काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या एक प्रसिद्ध शहरात आलेला अनुभव लिहित आहे. जसा घडला तसाच लिहित आहे.
लांडगापूरात (शहराचे नाव बदलले आहे) सकाळी आलो. काही कामे होती. काही व्यक्तींच्या भेटी घ्यायच्या होत्या. दिवसभर थांबून संध्याकाळी परतायचे होते. म्हणून लॉज बुक करायचा होता. बसस्थानकाच्या आसपास एक दोन लॉज पाहिले. आधी गुगलवर पण आसपास कुठे लॉज आहेत ते पाहून आलो होतो. त्यावरून जी कल्पना केली होती, प्रत्यक्षात मात्र भलतेच चित्र होते. इतकी शहरे फिरलोय. गुगलबाबत शक्यतो असे होत नाही. पण या शहरात उतरल्यापासूनच बहुतेक धक्कादायक अनुभव यायचे होते. शेवटी गुगलचा नाद सोडून आसपास जो लॉज दिसेल तिथे जाऊन चौकशी करायचे ठरवले. बस स्थानकातून बाहेर आल्यावर डाव्या बाजूला थोड्या दूर अंतरावर असलेल्या चौक आणि रस्त्याला लागून काही लॉज दिसत होते. तिकडे जाऊन एकएक लॉजवर चौकशी सुरु केली. बहुतेक लॉज सुनसान होते. दुरुस्तीची/साफसफाईची कामे काढलेली. कोण इथे येतंय कि नाही असे वाटावे असे गूढ वातावरण. ज्याला रेस्टॉरंट आहे असा लॉज पाहत होतो. काही ठिकाणी रूम्स फारच कोंदट अवस्थेत. तर काही ठिकाणी रूम्स चांगल्या पण रेस्टॉरंट नाही अशी तऱ्हा. मला सगळे बोअर वाटत होते.
एकेक लॉज बघता बघता एक लॉज दिसला ज्याला खाली रेस्टॉरंट होते. गर्दी होती. सर्व माझ्या अपेक्षेप्रमाणे होते. रेस्टॉरंटमधल्या कौंटरवर चौकशी केली. तेंव्हा रूम बुकिंग साठी त्याने आतल्या बाजूला जायचा इशारा केला. आत गेलो तर तिथे थोड्या कोंदट अंधाऱ्या जागेत एक काउंटर दिसला. काउंटरवरचा माणूस तिथेच बाजूला डबा उघडून जेवत बसला होता. मला पाहून त्याने कपाळावर आठ्या घालून "काय पाहिजे" अशा अर्थाने मान उडवली. मी "डबलबेड रूम आहे का? रेट काय आहे?" असे विचारताच त्याने ओरडून वेटरला बोलवून घेतले. त्याला मला रूम दाखवायला सांगितले. वेटर मला लिफ्टमधून वरती घेऊन गेला. वरती गेल्यावर पुन्हा तेच. गूढ वातावरण. कामे काढलेली. वेटरला विचारले, "या रूम्स सगळ्या रिकाम्या आहेत का? कोणी राहते कि नाही इथे?" तर तो म्हणाला "सगळ्या फुल्ल आहेत. एक दोनच रिकाम्या आहेत". त्यातली एक पसंत करून खाली आलो. काउंटरवरच्या व्यक्तीचे जेवण झाले होते. रूम नंबर सांगताच त्याने रजिस्टर उघडून मला तिथे रूम बुक करत असल्याची नोंद करायला सांगितले. तिथे सगळा तपशील लिहिल्यावर त्याने माझे आयडी कार्ड स्कॅन करून मला परत दिले. नंतर काउंटरवरच्या मदतनीसाने रूमचे भाडे भरण्यासाठी म्हणून माझे क्रेडीट कार्ड घेतले.
"तुमच्याबरोबर कोण आहेत? त्यांचे पण आयडी प्रुफ दाखवा" काउंटरवरचा तो मनुष्य मला म्हणाला. मी चक्रावलो. माझे आयडी प्रुफ दाखवल्यावर अजून बरोबरच्या व्यक्तीचे आयडी प्रुफ सुद्धा कशाला हवे? हा आगाऊपणा आहे असे मला वाटले. कारण मागे एकदा मित्राबरोबर याच शहरात थांबलो होतो, तेंव्हा हॉटेलमध्ये आमच्यापैकी एकाचेच आयडी कार्ड बघितले होते.
"नाही. त्यांचे कोणतेही आयडी कार्ड आणलेले नाही" मी निर्विकारपणे सांगितले
"असे कसे? काही न काही आयडी बरोबर आणले असेलच की" तो उद्दामपणे बोलला
"नाही. काहीच आणलेले नाही" मी ठाम
"कोण कोण आणि कितीजण आहात तुम्ही?"
