मनी उसळते कधी कधी

Submitted by निशिकांत on 19 December, 2018 - 00:17

गोंधळलेली व्यक्तीसुध्दा विचार करते कधी कधी
वाट शोधण्यासाठी उर्मी, मनी उसळते कधी कधी

मऊ मुलायम माणसासही दुर्धर होतो रोग जसा
बनून कातळ जगावयाची, आस उमलते कधी कधी

पिले उडाली, मजेत तिकडे, आनंदी आनंद तरी
सुरुकुतलेल्या गालांवरती ओघळते का कधी कधी?

खून, दरोडे, फसवा फसवी, बलात्कार पानोपानी
वाच मुलांना पेपर म्हणणे, नको वाटते कधी कधी

श्रावण नाही सेवा करण्या, खूप पटवले मनास पण
वृध्द वधाया दशरथ नसतो, मनात सलते कधी कधी

रक्षण मिळते स्त्रीभ्रुणास जर, जुळ्यात मुलगा असेल तर
नसता गर्भाशयीच हत्त्या निश्चित असते कधी कधी

कसे जगावे उद्या, काळजी आज कशाला करायची?
धगधगणारी भूक आजची, मरण मागते कधी कधी

संस्कारांच्या ओझ्याखाली जगू न शकलो हवे तसे
पाप, पुण्य विसरून जगावे मनाजोगते कधी कधी

वेड कसे "निशिकांत" लागले, नास्तिक असुनी, देवाचे?
भरकटलो मी मार्ग जीवनी, हे जाणवते कधी कधी

निशिकांत देशपांडे. मो.क्र.९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रावण नाही सेवा करण्या, खूप पटवले मनास पण
वृध्द वधाया दशरथ नसतो, मनात सलते कधी कधी

कसे जगावे उद्या, काळजी आज कशाला करायची?
धगधगणारी भूक आजची, मरण मागते कधी कधी

संस्कारांच्या ओझ्याखाली जगू न शकलो हवे तसे
पाप, पुण्य विसरून जगावे मनाजोगते कधी कधी

>>>
सम्पुर्ण गझल छान आहे.
हे ३ विशेष आवडले.