भाग पहिला https://www.maayboli.com/node/68516
भाग दुसरा https://www.maayboli.com/node/68533
ओडिसाला येऊन दोन दिवस झाले तरी उडिया जेवण चाखलं नव्हतं. कालच्या पुरी-कोणार्कच्या दिवसभराच्या प्रवासाचा थोडा थकवा होताच, त्यामुळे सकाळी फारसे कुठे गेलो नाही. ’ कनिका’ रेस्टॉरंटची झोमॅटोवर बरीच तारीफ वाचली आणि दुपारी जेवायला तिथे जायचं ठरवलं. हे एक ’ फाइन डाइन’ प्रकारातलं रेस्टॉरंट आहे. बाहेरची आणि आतलीही सजावट, एकूणच वातावरण छान, प्रसन्न होतं. उडिया थाळी मागवली.
थाळी यायच्या आधी भाजलेले उडदाचे पापड आणि मसाला ताक आलं. ताक अतिशय चवदार होतं आणि पापड आणि ताकाचं ’ काँबिनेशन’ अगदी मस्त जमलं होतं. थाळी यायला मात्र बराच जास्त वेळ लागला. एकूणच ओडिसामध्ये हिवाळ्यात दुपारच्या जेवणाची वेळ बरीच पुढे जाते म्हणे. आम्ही आपल्या सवयीने एक वाजता गेलो, तेव्हा तिथे शुकशुकाट होता, पण आम्ही अडीच-तीन वाजता निघालो, तेव्हा तिथे भरपूर गर्दी झाली होती.
थाळी आल्यावर मात्र वाट पाहिल्याचं सार्थक झालं.
एकूणएक सगळे पदार्थ अतिशय चविष्ट होते. कनिका हा उडिया गोड भाताचा प्रकार आहे. आपल्या साखरभातासारखा, पण जरा अगोड. भाज्यांमध्ये शेवग्याच्या शेंगा आणि बटाट्याची एक कोरडी भाजी होती, भरल्या परवराची रसदार भाजी होती. मला एरवी परवर फारसं आवडत नाही, पण ही भाजी अप्रतिम होती. दालमा हा उडिया स्पेशल प्रकार अर्थातच होता. (मला वाटतं मायबोलीकर सावलीने या तिन्ही पाककृती माबोवर लिहिल्या आहेत.) शिवाय एक आंबटगोड भाजी, बडी चुरमा ( या नावाची खात्री नाही, पण तिखट कुरकुरीत वड्यांचा चुरा होता), तांदळाची खीर आणि साधा भात- रोटी एवढे प्रकार होते. ताटंवाट्या, पेले, ताटल्या हे सगळं लखलखीत पितळेचं होतं. एरवी थाळी थोडी जास्तच होते पोटाला, पण हे जेवण अगदी योग्य प्रमाणात होतं.
जेवण करून निघालो. आज लिंगराज मंदिर आणि कोणार्कचा दृकश्राव्य शो, जमल्यास चंद्रभागा बीचवरून चंद्रोदय पाहणे असा बेत होता. पण जेवणात अपेक्षेपेक्षा जास्तच वेळ गेल्यामुळे पुढचं प्लॅनिंग जरा बारगळलंच.
बंगळूर ’ गार्डन सिटी’, जयपूर ’ पिंक सिटी’ , तसं भुवनेश्वर मंदिरांचं शहर म्हणून ओळखलं जातं. असंख्य जुनी मंदिरं इथे आहेत. त्यापैकी आम्ही लिंगराज मंदिर, परशुरामेश्वर मंदिर, मुक्तेश्वर मंदिर ही तीन मंदिरं पाहिली. तिन्ही शिवमंदिरं. लिंगराज मंदिर या सगळ्यांत भव्य आहे. पुरी आणि कोणार्कसारखंच इथेही सगळीकडे दगडावरचं सुंदर कोरीव काम आहे.
लिंगराज मंदिराच्या आवारात अनेक लहान लहान मंदिरं आहेत. नेहमीच्या देवतांची आहेतच, पण विशेष म्हणजे विश्वकर्म्याचं मंदिर आहे, यमराजाचं आहे आणि यमराजासमोरच सावित्रीचंही आहे. नेहमी शंकरासमोर नंदी असतोच, पण इथे नंदीचंही स्वतंत्र मंदिर आहे. इथेही पुरीसारखीच कॅमेरा, मोबाईलला बंदी असल्यामुळे फोटो काढता आले नाहीत. आवारात एक छानसं मांजर ऊन खायला बसलं होतं, त्यामुळे मुलांची जरा वेळ करमणूक झाली.