"मी आणि माझी बायको"
"कुठे आहेत त्या?"
"शॉपिंगसाठी गेलीय नातेवाईकांबरोबर. येईलच इतक्यात इथे. कदाचित आम्हाला रूम लागणार पण नाही. लंच साठी रेस्टॉरंट मात्र लागेल. पण जर विश्रांतीसाठी किंवा फ्रेश होण्याची गरज वाटलीच तर असावी म्हणून रूम बुक करून ठेवत आहे"
"ठीक आहे. मग त्या आल्यावर तुमच्या फोनवर त्यांचा फोटो काढून मला पाठवा" असे म्हणून आपल्या मदतनीसाला त्याने माझे क्रेडीट कार्ड स्वाईप करायला सांगितले.
मी पट्कन हो बोलून गेलो. पण पुढच्याच क्षणी मला वाटले हा जरा जास्तीच आगाऊपणा सुरु आहे. तिचा फोटो काढून मी ह्याला कशाला पाठवायचा? भलतेच काहीतरी वाटू लागले.
"एक मिनिट थांबा. मला इथे रूम बुक करायची नाही" मी चढ्या आवाजात बोललो आणि त्या मदतनीसाच्या हातून क्रेडीट कार्ड जवळजवळ हिसकावूनच घेतले. सुदैवाने ते अद्याप त्याने स्वाईप केले नव्हते.
कार्ड घेऊन मी निघून जाऊ लागलो. तसा काउंटरवरचा मनुष्य बाहेर आला.
"ओ साहेब. तुम्ही रूम बुक केली आहे. आता तुम्ही असे जाऊ शकत नाही. कॅन्सल करायचे पाचशे रुपये भरा" असे म्हणून तो मला आडवा आला. त्याने माझा हात पकडायचा प्रयत्न केला. मी अवाक् झालो. कारण काहीही कारण नसताना तो सरळसरळ गुंडगिरीवर उतरला होता.
"हातघाई वर येण्याची काही गरज नाही. मी पैसे दिले नाहीत. मी रूम बुक केलेली नाही. कॅन्सल करायचे पैसे भरण्याचा प्रश्न येत नाही" मी बाहेर येत बोललो.
"अहो तुम्ही रूम बघून आलात. रजिस्टरमध्ये बुक केल्याची नोंद पण केलीय तुम्ही. आता मालक माझ्याकडून पैसे घेतील त्याचे काय?"
"तो तुमचा प्रश्न आहे. मी पैसे दिलेले नाहीत. माझ्या दृष्टीने रूम बुक झालेली नाही. रजिस्टरमधली एन्ट्री खोडून टाका. प्रश्न मिटला" असे बोलून मी बाहेर रेस्टॉरंट जवळच्या काउंटरपाशी आलो. इथे ग्राहकांची बरीच गर्दी होती.
"अहो तुम्ही आधी आत येऊन रजिस्टरमध्ये बुकिंग कॅन्सल करायची सही करा आणि फोनवर मालकांशी बोला. मगच जा" तो गुंड आतून ओरडू लागला.
मला लक्षात आले. हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. एव्हाना बाहेरच्या काउंटरवरचा मनुष्य (हा सुद्धा पोरसवदाच पण गुंड छापच होता) आतल्या गोंधळाने सावध झाला होता. याच्याबरोबर अजून एकदोघे होते.
"काय झाले?" त्याने विचारले.
"हे बघा मी रूम बुक केलेली नाही. मला करायचीही नाही. तरीही हा तुमचा माणूस जबरदस्तीने पैसे मागत आहे" मी सांगितले.
"अहो ह्यांनी रूम बघितली. रजिस्टरमध्ये एन्ट्री पण केली. बरोबर बायको आहे म्हणून सांगतात. पण त्यांचा आयडी मागितला तर थातूरमातूर कारणे सांगू लागलेत. निदान त्या आल्या कि त्यांचा फोटो तरी काढून पाठवा म्हणून सांगितले तर आता घाबरून पळून जात आहेत. हे लफडी करतात पण नंतर आमच्या डोक्याला त्रास होतो. आता रजिस्टरमध्ये एन्ट्री बघून मालक माझ्याकडून पैसे घेतील त्याचे काय? त्यांना मालकाशी तरी बोलायला सांगा" आतला गुंड आरडाओरडा करत बोलू लागला.
