समग्र शेषनाग - जय त्रिकालदेव

Submitted by पायस on 4 October, 2018 - 19:33

१९८९ ते १९९१ हा काळ भारतासाठी मोठा धामधूमीचा होता. दोन वर्षात आपण ४ पंतप्रधान बदलले आणि तितक्याच वेगाने आपल्या राहणीमानात बदल स्वीकारले. असे म्हणतात की बदल घडत असताना हा शेवटचा टप्पा सर्वाधिक वादळी असतो. त्या नियमानुसार बॉलिवूडमध्ये या दोन वर्षात के आर रेड्डी नावाचे वादळ आले ज्याने पाप को जलाकर राख कर दूंगा, वीरू दादा, गर्जना सारख्या कलाकृतिंमधून जुन्याची नव्याशी सांगड घालण्याचा प्रयत्न केला. एके दिवशी त्याला दृष्टांत झाला की "हे शमशान घाट के मुर्दे, त्रिकालदेव चाहते हैं की तुम बाकी शमशान घाट के मुर्दों के लिए एक भक्तिरस से भरपूर फिल्म का निर्माण करो. ताकि कलयुग में भटक गए भूले बिसरे वापस राह पर आ सके". तो दिवस बहुधा नागपंचमीचा होता. तत्काळ त्याने शेषनागची निर्मिती केली. नाग जमातीवर तसे सिनेमे तर पुष्कळ येऊन गेले. पण नाग, खजिना, नागमणी, दैवी चमत्कार, रेखाच्या रुपातली माधवी, अमर विषारी तांत्रिक आणि मंदाकिनी असे बंपर पॅकेज केवळ शेषनागच देतो. अशा महान चित्रपटाचे विषामृत वाचकांपर्यंत पोहोचवणे एका व्यक्तिच्या शक्तीपलीकडचे काम आहे. तरी हा विषग्रहणाचा अल्पसा प्रयत्न!

१) शेषनाग सहकारी बँक लिमिटेड

१.१) प्रेक्षक आणि सिनेमा यांमध्ये टायटलरुपी रेखा असते.

पहिल्या काही फ्रेम्समध्येच शेषनागाची कूळकथा अ‍ॅनिमेशन मधून स्पष्ट केली आहे. शेषनागाने पृथ्वीला आपल्या डोक्यावर तोलून धरले आहे असा समज आहे. त्यानुसार मिश्किल हसणारे शेषनागाचे कार्टून पृथ्वी डोक्यावर घेऊन आहे असे दिसते. त्यानंतर प्रेक्षकांकडे वळून बघताक्षणी धरणी दुभंगते आणि त्यातून टायटल सीक्वेन्स सुरु होतो. हा सीक्वेन्स म्हणजे रेखाची नागकन्येच्या वेषातली छायाचित्रे आहेत. इथे अनुभवी प्रेक्षक लगेच सावध होतो. जर टायटल्सची नय्या पार करण्याकरिता सुद्धा रेखाची गरज भासत असेल तर सिनेमाच्या हिरोमध्ये काही फारसा दम नाही.

१.२) आमचे येथे चेक्स फक्त चंद्रग्रहणाच्या दिवशी वटवले जातील

टायटल्स सोबत वाजत असलेले पार्श्वसंगीत अ‍ॅबरप्टली संपून अचानक "ढॅण्ण" आवाज होतो आणि आपल्याला एका गूढ गुहेचे दृश्य दिसू लागते. एक पुजारी आणि तीन ठाकूरसाब ते राजासाब या रेंजमध्ये बसणारे लोक गुहेत प्रवेश करतात. तिघांच्या हातात प्रत्येकी एक पेटारा असतो. आपल्याला लक्षात येते की हे एक भूमिगत मंदिर असून इथे प्रत्येक खांबावर सात फण्यांच्या नागाची नक्षी आहे. मध्ये एक मोठ्ठी पिंड असून त्या पिंडीवर भल्यामोठ्या नागाच्या फण्याचे छत्र आहे. पुजारीच्या सांगण्याप्रमाणे ते लोक आपापल्या पेटार्‍यातून एक चंदेरी रंग दिलेला थर्माकोलचा तुकडा बाहेर काढतात. ते तीन तुकडे जोडले की या पिंड+नागाची छोटेखानी प्रतिकृति तयार होत असते. ती प्रतिकृति विशिष्ट जागी ठेवून पुजारी त्यांना एका बाजूला घेतो. मग चंद्रग्रहण लागते आणि त्या गुहेच्या छताला पडलेल्या भगदाडातून येणारे चांदणे अडवले जाते. गुहेत अंधार होताच त्या मोठ्या फण्यावरचे एलईडी पाकपूक करतात आणि त्या फण्यातून फूत्कार निघाल्यासारखे किरण येतात आणि प्रतिकृतित प्रवेश करतात. हा क्यू घेऊन कुठून तरी दोन नाग सरपटत येतात. ते अनुक्रमे जितेंद्र आणि माधवी असतात. जंपिंग जॅक आणि मॅड्सच्या डोक्यावर नागमणी असतो. आपण का मागे राहावे म्हणून तेही किरणे सोडतात आणि त्या तीनही किरणांचा संगम होऊन धरणी दुभंगते व तिच्या खालचा खजिना दृष्टीस पडतो. मग ते निघून जातात. चंद्रग्रहण सुटते आणि क्षणभरच एक निळसर ज्योत दिसते. पुजारी सांगतो की ती अमरज्योती आहे. मग ते तिघे पोतेभर दागदागिने आणि सुवर्णमुद्रा भरून घेतात. पुजारी त्यांना हे धन गोरगरिबांच्या भल्यासाठी वापरायला सांगतो आणि पुढची खेप पुढच्या चंद्रग्रहणाला मिळेल हे स्पष्ट करतो.

आता खरे तर सिनेमा इथेच संपायला हवा. क्लिअरली मंदिरात ग्रहणसदृश परिस्थिती निर्माण करणे फार काही कठीण कर्म नाही. नागांची दृष्टी अधू असल्याने त्यांना फक्त अंधार की उजेड इतकेच कळते आणि ड्राय आईसच्या मदतीने धूर करणे आणि तापमान कमी करणे सुद्धा अवघड नाही. मग ते आले आणि तो गाडलेला खजिना परत दिसला की हवे तेवढे धन काढून घ्यावे. पण अशी अक्कल सिनेमातल्या लोकांना नसल्यामुळे सिनेमा निष्कारण आणखी अडीच तास लांबतो.

२) व्हिलन की एंट्री

२.१) शमशान घाट के मुर्दे : एक संकल्पना

डॅनी या सिनेमात अघोरी या नावाने व्हिलन दाखवला आहे. अघोरी भलताच तगडा व्हिलन आहे. त्याची ओळख आपल्याला करून घ्यायची आहेच पण तत्पूर्वी आपण "शमशान घाट के मुर्दे" ही संकल्पना समजून घेतली पाहिजे. अघोरीचे मुख्य टार्गेट ती अमरज्योती आहे हे सूज्ञास सांगणे न लगे. आता अघोरी या ज्योतीच्या मदतीने अमर होणार ही त्याच्या दृष्टीने काळ्या दगडावरची पांढरी रेघ! मग बाकी सर्व एके दिवशी स्मशानात जाणार हेही नक्की! त्यामुळे इतरांपासून स्वतःचे वेगळेपण ठसवण्यासाठी तो समस्त मर्त्य मानवांना "शमशान घाट के मुर्दे" असे संबोधत असतो. अननुभवी प्रेक्षकांना अमरज्योतीचे महत्त्व आणि फोरशॅडोइंग कळण्याकरिता या तंत्राचा वापर केला आहे.

२.२) "जय त्रिकालदेव!"

यानंतर आपण दुसर्‍या एका गुहेमध्ये प्रवेश करतो. ही गुहा शेषनागाच्या गुहेपेक्षा भलतीच प्रकाशमान असते. पण इंटेरिअर डिझाईनरने सढळ हस्ते कवट्या आणि हिडीस चेहर्‍यांचा वापर केलेला असल्यामुळे ही गुहा व्हिलनची असल्याचे स्पष्ट होते. जटाधारी डॅनी तरातरा गुहेत घुसतो आणि गुहेच्या मध्यभागी असलेल्या उग्र पुतळ्यापुढे उभा ठाकतो. "जय त्रिकालदेव! (१)" हा या सिनेमातला अघोरीचा संभाषण सुरु करण्याचा प्रोटोकॉल असावा. बुचकळ्यात पाडणारी गोष्ट या त्रिकालदेवच्या मूर्तीचे स्तन लक्षात येतील इतके मोठे आहेत. आता इथे महाकाली किंवा तत्सम देवतेचा वापर का केलेला नाही हे माझ्या आकलनापलीकडचे आहे. असो, तर अघोरी त्या त्रिकालदेवच्या मूर्तीशी बोलायला सुरुवात करतो, नव्हे त्या मूर्तीला धमकवायला लागतो. तो समोरची एक धुनी पेटवतो आणि हातातल्या त्रिशूळाने अंगठा कापून घेतो. जोवर त्रिकालदेव त्याला त्या दोन नागांचा (पक्षी जॅक आणि मॅड्स) पत्ता सांगत नाही तोवर तो या रक्ताने त्या धुनीतली आग विझवणार असतो. ही धमकी असून त्रिकालदेवही मनात हसला असावा. ती जखम कांदा चिरताना बोट चिरले गेले तर होईल तेवढी आहे, बघता बघता रक्त गोठेल. रावणाच्या शिरकमल स्टाईल गोष्टींची सवय असलेला त्रिकालदेव याने कसला प्रसन्न होतोय? अघोरीच्या गँगमधले चिल्लर लोक मात्र लई घाबरतात. उद्या हा टपकला तर रात्रीच्या दोन पेगची सोय कोण करणार?

