संशोधन/शोध, समाज आणि आपण

Submitted by हायझेनबर्ग on 22 October, 2018 - 09:48

दरवर्षी विविध क्षेत्रातील योगदानांसाठी/ संशोधनासाठी नोबेल पारितोषिकं जाहीर होतात. अनेकदा ती जाहीर झाल्यानंतर कळतं की अशा काही विषयात अशा कोणीतरी मोलाची कामगिरी करून ठेवली आहे किंवा करत आहे. मग हिरहिरीने पुढचे काही दिवस त्या व्यक्तीविषयी तिच्या संशोधनाविषयी माहिती काढली जाते. (ठराविक हेतू ठेऊन ही एकंदर माहिती काढून स्वतःला अपडेट करत राहण्याची प्रक्रिया मला व्यक्तीशः खूप आवडते, आनंददायी वाटते.)

समाधानकारक माहिती मिळवून झाली की मला पहिला प्रश्न पडतो ह्या संशोधनामुळे/शोधामुळे माझे जीवन कसे प्रभावित झाले आहे किंवा होणार आहे. संशोधनाचा प्रत्यक्ष प्रभाव माझ्या जीवनावर पडला नसला तरी एकंदर सामजावर किंवा सामाजिक घटकांवर त्याचा प्रभाव पडून अप्रत्यक्षरित्या माझे जीवन कसे आणि कधी प्रभावित होणार आहे ह्याची विचारप्रक्रिया नकळतपणे डोक्यात चालू राहते.

अनेक वर्षात बर्‍याच नोबेल पारितोषिक विजेत्या संशोधनांबद्दल, शोधांबद्दल वाचून झाल्यावर (अगदी खोलात जाऊन क्रिटिक्सच्या नजरेतून संशोधनाचे अ‍ॅनालिसिस केले असे मी आजिबात म्हणणार नाही) मला असे वाटले की जो शोध मला आजवर सगळ्यात महत्वाचा वाटला आहे, ज्या शोधाने माझे आणि एकंदर सांप्रत समाजाचे भूत, भविष्य, वर्तमान अमुलाग्र बदलले आहे (खासकरून माझ्या भारत देशाचे) तो शोध तर ह्या नोबेल पारितोषिक विजेत्या संशोधनांच्या यादीत नाहीच. नोबेल कमिटीने ते संशोधन, तो शोध आणि तो संशोधक जाणूनबुजून दुर्लक्षित केला की काय (कमिटीवरही माणसेच असतात आणि त्यांचेही काही बायसेस असू शकतात) असे वाटण्याईतपत विचार डोक्यात आले. (अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे)

तर अशा अनेक प्रसिद्ध वा अप्रसिद्ध, (?) लहान वा मोठ्या शोधांबद्दल वाचणारे आणि संशोधनातल्या तांत्रिक बाबींच्या पुढे जाऊन ह्या शोधांचे (पारितोषिक विजेता असो वा नसो) वैयक्तिक/सामाजिक लेवलवर पडणार्‍या प्रभाव/योगदान ह्यावर आपआपली मते असणारे अनेक मायबोलीकर असतीलच.
म्हणून असे मत मांडण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी हा धागा ऊघडत आहे.

मी वरती ज्या शोधाबद्दल लिहिले आहे त्याबद्दल लवकरच डीटेलमधे लिहिनच तोवर एखाद्या शोधाबद्दल तुमची मते आणि विचार ईथे जरूर मांडा.
प्रतिसाद सविस्तर/अभ्यासपूर्णच लिहावेत असे काही नाही पण चर्चा घडून येण्याईतपत जुजबी माहिती जरूर द्यावी.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजचे जग माहिती तंत्रज्ञानाचे किंवा डिजिटल आहे असे म्हणतात. या माहिती तंत्रज्ञानामुळे प्रगती झाली, नवे उध्योगधंदे/नोक-या तयार झाल्या.
संशोधनक्षेत्रात प्रचंड वेगाने काम करणे शक्य झाले. अप्रत्यक्षपणे सामान्य माणसाच्या रोजच्या जीवनात, औषधोपचार, जीवनपद्धती, संपर्कमाध्यम यावर याचा खूप प्रभाव पडला.

अशा या माहिती तंत्रज्ञानच्या अनेक अंगांपैकी मुख्य असणारे ईंटरनेट हे आज मुख्यत्वे मुक्तस्त्रोत तंत्रज्ञानावर आधारीत आहे. मुक्तस्त्रोत तंत्रज्ञान व प्रकल्प नसते तर हे सगळे आज ज्या स्वरुपात आपण बघतो तसे नसते.

तर ही मुक्तस्त्रोत तंत्रज्ञानाची संकल्पना माझ्यादृष्टीने असे संशोधन आहे. ही कल्पना हे काही संशोधन नाहीये, पण त्याच्या जगावरील प्रभावामुळे मला ते इथे लिहावेसे वाटले.

असा एकच शोध सांगता येत नाही.
बहुतेक सगळे संशोधक कबूल करतात की आधी ज्यांनी संशोधन केले त्यांच्या संशोधनाच्या पायावर आम्ही संशोधन केले. इन्टरनेटसुद्धा अनेक लोकांच्या संशोधनातून प्रगत झाले. काँप्युटर, फोन, औषधे सुद्धा अशीच हळू हळू पुढे आली नि येत रहातील! त्यातील एका संशोधनाने एकंदर सांप्रत समाजाचे भूत*, भविष्य, वर्तमान अमुलाग्र बदलले, असे नसते, असे मला वाटते.

* भूत बदलत नाही, त्याबद्दल जास्त माहिती उजेडात येऊ शकते. पण वर्तमान नि भविष्य नक्की बदलते, बदलत रहाते.

त्यातील एका संशोधनाने एकंदर सांप्रत समाजाचे भूत*, भविष्य, वर्तमान अमुलाग्र बदलले, असे नसते, असे मला वाटते.
>>
सहमत. परंतु, कित्येकदा ते विशिष्ट संशोधन, उत्पादन, कल्पना किंवा काही व्यक्तींनी गाजवलेला एखाद्या क्षेत्रातला पराक्रम यांचा काळाच्या त्या तुकड्यावर एवढा प्रभाव असतो की तेव्हा व त्यानंतरच्या समाजाची व काळाची दिशा बदलते. समाजाचा खूप मोठा काहीतरी फायदा होतो. राहणीमान बदलते. कुठल्यातरी मोठ्या संकटातुन/रोगराईतुन सुटका होते. समाजाची विचार करण्याची पद्धत बदलते. काही नवे सामावले जाते काही टाकले जाते.
त्यामुळे हे सगळे जरी अनेक व्यक्ती व अनेक प्रकल्पांचे एकत्रीत योगदान असले तरी त्या एकट्या गोष्टींचा स्वतंत्र उल्लेखही व्हावा. त्यानंतर आपण कोणतेही भेदभाव न ठेवता हे समजुन घ्यावे की हा सगळा त्या अनेक व्यक्ती व अनेक प्रकल्पांचा एकत्रीत प्रभाव होता.