त्यावर चेहऱ्यावर छद्मी हास्य आणून बाहेरच्या काउंटरवरचा गुंड मला 'शहाणपणाचा' सल्ला देऊ लागला, "अहो घाबरू नका. मारणार नाही तुम्हाला तो. त्याच्याकडून मालक पैसे घेतील म्हणून तो बोलत आहे बाकी काही नाही. तुम्ही आत जा आणि मालकांशी फोनवर बोला. नाहीतर सरळ पाचशे रुपये देऊन जा"
"मारायचा काय संबंध? त्याच्या बापाचे खाल्लेले नाही. आणि आत जाण्याची काय गरज आहे? रजिस्टर इथे आणून द्या. मी एन्ट्री खोडून सही करतो. फोन सुद्धा इथे आणून द्या मी मालकांशी बोलतो" मी निग्रहाने पण आवाज चढवूनच बोललो.
"अहो हे हॉटेल आहे. इथे सगळे कस्टमर येत आहेत त्यांच्यासमोर आरडाओरडा कशाला करता? तुम्ही आत जा आणि काय ते सेटल करा. तो काय तुम्हाला मारत नाही. काळजी करू नका" इति बाहेरच्या काउंटरवरचा गुंड.
"हे बघा मी अनेक शहरे फिरलो आहे. पण इतकी अव्यावसायिक वृत्ती बघितली नव्हती. तुमच्या माणसाने माझ्या अंगाला हात लावला आहे मघाशी. तुमचे हॉटेल माझ्या कुटुंबासाठी सुरक्षित असेल असे वाटत नाही म्हणून मी निघून जात आहे" मी म्हणालो
"अहो हे भानगड करणारे वाटत आहेत. तुम्ही सरळ पोलिसांना बोलवा" आतल्या गुंडाने बाहेरच्या गुंडाला इशारा केला. त्याला वाटले पोलिसांना घाबरून मी आत यायला तयार होऊन 'सेटलमेंट' करेन.
"ठीक आहे. बोलवा पोलिसांना. बघूयाच माझा काय गुन्हा आहे" आता मी सुद्धा इरेला पडलो.
मला प्रकार लक्षात आला. मी कोणत्यातरी बाईला लॉजवर बोलवून घेत आहे जिचे माझ्याशी लग्न झालेले नाही, अशी त्या सर्वांनी आपली ठाम समजूत करून घेतली होती. आणि त्यावरून ब्लॅकमेल करून माझ्याकडून पैसे उकळण्यासाठी सगळे नाटक सुरु होते. मी स्थानिक नाही. बाहेरगावाहून आलोय याचा सुद्धा त्यांना अंदाज आला होता. त्यामुळे आत बोलवून मी मुकाट्याने पैसे दिले नसते तर मला पोलिसांची धमकी देऊन वा प्रसंगी मारहाण करण्यापर्यंत सुद्धा यांची मजल गेली असती. अन्यथा मालकाशी फोनवर बोलण्यासाठी मला आत बोलवण्याची काय गरज?
संस्कृती रक्षणचा ठेका घेतलेल्या एखाद्या सेनेचे हे पाळीव गुंड असावेत अशी माझी ठाम समजूत झाली होती. वेळ पडली असती तर फोन करून अजून चार जणांना त्यांनी बोलवून घेतले असते. या शहरात कामधंदे नसलेल्या तरुणांचे प्रमाण लक्षणीय आहे. वयात आलेल्या पोरांना तिकडे हेच उद्योग असतात. कोणाचे अफेअर आहे असा संशय जरी आला तरी यांचे नाक खुपसणे सुरु होते. माझ्या बरोबर येणाऱ्या महिलेच्या (मग ती माझी बायको असो अगर नसो) आयडी प्रुफशी त्यांना काही देणेघेणे असण्याचे नाही कारण नव्हते. माझे आयडी प्रुफ पुरेसे होते. माझा गुन्हा काय तर डबलबेड रूम बुक करू पाहत होतो आणि बरोबर जी स्त्री 'येणार होती' तिचा कोणताही आयडी पुरावा देण्याची माझी तयारी नव्हती. म्हणून त्यांच्यासाठी मी 'सावज' होतो.
मी सुद्धा पोलिसांना बोलवायची भाषा केल्यावर मग मात्र ते थोडे नरमले. मग काही न बोलता थोड्या वेळाने अत्यंत उद्विग्न मनाने मी तिथून बाहेर पडलो. काहीही कारण नसताना अत्यंत मनस्ताप झाला होता. या सगळ्यात माझी काय चूक होती तेच कळत नव्हते. बायकांना हॉटेलमध्ये आणून गुन्हे करण्याचे प्रकार घडतात हे मलाही माहित होते. पण माझे आयडी प्रुफ मी त्यांना दिलेच होते. 'तिच्या' फोटोची काय गरज? आमच्यात काय संबंध आहेत यांना कशाला हवे? आमचा विवाह झाला असेल अगर नसेल. यांना काय करायचे? तसेही विवाहबाह्य संबंध हा आता गुन्हा नाही. त्यामुळे अशा केसमध्ये जरी नंतर काही पोलीस चौकशी वगैरे झालीच तरी यांच्यावर काहीही बालंट येण्याचे कारण नाही. पण या शहरातले लोक अव्यावसायिक वृत्तीकरिता आणि दुसऱ्यांच्या व्यक्तिगत गोष्टीत नाक खूपसण्याकरता पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत. अन्यथा "आमच्या हॉटेलच्या नियमात तुम्ही बसत नाही. तुम्हाला इथे बुकिंग मिळणार नाही" एवढ्यावरच हा विषय संपला असता.
