रवा आणि खोबर्‍याचे लाडू

Submitted by दिनेश. on 12 October, 2009 - 02:01
rava khobare ladu
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ तास
लागणारे जिन्नस: 

चार कप बारिक रवा, दोन कप बारिक वाटलेले ओले खोबरे ( एका मध्यम नारळाचे एवढे होते)
एक कप तूप, तीन कप साखर, मोठी चिमूट केशर (किंवा हवा तो स्वाद ), बेदाणे व काजू
(आवडीप्रमाणे )

क्रमवार पाककृती: 

जाड बुडाच्या भांड्यात थोडे तूप घालून रवा भाजायला घ्या. फ़ार गुलाबी करायचा नाही.
शक्य असेल तर खोबरे वाटताना फ़क्त शुभ्र भाग घ्या (मी आळस केला ) रवा भाजत आला
कि त्यात खोबरे घाला. परतत रहा, रवा परत हाताला हलका लागला पाहिजे ( खोबर्‍याचा
ओलेपणा रहायला नको. ) लागेल तसे तूप घालत रहावे.
दुसर्‍या भांड्यात साखर आणि दिड कप पाणी घालून पाक करत ठेवा. सतत ढवळत रहा.
पाकातच केशर किंवा वापरत असाल तो स्वाद घाला. उकळी येउन फ़ेस आला कि गॅस मंद
करा. पाकातला चमचा वर काढून, थोडासा पाक अंगठा आणि पहिले बोट यांच्यामधे धरुन
बोटे हळूहळू लांब करा. एखादी तार दिसायला लागली कि गॅस बंद करा व अर्ध्या कपापेक्षा
थोडा जास्त पाक काढून ठेवा. मग पाकात रव्याचे मिश्रण घालून ढवळा.
दोन तीन तास झाकण न ठेवता मुरु द्या. मग लाडू वळायला घ्या. मिश्रण कोरडे वाटले तर
काढून ठेवलेला पाक कोमट करुन लागेल तसा मिसळा. (रवा किती जाड आहे, यावर किती
पाक लागेल, ते ठरते ) मिश्रण हाताला शिऱ्यापेक्षा थोडे घट्ट लागेल, इतका पाक घाला. लाडु
वळताना, हवे तसे बेदाणे व काजू वगैरे वापरा. (मी भाजलेला काजू लाडूच्या आत ठेवलाय, त्याने
लाडवाचा ओलावा कमी होतो. )

मला रव्याचे लाडू मऊसर आवडतात. (तसे नसले तर रांगोळीचा लाडू खाल्यासारखा वाटतो मला.)
हा लाडु मऊसर होतो. फ़ारसा टिकणार नाही, पण चवीला मस्त लागतो. (फ़्रीजमधे आठवडाभर
राहील. ) या प्रमाणात ५० ते ६० लाडू होतात. (कपाच्या आणि लाडवाच्या आकारावर अवलंबून )

वाढणी/प्रमाण: 
५० ते ६० लाडू होतील.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा आणि म्रु लाडु झक्कास!
रैना! रवा जाड असेल किंवा पाक एकतारिच्या पुढे झाला असेल..(हा माझा अंदाज हं..बाकी एक्स्पर्ट लोक अजुन सांगतिल)

रैना,
पाक कमी झाला असेल किंवा पक्का पाक झाला आसेल.......
मागील दिवाळीला माझ्याकडून असेच झाले होते सासरी खुप घाबरले होते...कोणी रागवेल ....नंतर पुन्हा पाक करुन टाकला.........लाडु खुप छान् झाले ....सगळे स्तुती करत होते.!

दिनेशदा आणि म्रु लाडु छान झाले ................टेस्ट घेऊ का ?!!!!!!!!!!

मूळात म्हणजे पाकातले लाडूसाठी रवा बारीक असेल तर उत्तम.
१) पाक कच्चा राहिला(साखर नुकतीच वितळून २ मिनीट म्हणजे कच्चा पाक.) व आधीच मिश्रण टाकले तर सैल रहाते.
२) पाक २ तारी होइपर्यन्त वाट पाहिली मग मिश्रण टाकले तर रवा भिजून फुलतो त्या पाकात मग मिश्रण थोड्या वेळाने कोरडे होते.
मग बेस्ट हेच की खूप बुडबुडे यायला सुरुवात झाली की, हाताने बघायचे की तार किती आहेत ते. दोन तार जस्ट यायला लागली की टाकायचे मिश्रण जरा पटपट मिक्स करायचे व गॅस हा आधी बंद करायचा व खाली काढायचे भांडे.
झाकून ठेवायचे. ह्यात गॅस का नेहमी मंदाग्नीवर पाहिजे जशी साखर वितळली की.
अ‍ॅक्चुयली, पाकाची एवढी भिती बाळगायचे खरेच कारण नाही. उगाच पाकाला हाईप्ड केलेय. Happy
साखर वितळली की जरा लक्ष द्यावे लागते. बस इतकेच. साखर वितळली की अगदी ३-५ मिनीटाचा खेळ असतो मग. त्यातच काय ते आवरायचे. ती मिनीटे गेली की खेळ खराब. Happy
(लहानपणी आईकडे बघुन शिकलेली मी, खरे तर पहिला लाडू देवाला दाखवायच्या आधी मलाच खायला मिळेल ह्या आशेत आईच्या आजूबाजूला वावरणारी मी आठवले.)