Submitted by अभि_नव on 22 October, 2018 - 10:54 >> अनुमोदन अभिनव.

* भूत बदलत नाही, त्याबद्दल जास्त माहिती उजेडात येऊ शकते. पण वर्तमान नि भविष्य नक्की बदलते, बदलत रहाते. >>जनरल स्टेटमेंट म्हणून अगदी बरोबर पण हे टाईमलाईनवर वर्तमानात ऊभे राहून त्यासापेक्ष भूत (जो बदलणॅ अशक्य आहे) असे म्हणायचे नसून... आपल्या जन्माआधीच लागलेल्या काही शोधातून तेव्हाचा वर्तमान जो आता भूतकाळ आहे तो कसा बदलला... भलेही आपण एवढे पुढे आलो आहोत की ते शोध तेव्हा समाजासाठी किती क्रांतिकारी होते हे समजणे आता अवघड होऊन बसले आहे... ऊदा. पोलिओ/देवी लस... आजच्या पिढीला असा काही घातक रोग कधीकाळी समाजात थैमान घालत असे हे माहितच नसावे... त्याकाळी लस आल्याने ह्या पिढीचा भूतकाळ (त्यांच्या पालकांचा वर्तमान) , वर्तमान आणि भविष्यही कायमचे बदलले.... असे

<<मला असे वाटले की जो शोध मला आजवर सगळ्यात महत्वाचा वाटला आहे, ज्या शोधाने माझे आणि एकंदर सांप्रत समाजाचे भूत, भविष्य, वर्तमान अमुलाग्र बदलले आहे (खासकरून माझ्या भारत देशाचे) तो शोध तर ह्या नोबेल पारितोषिक विजेत्या संशोधनांच्या यादीत नाहीच. नोबेल कमिटीने ते संशोधन, तो शोध आणि तो संशोधक जाणूनबुजून दुर्लक्षित केला की काय (कमिटीवरही माणसेच असतात आणि त्यांचेही काही बायसेस असू शकतात) असे वाटण्याईतपत विचार डोक्यात आले. (अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे)>>

कुणाला बक्षिस देणं किंवा न देणं हे सापेक्श आहे. आणि सापेक्शतावादाला नोबेल नाही Happy

काही कळाले नाही सुलू.
बक्षीस मिळाले न मिळाले ह्यापुढे जाऊन आपल्याला महत्वाच्या किंवा क्रांतिकारी वाटणार्‍या शोधांबद्दल लिहा असे म्हणतो आहे.
आज तुमचे जीवन समृद्ध असण्याला हातभार लावणारा कुठला शोध तुम्हाला सर्वात महत्वाचा वाटतो?

इन्टरनेटसुद्धा अनेक लोकांच्या संशोधनातून प्रगत झाले. काँप्युटर, फोन, औषधे सुद्धा अशीच हळू हळू पुढे आली नि येत रहातील! >> बरोबर.. पण तरी अ‍ॅलन ट्युरिंग, ग्रॅहम बेल सारख्यांना अनेक संशोधकांच्या गर्दीतून वेगळे काढून ह्यांच्या शोधकार्याबद्दल आपण लिहू आणि बोलू शकतो.

<<< काही कळाले नाही सुलू. >>>
आईन्स्टाइनला "फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट" बद्दल नोबेल मिळाले, सापेक्षतावादासाठी नाही.

<< आईन्स्टाइनला "फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट" बद्दल नोबेल मिळाले, सापेक्षतावादासाठी नाही.>> Happy मला क्रांतीकारी वाटणार्या शोधाबद्दलच लिहिले होते.. तुम्ही नीट वाचले नाहीत हायझेन्बर्ग! Happy

छान धागा. नोबेल पुरस्कार मिळाले की कशात आणि काय केलं ते वाचलं जातं.
मला आमूलाग्र बदलणारा शोध कोणता? असा चटकन विचार केला तर अनेक उत्तरं दिसली. पण अजुन थोडा विचार केला पाहिजे हे ही जाणवलं.
एक मिनिटाच्या अथक विचारानंतर माध्यमांचे लोकशाहीकरण ही प्रोसेस, आणि त्या अनुशंगाने येणारे आंतरजाल, सोमि, युट्युब.. आपली मते, विचार, कलाकृती ग्लोबल मांडण्याची आणि शिकण्याची मुभा आणि क्लाउड कॉन्ट्रिब्युशनने पैशांच्या पाठबळाशिवाय उभे राहू शकणारे प्रकल्प.
आता यातील नक्की काय शोध आहे याचा ग्रॅन्युलर विचार पुढचे अनेक दिवस करेन.

मला क्रांतीकारी वाटणार्या शोधाबद्दलच लिहिले होते.. तुम्ही नीट वाचले नाहीत हायझेन्बर्ग!! >> तुम्ही जे तुमच्या सापेक्ष लिहिले आणि ते मी माझ्या सापेक्ष वाचले. तुमच्या सापेक्ष जे तुम्हाला कळाले तेच माझ्या सापेक्ष मला कळेल असे तुम्हाला का वाटले? Proud
Theory of relativity बद्दल लिहिण्याआधी तुम्ही linguistic relativity बद्दल वाचले पाहिजेत. Wink

Theory of relativity तुम्हाला क्रांतिकारी का वाटते तेही लिहा पाहू. Happy

<< Theory of relativity बद्दल लिहिण्याआधी तुम्ही linguistic relativity बद्दल वाचले पाहिजेत. >> Happy

वस्तुमान आणि ऊर्जा या दोन साधारणपणे परस्परांशी संबंध न दिसणार्या गोष्टींचा एका सरळ सोप्या समीकरणात दिलेला मिलाफ, जगाला अणु उर्जा वापरायला दिलेला पर्याय ( अणुबाँब बनला ते मरु दे! ), कधीही न थाम्बणारा काळ हा थांबु ही शकतो, सरळ रेषेत जाणारा प्रकाश प्रसंगी वाकवला ही जाऊ शकतो हे सारे अकल्पनिय वाटणारे गणिताच्या सहाय्याने कागदावर आणि प्रयोगाच्या सहाय्याने प्रत्यक्षात सिद्ध होणे, टाईम ट्रॅवल सारखी फँटसी प्रत्यक्शात जमेल का अशी शक्यता..रोजच्या जीवनात अत्यंत गरजेची सॅतेलाईट, जीपीएस यांची गणिते अचुक ठेवण्यासाठी असलेला गणिताचाच ( हे हायझेन्बर्ग तुम्हीच सगळ्याना समजावयाचे आहे! ) मूलभूत पाया , मला याहून अधिक क्रांतीकारी परंतु नोबेल न मिळालेला शोध स्मरत नाही.