४९७ वे कलम कोर्टाने रद्द केलेय खरे. पण "विबासं असल्याचा संशयित" सुद्धा काही लोकांच्या दृष्टीने (तिऱ्हाईत असला तरी) गुन्हेगार ठरतो आणि ते त्याला त्रास देतात. या विचाराने दिवसभर डोके भणभणत राहिले.
बाकी, मायबोलीकर आपापली मते मांडायला मुक्त आहेत.
ता.क. : विषयाशी संबंधित जितके घडले आणि जसे घडले तितके सगळे सांगितले आहे. कोणाशीतरी बोलून मन मोकळे करणे हा सुद्धा एक उद्देश यामागे आहे. बाकी "ती स्त्री खरंच तुमची पत्नी होती का? तुम्हाला दुसरीकडे रूम मिळाली का? शहराचे नाव बदलून सांगायची काय गरज होती?" ह्या व अशासारख्या प्रश्नांना मी उत्तरे देणार नाही.
अनुभव भयंकर आहे.तुमच्या
अनुभव भयंकर आहे.तुमच्या हिमतीची कमाल आहे.
(बाय द वे, हल्ली कोणत्याही हॉटेल मध्ये रूम मध्ये राहणाऱ्या प्रत्येकाचे ओळखपत्र मागतात.मी आई आणि मुलगी शुक्रवारी रात्री 12.30 ला बोरिवली हॉटेल मध्ये चेक इन केले होते.(ऑफिस करून पुण्याहून, परीक्षा दुसऱ्या दिवशी 9 ला होती).तेव्हा सर्वांचे आयडी प्रूफ मागितले होते.मुलीचे माझ्याकडे आयडी प्रूफ तेव्हा नव्हते, शाळेची पावती, स्पोर्ट क्लास चे आयडी कार्ड असे बरेच काय काय दाखवले होते.
सध्या सगळीकडे आधार कार्ड ची सॉफ्ट कॉपी घेऊन फिरतो.एअरपोर्ट वर पण मागतात.
या हॉटेल मध्ये बायको चा फोटो दिला नाहीत हे बरे.त्याचा बराच वेगळा वापर झाला असता तुमच्याकडून पैसे न मिळाल्याने.एकंदर लोकांच्या भीतीवर पोट भरण्याचा धंदा दिसतो.जमल्यास ट्रिप अडव्हायजर वर त्या हॉटेल च्या रिव्ह्यू वर हा प्रकार टाका.हे मूळ मालका पर्यंत गेले नसल्यास त्यांना कळेल, ते सामील असल्यास तुम्हाला कांगावा करून उलटे आरोप होतील.पण लोकांपर्यंत केस पोहचेल.
तो लॉज सोडण्याचा निर्णय अगदी
तो लॉज सोडण्याचा निर्णय अगदी योग्य होता. वेळीच सावध झालात हे बरे झाले... अन्यथा पुढे अजुनही अनेक प्रकारचे धोके (पिनहोल कॅम वगैरे) अश्या वृत्तिंच्या व्यवस्थापनाकडून संभवू शकले असते
सर्व व्यक्तींचे आयडी प्रूफ
सर्व व्यक्तींचे आयडी प्रूफ मागणे यात विबासं हा एकच पॅरॅमिटर नाही
1. अ ने एका स्त्री ला आणले जिला तो ह्युमन ट्रॅफिकिंग साठी वापरणार आहे.आणि आयडी प्रूफ दिले नाही
2. अ आणि ब या जोडप्याने आयडी प्रूफ नसलेले क हे मूल पळवून आणले आणि कोणाला दत्तक म्हणून विकले
3. अ ने बायको ब चा खून करून मैत्रीण क ला बायको म्हणून हॉटेल ला आणले आणि नंतर तो ब चा खून मी नाही केला हे दाखवायला अलिबि म्हणून हॉटेल रजिस्टर ची मिस्टर अँड मिसेस एन्ट्री दाखवणार आहे.