ही काळजी असल्याने कुठून तरी सुधीर धावत येतो. सुधीर अघोरी गँगचा फ्रान्सहून आयात केलेला मेंबर असावा कारण त्याच्या दाढी मिशा थेट मस्कटिअर छाप आहेत. अघोरी आधी या शमशान घाटच्या मुडद्यावर उखडला असे दाखवतो. आता तो नक्की उखडला का नाही हे सांगणे थोडे कठीण आहे कारण संपूर्ण सिनेमाभर डॅनीचा चेहरा कायमस्वरुपी बद्धकोष्ठ झाल्यासारखा आहे. सुधीर त्रिकालदेवची शपथ घेऊन सांगतो की मी जॅक आणि मॅड्सला मानवी रुपात बघितले आहे (मागून त्रिकालदेव ओरडतो, शपथ घ्यायची तर आईची घे. मला का मध्ये ओढतो?). अघोरी जाम पॉवरबाज तांत्रिक असतो. त्याला सुधीरच्या डोळ्यात त्याने काय बघितले आहे ते सगळे दिसते. बातमी खरी असल्याचे कळल्यावर तो खदाखदा हसतो. "जय त्रिकालदेव! (२)" एक भोळसट मेंबर त्याला विचारतो के हे नाग तर फार विषारी असतात, त्याचं काय करणार आहेस. मग आपल्या डॅनी अघोरी बनवायची रेसिपी सांगतो.

त्रिकालदेवचा अघोरी (संदर्भः शमशान घाटच्या मुडद्यांकरिता सुलभ सैतानी पाककृति)
साहित्यः
१००० शैतान
१००० पाली
१ मगरीचे कातडे
२० विंचू

कृति:
स्मशानात १००० शैतान मावतील अशी एक चिता रचून घ्या. त्यात त्या १००० शैतानांना जाळून त्यांची राख गोळा करा. ही राखरांगोळी होईपर्यंत १००० पालींचे रक्त एका भांड्यात काढून घ्या. ते रक्त वापरून राखेचा एक मानवाकृति पुतळा बनवावा. हातापायांची बोटे बनवू नयेत. पुतळ्याला मगरीच्या कातड्याची त्वचा बसवावी. नीट न बसवल्यास एअर बबल्स राहून अघोरीच्या कपाळावर कायमस्वरुपी आठ्या पडतील. बोटांच्या जागी विंचवांच्या नांग्या जोडाव्यात. जर तुमचे शैतान, शंभर टक्के शैतान असतील तर तुमचा अघोरी निश्चितच हवा तसा चिडचिडा आणि त्रासलेल्या आवाजाचा तयार होईल. घरगुती पालींच्या जागी जर सरडे वापरल्यास अघोरीला कायमस्वरुपी बद्धकोष्ठ असण्याची गॅरेंटी!

आपले विषारीपण सिद्ध करण्याकरिता तो एका नागाकडून स्वतःला चावून घेतो. नाग बिचारा एक्सपायरी डेट उलटलेल्या अघोरीच्या चवीने तडफडून मरतो. अशा रीतिने आपल्या लोकांना मोटिव्हेट करून अघोरी त्या इच्छाधारी कपलला पकडायला बाहेर पडतो.

२.३) बॉस कधीच चुकत नसतो

अखेर आपल्याला प्रथमच सिनेमातल्या स्थळांचा भूगोल बघायला मिळतो. हिमालयाच्या कटआऊटच्या बॅकग्राऊंडवर आणि अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर व पुंगी यांच्या स्वरांवर जॅक आणि मॅड्स नाचत असतात. "तु नाचे मैं गाऊ, मितवा छेड मिलन के गीत" या शब्दांवर जितेंद्र आणि माधवीने भांगडा ते भरतनाट्यम् अशी अफलातून व्हरायटी दिली आहे. सरोज खानला बहुधा रेड्डीकाकांनी "जोपर्यंत ते सापासारखी जीभ लपलप करत आहेत तोपर्यंत एनीथिंग गोज्" असा कानमंत्र दिला असावा. थोड्यावेळाने त्यांना जमिनीवर नाचून कंटाळा येतो मग ते हवेत नाचायला लागतात. मग माधवीला तिच्या लांबसडक केसांचा कंटाळा येतो. त्यामुळे ती एक कडवे छोट्या, कुरळ्या केसांत नाचून घेते. त्यातही फार काही मजा न आल्याने मग ती पुन्हा लांब केस मोकळे सोडून चमकीवाल्या हिरव्या चुड्यात नाचून घेते. जितू इकडे तिकडे उड्या मारायची आणि मधून मधून माधवीला खाली लोळायला लावून तिच्यावरून उड्या मारायची जबाबदारी इमानेइतबारी पार पाडतो.
हे सगळे चालू असताना अघोरी आपल्या सोबत काही गारुड्यांना घेऊन येतो. वॉर्निंग शॉट म्हणून तो त्याचा त्रिशूळ फेकून जॅक आणि मॅड्सचे लक्ष वेधून घेतो. ते दोघे भलतेच चालू असल्याने ते नागरुप धारण करून सुमडीत पलायन करतात. हे नागांचे तेल अघोरी सोबत आलेल्या शमशान घाटच्या मुडद्यांवर काढतो. या नागांना शोधून जर त्यांनी अघोरीसमोर हजर नाही केले तर अघोरी त्यांची खाल उधडून टाकेल. "जय त्रिकालदेव! (३)"

३) सरपटण्यापेक्षा दोन पायांवर पळ काढणे सोपे असते

३.१) "आमच्या इथे अघोरी चावल्यावरची लस टोचून मिळेल" सर्पमित्र चारुदत्त वसुमित्र रे अर्थात चा. व. रे

हा खाल उधडण्याचा क्यू घेऊन एडिटर आपल्या काही सापांची कात वाळत टाकलेली दाखवतो. कुठूनतरी तिथे ऋषी कपूर उगवतो. ऋषीबाळ फारच गुणी बाळ दाखवला आहे. तो त्या गारुड्यांचे प्रबोधन करण्याचा असफल प्रयत्न करतो. इथे पटकथालेखक आपले अर्थशास्त्राचे ज्ञान पाजळतो - साप विकण्यापेक्षा सापांच्या कातीचे चामडे विकणे अधिक फायदेशीर आहे (सेकंडरी सेक्टर जॉब वि. प्रायमरी सेक्टर जॉब). ऋषीबाळ म्हणतो की हे भोलेनाथचे भक्त आहेत असं करू नका. तुमची चामडी कोणी लोळवली तर तुम्हाला कसं वाटेल? यावर ते गारुडी ऋषीबाळाची चामडी लोळवतात. याने बाळ भलताच खवळतो. तो जाऊन एका ओसाड मंदिरात शंकराच्या मूर्तिपुढे आपले गार्‍हाणे मांडतो. पण फार काही घडण्याआधीच त्याला दिसते की गारुडी लोक गठ्ठ्याने नागांच्या मागे लागलेत. मग तो शंकराला त्याच्या भक्तांना (पक्षी: कोणताही नाग) वाचवायचे वचन देतो. चाणाक्ष प्रेक्षकाच्या लक्षात येते की याच्यामुळे अघोरीच्या हातून जितेंद्र/माधवीचे प्राण वाचणार आहेत.