हायझेनबर्ग... .काही शोधांना नोबेल प्राइझ का बरे मिळाले नाही ?......या बाबतीत तु जरा अनसर्टन वाटत आहेस पण या तुझ्या अनसर्टन विचारामागचे ( हायझेनबर्ग.... अनसर्टन.... नो पन इंटेंडेड ..... Happy ) कारण मला असे वाटते की नोबेल प्राइझ फक्त सहाच विषयात दिले जाते... भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, अर्थशास्त्र, लेखन व शांतता.... १९०१ साली सुरुवातीला एवढे फक्त ६ विषय ठिक होते.. पण हळुहळु ज्ञानाच्या शाखा इतक्या विस्तारल्या आहेत आणी अनेकसे शोध त्या शाखांमधे इतक्या वेगाने लागत आहेत की कॅरॉलिन्स्का इन्स्टिट्युटला त्या प्रत्येक शोधाला नोबेल पारितोषिक देणे अशक्य आहे असे मला वाटते.

आणी पुष्कळ वेळेला असे पण होते की एखाद्या विषयातले नोबेल प्राइझ दुसर्‍याच विषयात संशोधन करणार्‍याला मिळते.. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे माझ्या क्षेत्रात.. १९७९ चे वैद्यक विषयातले नोबेल प्राइझ पेनसिल्व्हॅनिया मधे असलेल्या टफ्ट युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर अ‍ॅलन मॅकॉर्मॅकला मिळाले जो एक भौतिकशास्त्रज्ञ व अप्लाइड मॅथेमॅटिक्स मधला संशोधक व गुरु होता. त्याने एक्स रे चे चित्र जे २ मितीत असते त्याचे रुपांतर त्रिमीती चित्रात ..... लाइन इंटिग्रलचे फंक्षन वापरुन... कसे करायचे याचा शोध लावला... व CAT scan machine चा जन्म त्याच्या संशोधनावरुन झाला व भौतिकशास्त्र व अप्लाइड मॅथेमॅटिक्समधला तज्ञ असुनही वैद्यकिय क्षेत्रात त्याने क्रांती घडवुन आणली व आज आपल्याला त्याचा रोज बरे होण्यासाठी व जिव वाचवण्यासाठी उपयोग होत आहे.

पण नोबेल कमिटी हेव्हीली बायस्ड असणे हेही बर्‍याच जणांना डावलण्याचे कारण असु शकते ही शक्यताही नाकारता येत नाही.

मुकुंद
नोबेल प्राईझ मिळणे हा शोधाला प्रसिद्धी मिळण्याचा एक मोठा पॅरामीटर आहे... पारितोषिक मिळाल्यावर तो शोध एका रात्रीतून लोकमान्यता पावतो, पण सगळ्याच संशोधकांच्या नशिबी हे भाग्य येते असे नाही.

नोबेल प्राईझ (नोबेल व्यतिरिक्त त्यात्या क्षेत्रात मानाचे समजले जाणारे पुरस्कार असतातच) न मिळालेले शोध सुद्धा समाजावर प्रचंड सकारात्मक प्रभाव पाडणारे असू शकतात (प्रसिद्धीअभावी लोकमान्यता न मिळाली तरी) आणि अशा शोधांचा सुद्धा ऊहापोह व्हावा असा हेतू आहे.

ऊदाहरणार्थ ईतर कुठल्याही क्षेत्रापेक्षा वैद्यक क्षेत्रात समाजावर थेट प्रभाव पाडण्याचे मोठे सामर्थ्य आहे. पारितोषिक न मिळालेल्या आणि त्यामुळे प्रसिद्धी न पावलेल्या किंवा पारितोषिकाभावी शोधाचे महत्व अधोरेखीत न झालेले अनेक शोध वैद्यक शास्त्रात तुम्हाला ठाऊक असतीलच. तशाच एखाद्या शोधाबद्दल लिहावे अशी अपेक्षा आहे.

मी वैज्ञानिक शोधांबद्दलच बोलत आहे त्यामुळे साहित्य आणि शांतता सध्या बाजूला ठेऊ.

धन्यवाद सुलू सविस्तर लिहिल्याबद्दल.
थिअरी ऑफ स्पेशल रिलेटिविटी वर बेतलेले सॅटेलाईट प्रोजेक्शन आणि त्याचे रेग्यूलर वर्किंग नकळत पणे आपले जीवन प्रत्येक पावलागणिक किती सुसह्य आणि सुरक्षित बनवते आणि सध्याच्या मानवजातीच्या वेल बीईंग मध्ये ते किती खोलवर रूजलेले आहे हे जसजसे कळत जाते तसतसे थक्क व्हायला होते. आज अस्तित्वात असलेले कम्युनिकेशन आणि ट्रॅवलच्या (लहान वा मोठे) कुठल्याही माध्यमाच्या मुळाशी हेच समीकरण असावे.

मला याहून अधिक क्रांतीकारी परंतु नोबेल न मिळालेला शोध स्मरत नाही. >> खरे आहे पण भौतिक्शास्त्र क्षेत्रात, ईतर क्षेत्रात सुद्धा असे क्रांतिकारी शोध असू शकतात. Happy

गर्भनिरोधक गोळ्यांचा (Oral contraceptive pills) शोध लावणारा कार्ल डी-जेरासी (Carl Djerassi).
१९५१ साली गर्भनिरोधक गोळ्यांचा शोध लावण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि कित्येक मानाची पारितोषिके पटकावणाऱ्या ह्या संशोधकाला नोबेल पारितोषिकाने मात्र हुलकावणी दिली.
३० जानेवारी २०१५ रोजी मृत्यू पावलेल्या ह्या संशोधकावर २ फेब्रुवारी रोजी 'द टेलीग्राफ' वर आलेल्या (मृत्यू)लेखात Carl Djerassi, father of the Pill - obituary फार रोचक माहिती वाचायला मिळते.
सामाजिकदृष्ट्या अत्यंत उपयोगी ठरलेला हा शोध आणि तो शोध लावणारा संशोधक धाग्यात अपेक्षित निकषांवर खरा उतरतोय का?