सर्व लोकांचे आयडी प्रूफ पाहणे बरोबर वाटते.मात्र तुम्ही गेलात तसे हॉटेल असेल तर या आयडी प्रूफ कोपीज चा सुद्धा गैरवापर होऊ शकेल.
तिथले एकूण वातावरण बघून तिथून
तिथले एकूण वातावरण बघून तिथून लगोलग बाहेर पडलात हे बरे केलेत.
सर्व व्यक्तींचे आयडी प्रूफ मागणे यात विबासं हा एकच पॅरॅमिटर नाही <<< हो.
(यात अ बरोबर आलेल्या ब ने (जिचे कसलेही ओळखपत्र रेकॉर्डला नाही) खून/छळ इ. केला. हीदेखील एक शक्यता बसते.)
खोलीत राहणार्या सर्वच
या सर्व घटनाक्रमांत शेवटी एकच बाब जाणवते ती म्हणजे तुम्ही त्याने दिलेले कुठलेही पर्याय मान्य केले नाहीत (ओळखपत्र देणे / फोटो देणे / कॅन्सलेशन चार्जेस भरणे / आतल्या बाजूस जाऊन मालकाशी फोनवर बोलणे) म्हणून त्याने आरडाओरडा करणे / तुमच्या अंगाला हात लावणे हे तुम्हाला त्रासदायक वाटत असले तरीही त्यातदेखील मला फारसे चूकीचे वाटत नाही. तुमच्यासोबत त्या खोलीतर राहणारी व्यक्ति तुमची पत्नी असो अथवा नसो तिचे ओळखपत्र तुम्ही देऊ शकत होता. सोबत नसले तरी वॉट्सॅपवर तुम्ही घरुन मागवु शकला असतात. तेही शक्य नव्हते तर फक्त चेहर्याचा फोटो काढून तुम्ही त्याला फॉरवर्ड केला असतात तरी काही बिघडले नसते. त्याने स्वतः फोटो काढण्याऐवजी तुम्हाला फोटो काढून देण्याचा पर्याय सुचविण्यात त्याचा प्रामाणिकपणा दिसून येतो. त्याने रजिस्टरमध्ये परस्पर खाडाखोड केली म्हणून मालकाने त्याचे पैसे कापले असते परंतु तुम्ही त्याच्यासोबत हुज्जत घालत बाहेर निघून आलात त्यामुळे जितका आरडाओरडा झाला त्यायोगे तुम्ही पैसे न देता निघून गेलात या गोष्टीला अनायासे चारचौघे साक्षीदार मिळालेत व मालकाने त्याचे पैसे कापण्याचा धोका टळला. त्यामुळे पुरेसा आरडाओरडा झाल्यावर त्याने तुम्हाला जाऊ दिले यात तुमचा विजय झाला असे नसून त्याच्या पगाराला बसणारी चाट टळली हेच सिद्ध होते.
तुम्ही नाव लिहिले नसले तरीही हा प्रसंग कोल्हापुरातला आहे हे सहज कळते. तिथल्या लोकांचे सामान्य बोलणेही मोठ्या आवाजात व अनेकदा भांडण केल्यासारखे वाटते हे अख्ख्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. जसे पुणेकरांचे बोलणे अनेकांना शिष्टपणाचे / खवचट वाटते. तो सवयीचा आणि संस्कृतीचा भाग आहे. कोणी मुद्दाम तसे करीत नाही. त्याबद्दल वाईट वाटून घ्यायचे कारण नाही.
हॉटेल चालकांना किती मनस्तापातुन जावे लागते याची तुम्हांस कल्पना नसावी. हॉटेलमध्ये येऊन (केवळ ४९७ कलमाखालील नव्हे तर) कितीतरी प्रकारचे गुन्हे करणारे लोक येत असतात. अनेकदा यापायी पोलिस चौकशीस तोंड द्यावे लागते. कारकून किंवा मॅनेजरच नव्हे तर काही कोटींचा मालक असणार्या हॉटेल मालकाशीही पोलिस कसे अरेरावीने / शिव्या घालत बोलतात ते एकदा अनुभवा.
यापुढे कृपया या लोकांना सहकार्य करीत जा.
द वे, हल्ली कोणत्याही हॉटेल
द वे, हल्ली कोणत्याही हॉटेल मध्ये रूम मध्ये राहणाऱ्या प्रत्येकाचे ओळखपत्र मागतात.>>>>>+1
लॉज मध्येच नाही अगदी मोठ्या हॉटेल्स मध्ये सुद्धा.
काही हॉटेल्स मध्ये रजिस्टर मध्ये एन्ट्री केल्यावर फोटो सुद्धा काढतात.
