कुल्फीच्या बिस्किटचे पापलेट - २

Submitted by हायझेनबर्ग on 28 July, 2018 - 06:47

कुल्फीच्या बिस्किटचे पापलेट - १

शाळा सुरू होऊन तब्बल तीन महिने झाले होते. कुल्फी आणि पापलेटबरोबर सगळेच दिवस एकदम हसी-खुषीत चालले होते. शिकवायचे तास सोडून ऊरलेला शाळेतला वेळ म्हणजे आमच्यासाठी 'ऊंट के मुंह में जीरा', कधी कधी म्हणून पुरा पडायचा नाही गुफ्तगू करायला. दिवसभर आम्ही तिघिंनी कितीही गपशप केली तरी संध्याकाळी घरी जातांना वाटे काहितरी आपल्या पोटात तसेच राहिले आहे जे सांगायचे राहूनच गेले. मग ते रात्रभर पोटात सांभाळतांना मला मोठी मुष्कील पडत असे. त्या गडबडीत पापलेटच्या जुबानीतून येऊन माझ्या जुबानीत अडकलेले काही मैले अल्फाज अम्मी-अब्बू समोर माझ्याही नकळत माझ्याकडून निसटून जात आणि अम्मी 'हाय अल्ला...ही कशी नापाक तालीम मिळतेय ह्या मुलीला.. लहेजा तर बघा किती बिघडलाय हिच्या बोलण्याचा. मदरशात जात होती तेव्हा कित्ती गुणाची होती माझी पोर.' असे अब्बू समोर मला फटकारत. मी पटकन माझी जीभ चावलेली बघून अब्बू दाढीतल्या-दाढीत तेवढे हसत, पण मला काही न बोलता ते अम्मीलाच म्हणत..'तुम्ही तिच्या मागे एवढा जीव नका काढू बेगम, बच्ची आहे ती अजून'. झाले, अब्बूनी असे म्हणायची देरी की मग आमच्या घरावर शामतच येत असे. अम्मीची जुबान अमजद दर्जीच्या कैची सारखी जी चालू पडे ती चार तागे कापड फाडून 'खूप झाले स्कूल-बिल ऊद्याच हिच्या लखनौच्या खालाला खत पाठवून मी अशफाकमियांशी हिच्या निकाहाची बात चालवते कशी' असे म्हणूनच थांबत. अश्या वेळी मी माझं पुस्तक घेऊन दादाजानच्या खोलीत पळून जाई आणि थेट अब्बूंनी झोपायला हाक मारल्यावरच पुन्हा बाहेर येई.
पण मला वाटते अम्मीने लखनौच्या खालाला कधी खत पाठवलेच नसावे. मंदिरापासून ईनायत चुडीवाल्याकडे न जाता ऊलटी वाट पकडली की पन्नास पावलांवरच होता डाकखाना आणि अजून शंभरेक पावलावर निहालगंज रेल अड्डा. आमच्या घरून टांग्याने रेल अड्ड्यावर जायचे म्हंटले तर मग मोठा हमरस्ताच पकडावा लागे. अम्मीने तिची डाक टाकण्याचे काम माझ्याकडेच तर लाऊन दिले होते. तिने लखनौला खत पाठवायची धमकी दिली की मग पुढचे काही दिवस तिने लिहिलेले हरेक खत आणि त्यावरचा पत्ता नीट तपासून पाहण्याचे कामच मला माझ्या डोक्यावर येऊन पडल्यासारखे होई. अल्लाकसम, लखनौला जाणारे खत दिसले तर आपण त्याचे काय करायचे हे मला ठाऊक नव्हते पण असे खत कधी दिसलेच नाही. तो कोण काळा की गोरा अशफाकमियांही खरच होता की अम्मीने मला घाबरवण्यासाठी बुजगावणे ऊभे केले होते? अल्ला जाने! ह्या अशफाकमियांची एकदा मालोमात करण्याची माझी ईच्छा होती खरी, पण ह्याबाबतीत मी कुल्फीची नसीहत मानत असे. तिचा ऊसूल होता म्हणे.. 'जो वास आपल्याला आवडत नाही त्याच्या मागावर कधीच जायचे नाही. नाही तर मग तो वास भुतासारखा आपल्या रुहवर कब्जा करून बसतो'. कुल्फीचे रूह वगैरे बोलणे मला फार काही कळत नसे पण न जाणो अशफाक मियांचं भूत माझ्याच मानगुटीवर बसलं तर? कुल्फी दिवसातून असे पंचवीस तरी ऊसूल आम्हाला ऐकवत राही आणि आम्हीही ते पाळावेत असा आग्रह धरी. पापलेट बिचारी कुल्फीने सांगितलेले ईमाने ईतबारे ऐके पण मी कुरबूरत एखादाच ऊसूल पाळला तर पाळे नाहीतर नाहीच.
