सफर कलिंग देशाची ( ओडिशा प्रवासवर्णन) भाग १/३

Submitted by वावे on 31 December, 2018 - 04:01

भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर जन्म झालेला असल्यामुळे समुद्रात होणारा सूर्यास्त बघायची सवय लहानपणापासून आहे. थोडं मोठं झाल्यावर कन्याकुमारीला सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही समुद्रात होतात ही गंमत कळली आणि समुद्रातून होणारा सूर्योदय बघण्याची इच्छा निर्माण झाली. पुढे एकदा पाँडिचेरीला गेल्यावर सूर्योदय नाही, पण पौर्णिमेचा चंद्र समुद्रातून उगवताना पाहिला आणि उगाचच भारी वाटलं. तरी अजूनही पूर्व किनार्याबद्दल एक आकर्षण मनात आहेच.

खूप दिवसांपासून ओडिशाला जायचं मनात होतं. ओळखीचे २-३ जण जाऊन आले होते आणि त्यांच्या वर्णनांमुळे उत्सुकता वाढली होती. कोणार्कचं सूर्यमंदिर पाहण्याची उत्सुकता शाळेत असल्यापासून होतीच, पण इरावतीबाईंच्या 'परिपूर्ती’ मधली गूढरम्य कथा वाचल्यापासून जगन्नाथपुरीलाही जावंसं वाटत होतं .

होता होता यावर्षी नाताळच्या सुट्टीत ओडिशाला जायचं ठरलं. विचार पक्का झाल्यावर असं वाटलं की आई-बाबा आणि सासूबाईंनाही विचारावं, येता का, असं. कारण ते एरवी प्रवासकंपन्यांतर्फे बर्यापैकी फिरलेले असले तरी पूर्व भारतात गेलेले नव्हते आणि ओडिशा हे नाव तसं रुळलेल्या पर्यटनस्थळांच्या यादीत येत नाही. त्या तिघांचंही हो-नाही करता करता यायचं ठरलं. आम्ही चौघे इथून बंगळूरहून विमानाने आणि ते तिघे मुंबईहून ट्रेनने भुवनेश्वरला पोचणार होतो. त्यांचा प्रवास चांगलाच लांबलचक, म्हणजे ३१ तासांचा होता, पण सुदैवाने फर्स्ट क्लासची तिकिटे मिळाल्यामुळे तशी काळजी नव्हती. ते २१ तारखेला सकाळी ७ ला पोचणार होते, तर आम्ही त्याच दिवशी सकाळी १० ला. प्रत्यक्षात त्यांच्या गाडीला उशीर झाल्यामुळे ते आमच्याही नंतर, ११-११.३० ला हॉटेलवर पोचले.

हॉटेल बुक करताना नवर्याला पुरीच्या एका प्रसिद्ध हॉटेलचं नाव मित्राने सुचवलं होतं. पण ते हॉटेल फारच प्रसिद्ध असणार, कारण आम्ही जवळजवळ दीड महिना आधी चौकशी करूनसुद्धा तिथे आधीच पूर्ण बुकिंग झालेलं होतं. Happy त्रिवागोवर पुरीचं इतर कुठलं बरं हॉटेल न दिसल्यामुळे शेवटी भुवनेश्वरच्या एका हॉटेलमधे ३ खोल्या ४ दिवसांसाठी बुक केल्या. नंतर मात्र लक्षात आलं की थोडी जास्त शोधाशोध करून पुरीचंच दुसरं एखादं हॉटेल बुक करायला हवं होतं कारण कोणार्क, चिल्का सरोवर ही ठिकाणं पुरीपासून जवळ आहेत. भुवनेश्वरपासून थोडी लांबच पडतात.

२१ तारखेला हॉटेलला पोचल्यावर भारताच्या पश्चिम किनायापासून पूर्व किनार्यापर्यंतचा ( बाबांच्या शब्दात सिंधुसागरापासून गंगासागरापर्यंतचा) प्रवास करून थकलेले ज्ये. ना. आंघोळी करायला आतुर होते. ते फ्रेश झाल्यावर बाहेर जेवायला गेलो. बाहेरगावी गेल्यावर झोमॅटो, स्विगी, ओला, उबर अशा अ‍ॅप्सचा खूप आधार वाटतो हे या ट्रिपमध्ये लक्षात आलं. रेस्टॉरंटचं रेटिंग झोमॅटोवर बघून मगच तिथे जेवायला जायचं की नाही हे ठरवायचं आम्ही कटाक्षाने पाळलं.