मोबाईल वर फोटो मागणे हा शुद्ध आगाऊपणा होता. तो तुम्ही दिला नाहीत हे बरेच केलेत.
गेल्या कित्येक वर्षांपासून
गेल्या कित्येक वर्षांपासून हॉटेलमध्ये राहायला गेलेल्या सर्व सज्ञान लोकांचे id proof मागितले आहे आणि दिलेलं पण आहे. इतकी वर्षे pan card द्यायचे, आता ते चालत नाही address असलेले id proof लागतं. अजुन कधी मुलांचे मागितले नव्हते, पण वरील अनुभवावरून असे वाटते की ते सुद्धा बरोबर ठेवावे लागणार. परदेशी प्रवासात अनायसे सगळ्यांचे पासपोर्ट बरोबर असतात. बाकी आजकाल बऱ्याच मुली लग्नानंतर नाव, आडनांव बदलत नाहीत सोय म्हणून किंवा गरज नाही किंवा व्यक्तिगत चॉईस, त्यामुळे काय लगेच विबास होतं नाही. तसंच आडनाव ही concept फ़क्त काही राज्यात आहे, साऊथ मध्ये सरळ इंग्लिश initials वापरतात. कोणाला तरी कळणार का टी. दीपा चा नवरा पी. दीपक आहे का नाही ? शहर म्हणताय आणि decent हॉटेल सापडू नये ह्याच फारच आश्चर्य वाटतंय.
Register खाडाखोड आणि cancellation charges चा मुद्दा बरोबर आहे.
भारतात न येण्याचे आणखी एक
भारतात न येण्याचे आणखी एक कारण मिळाले!
उद्या रेस्टॉरंटमधे जेवायला गेलो, दुकानात काही विकत आणायला गेलो, किंवा नुसता रस्त्यावरून हिंडायला लागलो तरी आधार कार्ड, पॅन कार्ड मागतील!!
कसले कायद्याचे राज्य नि लोकशाही! गुंडगिरीच आहे सगळी!!
कोणत्याही हॉटेल मध्ये रूम
कोणत्याही हॉटेल मध्ये रूम मध्ये राहणाऱ्या प्रत्येकाचे फोटो ओळखपत्र मागतात. जर एका व्यक्तीचे फोटो ओळखपत्र नसेल तर या रजिस्टर्ड नावाची - ही व्यक्ती अशी लिंक ठेवण्यास मोबाईल वर फोटो मागितला असू शकतो. (फक्त एक शक्यता मांडतोय, समर्थन करत नाहीय.).
हा अत्यंत धक्कादायक अनुभव?
हा अत्यंत धक्कादायक अनुभव?
आम्ही त्यातल्या त्यात आधार
आम्ही त्यातल्या त्यात आधार/पॅन च्या सॉफ्ट कॉपी कोणाला न देणे इतके पाळतो.हार्ड कॉपी वर हँडेड ओव्हर फॉर वगैरे लिहून देतो.तसेही आपले आधार कार्ड बऱ्याच जागी पोहचले असल्याची शक्यता आहे.आता जिथे नाही पोहचलेले ते थांबवू शकतो.
लहान मुलांचे आयडी प्रूफ मागतात.किमान बर्थ सर्टिफिकेट ची सॉफ्ट कॉपी नुसती दाखवायला(फॉरवर्ड करायला नव्हे) जवळ असावी.
कोल्हापूर ला रेप्युटेड अशी बरीच हॉटेल आहेत, पंचवटी, अयोध्या वगैरे.मला वर्णन वाले शहर गाणगापूर वाटले होते.
मला वर्णन वाले शहर गाणगापूर
मला वर्णन वाले शहर गाणगापूर वाटले होते. >>> मला नाशिक वाटले
तिकडची लोकही अशीच वाटतात मला
तसे पाहता हल्ली सगळीकडे सगळ्या प्रकारचे नमुने सापडतात, सो शहरावरून काही बोलायला नको☺️
Achha,
Achha,
लांडगापूर वरून कोल्हापूर guess बरोबर वाटतोय
> Submitted by बिपीन चन्द्र
> Submitted by बिपीन चन्द्र हर... on 22 October, 2018 - 17:28 > +१
परिचित साहेब, तुम्ही त्या
परिचित साहेब, तुम्ही त्या हॉटेल मॅनेजरच्या दृष्टीने विचार करून बघा.
तुम्ही काही तासांसाठी हॉटेल रूम मागत होता, पूर्ण रात्र राहण्यासाठी नाही. तो तुम्हाला ओळखत नाही. तुम्ही काय कामासाठी कोल्हापुरात आला आहात ते त्याला माहिती नाही. हे सर्व लक्षात घेता त्याने खोलीत राहण्यार्या सर्वांचे ओळखपत्र मागितले यात गैर काही वाटत नाही.