दिनेशदा, मृ, लाडुचे फोटो झकास आलेत. हे माझे अतिशय आवडिचे लाडु

मनुस्विनी बरोबर सांगत्ये. पाकाला अजिबात घाबरायच नाही. (एकतारी पाका विषयी आमची भावंड काहितरीच जोक्स करायची. ) हात भाजेल अशी भिती असेल तर कालथ्याला पाकात बुडवुन वर काढायच मग पाकाचे थेंब खाली पडतात आणि पाक तयार झाला असेल तर कालथ्यातुन थेंब पडुन मग एक तार खाली येते किंवा बारिक दोरे दिसतात.. बस मग गॅस बंद रवा घाला आणि मग चांगल ढवळुन झाकुन ठेउन एक छोटी डुलकि काढुन या. वळा आणि स्वतःची पाठ थोपटा. Happy

मी दरवर्षी हे लाडु करते आणि अजुन तरी कधी बिघडले नाहियेत Happy

पाकातले पदार्थ सोपे म्हणणार्‍या मुलींनो माझी दिवाळीची लाडूंची ऑर्डर घेणार का, खर तर घ्याच :). माझे तर यावर्षी नेहमीचे बेसनाचे लाडू बिघडवून झालेत. त्यामुळे माझ्याच्याने पाक कामाला सोपे म्ह्णवत नाही. Happy

थोडासा बारीक रवा वेगळा असा नीट खरपूस भाजून मग तूपात परतून घे नी कर मिक्स.
साखर कमी पडेल बहुधा अश्याने. मग जराशीच बुरा साखर टाक नी वळ लाडू. पाक खूप कच्चा असेल तर टिकणार नाहीत लाडू आता.
वड्या करु शकतेस तसेच ते मिश्रण वापरून. तूपाच्या थालीत थाप. ओवन मध्ये ठेव एक २० मिनीटे १४५ वर.
मग नारळाच्या रवा घालून वड्या म्हणून खपतील. Happy

रैना, मिश्रण कोरडे व्हायची कारणे
१) रवा जाड होता
२) पाक जास्त उकळला गेला
३) हवा फार थंड व कोरडी होती.
४) मिश्रण फॅनखाली ठेवले गेले.
५) पाक क्वांटिटीने कमी होता

पाकात हेच काय कुठलेही मिश्रण घातले आणि कोरडे वाटले तर त्यात गरम दूध वा उकळते पाणी घालून
लाडू करता येतात. तसेच मिश्रण फार ओले वाटले तर परत रवा कोरडा भाजून मिसळता येतो. असे करताना अक्षरशः चमच्या चमच्याने मिश्रण घालायचे.

पाक करताना पाणी व साखर एकाच कपाने मोजणे आवश्यक असते. साखर पण सपाटच मोजून घ्यायची. जर शक्य असेल तर तपमापक घ्यावे. १०५ से ला बरोबर हवा तसा पाक होतो, या लाडवाचा.
आच मध्यम असावी. पाकाच्या तारा बघताना भांडे आचेवरुन बाजूला करुनच बघायच्या, कारण पाकाच्या अवस्था भराभर बदलतात.
पाकाचे फोटो काढेपर्यंत पाकाची अवस्था बदलते. आता पाक करणारे वा फोटो काढणारे, एक्स्पर्ट माणूस भेटले तरच हे जमणार ना ?

दिनेश, मी काढला ना फोटो काल. एकटीच होते बेसन कणीकेचे चुर्मा लाडू करताना. .. तारांबळ उडाली होती पण केले मॅनेज. Happy पण सगळे फोटो नाही जमणार. शेवटी शेवटी तर दोन मिनीटात आवरायचे असते एकदा का एक तार झाली की.

कसले tempting आहेत फोटो! मी अजूनही पाक वापरून लाडू केलेले नाहीत. पण मी दिनेशदा आणि माबोवरच्या सर्व सुगरणींची पा.कृ. वाचत असते. जरा हिंमत आली की करीन पाक घालून लाडू!

मनस्विनि मि लाडु केले आणि रात्रिपर्यत घट्ट झाले आणि ओवेन मधे वड्या करायच्या म्हनुन ठेव्लेले मिष्रन आपोआप घट्ट झाले होते, त्यामुळे ओवेन वापरला नाही. म्हणजे आता लाडु टिकतील का ?

म्हणूनच "पाक"कला Wink
माझे रवा-बेसन झाले नीट...वळताना जरा ओलसर होते पण आता झाले कोरडे पण ना बसलेत खाली. गोल गरगरीत नाही राहिले. असं का बरं होतं.

