जायचे घेवून गाऱ्हाणे कुठे ?

Submitted by सुप्रिया जाधव. on 25 August, 2018 - 01:24

गायचे अपुलेच रडगाणे कुठे ?
ह्याचसाठी टाळते जाणे कुठे

पाहिजे आहेत थोडेसे चणे
मागते काजू नि बेदाणे कुठे ?

खात पडते धूळ देव्हाऱ्यामधे
चालते हल्ली जुने नाणे कुठे ?

दात पडल्यावर दिले आहेत तू
चावता येतात हे दाणे कुठे ?

बाप मेला, नांदवेना दादला
जायचे घेवून गाऱ्हाणे कुठे ?

सुपिक होती जमिन, नापिक जाहली
सांग ना पेरायचे दाणे कुठे ?

चालली इस्टेट नावावर तिच्या
काढते आहेस तू खाणे कुठे ?

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users