पाकातले चिरोटे

Submitted by प्रीतीसंगम on 19 September, 2018 - 13:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

पाकातले चिरोटे

१ कप रवा
खायचा रंग,मी पिवळा आणि गुलाबी वापरला आहे
१ टेस्पून तेल मोहनासाठ
चिमुटभर मीठ
४ टेस्पून वितळलेले तूप,
३ टेस्पून कॉर्न फ्लोअर
पाक:
१ कप साखर,१/२ कप पाणी, गोळीबंद पाक करावा

क्रमवार पाककृती: 

रव्यामध्ये १ टेस्पून कडकडीत गरम तेल घालावे. चिमूटभर मीठ घालावे. अंदाज घेउन पाणी घालावे आणि थोडा घट्ट असा गोळा भिजवावा. २ तास ओल्या कपड्याने झाकून ठेवावे.
२तासांनी भिजवलेल्या गोळ्याचे ३ सारखे भाग करावे. एक गोळ्यात गुलाबी आणि एक गोळ्यात पिवळा रंग घालून नीट मळून घ्या. एक गोळा कोणताही रंग न घालता तसाच ठेवा.प्रत्येक गोळ्याची एकदम पातळ पोळी लाटावी. पोळीतून खालचा पोळपाट दिसला पाहिजे इतपत पातळ लाटावी.
३ टेस्पून तूप वितळवून त्यात ३ टीस्पून कॉर्न फ्लोअर घालून पातळसर पेस्ट बनवा.१ लाटलेली पोळी घेऊन त्यावर बनवलेली पेस्ट पसरावी. त्यावर दुसरी लाटलेली पोळी बरोबर पहिल्या पोळीवर येईल अशी ठेऊन या पोळीवर पेस्ट लावावी. वर तिसरी पोळी ठेवून उरलेली पेस्ट लावावी.
एका बाजूने गुंडाळी करत मध्यभागी आनून घट्ट रोल बनवावा. अशाच उरलेल्या तीन पोळ्या बनवून रोल बनवा.साखर आणि पाणी एकत्र करून गोळीबंद पाक करावा. रोलचे १/२ इंचाचे तुकडे करावे. एक तुकडा घेउन लेयर असलेली बाजू वर अशाप्रकारे ठेवून हाताने दाब देउन चपटे करावे. लाटणे फिरवून छोटीशीच पुरी/चिरोटे बनवा. तयार चिरोटे तेलात मंद आचेवर बदामी रंगावर तळून घ्या. चिरोटा कोमट झाल्यावर साधारण गरम असलेल्या पाकात घाला. मिनिटभर ठेवून बाहेर काढा. आणि उभा करून ठेवा.

वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांसाठी
माहितीचा स्रोत: 
मावशी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुपच सुन्दर .....
मी मैदा आणि रवा वापरुन करत असते चिरोटे.....
आता फ़क्त असे रव्याचे करुन बघेन ,फोटो बघून तोपासु...

Back to top