भुतावरून आठवलं, मला वाटतं आमच्या शाळेत भूत आहे आणि ते आम्हा सगळ्या मुलींवर नजर ठेऊन असते. त्यादिवशी एका टळटळीत दुपारी अम्मीने डब्याला बांधून दिलेले खिम्याचे पराठे आणि दही खाल्ल्यानंतर मी अगदी मन लावून ईतिहासाच्या तासाला नफीसा मॅडमचं शिकवणं ऐकत होते. त्या 'लेडी नूर सुलताना' बद्दल सांगत होत्या.. - 'लेडी नूर सुलताना ने गोर्‍या साहिबाविरूद्धं ईन्किलाबची एवढी जोरदार जंग छेडली की तिला लोक सुलतान-ए-जानूब टिपू ची बाजी सुलताना-ए-शामल नूर म्हणजे दक्खनचा सुलतान टिपूची मोठी बहीण ऊत्तरेची सुलताना नूर म्हणत. गोर्‍या साहिबाने तर घाबरून नूर सुलतानाला 'लेडी टिपू' खिताबच बहाल केला.. निहालगंजमध्ये तिचा आता खंडहार झालेला महाल आहे जिथे ती खिम्याचे पराठे बनवत असे. रात्री अपरात्री महालातून बाहेर पडून ती दही घुसळणार्‍या सैनिकांसोबत गोर्‍या साहिबाच्या अम्मीवर जासुसी करीत असे आणि....' ऐकतांना माझे डोळे एवढे जड झाले होते म्हणून सांगू. क्षणभरच माझ्या पापण्या मिटल्या असतील-नसतील, तेवढ्यात मला खिडकीपाशी डोक्यावर जिरेटोप घालून हातात भाला घेऊन घोड्यावर गस्त घालणारी लेडी नूर सुलताना दिसली. तिची डोळ्यातून अंगार ओकत माझ्यावर रोखलेली नजर बघून मला एवढी भिती वाटली की मी बिजलीचा झटका लागल्यागत एकदम ताठ होत समोर बघत बसले. जड झालेल्या पापण्यांनी पुन्हा मिटण्यासाठी एवढी फडफड सुरू केली, पण मी चुकूनही माझी नजर पुन्हा खिडकीकडे नेली नाही. तासाचा टोल पडल्यावर मी घाईघाईत कुल्फी आणि पापलेटला लेडी सुलतानाच्या भुताबद्दल सांगितले तर कुल्फी म्हणाली..'हट पागल.. भूत असले म्हणून काय झाले त्यांनाही वास असतो. खिडकीपाशी घोडा येईल आणि मला वास येणार नाही? ये नामुमकीन है जनाब. तुला वहिम झाला असणार, झोपाळू कुठची'. मग त्यानंतरही अनेक दुपारी ईतिहासाच्या आणि काही दुसर्‍या तासांना मला लेडी नूर सुलताना खिडकीपाशी माझ्यावर डोळे रोखून गस्त घालतांना दिसत राही, पण मी कुणाला सांगण्याच्या भानगडीत पडले नाही. तिचे भूत दिसले की ताठ बसायचे, डोळे मोठे करायचे आणि समोर फळ्याकडे बघायचे एवढेच मला माहित होते आणि तेवढेच मी करत राही.

दादाजान आताश्या मला शाळेत सोडायला येत नव्हते. जूनच्या महिन्यात ईद संपून शाळा सुरू झाल्यावर तीन दिवस जो मुसळधार पाऊस पडला त्यानंतर ऑक्टोबर ऊजाडला तरी एक टिपूसही निहालगंजच्या मातीवर पडलं नव्हतं. दादाजानची तबियतही आजकाल फार नासाज रहात असे. ऑक्टोबरच्या ऊन्हाचा तडाखा त्यांना सोसवत नव्हता. दिवसभर ते त्यांच्या खोलीत पडून रहात. कधी मधी संध्याकाळी अतिशय सावकाशीनं पायर्‍या ऊतरत खाली जाऊन बेकरीत डोकावत पण तेवढेच. त्यांचे बाहेर पडणे कमी कमीच होत चालले होते. मी शाळेतून येतांना कधी शाहीद जुतीवाले किंवा अमजद दर्जी किंवा कधी कोपर्‍यावरच्या फळांच्या ठेल्यावाले बागवान चाचा मला दादाजानच्या तबियतबद्दल विचारीत तेव्हा त्यांना काय सांगावे ते मला कळत नसे मग मला फार अस्वस्थ वाटत राही. बागवान चाचा म्हणत 'हे माझे कष्मीरी सेब खिलव तुझ्या बुढ्ढ्याला, टणाटण ऊड्या मारत येईल बघ माझ्यापाशी मोहल्ल्याची नयी-ताजी खबरबात काढायला... हॅ हॅ हॅ'. आणि लागलीच अखबाराच्या चौकोनी तुकड्यात दोन सेब बांधून त्याला छताला लटकलेल्या बंडलाचा धागा गुंडाळून ते पुडकं माझ्या शबनम मध्ये टाकत सुद्धा. सेबच्या एकावर एक नीट रचून ठेवलेल्या राशीतून अलगद सेब ऊचलण्याचे आणि नाकाजवळ नेत त्यांचा गोड वास जोखण्याचे चाचांचे हुनर अगदी बघत रहावे वाटे. पैशांची तर काही बातच नाही, जणू सगळा मोहल्लाच माझ्या दादाजानची जागीर आहे असे मला वाटे. चाचा वरतून पुन्हा विचारत 'आलूबुखार खातेस का बेबी? मस्त गोड तुरट आहेत बघ' मी मान हलवून नाही म्हणायच्या आधीच एक बुखार माझ्या हातात कोंबून ते ताटकळलेल्या असामीला म्हणत 'अरे अपने काझीसाब की पोती है, अपने शौकतमियां है ना, जी बेकरीवाले... ऊनकी लाडो!..बडी होनहार बच्ची है.. कहीये क्या लिजिएगा आज... अनार बडे मीठे आयें है. अपने यहा तो नही है पर ऊपर शिमला में बडी छप्परतोड बारिश हो रखी है.. वहीसे मंगाये है.... भई जन्नत का पकवान है ये... आधा दर्जन बांध दूं... सुना है आपके वालिदसाब ईस दफे हज जा रहे है....' मी घराकडे शंभर पावलं चालूनही चाचांचा मिठासभरा आवाज माझा पाठलाग करतच राही.