इकडे अघोरीच्या आदेशावरून सुधीर आणि कं. जॅक आणि मॅड्सच्या शोधात असतात. पण पकडलेल्या नागांपैकी एकही नाग इच्छाधारी नसल्यामुळे अघोरी वैतागतो. तो म्हणतो की जाऊन शोधा त्यांना आणि पकडलेल्या नागांचे विष काढून मला द्या. आज मी विषपान करणार आहे. जितेंद्राला आपले जातभाई मारले जात असल्याचे बघवत नाही. तो थेट अघोरीच्या गुहेत जाऊन थडकतो. त्याच्या आवाजाचे पडसाद पुरते पाच सेकंद उमटतात. कान किटल्यामुळे अघोरी बाहेर येतो. बघतो तर काय - हा तर इच्छाधारी नाग! मुडदा स्वतःच शमशान घाटमध्ये आल्याने खुश होऊन तो विकट हास्य करतो. मग त्यांच्यात वाक्-युद्ध रंगते. अघोरी त्याला पेटीत बंद करणार असल्याचे सांगून नसलेल्या पेट्यांमधून हवी ती पेटी निवडायची मुभा देतो. जितेंद्र त्याला "तुझ्या अस्थी बंद करता येतील अशी पेटी चालेल मला" म्हणून अघोरीला उचकवतो. "जय त्रिकालदेव! (४)"

दोघांमध्ये तुंबळयुद्ध (बजेटमध्ये जेवढे तुंबलं तेवढं तुंबळ) होते. कधी नव्हे तो एक इच्छाधारी नाग पुंगीच्या स्वरांमध्ये मदमस्त होण्याआधीच झडप घालून पुंगी फेकून देण्याचा शहाणपणा करतो. अघोरीकडे आग लावणे (शब्दशः), फुंकरीतून वादळ निर्माण करणे, हवेतून तलवार काढणे अशा पॉवर्स असतात. तर जितेंद्राकडे हवेत तरंगणे, फेकलेल्या तलवारीचा हार करणे अशा पॉवर असतात. मानवी रुपात झोंबाझोंबी करून पोट न भरल्याने ते नाग आणि मुंगसाच्या रुपात झोंबाझोंबी करतात. असा विषम सामना असूनही जितू अघोरीवर भारी पडत असतो. तो अघोरीला चावणार इतक्यात मॅड्स येऊन सांगते की "प्रीतम इसे मत डसो." तब्बल २४ मिनिटांनंतर आपल्याला जितेंद्राचे सिनेमातले नाव कळते - प्रीतम. मॅड्स म्हणते की अघोरी आपल्यापेक्षा जास्त विषारी आहे. डॅनीचे समाधान झालेले असल्याने तो हसून जरा हवापाण्याच्या गोष्टी करू बघतो. त्यावर जितेंद्र विषफुंकार सोडतो. ही विषफुंकार कमी आणि फ्लेमथ्रोअरचा ब्लास्ट जास्त आहे. यावर अघोरी कसलं तरी भस्म फेकतो आणि याने धूरच धूर होतो. "जय त्रिकालदेव! (५)". याने म्हणे माधवी जखमी होते. धूराच्या आडोशाने जॅक आणि मॅड्स काढता पाय घेतात आणि अघोरी सगळ्या गारुड्यांना परत त्यांच्या पाठलागावर लावतो.

३.२) रेखा कोणतीही असो, तिला ओलांडून जायचे म्हणजे अग्निपरीक्षा द्यावीच लागते.

ऋषीबाळ आपल्याच तंद्रीत चाललेला असतो. त्याला दगडावर एक अंगाला केचप फासलेला रबरी नाग दिसतो. एका नजरेत त्याला कळते की "ये तो जखमी नागीन हय". तीन चिल्लर गारुडी येऊन त्याला ती नागीण मागतात. ऋषीबाळ झाशीच्या राणीइतक्या बाणेदारपणे सांगतो - नहीं दूंगा! तो त्या नागिणीला आपल्या कासोटीला बांधून पळ काढतो. उतारावर धावत असल्याने तो अपेक्षेप्रमाणे धडपडतो. मग हे गारुडी त्याला काठ्यांनी झोडप झोडप झोडपतात. या नादात त्यांचे लक्ष नसताना एक नाग (हा बहुधा जितेंद्र असावा) त्यांना डसतो. प्रत्यक्षात हे काम आधीसुद्धा होऊ शकले असते पण नागाला "गठ्ठ्याने बडवला जाणारा माणूस कसा दिसतो?" या शोमध्ये रस असावा. या संधीचा फायदा घेऊन बाळ नागीणीला एका सुरक्षित ठिकाणी सोडतो आणि तिचे प्राण वाचवतो.

ही बातमी कळल्यानंतर अघोरीचा राग ऋषी कपूरवर शिफ्ट होतो. तो आधी ऋषी कपूरला मारायचे ठरवतो. इकडे माधवी आणि जितेंद्रची परत गाठभेट पडते. बागेत रोमान्स करायच्या पोजमध्ये माधवी अजूनही माणसांमध्ये माणूसकी शिल्लक आहे या अर्थाचा डायलॉग मारते. जितेंद्रही "हो ना, याला नक्की भोलेबाबाने पाठवले असणार" म्हणत दुजोरा देतो. हे दोघे याचे उपकार न विसरण्याची शपथ घेतात. याचाच अर्थ लवकरच ऋषी कपूरचे कुत्र्यागत हाल होणार आहेत, त्याशिवाय यांना त्याच्या उपकारांची परतफेड कशी करता येईल?

"जय त्रिकालदेव! (६)" अघोरीने भलेही ऋषीबाळाला मारण्याची घोषणा केलेली असली तरी तो अजूनही या नागांना आपल्या सीमेबाहेर निसटू देण्याच्या मूडमध्ये नसतो. मग त्याला पॉवर दाखवायची हौस येते आणि एका रँडम ठिकाणी तो त्रिशूळ जमिनीत रोवतो. त्याच्या ताकदी धरणी दुभंगून एक सीमारेखा तयार होते. त्याच्या म्हणण्यानुसार ही रेखा ओलांडणे जॅक आणि मॅड्स के बस की बात नसते आणि तसेच होते. हे दोघे नागरुपात ती रेखा ओलांडायचा प्रयत्न करतात तेव्हा ती अग्निरेखा असल्याचे कळते. हे बिचारे अघोरीप्रूफ पण नसतात तर फायरप्रूफ कुठून असणार? इच्छाधारी रुपांतरणाच्या नियमांनुसार नागांना रोमान्स/फायटिंग/डायलॉगबाजी या कामांव्यतिरिक्त रुप बदलता येत नसल्याने ते माणूस बनून उडी मारून ती रेखा पार करण्याचा प्रयत्न करत नाहीत. पिंडी ते ब्रह्मांडी या तत्वाच्या करोलरी नुसार शंकराची पिंड कुठेही प्रकट होऊ शकते. या करोलरीमुळे त्या रँडम ठिकाणी हवेतून पिंड अवतरते. मग हे नाग या पिंडीला विळखा घालून तिला ओढत ओढत नेतात. अघोरी आणि त्याच्या शोधपथकाचा मंत्र "आपण बरे आणि आपले काम बरे" असल्याने त्यांना त्यांच्या शेजारून एक पिंड घसरत चालली आहे हे दिसत नाही. हायरार्की मध्ये अग्निदेव शंकराच्या खाली असल्याने तो लगोलग आग विझवतो आणि हे लोक पिंडीसकट ती अग्निरेखा ओलांडतात.

या लोकांनी रेखा ओलांडल्याचा क्यू घेऊन पुढच्या दृश्यात रेखा येणार हे उघड आहे. तरी इथे माझी अल्पकाळापुरती विरामरेखा. त्रिकालदेवाची कृपा होताच उरलेल्या शमशान घाटच्या मुडद्यांबद्दल प्रतिसादांत विस्ताराने लिहितो Proud

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

जितेंद्र टू माधवी : लेकिन ये यहां कैसे पहुंच गया? >>डायलॉक जिंतेद्रच्या आवाजात ऐकू आला Lol

बाकी अफाटच Lol __/\__

Biggrin

'मेरे करन अर्जुन आएंगे' या भयानक अत्याचारी सिनेमातला.... अहो तो फक्त "करन अर्जुन" असाच सिनेमा होता!! Happy
शैलीत घडत असलेल्या बदलांचा हा एक पुरावा Happy
' खिल्लार' वगैरे शब्द वापरण्याचं तुमचं कसब अफाट आहे!
मस्त मराठी, मस्त कल्पनाशक्ती आणि मेन म्हणजे अगदी निर्मळ, निखालस विनोद...यांमुळे...ही लेख वाचणे ही एक मेजवानीच आहे.

तुफान परीक्षण । कहर आहे हा पिक्चर । काय तो डान्स काय त्या हम्मा चे घाबरलेले डोळे हाहाहा।। तो रिशी पकुर असा मेंगलट का आहे ??

त्याचे नाव - जॅक गौड. >> बरोबर, जॅक गौडच तो. रिव्हर्स स्वीप _/\_

रेखा च्या गाण्याचं पूर्ण शूट वर्णन >> ते गाणं विशेष कहर आहे. त्याच्याकडे वळणार आहोतच, पण तत्पूर्वी कथा पुढे नेऊया.

५) द्रौपदीला पणाला लावण्याआधी युधिष्ठिराने तिचं मंगळसूत्र पणाला लावलं असेल काय?

