बहुता काळीच्या खोबणी मध्ये बोटं चिटकवून त्या बळावर कुडी वर ओढतो आहे. कुठं कुणा किल्ल्याच्या माथ्यावरून आसुदान रंगलेला भंवताल शोधतो आहे. कुठं कंबर कंबर, छाती छाती गवतांत पावलं खुपशीत कुण्या किल्ल्याच्या तटावरून हिंडतो आहे. कधी कुण्या बुरूजातल्या चोर वाटेनं कसा बसा तोल सांभाळीत खाली उतरतो आहे. कधी दोन प्रचंड गिरीदुर्गांमधील मैलच्या मैल अंतर कडाडत्या उन्हात चालून जातो आहे. कुठं एखादा बेलाग कड्यावरला तट तळातूनच न्याहाळतो आहे. तर कधी तळातल्या कुण्या कपारीतून ठिपकणारं थेंब थेंब पाणी ओंजळीत भरून तहान शमवतो आहे. कुठं कुण्या गडातळीच्या खनाळात कुणी कधी काळी मांडलेल्या तीन धोंड्यांवर खिचडी शिजवतो आहे. कधी कुण्या किल्ल्यावर जात असता कुण्या दरीचे चढ उतार भटकतो आहे. कधी कुण्या खोगळीत शांतपणे झोपी जातो आहे. कुठं कुण्या किल्ल्याच्या पठारावर चांदिण्या रात्री उलथा झोपून माथ्यावरलं नक्षत्रभरलं आकाश दुर्बिणीतून न्याहाळतो आहे. कधी कुण्या चोर दिंडीनं तटात प्रवेशतो आहे. कधी कुण्या खंदकातून आश्चर्यमाखल्या मुद्रेनं चालतो आहे. कुठं कुण्या किल्ल्यावरील सदरेवर घडलेले ऐतिहासीक प्रसंग स्मरून तिथं मुजरा घालतो आहे. कधी कुण्या गडावरल्या अंबरखान्याच्या भवताली कायबाय हुडकतो आहे. कुठं शेजारच्या कुण्या अलंगेच्या सावलीत बसून कपाळावर साकळलेला घाम पुसतो आहे. कुठं कुण्या किल्ल्यावर पोचणार्‍या भुयारातं गुढग्यांवर रांगत तसूं तसूं पुढं सरतो आहे. कधी कुण्या प्रचंड महाद्वाराच्या भव्यतेनं चेपून जातो आहे. कुठं शेजारचा प्रचंड बुरूज निरखून दाद देतो आहे. कुठं कुण्या तटाच्या जंगीतून तळातलां टप्पा ध्यानी घेतो आहे. कधी कुण्या जळभरल्या टाक्यांत डोकावतो आहे. कुठं कुण्या किल्ल्यावरल्या तळ्यातल्या चिंब थंड पाण्यांत पोहोतो आहे. कुठं कुण्या गडाभंवतालीच्या मेटांचा तलाश करतो आहे

कधी कुण्या किल्ल्याभंवतालीचे पाहारे हुडकून काढीत ते नकाशावर नोंदतो आहे. कुठं कुण्या किल्ल्यावर अजून जीव धरून उभ्या असलेल्या देवळांत शिवमहिम्नाचा पाठ करतो आहे. कधी कुण्या किल्ल्यावरचे बेभान वारे अनुभवतो आहे. कुठं कोणी एक किल्ला चढून जात असतां वरून कोसळणार्‍या धुवांधार पावसांत काकडतो आहे. कधी धडधडत्या थंडीत एखाद्या बालेकिल्ल्याभंवतालींच्या गच्च धुकटांत हरवून जातो आहे. कुठं कुण्या गडातळीच्या एखाद्या वीरगळासमोर नम्र होतो आहे. कधी दो किल्ल्यांमधले तुडुंबले खळाळत्या जळाचे ओढे ओलांडतो आहे. कधी वाघरासारखा पालथा पडून कुण्या गडावरल्या झरप्यांतलं पाणी पितो आहे. कुठं कुण्या तटाच्या सांवलीत पाठीवरल्या पिशवींतला तहान लाडू - भूक लाडू खातो आहे. कधी कुण्या किल्ल्यांवर मैतरांसवे भटकतो आहे. कितीकदा एकूटवाणा रात्री बेरात्री कुण्या गडाच्या तटा बुरूजांवरून सैराट हिंडतो आहे.

कधी आनंदानं थिरकलो, कधी प्रमादाच्या पुराबरोबर वाहात गेलो. कधी मनं स्थिरावलं कधी गढूळलं -

मीही कुणी ऋषि मुनि नव्हे, प्रमादशील मानव आहे.

ते असो -

पाचं तपं उलटून गेली, असा किल्ल्या गडांचा वेध घेत त्यांच्या वाटा तुडवतो आहे. या दुर्लक्षित आयुष्यापैकी जवळ जवळ तिसरा भाग गड किल्ले भटकतां त्यांचं चिंतन करता, त्यांवर जायचे बेत आंखतां, त्या साठी झुरता व्यतीत झाला.

आयुष्याच्या या सायंकाळी क्षण स्वस्थ बसून ती स्मरणं आठवीन म्हणतो.

वावे ,
खूपच छान लिहिला आहेस !!अप्रतिम
मी अजून हे पुस्तक वाचलेले नाही
पण तुझे रसग्रहण वाचून कधी एकदा वाचेन असे झाले आहे

जसे तू म्हणालीस "या मातीला कधीतरी शिवाजीमहाराजांचे पाय लागले आहेत"
या जाणिवेनेच नुसते भारावून जायला होते, तसे मला एकदा गो नि दांचे भाऊ (सख्खे /चुलत ते नाही माहित )
कोकण रेल्वे मध्ये भेटले होते. अगदी चुट्पुरति भेट झाली आणि नंतर मला इतके भारावल्या सारखे झाले!

मस्त ! असेच लिहित राहा !खूप शुभेच्छा !

छान लिहिले आहे.

मध्ये मला "सोलो ट्रेक" ची आवड निर्माण झाली होती. अनेक ट्रेक एकट्यानेच केले. वर भुत्याने लिहिल्यासारखा प्रत्यय तेंव्हा यायचा.

खूपच सुरेख.... Happy
गोनिदा हे शिवप्रेमी, गडप्रेमी व भाषाप्रभू ...

____/\___

वेडोबा, धन्यवाद Happy
उद्या आठ जुलै, म्हणजे गो. नी. दांडेकरांची जयंती. या निमित्ताने 'आठवणी गोनीदांच्या' हा कार्यक्रम या फेसबुक ग्रुपवर आहे. (मला व्हॉट्सॲपवर याची माहिती मिळाली)
209741222_4421006187933504_6238700558831253761_n.jpghttps://www.facebook.com/groups/mahasangh/