तुम्ही ओळखपत्र मागितल्यावर आधी हो आणि मग नाही म्हणालात.
त्यानंतर तुम्हाला त्याने जर हातापायी वगैरे केली असेल तर ते मात्र चुकीचे आहे. एन्ट्री करून खाडाखोड करताना जर त्याचे व हॉटेल मालकाचे काही वाजणार असेल तर फार तर फोनवरून ते क्लॅरिफाय करायला हवे होते. तुम्ही जर ऑनलाइन रूम बूक केली असती तर काय केले असते अश्या परिस्थितीत?
फोटो काय फॉरवर्ड करायचा!
फोटो काय फॉरवर्ड करायचा! काहीही चाललय. नुसत्या फोटोवरून काय कळणार आहे? कुणाचाही फोटो पाठवला तरी तो व्हेरिफाय कसा करणार? अधिकृत सरकारी आय. डी. (लायसन्स, पासपोर्ट, आधार( ?)) वगैरे ठीक आहे.
झक्की - खरय तुमचं. भारतातल्या बर्याच श्या सिस्टीम्स ह्या जुन्या ब्रिटीश काळात ल्या नेटीव्हज वर अविश्वास दाखवणार्या आणी त्या व्यक्तीला स्वतःचं निरपराधित्व सिद्ध करायला लावणार्या आहेत.
सर्व सज्ञानांचं ओळखपत्र
सर्व सज्ञानांचं ओळखपत्र मागतात. यात विबासं हाच मुद्दा नसतो, तर अतिरेकी कारवाया वगैरे मुद्दे असतात.
मलाही यातला हात धरण्याचा प्रकार सोडला तर बाकी धक्कादायक नाही वाटलं खरं तर. फोटो मागणं हेही ऑडच आहे म्हणा.
आता लेख आणि प्रतिसाद परत एकदा
आता लेख आणि प्रतिसाद परत एकदा पूर्ण वाचले.
बीपीनचंद्र यांच्या प्रतिसादाला अनुमोदन.
मी स्थानिक नाही. बाहेरगावाहून आलोय याचा सुद्धा त्यांना अंदाज आला >>>
अंदाज काय, उघड आहे की ते. कितीसे स्थानिक लोक लॉजवर जाऊन रहातात? शिवाय तुम्ही रजिस्टर मध्ये पत्ता लिहिलाय, त्याला तुमचे आयडी कार्ड दिलेय.
अंगाला हात लावणे, धमक्या देणे हे मात्र चुकीचे आहे.
धन्यवाद अॅमी आणि मानव.
धन्यवाद अॅमी आणि मानव.
फोटो मागणे चूकीचे का वाटतेय
फोटो मागणे चूकीचे का वाटतेय अनेकांना? एकतर अतिथी ओळखपत्र द्यायला तयार नाही. त्यात समजा हॉटेलातल सीसीटीवी कॅमेरा नसेल / खराब असेल तर उद्या पोलिसांनी विचारले की नेमक्या कोण दोन व्यक्ति इथे राहून गेल्या तर काय उत्तर द्यायचे?
बिपीन चन्द्र यांच्याशी सहमत
बिपीन चन्द्र यांच्याशी सहमत आहे.
<<< भारतात न येण्याचे आणखी एक कारण मिळाले! >>>
छान छान, तसेही तुम्हाला कुणी भारतात याच म्हणून आमंत्रण दिले नाहीये. मुद्दाम कशाला वाकड्यात बोलताय?
हॅाटेल मालकाचे बरोबर आहे.
हॅाटेल मालकाचे बरोबर आहे.
कारण - १) त्या शहरात असे दोन तासांसाठी खोली घेणारी जोडपी(!) येतात.
२) स्थानिक पोलिस सतत फेऱ्या मारतात.
३) सर्वांचे आइडी हवेत हे काही हॅाटेल्सना तोंडी सांगितलेले असते.
४) संशयास्पद गेस्टना भेटून माहिती घेतात. मालकाकडून दंड घेतात.
५) नोंदणी केल्यावर खाडाखोड किंवा येण्याजाण्याच्या वेळेत दोन तासांचा फरक हे फार संशयास्पद गेस्ट असतात. म्हणजे एखाद्या हॅाटेलात अशा बऱ्याच नोंदी असणे म्हणजे मालक काही धंदा करतो असा वहीम येतो.
थोडक्यात असे प्रुफ मागणे योग्य आहे.