एखादे दिवशी दादाजानची तबियत जरा अजूनच नरम वाटली की अब्बू मला शाळेत जातांना डाकखान्याच्या पाठीमागच्या फाटकासमोरच्या डॉक्टर गुप्तांच्या दवाखान्यात जाऊन त्यांना, घरी येऊन दादाजानला बघून जाण्याचा पैगाम द्यायला सांगत. मी तिथे जाऊन डॉक्टर साहेबांच्या मेजासमोर ऊभी राहिले की ते जाड काळ्या फ्रेमच्या ऐनक मधून डॉक्टरसाब एकवार माझ्याकडे बघत आणि 'हूं! ठीक है! १२:३० बजे आऊंगा' असे आणि एवढेच एकदम सुख्या आवाजात म्हणत आणि मी मान खाली घालून मागे फिरे. तिथे एकही अल्फाज वापरण्याची मला कधी गरजच पडत नसे, डॉक्टरसाब समोर नुसते जाऊन ऊभे राहिले की झाले काम. डॉक्टरांनी आत बोलावण्याची वाट बघत बाहेर ताटकळणार्‍या ऊदास लोकांचे चेहरे मला आजिबात बघवत नसत. डॉक्टरांची दाढी नेहमीच एकदम साफ असे आणि केस मात्रं तेल लाऊन मागे ओढून एकदम नेटके बसवलेले. माझ्या अब्बूंनाही एकदा असे साफ दाढी, नीट मागे वळवून बसवलेले केस, डॉक्टरसाबसारखेच बुशशर्ट आणि पतलून मध्ये बघावे असे मला फार वाटून जाई. १२:३० वाजले की डॉक्टरसाब त्यांच्या पांढर्‍या स्कूटरवरून निहालगंजच्या हरेक बीमार बंद्याला घरी जाऊन बघून येत. मध्येच अब्बूंचे कोणी एक युनानी हकीम दोस्तही सरायगंजवरून येऊन दादाजनला बघून गेले, अब्बूंनी त्यांना तार करून बोलावले होते. ते आल्यावर दादाजानच्या तबियतवरून त्यांची भली मोठी गुफ्तगू झाली बंद खोलीमध्ये. हकीम साहेबांनी दादाजानसाठी सांगितलेले काही घरेलू नुस्खे बनवण्यात मी अम्मीला रसोईत थोडी मदत करत असे, पण त्या नुस्ख्यांचे वास मोठे विचित्र येत आणि मग मला तिथून पळून जावसं वाटे. त्यावेळी जर कुल्फी आमच्या घरी आली असती तर तिने आयुष्यात पुन्हा आमच्या घरी पाऊल ठेवले नसते. मी शाळेत आणि अब्बू बेकरीत गेले की अम्मी तासनतास दादाजानच्या ऊशाला बसून कुराण-ए-शरीफ पढत राही. दोन गोष्टी आमच्या घरात मांजरीच्या पावलांनी अलगद शिरकाव करीत होत्या - दादाजानच्या दवादारूच्या बाटल्या आणि एक बदहवास खामोशी. कुल्फीनेही विचारले होते एकदा,
'हे आजकाल कसले दवाच्या वासासारखे ईत्र लावतेस गं तू बिस्किट?'.
मग तेव्हापासून मी अम्मीच्या अलमारीत ठेवलेल्या ईत्राचा एक छोटा फाया माझ्या कमीजच्या आत लपवून ठेऊन देई. खुदा ना खास्ता कुल्फीने दवाच्या वासाला कंटाळून मला टाळले असते तर? मला तर रडायलाच आले असते.

आजकाल शाळेला जातांना वाटेवरच्या मंदिराच्या मोठ्या अंगणात मला मोठी लगबग दिसे, काहीतरी सजावटही चाललेली असे. बांबुचे एक भले मोठे काहितरी ऊंचचऊंच बांधणे चालू होते. मधून मधून घंटांचे आणि ढोलताशांचेही आवाजही येत. कधी कधी ते आवाज ईतके मोठे होत की मॅडमनी सांगितलेले आमच्या कानात काही शिरतच नसे. मग कंटाळून मॅडम म्हणत 'पुढची दहा मिनिटं तुम्ही हे फलाणा-ढिकणा मनातल्या मनात वाचून काढा पाहू'. आवाजांच्या त्या गर्दीत ते फलाणा-ढिकणा काय आहे हे प्रत्येकाला वेगवेगळेच ऐकू येई. आणि नेमकी तेव्हाच कुल्फीची चूळबूळ चालू होई. मी एक बघितले आहे, मंदिरातले ढोल ताशे वाजायला लागले की कुल्फी पछाडल्यागत करे.. म्हणजे काही बोलणेही नाही आणि काही सांगणेही नाही नुसतीच बेकरार चलबिचल. मी पापलेटला दबक्या आवाजात विचारले, 'तुला काय वाटतं? लेडी सुलतानाच्या भुताने हिला पछाडलं असावं की तिच्या घोड्याच्या?' मग पापलेट तोंडावर हात ठेऊन म्हणे 'हाफ पॅटीतल्या, बीन दाढीमिशीच्या ढेरपोट्या गोर्‍या साहिबाच्या गंज्या अम्मीच्या भुताने..ही ही ही' हे ऐकून माझाही मग स्फोटच होई आणि आम्ही दोघी मान खाली घालत दात काढत फुटलेलं हसू सांडत आणि सांडलेलं हसू सांभाळत आणखी हसत बसू ईतके की बरगड्याही दुखत कधी. कुल्फी मात्र तिच्याच तंद्रीत बेकरार होत राही आणि ढोल ताशे थांबले की मगच ताळ्यावर येत. आमचे नसीबच मोठे म्हणावे पापलेटने म्हंटलेले तिने काही ऐकले नाही, नाही तर अजून आठेक नवे ऊसूल तिने आमच्यावर लादले असते. माझे काही नाही पण तिचे ऊसूल पाळता पाळता पापलेटच्या नाकी नौ येत असत आणि ही बादशहाच्या कायम कुरबुरणार्‍या बेगम सारखी दिवसाच्या शेवटी 'आज हा ऊसूल तुम्ही ईतक्यांदा मोडला' असे हिसाब-किताब आम्हाला सांगत राही.