लाडु वळल्यावर फ्रीजमधे ठेवले तर गोल होतील. बेसन भाजताना, पाक करताना एकाग्रतेची कसोटी लागते. तसा अधून मधून पाक करायची प्रॅक्टीस करायला हरकत नाही. वाया जात नाही, सुधारस करता येतो. लिंबू सरबत वगैरे करता येते. चहात साखरेच्या जागी वापरता येतो. (पुर्वी लग्नाच्या जेवणात, जिलेबीचा उरलेला पाक अळूच्या पातळ भाजीत ओतत असत !!! )

पक्का पाक चमच्याने पाटावर ओतून लॉलीपॉप करता येते. हा पाक ताणून त्याच्या रेवड्या करता येतात. शोभेची फुले वगैरे करता येतात.

पुर्वी लग्नाच्या जेवणात, जिलेबीचा उरलेला पाक अळूच्या पातळ भाजीत ओतत असत !!! >> हो आणि त्यामुळे त्या आळुच्या फदफद्याची चव म्हणजे खीर बरी इतकी गोड असायची Sad अजुनही काही लोक भाजी करताना तेवढीच साखर आणि गुळ घालुन भाजीचे वाटोळे करतात.

जबरी !! माझी आज्जी पण भारी करते एकदम नारळी पाकाचे लाडू... दरवेळी मी इथे येताना घेऊन येतो... पहिल्या २/३ दिवसातच संपतात ते.. Happy

मस्तच...शाही रवा खोब-याचे लाडू बघुन तोंडाला पाणी सुटलं.
मी ही आत्ताच रव्याच्या लाडवांचं मिश्रण मुरत ठेवलयं.. आधी पाक जास्त झाल्यामुळे तुम्ही सांगितल्याप्रमाणे थोडा रवा भाजून मिश्रणात मिसळला आहे. आता चांगले वळता येतील असं वाटतयं.

वर दिलेल्या प्रमाणात मी चमचाभराचाही फरक केला नाही. (फक्त तूप कमी टाकलं कारण लोणी कढवायचं राहिलं होतं.) कृती देखिल तंतोतंत पाळली. (वाटीभर पाक तेवढा काढून ठेवायला विसरले.) अगदी एक उकळी आल्यावर पाकाला आचेवरून काढून रवा-खोबरं मिश्रण घातलं आणि दोन तास मुरू दिलं. जन्मात कधीही पाकाचं काही जमणार नाही असं वाटत असताना लाडू चांगले जमले. फ्रिजमधे ठेवलेत. वरून कोरडे आणि आतून ओलसर, मऊ झाले आहेत. (असेच असायला हवेत की नाही ते माहिती नाही.)

मायबोली आणि आर्च, दिनेशदा, मनु वगैरे सारखे माबोकर जिंदाबाद!!!

दिनेश, मृ , लाडू खूप छान दिसत आहेत.
सुरवातीला मला पण त्या पाकाचं टेंशन यायचं मग कंडेंस्ड मील्क +रवा +ओल खोबर वापरुन करायचे.

मृण्मयी, हो तसेच व्हायला हवेत हे. आत काजू ठेवल्याने, आत पण फ़ार ओलसर रहात नाही.
सगळ्या मायबोलीकरांकडे यावर्षी हे लाडू तर. मायबोली झिंदाबाद !!!

मस्त आहे दिनेशदा, मी पण करणारे,
माझे मादच्या वर्षी खुपच घट्ट झालेले, पाकाचा अंदाज चुकल्या मुळे (हातोडीने फोडुन खायची वेळ होती,)

मला पहिल्याच वेळेस एकदम ५०-६० लाडू करायचे नाही आहेत. चुकले तर काय करा?
सगळ्या प्रमाणाना ४ ने भागून (१ कप रवा, पाव कप खोबरे, पाव कप तूप, पाऊण कप साखर) असेच १२-१५ लाडू होतील का?
तसच पाऊण कप साखरेचा पाक करायचा असेल तर पाणी किती घ्यायचे?

माझे लाडू यशस्वी!! दिनेश, मनू, अमृता अन अधिक टिपा देणारे सगळेच.. मनापासून धन्यवाद!! Happy

झेलम, मी बरोब्बर १/२ प्रमाण घेतलं. २५ लाडू झालेत. वर दिलेल्या कृतीत रवा+खोबर्‍याच्या अर्ध्या प्रमाणात साखर घेतलीये, अन साखरेच्या निम्मं पाणी घातलय. तुझ्याकडे मोजमापाचा कप असेल तर त्यात मोजून घे.

या पद्धतीने केलेत लाडू आणि मस्त झालेत!!! फक्त थोडा पाक काढून ठेवायचं विसरली बाकी तंतोतंत रेसिपी फॉलो केली. पहिल्यांदाच लाडू केलेत आणि ते छान झालेत. दिनेशदा धन्यवाद! सर्वांच्या टीप्स पण छान आहेत.
सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!

Pages