६) मध्यंतरी म्हणजे जर्मन बेकरी स्फोटानंतर माथेरानमध्ये एकट्याला रुम देत नव्हते. पोलिसांचे स्पष्ट आदेश होते.।।पण माझ्याकडे ट्रेकिंगच्या वेळी सॅकमध्ये सर्व झेरॅा्क्स असल्याने विशेषत: लँडलाइन फोन बिल, इलेक्ट्रिक बिल होते. मला रुम मिळाली. मालक गिरिविहार गिरीष आचार्य - " आता सर्व माथेरान रिकामं आहे पण एकट्याला कोणी रुम देणार नाही." मी सॅकमधून फोनबिल काढल्याबरोबर " अरे, रुम पाहा राहा. १५०रु.
त्याचा माणूस म्हणाला याच रुमचे सिजनला रु दोन हजार घेतो प्रत्येकी पण आता तुम्हाला त्याने रुमच दिली दिडशेंत!
७) आताच गुजरात राजस्थानात गेलो होतो सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात. एका हॅाटेलात सर्वांचे आइडी द्यावे लागले. दुसरीकडे नाही.
८) तुमच्या लेखाला सुसंगत माझे अनुभव दिलेत.
धाग्याच्या नावात ४९७ का
धाग्याच्या नावात ४९७ का लिहिलंय? ते कलम विबासंचं आहे ना?
सगळ्यांचं ओळखपत्र मागण्यामागे 'विबासं पोलिसिंग' हा हेतू असतो का तसा काही नियम आहे? फॉर सिक्युरिटी? जर नियम असेल तर तुम्हाला ते विबासं पोलिसिंग का वाटलं? तुम्ही ४९७ चा उल्लेख का केलाय?
समजा तो विबासं आहे हे गृहित धरुन चालू. तर दोन व्यक्तींच्या परस्पर संमतीने होता ना? मग दोघांची नावं आणि आयडेंटिटी लिहायला काय हरकत आहे? अगेन जर नियम असेल तर. नियमात फक्त एकाच्या नावावर रुम घेता येत असेल तर गोष्टच निराळी. पण इथे लिहिणार्यांच्या प्रतिक्रियातुन तसं वाटत नाही.
तुम्हाला नाव द्यायचं न्हवतं का? का आयडेंटिटी वर घोडं अडलेलं? नाव आणि कागदावरचं नाव सेम होतं का फेक नाव दिलेलं?
यातील कोणत्याही प्रश्नात मला जराही रस नाही. तुम्ही धागा काढला आहे, सो ते समजल्याशिवाय काही उत्तर देता येणार नाही सो लिहिलंय.
शेगावलाही सर्वांचं ओळखपत्र
शेगावलाही सर्वांचं ओळखपत्र मागतात. असेल तर मुख्य ईमारतीत जागा देतात. एकाकडेच असेल तर काॅमन हाॅलमध्येे लांब रूम देतात.
भारतात गेल्यावर ड्रायव्हर्स
भारतात गेल्यावर ड्रायव्हर्स लायसन्स पुरेसं होतं ना प्रुफ? पॅन कोणाला देणार नाही. आधार नाहीच, असतं तरी नक्कीच दिलं नसतं.
ड्रायव्हर्स लायसन्स पुरेसं
ड्रायव्हर्स लायसन्स पुरेसं आहे.
>> भारतात गेल्यावर
>> भारतात गेल्यावर ड्रायव्हर्स लायसन्स पुरेसं होतं ना प्रुफ
भारतातला लायसन्स म्हणतोस का?
अमेरिकेतला चालत नाही. पासपोर्ट लागतो. किमान मोठ्या शहरात तरी.
छोट्या ठिकाणी ज्याच्या नावावर रूम आहे त्याचं ओळखपत्र चालू शकतं.
हो हो. भारतातलाच. तिकडे २५
हो हो. भारतातलाच. तिकडे २५ वर्षाचा मिळतो सो ते अजुन व्हॅलिड आहे.
रच्याकने: आता एक टेंपररी फोनचं कार्ड हवं होतं, तर प्रीपेड टी-मोबाईलचं घ्यायला गेलो तर मी नाव पत्ता डीटेल दिले तर तो माणून अन-नेम कार्डही द्यायला तयार होता. अमेरिकेत का_हि_ही माहिती शिवाय कार्ड मिळू शकतं हे नविन होतं मला.
अमेरिकेत तुम्हाला वॉलमार्टात
अमेरिकेत तुम्हाला वॉलमार्टात पण मिळते की प्रीपेड कार्ड. स्ट्रेट टॉक, क्रिकेट, बूस्ट अश्या अनेक कंपन्यांची कार्डे मिळतात.
ते कॉलिंग कार्ड असतं ना? का
ते कॉलिंग कार्ड असतं ना? का सिम कार्ड ही असतं?
Pages