बेकरारी संपून शांत झाल्यावर मी कुल्फीला दोनदा विचारले, 'काय होतेय तुला? तबियत नासाज आहे का?'
तर तिचा आपला एकच एक जवाब 'आत्ता नाही..नंतर सांगेन'. तिचा नंतर कधी येणार होता अल्लामियांलाच ठाऊक. मला जर ठाऊक असते तिचा 'नंतर' म्हणजे आमच्यासाठी कयामतचा दिन घेऊन येणार आहे तर मी अल्लामियाकडे तो 'नंतर' कधीच येऊ नये अशी दुवा मागितली असती.
मग अचानक एके दिवशी शाळेत ऐलान झाले 'ऊद्या एक मोठा पाक हिंदी त्योहार आहे म्हणून मंदिरात दिवसभर मोठे जश्न आहे तर आपल्या शाळेला रुखसत असणार आहे.' अनपेक्षितपणे अचानक एका दिवसाची रुखसत मिळूनही माझे मन थोडे खट्टू झाल्यासारखे मला वाटले. घरचा बदहवासीचा मौहोल नको नकोसा वाटत असे आणि शाळेत कुल्फी पापलेट बरोबर मन छान रमत असे, पण आता नाईलाज होता. रुखसत मिळाल्याने ऊद्या शाळा नसल्याचे ऐकून पापलेटला कोण खुषी झाली होती. तिची खुषी पाहून मीही त्यात आनंद मानून घेतला. शाळा सुटल्यावर आम्ही निघालो तसे कुल्फी म्हणाली 'ऊद्या बरोबर सकाळी नवाच्या ठोक्याला ईथे शाळेत यायचं आहे दोघीनी'.
मी आणि पापलेट एकमेकींकडे बघून हसलो. मग पापलेट म्हणाली..' अरे नादान लडकी, तू ऐकले नाहीस का ऊद्या आपल्या शाळेला रुखसत दिली आहे.
'मेरी प्यारी पापलेट जान, ऊद्या रुखसत दिली आहे ते मला ठाऊक आहे पण ऐक, ऊद्याचा दिवस माझ्यासाठी मोठा खास आहे. आपल्याला एका खास मुहिमेवर जायचं आहे आणि तुम्ही दोघींनी माझ्याबरोबर आलंच पाहिजे'. कुल्फी पापलेटसमोर बोट नाचवत म्हणाली.
'अगं ही असं बिथरल्यासारखं काय करते आहे. कसला खास दिवस आणि कसली खास मुहीम?' कुल्फीच्या अरेरावीला आणि तिच्या खुफिया वागण्याला पापलेट वैतागली होती हे मला दिसत होतं. पण मी काहीही न बोलता चोरासारखी शांतपणे पहात ऊभी होते.
'ते काही मी आत्ता सांगत नाही. ऊद्या दोघीही नवाच्या ठोक्याला मला ईथे शाळेच्या मोठा फाटकाजवळ हाजिर पाहिजे म्हणजे पाहिजेच बस्स!'
'अगं आणि आम्ही घरी काय सांगायचं?' पापलेटला कळालेच नाही की हा प्रश्न विचारून तिने कुल्फीला ती येण्यास तयार असल्याची कबुली आयतीच देऊन टाकली होती.
'सांग, की आम्ही शाळेत लेडी नूर सुलतानावर नाटक बसवतो आहे, आणि तुला त्यात हाफ पॅंटीतल्या, बीन दाढीमिशीच्या ढेरपोट्या गोर्‍या साहिबाच्या गंज्या अम्मीचा किरदार अदा करायचा आहे म्हणून त्याची तालीम आहे शाळेत.' हे ऐकताच पापलेटचा चेहरा असा काही खर्रकन पडला म्हणून सांगू. मला तर हसण्याचा ठसकाच लागला आणि खूप ताज्जुबही वाटलं की तंद्रीत असतांनाही कुल्फीनं हे नेमकं ऐकलं तरी कसं?
मग आम्ही निमूटपणे मान हलवून ऊद्या सकाळी येण्याबद्दल राझी झाल्याचे कुल्फीला सांगितले. मला तर मनातून छानच वाटत होते की रुखसतच्या दिवशीही कुल्फी पापलेट बरोबर मला धमाल करता येणार आणि तीही शाळेबाहेर.