५.१) व्हिलनकडे मोरल हायग्राऊंड असता कामा नये

इथे घरात पत्त्यांचा डाव रंगलेला असतो. इथे आपल्याला अनुपम खेरचे नाव बन्सी, तर जॅक गौडचे नाव गणपत असल्याचे कळते. बन्सीच्या पत्ते पार्टनरला (जॅक गौड नव्हे, अजूनच कोणीतरी) बन्सीवर विश्वास नसतो. त्यामुळे जोवर त्याचे थकलेले पैसे मिळत नाहीत तोवर तो पुढचा डाव खेळायला तयार नसतो. तेवढ्यात बाळ "जीजाजी, (जानवर) भाग गए. जीजाजी, (जानवर) भाग गए." बोंबलत घरात परततो. बाळाला विरामचिन्हांचा वापर येत नसल्याने ते ऐकू "जीजाजी भाग गए, जीजाजी भाग गए" असे येते. पत्ते पार्टनरला ते खरे वाटून तो आपले बुडालेले पैसे शोधण्याकरिता जंगलाकडे धावत सुटतो. तिकडे अनुपम आतल्या खोलीतून पैसे घेऊन येतो. गणपत त्याला म्हणतो की हा तुझ्या नावाने काय बोंब मारतोय बघ. बाळ लगेच खुलासा करतो की तो गुरांविषयी बोलत होता. इतका वेळ त्याच्या ओव्हर-अ‍ॅक्टिंगवर वैतागलेला अनुपम खेर त्याला फोडण्याचा वास्तववादी अभिनय करतो. इंटरेस्टिंग बाब अशी की बन्सी बासरीवाल्याला फोडतो.
रेखा मध्ये पडते तर तो तिलाही हाणतो. अ‍ॅपरंटली ती गुरे सबंध गावाची असतात आणि गावात एकही गुराखी नसल्याने सगळी ऋषीबाळाच्या भरोसे सोडलेली असतात. आता सगळ्या गावकर्‍यांना हे लोक कसे शांत करणार हा प्रश्न प्रेक्षकांना पडतो. सेम प्रश्न जितेंद्र आणि माधवीलाही पडलेला असतो. त्यामुळे ते सगळी गुरे गोळा करून गावात सोडून जातात. याने समस्येचे तात्पुरते समाधान झालेले असले तरी अनुपम खेर हुशार असल्याने तो तरीही ऋषीबाळाला घराबाहेर काढतो. बाळही आपल्या बहिणीला मारहाण होऊ नये म्हणून हात जोडून काढता पाय घेतो. घरातून निघतो आणि थेट जंगलात जातो. भोलेबाबाची महिमा अपरंपार आहे. बाळासाठी जंगलात दगडात खोदकाम करून एक शिवमंदिर तयार असते. थकला भागला बाळ तिथे विसावतो.

याक्षणी दिग्दर्शकाला लक्षात येते की बन्सीला रोखठोक व व्यवहारी दाखवल्याने आपल्याला त्याला वाईट दाखवता येणार नाही. त्यामुळे नंतर जेव्हा ऋषीबाळ आणि रेखातै त्याला जॅक आणि मॅड्सच्या मदतीने धडा शिकवतील तेव्हा त्यांच्याकडे मोरल हायग्राऊंड नसेल. म्हणून एक व्हिलन स्पेशल सीन टाकणे भाग आहे. गौडचे नाव गणपत असल्याने त्याने अनुपमला दारू पाजलेली असते. मग अनुपम दारूच्या नशेत रेखाकडे पैसे मागतो. रेखा म्हणते की सगळे पैसे तर तू जुगारात हरलास. आता घरात दागिने, पैसे, भांडीकुंडी, काही म्हणजे काहीच शिल्लक नाही. तो लगेच प्रतिवाद करतो "तेरा मंगलसूत्र अभी भी बचा हैं". ती म्हणते नक्को ना, बन्सी प्लीऽऽऽऽऽऽऽज!
बन्सी प्लीज?
अंहं ऐसे नही, बन्सी प्लीऽऽऽऽऽऽऽज!
अनुपम म्हणतो की हे मंगळसूत्र मी घेऊन दिलंय. मीच दिलेली वस्तु मी परत घेतली तर कुठे बिघडलं? आदर्श भारतीय नारी (बॉलिवूड इश्टांडर्ड) असल्याने लगेच ती "इसकी कीमत सिर्फ एक सुहागनही जान सकती हैं" वगैरे डायलॉग मारते. यात सिंदूर की कीमत, आता सिंदूरही परत घेणार का वगैरे तोंडाच्या वाफा ओघाने दवडल्या जातात. त्यानुसार तो तिच्या कपाळातला सिंदूर पुसतो सुद्धा! पण सिंदूरच्या नावाखाली विगच्या भांगेत मारलेला लाल पट्टा पुसला जात नाही आणि तो पुढच्या फ्रेममध्ये जसाच्या तसा दिसतो. शेवटी तो मंगळसूत्र हिसकावून घेतो आणि तिला घरात कोंडतो.

५.२) "जीतम् जीतम् जीतम्"

बाहेर गणपत बन्सीची वाटच बघत असतो. पैजेला लावायला बन्सीकडे दागिना आहे हे कळल्यावर पुढचा डाव सुरु होतो. ते दोघे खेळत असलेला खेळ असा - पैसे लावणारा एका पत्त्याच्या प्रकाराचे नाव घेणार. मग पत्ते वाटायला सुरुवात होईल. जर त्या प्रकारचा पत्ता त्याला वाटला गेला तर तो जिंकला नाहीतर डीलर जिंकला. उदा. बन्सी बादशहा मागतो तर चारपैकी कोणताही बादशहा चालेल. अर्थात जर गणपतला बादशहा आधी वाटला गेला तर तो जिंकेल. तसे बघावे तर पारडे किंचित बन्सीच्या बाजूने आहे (बन्सी जिंकण्याची शक्यता = १/१३(समेशन ((१२/१३)*(१२/१३))^क्ष, क्ष = ० ते २४) ~ ५१ %). पण अर्थातच गणपत पत्ते लावत असल्याने त्याला आधी इस्पिकचा बादशहा मिळतो व तो जिंकतो. अनुपमची खुमखुमी अजून बाकी असते. तो घर पणाला लावतो आणि म्हणतो यावेळेस बेगम पाहिजे. पुन्हा गणपतला किल्वरची राणी आधी मिळते आणि तो जिंकतो. या डावात संपूर्ण वेळ केवळ काळे पत्ते वाटले जात आहेत. हे दोन्ही पार्ट्यांची अंतर्मने काळी असल्याचे द्योतक असावे काय?

सिनेमा भक्तिरसाने परिपूर्ण असल्याने एक डाव महाभारताची आठवण काढणे गरजेचे आहे. त्यानुसार गणपत शकुनी मामा, दुर्योधन आणि दु:शासन असे डेडली कॉम्बो बनून बन्सीला सुचवतो - अजून बायको बाकी आहे तुझी. युधिष्ठिराप्रमाणे बन्सीही आधी आढेवेढे घेतो. यांचा पत्त्याचा डाव बघायला सारा गाव लोटलेला असतो. ते सगळे याला सांगतात की रेखा तुझी लकी चार्म आहे. लाव तिला पणाला, जिंकशील तू! अनुपम म्हणतो, बरं ठीक आहे. पण पत्ते मी वाटणार. असे करून तो आपले ऑड्स कमी करतो (१०० - ~५१ = ~४९%). यानंतर तो हरला नाही तरच नवल! नोंद घेण्याच्या काही गोष्टी - १) प्रोग्रेशननुसार गणपत गुलाम मागतो. २) बन्सीला एक चौकट आठ (नॉन काळा पत्ता) वाटला जातो. तो पूर्णपणे वाईट नाही याचे ते प्रतिक आहे. आपला पराजय सहन न झाल्याने बन्सी जागच्या जागी कोसळतो.

५.३) युग कोणतेही असो, वस्त्रहरण थांबवायला कृष्णच धावून येतो

विजयाच्या आणि चपटीच्या नशेत चूर गणपत रेखाच्या खोलीचे दार उघडतो. सिनेमात हवेत तरंगण्याची पॉवर मर्त्य मानवांकडे नसल्याने रेखा त्याला कानफटात मारून परत भूतलावर आणते. याने चिडून तो वस्त्रहरणाचे प्रायव्हेट स्क्रीनिंग करायचे ठरवतो. तिला फरफटत तो अनुपम खेर जिथे बेशुद्ध पडलेला असतो तिथे घेऊन जातो. ती बेशुद्ध अनुपमला गदागदा हलवून वायफळ प्रश्न विचारते "मला या लांडग्याच्या हवाली का केलंत? केलंत तर केलंत, जिवंतपणी का केलंत, मला मारून का नाही टाकलंत" इ. इ. यावर सगळे बघे मनसोक्त हसतात. मग वस्त्रहरणाचा कार्यक्रम सुरू होतो. आता प्रेक्षकाची उत्सुकता चाळवते. महाभारतात द्रौपदीचा भाऊ योगेश्वर कृष्ण होता. इथे चंपाचा भाऊ भोला आहे. तोही जंगलातल्या मंदिरात निवांत झोपलेला. तो या दु:शासनापासून हिचे लज्जारक्षण कसे काय करणार?