वा वा भावेसाहेब...
मी एक्झाक्टली ह्याच शोधाबद्दल आणि संशोधकाबद्दल लिहिणार होतो. ह्याचाच ऊल्लेख मी धाग्याच्या मसुद्यात केला आहे.
ह्या गोळीचे कसले अद्वितीय परिणाम समाजावर झाले आहेत.. आणि हिच्या अभावात आज आपण भारतीय कुठे असतो ह्याचे वेगवेगळ्या सोर्सेस मधून तुकड्या तुकड्या वाचलेले अ‍ॅनालिसिस माईंडब्लोईंग आहे.
ह्या एका गोळीने देशाचा आणि जगाचा भविष्यकाळ आशर्यकारक रित्या बदलला आहे. भारताची २०४५-२०५० पर्यंत बहुतांशी विकसित देश होण्याची वाटचाल ह्या एका शोधामुळे अनेक दशकांनी अलिकडे आली.
लोकसंख्या, प्रदुषण, कमी दरडोई ऊत्पन्न, रिसोर्सेस चे पीक युटिलायझेशन हे प्रश्न काही क्षेत्रात आज भेडसावत आहेत त्यांचे भयावह परिणाम ह्या एका शोधाने किती हलके केले हे सगळे वाचणे खूप रंजक आहे. समृद्धी देणारे शोध गौरवल्या जातात पण जे भयानक काही घडू शकले असते ते घडू न देणार्‍या शोधांचे यश केवळ हाईंडसाईट्मध्ये बघून लक्षात येत नसल्याने त्याचे महत्व चटकन ऊमगून येत नाही.
लवकरच सगळे स्टॅट्स आणि अ‍ॅनालिसिस लिहायचा प्रयत्न करतो आहे.

यामध्ये गणिती शोध चालतील का? गणितातील संशोधनासाठी इतर पारितोषिके असली तरी त्यांना नोबेल मिळू शकत नाही आणि धाग्याचा रोख मुख्यत्वे नोबेल पारितोषिकाविषयक आहे.

१८४६ मध्ये जॅकोबी या गणितज्ञाने मॅट्रिक्सच्या आयगेन व्हॅल्यू शोधण्याची एक पद्धत सुचवली होती. या पद्धतीकडे जवळपास एक शतक दुर्लक्ष झाले कारण ही पद्धत सर्व प्रकारच्या मॅट्रायसेसना लागू पडत नाही आणि गाऊसने सुचवलेली एक सर्वसमावेशक पद्धत आधीपासून अस्तित्वात होती. पण जॅकोबीची पद्धत गाऊस पद्धतीपेक्षा कित्येक पटीने वेगवान आहे. १९५५ मध्ये जॉन ग्रीनस्टाट या गणितज्ञाने जॅकोबीच्या पद्धतीचे सुटसुटीत स्वरुप (जे अधिक समावेशकही आहे) प्रचलित केले. ग्रीनस्टाटच्या पद्धतीचे पहिले इंप्लिमेंटेशन १९६० मध्ये अस्तित्वात आले. तसेच हेही लक्षात आले की ही सर्वसमावेशक पद्धत नसली तरी रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम्समध्ये बहुतांश वेळा ही पद्धत वापरता येते.

याचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम काय? आयगेन व्हॅल्यू शोधण्याचे एक कारण असते बहुचलीय समीकरणे सोडवणे. सध्याच्या जगात कित्येक प्रश्न हे बहुचलीय समीकरणे सोडवणे या गटात मोडतात. गूगल/फेसबुक वगैरे तुमच्या डेटाला प्रोसेस करते किंवा मशीन लर्निंग करते तेव्हा कित्येक सहस्त्र चलांतील समीकरणे सोडवत असते. इथे गाऊसची पद्धत वापरल्यास हे सर्व इतक्या वेगाने कधीच डेटा अ‍ॅनॅलिसिस करू शकत नाहीत. या मर्यादेमुळे सोशल नेटवर्किंग आणि इंटरनेट युग या संकल्पना पुढची काही दशके तरी अस्तित्वात येऊ शकल्या नसत्या. पण ही पद्धत बहुतांशी वेळा संशोधन क्षेत्रांतील व्यक्ती वगळता कोणाला फारशी ठाऊक नसते. नोबेल तर जाऊच दे पण कोणतेही पारितोषिक न मिळालेल्या शोधांपैकी, ज्यांचा आजच्या दैनंदिन जीवनावर प्रचंड प्रभाव पडला आणि या उदाहरणात पुढची कित्येक वर्षे तो प्रभाव जाणवेल, हा मला सर्वाधिक महत्त्वाच्या शोधांपैकी एक वाटतो.

@ हायझेनबर्ग - काय हा योगायोग Happy
"लवकरच सगळे स्टॅट्स आणि अ‍ॅनालिसिस लिहायचा प्रयत्न करतो आहे."
जरूर लिहा, वाचायला आवडेल.
धन्यवाद.

खरं म्हणजे एडिसनला अनेक नोबेल पारितोषिकं मिळायला हवी होती. त्याच्यामुळे तर किती प्रभाव पडला आहे आपल्या आयुष्यावर. त्याला नोबेल देण्याऐवजी थॉम्सन आणि ओवेन रिचर्डसन यांना पारितोषिक मिळाली. दुर्दैवी आहे हे!
अजूनही नोबेल कमिटी चूक सुधारू शकते. एडिसनला 'नोबेल जीवनगौरव' पुरस्कार द्यावा.

बेस्ट धागा आहे आहे हा!
सगळ्यांचे प्रतिसाद ही उत्तम!
वाचत राहणार.
@ सं.भा.--- कार्ल ड्जेरस्सि...यांच्या बद्दल काहीच माहित नव्हते...इथे दिल्या बद्दल आणि डोक्यात वाचन किडा टाकल्या बद्दल धन्यवाद!

@ पायास... गणितातील गोष्टी वाचायला जास्त मजा येईल. असे माझे वै म.
सामन्य माणसाच्या दृष्टिने गणिताचा 'असाही' लोकोपयोगी काही उपयोग असतो हे वाचायला नक्की आवडेल.