दुसर्‍यादिवशी कुल्फीने सांगितले तसे मी बरोब्बर नवाच्या ठोक्याला शाळेच्या फाटकावर पोचले.. एक मिनिट आधी नाही की एक मिनिट नंतर नाही बरोब्बर नवाच्या ठोक्याला. मला आजकाल दोन-दोन अम्मींना सफाई द्यावी लागत असे... घरची अम्मी ठीकच होती तिच्या चिडण्या बिथरण्याबद्दल मी थोडाफार अंदाज बांधू शकत असे पण ही शाळेतली..तौबा तौबा... बिलकूल अंदाज बांधता येत नसे, त्यापेक्षा निमूटपणे आपल्याला जसे सांगितले गेले आहे तसे करावे हे बरे.
नवाच्या ठोक्याला मग कुल्फीही आलीच. मी पहिल्यांदाच तिला सलवार-कमीज मध्ये बघत होते. ती घरची मोठी अमीर होती हे मला माहित होते पण तिने आज घातलेले सलवार कमीज अगदीच साधे आणि फिक्या रंगाचे होते. डोळ्यात सुरमा घातलेला नव्हता, कानात डूलही नव्हते नि नाकात चमकीही नाही, केस ही असे तसेच बांधलेले होते. मला तर एक क्षण वाटले ही आमची कुल्फी नाहीच तिची कोणी हमशकल आहे. मी ताज्जुब दाखवत तिला विचारले.. 'हे काय गं असा काय तुझा अवतार... आजारी आहेस ना?' तर तिचा मलाच प्रश्न 'हे ऊन आहे की अल्लाची भट्टी...पापलेट कुठे आहे?'
मी मनातल्या मनात म्हणाले ही आजकाल तिरसटासारखेच वागते, पण तोंडातून मात्र,'मला काय माहित? येईल की. कुठे लडाईवर जायचं आहे आपल्याला.' असे निघाले.
तेवढ्यात पापलेट आलीच. ती एवढा नट्टापट्टा करून आली होती म्हणून सांगू. गुलाबी ओठ, नाकात चमकी, स्नो पावडर, डोळ्यात सुरमा, कानात लांब झुमके सलवार कमीज मात्रं साधेसेच होते. तिला बघताच कुल्फीने असा काही डोक्यावर हात मारून घेत ऊसासा टाकला की बस्स! ते फणकार्‍यातच म्हणाली...' अरे कमदिमाग नादान लडकी, तुला मी असे नट्टापट्टा करून यायला सांगितले होते का?
त्यावर पापलेट मुरडत म्हणाली,' का काय झाले? एवढी तर सुंदर दिसते आहे मी. किती वेळ लागला माहितीये आईन्यासमोर..तब्बल अर्धा तास'
'तू काढ पाहू ते झुमके आणि ती नाकातली चमकी आधी. आणि तो सुरमा तर पहिला ऊतरव. रुमाल आहे ना तुझ्याकडे' कुल्फी घाई करत म्हणाली.
'का पण?' पापलेटचा आवाज किंचित ओला झाला होता.
'मी सांगते म्हणून' कुल्फी अतिशय जालीम होत म्हणाली.
मला बिल्कूल आवडले नव्हते कुल्फीचे वागणे पण मला बघायचेच होते ह्या वागण्यापाठीमागचा राज काय आहे. पापलेटने जेव्हा मी काहीतरी बोलावे ह्या आशेने माझ्याकडे पाहिले तेव्हा मी तिला डोळ्यांनी नुसते 'फिलहाल ती सांगते आहे तसे कर' एवढेच खुणावले.
मोठ्या अनिच्छेने आणि रडवेल्या चेहर्‍याने तिने तो तामझाम ऊतरवला आणि रुमालात बांधून ठेवला.
'मग मला 'सर से लेके पाव तक' न्याहाळून झाल्यावर कुल्फी म्हणाली, 'तू ठीकच दिसते आहेस'
चमकी, झुमके वगैरे गेहने मला फार आवडत नसत त्यामुळे मी कोणाची शादी आणि ईद असल्याशिवाय आणि त्याहीपेक्षा अम्मीने 'घाल' म्हणून माझ्यामागे दोन दिवस कटकट केल्याशिवाय ते घालतच नसे. अम्मीच्या अलमारीत माझा एक छोटासा गेहन्यांचा डब्बा होता ज्याला आतून अगदी मुलायम असे गहिर्‍या लाल रंगाचे मलमल लावलेले होते. मलमलीवरून हात फिरवतांना माझ्या बोटांना, गालांना गुदगुदी होऊन मला मोठे छान वाटे. मग मी सुटीच्या दिवशी कधीतरी तो डबा काढून त्यातले गेहने अम्मीच्या पलंगावर काढून ठेवत नुसताच मलमलीवरून हात फिरवत बसून राही.
'झाले? चला आता माझ्याबरोबर' आणि कुल्फी चालू लागली.
मग मला राहवले नाही.. मी ही जागची न हलता तोर्‍यात म्हणाले, 'थांब, आधी आम्हाला कळालेच पाहिजे तू आम्हाला कुठे घेऊन चालली आहेस?'
