रवा आणि खोबर्‍याचे लाडू

Submitted by दिनेश. on 12 October, 2009 - 02:01
rava khobare ladu
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ तास
लागणारे जिन्नस: 

चार कप बारिक रवा, दोन कप बारिक वाटलेले ओले खोबरे ( एका मध्यम नारळाचे एवढे होते)
एक कप तूप, तीन कप साखर, मोठी चिमूट केशर (किंवा हवा तो स्वाद ), बेदाणे व काजू
(आवडीप्रमाणे )

क्रमवार पाककृती: 

जाड बुडाच्या भांड्यात थोडे तूप घालून रवा भाजायला घ्या. फ़ार गुलाबी करायचा नाही.
शक्य असेल तर खोबरे वाटताना फ़क्त शुभ्र भाग घ्या (मी आळस केला ) रवा भाजत आला
कि त्यात खोबरे घाला. परतत रहा, रवा परत हाताला हलका लागला पाहिजे ( खोबर्‍याचा
ओलेपणा रहायला नको. ) लागेल तसे तूप घालत रहावे.
दुसर्‍या भांड्यात साखर आणि दिड कप पाणी घालून पाक करत ठेवा. सतत ढवळत रहा.
पाकातच केशर किंवा वापरत असाल तो स्वाद घाला. उकळी येउन फ़ेस आला कि गॅस मंद
करा. पाकातला चमचा वर काढून, थोडासा पाक अंगठा आणि पहिले बोट यांच्यामधे धरुन
बोटे हळूहळू लांब करा. एखादी तार दिसायला लागली कि गॅस बंद करा व अर्ध्या कपापेक्षा
थोडा जास्त पाक काढून ठेवा. मग पाकात रव्याचे मिश्रण घालून ढवळा.
दोन तीन तास झाकण न ठेवता मुरु द्या. मग लाडू वळायला घ्या. मिश्रण कोरडे वाटले तर
काढून ठेवलेला पाक कोमट करुन लागेल तसा मिसळा. (रवा किती जाड आहे, यावर किती
पाक लागेल, ते ठरते ) मिश्रण हाताला शिऱ्यापेक्षा थोडे घट्ट लागेल, इतका पाक घाला. लाडु
वळताना, हवे तसे बेदाणे व काजू वगैरे वापरा. (मी भाजलेला काजू लाडूच्या आत ठेवलाय, त्याने
लाडवाचा ओलावा कमी होतो. )

मला रव्याचे लाडू मऊसर आवडतात. (तसे नसले तर रांगोळीचा लाडू खाल्यासारखा वाटतो मला.)
हा लाडु मऊसर होतो. फ़ारसा टिकणार नाही, पण चवीला मस्त लागतो. (फ़्रीजमधे आठवडाभर
राहील. ) या प्रमाणात ५० ते ६० लाडू होतात. (कपाच्या आणि लाडवाच्या आकारावर अवलंबून )

वाढणी/प्रमाण: 
५० ते ६० लाडू होतील.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा,
खुप खुप धन्यवाद! लाडु खुपच छान झाले आहेत.

पाककृती जशी दिली आहे त्याप्रमाणेच सगळे केले, फक्त साखरेचे प्रमाण रव्याच्या अर्धे घेतले.

लाडु चवीला छान झाले आहेत पण आपण फोटोत दाखवल्याप्रमाणे बाहेरुन तुकतुकीत झाले नाहियेत, खोबर्‍यामुळे असेल का?

सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!

माझ्याकडे खवणी नाही म्हणून मी खोबरे वाटून घेतले. ( आता हे सिक्रेट ठेवले, म्हणून माझ्यावर रागवायचे नाही बरं ) म्हणून ते तुकतुकीत झाले असावेत.