"पिल" हा फार उपयुक्त शोध आहे याबद्दल असहमत.
गर्भनिरोधक गोळी बायकांच्या हॉर्मोन्स सायकलमध्ये फेरफार करून आणि ओव्ह्युलेशन सप्रेस करून काम करते. यापेक्षा कितीतरी सोपे नॉन हॉर्मोनल मार्ग उपलब्ध आहेत आणि ते पुरुषांनी वापरल्यास त्याचे इतरही फायदे आहेत.
एचआयव्ही सारख्या आजारापासून पिल संरक्षण करू शकत नाही. गर्भनिरोधाची सगळी जबाबदारी बायकांवर टाकली असता त्यांना त्यांच्या नवऱ्यांपासूनच एसटीडी होण्याची संभावना असते. आणि एचआयव्ही सारख्या रोगामध्ये हे गर्भधारणेआधी माहिती नसेल तर होणाऱ्या बाळाला जन्मतः रोगाची लागण होऊ शकते.भारतात सरकारनी कितीही फुकट तपासण्या आणि सोयी उपलब्ध करून दिल्या असल्या तरी गरीब बायका क्वचितच प्रेग्नन्सीआधी एचआयव्ही चाचणी करून घेतात. पण सरकारच्याच गर्भनिरोधक गोळीच्या प्रचारामुळे (आणि फुकट वाटपामुळे) गोळी मात्र सगळ्यांना परिचित आहे. काँडोम्सचे पण विनामूल्य वाटप होते पण पुरुषांनी या बाबतीत स्वतःला सूट दिलेली दिसते. पुरुषांनी गर्भनिरोधाची जबाबदारी घेतली तर असे आजार कमी होतील आणि पुरुषांचा सुद्धा अशा आजारापासून बचाव होईल.
याव्यतिरिक्त पिलचे अनेक साईड इफेक्ट्स आहेत ज्यामुळे स्त्रियांना ती घेणे आणि घेत राहणे अडचणीचे वाटू शकते.

सई, काही अंशी सहमत. हाब आणि भावे यांचे प्रतिसाद वाचून तू लिहिलेलंच मला वाटलं होतं.
त्याचे दीर्घ कालीन वापराने होणारे साईड इफेक्ट्स आणि आणि एस टी डी पासून काहीही संरक्षण नसणे या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करता नये.

सई/मेधा
बाकी प्रश्नांची ऊत्तरं शोधाबद्दलच्या सविस्तर माहितीपर प्रतिसादात येतील पण
एचआयव्ही आणि एसटीडीचा पिलशी काय संबंध आहे ते कळाले नाही. पिलचा वापर केला किंवा नाही केला त्याने एचआयव्ही आणि एसटीडी बाधित होण्या न होण्याचा परस्पर काय सबंध आहे?

पिल मुळे एचआयव्ही आणि एसटीडी ची लागण होत नाही असे कोणी म्हणत असेल तर ते नक्कीच चूक आहे.

हाब, बर्‍याच लोकांमधे पिल म्हणजे सिल्व्हर बुलेट अशा प्रकारचे गैरसमज होते, अजूनही आहेत. अशा समजुतीमुळे स्त्रिया आणि पुरुष इतर संभाव्य धोक्यांकडे दुर्लक्ष करतात, पिलमुळे गर्भ निरोधन ( आणि काही स्पेसिफिक केसेस मधे हॉर्मोनल ट्रीटमेंट) यापलिकडे संरक्षण नाही हे बर्‍याच लोकांना माहित नसते, एकदा दोनदा सांगून पचनी पडत नाही.

पिलच्या दीर्घकालीन वापराने आणि पिल बंद केल्याने होणारे परिणाम याबद्दल पण बर्‍याच लोकांना काहीही माहिती नसते.

जेम्स वेस्ट आणि निकोला टेस्ला यांच्याबद्दल लिहायचं मनात आहे बर्‍याच दिवसांपासून. आता सवड काढून लिहिते.

टेस्ला च्या केस मधे नोबेल कमिटी , न्यूज मिडिया , खुद्द टेस्ला आणि एडिसन यांचे फार गुंतागुंतीचे कनेक्शन आहे

मला व्यक्तीगत जनुकीय संपादनामध्ये (gene editing)झालेले नजिकच्या काळातले संशोधन व शोध महत्वाचे वाटतात. CRISPR cas9" gene editing technology किंवा zinc fingers वगैरे. क्रिस्पर प्रॉमिसिंग आहे आणि क्लिनिकल ट्रायल्स सुरु झाल्या आहेत. बहुतांश रोगांची मुळं जनुकीय असल्याने मानव जातीला होणारे फायदे कल्पनातीत आहेत. क्रिस्पर चा शोध जेनिफर डाउड्ना व आणि एका संशोधिकेने लावला आहे. दोन्ही महीला आहेत हे विशेष. मानव जातीला वरदान ठरेल अशा संशोधनात महीला आघाडीवर आहेत हे वाचून छान वाटले होते.

ओके.. हे शोधाचा वापर करणार्‍याच्या गैरसमजातून ऊद्भवणारे धोके आहेत.. तसे ते पुरेशा माहितीअभावी प्रत्येक गोष्टीतच शक्य आहे. शोधाशी आणि संशोधकाशी त्याचा सबंध नसल्याने आपण ह्या चर्चेत ते सध्या बाजूला ठेऊयात.

टेस्ला आणि एडिसन बद्दल नक्की लिहा. टेस्ला/एडिसन/वेस्टिंगहाऊस आणि जेपी मॉर्गन ह्यांच्यातल्या ईलेक्ट्रिसिटीच्या कमर्शिअलयाझेशन वरून त्याकाळी घडलेल्या विवादास्पद नाट्यावर २०१७ मध्ये 'द करंट वॉर' सिनेमा आला होता. बघायचा राहून गेला आहे.

<< आज अस्तित्वात असलेले कम्युनिकेशन आणि ट्रॅवलच्या (लहान वा मोठे) कुठल्याही माध्यमाच्या मुळाशी हेच समीकरण असावे.>>
फक्त भौतिकशास्त्राचा विचार केला तर हो, तंत्रज्ञान आणि गणिताचा विचार केला तर मॅक्स्वेल आणि फुरिये !