पहिल्या दिवशी आम्ही जिथे गेलो होतो, त्या धौलीच्या पायथ्याशी अशोकाचा एक शिलालेख आहे. शांतीस्तूप पहायला जाताना तो पहायचा राहिला होता म्हणून आत्ता जाऊन पाहिला. एका मोठ्या खडकावर ब्राह्मी लिपीत तो कोरलेला आहे. सम्राट अशोकाच्या महत्त्वाच्या शिलालेखांपैकी तो एक आहे.
तिथून निघून कोणार्कच्या दिशेने प्रवास सुरु केला. आदल्या दिवशी ओटीडीसीच्या वेळेला बांधील असल्यामुळे ज्या गोष्टी करायला जमल्या नव्हत्या, त्या आज करण्याचा बेत होता. त्याप्रमाणे कोणार्कला पोचलो, पण तिथलं वस्तुसंग्रहालय आम्ही पोचायच्या थोडा वेळ आधीच बंद झालं होतं. त्यामुळे थोडा विरस झाला. तिथला शो सुरु व्हायला वेळ होता, म्हणून जवळच असलेल्या चंद्रभागा बीचवर गेलो. सूर्यास्त नुकताच झाला होता, त्यामुळे चंद्रोदय समुद्रातून होताना पहायला मिळेलसं वाटत होतं, पण प्रत्यक्षात चंद्र बराच डावीकडून, रस्त्याच्या बाजूने उगवला. परत कोणार्कला पोचलो, तर तिथे पहिला शो नुकताच सुरु झाला होता. त्यामुळे दुसर्या शोसाठी थांबलो. इतर ठिकाणी जसं एक शो हिंदीत आणि दुसरा इंग्रजीत किंवा स्थानिक भाषेत असतो, तसं इथे नव्हतं. इथे प्रत्येकाला हेडफोन्स देत होते आणि त्यावर हिंदी, इंग्रजी आणि उडिया यांपैकी एक भाषा निवडायची चांगली सोय होती. सूर्यमंदिराच्या पार्श्वभूमीवर हा शो दाखवतात. हाही शो छानच होता. असं म्हणतात की कृष्णाचा मुलगा सांब याला आपल्या रूपाचा गर्व झाल्यामुळे त्याला कृष्णानेच त्वचारोग होण्याचा शाप दिला. त्यावर उ:शाप म्हणून नारदमुनींनी त्याला सूर्याची आराधना करायला सांगितली. ती त्याने कोणार्कला येऊन केली आणि त्याचा त्वचारोग बरा झाला. म्हणून त्याने येथे सूर्याचे मंदिर बांधले. पुढे नरसिंगदेव या कलिंगाच्या राजाने इ. स. तेराव्या शतकात सध्याचं सूर्यमंदिर बांधलं. ही सगळी माहिती जरी चांगली सांगितली असली, तरी मला स्वत:ला सूर्यमंदिराच्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तुरचनेबद्दल (अयनदिनांना सूर्यकिरण बरोबर आत शिरतील असे दरवाजे, लोखंडी अवजड कांबींचा बांधकामातला वापर इत्यादी) काही अधिक माहिती मिळेल असं वाटलं होतं, ती अपेक्षा मात्र पूर्ण झाली नाही. आज थंडी चांगलीच पडली होती. काकडतच परत गाडीत येऊन बसलो आणि साडेनऊ दहाला हॊटेलवर पोचून जेवून झोपलो.
चौथ्या दिवशी सकाळी भुवनेश्वरमधे असलेली स्कंदगिरी आणि उदयगिरी लेणी पहायला गेलो. समोरासमोर असलेल्या दोन टेकड्यांमधे या गुहा किंवा बौद्धविहार आहेत. एखाददुसर्या गुहेत आपल्या अजिंठ्यासारखी भित्तिचित्रेही आहेत. वर चढायला मुलांनाही खूप मजा आली. केळी किंवा चणे विकत घेऊन काहीजण माकडांना खायला घालत होते. माकडंही मजेत होती.