काही अनाकलनीय कारणाने त्या जुगार्‍यांच्या अड्ड्यात मुरलीधर कृष्णाची लहानशी मूर्ती असते. रेखा जाऊन त्या मूर्तीला धमकावते की जर माझी इज्जत लुटली गेली तर तुला कोणी देव मानणार नाही. या गोंधळात रेड्डीकाका सराईतपणे एक क्लिवेज शॉट काढून घेतात. आकाशात विजांचा कडकडाट झाल्याने रेखाची जबर धमकी देवापर्यंत पोहोचली हे आपल्याला कळते. यानंतरचा शॉट दैवी चमत्कारापेक्षा काही कमी नाही. गणपतला नेमकं ती मूर्ती असलेल्या टेबलपाशीच पुढचा कार्यक्रम करण्याची हौस येते. बाहेर घोंघावणारा वारा खिडकीतून आत शिरतो आणि मूर्तीला गणपतच्या डोक्यात पाडतो. एवढ्यावर पवनदेव थांबत नाहीत. खिडकीचा पडदा निसटून येतो आणि रेखाच्या लज्जानिवारणार्थ तिच्या अंगाभोवती लपेटला जातो. ही संधी घेऊन रेखा धावत सुटते. शिवालिक टेकड्यांच्या प्रदेशातून ती चंबळच्या खोर्‍यातल्या डोंगरदर्‍यांपर्यंत धावते. अखेरीस ती एका दरीपाशी येते जिच्यातून नदी वाहत्त असते. मागे गणपत आणि कं. असतातच. प्राण गेले तरी बेहत्तर पण इज्जत वाचवली पाहिजे, या बाण्यानुसार ती नदीत उडी घेते. गणपतला वाटते की ही मेली. मग तो आपल्या साथीदारांसोबत परत फिरतो. इथे कॅमेरा ओमिनसली एक किंग कोब्रा आणि एक इंडियन कोब्रावर फिरतो. जे पुढच्याच फ्रेममध्ये दोन इंडियन कोब्रांमध्ये परिवर्तित होतात. हे दोन नाग कोण आणि यांचे इथे असण्याचे प्रयोजन काय हे सांगण्याची गरज नसावी!

शिवालिक टेकड्यांच्या प्रदेशातून ती चंबळच्या खोर्‍यातल्या डोंगरदर्‍यांपर्यंत धावते>> Biggrin

और आन्दो..

लै भारी. त्या गणपतचा संवाद आहे ना कांहीतरी 'मै कौरवो जैसा कायर नही, वस्त्रहरण करके रहुंगा' वगैरे

सिनेमात हवेत तरंगण्याची पॉवर मर्त्य मानवांकडे नसल्याने रेखा त्याला कानफटात मारून परत भूतलावर आणते. >> मर्त्य मानव नाही रे शमशान के मुर्दे असं हवं.. काय तूपन Biggrin

त्या गणपतचा संवाद आहे ना कांहीतरी 'मै कौरवो जैसा कायर नही, वस्त्रहरण करके रहुंगा' वगैरे>> मला वाटत तो म्हणतो कि एक्वेळ जमल नाही म्हणुन सोडून द्यायला मी कौरव नाही अस काहिस आहे.. आणि हे वाक्य ते लोक्स हवेलीत गेल्यानंतरच आहे ना.. अभ्यास कमी पडला वाटत माझा.. Proud

रेखा च्या गाण्याचं पूर्ण शूट वर्णन>> शेवटच्या अर्ध्या तासात नुसत गाणच तर दाख्वलय..मी परेशान झाली फॉर्वर्ड करुन करुन..
काय त्या स्टेप्स अन काय ते शब्द... अशक्य..

बाकी गोलू कि भोलू त्या सो कॉल्ड परीला पाहून आल्यावर रेखा अर्फ नागिनबाय त्याच्या कपाळाला हाथ लावून "अरे इसे तो ताप है' असं म्हणते ते तुम्ही नोटीस केलं का?

आणि थुंक से जहर मधे हे लोक ड्रॅगनसारख्या आगी का सोडतात कि थुकतात ?

लै भारी. त्या गणपतचा संवाद आहे ना कांहीतरी 'मै कौरवो जैसा कायर नही, वस्त्रहरण करके रहुंगा' वगैरे
>>>>

यावरुन अंदाज अपना अपना मधला परेश रावलच्या तेजाचा 'मै डिफीट खानेवाला नहीं हूं!' हा डायलॉग आठवला.

असे रिव्ह्यू लिहीण्यासाठी मुद्दामून हे सिनेमे पाहण्याची शिक्षा भोगून लोकांना अमृत देण्याची वृत्ती वाखाणण्यासारखी आहे. बरेच पंचेस उत्तम आहेत. पण सिनेमाच एव्हढा तद्दन बकवास आहे कि त्याची चिरफाड सुद्धा मनोरंजक वाटत नाही.

हे सिनेमे येऊन आता २५ वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला. जितेंद्राचे दातही पडले. त्या वेळी समकालीन पंचनामा पाहताना मजा येई. नंतरही काही काळ फारएण्ड चे पंचनामे पाहताना मजा येत असे. पण आता त्यात नावीन्य नाही उरले. इतक्या जुन्या सिनेमांच्या ऐवजी अक्षयकुमारचे ७८६ सारखे सिनेमे त्या त्या वेळी चिरफाडीसाठी मजा आणतील.

गौडचे नाव गणपत असल्याने त्याने अनुपमला दारू पाजलेली असते>>>>>> _/\_
<<<<<<<<ना, बन्सी प्लीऽऽऽऽऽऽऽज!
बन्सी प्लीज?
अंहं ऐसे नही, बन्सी प्लीऽऽऽऽऽऽऽज!>>>>>> Lol

<<<<<काही अनाकलनीय कारणाने त्या जुगार्‍यांच्या अड्ड्यात मुरलीधर कृष्णाची लहानशी मूर्ती असते........... हे दोन नाग कोण आणि यांचे इथे असण्याचे प्रयोजन काय हे सांगण्याची गरज नसावी!>>>>> हा पॅरा भयंकर जमलाय. Rofl

सस्मित >>>>>
झाली नाही ना अजून गोष्ट? Happy

नाही..., तुला नाही विचारलं....पायस यांना विचारते आहे..... Happy

हे दोन नाग कोण आणि यांचे इथे असण्याचे प्रयोजन काय हे सांगण्याची गरज नसावी!....यावरुन...पुढे मॅड्स व जॅक यांचं तिथे आगमन हे लक्षात आलंच!! Happy

ही मेजवानी कधी संपूच नये असं वाटतं!!

वा वा! नेहमीप्रमाणे जबरदस्त पायस!
मी पाहिलेले काही नीलबटवे (पक्षी, ब्लू-पर्स): सुरुवातीला त्या गुहेतल्या प्रसंगात जेव्हा चंद्रग्रहण होते, तेव्हा पृथ्वीची सावली खूप भराभर चंद्रावर सरकते. त्यानंतर मात्र संपूर्ण चंद्र झाकलेल्या अवस्थेत तुलनेने बर्‍याच काळ राहतो. शेवटी ग्रहण सुटते तेव्हा पृथ्वीची सावली आली तिथूनच परत जाते. मी लगेचच भौमितिक संशोधन करून पाहिले. म्हणजे त्या ग्रहणाच्या वेळी चंद्र पृथ्वीभोवती सलग न फिरता थोडा ऑसिलेट होतो, असा निष्कर्ष काढला गेला. कदाचित म्हणूनच ते एक 'विशेष' अश्या प्रकारचे ग्रहण असावे (पुजारी सांगतो त्या प्रमाणे).

शिवाय याच प्रसंगात एक सूक्ष्म निरीक्षण. जेव्हा जॅक आणि मॅड्स किरणांच्या करामती करून धरणी दुभंगवतात व खजिना दृष्टीस पाडतात, तेव्हा आपल्या ह्या करामतीवर, का कुणास ठाऊक, ते भलतेच खूष झालेले दिसतात. इथे मॅड्स चा चेहरा प्रफुल्लित होतो आणि जॅकचा चेहरा त्याला जमेल इतपत आनंदित होतो. हा सूक्ष्म फरक नक्कीच पाहण्यासारखा आहे.

गौडचे नाव गणपत असल्याने त्याने अनुपमला दारू पाजलेली असते.<<<<<
यासाठी खरोखर साष्टांग नमस्कार! _/\_
Rofl

नवीन प्रतिसादांचे आभार Happy
मर्त्य मानव नाही रे शमशान के मुर्दे >> Biggrin सही पकडे हैं.

'मै कौरवो जैसा कायर नही, वस्त्रहरण करके रहुंगा' >> "मैं महाभारत के कौरवों के तरह कायर नही. जो एक बार द्रौपदी की इज्जत लूट ना सके तो दोबारा कोशिश भी ना करें. मैं तो एक सीदासादा राक्षस हूं, जो आखरी सांस तक तेरी इज्जत लूटने की कोशिश करूंगा" - जितेंद्राकडून कुत्र्यागत मार खाण्याच्या काही क्षण आधी गणपतरावांचे उद्गार! हा डायलॉग (५) च्या सीनमध्ये नाही आहे, तो नंतर रिपीट राऊंडमध्ये येतो.