पहिल्या दिवशी संध्याकाळी जवळच असलेलं धौली हे ठिकाण पहायचा बेत होता. इ.स.पू. तिसर्या शतकात सम्राट अशोकाने कलिंग राज्यावर आक्रमण केलं. कलिंगातल्या नागरिकांना आपलं सार्वभौमत्व प्रिय होतं. त्यांनी प्राणपणाने अशोकाला प्रतिकार केला. घनघोर युद्ध झालं. रक्ताचे पाट वाहिले. भयंकर नरसंहार झाला. हा सगळा विध्वंस बघून अशोकाला युद्धाची किळस आली. पश्चात्ताप झाला. बौद्ध धर्माशी त्याचा आधीपासून परिचय होताच. या युद्धानंतर झालेल्या नवीन जाणिवेमुळे तो बुद्धाच्या तत्त्वज्ञानाकडे ओढला गेला आणि त्याने बौद्ध धर्म स्वीकारला. ही कथा आपल्याला माहिती असते. हे युद्ध ज्या परिसरात झालं आणि अशोकाला ही जाणीव ज्या परिसरात झाली, त्या ठिकाणी १९७२ मध्ये जपान आणि भारताने संयुक्तरीत्या एक शांतीस्तूप उभारला आहे. तेच हे धौली . तिथे बुद्धाची एक सुंदरशी मुख्य मूर्ती आहे आणि चारी बाजूंना अजून लहान लहान बुद्धमूर्ती आहेत. समोरच्या बाजूला दोन ऐटदार सिंह आहेत. ( एकूणच तिथे सगळीकडे सिंहाची शिल्पं खूप दिसली) एखाद्या ठिकाणी घडलेला इतिहास त्या ठिकाणाला वेगळंच महत्त्व प्राप्त करून देतो. हा स्तूप काही ऐतिहासिक नाही. अगदीच अलीकडचा, आधुनिक काळातला. पण त्याच्या पार्श्वभूमीमुळे आपली दृष्टी पूर्णपणे बदलते. त्या बुद्धमूर्तीचं दर्शन घेऊन खाली उतरताना मला अगदी ’ कोसला’ मधलं बुद्धदर्शन आठवत होतं.

dhauli.png

ही मुख्य बुद्धमूर्ती

IMG_3235.JPG

शांतीस्तूप
IMG_3233.JPG

हा फोटोग्राफीचा एक प्रयत्न Wink

त्याच स्तूपाच्या पार्श्वभूमीवर एक उत्कृष्ट दृकश्राव्य शो तिथे असतो. तोही पाहिला. दुसर्याच दिवशी पौर्णिमा होती. त्यामुळे स्तूपामागून जवळजवळ पूर्णचंद्र उगवलेला होता. त्या तशा वातावरणात ओम पुरीच्या घनगंभीर आवाजातलं निवेदन असलेला तो शो पाहणं हा अतिशय संस्मरणीय अनुभव ठरला.

IMG_3249.JPG

दुसर्या दिवशीसाठी ओटीडीसीची पुरी-कोणार्क टूर बुक केली होती. उडिया लोकांच्या हिंदी उच्चारांचे दणके बसायला लागले होते, विशेषत: फोनवर बोलताना फारच गोंधळ होत होता. बंगाली लोक जसे दोन्ही गालांमधे लाडू ठेवल्यासारखे बोलतात, तसेच, किंबहुना थोडे जास्तच, उडिया लोकही बोलतात हे आधी माहिती नव्हतं. वास्तविक बंगळुरात स्थलांतरित उडिया लोक खूप आहेत. ओडिशात फारसे उद्योगधंदे नसल्यामुळे आर्थिक निम्न वर्गातली अनेक माणसे बंगळूरला रहायला येतात आणि बारीकसारीक कामे करतात. आमच्या सोसायटीतला सिक्युरिटीचा पूर्ण स्टाफ, इस्टेट मॅनेजर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन हे सगळे झाडून उडिया आहेत. पण त्यांचे हिंदी उच्चार आम्हाला व्यवस्थित कळतात. कदाचित बाहेरच्या राज्यात राहून त्यांची बोली बदलली असेल. भुवनेश्वर-पुरी-कोणार्कमध्ये मात्र लगेजला लॉगेज आणि कॉल करो ला मात्र कल कॉरो ही कोडी सोडवता सोडवता दमछाक झाली. पण माणसं मात्र अतिशय सहकार्य करणारी होती. त्यामुळे कुठे अडचण आली नाही.
दुसर्या दिवशी सकाळी आठला निघून ओटीडीसीच्या थांब्यावर पोचायचं असल्यामुळे रात्री लवकरच झोपलो.

भाग दुसरा
https://www.maayboli.com/node/68533

भाग तिसरा ( अंतिम) https://www.maayboli.com/node/68557

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

वाचतेय वावे Happy

छान! पुढचा भाग वाचायची उत्सुकता वाढली.

छान!
मुंबईहून रेल्वे प्रवास ३१ तास दाखवत असला तरी प्रत्यक्षात गाडीत दोन रात्र काढावी लागतात. म्हणून हैदराबाद / सिकंदराबादला एक दिवस ब्रेक काढला होता. परतणारी गाडी (पुरी/भुबनेसर कुर्ला) मात्र एका रात्रीत येते.
माणसं साधीभोळी हे खरंच. टुअरिस्ट आहात म्हणून लुबाडा ही वृत्ती दिसत नाही.