पुढे जाऊ लागलेली पापलेट ही पाय थिजल्यासारखे थांबली आणि म्हणाली, 'हो बिस्किटला आणि मला तू आता सांगितलेच पाहिजे आपण अश्या काय खास मुहिमेवर चाललो आहोत'
माझा तोरा आणि पाय घट्ट रोऊन ऊभ्या पापलेटला पाहून कुल्फीचा नाईलाज झालेला दिसला. आधीच ऊन्हाच्या तडाख्याने वैतागलेल्या तिच्या कपाळावर अजून दोन आठ्या पडल्या आणि आमच्या दोघींकडेही आळीपाळीने बघत ती म्हणाली, 'सांगते! पण पहिले अल्लाची कसम खा, तुम्ही मला आजिबात दुसरा प्रश्न विचारणार नाही आणि चुपचाप माझ्याबरोबर चालू पडाल. कबूल?'
मला ही कुल्फीची कसम खायची चुनौती आजिबात मान्य नव्हती. तिच्या बरोबर येण्यासाठी तिने आम्हाला अगदीच गुझारिश नाही पण निदान दरख्वास्त तरी करायला हवी. पण नाही, ती आमची ऊस्ताद आणि आम्ही तिचे शागीर्द असल्यासारखी ती आमच्यावरच अटी वर अटी लादत होती.
पण पापलेट फटकन म्हणून गेली 'खाल्ली कसम! कबूल आहे आम्हाला! आता तू सांग!'
कुल्फीने एकदा केला तेवढा पुरे होता, 'नाकबूल' म्हणत मला पापलेटचा दुसर्‍यांदा हिरमोड करण्याची ईच्छा नव्हती. मी खामोषच ऊभी राहिले.
'मंदिरात' कुल्फी एवढेच म्हणाली आणि पुढे चालू पडली. मागे मी आणि पापलेट भुताने आमच्या कानात खुसफुसल्यासारखा चेहरा करून एकमेकांच्या पांढर्‍या पडलेल्या चेहर्‍याकडे पहात राहिलो.
शाळेच्या फाटकापासून ते मंदिराच्या फाटकापर्यंत आम्ही पुढे चालणार्‍या कुल्फीच्या मागे पळत 'का पण? कशाला? असे नको करूयात, भिती वाटते, ही नादानी आहे, हा गुनाह आहे, अल्ला आपल्याला सजा देईल, आपण मरून जाऊ आणि जहान्नुम मध्ये जाऊ' असे शंभर सवाल, गुझारिश आणि दरख्वास्त आणि काय काय करीत राहिलो पण ती ढिम्मंच, एक शब्दही फुटला नाही तिच्या तोंडातून.
शेवटी मंदिराच्या फाटकाजवळ जाऊन ती थांबली आणि म्हणाली, 'देखो भई, हे जन्नत, जहान्नुम कुठे आहेत मला माहित नाही. सगळे वासच मला जन्नतही दाखवतात आणि जहन्नुम कसे असू शकते त्याची आठवणही करून देतात. ह्या मंदिरातून रोज शंभर वेगवेगळे सुगंध मला येतात... ढोल, ताशे वाजू लागले की आवाजाच्या लहरी सगळ्या शंभर सुगंधांच्या लहरींची अशी काही अफलातून मिलावट करतात की मला वेड लागतं, फार बेकरार वाटत राहतं. मी तुम्हाला म्हंटलं नव्हतं - जो वास आपल्याला आवडत नाही त्याच्या मागावर कधीच जायचे नाही. नाही तर मग तो वास भुतासारखा आपल्या रुहवर कब्जा करून बसतो - त्याचाच दुसरा मतलब - जो वास आपल्याला खूप आवडतो आणि हवाहवासा वाटतो त्याच्या मागावर आपण कधीच गेलो नाही तर आपली रूह त्या वासाला ताऊम्र गिरफ्तार राहते आणि आपल्याला बेकरार करीत राहते.- आवडेल का तुम्हाला मी हयातभर बेकरार राहिलेलं? नाही ना? मग तुम्ही माझ्यासाठी एवढं केलंच पाहिजे. माझ्याबरोबर आत आलंच पाहिजे'
कुल्फी बोलत होती आणि आम्ही दोघी एकदम गारूड झाल्यासारख्या ऐकत राहिलो. ती माझ्यापेक्षा चारपट सुंदर आणि सहापट तालेवार होती हे मला माहितच होते पण त्यापेक्षाही एका क्षणातच मला ती माझ्यापेक्षा दहापट सयानी आहे हे सुद्धा पटले. कुलुपाची हरवलेली चावी सापडल्यानंतर जसे वाटते तसे कुल्फीचे सगळे वागणे कायम तिला येणार्‍या वासांच्या ईर्दगिर्दच फिरते हेही एकदम लख्खं कळाले. माझ्यासाठी हवेत तर्हेतर्हेचे वास आहेत-नाहीत सगळे ठीकच होते. पण कुल्फीला वास दिसतात, ते तिला खुणावतात त्यांच्या मागे बोलावतात, तिला खुषी देतात, त्रास देतात, तिचा नूर, तिचे अंदाज बनवतात आणि बिगडवतात सुद्धा ह्याबद्दल माझ्या मनात आजिबातच शक राहिला नाही. नूर सुलतानाचे भूत खरंच खिडकीत आले असते तर ते मला दिसण्याआधी तिच्या घोड्याचा वास कुल्फीला नक्की आला असता ह्याचेही मला एकदम सौ फिसदी यकीन वाटले. पापलेट म्हणाली 'अगं पण आपल्याला ओळखले त्या लोकांनी आणि पकडून ठेवले तर?'