ही स्कंदगिरी आणि उदयगिरीची लेणी.
नंतर परशुरामेश्वर आणि मुक्तेश्वर ही दोन मंदिरं पाहिली. दोन्ही जवळजवळच आहेत. उंच, दगडी, कलिंग पद्धतीचे बांधकाम. दोन्ही मंदिरांवर सुंदर कोरीव काम आहे. अतिशय शांत, स्वच्छ, रमणीय असा परिसर आहे. एकूणच तिथे सगळ्याच मंदिरांच्या परिसरात चांगली स्वच्छता आढळली.
परशुरामेश्वर मंदिर
परशुरामेश्वर मंदिरावरचे कार्तिकेयाचे शिल्प
परशुरामेश्वर मंदिरावरचे कोरीव काम
मुक्तेश्वर मंदिर आणि परिसर
तिथून जेवायला गेलो आणि जेवून हॉटेलवर जाण्यासाठी रिक्षाची वाट बघत उभे होतो. मुलांची मस्ती सुरूच होती. तेवढ्यात धावाधावी करताना धाकटा जोरात पडला. चेहर्याला चांगलंच लागलं. सुदैवाने डॉक्टरांकडे जायची वेळ मात्र आली नाही. पण मग अजून कुठे खरेदीला वगैरे जायचा मूड राहिला नाही.
दुसर्या दिवशी हॉटेल सोडायचं होतं. चिलिका (चिल्का) सरोवराला जाण्यासाठीही ओटीडीसीची टूर असते. पण ती सकाळी सात ते संध्याकाळी सात अशी असते. आमचं परतीचं विमान रात्रीचं असल्यामुळे आम्हाला कदाचित जमलं असतं, पण आई-बाबा-सासूबाई दुपारच्या विमानाने मुंबईला परतणार होते. आम्हालाही सकाळी सातलाच मुलांना घेऊन सामानासकट चेकआउट करणं अवघड वाटत होतं, त्यात धाकटा जरा मलूलच होता, त्यामुळे आम्हीही चिल्का सरोवराला जायचा बेत रद्द केला.
अकरा-साडेअकराला चेकआऊट केलं, ते तिघे विमानतळावर जाण्यासाठी रवाना झाले आणि आम्ही रीजनल म्युझियम ऑफ़
नॅचरल हिस्टरी पहायला गेलो. भुवनेश्वरला गेल्यावर नक्की भेट द्यावी, असं हे म्युझियम आहे. खर्या ह्त्तीचा, देवमाशाचा सांगाडा इथे पहायला मिळाला. विविध प्रकारच्या प्राणी आणि वनस्पतींबद्दल भरपूर माहिती देणारं असं हे संग्रहालय आहे. विशेषतः ज्या हत्तीचा सांगाडा आहे, त्या शंकरची कहाणी चटका लावून जाते.
हा शंकर नावाचा हत्ती ओडिसामध्ये गावात शिरून त्रास देऊ लागला, दोन माणसांचा मृत्यूही ओढवला, फॉरेस्ट खात्याने त्याला पकडून ठेवलं होतं. पुढे त्याला काही इन्फेक्शन होऊन तो मेला. नंतर त्याचे शवविच्छेदन करताना खूप पूर्वी त्याला लागलेली बंदुकीची गोळी हाडात अडकून बसलेली दिसली. शंकरच्या हिंसक वृत्तीचे कारण म्हणजे हा बंदुकीचा हल्ला असू शकतो. आजही त्याच्या हाडांच्या सापळ्यात ती गोळी दिसते.
देवमाशाचा सांगाडा
संग्रहालयातून बाहेर पडेपर्यंत दोन वाजून गेले होते. फिरून फिरून आम्हीही दमलो होतो. त्यामुळे निवांत एखाद्या सिनेमाला जाऊ, दोन-तीन तास आरामात बसू आणि मग एअरपोर्टला जाऊ असा विचार केला. एस्प्लनाड मॉलमध्ये गेलो. हा देशातला सहावा मोठा मॉल आहे म्हणे. मॉल चांगला आहे, पण स्पायडरमॅन की झीरो या पर्यायांमध्ये मी झीरो निवडला. (का ते विचारू नका). यापुढे मायबोलीवर परीक्षण वाचल्याशिवाय सिनेमाला जायचं नाही असा कानाला खडा! सिनेमा (एकदाचा) संपल्यावर बाहेर आलो, रिक्षा करून हॉटेलवर जाऊन सामान ताब्यात घेऊन लगेच विमानतळावर गेलो. रात्री बारा-साडेबाराला बंगळूरला घरी पोचलो आणि घरी पोचल्यावर नेहमीच जसं सुख वाटतं तसं वाटलं. दुसर्या दिवशी सुट्टीच होती त्यामुळे निवांत झोप काढली.