तुम्हाला माझा मुद्दा कळलेला दिसत नाही.
जेव्हा तुम्ही कुठल्याही शोधाला समाज बदलण्याचे वगैरे क्रेडिट देता, तेव्हा त्यापेक्षा सोपे किंवा सहज दुसरे काही नसले तरच त्या क्लेममध्ये तथ्य आहे.
या केस मध्ये पिल पेक्षा अधिक सोपे आणि सेफ मार्ग आधीच उपलब्ध होते. अगदी पुरातन काळापासून. आणि पिलमुळे फक्त कुटुंबनियोजनाची जबाबदारी बाईवर देण्यात आली. तीसुद्धा धोका पत्करून.

>>>>एचआयव्ही आणि एसटीडीचा पिलशी काय संबंध आहे ते कळाले नाही. पिलचा वापर केला किंवा नाही केला त्याने एचआयव्ही आणि एसटीडी बाधित होण्या न होण्याचा परस्पर काय सबंध आहे?
तुम्ही पिल ही आयडियल मोनोगॅमी असलेल्या लग्नात फक्त गर्भनिरोधासाठी वापरली जाते असे अझम्पशन करून लिहिता आहात. पण ते खरेच तसे आहे का?
विस्कटुनच सांगायचे झाले तर एखाद्या विविहीत स्त्रीचा नवरा (किंवा ती स्त्री स्वतःच) अनफेथफुल असेल आणि संबंधित सर्व व्यक्ती फक्त "पिल" वर अवलंबून असतील तर एसटीडी होण्याची शक्यता कितीतरी पटीने वाढते (कॉन्डोमच्या तुलनेत). कॉन्ट्रासेप्शन हे फक्त मुले टाळण्यासाठी असते हे गृहीतक असेल तर तुमच्या म्हणण्यात थोडेसे तथ्य आहे. पण तुम्ही "सामाजिक" पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहिले तर कॉन्ट्रासेप्शन इज मच मोअर दॅन दॅट! अमेरिकेत यावर इलेक्शनसुद्धा लढवली जाते.

>>>ओके.. हे शोधाचा वापर करणार्‍याच्या गैरसमजातून ऊद्भवणारे धोके आहेत.. तसे ते पुरेशा माहितीअभावी प्रत्येक गोष्टीतच शक्य आहे.
तुम्ही कुठल्याही गर्भनिरोधाबद्दल माहिती देणाऱ्या वेबसाईटवर जा. तिथे पिलच्या निगेटिव्ह इफेक्ट्समध्ये एसटीडी होण्याचा धोका वगैरे सगळी माहिती असते. आणि काँडोम्सच्या निगेटिव्ह पॉईंटमध्ये "रिलक्टंस टु युज फ्रॉम मेल पार्टनर" हा पॉईंट असतो (मायबोलीवर आयरोल इमोजी नाही बहुतेक).
मुद्दा असा की एखाद्या स्त्रीला जरी माहिती असेल की पिल घेतल्यामुळे तिला एस्टिडीचा धोका आहे, तरी ती तिच्या पार्टनरला कॉन्डोम वापरण्यास सक्ती करू शकते का? मग निदान मूल तरी नको व्हायला म्हणून त्यातला त्यात गोळी बरी. या परिस्थितीमध्ये पिलचा समाजावर पॉझिटिव्ह इफेक्ट आहे की निगेटिव्ह?

या केस मध्ये पिल पेक्षा अधिक सोपे आणि सेफ मार्ग आधीच उपलब्ध होते. अगदी पुरातन काळापासून. आणि पिलमुळे फक्त कुटुंबनियोजनाची जबाबदारी बाईवर देण्यात आली. तीसुद्धा धोका पत्करून. >> सई , अगदी माझ्या मनातलं लिहिलंस.

हाब नुसतेच गैर समज नाहीत तर पिल ही स्त्रियांची जबाबदारी आणी त्रास / धोके हे त्यांनाच. पुरुषांना त्रास काहीच नाही. यामुळे पिलचं मार्केटिंग सरकारी यंत्रणेमार्फत फार पद्धतशीरपणे केलं गेलंय भारतात आणि इतर डेव्हलपिंग देशात .

*कॅथोलिक चर्चचा पिल्स , काँडोम वा इतरही प्रकारचे गर्भ निरोधन याला कायम विरोध आहे . कदाचित या कारणामुळे नोबेल कमिटीने या शोधाकडे दुर्ल्क्ष केले असेल .

इतर क्रिश्चियन डिनोमिनेशन्स चा पण असेल, मला माहिती नाही.

जेव्हा तुम्ही कुठल्याही शोधाला समाज बदलण्याचे वगैरे क्रेडिट देता, तेव्हा त्यापेक्षा सोपे किंवा सहज दुसरे काही नसले तरच त्या क्लेममध्ये तथ्य आहे. या केस मध्ये पिल पेक्षा अधिक सोपे आणि सेफ मार्ग आधीच उपलब्ध होते. अगदी पुरातन काळापासून. >> काय मार्ग होते?
तुम्ही काँडोम किंवा तत्त्सम पुरुषांनी वापरावयाच्या उपायांबद्दल बोलत आहात का? (हो असे गृहीत धरतो)
तुम्ही अ‍ॅपल्स आणि ऑरेंजेसची चुकीची तुलना करीत आहात. वरवर दोन्ही गोष्टी सारख्या वाटत असल्या तरी त्या वेगळ्या आहेत, कसे ते सांगतो.
काँडोम (हा सुद्धा एक अतिशय महत्वाचा शोध आहेच) हे (ईकॉनॉमिक्सच्या भाषेत) Ex-Ante मेजर आहे पिल हे Ex-Post. थोडक्यात Ex-Ante म्हणजे काही घडण्याआधी करावयची तजवीज आणि Ex-Post म्हणजे काही घडल्यानंतर करावयची तजवीज. हा फरक ध्यानात घेतलात तर तुम्हाला दुसरा अतिशय मोठा आणि सगळ्यात महत्वाचा फरक लगेच लक्षात येईल. तो म्हणजे काँडोम पुरुषाच्या हातात आहे आणि पिल स्त्रीच्या.
हा दुसरा फरक तुमचा पुढचा आक्षेप अगदीच निकालात काढतो << पिलमुळे फक्त कुटुंबनियोजनाची जबाबदारी बाईवर देण्यात आली. तीसुद्धा धोका पत्करून. >>
पिलकडे तुम्ही जबाबदारी म्हणून बघता की 'निर्णयाचा हक्क' हा तुमच्या दृष्टीकोनाचा भाग झाला. पण गर्भधारणा कधी होऊ द्यायची हा निर्णय सर्वस्वी स्त्रीचा आहे असे गृहीत धरल्यास (तुमचा ह्यावर आक्षेप नसावा Happy ) पिल ही स्त्रीच्या हातावर ठेवलेली निर्णायक शक्तीच नव्हे का? तुम्ही म्हणता ही लादलेली जबाबदारी आहे मी म्हणतो हे स्त्री सक्षमीकरणाचे महत्वाचे शस्त्र आहे.
कुटुंबात जोडीदारांच्या सांजस्याने काय होते ही गोष्ट वेगळी पण जगात सगळीकडे (विकसित, विकसनशील किंवा मागसलेल्या देशात ऊतरत्या क्र्माने का होईना) प्रामुख्याने पुरूषप्रधान कुटुंबपद्ध्ती असतांना कुटुंबाचे आणि व्यक्ती म्हणून स्वतःचे भविष्य स्वतः ठरवण्याची शक्ती स्त्रीच्या हातात असणे तुम्हाला आक्षेपार्ह का वाटते आहे?