तर लगेच कुल्फी डोळे बारीक करून कोरलेल्या भुवया ऊडवत म्हणाली, 'हे बघ माझ्याकडे काय आहे? हे लावल्यावर तर तुझी अम्मी सुद्धा तुला ओळखणार नाही आणि पकडून वगैरे ठेवत नसतं गं कोणी' असे म्हणत तिने दुपट्ट्याला मारलेल्या गाठीतून नाजूकश्या बिंदींचे एक छोटे पाकीट काढले. हिंदी मुली अश्याच बिंदी लावत कपाळावर, आमच्या आजूबाजूलाही कितीतरी मुलींनी लावलेली तशी बिंदी.
आम्ही तिघिंनीही कपाळावर बिंदी लावल्यावर पापलेटला मनात मोठी गुदगुदी होऊ लागली. ती म्हणत राहिली, 'ए सांगा ना मी किती खुबसूरत दिसते? मला आत्ताच्या आत्ता हातात आरसा हवा आहे'
लगेच कुल्फी मिष्किलीने म्हणाली, 'आता हिच्यासाठी हिंदी मियांच शोधावा लागणार बघ आपल्याला...ही ही ही'
मग आम्ही तिघीही दात काढत हसत राहिलो.
मी म्हणाले, 'पण आत जाऊन करायचं काय? आणि कोणी आपल्याला काही विचारलं तर?'
कुल्फी म्हणाली, 'हे बघ ह्या मोठ्या दारातून आत गेल्यावर तो छोटा कमरा आहे ना तिथे एक बुत असते आणि तिथूनच सगळे वास येतात. आपण तिथे जायचे मी सगळे वास माझ्या रुह मध्ये साठवून ठेवणार आणि मग पाच मिनिटांनी आपण परत यायचे. झाले! एवढे आसान आहे. आपण कोणाशी बोलायचे नाही की मग आपल्याशीही कोणी बोलणार नाही. समजले?'
तुला हे बुत वगैरे कसे माहित? आणि कोणी सांगितले? वगैरे शंका विचारण्याच्या भानगडीत न पडता आम्ही माना डोलावल्या आणि आत निघालो. सगळीकडे मोठी सजावट केलेली होती, अधून मधून ढोल ताशांच्याही फैरी झडत होत्या आणि लगबगही दिसत होती. आतल्या छोट्या खोलीत तीरकमान हातात घेतलेल्या बीनादाढीच्या सुलतानाचे मोठे सुंदर आणि नक्षीदार बुत होते. कुल्फी डोळे बंद करून शांत ऊभी होती. मला मशिदीत येतो तसा फुले, तेलाचा दिवा आणि अगरबत्ती ह्यांच्याशिवाय चौथा वास आजिबात येत नव्हता. पण कुल्फीला एकशे चार तरी वेगवेगळे वास आले असणार हे नक्की. तिच्या ऊजव्या हाताला ऊभी राहून मी सुलतानाचे नक्षीदार बुत न्याहाळण्यात गर्क होते. मोठा नूर दिसला मला त्याच्या चेहर्‍यावर. मला त्याचा चेहरा फार पाक आणि डोळे रहमभरे वाटले. दादाजान नेहमी म्हणत अल्ला मोठा पाक आणि रहमतवाला आहे. लहान मुलांच्या सगळ्या ख्वाहिश सगळे अरमान तो मोठ्या खुषीने पूर्ण करतो. हा नक्षीदार सुलतानही अल्लासारखाच असावा असे मला वाटले. त्याची जुबान तर मला माहित नव्हती पण मनातल्या मनात एक कलमा पढून दादाजानच्या सलामतीसाठी दुवा मागितली. सुलतानाला ती आवडली असेल का? त्याला ती मंजूर होईल का? कळायला काही मार्ग नव्हता.
कुल्फीच्या डाव्या हाताला ऊभ्या पापलेटची नजर सगळीकडे भिरभिरत होती, ती मोठ्ठाले डोळे करून वरच्या ऊंच छताकडे बघत स्वतःभोवतीच गोल फिरत होती.
तेवढ्यात हातात थाळी घेऊन भगवी कफनी घातलेले मौलवी बाबा पुढे आले आणि म्हणाले,
'हं! नीट हात जोडा गं पोरींनो, आज दसरा आहे ना. रामरायाने रावणाचा वध करून सितामैयाला त्याच्या कैदेतून सोडवले, म्हणजे मोठा पवित्र दिवस म्हणायचा की नाही आज. हं घ्या घ्या प्रसादाचा लाडू घ्या.. करा पाहू हात पुढे.. जरा अजून पुढे करा गं.. किती वाकवणार ह्या म्हातार्‍याला? आणि कुणाच्या घरच्या गं तुम्ही मुलींनो? पूर्वी कधी पाहिले नाही तुम्हाला मंदिरात.'
झाले! मौलवी बाबा स्वतः बोलत होते तोवर ठीक होते. पण त्यांनी आम्हालाच विचारले 'आम्ही कोण?' तेव्हा आम्ही तिघीही एकदम सटपटलोच. कुल्फी आणि पापलेट नुसतेच डोळे मोठे करून मौलवी बाबांकडे टकमका पहात राहिल्या. माझ्याही मानेवरून भर ऊन्हाळ्यात बिच्छू रेंगल्यासारखी भितीची लहर सरसरत गेली. काय बोलावे काय सांगावे? काही सुचेना. मौलवी बाबांकडे बघतांना मला दादाजानची भयंकर आठवण झाली आणि मग का कोणास ठाऊक अचानक डॉक्टर गुप्ताच आठवले. माझ्या तोंडून मी आजिबात होठ न हलवताही 'डॉक्टर गुप्ता, मेहमान' असे काहीतरी पुटपुट निघाले. माझी ऊर्दू जुबान आज माझा घात करणार अशी भिती मला राहून राहून वाटत होती.