फ्रीज मुळे लाडू वाचले. अप्रतिम झालेत. दिनेशदा, मनु आणि सगळेच - टिपांबद्दल धन्यवाद. खुन्नस खाऊन दोन लॉट केलेत. लेकीनी एकावेळेस दोन लाडू पाहीजेत म्हणून रडून गोंधळ घातला यातच काय ते आले.
एकदा आधी लिहील्याप्रमाणे मिश्रण कोरडं झालं, दुसरं ओलं झालं जास्त. दिवाळी संपल्यावर पुन्हा करुन पाहणार आणि आता रेग्युलरली करणार. पाकाची तार तर मला दोन्ही वेळा दिसलीच नाही. Happy
पण कधी ना कधीतरी जमेल या आशेवर रिसर्च करणार.
मनापासून धन्यवाद. Happy

रैना माझही आधी sad mixture झालं, घट्ट झालं. माझ्याकडे जाड रवा होता आणि बारिक रवा दुकानात मिळाला नाही म्हणून पाकाचं प्रमाण चुकलं असेल. पण नंतर मे चमचा चमचा गरम पाणी ताकून मिश्रण मऊ बनवलं आणि लाडू वळले.
म्हणजे troubleshooting करता आले.
बाकी चव rocks!

पहिल्यांदा पाकातले लाडु जमले मला Happy

अर्थात पाक बहुतेक थोडा जास्त झालेला. Happy आधीच्या एकसोएक वाईट अनुभवांमुळे पाणी थोडे जास्त घेतलेले. (तरी आधीच अर्धा कप काढुन ठेवलेला (आता त्याचे काय करु???) )

मिश्रण थोडे सैलच राहिले दोन्-तिन तासानंतरही. मग सरळ फॅन सुरू करुन खाली बसले, लहान लहान गोळे केले. सगळे करेपर्यंत मिश्रण वाळले. मग तुपाचा हात लाऊन त्या गोळ्यांचे मस्त गुळगुळीत लाडु बनवले. चव तर अतीसुंदर आलीय. दिनेशनी लिहिल्याप्रमाणे वेलचीबरोबर वाटताना छोटासा दालचिनीचा तुकडा आणि एक लवंगही टाकली होती.......आता खायला या सगळ्यांनी Happy

दिनेश तुमचे अगदी मनापासुन आभार.

सेम पिंच अ‍ॅश. मला पण पहिल्यांदाच पाकातले लाडू छान जमलेत.
धन्यवाद दिनेश, लाडूची चव मस्तच झाली फक्त रंग पांढराशुभ्र नाही आला(रवा कच्चा राहील या भीतीने किंचित जास्त भाजला गेला).
आणी इतर माबो करांना सुद्धा धन्यवाद, सगळ्यांच्या टिप्स शिवाय लाडू जमले नसते. Happy

मला पण पहिल्यांदाच पाकातले लाडू छान जमलेत.
धन्यवाद दिनेश. तुमचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत......
फ्रोझन खोबरे वापरल्यामुळे कशी चव लागेल अशी भिती वाटत होती...पण चव एकदम छान लागते आहे

अरे आभार कसले ?
लाडुची कूळकथा वाचलीय का ?
पोटभरीचा, हाताळायला सोपा आणि मुख्य म्हणजे, सरळ हातात देता येण्यासारखा पदार्थ आहे हा. ( म्हणजे वाटी, बशी वगैरे लागत नाही. ) असा सोयीचा प्रकार म्हणून लाडू निर्माण झाला.
आणि हा लाडू खाताना अजिबात फुटत नाही.

काल मी हे लाडू करायला घेतले. पाकात रवा घातला तेंव्हा शिर्‍यासारखे दिसत होते. पण २ तासानंतर ते मिश्रण एकदम कोरडे झाले आहे. सगळा भुगा भुगा दिसतो आहे. Sad
रवा अगदी बारिक होता. पंखा लावला नव्हता. तरी असे कसे झाले असेल?
बरे, आता त्याचे करता येईल? चवीला व्यवस्थित गोड आहेत. अजून पाक घातला तर फारच गोड होतिल.

आदिती ,तुम्चा पाक कमी झाला असावा.
किवा रवा जस्त भाजला गेला अस्एल तर तो पाकात जस्त फुगुन येतो. म्हणून कमी पडला असावा. गरम दुधाचा हबका मरून बघा. पण यामूळे फार काळ लाडू बाहेर टिकणार नाहीत.