शंतनू - नीलबटवे मस्त Lol

आंबटगोड - एवढ्यात कुठली हो गोष्ट संपायला? अजून जवळजवळ दीड तासाचा सिनेमा बाकी आहे Proud

६) हिरोचे दिवस पालटायला सुरुवात झाले की हिरोईनला त्याच्या आयुष्यात यावेच लागते

६.१) "सांग सांग भोलानाथ, माझी दीदी मेली नाही ना?"

इकडे मंदिरात झोपी गेलेला भोला जागा होतो. जाग आल्यावर त्याला विजा कडाडताना दिसतात. वीजांची इंटेन्सिटी बघून त्याच्या लक्षात येते की घरी काहीतरी घोळ झालेला आहे. तो धावत जाऊन दणादणा दार वाजवतो. त्यावर उत्तर म्हणून गणपत त्याला कनाकना वाजवतो. गणपत बाळाला सांगतो की मी जुगारात तुझ्या जीजाजीचं सगळ जिंकून घेतलं. तुझी दीदी मेली. इथे तुझ्यासाठी काही नाही. आधी बाळाचा यावर विश्वास बसत नाही. मग त्याला बघ्यांपैकी एक (हा सहसा अलिफ लैलामध्ये फकीर टाईप्स रोलमध्ये असायचा) त्याला रेखाने जलसमाधी घेतल्याचे सांगतो. इथे ऋषी कपूरने या सिनेमाच्या क्वालिटीला गालबोट लावत सदमा लागण्याचा संयत अभिनय केला आहे.

पुढच्याच फ्रेममध्ये हे लागलेले गालबोट दूर होते. जसे आधुनिक जगात साडीच्या पदराला लावायची सेफ्टीपिन चोरीला गेली तरी सीआयडीला बोलावले जाते, तसेच शेषनागच्या जगात भोलेनाथच्या मंदिरात धाव घेणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे भोला दीदीची लाश शोधणे किंवा गेलाबाजार नदीकाठ चेक करणे अशी फुटकळ कामे बाजूला ठेवून तडक जंगलातले मंदिर गाठतो. तो आपले गार्‍हाणे मांडायला लागतो - ते लोक बघ काय म्हणत आहेत. माझी दीदी मेली म्हणे. आता मी काय करू? माझं दुसरं कोणी नाही या जगात. माझी दीदी नाही तर मी तरी जगून काय करू? हे मिनिटभर झाल्यानंतर तो म्हणतो की जर माझी दीदी मला परत मिळाली नाही तर मी डोकं आपटून जीव देईन. भोलेनाथ आधी मनात म्हणाला असेल की नसलेली गोष्ट तू कशी काय आपटणार आहेस? पण त्याच्या लगेच लक्षात आले असेल की हा प्राणी डोके आपल्यावर (पक्षी: पिंड) आपटून जीव देणार आहे. पिंड केचपने भिजेपर्यंत बाळ डोके आपटतो. या यातना असह्य होऊन भोलेनाथ मॅड्सला म्हणतो टेक ओव्हर! माधवी नागरुपात मंदिरात येते आणि याने करून ठेवलेला उद्योग बघते. मग ती लगेच रेखाचे रुप घेऊन त्याला थांबवते.

६.२) विरह नागांनाही सहन होत नाही

सिनेमाच्या सुरुवातीला आपण अघोरी आणि जितेंद्रच्या पॉवर बघितल्या आहेत पण माधवीकडे काय पॉवर आहेत ते स्पष्ट झालेले नसते. उर्वरित सिनेमात ती जेवढ्या पॉवर दाखवते ते बघता हे दोघे किस झाड की पत्ती असेच म्हणावे लागे. भोला नावाप्रमाणेच भोला असल्यामुळे त्याला रेखाच्या रुपातली माधवी खरी रेखा वाटते. प्रेक्षकांना यांच्यातला फरक कळावा म्हणून रेखाने स्पेशल डिझाईनची नाग टिकली लावली आहे. कही किसी रोजमध्ये सुधा चंद्रनने रमोला सिकंदची भूमिका साकारेपर्यंत टिकली फॅशनचा हा नवा मापदंड असावा. रेखाने नदीत उडी घेताने जे कपडे घातलेले असतात तोच वेष या रुपात मॅड्सचा असतो. भोलाच्या कपाळा स्पर्शमात्र करताच त्याची कपाळाची जखम बरी होते. बाळ म्हणतो की जीजाजी आणि आपले घर तर गेले. आता कुठे जायचे? रेखा म्हणते की तू चिंता नको करू, मी बघते काय करायचे. मग ते दोघे मंदिरातून बाहेर पडतात आणि विरहाचे म्युझिक वाजू लागते. क्षणभर गोंधळ होतो खरा पण लगेच कॅमेरा पिंडीवर बसलेल्या नागरुपातल्या जितेंद्रावर क्लोजअप मारतो आणि विरहाचे म्युझिक का याचा खुलासा होतो.

मग हे भाऊ-बहीण एका निर्जन ठिकाणी जातात. रेखा जणू एका विशिष्ट ठिकाणाचा ठाव घेत असते. ते सापडल्यावर ती बाळाला तिथे खणायला लावते. थोडे खणल्यावर तिथे दागिन्यांनी भरलेले एक छोटे मडके सापडते. भोला म्हणतो की मला नको एवढे धन! मला फक्त इतकेच धन पाहिजे ज्यातून मी माझ्या ताईसाठी म्हणजे रेखासाठी बांगड्या बनवू शकेन. अजूनही पोस्ट गणपत हल्ला वेषात असल्यामुळे मॅड्सला अंगावरचे कापड हटवून कपाळावर हात मारून घेता येत नाही. मग शेवटी ती "भोलेनाथनी स्वप्नात येऊन मला आदेश दिला" हे हुकमी अस्त्र वापरते. अजून भोचकपणा न करता ऋषी कपूर ते दागिने घेतो.

पुढच्याच दृश्यात आपल्याला कळते की या दागिन्यांना विकून ऋषी आणि रेखाने एक मोठ्ठी हवेली विकत घेतली आहे. या हवेलीत ऋषी कपूर म्हशी विकत घेऊन त्यांचा तबेला बांधण्याचे स्वप्न बघतो आहे. एवढ्यात दारावर टकटक होते. रेखा जाऊन बघते तर दारात जितेंद्र उभा! रेखाच्या रुपात मॅड्स असल्याने ती लगेच जॅकला ओळखते. पण भोलाला जॅक माहित नसतो. मग जॅक त्याला सांगतो की मी प्रीतम, आधी मी बायकोची गुलामी करायचो आता मला नोकरी पाहिजे. आधी ऋषी कपूर आढेवेढे घेतो पण मग जॅक आणि मॅड्स त्याला समजावतात. अरे तू बासरी वाजवणारा, तुझ्या हातात बासरीच शोभते, झाडू नाही. जॅक मी तुझ्या बासरीचे मंजूळ सूर ऐकून लहरीया गावातून लहरत आलो ही शुद्ध लोणकढी थाप मारतो. हे ऐकून बाळ भलताच खुश होतो आणि परस्पर ठरवतो की याची नोकरी पक्की! इथे जितेंद्राच्या चेहर्‍यावरचे मिश्किल भाव बघता, द्व्यर्थी संवादांचा कोटा सुरू झाला असल्याचे आपल्याला लक्षात येते. काम समजावण्याच्या निमित्ताने मॅड्स जॅकला आपल्या बेडरूममध्ये घेऊन जाते आणि मूळ रुपात येऊन रोमान्स सुरु करते. पण मिठाच्या खड्याप्रमाणे ऋषी कपूर परत येतो आणि तिला परत रेखा बनावं लागते. मग दोन द्व्यर्थी संवाद मारून जितेंद्र म्हणतो की आता आम्हाला काम करू दे, तू जाऊन बासरी वाजव!

६.३) तुम्ही आपटल्यानंतर टाळ्या पिटणारे बघे माणसेच असतील असे नाही, अस्वलेही तुमच्यावर हसण्यात इंटरेस्टेड असू शकतात.