वावे, प्रवास वर्णन, प्रकाश चित्रे, सुरेख आहेत. पुढच्या भागाची वाट बघतो. तेथे अनेक सिंह मूर्ती असल्याचे वाचले. एके काळी या सर्व भागात अनेक सिंह असावेत, आतापर्यंत गीर मध्ये आहेत याची खंत आहे.

खूप छान प्रवास वर्णन! वाचतोय!
>>>>>इरावतीबाईंच्या 'परिपूर्ती’ मधली गूढरम्य कथा वाचल्यापासून जगन्नाथपुरीलाही जावंसं वाटत होतं .
याबद्दल थोडी विस्तृत माहिती द्याल?

छान लिहिलंय. आवडलं.
पुढचे भाग जमेल तितक्या लवकर आणि छान सविस्तर येऊद्या.

सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार! पुढचा भाग लवकरच टाकते.
अज्ञातवासी, इरावती कर्व्यांच्या कथेबद्दल पुढच्या भागात नक्की लिहीन.

मुंबई किंवा हैद्राबादेतून भुवनेश्वरला लँड झाले की शांत वातावरण टेक ओव्हर करते. स्ट्रेस रक्तातूनच कमी व्हायला लागतो. सुरेख रस्ते ग्रीनरी
मंदिरे वगैरे जबरदस्त. हैद्राबादी लोकां साठी एक छान म्हणजे हैद्राबाद हाउस च्या शाखा तिथे आहेत. भुवनेश्वर मध्ये एक अर्बन हाट टाइप जागा आहे तिथे सर्व ओरिसातील हस्तकला व वस्तू मिळतात. ओरिसा स्टेट म्युझीअम पण साधी व चांगली जागा आहे. नक्की बघा. लिंगराज मंदिर व
इतर मंदिरे फर्स्टक्लास. माय फेवरिट प्लेस

कटक येथे चांदिचे फिलिग्री वर्क दागिने वस्तू फार छान मिळतात.

छान प्रवासवर्णन.
परिपूर्ती वाचायला हवं आता.
बुद्धमुर्ती चा फोटो सुंदर आहे.
रात्रीचा स्तुपाचा फोटो वेगळाच भासतोय.
साडी घेतली का? Happy

मुंबईहून रेल्वे प्रवास ३१ तास दाखवत असला तरी प्रत्यक्षात गाडीत दोन रात्र काढावी लागतात.  >>> आम्ही कल्याणवरून संध्याकाळी चार वाजता कोणार्क एक्प्रेस पकडली होती. दुसरा संपूर्ण दिवस गाडीत काढला. तिसऱ्या दिवशी पहाटे चारला भुवनेश्वरच्या अगोदर अर्धा तास खूर्दारोड जंक्शनला उतरलो होतो. तिथून लगेच अर्ध्या तासात एक गाडी पुरीला जायला सुटते. आमचा मुक्काम पुरी येथे होता. आम्ही भल्या पहाटे सामान घेऊन धावत पळत स्टेशनच्या बाहेर जाऊन तिकीट काढून गाडीमध्ये येऊन बसलो होतो. ती गंमत आठवली.

येतानाही आम्ही कोणार्क एक्प्रेसच पकडली. पण ती भुवनेश्वर येथून दुपारी साडेतीनला. पुन्हा दुसरा संपूर्ण दिवस गाडीत आणि तिसऱ्या दिवशी पहाटे चारला कल्याणला पोहोचलो.

पण गाडीत फार मज्जा आली. जाता येता दोन दोन, चार हजार किमीचा प्रवास झाला. पुष्कळ लोकांशी भेट झाली. गप्पा झाल्या. तीनचार राज्यांतून गाडी जाते. तेथील निसर्ग, लोकांचे राहणीमान, त्यांची भाषा, गाडीच्या खिडकीतून दिसणारी त्याची वेगवेगळी घरे बघायला मिळाली. रेल्वेगाडीच्या प्रवासाची सर विमानप्रवासाला नाही हेच खरे. उटी येथे जाता येतानाही असाच चाळीस तास रेल्वेगाडीतून प्रवास केला होता. मज्जा आली होती.

हो, आई बाबा आणि साबांनी रात्री सव्वाबारा वाजता सुटणारी पुरी एक्स्प्रेस पकडली होती. ती दुसरा दिवस पूर्ण काढून तिसऱ्या दिवशी सकाळी ७ ला भुवनेश्वरला पोचते. पुढे पुरीपर्यंत जाते. त्यांनाही गाडीत कंटाळा असा फारसा आला नाही. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मग ओडिसा. बाहेरची दृश्यं ंं बदलत जातात. छत्तीसगडमध्ये जंगल, ओडिसात सगळी भातशेती दिसत होती. फर्स्ट क्लास असल्यामुळे गप्पा मारायला माणसं मात्र भेटली नाहीत. परत जाताना मात्र कंटाळा आला असता लांबलचक प्रवासाचा, म्हणून विमानाची तिकिटे काढली.

रेल्वेगाडीच्या प्रवासाची सर विमानप्रवासाला नाही हेच खरे. अगदी अगदी!