धन्यवाद प्राजक्ता आणि तोषवी. गरम दुधाचा हबका मारुन लाडू फारच छान झाले आहेत. आता फ्रिजमध्ये ठेवते. ३-४ दिवस तरी टिकतील ना?
बहुतेक रवा जास्त भाजला गेला होता.

हे लाडू गेल्या तीन आठवड्यात दुसर्‍यांदा केलेत . मस्त लागतात . माझे लाडू आत्तापर्यंत जरा कडक होत असत , पाक कमी पडत असावा . पण ह्या पद्धतीने छान मऊ होतात . थँक्स दिनेशदा .

रमणी , राघवदास लाडू छानच लागतात, पण ते वेगळे. त्यात बेसनपण असते.
आभार संपदा, मला हल्ली कठीण पदार्थ सोपे करायचा छंद जडलाय बहुतेक. पुर्वी असे पदार्थ खुप दिवस टिकावेत, प्रवासात उपयोगी पडावेत, आल्या गेल्याला, बाळ गोपाळाना, लेकी सुनाना द्यावेत अश्या दृष्टिने टिकाऊ केले जात असत. आपल्याला तेवढा संयंम कुठला ?

दिनेशदा पहिल्यांदा लाडू केले तेही पाकाचे आणि छान झाले..संपले सुध्दा.. Happy

तुम्ही केलेल्या लाडवांसारखे वरुन मऊ काही दिसत नव्हते बहुदा मी जाड रवा वापरला म्हणुन कारण नारळ मी मिक्सर्मधुन काढलं होतं..

पण ओवरऑल छानच झाले..

खुप खुप धन्यवाद..

माझे लाडुचे मिश्रण पाक पक्का झाल्यामुळे कडक झाले आहे.आता वर काहीजणींचे अनुभव वाचून त्यात चमचा चमचा गरम पाणी किंवा दुधाचा हबका मारून बघते..

>>>>दुसर्‍या भांड्यात साखर आणि दिड कप पाणी घालून पाक करत ठेवा. सतत ढवळत रहा.
पाकातच केशर किंवा वापरत असाल तो स्वाद घाला. उकळी येउन फ़ेस आला कि गॅस मंद
करा. पाकातला चमचा वर काढून, थोडासा पाक अंगठा आणि पहिले बोट यांच्यामधे धरुन
बोटे हळूहळू लांब करा. एखादी तार दिसायला लागली कि गॅस बंद करा

लाडू करताना हा भाग अगदी तंतोतंत पाळला की लाडू उत्तम होतो. मी पण याच कृतीने आयुष्यात पहिलून पाकातले लाडू केले आणि काही न बिघडता चांगले झाले. तसंच महत्त्वाचं म्हणजे इलेक्ट्रिक कॉइलवर भांडं ठेवून पाक करत असाल तर पहिला बुडबुडा दिसताक्षणी बर्नर बंद करून भांडं उतरवऊन घ्यायला लागतं, नाही तर उरलेल्या आचेवर पाक आणखी घट्टं होतो.

अजुन एक - अगदी थिक बॉटमचे स्टीलचे भांडे असेल तरिही पाक पक्का होत रहातो असे निदर्शनास आले आहे Happy तेव्हा ते एक सांभाळा Happy

ह्या वर्षीही हे लाडू मस्त जमलेत!! किपर आहे ही रेसिपी. दिनेशदा, मनू आणि अमृता, तिघांच्याही टिप्स मस्त आहेत.

तसेच पाकासाठी http://www.maayboli.com/node/6445 ह्या धाग्यावर छान माहिती आहे.

माझे एक्दम आवडते लाडू. मी सरळ एकतारी पाक करते....रुचिरातली रेसिपी फक्त साखर चार वाटीला , तीन वाट्या आणि एक वाटी नारळ. या दिवाळीत झक्कास झाले. ४० एक लाडू दणादण संपले.

Pages