जितेंद्र-रेखाला काम मिळालं तसं ऋषी कपूरला काम देणे भाग आहे. त्यानुसार पुढची फ्रेम हॅमॉकमध्ये बंदूक आणि गिटार घेऊन बसलेल्या मंदाकिनीवर आहे. लाल शर्टवर पांढरा शर्ट आणि पांढरी पँट अशा अत्यंत सुयोग्य रंगसंगतीचे कपडे घालून ताई माळरानावर शिकार करायला आलेल्या असतात. तिच्यासोबत मोती नावाचा कुत्रा पण असतो. आकाशात दोन खग विहरताना बघून त्या ललनेस डकहंट खेळण्याची हुक्की येते. साधारण मोतीच्या उंचीचे एक अस्वलाचे पिल्लू येऊन मंदाकिनीला मिठी मारते. आपल्याला मिठी मारणारा प्राणी कुत्रा नसून अस्वल आहे हे कळताच तिची टरकते. हे अस्वल पूर्णवेळ पौर्णिमेला रडणार्‍या लांडग्याप्रमाणे वर तोंड करून, मर्दमधल्या वाघाप्रमाणे हात जोडून दोन पायांवर धावते. त्याला धावताना बघून मंदाकिनीसुद्धा धावते. धावत धावत ती रमत गमत चाललेल्या ऋषी कपूरवर आदळते. ऋषी कपूर तिच्या वजनाने दाणकन् आपटतो आणि हे बघून अस्वलाला मौज वाटते. मग ते टाळ्या पिटत, चार पायांवर रमत गमत निघून जाते.

अस्वल गेल्याची खात्री होताच मंदाकिनी आपले संस्कार दाखवत भोलाला थॅंक यू म्हणते. भोला जमिनीवर आपटला तेव्हा त्याचे डोकेही आपटले असावे. तो मंदाकिनीला परी समजतो आणि तिला तिचे पंख कुठे आहेत हे विचारतो. ती त्याला पागल म्हणून निघून जाते. इथे ऋषी कपूरचे एक्साईटेड एक्सप्रेशन्स बघण्यासारखे आहेत. तिथून निघते तर ती थेट घरी जाते. तिचे नाव कामिनी असल्याचे आपल्याला कळते. रझा मुराद तिचा बाप दाखवला आहे. घरी परतताना तिच्याकडे फक्त गिटारच असते पण रझा मुरादला बंदूकीसारख्या किरकोळ वस्तुची चिंता नसल्याने तो याकडे दुर्लक्ष करतो. कामिनी गावात नव्यानेच आलेली असल्याचे कळते. कुठून तरी डॅन धनोआ "हाय अंकल" करत उगवतो. याचे सिनेमातले नाव विक्रम! इथे एक मिसलेला विनोद आहे. विक्रम कामिनीला म्हणतो की "तुम आज बुटिफूल लग रही हो". त्यावर ती "और तुम बेवकूफ लग रहे हो" असे प्रत्युत्तर करते. तांत्रिकदृष्ट्या संवादलेखकाला बुटिफूल - ब्लडीफूल असे यमक जुळवायची सुवर्णसंधी होती. पण संवादाचे बजेट डॅनीवर खर्च केल्यामुळे इथे दुर्लक्ष झाले आहे. रझा मुरादला आपल्या लेकीचे कौतुक असल्याने तो या विनोदावरही दिलखुलासपणे हसतो. ती आपल्या खोलीत गेल्यावर डॅन धनोआ आडून आडून रझा मुरादलाही फूल म्हणून घेतो. आता कामिनी नसल्यामुळे रझा मुरादला विनोदावर हसण्याची गरज नसते. तो विक्रमला काम काय आहे ते विचारतो. विक्रम जनावरांची कातडी परदेशात निर्यात करून आलेले साडेचार लाख रुपये घेऊन आलेला असतो. विक्रमला कामिनीत अधिक रस असतो तर रझा मुरादला धंद्यात! त्यामुळे तो विक्रमकडून पैशाची ब्रीफकेस हिसकावून घेता घेता त्याला कामिनीशी विक्रमचे लग्न लवकरच लावून देण्याचे आश्वासन देतो.

इथे दोन महत्त्वाचे मुद्दे उपस्थित झाले आहेत, ज्याने सिनेमातला कॉन्फ्लिक्ट पुढे जाणार आहे.
१) ऋषी कपूर मंदाकिनीच्या आयुष्यात आल्यामुळे मंदाकिनीला डॅन धनोआ व्यतिरिक्त ऑप्शन निर्माण झाला आहे.
२) रझा मुराद जनावरांच्या कातडीच्या निर्यातीचा धंदा करतो. या सिनेमात आणखी एकच व्यक्ती आहे जी जनावरांच्या कातडीशी संबंधित आहे. द मॅन हिमसेल्फ, अघोरी! जय त्रिकालदेव!!

>> मग दोन द्व्यर्थी संवाद मारून जितेंद्र म्हणतो की आता आम्हाला काम करू दे, तू जाऊन बासरी वाजव!

रणांगण ची प्रेरणा सापडली..

७) हिरोची अच्छाई दिसल्याशिवाय हिरोईन त्याच्या प्रेमात पडत नाही.

७.१) जर ऐपत अंथरूण नसेल तर स्वप्नेही पाय नाहीत.

इकडे भोला परीच्या जादुई नजरेने घायाळ होऊन घरी परतलेला असतो. अशा घायाळ अवस्थेत गाणे म्हणणे बंधनकारक असल्याने तो लगेच उघड्या डोळ्याने स्वप्नरंजन सुरु करतो. आपल्या स्वप्नांचे स्वामी आपण असतो ही गोष्ट अनेक हिंदी दिग्दर्शक विसरतात. त्यामुळे ते स्वप्नरंजनाचा पूर्ण लाभ उठवत नाही. शेषनागमध्ये मात्र तसे होत नाही. त्यामुळे या स्वप्नातल्या गाण्यात ऋषी कपूर मंदाकिनीवर रुसलेला असतो आणि मंदाकिनी गाणं म्हणून त्याची समजूत घालत असते. पुन्हा एकदा, हे स्वप्न ऋषी कपूर बघत आहे आणि अजून तो मंदाकिनीच्या खिजगणतीतही नाही. स्वप्न बघायला पैसे लागत नाहीत हेच खरे!

गाणं आहे - तेरा हाथ ना छोडूंगी मैं हूं तेरी हथकडी अडी वे अडी. तबल्यामध्ये भरणायुक्त तिहाई म्हणून एक तिहाईचा प्रकार असतो. त्यामध्ये तिहाईच्या पल्ल्यांमधला पॉज भरून काढण्यासाठी काहीतरी पीस वाजवतात जसे (धाधा तीट धाधा तींना धाऽकत) x३ यातल्या कत चे जे काम आहे तेच त्या "अडी वे अडी" चे आहे. ऋषी कपूरने या गाण्याच्या पहिल्या कडव्यात कमालीचा संयम दाखवला आहे. मंदाकिनीचा रोमान्स याच्या अंगावर उतू जात असतानाही बापडा निग्रहाने तिला भाव देत नाही. पहिल्या कडव्या फक्त तिच्या सिंदूराच्या रेषेत मोगर्‍याची फुले आहेत. पुढच्या कडव्यात ती शकुंतलेप्रमाणे मोगर्‍याच्या गजर्‍यांच्या दागिन्यांनी मढते. मग ऋषी कपूरचा रोमान्स तिच्या अंगावर उतू जातो. तिसर्‍या कडव्यात तिच्या अंगावरची फुले गायब होतात आणि ऋषी कपूर बासरी वाजवतो. मग दोघांचा रोमान्स एकमेकांवर उतू जातो. बाकी या गाण्याच्या स्टेप्सचा बारकाईने अभ्यास केल्यास मंदाकिनी त्याची हथकडीच काय बेड्या, साखळदंड सगळं काही आहे हे लक्षात येते.

स्वप्न बघता बघता बाळ झोपाळ्यावर झोके घेत असतो. झोके घेता घेता तो धम्म करून जमिनीवर पडतो. रेखा काळजी वाटून त्याची चौकशी करते. इथेच टीना म्हणते तो "लगता हैं तुझे ताप हो गया हैं" डायलॉग आहे. जितेंद्राला त वरून ताकभात ओळखता येत असल्याने तो त्याची निवांत फिरकी घेतो. रेखाला सुद्धा काय चाललंय ते कळतं आणि ती वैद्याकडे जायचा बहाणा करून ऋषी कपूरला जितेंद्रासोबत एकटे सोडून निघून जाते. मॅड्सनेही बाळाला भाऊ मानल्यामुळे बाळ त्याचा मेव्हणा झाला. मग जितेंद्र मेव्हण्याची सेटिंग करून देऊ म्हणून त्याला विचारतो की काय झालं जरा विस्ताराने सांग. बाळ म्हणतो की मला एक परी भेटली, तिचा रंग म्हशीच्या दूधासारखा होता पण तिला पंख नव्हते. कदाचित एखाद्या राक्षसाने ते कापले असावेत. हे ऐकल्यावर जितेंद्र गिव्ह अप मारतो "भोला तू वाकई भोला हैं रे"

७.२) वस्त्रहरण राऊंड २

रेखा आठवड्याच्या बाजारात एक वैद्य शोधून काढते. तो औषध म्हणून एक चाटण देतो. ते चाटण बनवेपर्यंत रेखा तिथेच उभी राहते. गणपतही योगायोगाने तिथेच आलेला असतो. तो लगेच रेखाला ओळखतो. तो तिचा पत्ता काढून तिच्या आधी तिच्या घरी पोहोचतो. ही रेखा, रेखा नसून मॅड्स असल्यामुळे तिला आधी गणपत ओळखू येत नाही. मॅड्सकडे फ्लॅशबॅक बघायची पॉवर असते. तिचा वापर करून ती काय घडले होते ते जाणून घेते. ती नागीण असल्याचे आडून आडून सुचवून ती त्याला परत जायला सांगते. इथे तो अतिसुंदर "मैं कौरवों के तरह कायर नहीं" संवाद आहे. तो तिला हात लावू बघतो तर त्याला विजेचा झटका बसतो (मॅड्सची आणखी एक पॉवर!). इथे तिच्या छातीचा भाता जोरजोरात वाजायला लागतो. श्रीदेवीने नगीनामध्ये रुढ केलेल्या नियमावलीनुसार ही नागीणीची चिडचिड अवस्था होय.