ओडिसा सहलीत सर्वात जास्त आवडलेल्या बाबी म्हणजे तिथल्या देवळांमध्ये असलेली स्वच्छता, सहकार्य करणारी, लुबाडणूक न करणारी माणसे, नुकताच हॉकी विश्वचषक होऊन गेलेला असल्यामुळे सजवलेलं भुवनेश्वर आणि अर्थातच उडिया जेवण! सर्वाधिक तापदायक बाब म्हणजे न समजणारे उच्चार!
चिल्का सरोवराला जायला जमलं नाही याचं मात्र वाईट वाटलं. परत कधीतरी नक्की जाऊ असं स्वतःचं समाधान करून घेतलंय सध्या! पाहूया कसं काय जमतं ते!
खूप छान माहिती, सुरेख फोटो,
खूप छान माहिती, सुरेख फोटो, अगदी घरगुती वर्णन <<<< आवारात एक छानसं मांजर ऊन खायला बसलं होतं, त्यामुळे मुलांची जरा वेळ करमणूक झाली.>>>>>>. असं सगळं वाचले की मजा वाटते. फोटो पहायला पण खूप आवडतात. धन्यवाद वावे , मस्त वाटली तुमची सहल. तुम्हाला असेच भरपूर फिरायला मिळो या सदिच्छा !!
धन्यवाद रश्मी! मलाही तुमच्या
धन्यवाद रश्मी! मलाही तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादांमुळे लिहिण्याचा हुरूप आला!
मुक्तेश्वर मंदिराचे फोटो टाकायचे राहिलो होते, ते आता टाकले आहेत.
सहलीत सर्व काही ठीक होतंच असं
सहलीत सर्व काही ठीक होतंच असं नाही. पुरीमध्ये रोडवरच देवळासमोर एक स्टोर आहे त्यामधल्या हॅाटेलात ओडिशा थाळी १२० /१८० (एसी हॅालमध्ये) होती. ती घेतली होती. पण त्यांना म्हटलं प्रसादात जे पदार्थ +(भाज्या) असतात तसे यात आहेत का तर नाही म्हणाला. इकडे परंपरा फार पाळतात. देवळात आत शिरल्यावर ते प्रसाद विकत होते त्यांचेकडून घ्यायला हवे होते. पाण्यातल्या ( ग्रेवी नाही,कांदा लसुण नाही) भाज्या हे वैशिष्ट्य.
अगदी टपरीदुकानातले
रोशगुल्ला,रबडी सुद्धा खास असते.
अगदी म्हातारपणीही निवांत जाण्याचे ठिकाण आहे. घाई न करता फिरायचे. खायचे.
सुंदरच झालं आहे ट्रिपच वर्णन.
सुंदरच झालं आहे ट्रिपच वर्णन. सगळे फोटो पण छान आले आहेत. वस्तुसंग्रहालय आमच्या प्लान मध्ये नव्हते आणि light शो दोन्हीकडे वेळेमुळे जमले नाहीत. आता तुमचे फोटो पाहून जरा हळहळ वाटते आहे. फक्त आम्ही सरोवर केले, बराच वेळ मोडतो आणि बऱ्यापैकी शांत असते ride, नावाडी हाताने row करत असल्याने, मोठा ग्रुप हवा. बाकीची मंडळी पुढे कोलकाता ला निघून गेली आम्ही परत आलो.
सुरेख वर्णन, सुंदर फोटो.
सुरेख वर्णन, सुंदर फोटो.
लेखमाला आवडली.
Srd, शशांकजी, राजसी, धन्यवाद!
Srd, शशांकजी, राजसी, धन्यवाद!