पिल बद्दलचा तुमचा पूर्वग्रह 'साईडईफेक्ट्स' ह्या एका शब्दामुळे असेल तर ...
साईडईफेक्ट हे शोधामुळे नसून पिलच्या ईंडस्ट्रिअल प्रोसेसमुळे आहेत. कमी किंमतीचे आणि कमी दर्जाचे ईन्ग्रिडिअंट्स, ऊत्पादनात प्रक्रियेतली ढिसाळ कामगिरी, पैशांसाठी ऊत्पादनाच्या दर्जाबद्दल (ग्राहकाने आणि ऊत्पादकाने) दाखवलेली अनास्था ह्या गोष्टी आहेतच, पण साईड ईफेक्ट्सच्या केसेस ह्या ऊत्पादन आणि खप ह्यामानाने अगदीच अगदीच नगण्य आहेत ही नंबर्स देऊन प्रुव करता येण्यासारखी फॅक्ट आहे.

एखाद्या विविहीत स्त्रीचा नवरा (किंवा ती स्त्री स्वतःच) अनफेथफुल असेल आणि संबंधित सर्व व्यक्ती फक्त "पिल" वर अवलंबून असतील तर एसटीडी होण्याची शक्यता कितीतरी पटीने वाढते (कॉन्डोमच्या तुलनेत). >> पुन्हा चुकीची तुलना.. पिल (गर्भनिरोधक) आणि एसटीडीचा (गुप्तरोग) सबंध तुम्ही का जोडू पाहता हे अजूनही माझ्या समजण्यापलिकडे आहे. एक गोष्ट प्रजनन ह्या नैसर्गिक शरीरक्रियेशी निगडीत आहे आणि दुसरी रोगावस्था आहे. अतिशय भिन्न गोष्टी... एसटीडीचा प्रसार समलैंगिक लोकांतही होतो ही फॅक्ट तुम्ही लक्षात घेतल्यास त्याचा पिल घेण्या न घेण्याशी, मोनोगॅमस किंवा पॉलिगॅमस असण्याशी दुरान्वयेही सबंध नाही हे सत्य धडधडीत दिसते.
पुन्हा सांगतो काँडोम आणि पिल ह्या भिन्न परिणाम साधण्यासाठीच्या भिन्न गोष्टी आहेत.. त्या एकमेकांना रिप्लेसेबल नाहीत.... दोन्हींमुळे गर्भधारणा रोखता येते हे एकच साम्यस्थळ आहे पण आधी म्हणालो तसे दोन्हींमध्ये परुणाम आणि स्टेकहोल्डर्स वेगळे आहेत.

मुद्दा असा की एखाद्या स्त्रीला जरी माहिती असेल की पिल घेतल्यामुळे तिला एस्टिडीचा धोका आहे, तरी ती तिच्या पार्टनरला कॉन्डोम वापरण्यास सक्ती करू शकते का? >> 'सक्ती' शब्दाचा वापर ईंट्रेस्टिंग आहे.. ईंडिकेशन ऑफ टोटल प्रिज्यूडिस. Happy
सामंजस्याने 'साधन कुठले वापरावे' ही निर्णय प्रक्रिया पार पडत असेल तर सक्तीची गरज पडू नये. सक्ती विषय आला की त्या सक्तीचे परिणाम टाळण्यासाठी प्रत्येकाकडे आपला ऊपाय असावा हे योग्य नव्हे का?

मग निदान मूल तरी नको व्हायला म्हणून त्यातला त्यात गोळी बरी. या परिस्थितीमध्ये पिलचा समाजावर पॉझिटिव्ह इफेक्ट आहे की निगेटिव्ह? >> हे तुम्ही आज आत्मविश्वासाने बोलू शकता पण पिलचा शोध काही काल नाही लागला... ७०-८० वर्षांपूर्वीच्या स्त्रियांसाठीच्या परिस्थितीचा विचार करू जाता - आपल्या आज्या नोकरी करत होत्या की ४-६ मुले सांभाळत होत्या ?, मग आली आई लोकांची पिढी २-३ मुलांची, आपली पिढी १-२ मुलांची आणि आता विशी बावीशीतली पिढी असे संक्रमण तर तुम्ही बघू शकता? बरोबर ? मग हे पिल मुळे घडून आले की काँडोममुळे असे तुम्हाला वाटते (तुम्ही अजूनही काँडोमसाठी सक्ती करावी लागते असे म्हणालात हे प्लीज नोट करा Happy )
ह्या अनुषंगाने मीच तुम्हाला विचारतो पिलचा समाजावर पॉझिटिव्ह इफेक्ट आहे की निगेटिव्ह?