चिडचिड अवस्थेतली रेखा गणपतच्या कानफटात वाजवते. ऋषी कपूर कुठूनतरी येऊन तडमडतो पण गणपत त्याला कुंच्याने कोळिष्टक झटकावे तसे बाजूला करतो आणि एका खोलीत कोंडतो. आता रेखारुपी मॅड्स बाळासमोर तिच्या ऑस्स्म पॉवर्स दाखवू शकत नाही मग तिला वाचवणार कोण? अर्थातच जितेंद्र! जितेंद्र येऊन गणपत आणि त्याच्या टोळीशी फायटिंग करतो. जितेंद्राच्या पॉवर्स बघता ही फाईट एक सेकंद सुद्धा चालायला नको आहे पण बिंग फुटण्याची भीति असल्याने तोही फार काही पॉवर वापरू शकत नाही. मग नाईलाजाने त्याला स्नेक स्टाईल कुंगफूचा आधार घ्यावा लागतो. असे म्हणतात की ही स्नेक स्टाईल शिकण्यासाठी १९७८ चा जॅकी चॅन टाईममशीनमधून १२ वर्षे भविष्यात येऊन हा सिनेमा पाहून गेला होता. उगाच नाही स्नेक इन द ईगल्स शॅडोमध्ये तो इतका चांगला कुंगफू करत! गणपत आणि त्याचे मित्र प्रचंड प्रमाणात मार खाऊन पळतात. जॅक मॅड्सला विचारतो तो या गुंडांना चावली का नाहीस? ती म्हणते की त्याच्यासाठी मला माझे खरे रुप दाखवावे लागले असते (हा इच्छाधारी रिलेटेड नियम नवीन आणि यूनिक आहे), त्याने सत्य कळून भोला फार दु:खी होईल. मग जितेंद्र आणि रेखा भोलाचे ट्रेनिंग करायचे ठरवतात. भोला सराव करायचा सोडून जितेंद्राची स्तुती करत बसतो "तुम तो इतनी तेज तलवार चलाते हो की जिसकी गर्दन कटने वाली हो उसे पताही नही चलेगा." आणि तलवारबाजी शिकताना त्याला बासरी कशाला पाहिजे? असो, इथे केळ्याच्या सालावरून घसरून पडण्याचा हुकमी जोक दिग्दर्शक काढून घेतो. बाकी त्या ट्रेनिंग सीनचा सिनेमाशी काही संबंध नाही.

७.३) लोकांचा गळा दाबण्याआधी त्यांच्या हातात रायफल नाही ना आणि त्यांच्यासोबत सहा गुंड नाहीत ना हे बघून घ्यावे, नाहीतर हाडांचा भुगा होण्याची संभावना असते

अ‍ॅबरप्टली सीन कट होऊन डॅन धनोआ बंदूकीने एक पक्षी मारतो हे दृश्य दिसते. हे असे अ‍ॅबरप्ट कट्स १९८७ ते १९९१-९२ च्या कालखंडाची खासियत आहे. या काळात काही संकलक अ‍ॅव्हांत गार्दे शैली वापरत असल्याने असे जॅरिंग कट्स देत असत (याविषयक अधिक टिप्पणी गैरकानूनीच्या रसग्रहणात दिली आहे). तर असा जॅरिंग कट बसून आपल्याला दिसते की या ट्रेनिंगने कॉन्फिडन्स वाढलेला ऋषी कपूर मंदाकिनी, डॅन धनोआ आणि आणखीन सहा शिकारी जंगलात उभे आहेत. भोलाला विक्रमने पक्षी मारल्याचे फारच दु:ख होते. विक्रम म्हणजे डॅन धनोआ या सिनमात वारंवार इंग्रजी बोलताना दाखवला आहे. या काळात भारतीय युवा पिढीवर अमेरिकन संस्कृतीचा प्रभाव वाढत होता. अधिकाधिक हॉलिवूड सिनेमे बघायला मिळत असल्याने सव्यापसव्याशी जवळीक वाढलेली होती. त्याचा प्रभाव खराब इंग्रजीच्या रुपाने भाषेतून दिसून येतो. विक्रम हे पात्र या पिढीचे प्रतिनिधीत्व करते.

भोलाला हिंसा आवडत नसल्याने तो "पिताजी कहते थे ..." या तंत्राचा वापर करून विक्रमला जाम पकवतो. तो म्हणतो की हे सगळे प्राणी माझे मित्र आहेत, ते मी बोलावले की येतात. इथे विक्रम भोलाशी उर्मटपणे वागून त्याला त्याच्या मित्रांना बोलवायला सांगतो. मंदाकिनीला हे उर्मट वागणे पसंत पडत नाही. तिचा चेहरा दाखवून दिग्दर्शक ही आता भोलाच्या साईडला होणार असल्याचे सूतोवाच करतो. मग ऋषी कपूर त्याची फुकणी फुकायला लागतो. त्याची बासरी ऐकून बिबटे, गाई-म्हशी पासून हत्ती आकर्षित होतात. तसेच मिनिटागणिक सिनेमाचा भूगोल दक्षिणेकडे सरकत असल्याचे आपल्या बॅकग्राऊंड बघून कळते. आपण आता हिमालयातून गंगेच्या उपनद्यांच्या मैदानाला पार करून पठारी प्रदेशात आलो आहोत.

आता या सगळ्या प्राण्यांना यायला थोडा वेळ लागणार असतो. पण तेवढा संयम नसल्याने ऋषी कपूर गाणे सुरू करतो. मुन्ना अझीझ पुढची तीन मिनिटे विव्हळतो. सिनेमा बघत असलेल्यांपैकी कमकुवत हृदयाच्या व्यक्तींनी याची नोंद घ्यावी. गाणे आहे - दोस्तों, दोस्ती के गीत मैं गाता हूं, चले आओ मैं तुमको बुलाता हूं. अशा वास्तववादी (?!) परिस्थितीत गाणे सेट केले की मग डॅन्स फारसा बसवावा लागत नाही. याने पैसा आणि श्रम दोन्हींचे बचत होते. होतकरू दिग्दर्शकांनी या गाण्याचा या अँगलने कसून अभ्यास करावा. तर डॅन्स बसवायची गरज नसल्याने ऋषी कपूर पूर्णवेळ बासरी वाजवणे आणि येणार्‍या प्राण्यांकडे बघून खुश होणे इतकेच काम करतो. विक्रम आधी हसतो आणि नंतर गोंधळतो "याच्या बासरीची नक्की रेंज काय आहे? याचा अँप्लिफायर कुठे आहे?". मंदाकिनीला या गाण्यात हिरोवर इंप्रेस होण्याचे काम दिलेले आहे ते ती मनापासून करते.

आता इतक्या सगळ्या शिकार्‍यांपुढे एवढे सगळे प्राणी आयते आणून दिल्यावर जे व्हायचे तेच होते. ते प्राण्यांची शिकार करतात. इतके लॉजिक भोलाला समजत नसल्याने तो विक्रमचा गळा दाबायचा प्रयत्न करतो. अर्थातच त्याच्याच्याने ते होणार नसतं. विक्रम त्याला जमिनीवर फेकतो आणि त्याच्यावर बंदूक रोखतो. प्रेक्षक क्षणभर बरी ब्याद टळली म्हणून निश्वास टाकतो पण मंदाकिनी मध्ये तडमडते. ती म्हणते याला नको मारू. तो म्हणतो बरं पण मी याला बडवू तर शकतो. मग तो त्याला रायफलच्या दस्त्याने मरेस्तोवर बडवतो. मग त्याला मारणार इतक्यात मंदाकिनी पुन्हा म्हणते की याला नको मारू. तो म्हणतो की या गावठीचा तुला एवढा पुळका का? ती म्हणते गावठी तू, तुझ्याइतका कमिना मी अजून नाही पाहिला. तो लगेच त्सुक्कोमी मारतो "क्यूं अपने बाप को नही देखा?" पण हाडाचा बिजिनेसमॅन असल्याने डॅन धनोआला ठाऊक असते की ऋषी कपूरच्या कातडीला बाजारात किंमत नाही. त्यामुळे तो फक्त त्याची बासरी तोडून त्याला सोडून देतो.

Pages