Srd, अगदी खरं. विशेषतः लहान मुलं सोबत असताना सेफ्टी महत्त्वाची.
निवांत जाण्याचे ठिकाण. >> बरोबर. पुरी हे समस्त बंगाली जनतेचे निवांत जाऊन राहण्याचे ठिकाण आहे. ( म्हणून तर हॉटेल्स फुल )
राजसी, दोन्ही शोज एकदा पाहण्यासाठी चांगले आहेत. मी आत्तापर्यंत गोवळकोंडा, शनिवारवाडा आणि आता हे कोणार्क आणि धौली एवढेच लाईट अॅंड म्युझिक शो पाहिले आहेत. शनिवारवाड्यातला जुना शो चांगलाच होता, आताचाही छानच आहे. गोवळकोंड्याचाही सुंदर आहे. एका मर्यादेनंतर त्यातल्या चमत्कृतींचं अप्रूप वाटत नाही. Content चा दर्जा
महत्त्वाचा. या निकषावर कोणार्क २ नं. बाकी तिन्ही १ नं
तुम्ही चिल्का सरोवरात डॉल्फिन्स पाहिले का?
छान लिहिलंय. पहिल्या
छान लिहिलंय. पहिल्या भागापासूनच आवडलं.
सर्वात आवडलं म्हणजे
सर्वात आवडलं म्हणजे भुवनेश्वरमध्ये लिंगराजच्या अगोदर जे मोठे बिंदू सरोवर आहे त्याचा हुसेनसागर केला नाही. पाणी हिरवं आहे पण दुर्गंधी येत नाही. आणि समोरचे अनंत वासुदेव मंदिर छान.
तुम्ही चिल्का सरोवरात
तुम्ही चिल्का सरोवरात डॉल्फिन्स पाहिले का-- ho. पार समुद्राच्या तोंडापर्यंत नेतात त्यामुळे दिसतात. बिचारे इतक्या बोटींना बघून घाबरून पळून लपून बसतात! बायकांची बाथरूमची पंचाईत होते:( मधल्या थांब्यावर काहीच व्यवस्था नाही. बीच अप्रतिम आहे . परदेशात असे स्पॉट्स किती नीट करतात.
मारवंठे जवळ भटकळ आहेत ना तिथे पण डॉल्फिन दाखवतात, fyi
https://www.saivishram.com/beach-resort-udupi/
हे चेक करा.
तीनही लेख छान झाले. प्रचि
तीनही लेख छान झाले. प्रचि फारच सुंदर !
निवांत जागा आहे चिल्का लेक पण !बाकी गैरसोयी सगळ्याच पर्यटनस्थळी आहेतच.
चिल्कालेक करायला हवं होतं.
चिल्कालेक करायला हवं होतं. बघण्यासारखा आहे. स्वतंत्र जाऊन येऊन अर्ध्या दिवसात आटपलं असतं. कित्येक किलोमीटर छातीच्या वर पाणी जात नाही एव्हढाच लेक खोल आहे. लेकमध्ये मच्छिमार पाण्यात उभे राहून मासे पकडताना दिसतात. खोलवर गेल्यावर डॉल्फिन पुष्कळ बघायला मिळतात. आणि हाताने व्हलवायची नाही तर मोटरबोट आहेत तिथे.
स्वतंत्र जाऊन येऊन अर्ध्या
स्वतंत्र जाऊन येऊन अर्ध्या दिवसात आटपलं असतं.---हो
हाताने व्हलवायची नाही तर मोटरबोट आहेत तिथे.--- हो, मी confuse केलं आत्ताच्या सुट्टीत दुसऱ्या बोटिंगबरोबर:)
मोटरबोट असून बऱ्यापैकी संथ जाते असं वाटलं, योग शिबिराला गेल्यासारखी शांतता होती
बरोबर स्वतःच प्यायचं पाणी हवं, पाणी मिळत नाही, शहाळी असतात, मधल्या थांब्यावर. मोती आणि चंद्रमणी का काय विकणारे जरा मागे लागतात!
सुरेख वर्णन, सुंदर फोटो.
सुरेख वर्णन, सुंदर फोटो.
लेखमाला आवडली.
तिनही भाग एक सलग वाचले. छान
तिनही भाग एक सलग वाचले. छान लिहिलं आहे.