असो...
वाफेच्या ईंजिनाचा शोध लागला... त्याचे रेल्वे ईंडस्ट्रीमध्ये रुपांतर झाले... अनेक पिढ्यांनी त्यावर प्रगती केली... भरभराट झाली...मग वाफेच्या ईंजिनासाठी कोळसा जाळावा लागतो असे अचानक Uhoh लक्षात आले.. आता किती पोल्यूशन झाले केवढा आत्मघातकी शोध होता हे आज म्हणणे माझ्या मते अतिशयच स्वार्थी आणि सोयीस्कर आहे. Proud

पिल हे Ex-Post. थोडक्यात Ex-Ante म्हणजे काही घडण्याआधी करावयची तजवीज आणि Ex-Post म्हणजे काही घडल्यानंतर करावयची तजवीज. >> बर्थ कंट्रोल पिल हे कंडोम पेक्षा ही फार आधी करावयाची तजवीज आहे हो . सतत घ्यायच्या गोळ्या असतात. तुम्ही मॉर्निंग आफ्टर पिल म्हणत असाल तर तसे स्पष्ट करा प्लीज.
आणि बर्थ कंट्रोल पिल्सचे दीर्घ कालीन वापराने होणारे परिणाम हे त्यातल्या अ‍ॅक्टिव्ह इन्ग्रेडियंटचेच आहेत. फिलर्स, मॅयुफॅक्चरिंग क्वालिटी वगैरे वगळून सुद्धा बर्थ कंट्रोल पिल्सचे लॉन्ग टर्म साइड इफेक्ट्स आहेत

नोप... नाव आणि अर्जन्सी शेड्यूल वेगळे असले तरीही कन्सेप्चुअली आणि कलेक्टिवली दोन्न्हीही 'बर्थ कंट्रोल पिल' च आहेत. वेगळे स्पष्टीकरण वगैरे गरज नाही.
Ex-Ante आणि Ex-Post हे फिगरेटीव टर्म्स मधे म्हणालो... (लिटरल...लाईक नाईट स्टँडसच्या टर्म्स मध्ये नाही)... नॅचरल ईंटरकोर्स होणार/झाला आहे म्हणूनच तर पिल ची गरज पडेल ना? ईंटरकोर्स घडून गेल्यानंतर काँडोम असूनही त्याचा काही ऊपयोग आहे का?

आणि बर्थ कंट्रोल पिल्सचे दीर्घ कालीन वापराने होणारे परिणाम हे त्यातल्या अ‍ॅक्टिव्ह इन्ग्रेडियंटचेच आहेत. फिलर्स, मॅयुफॅक्चरिंग क्वालिटी वगैरे वगळून सुद्धा बर्थ कंट्रोल पिल्सचे लॉन्ग टर्म साइड इफेक्ट्स आहेत >> वेल... मला काही 'अमूक मेथड वापरा' असे सजेस्ट करायचे नसल्याने (मी कसलाच पुरस्कर्ता नाही) आणि माझा हेतू 'रेट्रोस्पेक्टमध्ये पिलचा एक क्रांतिकारी शोध म्हणून समाजावर पडलेल्या प्रभवाचे अ‍ॅनालिसिस' असा असल्याने ते लिहिपर्यंत सध्या साईडईफेक्ट आणि टेक्निकल/ मॅन्यूफॅक्स्चरिंग वगैरे प्रोसेस बद्दलचे सविस्तर डिस्कशन (जे ही खरंतर डेटा ड्रिवन असावे) लांबणीवर टाकू ईच्छितो. Happy

"माझा हेतू 'रेट्रोस्पेक्टमध्ये पिलचा एक क्रांतिकारी शोध म्हणून समाजावर पडलेल्या प्रभवाचे अ‍ॅनालिसिस' असा असल्याने ते लिहिपर्यंत सध्या साईडईफेक्ट आणि टेक्निकल/ मॅन्यूफॅक्स्चरिंग वगैरे प्रोसेस बद्दलचे सविस्तर डिस्कशन (जे ही खरंतर डेटा ड्रिवन असावे) लांबणीवर टाकू ईच्छितो. "
+१
वरील प्रतिसादांमध्ये सर्व मान्यवरांनी मांडलेले मुद्देही बरोबरच आहेत फक्त मूळ विषयात काही गोष्टींची सरमिसळ होते आहे असं वाटतंय. पिल्स चे साईड इफेक्टस वगैरे सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण त्यांचा आणि HIV व STD चा अर्थाअर्थी काहीच संबंध नाही आहे. STD होण्यासाठी (अत्यल्प प्रमाणात HIV सुद्धा ) ईंटरकोर्स व्हायलाच पाहिजे अशी गरज नाहीये. तो ओरल सेक्स, संपर्कात आलेल्या दोन्ही व्यक्तींची दुखापतग्रस्त त्वचा आणि कोणत्याही कारणाने (जसे जीभ चावली जाऊन, माउथ अल्सर फुटून वा अतिउत्साहात ओठ चावले जाऊन ) दोन्ही व्यक्तींच्या मुखातून होणाऱ्या रक्तस्त्रावाच्या माध्यमातूनही संक्रमित होऊ शकतो.
पिल्स ची गोष्ट मात्र वेगळी आहे जर ईंटरकोर्स होत/होणार असेल तरच तिचा वापर होणार आणि तोहि कुठल्या रोगापासून बचाव करण्यासाठी नसून केवळ प्रेग्नन्सी टाळण्यासाठीच. बाकी कंडोमची देखील काही स्त्री-पुरुषांना अलर्जी असते पण तो विषयच वेगळा आहे.
(हुश्श... झाला बुवा एकदाचा प्रतिसाद लिहून, आधी खूप संकोच वाटत होता.)

नॅचरल ईंटरकोर्स होणार/झाला आहे म्हणूनच तर पिल ची गरज पडेल ना? ईंटरकोर्स घडून गेल्यानंतर काँडोम असूनही त्याचा काही ऊपयोग आहे का? >> इंटरकोर्स घडून गेल्यानंतर ( जर ओव्ह्युलेशन च्या काळात झाला असेल तर ) बर्थ कंट्रोल पिलचा पण काही उपयोग नसतो .

माझ्यामते रेइन्फोर्स्ड सिमेंट काँक्रीटचा शोध हा समकालीन मानवी जीवनावर भरपूर मोठ्या प्रमाणावर प्रभाव पाडणारा आहे.

रेइन्फोर्स्ड सिमेंट काँक्रीट Joseph Monier याने लावला.
रेइन्फोर्स्ड सिमेंट काँक्रीट वापर करून पहिली बहुमजली इमारत उभारण्याचे श्रेय François Coignet नावाच्या फ्रेंच उद्योजकाकडे जाते.

मानवी लोकसंख्यावाढीच्या वेगाच्या प्रमाणात लागणारी घरांची मागणी, बहुमजली बांधकामे करता आली नसती तर, कशी काय पुरवता आली असती असा विचार करता मती कुंठित होते.

सगळ्यात परिणाम कारक माझ्या मते विद्युत बलाने चुंबकत्व तयार करणे.‌ या शोधाने एसी,डीसी इले. मोटार तयार झाल्या व रोजच्या जीवनात जीवनावश्यक यंत्र यावरच चालतात.