'अच्छा! डॉक्टर गुप्तांकडे आलात का तुम्ही? आणि मेहमान काय म्हणता? आम्ही डॉक्टर गुप्तांकडे पाहुण्या आलो आहोत असे म्हणावे. कुठे आहेत बरं डॉक्टरसाहेब रोज तर येतात साडेनऊ पर्यंत..ऊशीर झाला का आज त्यांना?' यावेळी काहीच बोलायचे न सुचल्याने मी हुं की चूं केले नाही.
'बरं आता सरका पाहू तुम्ही थोडं बाजूला, बघा तुमच्या मागे किती लोकं खोळंबलीयेत रांगेत दर्शनाला...' म्हणत त्यांनीच हातातल्या थाळीसहित आपला मोर्चा दुसरीकडे वळवला.
मी मागे वळून बघितले तर वीस तरी बंदे रांगेत आमच्याकडे नजर लाऊन आम्ही सरकण्याची वाट बघत ऊभे होते. रांगेच्या शेवटी काळ्या फ्रेमचा ऐनक आणि बुशशर्ट-पतलून मधल्या डॉक्टर गुप्तांना पाहून तर माझी बोबडीच वळायची बाकी होती. मी पटकन कुल्फीचा हात करकचून दाबला आणि म्हणाले 'बाहेर पळ ईथून लवकर नाहीतर तुझ्या नाकाच्या खिदमतीत आज आपण ईथेच मरून जाऊ.' आणि मग आम्ही तिघींनीही तिथून जी धूम ठोकली ते थेट फाटकाच्या बाहेर येऊनच दम खाल्ल्ला.
मौलवी बाबा आमच्या मागून 'संध्याकाळी रावणदहन बघायला या बरंका मुलींनो.. मोठा प्रसादही मिळेल' असे काहितरी मोठ्याने म्हणत राहिले. पण नीट काही ऐकू आले नाही कळाले तर त्याहूनही नाही. बाहेर आल्यावर आधी श्वास घ्यावा की आधी हायसे वाटून घ्यावे की आधी हसावे अशी काहीतरी विचित्र आवस्था झाली आमची तिघिंची. हसून हसून झालेली पोटदुखी ओसरल्यावर मला एकदम घराची आठवण आली आणि घरी जावेसे वाटू लागले. मला वाटले घरातली बदहवासी अचानक हटून गेली आहे आणि दादाजान ऊठून दाढीला मेंदी लाऊन घ्यायला तयार बसले आहेत. बदहवासी घरात होती की माझ्या मनात ह्याचा ही फैसला होत नव्हता.
कुल्फी म्हणाली. 'आत सुगंधांचा खजानाच मिळाला मला.. आज माझी रूह कित्ती तरी दिवसांनी आजाद झाली. पळायच्या आधी एकशे चार तरी वेगवेगळे नवे वास मोजले मी. बहोत शुक्रिया मेरे शेर दोस्तों आज तर माझी जान-कुर्बान आहे तुमच्यावर'
पापलेट म्हणाली, 'वा रे!आली मोठी शेर दोस्त म्हणणारी! तू तर आम्हालाच कुर्बान करून टाकलं होतंस ... बिस्किट होती म्हणून वाचलो आपण. बिस्किटच आता आपली लेडी नूर सुलताना आहे... ही ही ही. तुझ्या ह्या उंची नाकासाठी ना मी एक गाणं बनवलं आहे....जरा कान ईधर तो दिजिये मोहतरमा...
'आईंयेsss मेहेरबां... सुंघिये जानेजां.. नाकसे लिजिये जीssss..... मुष्क के ईम्तिहांsss...आईंयेsss'
ते गाणं आणि त्यावर पापलेटची अदाकारी बघून आम्ही पुन्हा पोट दुखेस्तोवर हसलो. तिथून घरी परततांना पोटात केवढीतरी भूक लागली होती माझ्या, पण मला की कुल्फी म्हणते तसं माझ्या रुहला एकदम हौसला बुलंद झाल्यासारखंही काहीतरी वाटत होतं.

-- क्रमशः

कुल्फीच्या बिस्किटचे पापलेट - ३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बर्‍याच वर्षांनी सासरी जबलपुरला आले. जवळच्या राममंदिरात सकाळी मुलाला आणि दीराच्या मुलीला घेऊन गेले होते तेव्हा परिसर आणि मंदिरातले वातावरण पाहून ही कथा पुन्हा आठवली, कथेतल्या मंदिरातच आल्यासारखे वाटले.
वेळ मिळाला तर सगळे भाग परत वाचेन.

सगळ्यांना दसर्‍याच्या शुभेच्छा. ईथे एमपीत दसरा आणि रावणदहन ऊद्या आहे.

अप्रतिम , प्रेमातच पडले मी कुल्फी बिस्किट आणि पापलेट च्या. सलग दोन भाग वाचले, मला पण सगळ्यांनी लिहीलय तशी भिती वाटतेय पुढे काय होईल. (दु:खांत?)
वाचतेच आता.

ही संपूर्ण कथा इतकी गोड आहे. खरच लहान मुलगी झाले आहे आणि कुल्फी, पापलेट व बिस्कीटबरोबर बागडते आहे असे वाटत रहाते.

Pages