तिनही भाग एक सलग वाचले. छान
तिनही भाग एक सलग वाचले. छान लिहिलं आहे. >>> +१
लेखमाला आवडली..
लेखमाला आवडली..
सचिन काळे, साळुंकेजी, मित,
सचिन काळे, साळुंकेजी, मित, हर्पेन, अनघा, अनया, मंजूताई, srd, मनःपूर्वक धन्यवाद !
राजसी, लिंक पाहते. चिल्काला जायचं असेल तर सकाळी सात ते आठ वाजता निघायला हवं होतं. ते आम्हाला जमेलसं वाटलं नाही. म्हणून नाही गेलो. चौथ्या दिवशीच जाऊन आलो असतो तर बरं झालं असतं.
स्वच्छतागृहांच्या गैरसोयीबाबत -- पुरीला सशुल्क स्वच्छतागृहाची उत्तम सोय होती. स्वच्छ होतं. कोणार्कला मात्र आनंदीआनंद होता. कारण ते फ्री! पैसे घ्या, पण स्वच्छ ठेवा.
इतक्यात संपली मालिका?
इतक्यात संपली मालिका?
फोटो आणि वर्णन दोन्ही सुंदर होते. तुमच्या मालिकेमुळे ओडिशा मझ्या विशलिस्टवर आली आहे
माधव, तुमचा प्रतिसाद वाचून
माधव, तुमचा प्रतिसाद वाचून एकदम मस्त वाटलं
मला लिहिण्याची फारशी सवय नाही. त्यामुळे बिचकतच लिहिलं आणि थोडक्यात गोडी असते
ओडिशाला नक्की जा
वावे , खूपच सुंदर प्रवास
वावे , खूपच सुंदर प्रवास वर्णन ! प्रचि पण एकदम झक्कास !
आज बऱ्याच दिवसांनी माबो वर आले आणि छान प्रवासवर्णन वाचायला मिळाले ! तुमच्यासोबत आमची पण सैर झाली म्हणायची कलिंग देशाची
सूर्यमंदीराविषयी ची माहिती मस्तच ! एकंदरीत बरीच स्वच्छता आहे अस वाटलं प्रचि बघून .
इरावती कर्व्यांच्या परिपूर्तीमधल्या ’ नवकलेवर’ या कथेचा उल्लेख आणि सारांश खूपच छान !
लिहीत राहा ! पुलेशु!
धन्यवाद अंजली!
धन्यवाद अंजली!
खूप छान वर्णन आणि फोटोही.
खूप छान वर्णन आणि फोटोही. लेखमाला वाचून बरे वाटले, तिकडे जायचे तर आहेच, आता इच्छा तीव्र झाली.
खूप छान वर्णन आणि फोटोही.
खूप छान वर्णन आणि फोटोही. लेखमाला वाचून बरे वाटले, तिकडे जायचे तर आहेच, आता इच्छा तीव्र झाली.
धन्यवाद साधनाताई
धन्यवाद साधनाताई
>>स्वच्छतागृहांच्या बाबत>>
>>स्वच्छतागृहांच्या बाबत>>
भुबनेश्वर : दिवसभर हॅाटेल सोडून फिरतो त्यामुळे टॅाइलेट लागतेच. पूर्व भागात बिंदू सरोवर आसपास नऊ मंदिरे आहेत. मुक्तेश्वर आवारानंतर रस्त्यापलिकडे तीन मंदिरे आहेत त्यापैकी राजारानीच्या मोठ्या आवारात टॅाइलेट आहे. फक्त या मंदिराला प्रवेश तिकिट १५/- आहे. फारनरशिवाय इकडे कुणी येत नाही,स्वच्छ आहे,बाग आहे तिथे आराम करता येतो. इथून नंतर भुवनेश्वर पश्चिमेस (६किमी) उदयगिरी - खंडगिरी पैकी खंडगिरीत आहे टॅाइलेट.
मस्त लिहिलंय प्रवास वर्णन.
मस्त लिहिलंय प्रवास वर्णन. तिन्ही लेख आवडले. धन्यवाद !! पुलेशु.
चार चार नव्वद, धन्यवाद
चार चार नव्वद, धन्यवाद
फार छान आहे लेखमाला.. आणि
फार छान आहे लेखमाला.. आणि मार्गदर्शक देखील