१७ ऑक्टोबर ...स्मिता पाटील यांचा जन्मदिवस...
का कोण जाणे मला स्मिताचा उल्लेख एकेरी करावासा वाटतो.. आदरार्थी बहुवचन वापरावंसं वाटत नाही..कारण ती मला आपल्यातलीच कोणीतरी वाटते..अगदी ओळखीची, जवळची कोणीतरी ! तिचे एक-एक सिनेमे बघत गेले आणि ती हळूहळू मला जवळची वाटू लागली. अजूनही मला तिचं प्रचंड कुतूहल वाटतं... तिचा अभिनय इतका बोलका होता की जणू एखादं आपलं माणूस जीव एकवटून काहीतरी सांगायचा प्रयत्न करतंय असं वाटत रहायचं.
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या.... या गाण्यात मी तिला पहिल्यांदा पाहिलं. नंतर तिचे सिनेमेही पाहिले. तिच्या प्रत्येक व्यक्तिरेखेचा माझ्यावर गहिरा प्रभाव पडला आहे. ती तिच्या अभिनयाने मला त्या कथानकाच्या विश्वात घेऊन जायची...चित्रपटाच्या शेवटी मी सुन्न झालेले असायचे...अगदी निशब्द..भारावून जायचे..कित्येकदा माझे डोळेही पाण्याने भरायचे ! ती ताकदीने चित्रपटात वास्तव उभं करायची ...त्या वास्तवाचे चटके तिचा अभिनय बघणाऱ्यांनाही लागायचे...म्हणून मला तिचे सिनेमे बेहद आवडतात.
'मिर्च मसाला' हा तिचा मी पाहिलेला पाहिला चित्रपट. हातभर बांगड्या, कपाळावर ठसठशीत गोंदण अशी राजस्थानी पेहरावात वावरणारी स्मिता आत्ताही माझ्या डोळ्यासमोर येते. सिनेमाचा शेवट अंगावर काटा आणणारा होता. आजकाल फेमिनिझमचे गोडवे गाणाऱ्या जगाला खरा स्त्रीवाद आणि खरी नारीशक्ती काय आहे हे स्मिताने ऐंशीच्याच दशकात दाखवून दिलं होतं. मला तिचे सगळेच सिनेमे मास्टरपीस वाटतात. मी तिचा 'अर्थ' पाहिला... 'मंडी', 'बझार', 'भूमिका', 'आखिर क्यू' हे चित्रपट पाहिले. सगळ्या थक्क करुन सोडणाऱ्या कलाकृती! मन हेलावून टाकणाऱ्या कथा आणि संवाद!
मंडी मधली पिंजऱ्याच्या गजांआड राहणंच स्वीकारणारी, पिंजऱ्याबाहेरच्या संघर्षाने भरलेल्या जगाला घाबरणारी झीनत...जेव्हा तिला पिंजऱ्यातल्या घुसमटीनेही जीव जाणार याची जाणीव होते तेव्हा ती पंख पसरते...तिचं एकटीने पळून जाणं कितीतरी अर्थ मागे सोडून जातं.
अर्थ मधली कविता असो वा बझार मधली नजमा...आपापल्या पद्धतीने त्यांनी स्वतःचा शोध घेतला आहे. बझार मधली नजमा समाजातलं कटू सत्य त्वेषाने सांगू पाहते. गरिबी माणसाला हतबल बनवते....आणि ती 'हतबलता' विकत घेणारे आणि विकणारे अशी दोन्ही माणसं जगात असतात. समाजाचं हे विद्रुप रूप बघून सुन्नता येते. भूमिका मधली उषा चौकटीच्या बाहेर पडण्यासाठी धडपडते. पहिल्या लग्नाच्या नात्यातून बाहेर पडत ती स्वातंत्र्याचा अर्थ शोधते. दुसऱ्या लग्नातही तिला अपयश येतं...शेवटी तिला सांगितलं जातं...'बदलतात ते पुरुषांचे मुखवटे...पुरुष नाही'. सगळी साचेबद्धता, सगळ्या चौकटी सोडून ती शेवटी निराळा मार्ग निवडते.
स्मिताच्या या सगळ्या व्यक्तिरेखा माझ्या मनात खोल कोरल्या गेल्या आहेत. या चित्रपटांनी मला वेगळी दृष्टी दिली. समाजभान दिलं. उथळ विचारशैलीकडून प्रगल्भतेकडे नेलं....माझ्यासाठी तिचे सिनेमे म्हणजे " लाईफ लेसन्स " ठरले आहेत..हे सिनेमे विचारात पाडतात..आपल्या ठोकळेबाज,एकसुरी आयुष्यात प्रश्नांचं वादळ निर्माण करतात..
खरंच प्रत्येकाने आयुष्यात स्मिताचा एकतरी सिनेमा नक्की पहावा..
स्मिताचे सिनेमे आणि मी
Submitted by क्षास on 18 October, 2018 - 08:21
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त लिहिलय.
मस्त लिहिलय.
माझी आवडती होती. तिच्या
माझी आवडती होती. तिच्या चित्रपटातला मंथन पण सुरेख होता.
अर्थ, मंडी, भूमिका पाहिले
अर्थ, मंडी, भूमिका पाहिले आहेत.
> सगळी साचेबद्धता, सगळ्या चौकटी सोडून ती शेवटी निराळा मार्ग निवडते. > हे काही आठवत नाहीय. काय शेवट होत भूमिका चित्रपटाचा?
भूमिकामध्ये शेवटी ती दुसऱ्या
भूमिकामध्ये शेवटी ती दुसऱ्या नवऱ्यापासून वेगळं झाल्यावर एकटं राहण्याचा निर्णय घेते. ' मेरे अकेलेपनसे मुझे खुद ही निपटना होगा' म्हणत ती मुलीसोबत जाणंही नाकारते.
अच्छा. धन्यवाद
अच्छा. धन्यवाद
स्मिता पाटील हि अभिनेत्रीही
स्मिता पाटील हि अभिनेत्रीही छान होती, आणि हा लेखही छान आहे,
जैत रे जैत मध्ये पण छान काम
जैत रे जैत मध्ये पण छान काम केले आहे , मी कात टाकली अर्थपूर्ण गाणे
काय मस्त लिहीलय.
काय मस्त लिहीलय.